मूर्त दृश्याला अमूर्ताकार देणारा चित्रकार

रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्रकलेचा वेध

रवींद्रनाथांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे स्मरण आम्हा भारतीयांना अनेक संदर्भात होत असते. ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण जीवन जगले. सौंदर्योपासकता हा त्यांचा स्थायीभाव होता. साऱ्या आसमंताकडे ते सौंदर्यासक्त दृष्टीने पाहत असत. निसर्गातील प्रत्येक घटकाशी त्यांचे ममत्वाचे नाते होते. त्यांच्या प्रतिभाधर्माचा मूलस्रोत तोच होता. शिवाय मानव आणि धरातलावरील त्याचे जीवन हा त्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि निरंतर चिंतनाचा विषय होता. ते जनसंपर्कापासून फार नव्हे पण तरी किंचित दूरच राहिले. ते एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. बोलपूर येथील शांतिनिकेतनाच्या परिसरात नवनिर्मितीच्या कार्यात ते सतत मग्न असत. कोणती अंतःप्रेरणा त्यांच्या सर्जनात्मकतेला आवाहन करीत असेल बरे?

भारतीय प्रबोधनपर्वाचे अपत्य असलेल्या रवींद्रनाथांनी वाङ्‌मयाचे क्षेत्र आपले मानले. त्यांनी कविता, कादंबरी, कथा, कथिका/लिपिका (म्हणजे अगदी लहानशा कथा), नाटक, ललितरम्य प्रवासवर्णने, छिन्नपत्रे असे वेगवेगळे वाङ्‌मयप्रकार हाताळले. त्यांनी तत्त्वचिंतनपर लेखन केले. भारतीय शिक्षणप्रणालीविषयी आपली मते स्पष्टपणे मांडणारे निबंध लिहिले. इतिहासाचा डोळस वृत्तीने मागोवा घेतला. साहित्य, चित्रकला, संगीत, नाटक, स्थापत्य, शिल्प यासारख्या कलांचा लेखनातून परामर्श घेतला. ते स्वतः चित्रकार, संगीतकार आणि गायकही होते. स्वातंत्र्यलढ्यातही ते सहभागी झाले. युरोप, चीन, जपान यासारख्या देशांना त्यांनी भेटी दिल्या आणि आधुनिक काळातल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीला विशेष चालना दिली. संस्कृतीचे सर्वंकष चिंतन करणारा त्यांच्यासारखा महामानव राष्ट्रीय उत्थानाच्या काळात आम्हाला लाभला ही अभिमानाची बाब आहे. पारतंत्र्याच्या काळात हा नवनिर्मितीचा ध्यास घेतलेला हा प्रज्ञावंत जन्मला. आणि नावाप्रमाणेच तो अंधकारयुगातील रवींद्र ठरला.

ते उत्तम चित्रकार होते. बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची गोडी होती- विविध प्रकारची रेखाटने ते करीतच होते. पण वयाच्या पासष्टाव्या वर्षापासून त्यांना या कलेतला आत्मस्वर सापडला. रवींद्रनाथांना ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले. आयुष्याच्या उत्तरायणातल्या पंधरा वर्षांत त्यांच्यासारख्या परिणतप्रज्ञ प्रतिभावंताने जवळजवळ दोन हजार चित्रे काढली. रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून अमर्याद क्षितिज आपल्या कवेत घेता येईल असे त्यांना वाटले. पण म्हणून या काळात त्यांची लेखनप्रतिभा क्षीण झाली होती का? मुळीच नाही. ती परिपक्व झालेली होती. ‘प्रांतिक', ‘आरोग्य' आणि ‘शेष लेख' यासारखे जीवन-मृत्यूविषयी चिंतन करणारे त्यांचे काव्यलेखन याची साक्ष देते. उद्याच्या मानवजातीसंबंधीच्या चिंतनाचा सामर्थ्यशाली आणि स्थल-काल-निरपेक्ष मागोवा घेणारा सूक्ष्म दृष्टीने अभ्यास करून लिहिलेला 'Crisis in civilization’ हा त्यांचा शोधनिबंधही याच काळातला आहे.

