कविवर्य बोरकरांचे स्मारक गोमंतभूमीत का व्हावे?

8 जुलै : बा. भ. बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने..

संस्कृतचे पध्दतशीर, औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी केलेला मेघदूतानुवाद असाच विस्मयचकित करणारा आणि आल्हाददायी स्वरूपाचा आहे. तीच गोष्ट त्यांनी लिहिलेल्या रवींद्रनाथांच्या ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ या रसमय चरित्राची. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जंत्रीवजा प्रवासाचे साग्रसंगीत वर्णन न करता बोरकरांनी त्यांच्या प्रतिभेच्या प्रकाशवाटा कुतूहलाने पण नेमकेपणाने न्याहाळल्या. ‘ये हृदयीचे ते हृदयीं’ कसे घालावे, हे कविवर्य बोरकरच करू जाणे. अशा दिव्य पुरुषाचे स्मारक कल्पकतापूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने उभारले तर गोमंतकीयांना ते प्रेरणादायी तर ठरेलच, शिवाय अन्य भारतीयांना ते तीर्थस्थल वाटेल.

कविवर्य बा. भ. बोरकर हे गोमंतभूमीत जन्मास आलेले प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व. मात्र या भूमीपुरतेच त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित राहिले नाही. त्यांच्या असामान्य कवित्वशक्तीमुळे मराठी साहित्यविश्वात त्यांची कीर्ती अक्षरश: दुमदुमत राहिली. जन्मजात प्रतिभेविषयी अभिमान बाळगून ते स्वस्थचित्त राहिले नाही; अखंडित परिश्रमशीलता हा त्यांचा स्थायीभाव होता. अविरतपणे त्यांनी केलेल्या काव्यसाधनेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत गेले. 

स्वहिताकडे वेळप्रसंगी दुर्लक्ष करून त्यांनी जीवनसंगरात धडाडीने उडी घेतली. गोव्याचा मुक्तिसंग्राम हा अटीतटीचा सामना होता. परकीय सत्तेची ती पक्की मगरमिठी माणुसकीच्या मूल्यविवेकाला कलंकित करणारी होती. ऋजू अंत:करणाच्या आणि मनस्वी कलावंताच्या पिंडाला परकीयांची ही दुष्टकृती मुळीच मानवण्याजोगी नव्हती. ‘वन्हि तो चेतवावा’… अशीच त्या काळची परिस्थिती होती. डॉ. राममनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगाव येथे सभाबंदीचा कायदा मोडून ही कोंडी फोडली. पोर्तुगीजांच्या जुलमी सत्तेला त्यांनी आव्हान दिले. अर्थातच तत्कालीन तरुणाईला ते आवाहनही होते. प्रा. लक्ष्मणराव सरदेसाई, बा. भ. बोरकर, लक्ष्मीदास बोरकर, विश्वनाथ लवंदे आणि अन्य काही तरुण हे युगमानसाच्या हाकेला ओ देणारे महत्त्वाचे प्रतिनिधी ठरले. बोरकरांचा राष्ट्रवादी पिंड, त्यांचे युगभान आणि त्यांची समाजमनस्कता त्यांच्या कवित्वशक्तीच्याच तोलामोलाची होती. घरातले थोरले भावंड आणि कर्ता पुरुष म्हणून दायित्व खांद्यावर असूनही बोरकर गोवा मुक्तिसंग्रामात हिरिरीने उतरले. ते प्रतिभावंत म्हणून मला प्रिय आहेतच; शिवाय हेही बोरकर मला भावतात.

लोकोत्तर व्यक्ती आपल्या मनाची मशागत करून आपले व्यक्तिमत्त्व अधिकाधिक संपन्न बनवीत असतात. आपण गेल्यावर आपला कीर्तिसुगंध दरवळत राहावा असा अट्टहास त्यामागे नसतो. आत्मभान आणि समाजभान या दोहोंची तरफ सांभाळत आपली जीवनसाधना त्यांनी अहर्निश चालू ठेवलेली असते. परंपरेचे संचित, वर्तमानकाळाची डोळस जाणीव आणि भविष्यकालीन पिढीविषयीची आस्था अन्‌ ममत्व घेऊनच ते वावरत असतात. मृत्यूनंतर माझे काय होईल याचा हिशोब न मांडता निरपेक्षपणे जीवन जगणे हा त्यांचा मनोधर्म. स्वत: बोरकरच या संदर्भात बोलून गेले आहेत :

