नानासाहेब गोरे यांचे चिररुचिर ललितनिबंध लेखन

1 मे 2022 : नानासाहेब गोरे यांच्या 29 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने

नानासाहेब गोरे यांच्या ललितनिबंधलेखनातील कौशल्य कशात आहे? एकच एक घटक सांगता येणार नाही. जीवनोत्सुकता हा त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. ते समाजमनस्क आहेत. विवेकशक्तीवर त्यांची निष्ठा आहे. त्यांचे मन कवीचे आहे. म्हणूनच तर त्यांनी ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यावर आपल्या आयुष्याचा आलोक त्यांनी कवितेत गुंफला. शब्दशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झालेली आहे. गीर्वाणभारतीचे दृढ संस्कार होऊनही मराठमोळेपण त्यांनी आपल्या शब्दकळेत सामावून घेतले आहे.

नानासाहेब गोरे दीर्घकाळ राजकीय क्षेत्रात वावरले. ऐन तारुण्यात त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात धडाडीने उडी घेतली. त्यांची युयुत्सु वृत्ती अखेरपर्यंत कायम राहिली. भारताचा अभंग भाग असणारा गोमंतक अद्याप मुक्त झालेला नव्हता. पोर्तुगीजांच्या पाशवी सत्तेमुळे गोमंतकीय जनता त्रस्त झालेली होती. नानासाहेब पुन्हा एकदा तितक्याच पोटतिडिकीने गोमंतकाच्या मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. त्यामुळे त्यांना आमवदला तुरुंगवास घडला. हा झाला त्यांच्य व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा अन् उज्ज्वल पैलू.

नानासाहेबांनी सकस आणि सरसरमणीय सृजनशील साहित्याची सातत्याने निर्मिती केली, हा देखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तेजस्वी पैलू. त्यांच्या जीवनप्रवासातील ते अविभाज्य अंग. परिपूर्णतेचा ध्यास घेतलेल्या ध्येयवादी तरुणाचे प्रतिबिंब पाहावे ते नानासाहेबांच्या जीवनात. परिणतप्रज्ञ अवस्थेतदेखील त्यांची जीवनेच्छा अभंग राहिली. त्यांची संवेदनशीलता आणि प्रतिभा शेवटपर्यंत अम्लान राहिली. त्यांचा मन:पिंड मुळी सृजनशील साहित्यिकाचा. जीवनाची खडतर साधना करीत असताना साहित्याच्या परिशीलनामुळे आणि साहित्य निर्मितीमुळे आपल्या मनावर त्यांनी कोणताही तवंग येऊ दिला नाही. अनेकदा त्यांना कारावासात जावे लागले. या विजनवासात ते वाचन-चिंतन-मनन करीत राहिले. याचीच परिणती त्यांच्या वैचारिक वाङ्मय आणि ललितनिबंधांच्या निर्मितीत झाली. परिस्थितिजन्य कारणांमुळे त्यांना राजकारणात पडावे लागले खरे; साहित्यनिर्मितीत ते मग्न राहिले असते, तर विपुल आणि समृद्ध साहित्यसंपदेचे अक्षय्य लेणे त्यांनी मागे ठेवले असते. पण प्रतिभाशाली साहित्यिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत या नात्याने त्यांनी संपन्न असे अक्षरसंचित आजमितीला निर्माण केले आहे, तेही मौलिक स्वरूपाचे आहे.

नानासाहेब गोरे यांचे बालपण कसे गेले, त्यांचे भावनात्मक, वैचारिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याचे संक्षेपाने विवेचन करणे अगत्याचे वाटते. त्यांचा जन्म देवगड तालुक्यातील हिंदळे या गावी 15 जून 1907 रोजी झाला. प्रेमळ आई-वडिलांचे छत्र त्यांना लाभले. त्यांच्याविषयीच्या नानासाहेबांच्या भावना उत्कट होत्या. कोकणातील निसर्गरमणीय परिसराचे प्रगाढ संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांचा आयुष्याचा बराच काळ पुण्यात गेला तरी देवगडच्या पुळणीवर ते आपल्या बहिणीसह खेळले. शंख-शिंपले त्यांनी गोळा केले. त्या मधुर आठवणी त्यांच्या मनाच्या सांदिकोपर्‍यात कायमच्या राहिल्या. त्यांच्या अंत:करणाच्या कुहरात सागरगर्जितांचे प्रतिध्वनी उमटत राहिले. अनेक प्रकारची सृष्टीची दृश्ये त्यांनी पुढील आयुष्यात देश-विदेशात पाहिली. ते मोहून गेले. पण कोकणातील त्यांनी अनुभवलेला निसर्ग निरंतर त्यांना साद घालत राहिला. या स्मरणरमणीयतेतून ‘शंख आणि शिंपले’ सारखे प्रसन्न शैलीतील चिररुचिर ललित लेखन करण्याची अंत:प्रेरणा त्यांना झाली.