रवींद्रनाथांच्या चित्रकलासाधनेचा मागोवा सूक्ष्मतेच्या पातळीवर जाऊन, अनेक अंगांनी आणि सविस्तरपणे घ्यावा लागेल. युवावस्थेत त्यांनी चांगली चित्रे काढण्याची प्रयत्न केला. त्यांनी केलेले काही प्रयत्न यशस्वीही ठरले. चित्रकलेच्या होतकरू विद्यार्थ्यांने केलेल्या प्रयत्नांसारखे ते प्रयत्न होते. विसाव्या शतकाच्या चित्रकलेच्या इतिहासात त्यांनी स्वतःचे आगळे-वेगळे स्थान निर्माण केले. स्वतःची अशी शैली निर्माण केली. भारतीय चित्रकलेतील आधुनिकतावादाचे ते प्रणेते मानले जातात. 

समांतर प्रक्रियेने त्यांनी या कलेतील आदिमतेचाही शोध घेतला. रवींद्रनाथांची चित्रकला जितकी आधुनिक आहे; तितकीच ती आदिमही आहे. आदिम याकरिता की त्यांची चित्रे त्यांच्या कवितेप्रमाणे, तत्वचिंतनाप्रमाणे उत्स्फूर्तपणे आणि अंतःप्रेरणेतून उतरलेली आहेत. निसर्गाविषयीच्या ममत्वातून आलेली आहेत. जे दिसते त्याला अमूर्ताकार द्यायला त्यांना कष्ट पडलेले नाहीत. चित्रकार या नात्याने त्यांनी कोणतीही परंपरा पाळलेली नाही. कलासंप्रदाय, शैली किंवा शैलीतंत्र यांचे अनुकरण केलेले नाही. चित्रक‌लाविषयक जुन्या संकल्पनांना ते मुळीच चिकटून राहिले नाहीत. 

कुमारस्वामी त्यांच्या चित्रकलेविषयी म्हणतात, "त्यांना हे सहज शक्य झाले याचे कारण त्यांनी आपल्या दीर्घायुष्यात खूप चित्रे पाहिली असतील, पण त्यांनी खूप चित्रे पाहिली आहेत हे त्यांच्या स्वतःच्या चित्रांतून अजिबात जाणवत नाही. ती त्यांच्या स्वतःच्या चिंतनातून आलेली आहेत. अनेकदा युरोपियन 'एक्सप्रेशनिस्ट' चित्रकारांशी रवींद्रनाथांच्या चित्रांची तुलना केली जाते. कारण त्यांच्यामध्ये लयबद्धता, सजीवता आणि गतिमान रेषेची क्रीडा आढळते. परंतु प्रत्यक्षात लेखन माध्यमावर पूर्ण प्रभुत्व असलेल्या या लेखकाच्या अस्तित्वाशीच त्याची चित्रकला निगडित आहे. साहित्यिक म्हणून वावरत असताना आलेल्या सर्जनशीलतेत त्यांच्या चित्रांचा मूलस्त्रोत आढळतो. जरी त्यांच्या चित्रकलेतील आशय आणि आविष्कार भिन्न असला तरी दृश्यात्मक वास्तवाला अमूर्त आकारात संक्रमित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत आहे. मनाने निसर्गाशी एकरूप झाल्यामुळे त्यांना मिळालेल्या अंतर्दृष्टीतून स्वतःची अशी एक अभिनव चित्रलिपी त्यांनी निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

आपल्या चित्रकलेविषयी रवींद्रनाथ म्हणतात, “My pictures are my versification in lines. If by chance they are entitled to claim recognition, it must be primarily for some rhythmic significance of an idea or representation of a fact." (Ravindranath Tagore: Philosophy Of Education And Painting: Prof. Devi Prasad, National Book Trust, New Delhi)

रवींद्रनाथांच्या चित्रकलेत प्रयोगशीलता होती. एका दृष्टीने तो त्यांच्या जीवनातलाच एक प्रयोग होता. एक चित्रकार या नात्याने स्वतःच्या कलासामर्थ्यांचा तो एक शोध होता. त्यांनी म्हटलेले आहे की, माझ्या तरुण वयात मी दीक्षा घेतली असेल तर ती लयतत्वाची - विचारातील लय, स्वरातील लय. मला कळून चुकले की लय नगण्य वस्तुजाताला वास्तव प्राप्त करून देते; अर्थपूर्णता प्राप्त करून देते. त्यांच्या या चित्रांतही लय हे प्राणतत्त्व आहे. 

आपल्या बालपणातील दिवसांकडे मागे वळून पाहताना रवींद्रनाथ म्हणतात, "मी एकाकी मूल होतो. माझ्याबरोबर खेळायला मित्र नव्हते; पण माझ्या साथसंगतीला भव्य-दिव्य जग होते. बाह्यतः दिसणारे जग म्हणजे माझ्यासारखेच एकाकी मूल आहे अशी कत्त्पना मी करू शकत होतो, दूरवरच्या क्षितिजावरच्या आकाशाच्या भव्य खिडकीतून पाहताना.”

