संवाद : प्रतिभावंत ‘पुरुषोत्तमा’शी

8 नोव्हेंबर : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिवसानिमित्ताने... 

mid-day.com

पु. ल., तुमच्या विविधांगी साहित्य प्रवासाचा मागोवा थोडक्यात कसा घेता येईल? मराठीतील विनोदी वाङ्मयाच्या क्षेत्रातील तुमचे कर्तृत्व नेत्रदीपक स्वरूपाचे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील विपुल संदर्भ, शब्दनिष्ठ विनोदनिर्मिती, उपहास-उपरोध-विडंबनचातुर्य, मराठी भाषेवरील तुमचे असामान्य प्रभुत्व ही तुमच्या शैलीची गुणवैशिष्ट्ये. ती भाषा वाकविण्याची तुमची विलक्षण ताकद ठायी ठायी प्रत्ययास येते. याचबरोबर जीवनातील सुसंगतीविषयीचे उत्कट प्रेम, जीवन सुंदर करण्याची अदम्य प्रेरणा, काठोकाठ भरलेली रसिकता आणि जीवनाच्या तळाशी पाझरणारी करुणा यांचेही तितकेच दर्शन घडते.

आदरणीय आणि प्रिय पु. ल. देशपांडे यांस,
सविनय नमस्कार.

आज 8 नोव्हेंबर 2022. तुमची 103 वी जयंती. बरोबर चार वर्षांपूर्वी मराठीच्या साहित्यविश्‍वात तुमची जन्मशताब्दी 8 नोव्हेंबर 2018 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत आनंदमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी झाली. साध्या पद्धतीने पण नाट्यमयतेने तुमच्या विविधांगी साहित्याचे केलेलं वाचन असो, तुमच्या, ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाचा सादर केलेला नेटका प्रयोग असो, तुमच्या ‘ती फुलराणी’, ‘सुंदर मी होणार’, ‘एक झुंज वार्‍याशी’, ‘राजा आयदिपौस’ आणि ‘तीन पैशांचा तमाशा’ या रूपांतरित नाटकांचे ठिकठिकाणी झालेले प्रयोग असोत किंवा ‘विठ्ठल तो आला आला’ व ‘मोठे मासे छोटे मासे’ यांसारख्या खुमासदार एकांकिकांचे बहारदार प्रयोग असतो. ‘बटाट्याची चाळ’मधील निखळ विनोद निर्माण करणार्‍या लेखनातील दिलखेचक निवडक भागांचे अभिवाचन असो, ‘वार्‍यावरची वरात’ व ‘असा मी असामी’ या एकपात्री प्रयोगांचे रंगमंचावर केलेले सादरीकरण असो आणि या सर्वांवर कडी करणार्‍या ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘अंतू बर्वा’, ‘सखाराम गटणे’, ‘नारायण’, ‘हरितात्या’, ‘नामू परीट’, ‘नाथा कामत’, ‘चितळे मास्तर’, ‘परोपकारी गंपू’ या निवडक व्यक्तिरेखांचे अभिवाचन असो. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटात तुम्ही केलेल्या संवादिनीवादनाचे सुरेल सूर आठवून त्यांचा आस्वाद तुमच्याच आवाजात ऐकण्याच्या प्राप्त करून दिलेल्या संधीद्वारा सुदूर प्रदेशातील अगणित रसिकांना घेता आला. ती पर्वणी होती. एका अभिजात स्वरूपाच्या सुवर्णयुगात मनाने रमण्याची संधी प्रथितयश कलावंतांनी व नव्या उभारीने पुढे येणार्‍या नव्या पिढीतील कलावंतांनी दिली. या भूमीत कलावंतांची वाण नाही, तशीच रसिकांचीदेखील वाण नाही याचा प्रत्यय आणून दिला... आमची मने पुलकित केली.

... मात्र एकच खंत मनात होती, तुम्ही नसलेल्या जगात हे सारं घडत होतं... तुम्ही लौकिक जगाचा निरोप घेऊन 22 वर्षं लोटली... पण एक गोष्ट खरी की, तुम्ही निर्माण केलेली, हसणारी अक्षरं चिरनूतन आहेत... तुमच्याशी केलेला हा संवाद हा अर्थातच त्या अक्षरांशी भीत भीत केलेलं हस्तांदोलन आहे... माझ्या मर्यादा ओळखून...

तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि वाङ्मयनिर्मितीत प्रेयस आणि श्रेयस यांचा गुणसंगम आहे; शिवाय ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ या नामाभिधानाने तुमचा गौरव झालेला आहे. ज्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व तुम्ही झालेले आहात, तो भौगोलिक चतु:सीमांनी वेढलेला महाराष्ट्र नाहीय. मराठीचे समृद्ध संचित आपले आहे असे मानणार्‍यांचे तुम्ही श्रद्धास्थान आहात. ‘भावमुद्रा’ या पुस्तकात दुर्गाबाई भागवतांनी ‘महाराष्ट्राची दगडी शीर’ हा आशयसंपन्न आणि समर्थ शब्दकळेने युक्त असा ललितनिबंध लिहिला. कुमारवयात पुरुषार्थ प्रकट करणाऱ्या श्रीशिवछत्रपतींचा आणि श्रीज्ञानदेवांचा दुर्गाबाईंनी त्यात महाराष्ट्राचे मानबिंदू म्हणून गौरव केला आहे. या सांस्कृतिक समृद्ध परंपरेवर, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात घडलेल्या प्रबोधनपर्वावर आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी वाङ्मयीन प्रवाहांवर तसेच अंत:प्रवाहांवर डोळसपणे अन् निस्सीम प्रेम करणारा तुमच्यासारखा साहित्य पुरुषोत्तम दुर्मीळ मानावा लागेल. आमची तरुणाई ‘विशाखा’ नक्षत्रावर जन्मास आली, असे आत्मनिर्भरशील उद्गार तुम्ही काढले. एकीकडे तो कुसुमाग्रज-प्रतिभेचा सार्थ गौरव होता; त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या कवितेने निर्माण केलेल्या मंतरलेल्या दिवसांचा महिमा तुम्ही गायला होता. सेनापती बापटांवर लिहिताना तुम्ही ‘एका जुन्या सैन्याचा सेनापती’ असे बिरूद त्यांना लावले. डॉ. राममनोहर लोहिया या भारतीय रणपर्वातील पोलादी पुरुषाला उद्देशून तुम्ही ‘डॉ. लोहिया : एक रसिक तापस’ असे उत्स्फूर्त शब्द लिहून गेलात. व्यक्तित्वाच्या सम्यक बाजू न्याहाळण्याची प्रज्ञा तुमच्याकडे होती. समष्टीचे प्रगल्भ आकलन तुम्हाला होते. व्यष्टी आणि समष्टी यांचा गोफ कोणत्या शब्दांत गुंफावा याचे आत्मभान तुमच्याकडे होते. राम गणेशांच्या असामान्य प्रतिभेला उद्देशून तुम्ही ‘हे देवाघरचे लेणे’ असे लिहून गेलात. बाबा आमटे यांच्या कर्तृत्वशक्तीत तुम्हाला ‘एक विज्ञानयोगी’ दिसला. आम्ही हे सारे फक्त पाहतो; पण अंतरंग दिसते तुम्हाला : तुमच्या उत्तुंग प्रतिभाशक्तीला. डॉ. इरावतीबाई कर्वे यांच्या ज्ञानक्षेत्रातील अखंडित साधनेकडे कुतूहलाने पाहताना तुम्हाला ‘एक दीपमाळ’ दिसली. अक्षरांचा साक्षात्कार व्हायला मग विलंब लागत नाही. त्यांनादेखील तुमच्या चिंतनशीलतेकडे पाहून हात जोडावेसे वाटतात. संगीतक्षेत्र हे तुमचे मुक्तविहार करण्याचे खास प्रांगण असल्यामुळे तुम्ही मनाने जोडलेले अनेक ‘आप्त’ येथे भेटतात. त्यांची मांदियाळी अनुभवण्याची सुवर्णसंधी आम्हाला लाभते. मग ते भास्करबुवा बखले असोत, मल्लिकार्जुन मन्सूर असोत, पंडित वसंतराव देशपांडे असोत, कुमारगंधर्व असोत वा स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर असोत. नाटक आणि रंगभूमी हा तुमचा बहिश्‍चर प्राण. मग या क्षेत्रांतील दिग्गजांची वर्णी का नाही लागणार? आयुष्याची अबदागीर ज्यांनी अभिमानाने मिरवली ते श्रेष्ठ कलावंत एकत्रितपणे तुमच्या शब्दसृष्टीने फुलविलेल्या रंगमंचावर भेटतात. मग काय चमत्कार होतो?

