भारतीय संस्थानांच्या इतिहासाचा धांडोळा

सुनीत पोतनीस यांच्या ‘बखर संस्थानांची’ या पुस्तकाचा परिचय.

हे पुस्तक वाचत असताना वाचक म्हणून आपल्याला काही प्रश्न पडतात. ब्रिटिशांनी खेळलेल्या धूर्त खेळी अशा की, ज्या ज्या वेळेस एखादं राज्य किंवा संस्थान अडचणीत सापडलं रे सापडलं की त्यांना मदत करण्याचं आमिष दाखवत त्या संस्थानात प्रवेश करायचा डाव ब्रिटिश साधून घेत असत. परंतु राज्य व संस्थान वाचवण्याच्या नादात उलट आपण आपलं संस्थान ब्रिटीशांच्या घशात घालत आहोत हे कसं उमजत नव्हतं या राज्यकर्त्यांना?

पेशवाईची सुरुवात हा जर मध्य मानला तर पेशवाईच्या अगोदर आणि पेशवाईनंतरच्या इतिहासात भारतामध्ये लहान-मोठी जवळपास 565 संस्थाने होती. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली ही संस्थाने मग दुर्लक्षिली का गेली? याचे कारण या संस्थानांचे संस्थानिक हे जन्मानेच संस्थानिक होते, आपल्या कर्माने नव्हे. या 565 संस्थानांपैकी महत्त्वाच्या 39 संस्थानांचा आढावा घेतला आहे सुनीत पोतनीस यांनी, त्यांच्या ‘बखर संस्थानांची’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये...

ब्रिटिशांच्या काळात दोन प्रकारचे शासकीय प्रदेश होते. एक प्रदेश जो ब्रिटिशांनी स्वतः जिंकलेला आहे किंवा ब्रिटिशांच्या राज्यामध्ये विलीन झालेला आहे. दुसरा प्रदेश जो असेल भारतीयांचा पण अंकित असेल मात्र ब्रिटिशांना, त्याला आपण ‘रियासत’ किंवा ‘संस्थान’ असे म्हणतो. या संस्थानांचा इतिहास हा रंजकतेने भरलेला आहे. हा इतिहास काही संस्थानांनी केलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक प्रगतीचा आहे, तसेच काही संस्थानिकांच्या विलासी वृत्तीचाही आहे. विलासी वृत्ती इतकी की, 801 कुत्रे पाळणारे आणि पाळीव कुत्रीच्या लग्नावर लाखो रुपये खर्च करणारे तसेच पेपरवेट म्हणून 185 कॅरेटचा ‘जेकब’ हिरा वापरणारे संस्थानिक होते. तसेच प्रसंगी प्रतिष्ठेसाठी ‘रोल्स रॉईस’ गाड्यांमधून कचरा वाहणारे होते.

ही भारतीय संस्थाने खालसा करण्यात सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मोठा हातभार लावला. लॉर्ड डलहौसीच्या काळानंतर ‘डॉक्टरीन ऑफ लॅप्स’ किंवा ‘खालसा धोरण’ हे शस्त्र प्रभावीपणे वापरले गेले. ब्रिटिशांनी ज्या संस्थानांच्या राज्यकर्त्यांना पुरुष वारसदार नाहीत ती संस्थाने या कायद्याखाली धडाधड खालसा करायला सुरुवात केली. संस्थाने आपली अंकित कशी होतील याची पूर्ण खबरदारी धूर्त ब्रिटिशांनी घेतली होती. संस्थानिकांची अवस्था दात नसलेल्या सापाप्रमाणे करून ठेवायची असे त्यांनी ठरवले. त्यांचे अधिकार काढून घेतले गेले. भारतीय राज्यकर्ते जरी स्वतःला ‘महाराजा’, ‘राजा’, ‘नवाब’, ‘मीर’ म्हणवून घेत तसेच स्त्री राज्यकर्त्या स्वतःला ‘बेगम’, ‘महाराणी’ वगैरे म्हणून घेत असल्या तरी ब्रिटिशांच्या लेखी याला काडीचीही किंमत नव्हती. मुळात, भारतीय राजांना राजा (किंग) व त्याच्या राज्याला राज्य (किंग्डम) असे ब्रिटिश कधी मानतच नव्हते. ते राज्यांना ‘प्रिन्सली स्टेट’ असं म्हणत. म्हणजे आमचे अंकित असलेले हे भारतीय ‘राजे’ म्हणण्यास पात्र नाहीत. म्हणून ब्रिटिशांनी भारतीय संस्थानिकांचे राजमुकुट कायद्याने काढून घेतले. मुकुट घालण्याचा अधिकार हा फक्त ब्रिटनच्या राजाला किंवा राणीलाच असेल. मग दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी भारतीय राज्यकर्त्यांनी हिरेजडित फेटे, पगड्या बांधायला सुरुवात केली.

