डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समाजपरिवर्तनाचे प्रणेते

14 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती 

ज्या मानवतेच्या चिरस्थायी मूल्यांवर भारतीय लोकशाहीची कोनशिला जगातील आदर्शभूत ठरलेल्या संविधानाद्वारे बसविण्याचा डॉ. आंबेडकरांनी ध्यास घेतला, त्या द्रष्टेपणामुळे अनेक आव्हाने येऊनही गेली बहात्तर वर्षे भारतीय लोकशाही टिकून आहे. राष्ट्रीय जीवनात चढउतार असतात, हर्षमर्श येतात. संकटमालिका येते. पण जनमानसातील परस्परांविषयी विश्वास, विचारांचा समन्वय आणि ध्येयमार्गाने वाटचाल करण्याचा अचल निर्धार कायम असेल, तर लोकशाहीतील मूल्यविवेक ढासळून पडत नाही. भारतीय संघराज्याने आतापर्यंत हेच दाखवून दिले आहे. लोकशाही जीवनप्रणालीच्या या मूलारंभप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे अखंड ज्ञानोपासक ध्येयवादी प्रज्ञावंत आपल्या राष्ट्राला लाभले याबद्दल आपण त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञताभाव बाळगायला हवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती. ते जाऊनही 66 वर्षे लोटली, पण भारतीय समाजपुरुषाला मूलगामी, बुद्धिनिष्ठ, समग्रतेने आणि वृत्तिगांभीयाने वैचारिक बैठक देणारे, त्याचप्रमाणे सदैव कृतिशील राहलेले संघर्षशील व्यक्तिमत्त्व म्हणून आम्हा भारतीयांना त्यांचा विसर पडलेला नाही. त्यांच्या समर्पणशील वृत्तीमुळे आणि वैचारिक वारशामुळे ते निरंतर आमच्यात आहेत, असे वाटते.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेले डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या कर्तृत्वाचा ठसा विसाव्या शतकावर तर उमटलाच आणि आता एकविसाव्या शतकाची दोन दशके पूर्ण झाली. आजचे युगमानस गतिकमानतेचे आहे आणि काळ जटिलतेचा आहे. अनेक सामाजिक समस्यांचा आहे. अशाही काळात डॉ. आंबेडकरांचा सामाजिक विचार मानवतेला दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश देणारा आहे. म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण पुन: पुन्हा करावेसे वाटते.

प्रत्येक माणूस जन्माला येताना सामान्य माणूस म्हणूनच जन्माला येतो. पण समज आलेल्या वयापासून त्याच्यावर झालेल्या संस्कारांअनुसार आणि अवतीभोवतीच्या परिस्थितीअनुसार माणसे घडत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महामानव असेच घडले. त्यांच्यासारखे अन्य महामानव कालप्रवाहात निर्माण झाले, त्यांच्यामधील ‘हा श्रेष्ठ; तो कनिष्ठ’ अशी तुलना होऊ नये. कुणीही अट्टाहासाने अशी तुलना करू नये. कारण आजच्या लोकशाही युगातील विचारप्रणालीला

‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयम्।’

ही उक्ती तंतोतंत लागू पडणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत, ‘‘प्रत्येक मनुष्याला विचारस्वातंत्र्य आहे आणि आपल्याला लाभलेल्या विचारस्वातंत्र्याचा उपयोग सत्याचा शोध घेण्यासाठी केला पाहिजे. सत्याचा शोध घेण्याचा हा मार्ग अत्यंत बिकट आहे.’’

यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले? तर त्यांनी खडतर जीवनसाधनेचा मार्ग पत्करला. गौतम बुद्धांचा धम्मविचार, कबीरांचा प्रेमभाव आणि जोतीरावांची क्रांतिप्रवणता स्वीकारली. या तिघांच्या विचारसरणींतील अंत:सूत्र कोणते होते? ती होती सामाजिक करुणा! तिच्या बळावर डॉ. आंबेडकरांनी भारतीय इतिहासाचा दीर्घ कालपट आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने उजळून टाकला. उपेक्षित समाजाला सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. त्यामागे त्यांच्या विवेकशक्तीची बैठक होती.