मी विझल्यावर त्या राखेवर
नित्याच्या जनरितीप्रमाणें
विस्मरणाचे थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणें

असे जरी असले तरी त्यांची आत्मप्रत्ययशील जाणीव सतत जागृत असायचीच. यामुळे त्यांनी पुढीलही उद्‌गार काढले :

मी विझल्यावर त्या राखेवर
पण कोण्या अवसेच्या रात्रीं
धुळिंत विखुरल्या कविता माझ्या
धरितिल चंद्रफुलांची छत्री

जवळजवळ साठीच्या सीमारेषेवरील त्यांच्या प्रगल्भ चिंतनाची विलोभनीय प्रचिती रसिकांना आल्यावाचून राहत नाही.

खरोखरीच माणूस गेल्यावर शिल्लक राहते ती चिमूटभर राख! पण हीच जर त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता असेल तर जगायचे तरी कशाला? माणसाने उच्च ध्येय तर मनी बाळगलेच पाहिजे. आपले तत्त्वज्ञ राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तर बोलून गेले, ‘Man dies; but humanity lives.’ माणुसकीच्या मूल्यांच्या संवर्धनार्थ ‘स्मारके’ ही हवीतच. आणि ती चैतन्यमय स्वरूपात जितीजागती हवीत. तरच ती पुढीलांना प्रेरणादायी ठरू शकतील. परदेशात शेक्सपियरसारख्या प्रतिभावंतांचे भव्य स्मारक प्रेरणादायी ठरल्याचे सांगतात. आपल्याकडे मराठी साहित्यापुरते बोलायचे झाल्यास कविकुलगुरू केशवसुतांचे त्यांच्या जन्मगावी उभारलेले स्मारक हे चैतन्यकेंद्र ठरलेले आहे. तद्वत नाशिक येथील कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्मारकही देखणे आणि कार्यदर्शी ठरलेले आहे. बा. सी. मर्ढेकरांचे मर्ढे येथे सुंदर स्मारक होऊनही उद्‌घाटनाअभावी ते कार्यरत होऊ शकलेले नाही.

गोव्यातीलच नव्हे, तर मराठी कविकुलातील श्रेष्ठ कवी म्हणून गणले जाणाऱ्या बाकीबाब बोरकरांनी मराठीतील सौंदर्यवादी धारा सशक्त केली, असा निर्वाळा दिला जातो. 30 नोव्हेंबर 1910 मध्ये कुडचडे येथे ते जन्मले आणि 8 जुलै 1984 रोजी त्यांना मृत्यूने गाठले. 74 वर्षांचा त्यांचा लौकिक जीवनप्रवास. त्यांच्या अम्लान स्वरूपाच्या प्रतिभेचा पल्ला लक्षात घेता त्यांनी आणखी काही वर्षे जगायला हवे होते, असे राहून राहून वाटते. मिळालेल्या आयुष्याचे त्यांनी सोने केले, असे निर्विवादपणे म्हणावे लागेल. आपल्यामागे त्यांनी ‘समर्थ शब्दांचे स्वामी’ या नात्याने अगणित अनुभूतींचा अक्षय कुंभ भरून ठेवलेला आहे. तो कधीही रिता होणारा नाही. पुढच्या कैक पिढ्यांच्या संवेदनशीलतेचे आणि अभिरुचीचे तो पोषण करत राहील. म्हणून एका पाश्चात्त्य वाङ्‌मयविशारदाच्या शब्दांत सांगायचे झाल्यास :
‘In the republic of letters there are no tears.’ 