आपण न पाहिलेल्या, न अनुभवलेल्या सुवर्णयुगात अलगद प्रवेश करतो. आमच्या नेणिवेला जाणिवेचे नेत्र लाभतात आणि पंचसंवेदना आकंठ आनंदाने तुडुंब भरून जातात. ही सारी किमया असते तुमच्यासारख्या शब्दप्रभूची! शब्दांमधील अंत:संगीत पारखणारे ‘आनंदयात्री बाकीबाब’ हे तर या रसपूर्ण मैफलीत हवेतच. अण्णासाहेब तथा शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांना तुम्ही ‘माझे एक दत्तक आजोबा’ असे संबोधले आहे. हे प्रेम शब्दांपुरते मर्यादित नाही. सर्वांगपरिपूर्ण जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तुपाठ अण्णासाहेब फडके यांनी दिला. त्याचे साग्रसंगीत दर्शन तुम्ही तन्मयतेने लिहिलेल्या त्यांच्या दीर्घ स्वरूपाच्या जीवनालेखातून घडविले आहे. तुमचे मातुल घराण्यातील आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ यांचे सरसरमणीय व्यक्तिचित्र तुम्ही ‘गणगोत’मध्ये ‘ऋग्वेदी’ या शीर्षकाने रेखाटले आहे. या आजोबांचे म्हणजेच अण्णासाहेबांचे व्यक्तिचित्र तुम्ही तितक्याच उत्कटतेने आणि समरसतेने उभे केले आहे. तुमच्या सर्व प्रकारच्या व्यक्तिचित्रांत ‘जिव्हाळा’ हा नवीन रस अनुभवायला मिळतो. कारण तुम्ही मनुष्यजन्मावर प्रेम करीत राहिलात. ‘माणसा’वर तुम्ही अलोट प्रेम केले. उदाहरणार्थ, ‘गणगोत’मधील छोटा ‘दिनेश’ असो वा मोठे ‘विनोबा’ अथवा ‘बळवंत मोरेश्‍वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे’ असोत. याला म्हणतात लेखकाची समदृष्टी, दृष्टिकोनातील विश्‍वात्मकता, म्हणूनच ना तुम्हाला रवींद्रनाथांइतकेच समुद्रापलीकडचे चार्ली चॅपलिन सारखेच प्रिय! कविवर्य नारायण सुर्वे म्हणायचे, ‘माणसाचं मन कसं सुपाएवढं असावं; संवेदनशील कवी-लेखकाचं तर दोन सुपांएवढं असावं’ किती साधासोपा विचार; पण किती मूलगामी! पु. ल., तुम्ही हा मंत्र तर संवेदनक्षम वयापासून मनात मुरवून घेतला होता!

वंगभूमीच्या सांस्कृतिक संचिताविषयी तुम्हाला ममत्त्व वाटायचं. तेथील समृद्ध वाङ्मयीन परंपरा तुम्हाला समजून घ्यावीशी वाटली. म्हणून तुमचे बंगालमधील स्नेही सलील घोष यांच्या मदतीने तुम्ही पन्नासाव्या वर्षी पश्‍चिम बंगालमध्ये गेलात. पर्जन्यकालात वृक्षांच्या पानांवरून टपटप् नाद करीत पाण्याचे पारदर्शी थेंब ओघळू लागले की, गुरुदेव टागोर कळीचे फूल व्हावे तितक्याच सहजतेने ‘पाताय पाताय टुपुर टुपुर नूपुर बाजे’ अशी नादमधुर रचना करायचे. त्यांचे भावविश्‍व समजून घेण्याच्या इराद्याने तुम्ही अल्पावधीतच बंगाली भाषा आत्मसात केली. ज्ञानोपासक आणि वाङ्मयाचा आस्वादक असावा तर तो तुमच्यासारखा! रवींद्रनाथांना 80 वर्षांचे समृद्ध आयुष्य लाभले. तुम्हीही 81 वर्षांचे अभिरुचिसंपन्न जीवन जगलात.

प्रामुख्याने विनोदी लेखन तुम्ही केलेत. त्या गुणवैशिष्ट्यामुळे तुमची वाङ्मयीन क्षेत्रात ठसठशीत मुद्रा उमटली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या गादीचे नंतरच्या पिढीतील समर्थ वारसदार अशी तुमची ख्याती आहेच. पण ती अपुरी आहे. नाटककार, संगीतकार, प्रवासवर्णनकार आणि समग्र जीवनाचे चिंतनशील भाष्यकार हे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील तेजस्वी पैलू कसे बरे विसरता येतील? तुमच्या व्यक्तिमत्त्वातील वृत्तिगांभीर्याकडे कुणी गांभीर्याने पाहिलेच नाही, असे म्हणावेसे वाटते. या संदर्भात ‘वंगचित्रे’ या पुस्तकातील पुढील आशयाकडे लक्ष केंद्रित करावेसे वाटते. ज्ञानाधिष्ठीत संस्कृतीची देवता असलेल्या सरस्वतीबद्दल तुम्ही जे समुचित उद्गार काढता, ते ज्ञानोपासकांना नवी प्रेरणा देणारे आहेत.