हे विवेचन करताना हेही सांगणे आवश्यक वाटते की, जॉन स्टुअर्ट मिल म्हणत असे- ‘‘एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पू नका, अगर त्यावर इतका विश्वास टाकू नका की, त्यामुळे तो लोकशाही संस्थांचे स्वरूप बदलून टाकेल.’’ रवींद्रनाथांचेदेखील हेच म्हणणे होते की- व्यक्तीचे स्तोम माजवताना परम सत्याची अवहेलना होऊ देऊ नका. डॉ. आंबेडकरांच्या कृतिशील व्यक्तिमत्त्वात या विवेकाचे भान होते. माणूस हे या विश्वरचनेचे केंद्र आहे. माणूस स्वत:ला बदलू शकतो, तसेच तो आपल्या भोवतीचे वास्तव विचाराने आणि कृतीने बदलू शकतो, हे त्यांच्या तत्त्वचिंतनाचे सूत्र होते- ‘शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा.’ हा क्रांतीचा मंत्र त्यांनी समाजाला दिला. परिवर्तनवादी विचार समाजात रुजविण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा त्याला दडपून टाकणाऱ्या धर्मसत्ता, राजकीय सत्ता, अर्थसत्ता इत्यादी सत्ता आपली शस्त्रे परजून उभ्या असताना या कठोर वास्तवाची त्यांना पुरेपूर जाणीव होती, म्हणूनच त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्रस्थापित करावयाचा आणि शतकानुशतके दास्यात खितपत पडलेल्या दलित-शोषित जाती-जमातींचा आत्मसन्मान जागवायचा, हे ब्रीद स्वीकारले अत्यंत आत्मनिर्भर वृत्तीने. माणसाने माणसाशी मानसन्मानाने वागावे अशी आपली अपेक्षा असते. ही अपेक्षा जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपण म्हणतो की, या समाजात माणसाला मूल्य आहे, माणुसकीला मूल्य आहे. म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी लोकशाहीची संज्ञा स्पष्ट करताना ‘एक माणूस, एक मूल्य’ हा सिद्धान्त मांडला. त्यामागे त्यांच्या जीवनचिंतनाची निश्चित धारणा होती.


हेही वाचा : माणगाव परिषद:सामाजिक चळवळीतील माईलस्टोन - विश्वास सुतार


ही मूल्यसरणी स्वीकारून डॉ.आंबेडकरांनी आपल्या जीवनाची वाटचाल कशी केली आणि आपल्या बरोबर समाजमानसाला ते कसे घेऊन गेले याची मांडणी करायची आहे. त्यांचे जीवनचरित्र तर सर्वज्ञात आहे. तीन गुरूंबरोबरच विद्या, विनय आणि शील ही त्यांनी उपास्य दैवते मानली.

ज्ञान म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा पाया होय. म्हणून प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी वाटेल त्या प्रकारचे कष्ट सोसून शिक्षण मिळवले पाहिजे आणि ज्ञानाच्या बळावर स्वतंत्रपणे विचार करायला शिकले पाहिजे, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. बुद्धीचा विकास करणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणामुळे तो आपल्याला साधता येतो. म्हणून त्यांनी दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. शिक्षणामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होईल, त्यांच्या मानसिक, बौद्धिक क्षमतांची वाढ होईल. प्रस्थापित विद्वानांच्या विचारांचे टीकात्मक परीक्षण करण्यास ते समर्थ होतील. प्रथम सूत्राचा शोध घेऊन आवश्यक माहिती मिळविण्याचा ते प्रयत्न करतील. त्यांच्या मनात कोणत्याही विषयाची जिज्ञासा निर्माण होईल, असे डॉ. आंबेडकर म्हणत असत.

डॉ. आंबेडकर 1913 मध्ये कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. भारतातील सामाजिक परिस्थिती आणि अमेरिकेतील सामाजिक परिस्थिती यांमधील फरक त्यांना जाणवला. भारतातील वंचित आणि पीडित जनतेच्या आयुष्यात शिक्षणाची आवश्यकता का व कशासाठी हे त्यांना कळले. म्हणून आपल्या वडिलांच्या मित्राला त्यांनी पत्र लिहिले, ‘‘पालक मुलांच्या जन्माचे साथी आहेत, कर्माचे नव्हेत- या संकल्पनेचा आता त्याग केला पाहिजे.’’ पुढे ते म्हणतात, ‘‘पालक मनात आणतील तर ते आपल्या मुलांचे भवितव्य साकार करू शकतात. मुलांच्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलींच्या शिक्षणाचा ही तेवढ्याच गांभीर्याने विचार करावा आणि त्याअनुसार कृती करावी. पुढे याच पथात शेक्सपिअरच्या एका नाटकातील वाक्य ते उद्‌धृत करतात की, प्रत्येक माणसाच्या जीवनात जेव्हा संधीची लाट येते, तेव्हा तो माणूस त्यावर आरूढ झाला, तर तो समृद्धीच्या मार्गावर जातो. परंतु जीवन व्यर्थ घालवले तर त्या माणसाच्या वाट्याला दु:खच येणार. वंचितांच्या आणि पीडितांच्या जीवनात आलेली शिक्षणाची संधी न गमावता शिक्षण घेऊन ज्ञानी झाले पाहिजे. त्यासाठी येईल ते दु:ख सहन करायला पाहिजे, असाही सल्ला डॉ. आंबेडकर देतात.