काही संस्थानांचा इतिहास वाचल्यावर फार अंतर्मुख व्हायला होते. इंदूर संस्थानचे राजे तुकोजीराव तृतीय यांनी तीन विवाह केले. तिसरा विवाह अमेरिकन तरुणी नॅन्सी ॲन मिलर हिच्याशी झाला होता. नॅन्सीने स्वतःहून विवाहाआधी हिंदू धर्म स्वीकारला होता. हे धर्मांतर इंदूरातील होळकरांना मान्य नव्हते. होळकरांचे त्यावेळचे राजवैद्य (डॉक्टर) यांनी ही समस्या सोडवण्यासाठी थेट शंकराचार्यांना पाचारण केले. विशेष म्हणजे शंकराचार्यांनी या धर्मांतराला होकार तर दिलाच वर स्वतः इंदूरात येऊन हा धर्मांतर विधीही स्वहस्ते पार पाडला होता.

पुस्तकात काही लोकांबद्दल वाचून तर मन भरून येतं. सध्या सातारा जिल्ह्यातील औंध हे एकेकाळचं फार मोठं संस्थान. या संस्थानातील एक संस्थानिक म्हणजे भवानराव पंतप्रतिनिधी. हे भवानराव कलेचे प्रचंड भोक्ते होते. राजा रविवर्मा यांच्याशी भवानरावांचा चांगला स्नेह होता. भवानराव उर्फ बाळासाहेब हे स्वतः उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनासाठी ते स्वतः काव्यरचना देखील करीत असत. भवानराव कीर्तनाची तयारी सहा-सहा महिने अगोदर करीत असत. इतकंच नव्हे तर स्त्री कीर्तनकारांनाही भवानरावांनी तयार केलं होतं. सहा-सहा महिने कीर्तनाची तयारी करणारे भगवानराव कुठे आणि कीर्तनाच्या, प्रबोधनाच्या नावाखाली ‘स्टँड-अप कॉमेडी शो’ करणारे आजचे कीर्तनकार कुठे? याच औंध संस्थानात भवानराव, महात्मा गांधी आणि मॉरिस फ्रिडमन या तिघांनी मिळून एक अभिनव प्रयोग केला होता. भारतीय संस्थानांच्या इतिहासात हा प्रयोग ‘औंध एक्सपिरिमेंट’ म्हणून ओळखला जातो. संस्थानांचा कारभार लोकप्रतिनिधींकडे सोपवावा अशा प्रकारचा हा प्रयोग होता. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचलेलं बरं.

गुजरातमधील कच्छ संस्थानचे मिर्झा महाराज खेनगर (तृतीय) यांची कारकीर्ददेखील अशीच अतिशय उज्ज्वल होती. त्यांनीच ‘कच्छ स्टेट रेल्वेसेवा’ सुरू केली होती. राज्यात अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या. गुजरातमधील सर्वात जुनं म्युझियम म्हणजेच ‘फर्ग्युसन म्युझियम’ जे आज ‘कच्छ म्युझियम’ म्हणून ओळखलं जातं, त्याची स्थापनादेखील यांनीच केली होती. या खेनगरजींचं इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाशी तर अतिशय मित्रत्वाचं नातं होतं. खेनगरजींच्या प्रत्येक लंडन भेटीत त्यांचा मुक्काम थेट बंकिंगहम पॅलेसमध्येच असायचा. इतकंच नव्हे तर भारतातील व्हाइसरॉयलाही राणीची भेट हवी असल्यास खेनगरजींचाच वशिला लावावा लागायचा. कच्छ मधील ‘कच्छ, गुर्जर, क्षत्रिय’ ऊर्फ ‘के.जी.के’ या समाजाने 1950 पासून आजतागायत भारतीय रेल्वे मार्ग आणि त्या मार्गावरील पुलांची कामे केली आहेत, म्हणून पोर्तुगीजांनी या समाजाला ‘मिस्त्री’ हे नाव दिले. आपण बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम ही कामे करणाऱ्यांनापण ‘मिस्त्री’ म्हणतो, त्याचं हे मूळ असावं असा एक अंदाज आहे.

