निसर्गविनाश थांबवण्यासाठीची शेवटची हाक!

अतुल देऊळगावकर लिखित 'निसर्गकल्लोळ' या पुस्तकाचा परिचय..

हवामान बदलामुळे मानवजातीचे व जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. निसर्ग विनाशामुळे तरुणाई कधी नव्हे ते आज सर्वात जास्त मानसिक तणावाला सामोरी जात आहे. मनाला आल्हाद प्रदान करेल असा निसर्गच आज आपण आपल्या सभोवताली बाकी ठेवलेला नाही. अशा या निसर्ग विनाशाचा पर्यावरणीय, अर्थशास्त्रीय, मानसशास्त्रीय, साहित्यिक, सांगितिक, वास्तुशास्त्रीय, आध्यात्मिक या विविध अंगांनी मानवावर होणारा परिणाम विषद केला आहे, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी, 'निसर्ग कल्लोळ' या त्यांच्या नव्या पुस्तकात. ‘राजहंस प्रकाशन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

आपल्याकडे सर्वसामान्य व्यक्तिंची पर्यावरणाबद्दलची जी समज आहे ती फक्त 'झाडे लावा झाडे जगवा', 'पाणी अडवा पाणी जिरवा' आणि गेला बाजार 'गप्पी मासे पाळा हिवताप टाळा' इथपर्यंतच मर्यादित असते. पर्यावरणाची व्यापकता ही अशा चटकदार घोषवाक्यांपुरती तर अजिबात मर्यादित नाही. तसेच ती व्यापकता केवळ हवा, पाणी, झाडे इथपर्यंतही मर्यादित नाही. उलट असं म्हणता येईल की, पर्यावरणाच्या अभ्यासाची संवर्धनाची सुरुवात मात्र ही या गोष्टींपासून होते. हवेच्या प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक म्हणून आपण वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड यांना जबाबदार धरतो. पण शास्त्रीय अभ्यास मात्र असं सांगतो की हवेच्या प्रदूषणास कारण ठरणाऱ्या घटकांमध्ये वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचा क्रमांक आठवा लागतो आहे. प्रदूषकांमध्ये प्रथम क्रमांकावर जर कोण असेल तर ती म्हणजे सर्व शहरांमध्ये सगळीकडे सुरू असलेली विविध प्रकारची बांधकामे, त्यातून पसरणारी धूळ. हवामान बदलामुळे मानवजातीचे व जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. निसर्ग विनाशामुळे तरुणाई कधी नव्हे ते आज सर्वात जास्त मानसिक तणावाला सामोरी जात आहे. मनाला आल्हाद प्रदान करेल असा निसर्गच आज आपण आपल्या सभोवताली बाकी ठेवलेला नाही. अशा या निसर्ग विनाशाचा पर्यावरणीय, अर्थशास्त्रीय, मानसशास्त्रीय, साहित्यिक, सांगितिक, वास्तुशास्त्रीय, आध्यात्मिक या विविध अंगांनी मानवावर होणारा परिणाम विषद केला आहे, पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी, 'निसर्ग कल्लोळ' या त्यांच्या नव्या पुस्तकात. ‘राजहंस प्रकाशन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