1950 हा त्यांच्या अशा प्रकारच्या लेखनाचा मूळारंभ होता. ‘सीतेचे पोहे’ हा त्यांच्या ललित लेखांचा संग्रह 1953 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यांचे ललितनिबंध लेखन दिवसेंदिवस बहरत गेले. ‘डाली’ (1956), ‘गुलबर्गा’ (1959), ‘चिनारच्या छायेत’ (1969) आणि नंतरच्या काळातील ‘काही पाने, काही फुले’ (1983) या त्यांच्या पुस्तकांत निसर्गसौंदर्य, आत्मपरता, उत्कट संवेदनशीलता आणि शैलीसुंदर शब्दकळा यांचा गुणसंगम आढळतो. हे सारे घडते ते बालपणी झालेल्या संस्कारांमुळे.

नानासाहेब पुण्यात वाढले. नाना वाड्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. एस. एम. जोशी आणि गोपीनाथ तळवलकर हे त्यांचे सहाध्यायी होते. हुशार विद्यार्थी म्हणून गोरे नावाजलेले होते. सर्वांगीण विकास व्हावा असा त्यांनी ध्यास घेतला. क्रीडांगणावरही त्यांनी यश मिळवले. खो-खो खेळात त्यांनी आपले नैपुण्य सिद्ध केले. जिमखान्यावरच्या क्रीडामहोत्सवात ते चमकले. उमदा घोडा मिळवून अश्‍वारोहणकला त्यांनी आत्मसात केली. विद्यार्थी मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात त्यांचा रांगोळीचा गालिचा सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. ते उत्तम नखचित्रे काढायचे. शिस्तबद्ध जीवनविकासाची संथा त्यांना शालेय जीवनात लाभली.

नानासाहेबांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन कॉलेजमध्ये झाले. गो. ग. आगरकरांच्या समाजसुधारणावादी विचारसणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांचा पिंड बुद्धिप्रामाण्यवादी बनला. लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्या’चे त्यांनी परिशीलन केले. इंग्रजी वाङ्मयाचा व्यासंग वाढविला. माधव ज्यूलियन यांच्या नितांतरमणीय कवितेमुळे त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा विकास झाला. ‘विरहतरंग’ या त्यांच्या खंडकाव्याची नानासाहेबांनी पारायणे केली. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी ‘च्यवन’ हे छंदोबद्ध इंग्रजी नाटक लिहिले. सुरुवातीला लेनिनच्या विचारसरणीतील वास्तववाद आणि क्रांतिप्रवणता त्यांच्या बुद्धिवादी पिंडाला मानवली, पण विचारान्ती ‘कम्युनिझम’ हीदेखील मूलतत्त्ववाद्यांसारखीच कडवी मनोवृत्ती आहे, हे त्यांना उमजून आले. या विचारसणीतील फोलपणा जाणवला. त्यांचा कल गांधीवादी विचारांकडे वळला. कोणतीही विचारसरणी अंधपणे स्वीकारू नये, पोथीनिष्ठ होऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष राहिला. या मुक्त मोकळ्या मनोधारणेमुळे त्यांची प्रतिमा नव्या नव्या उन्मेषांसह प्रकट होऊ लागली. तिला नवीन धुमारे फुटले. ललित निबंधाचे माध्यम त्यांना मानवले ते यामुळेच.