मागाहून रवींद्रनाथांनी लोकसाहित्य आणि लोकपरंपरेतील मानवी चैतन्यशील जग पाहिले. आधुनिक जगही न्याहाळण्याची संधी त्यांना मिळाली. 1924 मध्ये त्यांनी चीन आणि जपान या देशांचा दौरा केला तर 1930 मध्ये युरोप-अमेरिकेला भेट दिली. तिथल्या म्युझिअम्समधली चित्रे पहिली. चित्रप्रदर्शने पाहिली. चित्रकलेतील प्रयोगशीलता न्याहाळली. आणि यॉर्क शहरांना त्यांनी भेटीगाठी दिल्या. नवीन प्रवाह आत्मसात केले.

1930 मध्ये आपली सून प्रतिमा हिला लिहिलेल्या पत्रात रवींद्रनाथ म्हणतात, "मी यापूर्वी चित्र कधी काढले नव्हते. एखाद्या दिवशी काढीन असे स्वप्नही उराशी बाळगले नव्हते. पण दोन-तीन वर्षांपूर्वी मी चित्रे काढायला सुरुवात केली. त्यानंतर एकाएकी विपुल चित्रे मी काढली. पुष्कळ तज्ज्ञ वाहवा म्हणायला लागले!...' या साऱ्याचा अर्थ काय? माझ्या आयुष्याच्या अंतिम अध्यायात माझ्या नियतीने मला परिपूर्तीसाठी ही सामग्री पुरविली आहे."

प्रारंभीच्या काळात रवींद्रनाथांच्या या नव्या उपक्र‌माकडे अनेकांनी काहीशा उपहासाने पाहिले, "एका श्रेष्ठ कवीची विक्षिप्त आणि निरुद्देश अशी ही रेखाटने आहेत. ही गांभीर्याने घेण्यासारखी नाहीत. खऱ्या अर्थाने कलाकृती म्हणून ती स्वीकारली जाणे अशक्य आहे " अशी प्रतिक्रिया दिली.

रवींद्रनाथांनी आपली चित्रे एका बैठकीत पूर्ण केलेली आहेत. ती तशी व्हावीत असाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्या चित्रांमध्ये विविधता आहे. आणि त्या विविधतेतून एक अंतःसूत्र आणि संगती शोधण्याचा ध्यास त्यांच्या चित्रकलानिर्मितीत आहे, तो अभ्यसनीय वाटतो. त्यांनी मानवी चेहरे रेखाटले, रंगविले. वेगवेगळ्या भावमुद्रांचे चित्रण केले. निसर्गदृश्ये, व्यक्तिरेखा, प्रतीके, आकृती, प्राणी, फुले आणि क्षणचित्रे रंगविली / रेखाटली / विलेपन केले. 

त्यांनी रेखाटनासाठी / रंगकाम करण्यासाठी जी रंगद्रव्ये वापरली त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी प्रकाशमान पारदर्शक वातावरणनिर्मितीसाठी जर्मन पेलिकन रंगात शाई वापरली. अधोरेखिते किंवा टेक्सचर्ड क्षेत्रे दाखविण्यासाठी 'ऑपिक कलर’ वापरले. तैलरंगांचा प्रयोग करून पाहिला. वॉटर कलरचे माध्यम मात्र रवींद्रनाथांना बहुधा विशेष मानवले नाही. त्यांनी आपल्या बहुतांश चित्राकृती कागदावर पेस्टल कलर, पेन आणि शाई, पेन्सिल इत्यादीच्या सहाय्याने रेखाटलेल्या / रंगविलेल्या आहेत. 

प्रतिक्षण, कोलकाता; विश्वभारती, शांतिनिकेतन आणि सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या प्रसिद्ध केलेल्या ‘रबींद्र चित्रावली’च्या चार खंडांमधून रवींद्रनाथांच्या चित्रप्रतिभेचे विलोभनीय दर्शन घडतो. ती चित्रे न्याहाळणे हा एक आनंदनुभव आहे.

- सोमनाथ कोमरपंत
somnathpant@gmail.com 
(लेखक गोवा विद्यापीठाचे निवृत्त मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ समीक्षक आणि मराठी साहित्याचे प्राध्यापक आहेत.)

Tags: चित्रकला रबींद्रचित्रावली शैली शांतिनिकेतन Load More Tags

Add Comment