बा. भ. बोरकर गोमंतप्रदेशाच्या कुशीत जन्मले नसते, तर या भूमीच्या खडतर कालखंडात आमची भावसृष्टी उजाड पडली असती. ते आमच्या मनोभूमीत प्राणांची धुगधुगी निर्माण कणारे मंत्रदृष्टे कवी होते. माझी पिढी पारतंत्र्यात असताना राष्ट्रशक्तीचा प्रत्यय आणून देणारी आणि भारतीय सांस्कृतिक संचिताच्या प्राणस्वराचे सामगायन करणारी त्यांची कविता आम्हाला भावी स्वातंत्र्याचा स्वप्नसंदेश देत होती. जाणिवेच्या कोवळ्या वयात सर्वत्र दहशतीचे साम्राज्य असताना, ही भूमी गर्तेत जात असताना आमची संवेदनक्षम मने तरल धुंद हवेत सहजतेने वर उचलली जात होती. ‘विसरूं म्हणता विसरेना’ अशी ती अनिर्वचनीय अनुभूती होती… बा. भ. बोरकर जाऊनही 39 वर्षे झाली… आमच्या पिढीच्याही भावना बथ्थड होत चालल्या आहेत. त्या दिवसांत मृगसरींसारखे पहिल्यांदा आमच्या मनाच्या अंगणात पडलेले काव्यतुषार वेचताना आम्ही आनंदाने बेहोश होत असू… भावमंत्रित करणाऱ्या त्या आठवणींची ओंजळ आजही मन चिंबओले करून सोडते… तिसऱ्या इयत्तेतच या बाळकृष्ण भगवंतांच्या अक्षरब्रह्माचा साक्षात्कार आमच्या पिढीला झाला होता. 

चढवूं गगनिं निशाण
कोटि मुखांनी गर्जूं जय जय स्वतंत्र हिंदुस्थान ॥धृ॥
निशाण अमुचें मन:क्रांतीचें
समतेचे अन्‌ विश्वशांतीचें
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे हृषिमुख – तेज महान
हिमालयासम अमुचा नेता
अजातशत्रू आत्मविजेता
नामें त्याच्या मृत्युंजय हे चढवूं वरति निशाण

या भूमीवर मिरवले जाणारे परकीय निशाण आमचे नसून भारताचा तिरंगी ध्वज आपला आहे या जाणिवेच्या क्षेत्रात नेणाऱ्या या उत्तुंग प्रतिभेच्या कवीसाठी कृतज्ञतेचा एक कोपरा मी हृदयात साठवून ठेवला आहे… भावी पिढ्यांनीही अशीच भावना या महान कवीविषयी मनात बाळगावी असे मनोमन वाटते… स्मृतीपेक्षा विस्मृतीच अधिक बलवत्तर ठरावी असे हे जटिल आणि व्यामिश्र युग आहे. म्हणून बोरकरांचे जितेजागते स्मारक गोव्यात व्हावे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि त्यांच्या कवित्वशक्तीच्या स्मृती चिरबध्द व्हाव्यात!... 


हेही वाचा : बोरकरांची कविता : मराठी काव्यसृष्टीचे अक्षय लेणे - सोमनाथ कोमरपंत


18 जून 1946 रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांनी मडगावला लढ्याचे रणशिंग फुंकले. बा. भ. बोरकर त्या वेळी फक्त 36 वर्षांचे होते… घरातील ते थोरले… कर्ते पुरुष… अनेक भावंडे त्यांच्यावर अवलंबून असलेली… शिक्षकी पेशात उत्तम बस्तान बसलेले… शब्दशक्तीचे वेड मनात जोपासलेले… संस्कारबहुलत्व मनी मुरवून घेतलेले… नखशिखान्त पाश्चात्त्य वेषभूषा करणाऱ्या या तरुणाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले… या रणकुंडात राजीखुशीने त्यांनी उडी घेतली.

प्राप्त परिस्थितीत युवामनाने स्वभूमीविषयीच्या दायित्वाचे पालन कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बोरकरांनी समकालीनांसमोर ठेवला… हे लोण सर्वत्र पसरायला विलंब लागला नाही.

बा. भ. बोरकर फक्त कवी नव्हते. ते कुशल शिक्षक होते. विचारवंत होते. द्रष्टेपण होतेच… ध्येयवादाची अन्‌ कर्तृत्वशक्तीची जोड मिळाली… पुढील काळात ‘प्रजेचो आवाज’ हे वृत्तपत्र सुरू करून जागृतिपर्वाचा ओनामा त्यांनी केला… समता, ममता आणि मानवता या त्रिगुणात्मक शक्तीची उपासना करणाऱ्या गांधीजींसारख्या थोर पुरुषाविषयीची कमालीची आत्मीयता हा बोरकरांचा स्थायीभाव. अनेक मृण्मय देहांचे जीवन या महात्म्याच्या स्पर्शामुळे हिरण्यमय झाले. पण तेवढ्यापुरता बोरकरांचा जीवनप्रवास सीमित राहिला नाही. अनेक मिती असलेले, काळाच्या मुशीत घडलेले हे बहुमोल रत्न… त्यांच्या भावसमृद्ध प्रवास, त्यातील विलोभनीय वळणे न्याहाळणे, ही एक आनंदाची अनुभूती. लौकिकाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी आणि पारलौकिकाकडे पाहण्याची नि:संग वृत्ती हे दोन्ही गुणविशेष त्यांच्या अंतरंगात गुण्यागोविंदाने नांदत होते… यात कुणाला विसंवाद वाटण्याचे काही एक कारण नाही… कारण मानवी मन हे एक अजब रसायन आहे.