हेही वाचा : मारुती चितमपल्ली : वनस्पतिकुळातील माणूस - सोमनाथ कोमरपंत


आत्माविष्काराच्या प्रेरणेतून लिहिलेल्या नानासाहेबांच्या ललितनिबंधांचा येथे परामर्श घ्यायचा आहे. ‘शंख आणि शिंपले’ या पुस्तकातील त्यांचे ललित लेखन वाचणे हा एक आनंदानुभव आहे. कोकणात आणि नंतर पुण्यात घालवलेल्या आनंदक्षणांची ही स्मरणसाखळी आहे. पुढे त्यांच्या कर्मकांडांवरील विश्‍वास पूर्णत: उडाला, तरी त्यांनी बालपणातील भावविश्‍व समरसतेने रंगवले आहे.

‘‘अशी फुले परडीत असल्यावर त्या घमघमाटात बसून पूजा करण्याची हौस कुणाला वाटणार नाही? पाराच्या धारेखाली बसून यथेच्छ अंघोळ करायची, तांब्या लख्ख घासून तोंडमोंड भरून आणावा, गंध उगाळून घ्यावे नि दीड-दोन घटकासुद्धा हवी तर पूजा करावी. पंचायतनात फुले रचावी आणि त्यानंतर ती मावेनाशी झाली, तर देव्हार्‍याच्या पट्टीवर ती ओळीने माळावी. शंखाला व घंटेलासुद्धा तिथे फुले मिळत. पूजा आटोपल्यावर आजीने दिलेल्या गूळ-खोबर्‍याचा प्रसाद गट्ट करावा आणि वाटीत उरलेले चंदन अंगभर फासावे.’’ आपल्या चित्रकलेच्या छंदाबद्दल नानासाहेबांनी तन्मयतेने लिहिले आहे. त्याचा समग्रतेने आस्वाद घ्यायला हवा.

पुण्यातील शाळेमधील पहिल्यावहिल्या दिवसांच्या मनोरंजक आठवणी नानासाहेबांनी सांगितल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन शैक्षणिक जगताचे दर्शन घडते. पुण्याचा परिसर दृग्गोचर होतो.

सुट्टीत कोकणात यायचे म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणी असायची. पहिल्यांदा पुण्याहून ट्रेनने मुंबईला जायचे आणि तिथे बोट पकडून देवगड बंदरात उतरायचे. त्या प्रवासाचे साग्रसंगीत वर्णन नानासाहेबांनी केले आहे, ते वाचनीय आहे. अशाच एका सायंकालीन क्षणचित्राचे वर्णन त्यांनी चित्रमय शैलीत केले आहे.

‘‘संध्याकाळी, दिवस बुडायच्या सुमारास सूर्याचे बिंब सौम्य होऊन क्षितिजावर ओठंगले, की ते दृश्य काही मनात मावायचे नाही. वर एवढे मोठे आभाळ आणि खाली इतके साचले पाणी. शिंपल्याची जणू काही दोन दळेच, आणि त्या शिंपल्याच्या शिवणीपाशी सूर्यबिंबाचा विलक्षण तेजस्वी गोळीबंद मोती.. असा शिंपला कोणी कधी पाहिला असेल काय?’’

अप्पा बळवंताच्या गेटावरून शनिवारवाड्याकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या पांजरपोळाच्या बोळाची फांदी जिथे फुटते त्याच्या आसपासच्या वाड्यात गोरे यांचे बिर्‍हाड होते. तत्कालीन पुण्यातील त्या वाड्याचे, गल्लीबोळांचे आणि गलिच्छ रस्त्यांचे वास्तवपूर्ण चित्रण नानासाहेबांनी केलेले आहे. पुणे असे धुळकट आणि विटके असूनही त्या नगराला वैशिष्ट्यपूर्ण रंगरूप होते. त्यामुळे नानासाहेबांच्या मनात पुण्याविषयी आत्मीयतेची भावना आहे.