कपूरथळा संस्थानच्या प्रकरणात ‘मालेरकोटला’च्या नवाबाचा उल्लेख आहे. फाळणी झाल्यानंतर उठलेल्या जातीय दंगलीत मालेरकोटलामध्ये मात्र आपल्याला हिंदू-मुस्लिम-शिख यांच्यात धार्मिक सलोखा दिसून येतो. हा धार्मिक सलोखा थेट अठराव्या शतकापासूनचा आहे. जेव्हा शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंहांच्या मुलांना ‘सरहिंद’च्या नबाबाने भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा फर्मावली होती, तेव्हा याच मालेरकोटलाच्या नवाबाने त्या शिक्षेविरोधात सरहिंद नबाबाला भर दरबारात ‘ही शिक्षा कशी कुराणाच्या विरोधात आहे’ हे सुनावले होते. ही गोष्ट जेव्हा गुरुगोविंद सिंहांना समजली तेव्हा त्यांनी मालेरकोटलाच्या नवाबाचे आभार मानले. किशनगड संस्थानाच्या प्रकरणात सरूप सिंहांच्या मृत्युपत्राचा उल्लेख आहे. ते मृत्युपत्र मुळातूनच वाचण्यात मजा आहे. याच किशनगडचे महाराजा मदनसिंह बहादूर यांच्या कार्यकाळात प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यासाठी इतर आवश्यक उपाययोजना तर त्यांनी केल्याच पण एक महत्त्वाचा कायदा त्यांनी पारीत केला, त्याने माझे लक्ष जास्त वेधून घेतले. महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा करताना किशनसिंगांनी समाजात लग्नकार्यात होत असलेल्या अनावश्यक खर्चाला कायद्याने पायबंद घालता होता.

या पुस्तकात स्वतःचा खासगी आणि राज्याचा जमाखर्च स्वतः स्वतःच्या हाताने लिहिणारे एकमेव भारतीय राज्यकर्ते महादजी शिंदे हेही लक्ष वेधून घेतात. हिंदूंचा पराकोटीचा द्वेष करणारा सिकंदर बुतशिकन असो की ‘रणजी करंडक’ हे नाव ज्या जामनगरच्या राजाच्या नावावरून पडले तो रंजीत सिंह असो, यांच्याबद्दल चिक्कार माहिती वाचायला मिळते. जामनगरच्या दिग्विजय सिंग या महाराजाने पाचशे पोलिश मुला-मुलींची दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सुटका करून त्यांना जहाजात भरून भारतात आणलं आणि चार-पाच वर्षं त्यांचं पालकत्व स्वीकारलं. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर व ही मुलं मोठी झाल्यावर त्यांनी वेळोवेळी जामनगरला भेट देऊन जामनगरच्या राजाची कृतज्ञता व्यक्त केली. 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या भयंकर भूकंपानंतर या मुलामुलींपैकी जे जिवंत होते त्यांनी गुजरातला मोठी आर्थिक मदत देऊ केली. स्वतः तर मदत केलीच केली वर पोलंड सरकारलाही मदत करायला लावली हे विशेष. कृषी बँक स्थापन करणारा दक्षिणेकडील चामराजा हा पहिला संस्थानिक. 1905 मध्ये विद्युत दिव्यांनी रस्ते उजळून टाकणारे आशिया खंडातील पहिले संस्थान म्हणजे चामराजाचे मैसूर हे होय.