डॉ. आंबेडकरांची शिक्षणाविषयीची ही आस्था आणि प्रेम ‘आधी केले; मग सांगितले.’ या वृत्तीतून आलेले आहे. डॉ. आंबेडकरांनी परदेशाच्या वास्तव्यात कष्टपूर्वक शिक्षण घेतले. सहा वर्षांत परदेशातल्या सर्वश्रेष्ठ नामवंत विद्यापीठांत एम. ए., एम. एस्सी., डी. एस्सी. आणि बार-ऍट-लॉ ह्या पदव्या उच्च श्रेणीने प्राप्त करण्याचा अपूर्व विक्रम केला. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास व कायदा ह्या विषयांत प्रावीण्य मिळवून त्यांनी प्रकांड पंडित म्हणून नावलौकिक प्राप्त केला. हॅरॉल्ड लास्की, किंगस्ले मार्टिन, मॉरिस डॉब, एड्विन कॅनन, सिडने वेब, गोल्डन वॉजर व जॉन ड्यूई इत्यादी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्वानांनी मुक्त कंठाने त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा केली. राजकीय क्षेत्रात दलितवर्गाला माणुसकीचे हक्क मिळवून देण्यास आणि सामाजिक समतेचा लढा गतिमान करण्यात यशस्वी झालेल्या डॉ. आंबेडकरांना लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी दिली. ही पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय विद्यार्थी होते.

एम.ए.ची पदवी मिळाल्यानंतर 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात भारताच्या राष्ट्रीय नफ्यातील वाट्याविषयी ऐतिहासिक दृष्टीने चिकित्सक अभ्यास केला. राष्ट्रीय उत्पन्नाचे स्वरूप, त्याची विषम वाटणी इत्यादींबाबत विवेचन करून भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे न्याय्य विभाजन कसे करता येईल हेही त्यांनी सुचविले आहे. या प्रबंधामुळे त्यांना पीएच. डी. ची पदवी मिळाली. हा प्रबंध ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्तव्यहाराचा विकास’ (‘दि इव्हॅल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’) या नावाने प्रसिद्ध झाला. प्रा. आर. ए. सेलिग्मन यांची त्याला प्रस्तावना आहे. या महान अर्थशास्त्रज्ञाने डॉ. आंबेडकरांच्या व्यासंगांची व विवेचनशक्तीची प्रशंसा केली आहे.

‘य: क्रियावान: स पण्डितः’ या उक्तीअनुसार डॉ. आंबेडकरांनी परदेशात अर्थशास्त्राचे जे सूक्ष्म अध्ययन केले; त्याचे उपयोजन समाजाभिमुख वृत्तीने त्यांनी दुबळ्या घटकांच्या कल्याणासाठी केले. दलितांच्या वाट्याला येथील समाजव्यवस्थेमुळे, धर्मव्यवस्थेमुळे दारिद्र्य व कर्जबाजारीपण आले. त्या विळख्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी वेळोवेळी पावले उचलली. सतत संघर्ष करत, राजकीय दबाव टाकत त्यांनी घटनेत अनेक तरतुदी करून घेतल्या. ब्रिटिश सरकारने आणि स्वतंत्र भारतातील शासनाने दलितांसाठी ज्या कल्याणकारक योजना राबवल्या, नोकऱ्यांत राखीव जागा देऊ केल्या, शैक्षणिक अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आली. एन. माधवराव, सय्यद सादुल्ला, अल्लादी कृष्णास्वामी अय्यर आणि सर बेनेगल नरसिंगराव हे घटना समितीचे अन्य सदस्य होते. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी घटना समितीसमोर जो मसुदा सादर केला त्यातून त्यांच्या व्यापक प्रज्ञेचा प्रत्यय येतो. तो मुळातून समजून घेतला पाहिजे. पण डॉ. आंबेडकरांच्या विचारातील भारताच्या भविष्यकालीन स्वप्नांची झेप लक्षात घेण्यासाठी खालील सूत्रमय आशय ध्यानात घ्यावा लागेल.