‘शंख आणि शिंपले’मधील आठवणी त्यांच्या बालवयाशी आणि कुमारवयाशी निगडित आहेत. एका स्मरणरमणीय जगाचे स्वप्न-वास्तवयुक्त ते चित्र आहे. प्रौढवयात नानासाहेबांनी हे सारे अनुभव टिपले असतील. पण त्या उंबरठ्यावर निजशैशव पारदर्शी वृत्तीने टिपण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

‘कारागृहाच्या भिंती’मध्ये भोवताली अंधार, भीतिग्रस्तता आणि या दोहोंच्या अडकित्त्यात सापडलेली एकान्तातील कातरता असताना त्यांनी आपल्या संवेदनशील मनातील तरंग व्यक्त केले आहेत. आजच्या घटकेला त्यांच्या मनातील विचारांच्या ठिणग्या आणि भावनांचे कल्लोळ न्याहाळताना काय वाटते? त्या कालखंडातील ध्येयप्रवणतेची भावना तर पूर्णपणे पुसून गेली आहे. गतपिढीतील ध्येयवादी माणसांना कमालीच्या खस्ता खाव्या लागल्या. तरी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी बाळगलेली जिद्द आणि मनोनिर्धार अढळ होता. त्या काळातील तरुणाईचे प्रातिनिधिक चित्र ‘कारागृहाच्या भिंती’मध्ये आढळते. विनोबाजी, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू आणि ना. ग. गोरे यांच्यासारख्या कृतिशील प्रज्ञावंतांना कारावासात लिहिण्याची प्रेरणा झाली. त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या सामाजिक नीतिमूल्यांची मिती आणि वाङ्मयीन प्रेरणांची मिती तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते.

‘कारागृहाच्या भिंती’मध्ये 13 मार्च रोजी लिहिलेल्या टिपणात संध्याकालीन शांत, शीतल समयाचे नानासाहेबांनी रेखाटलेले क्षणचित्र आपल्या अंत:करणात कायमचे कोरले जाणारे आहे.

‘ती पाहा आता खालच्या वाड्यातून धुराची बारीक वलये तर चढू लागली. किरांचे थवे घरांकडे झेपावे लागेल गरुडपक्षी आपले भ्रमण संपवून आमच्या काप्या फणसावर येऊन कसे बसले आहेत व कर्कश आणि चमत्कारिक आवाज काढून आपल्या दुहेरी कोयत्यासारख्या चोची फणसाच्या फांदीवर पाजळीत आहेत.’

हे काव्यात्म चित्र प्रत्यक्ष समोर दिसणारे नसून स्मरणोज्जीवित आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

19 मार्चच्या दैनंदिनीत नानासाहेब लिहितात.

‘तथापि या सर्व वस्तूंमधून माझ्या मनात भरून राहिलेली कोणती वस्तू असेल तर शिरीष पुष्प. शिरीष पुष्प आणि फर्गसन कॉलेज यांच्यामधील अविभाज्य साहचर्य तेव्हापासून माझ्या मनात दृढ आहे. शिरीषाचे फूल म्हटले, की फर्गसनचे आवार डोळ्यांसमोर उभे राहते.’

या भावविभोर आठवणी जागवीत असताना, ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये शिकत असताना आपल्या भारती भवनातील रविवारच्या वर्गात ओक मास्तरांनी त्यांना ‘शाकुन्तल’ शिकविले... ‘शाकुन्तल’च्या पहिल्या अंकातच आलेल्या शिरीष कुसुमांचा भावसंदर्भ नानासाहेबांना पुन्हा एकदा त्या काळात घेऊन जातो. काव्यात्म निवेदनशैलीची परिसीमा त्यांनी येथे गाठलेली आहे... हे मंत्रभारलेपण नानासाहेबांच्या शैलीत आहे.

त्यांच्या भावतरंगदर्शनाबरोबरच वैचारिकताही सहजतेने सामावली जाते. 13 फेब्रुवारी 1942 रोजी लिहिलेली नोंद या दृष्टीने लक्षणीय वाटते.

‘लहान मुले मोठी झाली म्हणजे तीच माणसे बनतात आणि एकमेकांचा द्वेष करू लागतात. गळू कापू लागतात. एकमेकांना गुलाम बनवू लागतात. म्हणजे फुलांचे काटे बनतात म्हणायवयाचे ते कोणत्या उत्क्रान्तितत्त्वाने? की सौंदर्यात अशी भीषणता दडून बसलेलीच असते, परिस्थितीने माणूस असा बनतो काय, मी परिस्थिती बनवीन म्हणणारा माणूस परिस्थितीचा पूर्णांशाने गुलामही बनतो म्हणावयाचा.’

केशवसुतांच्या ‘नरेंचि केला हीन किती नर’ या काव्योद्गाराची येथे आठवण होते... वाचकांचाही अंतर्मुखतेचा प्रवास सुरू होतो.