‘सरस्वतीइतके संस्कृतीचे सुंदर प्रतीक नसेल. चिखलातून उगवणार्‍या कमलाचे आसन-साक्षात माती आणि वाहत्या पाण्याचा आधार. संस्कृतात पाण्याला ‘जीवन’च म्हणतात. सुखदु:खाने भरलेल्या जीवनाचा आधार. एका हाती ग्रंथ आणि एका हाती मनाचे जाड्य नाहीसे करणारी वीणा. सर्व रंगांचे मीलन झाल्यावर निर्माण होणार्‍या शुभ्र रंगाचे वसन ल्यालेली. मानवी संस्कृतीला अंधारात किंवा कृत्रिम रीतीने फुलता येत नाही. तिला मातीचा आणि पाण्याचा आधार लागतो. ती एकाच रंगाच्या जीवनाचा आधार धरणारी असून भागत नाही. शुभ्रता म्हणजे रंगांचा अभाव नव्हे. सर्व रंगांचे मीलन. नुसते ज्ञान कोरडे; म्हणून त्याला सूरांची साथ असली की ते ज्ञान माणसाला विनाशाकडे न नेता विकासाकडे नेते. सप्तसूरांचा आणि सप्तरंगांचा जिथे आदर होतो तिथेच संस्कृती फुलते.’

चिंतनाने युक्त अशी तुमची वाणी लालित्याने बहरून येते. अल्पाक्षरांत रसिकतेचे रंग भरले जातात. तुमच्यासारख्या अभिरुचिसंपन्न माणसाचे सहजतेने लिहिणे व सहजतेने बोलणे अभिजाततेचे लेणे बनून जाते.

तुम्हाला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणा, पु. ल. देशपांडे म्हणा, पु. ल. म्हणा आणि अत्यंत जवळच्या स्नेह्यांप्रमाणे पी. एल. म्हणा. काही फरक पडत नाही. कारण तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामधील ‘पुरुषोत्तम’ हा केंद्रबिंदू कधी ढळणारा नाही. या प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांचे संगमतीर्थ असलेल्या ‘पुरुषोत्तमा’ला तेवढ्याच तोलामोलाची ‘सुनीता’ लाभली तर ते समृद्ध सहजीवन इतरांच्या जीवनाचा पाऊलवाटेवर आनंदाची पुष्प पखरण करीत राहते. आमच्या पिढीने हा आनंद मनसोक्त अनुभवला. यासाठी आम्ही तुमचे कायमचे ऋणी राहू. 

तुमची ती ‘वार्‍यावरची वरात’ असो, ‘असा मी असामी’ असो, ‘हसवण्याचा माझा धंदा’ असो किंवा ‘वटवट वटवट’ असो. ती केवळ शब्दांनी निर्माण केलेली वटवट असे कुणाला वाटले नाही. आनंदाच्या फुलांचा आणि परागांचा तो वर्षावच वाटला.

परिणतावस्थेत तुम्हा दोघांनी बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर आणि आरती प्रभू या कविश्रेष्ठांच्या कवितांचे अभिवाचन केले. तो परमनप्रवेश होता. रसार्द्रतेचा तो उत्कर्षबिंदू होता. शब्दसमाधियोग होता. रसिकांनी पंचेद्रियांनी अतींद्रिय आनंदाच्या नवानुभूतीचा आस्वाद त्या वेळी घेतला. पु. ल., तुम्ही ‘राजसंन्यास’चे पणजीच्या ‘कला अकादमी’च्या ‘दीनानाथ नाट्यगृहा’त अभिवाचन केले. त्या वेळच्या अनेक आठवणी मनात रुंजी घालताहेत.

आज पुन्हा एकदा ती संस्मरणे मनाच्या ‘कॅलिडोस्कोप’मध्ये साठविण्याचा प्रयत्न करीत आहे... त्या वेळी अस्तकालीन काषायमधुर आकाशरंगांनी गडकरी-प्रतिभेचे शब्द तुमच्या मुखातून बाहेर पडल्यावर, आतुरतेने ते पिऊन घेतले. पश्‍चिम समुद्राच्या लाटा किनार्‍यावर आपटत होत्या... आणि आनंदाच्या लाटाही रसिक मनात उमलत होत्या... ती अनन्यसाधारण घटिका होती... श्रुती धन्य जाहल्या होत्या! 

पु. ल., तुमच्या जीवनाचा चरित्रपट या ठिकाणी मांडायचा नाही. काही अधोरेखिते येथे मांडावीशी वाटतात. तुम्ही उभ्या-आडव्या महाराष्ट्रात अनिरुद्ध संचार केला. तेवढ्यापुरते तुमचे कर्तृत्वक्षेत्र मर्यादित नव्हते. तर सार्‍या भारतात आणि बाहेरील देशातही तुमची कीर्ती पसरलेली होती. ‘सबकुछ पु. ल.’ अशी तुमची अप्रतिम प्रतिमा आहे. त्यामागे तुमचे अपार कष्ट आहेत. मुंबई, पुणे, सांगली येथे तुमची तरुण वयात स्थलांतरे झाली. तुम्ही एम. ए. होताना तुम्हाला कवी गिरीशांचे पालकत्व लाभले, पितृघराण्याचा आणि मातुल घराण्याचा रसिकतेचा वारसा तुम्ही निगुतीने जपला.