हेही वाचा : अभिवादन : बहिष्कृत भारताच्या नायकाला - संपादक


‘‘आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट राहता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाहीचा पाया सामाजिक लोकशाहीवर भक्कमपणे आधारल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकत नाही. पण सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? समता, स्वातंत्र्य व विश्वबंधुत्व या तत्त्वांवर आधारलेला जीवनमार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही! ही तीन तत्त्वे वेगवेगळी मानता कामा नयेत. त्यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यांपैकी एक तत्त्व दुसऱ्या तत्त्वापासून वगळणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ हेतूस सुरुंग लावण्यासारखे आहे. समतेपासून स्वातंत्र्याचा काडीमोड करता येणार नाही, की स्वातंत्र्यापासून समतेचा काडीमोड करता येणार नाही किंवा स्वातंत्र्य व समता, ही दोन्ही विश्वबंधुत्वापासून अलग करता येणार नाहीत.’’

ज्या मानवतेच्या चिरस्थायी मूल्यांवर भारतीय लोकशाहीची कोनशिला जगातील आदर्शभूत ठरलेल्या संविधानाद्वारे बसविण्याचा डॉ. आंबेडकरांनी ध्यास घेतला, त्या द्रष्टेपणामुळे अनेक आव्हाने येऊनही गेली बहात्तर वर्षे भारतीय लोकशाही टिकून आहे. राष्ट्रीय जीवनात चढउतार असतात, हर्षमर्श येतात. संकटमालिका येते. पण जनमानसातील परस्परांविषयी विश्वास, विचारांचा समन्वय आणि ध्येयमार्गाने वाटचाल करण्याचा अचल निर्धार कायम असेल, तर लोकशाहीतील मूल्यविवेक ढासळून पडत नाही. भारतीय संघराज्याने आतापर्यंत हेच दाखवून दिले आहे. लोकशाही जीवनप्रणालीच्या या मूलारंभप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे अखंड ज्ञानोपासक ध्येयवादी प्रज्ञावंत आपल्या राष्ट्राला लाभले याबद्दल आपण त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञताभाव बाळगायला हवा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कित्येक समरप्रसंग असे आहेत, की त्यांना तीव्रतेने लढा द्यावा  लागला. सामाजिक जीवनात आणि व्यापकपणे राष्ट्रीय जीवनात अशा प्रकारचा असमतोल निर्माण होतो, तेव्हा कृतिशील प्रज्ञापुरुषाला धीराने तोंड द्यावे लागते. डॉ. आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वीकारलेला बौद्ध धम्म आणि पाच लाख दलित बांधवांनी घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा, नाशिकच्या काळाराम मंदिरात केलेला सांघिक प्रवेश आणि महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह या घटनांमागची मीमांसा आपण वस्तुनिष्ठ पातळीवर आणि नि:पक्षपातीपणे करायला हवी. आपणच निर्माण केलेल्या जीर्ण-शीर्ण शृंखलांचे आपण दास होऊन बसलो होतो, अशा वेळी नव्या युगाची स्पंदने जाणून परिवर्तनशीलतेचे मानबिंदू होऊन निर्भरशील वृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे उभे राहिले आणि राष्ट्रधर्माचे ते उद्गाते कसे ठरले, हे आपल्याला कळून चुकेल.

(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या (14 एप्रिल) पूर्वसंध्येला हा लेख प्रसिद्ध करत आहोत.)

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा
somnathpant@gmail.com

Tags: बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिवेध आंबेडकर जयंती दलित साहित्य महाराष्ट्र विचारवंत Load More Tags

Comments:

Sudhakar Gaidhani

Prof. Somnath Komarpant yancha Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar yanchya sandarbhat oghawatya bhashet lihilela lekh khup moulik asa aahe. Tyanche aani sampadakanche manapasun Abhinandan. Sudhakar Gaidhani

Avi

सोपा मतितार्थ अवघड भाषेत मांडला आहे . काय फायदा .

नंदकिशोर लेले पुणे

सर नमस्कार. आपला लेख यातून आंबेडकर यांच्या विचारांचे सार आपण वाचकांपर्यंत पोहोचते केले आहे.खूप धन्यवाद.सर आपलं लेखन पुनः सुरू झालं हे खूपच आनंददायी बाब आहे.

Add Comment