‘कारागृहाच्या भिंती’मध्ये दैनंदिनी लिहीत असताना, घटना - प्रसंगांच्या अनुषंगाने नानासाहेबांनी आपल्या मानसप्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्या त्या प्रसंगाला अनुसरून संस्कृतमधील अभिजात वाङ्मयातील समुचित संदर्भ येतात. मराठी साहित्यातील संदर्भ येतात. त्यामुळे या लेखनाला शाश्‍वत मूल्य प्राप्त झाले आहे. लोकमान्यांच्या ‘गीतारहस्या’चा व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ‘वेस्टर्न थॉट ऍण्ड इस्टर्न रिलिजन’ या ग्रंथाचा उल्लेख आढळतो.

युसुफ मेहेरअली हा प्रिय मित्र भेटून गेल्यानंतर मनात उमटलेल्या आनंदलहरींचे वर्णन येते. आप्तजनांच्या आठवणी त्यात आहेत. गांधीजींच्या 75 व्या वाढदिवसाची ते आवर्जून आठवण काढतात. पण त्यांचे मन खर्‍या अर्थाने रमते ते निसर्गाच्या चित्रणात.

चांदण्याचं वर्णन करतान ते सहजतेने लिहून जातात, ‘ते मंद होते. अलवार होते. जणू भावनामंथर होते... मला ते जयजयवंतीच्या स्वरमालिकेप्रमाणे वाटले. मालकंसाच्या छटा डोळ्यांसमोर तरंगल्या. मोनालिसाचे गूढ हास्य आठवले.’

माधव ज्युलियनांच्या ‘कोणता राजहंस मानसी’ या ओळी आठवत, खिडकीतून आलेल्या या चांदण्याचे पाझर अंगावर घेत किती तरी वेळ ते बसून राहतात. या क्षणचित्रात त्यांची रसिकता ओथंबून आलेली आहे.

नानासाहेबांनी आपली मुलगी शुभा हिला काही पत्रे लिहिली. अक्षरवाङ्मयाचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल. या पत्रांतून हिंदुस्थानातील मानवी सागरात वास करणार्‍या लोकांच्या संस्कृतीविषयी त्यांनी समरसून लिहिले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. त्यात झारखंडवासियांसंबंधी ‘धुमकुडिया’ या शीर्षकाखाली अप्रतिम शैलीत लिहिले आहे. ‘नागफणी’ या दुसर्‍या पत्रात भेडाघाटला घेतलेल्या आनंदानुभूतीचे वर्णन येते.

‘आता येथे कोंबडा आरवत नाही’ या ललितनिबंधात कोकणातील आपल्या घराकडील आठवणी चित्रमय शैलीत टिपलेल्या आहेत. घराभोवतालचा आसमंत आपल्या डोळ्यांसमोर येथे साकार होतो. या ललित निबंधातील तपशील चित्तवेधक आहेत. निवेदनशैलीला नर्मविनोदाची महिरप आहे. त्याचा शेवटही त्यांनी गमतीगमतीने केला आहे.

क्षणात दिसणार्‍या दिव्य भासातून कवी कविता रचतो आणि मनात निरंतर चालणार्‍या ध्यासातून शिल्पकाराचे शिल्प साकार होते. ‘दिगंबर’ या व्यक्तिचित्रात नानासाहेबांच्या प्रतिभा गुणांचा परमोच्चबिंदू गाठला गेला आहे. अस्वस्थतेतून अक्षय्य कलाकृती घडून येते, या अनुभवाचा प्रत्यय येथे येतो.

‘नवनिर्मितीच्या साक्षात्कारानुभूतीने अरिशिनेमीचे बाहू फुरफुरले. अंगप्रत्यंगातून चेतना झंकारली, बिनदारांचे, बिनखांबांचे, बिनमंडपाचे मंदिर. आतापर्यंत बांधलेल्या सर्व मंदिराहून निराळे. खांब, दरवाजे आणि मंडप हवेत कशाला?’... ‘या शिलाखंडातून माझे हात तासून काढेल ती या मंदिरातील मूर्ती - ती झंझावातात अचल राहील. जगाच्या व्यवहाराकडे सस्मित मुखाने पाहील. मानवी व्यवहाराची वारुळे व तेल तिच्याभोवती वाढत असली तरी मेघाचे उष्णीष ती आपल्या शिरोमणी धारण करील. पंचमहाभूतांच्या मांडीवर ती नि:शंकपणे नग्न उभी ठाकेल.’ या ललितनिबंधाचा शेवटही आपल्या मनाला खिळवून ठेवणारा आहे.