1944 मध्ये बी. ए. झाल्यावर दादरच्या ‘ओरिएन्ट हायस्कूल’मध्ये तुम्ही अल्पकाळ अध्यापन केले. एम. ए. झाल्यावर बेळगावच्या ‘राणी पार्वतीदेवी महाविद्यालय’, त्यानंतर मुंबईच्या ‘कीर्ती कॉलेज’मध्ये आणि मालेगावच्या शिक्षणसंस्थेत तुम्ही अध्यापनाचे कार्य केले.

बडोद्याच्या ‘अभिरुची’ या ख्यातनाम वाङ्मयीन नियतकालिकात ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र लिहून तुम्ही लेखनाचा ओनामा केला. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या बहुचर्चित पुस्तकाची आदिप्रेरणा म्हणून तुमच्या या सुरुवातीच्या लेखनाकडे पाहावे लागेल. ‘गणगोत’मधील व्यक्तिरेखा काहीशा वेगळ्या धाटणीच्या. गांभीर्ययुक्त. पण तुमच्या मन:प्रवृत्तीतील नर्मविनोद कुठेच लपून राहत नाही. ह्या व्यक्तिरेखादेखील खास पु. ल. स्पर्शाच्याच. यातली कोणती सरस हे ठरवणे कठीण. त्यांतही पुन्हा ‘इंटरनॅशनल पुरंदरे’, ‘रावसाहेब’, ‘मला दिसलेले विनोबा’ आणि ‘म्युझिक डा(यरे)क्टर केशवराव भोळे’ या व्यक्तिरेखा अविस्मरणीय.

अनेक नाटकांत आणि 24 मराठी चित्रपटांत तुम्ही काम केले. ‘गुळाचा गणपती’मधील तुमची भूमिका अजूनही रसिकजनात ठाण मांडून बसलेली आहे. तुम्ही कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या चित्रपट निर्मितीच्या अंगोपांगांत कौशल्य प्रकट करून आपली आगळी-वेगळी मुद्रा उमटवली आहे.

डिसेंबर 1955 मध्ये तुम्ही ‘पुणे आकाशवाणी’वर रुजू झालात. स्वप्रतिभेच्या विकासाबरोबरच दुसर्‍यांना प्रोत्साहन देण्याची उदार मानसिकता तुमच्यामध्ये होती. डॉ. आनंद यादवांच्या सुरुवातीच्या ‘हिरव्या अक्षरां’ना तुम्ही उत्तेजन दिले. दया पवारांच्या ‘बलुतं’ या आत्मचरित्राची तुम्ही पाठराखण केलीत. ‘दु:खाने गदगदलेलं झाड’ असं त्यांच्या संवेदनशीलतेचं वर्णन तुम्ही केलंत. प्रकाश नारायण संत यांच्या ‘वनवास’मधील लंप्याचं भावजीवन तुम्हाला इतकं भावलं की तुम्ही म्हणालात,

‘लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी या कथा मॅडसारख्या वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतील. एका निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चटकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे, या आनंदात मी आहे.’

तुम्ही केलेली ही प्रशंसा वरपांगी स्वरूपाची नाही. एक सूज्ञ, चोखंदळ रसिकाग्रणीची दिलेली ही पाठीवरची थाप आहे. ‘गुणी गुणान् वेत्ति’ या युक्तीनुसार ती समानधर्मेपणाची आहे. दोषदिग्दर्शन करीत बसण्यापेक्षा कमलगंध शोधणारी आहे. युगमानसाच्या स्पंदनांशी एकरूप होणार्‍या, तुमच्या स्वागतशील मनाची आहे...

तुमच्या संवेदनशीलतेची समलय खरोखर वाखाणण्यासारखी... जसे तुम्ही उमलत्या प्रतिभेविषयी बोलता / लिहिता तसेच ज्येष्ठांबद्दलही लिहिता. ‘आनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधना’ हे गुरुदेवांचं चरित्र बा. भ. बोरकर यांनी समरसतेने लिहिलं. ही प्रक्रिया कशी आहे? एका श्रेष्ठ कवीला तितक्याच समर्थ कवीने समजून घेणे. हा हृदयसंवाद असंख्य रसिकांपर्यंत पोचविणे. या रसमय चरित्राला तुम्ही लिहिलेली ‘दोन आनंदयात्रिकांचे मनोमीलन’ ही आस्वादात्मक प्रस्तावना वाचल्यानंतर रसज्ञतेची तिसरी मिती मिळाल्याचा अपरिमित आल्हाद लाभतो.