जीवनातील मांगल्यावर आणि शिवत्वावर त्यांची अपार श्रध्दा होती. ती अंध नव्हती. ती डोळस होती. तिला विवेकाची जोड होती. पूर्वसूरींचा वारसा जोपासणे हे त्यांचे जीवनव्रत होते. म्हणून बोरकर मनाने पूर्णत: आधुनिक असनूही विदग्ध विश्वात वावरणारे होते. त्यांच्या पोळणाऱ्या आत्म्याला प्राचीन व समृध्द परंपरेच्या प्रात:स्मरणात शैत्य लाभत होते. निरंतर काव्यसाधनेने त्यांनी ते भरपूर प्रमाणात मिळवले. रुपये – आणे – पैसे यांपेक्षा हे भिन्न अनुभूतींचे होते. हे सारे असीम सुख जळी – स्थळी – काष्ठी – पाषाणी त्यांच्याबरोबर सतत वावरणाऱ्या कवितासखीने त्यांना दिले. पु. शि. रेगे यांच्याप्रमाणेच ती केवळ मनस्विनी राहिली नाही; देहस्विनीही होऊन आली… बोरकरांच्या विविधरूपिणी कवितेचे सूक्ष्मतेने अंतरंगदर्शन घेताना या बाबीचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. या रसधुंद कवीने उन्हाचे चांदणे केले. वास्तवानुभूतीला स्वप्नमय सौंदर्यकळेचे लेणे प्राप्त करून दिले. अशा या कवीची संवेदनशीलता, सत्त्वशीलता आणि काव्यात्मकता समाजमानसाच्या अंतरंगात रिघल्यामुळे ते सतेज राहते. म्हणून त्यांची स्मृती सातत्याने जपली गेली पाहिजे. 

बोरकरांच्या काव्यधर्मी पिंडातील भारतीयत्वाचा अनुस्युत धागा मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. हे भारतीयत्व त्यांच्या आर्ष – विदग्ध प्रतिमासृष्टीतून प्रकट होते. अनेक मेधावींच्या जीवनदर्शांतून ते प्रकट होते. निसर्गानुभूती हा त्यांच्या समर्थ अभिव्यक्तीतील आलंबन विभाव. तिच्याशी या कविमनाने साधलेली एकतानता रसवृत्तींच्या विलासाची अनोखी कळा धारण करते. रसिकतेचेही उन्नयन करण्याची किमया बोरकरांना साधलेली आहे. मूल्यविवेकाविषयीचे त्यांचे आत्मभानही तितकेच मौलिक… चिंतनशीलतेचे नवनीत होऊन आलेले.

बोरकरांच्या कवितेच्या एका गाढ्या अभ्यासक डॉ. आशा सावदेकर यांनी त्यांच्या विविध गुणविशेषांचे या दृष्टीने केलेले अधोरेखन महत्त्वाचे वाटते :
‘‘भव्य, उत्कट आणि उदात्त, दिव्य यांच्या ध्यासातून गांधीनिष्ठा, मानवतावादी वृत्ती, कारुण्य अशा गुणांचा आविष्कार त्यांच्या पिंडात झाला होता. म्हणूनच इंद्रियसंवेदनांची ओढ आणि अपार्थिवाचा ध्यास यांच्या खेचीमधून त्यांच्या कवितेत एक वेगळा रंग निर्माण झाला. अनेक प्रकारची अक्षरगणवृत्ते, मात्रावर्तनी जातिवृत्ते त्यांनी सहज वापरली. ज्ञानेश्वर, तुकोबा, सोहिरोबा, रवींद्रनाथ, तांबे यांच्या आकर्षणातून त्यांची कविता फुलली. भारतीयत्व त्यांनी संस्कृती आणि तत्त्वज्ञान अशा मुळांनी शोषून घेतलेले आहे. म्हणूनच त्यांची कविता कालसापेक्ष असूनही कालातीत होऊ शकली. दु:ख, वेदना साहूनही ते कोश त्यांना जखडू शकले नाहीत. ‘हिरवळ आणि पाणी’ यांच्या प्रदेशात मांगल्यावर, शिवत्त्वावर श्रध्दा ठेवून आत्मप्रतीतीचे बोल त्यांच्या कवितेने आळवले आणि नवेपणाच्या कोणत्याही आकर्षणात न गुरफटता पिंडधर्मानुसार अस्सल देशी, भारतीय संस्कृतीची सगळी ओल कवितेतून शोषून घेतली.’’
(संदर्भ : बा. भ. बोरकर यांच्या कवितेची पृथकात्मता, पद्मगंधा प्रकाशन, पुणे. प्रथमावृत्ती : 2004)