हेही वाचा : नानासाहेब गोरे : सॉक्रेटिसचे तत्व पाळणारे - नरेंद्र चपळगावकर


आपल्या सहवासात आलेल्या व्यक्तींची चित्रे त्यांनी अशा प्रकारच्या प्रसन्न शैलीत रेखाटली आहेत. त्यांची अभिव्यक्तीची तर्‍हा भिन्न भिन्न स्वरूपाची असली तरी गाभा मात्र आदराचा, आत्मीयतेचा आणि सौहार्दाचा आहे. भारताच्या अलीकडच्या इतिहासाच्या पटलावर त्यांनी आपली तेजस्वी मुद्रा उमटवली आहे. साने गुरुजींच्या मृत्यूनंतर नानासाहेबांनी लिहिलेले स्वप्नभाषण हे नितांतमधुर गद्यकाव्य आहे. ‘जाणिवेच्या जान्हवीचे आणि विस्मृतीच्या कालिंदीचे मिसळत असलेले; पण अद्याप एकजीव न झालेले प्रवाह कौतुकाने पाहत असताना या वाळवंटावरून मी कधी कधी तुम्हाला साद घालतो.’ या ओथंबलेल्या शब्दांत नानासाहेबांनी प्रारंभीच आमच्या अंतःकरणाची तार छेडली आहे. युसुफ मेहेरअलींच्या अकाली जाण्याने नानासाहेबांच्या अंत:करणात जी कातरता निर्माण झाली, तेव्हा त्यांनी काढलेले उद्गार मेहेरअलींच्या कर्तृत्वाचे यथार्थ चित्रण करतात. ‘तू आणखी जगायला हवा होतास. जीवनाचे जे शिल्प तू बनवलेस ते त्यामुळे अधिक विस्तीर्ण झाले असते इतकेच. त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडण्याची शक्यता नव्हती. कारण त्याची विलोभनीय महिरप तू केव्हाच रेखाटून पूर्ण केली होतीस.’

‘एक शांत सुंदर पिकणे’ या लेखात समानधर्मी आणि अभिरुचीसंपन्न अशा चिंतामणराव देशमुखांच्या सान्निध्यात कालिदासाच्या ‘मेघदूत’ या काव्यावरची चर्चा आहे. विदग्ध रसवृत्तीच्या समानशील व्यक्तींची सहज जमून आलेली ही मैफल आहे.

एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे हा एके काळी स्वातंत्र्यसंग्रामपर्वातील आणि समाजवादी चळवळीतील इतरेतर द्वंद्व समास होता. याचे कारण म्हणजे दोघांनी केलेली निरलस राष्ट्रसेवा आणि साने गुरुजींच्या ‘धडपडणार्‍या मुलां’मधील समर्पित जीवन जगण्याची केलेली पूर्ती, दोघांमध्ये प्रकृतिभिन्नता असूनही टिकून राहिलेली अभंग मैत्री, एकमेकांविषयी वाटणारा अपार जिव्हाळा... 12 नोव्हेंबर 1984 रोजी एस. एम. जोशी यांनी आपल्या कृतार्थ जीवनाची ऐंशी वर्षे पूर्ण केली, तेव्हा नानासाहेबांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचा लेख लिहिला. त्याचे नाव होते - ‘एसेम : एक विशेषनाम’. आपल्या दीर्घकालीन प्रिय सुहृदाविषयी लिहिलेला हा लेख ममत्वाने ओथंबलेला, त्याचे सत्त्वशील जीवन कवेत घेणारा आणि परिव्राजकाप्रमाणे जीवन जगलेल्या सच्च्या माणसाचे चरित्र आणि चारित्र्य साकार करणारा आहे, यात मुळीच शंका नाही. ते म्हणतात :