‘पुणे विद्यापीठा’त तुम्ही रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची काव्यनिर्मिती, त्यांचे विविधांगी कर्तृत्व, ‘शांतिनिकेतन’चा अभिनव प्रयोग आणि त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व यासंबंधी संक्षेपाने घडवलेलं रसग्राही विवेचन मनाला भावतं. तेथील तत्कालीन वातावरणात नेऊन तिथे घडल्या जाणार्‍या संपन्न भावविश्‍वाची परिक्रमा घडवून आणतं. ‘वंगचित्रे’बद्दल कितीदा लिहावे? एका संपन्न वाङ्मयीन आणि सांस्कृतिक भूमीचा मर्मदृष्टीने तुम्ही मागोवा घेतला आहे. येथे विविध प्रवृत्तीच्या माणसांच्या व्यक्तिरेखांची जी गुंफण आहे, ती मनोहारी स्वरूपाची आहे...

तुमच्या आयुष्यातील आणखी एक पैलू अधोरेखित करावासा वाटतो. 1959 ते 1961 या कालावधीत भारतातील दूरदर्शनचे पहिले निर्माते म्हणून तुम्ही उमटविलेली मुद्रा हा प्रसारमाध्यमांतील एका क्षेत्रात प्रकट केलेल्या मर्मदृष्टीचा द्योतक म्हणता येईल.


Read Also : An unpublished speech of P. L. Deshpande


पु. ल., तुमच्या विविधांगी साहित्य प्रवासाचा मागोवा थोडक्यात कसा घेता येईल? मराठीतील विनोदी वाङ्मयाच्या क्षेत्रातील तुमचे कर्तृत्व नेत्रदीपक स्वरूपाचे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, जीवनाच्या विविध क्षेत्रांतील विपुल संदर्भ, शब्दनिष्ठ विनोदनिर्मिती, उपहास-उपरोध-विडंबनचातुर्य, मराठी भाषेवरील तुमचे असामान्य प्रभुत्व ही तुमच्या शैलीची गुणवैशिष्ट्ये. ती भाषा वाकविण्याची तुमची विलक्षण ताकद ठायी ठायी प्रत्ययास येते. याचबरोबर जीवनातील सुसंगतीविषयीचे उत्कट प्रेम, जीवन सुंदर करण्याची अदम्य प्रेरणा, काठोकाठ भरलेली रसिकता आणि जीवनाच्या तळाशी पाझरणारी करुणा यांचेही तितकेच दर्शन घडते.

‘बटाट्याची चाळ’, ‘खोगीरभरती’, ‘नसती उठाठेव’, ‘गोळाबेरीज’, ‘हसवणूक’, ‘खिल्ली’, ‘मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास’, ‘पुरचुंडी’ आणि ‘उरले सुरले’ इत्यादी विनोदी पुस्तकांत समकाळातील जीवनाच्या राजकीय, सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पैलूंवर तुम्ही विनोदाद्वारे मर्मभेदक भाष्य केले आहे. पण यात वैयक्तिक विखाराचा लवलेश नाही, निंदा-नालस्ती नाही. जीवनातील दु:खाचा निचरा करणारी प्रसन्न चित्तवृत्ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात भरून राहिलेली आहे. तीच झुळझुळणार्‍या प्रवाही निर्झरासारख्या तुमच्या जीवननिष्ठेत आहे, अमोघ भावाशैलीत आहे.

पु. ल., तुमच्या विनोदी वाङ्मयनिर्मितीचा शोध घेताना एक आठवण आवर्जून उद्धृत करावीशी वाटते. 1974 मध्ये इचलकरंजी येथे भरलेल्या सुवर्ण महोत्सवी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तुम्ही भूषविलेत. म.सा.प.च्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’च्या, त्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या विशेषांकाविषयी डॉ. आनंद यादवांनी तुमची मुलाखत घेतली होती. ती अत्यंत खुमासदार होती. त्यांनी तुम्हाला प्रश्‍न विचारला होता, ‘पु. ल., रसिकांना निखळपणे हसविणारा विनोद तुम्हाला सुचतो तरी कसा?’ तुम्ही तत्काळ उत्तर दिले होते, ‘डॉ. यादव, मी वृत्तिगांभीर्याने जीवनातील प्रसंग टिपत असतो. तुम्हा लोकांना त्यात विनोद दिसतो.’

तुमच्या या बोलण्यातून तुमच्या मानवी जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचे प्रतिबिंब दिसून येते. तुम्हाला दुर्मुखलेले कुणी पाहिले नाही. जीवनाच्या उत्तरायणात जडलेल्या ‘पार्किन्सन’ या आजाराच्या प्रसंगीदेखील... या आनंदयात्रेमुळे दु:खेदेखील दूर पळून जात असावीत. निरामय देहाइतकेच निरामय मन असावे लागते. ते तुम्हाला कधीच सोडून गेले नाही... ही तुमच्या जीवनचरित्राची अपूर्वाई!