बोरकरांच्या प्रतिभाधर्माचे समग्र सामर्थ्य डॉ. आशा सावदेकरांनी येथे संक्षेपाने पण साकल्याने तसेच मर्मदृष्टीने आकळले आहे, याचा येथे प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

बा. भ. बोरकरांनी प्रामुख्याने मराठीतून आणि कोकणीतून काव्यरचना केली. एका दीपोत्सवी संध्याकाळी सहजतेने केलेल्या सात हिंदी रचनांचे उपायन घेऊन ते आपले जिवश्चकंठश्च मित्र कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या घरी गेले. माडगूळकरांना विस्मयाचा धक्काच बसला. संस्कृतचे पध्दतशीर, औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी केलेला मेघदूतानुवाद असाच विस्मयचकित करणारा आणि आल्हाददायी स्वरूपाचा आहे. तीच गोष्ट त्यांनी लिहिलेल्या रवींद्रनाथांच्या ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ या रसमय चरित्राची. त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जंत्रीवजा प्रवासाचे साग्रसंगीत वर्णन न करता बोरकरांनी त्यांच्या प्रतिभेच्या प्रकाशवाटा कुतूहलाने पण नेमकेपणाने न्याहाळल्या. ‘ये हृदयीचे ते हृदयीं’ कसे घालावे, हे कविवर्य बोरकरच करू जाणे. अशा दिव्य पुरुषाचे स्मारक कल्पकतापूर्वक आणि योजनाबद्ध रीतीने उभारले तर गोमंतकीयांना ते प्रेरणादायी तर ठरेलच, शिवाय अन्य भारतीयांना ते तीर्थस्थल वाटेल.

याची सर्व जबाबदारी आम्हा गोमंतकीयांवरच येऊन पडलेली आहे. आत्मविश्वासाने आणि अभंग जिद्दीने आपण ती निभावून नेली पाहिजे. कोणतेही सोंग पैशांशिवाय वठत नाही, असे म्हणतात. म्हणून येथील जनसामान्यांचे दातृत्वही येथे पणाला लागणार आहे. येथील दानशूर व्यक्तींनी आपल्या श्रेष्ठ प्रतिभावंताच्या स्मारकासाठी उदारमनस्कतेने आपले धन वेचावे. त्याचप्रमाणे जनसामान्यांनीदेखील आपला खारीचा वाटा उचलावा. शेवटी हा जगन्नाथाचा रथ आहे. स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारी येथील शिलास्मारकासाठी प्रत्येक भारतीयाकडून एकेक रुपया जमा व्हावा, असे आवाहन केले गेले होते. येथेही आपली फूल ना फुलाची पाकळी गोमंतकीय संचिताचा भाष्यकार असलेल्या तुमच्या – आमच्या बाकीबाब बोरकरांसाठी द्यावी असे आवाहन याप्रसंगी करावेसे वाटते.

- सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com 
(लेखक, मराठी साहित्य समीक्षक असून त्यांनी गोवा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.)


सह्याद्री वाहिनीवर 'प्रतिभा आणि प्रतिमा' या कार्यक्रमात प्रसिद्ध झालेली बा. भ. बोरकर यांची पु. ल. देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत : 

 

Tags: मराठी कविता बाळकृष्ण भगवंत बोरकर गोमंतक साहित्य मराठी कवी गोवा मुक्तीसंग्राम Memorial ba bha borkar marathi poetry goa kokani literature Load More Tags

Add Comment

संबंधित लेख