‘पदावाचून प्रतिष्ठा लाभलेली जी हाताचा बोटांवर मोजण्याइतपत माणसे समाजात असतात, त्यांपैकी एसेम एक आहेत.’ त्यांच्या जीवनप्रवासावर दृष्टिक्षेप टाकताना ते म्हणतात, ‘एसेमच्या जीवनात दहा-वीस वर्षांचा असा कालखंड येऊन गेला आहे, की ज्या वेळी एसेम नुसता कोंभ नव्हता, तर अनेकांना सावली देणारा आणि बहरलेला वृक्ष होता. ती अंधारातील ओळखीची साद नव्हती, तर अंधार हटवणारा पलिता होता. ती खडकाळीतील वाट नव्हती, तर तो वाटाड्या होता आणि तो सड्यावरचा निर्मळ पाण्याचा कोंड नव्हता, तर आपल्या दोन्ही काठांवर कार्याची हिरवळ पसरीत खळाळत राहणारा निर्झर होता.’ एसेम यांची साठा उत्तराची कहाणी येथे पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली आहे.

नानासाहेब गोरे यांच्या ललितनिबंधलेखनातील कौशल्य कशात आहे? एकच एक घटक सांगता येणार नाही. जीवनोत्सुकता हा त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. ते समाजमनस्क आहेत. विवेकशक्तीवर त्यांची निष्ठा आहे. त्यांचे मन कवीचे आहे. म्हणूनच तर त्यांनी ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यावर आपल्या आयुष्याचा आलोक त्यांनी कवितेत गुंफला. शब्दशक्ती त्यांच्यावर प्रसन्न झालेली आहे. गीर्वाणभारतीचे दृढ संस्कार होऊनही मराठमोळेपण त्यांनी आपल्या शब्दकळेत सामावून घेतले आहे.

प्रवाहित्व व प्रभावी निवेदनशैली हे त्यांच्या प्रतिभेचे गुणविशेष आहेत. मानवामधील जे भव्य आहे, मंगल आहे आणि उदात्त आहे, तिथे तिथे त्याचा वेध घेण्यासाठी त्यांची लेखणी सौदामिनीसारखी संचार करते. नितळ जीवनाशयाचे आरस्पानी रूप समर्थ शब्दकळेतून अभिव्यक्त करणे हा त्यांच्या लेखनाचा सहजधर्म आहे. त्यांचे चिररुचित ललितनिबंधलेखन वाचकांना निरंतर आगळ्यावेगळ्या आनंदविश्‍वात नेणारे आहे.

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com

Tags: नानासाहेब गोरे स्वातंत्र्यलढा समाजवाद साधना साप्ताहिक साहित्य ललित लघुनिबंध मराठी साहित्यिक Load More Tags

Comments:

Vishwas Dinkarrao Mudrale

पुण्यातील झाडे हा कै.ना.ग.गोरे यांनी लिहिलेला ललित लेख, त्यांच्या कोणत्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचे नाव कृपया कळवावे ही विनंती.

नंदकिशोर लेले पुणे

सर, आपल्या वरील लेखातून श्री ना ग गोरे यांच्या साहित्य या विषयी चांगली माहिती मिळाली.त्यांचे ललित लेखन लवकरच वाचेन.आपल्या अनेक लेखातून उत्तम साहित्यिक आणि त्यांची पुस्तकं, लेखन वैशिष्ट्ये सामान्य वाचकांना माहित पडतात आणि हा लेखही तेच काम करतो.आणि म्हणूनच आमच्या सारखे साहित्यप्रेमी आपलं लेखन आवर्जून वाचतात आणि समानधर्मी मित्रांना सांगतात. पुण्यात १९८१ साली मी टिळक रोडवर राहत होतो त्यावेळी पहाटे श्री ना ग गोरे फिरायला जाताना दिसत असत ते दर्शन अजूनही मनात ताजे आहे आणि त्यांची महती आपल्या लेखातून कळाली. आपणांस खूप धन्यवाद . आपल्या पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे.श्री गोरे यांच्या स्मृतीस अभिवादन.

Dr. Somnath Naik, USA

Congratulations for writing another scholarly and informative assay by an accomplished Marathi literature authority ! I feel proud to call you my childhood friend Somnath. You were my inspiration and were my role model. I have always admired you for achieving your accomplishments against all adversities we both faced growing up. Goan Marathi literature should always be grateful to you!

Anup Priolkar

Extraordinary Article Sir.

Add Comment

संबंधित लेख