पु. ल., ज्या थोरा-मोठ्यांशी तुमचा संवाद घडला, सहवास प्राप्त झाला आणि विविध कलाक्षेत्रांतल दिग्गजांशी मैत्र जुळले, तुमचे जीवन समृद्ध झाले. अभिरुचीसंपन्न झाले. तो पट प्रदीर्घ आहे. तो संक्षेपाने कसा मांडता येईल?

तुम्हाला तुमच्या आयुष्यात सहस्त्रचंद्रदर्शनाचा लाभ झाला. तुम्हाला प्रिय असलेल्या गोमंतभूमीतही तो शानदारपणे साजरा झाला. मात्र तो झाला, तुमच्या विकल अवस्थेत. तुमचे निकटचे आप्त असलेले गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पद्माकर दुभाषी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते... प्रा. स. ह. देशपांडे प्रमुख वक्ते या नात्याने आले होते. योगायोगाने ज्ञानेश्‍वर नाडकर्णी त्या वेळी गोव्यात होते. तेही तुमच्याविषयी जिव्हाळ्याने बोलले. कुलगुरूंना उद्देशून तुम्ही म्हणालात, “तुम्हाला मी कुलगुरू म्हणू की नुसतं पद्माकर म्हणू?” डॉ. दुभाषी चटकन उद्गारले, “पद्माकरच म्हणा.”

पु. ल., ही आठवण एवढ्यासाठीच उद्धृत कराविशी वाटली याचे कारण की, तुमच्या वागण्यातील अनौपचारिकता, सहजता आणि ऋजुता कळावी...

पद्माकर दुभाषींनी तेव्हाच्या मॅट्रिकच्या परीक्षेत अत्युच्च यश प्राप्त केले होते. वयाने तुम्ही ज्येष्ठ! त्यांना हरी नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो?’ ही कादंबरी तुम्ही भेट म्हणून दिली होती.

पु. ल., तुमच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वातील प्रथितयश नाटककार हा पैलू अधोरेखित केल्याशिवाय हा संवाद पूर्ण होणे अशक्य! ‘तुझं आहे तुजपाशी’ ही तुमची अक्षय आनंद प्राप्त करून देणारी नाट्यकृती. तिच्यातील काकाजींच्या व्यक्तिरेखेचा विसर रसिकांना कसा पडेल? तुमच्या विनोदी एकांकिकांनी मराठीच्या नाट्यक्षेत्रात आणि रंगभूमीवर संहिता आणि प्रयोग या दोहोंचा विचार करता खळाळते चैतन्य निर्माण केले. मराठी नाट्यसृष्टीत आधुनिकतेचा स्पर्श व्हावा म्हणून आणि नवीन आशयसूत्रे पुरवावीत हे प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून विश्‍वसाहित्यातील उत्तमोत्तम नाट्यकृतींची तुम्ही भाषान्तरे-रूपान्तरे केली. परभाषेतील हे वाग्वैभव मातृभाषेत आणताना तुम्ही या मातीशी प्रामाणिक राहिलात. प्रगल्भ जीवनदृष्टी सतत बाळगली. तुमच्या असामान्य प्रतिभेच्या विलोभनीय आविष्कार म्हणून तुमच्या या नाट्यकृतींकडे पाहावे लागेल. मराठीच्या नाट्यक्षेत्रातील यशामुळे तुम्हाला औरंगाबाद येथे भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद तरुण वयातच लाभले. दिग्गज नाटककार आचार्य अत्रे या संमेलनाला आवर्जून उपस्थित होते. तुमच्या प्रतिभेची ओळख त्यांना पटलेली होती. 

पु. ल., तुम्ही समाजसन्मुख वृत्तीचा आदर्श निर्माण केला. तुम्ही 1966 मध्ये स्थापन केलेल्या ‘पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान’कडे या संदर्भात अंगुलिनिर्देश करावा लागेल ‘जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेंच करी’ ही तुकारामांची उक्ती तुम्हाला आणि सौ. सुनीताबाईंना सार्थपणे लागू पडेल. सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रांत कार्य करणार्‍या किती तरी संस्थांना तुम्ही भरघोस देणग्या दिल्या. तुम्हाला आजवर शासनाकडून आणि अन्य महत्त्वाच्या संस्थांकडून किती तरी पुरस्कार लाभले. मानसन्मान प्राप्त झाले. पण सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून, तुम्ही सारे धन लोकांच्या अभ्युदयासाठी उदारहस्ते देऊन टाकले, तुमच्यासारखा दाता दुर्मिळच. 