हे पुस्तक वाचत असताना वाचक म्हणून आपल्याला काही प्रश्न पडतात. ब्रिटिशांनी खेळलेल्या धूर्त खेळी अशा की, ज्या ज्या वेळेस एखादं राज्य किंवा संस्थान अडचणीत सापडलं रे सापडलं की त्यांना मदत करण्याचं आमिष दाखवत त्या संस्थानात प्रवेश करायचा डाव ब्रिटिश साधून घेत असत. परंतु राज्य व संस्थान वाचवण्याच्या नादात उलट आपण आपलं संस्थान ब्रिटीशांच्या घशात घालत आहोत हे कसं उमजत नव्हतं या राज्यकर्त्यांना? बहुतेक संस्थानांसोबत ब्रिटिशांनी केलेल्या करारात दोन महत्त्वाची कलमं सर्व ठिकाणी समान दिसतात. 1) त्या संस्थानांनी ब्रिटिशांची तैनाती फौजा संरक्षणासाठी ठेवायची. 2) या संस्थानिकांनी ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय कुणाशीही लढाई किंवा हातमिळवणी करू नये. या दोन्ही कलमांमधली चलाखी लक्षात न येण्याजोगी अशी काय कुचंबणा व्हायची या संस्थानिकांची? शेजारपाजारची संस्थानं अशाप्रकारे ब्रिटिशांनी या कायद्याखाली गिळंकृत केलेले असताना इतर संस्थाने सावध कशी झाली नाही? हे सर्व वाचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी या संस्थानिकांची तुलना केल्यास महाराजांच्या स्वराज्यात प्रजा जास्त सुखी होती असं म्हणावं लागेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात जीवनावश्यक मूलभूत सेवा, अगदी सहजपणे, सुलभपणे स्वस्त दरात, चांगल्या दर्जाने प्राप्त होत होत्या. जनतेच्या या गोष्टींसोबत मात्र संस्थानिकांची कोणतीच बांधिलकी दिसून येत नाही; अर्थात काही अपवाद वगळता.

इंग्रजांमुळे इथे समानता आली हा एक हास्यास्पद दावा आहे. मुळात इंग्लंडमध्ये त्यावेळी त्यांचे उच्चनीचतेचे, भेदभावाचे निकष वेगळे होते. शिवाय इंग्रज हे भारतात बाहेरून आलेले होते. तेव्हा त्यांना भारतातील ब्राह्मण आणि दलितही सारखेच होते. पण ब्रिटिशांची ही एक मोठी देणगी आहे आपल्याला की, त्यांनी कायद्याचं राज्य आणलं आणि कायद्यासमोर सर्वांना समान मानलं. अर्थात यातही अपवाद आहेतच, तरी पण ही वरील गोष्ट मान्य करावीच लागेल. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे समाजाचा मणका ज्या गोष्टीमुळे मजबूत होत असतो ती शिक्षण व्यवस्था या संस्थानिकांच्या काळात तर अक्षरशः खिळखिळी झालेली होती. प्रतिकार करण्याचं शिक्षणच देऊ न शकणारी शिक्षण व्यवस्था ज्या समाजात असेल तिथे तो देश दीडशे वर्षं पारतंत्र्यात गेला यात नवल ते काय? राज्य ही एक गाडी समजली तर ती चालण्यासाठी त्याला अनेक चाकांची गरज असते मग त्यात शिक्षण, अर्थशास्त्र, प्रशासन, उद्योग, अशा बऱ्याच गोष्टी येतात. तसेच या गोष्टी समजून घेण्याची दूरदृष्टी असलेला राजाही असावा लागतो. आपली नेमकी इथेच बोंब होती / आहे.

बखर संस्थानांची
लेखक : सुनीत पोतनीस
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पाने : 398, किंमत : ₹600

- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com

Tags: book reviews bakhar sansthananchi literature marathi sahitya suneet potnis rajahans prakashan Load More Tags

Comments:

Ramrao Talekar

Eeitihasachi.Khupch.chan.mahiti.aahe.ya.pustkat.

Add Comment

संबंधित लेख