आणीबाणीच्या प्रसंगी अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी तुम्ही शासनाशी केलेला संघर्ष अतुलनीय स्वरूपाचा. दुर्गाबाईंनीही अशीच तोफ डागली होती. स्वकीयांचे सरकार अशी ताठर भूमिका लोकशाहीची वाटचाल करणार्‍या राष्ट्रात घेऊ शकते, याची सुतराम कल्पना कुणालाच नव्हती. पण ते घडले. अशा प्रसंगी तुम्ही जी जागरुकता दाखवली ती प्रशंसनीय स्वरूपाची. तुम्ही पत्रातून जनतेला आवाहन केले होते, ‘आणीबाणीच्या काळातले निर्घृण अत्याचार आणि अमानुष मुस्कटदाबी यांची पुनरावृत्ती होऊ नये असे ज्यांना वाटते त्यांनी मनुष्यधर्माच्या पालनासाठी, भारतीय लोकशाही टिकवण्यासाठी, हुकूमशाही आणि वंशपरंपरागत चालणारी सरंजामशाही नष्ट करण्यासाठी जनता पक्षाच्याच उमेदवारांना बहुसंख्येने निवडून दिले पाहिजे.’

पु. ल., अशी जीवनाच्या सम्यम अंगोपांगांकडे चौफेर नजरेने पाहणारी तुमची प्रतिभा तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या या सप्तरंगी इंद्रधनूचे वर्णन करताना शब्द अपुरे ठरतात.

तुमच्या 103 व्या जयंतीच्या प्रसंगी तुम्हाला विनम्र अभिवादन!

- डॉ. सोमनाथ कोमरपंत, मडगाव, गोवा.
somnathpant@gmail.com
(लेखक मराठी साहित्य समीक्षक असून त्यांनी गोवा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पदावरून काम पाहिले आहे.)

Tags: Pu La Deshpande letter to p l deshpande marathi literature Load More Tags

Comments:

मुकुंद दीक्षित, नाशिक.

पु लं नी माझ्या लग्नात स्वरचित मंगलाष्टक म्हटले कारण मी बाबा आमटे यांचा कार्यकर्ता, वासंती व माझे लग्न बाबांनी आनंदवनातील मित्रमेळाव्यात बारा महारोगी जोडप्यांबरोबर सामूहिक विवाह सोहळ्यात लावून दिले. हे इथे माझं कौतुक सांगण्यासाठी नव्हे तर या घटनेची नोंद या लेखासंबंधाने व्हावी असं वाटलं म्हणून. जगन मचकले, हरी बढे, विलास मनोहर, प्रकाश आमटे यांच्या लग्नात पण पु लं नी अशाच प्रसंगात मंगलाष्टक म्हटले होते. पत्रात्मक लेख अतिशय हृद्य झाला आहे. इतर अनेकांसारखे माझे पण भाईंशी 1977 पासून खूप मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणून हा खूप मनापासून लिहिलेला लेख अधिकच भावला.

विष्णू दाते

पु ल ते पु लच!! एकमेवाव्दितीय!! असे पुलं पुन्हा होणे नाही!!!

नंदकिशोर लेले पुणे

आपलं पत्र खूपच भावपूर्ण आहे. पत्रातील साहित्य कृतींचा उल्लेख यातून पुलं यांच हे साहित्य आवर्जून वाचलं पाहिजे हे कळतं. साहित्य ,नाट्य, चित्रपट संगीत आणि सामाजिक कालपटावर पु लं ची कारकीर्द सतत झळाळत आहेच.नवीन पिढी ही हे त्यातील श्रेष्ठत्व आणि वेगळं पण अनुभवत आहे.सर्वं सामान्य वाचक रसिकांना झालेलं त्यांचं दर्शन आणि आपल्यासारख्या साहित्यक्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या यांना झालेलं दर्शन यातील फरक आपल्या या पत्ररूपी लेखातून कळतो.एक आंतरिक जिव्हाळा या लेखनात ठायी ठायी जाणवतो. आपण त्यांना प्रत्यक्ष पाहिलं ऐकलं अनुभवलं हा भाग्ययोगच आहे.त्यांचं वंगचित्रे हे पुस्तक लवकरच वाचायला घेईन.सर हृदयस्थ पत्ररूपी संवाद खूप छान वाटला. आपणास ही अभिवादन.

Dattaram Jadhav

सदर लेख अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीला आहे. जिव्हाळ्याने भिजला आहे. अवघे पु.ल.समोर उभे राहिले - उत्तुंग कर्तृत्व समजले.

शरयू आसोलकर

आजच्या पिढीसाठी आणि सर्वांसाठी संदर्भमूल्य असणारा भावपूर्ण लेख. धन्यवाद सर.

Add Comment

संबंधित लेख