पुस्तकात काय मजकूर वाचायला मिळणार आहे याचं थोडक्यात सूचन पुस्तकाचे मुखपृष्ठ करत असते. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अतिशय मार्मिक असे मुखपृष्ठ रेखाटले आहे, तसेच अंतर्गत सजावट केली आहे. या पुस्तकात एकूण नऊ प्रकरणे आहेत. 'निसर्ग सत्र' या पहिल्या प्रकरणात जगभरातील तसेच भारतातील विविध आदिवासींना जंगलतोड, निसर्ग विनाश करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कुठे कुठे व कसा कसा लढा दिला आहे याचा विस्तृत तपशील वाचायला मिळतो. दरवर्षी सुमारे दहा कोटी हेक्टर जंगल जळत आहे. अरण्य तज्ज्ञांचे भाकित आज सांगते की, 'पृथ्वीतलावरून अब्जावधी हेक्टर अरण्य नाहीसे झाले आहे.' जर वेळीच पावले उचलली नाहीत तर भविष्यातही हा विनाश अटळ आहे. विनाशाचा वाढत जाणारा वेग पाहता 2100 मध्ये जगात एकही सदाहरित अरण्य शिल्लक राहणार नाही. वृक्षांच्या जवळजवळ अठरा हजार प्रजाती आज लृप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ब्राझीलमध्ये 'यानोमामी' नावाची एक आदिवासींची जमात आहे. ब्राझीलमधील ॲमेझॉनचे जंगल हेच या जमातीचे सर्वस्व आहे. या जमातीतील लोक हे गेल्या 50-60 वर्षांपासून अमेझॉनच्या जंगल विनाशाविरुद्ध आपली मांड ठोकून आहेत. या लढ्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे दावी कोपेनावा. राजकारणी तसेच कॉर्पोरेटची मजल तर दावी कोपीनावा यांना अक्षरशः जीवे मारण्यापर्यंत गेली होती. तरीही दावी हे जंगल व जमिनीच्या अधिकारासाठी 20 वर्षे लढत राहिले. दावी म्हणतात की, "ब्राझील सरकार आम्हाला खाणवाल्यांपासून वाचवत नाही. आम्हाला आमच्या हक्काची जमीन देत नाहीत." भारतात सुद्धा जमिनीखालील खनिजसाठ्यांसाठी अनेक राज्यांमध्ये कॉर्पोरेटांची स्पर्धा सुरू आहेत. श्रीराम डाल्टन या झारखंडी दिग्दर्शकाने खाणकामगारांचे प्रश्न फार मार्मिकपणे आपल्या 'स्प्रिंग थंडर' नावाच्या सिनेमात मांडले आहे. यू ट्यूब वर तो सिनेमा उपलब्ध आहे. छत्तीसगडमधील हसदेव अरण्य असेल, निकोबार बेटावर हजारो हेक्टर जमीन 'आदिवासी राखीव' असूनही त्याला न जुमानता तिथला निसर्ग उजाड केला जाणार आहे. आदिवासींना त्यांच्या मूळ अधिवासापासून दूर करून आपण आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानापासून वंचित होणार की काय अशी भीती वाटावी अशी परिस्थिती झाली आहे.

'निसर्गमग्नांची निर्मिती' या प्रकरणात जगभर ज्या ज्या साहित्यिकांनी, कवींनी, गायकांनी, चित्रकारांनी, शिल्पकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मानव व निसर्ग यांच्यातला ताणलेला संबंध दर्शवला गेला आहे. त्यांच्या कलाकृतींची दखल घेतलेली दिसते आहे. जसे कुमार गंधर्व आपल्या एका बंदीशीत 'ऐसो कैसो आयो रितो रे, अंबुवापे मोर ना आयो!' म्हणत रुसलेल्या निसर्गाबद्दल आपली भावना व्यक्त करतात. 1995 मध्ये मायकल जॅक्सनने 'इतिहास : काल, आज आणि उद्या' या अल्बमच्या माध्यमातून पृथ्वीची कैफियत मांडू पाहत होता. या अल्बममधील वसुंधरा गीताने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. कर्नाटकी संगीताचे प्रख्यात गायक टी. एम. कृष्णा यांचेही यासंदर्भातले कार्य अजोड असेच म्हणावे लागेल. निसर्गविन्मुख झालेल्या गायनाला त्यांनी पुन्हा निसर्गविन्मुख करण्याचा प्रयत्न केला. देश विदेशातील मांडणी शिल्प तयार करणारे कलाकार या प्रकरणात आपल्याला जागोजागी भेटतात. 'तेथे वृक्ष वाचती…' या प्रकरणात जगभरात ज्या ज्या ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे जे प्रचंड मोठे विध्वंस झाले, त्या विध्वंसानंतर त्या जागेवर पुन्हा कधी निसर्ग बहरेल की नाही अशी भीती होती. अशा ठिकाणीसुद्धा निसर्गाने अल्पकाळात बहरून एक सुखद धक्का दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदा. युक्रेन मधील चेर्नोबील अणुभट्टीचा स्फोट. या अणुस्फोटात नंतर चेर्नोबीलच्या जमिनीवर गवताचं एक पातंसुद्धा उगवणार नाही अशी भाकितं शास्त्रज्ञांनी केली होती. परंतु जखमा भरून काढण्याची निसर्गाची तीव्रता इतकी असते की अवघ्या 25 वर्षांत चेर्नोबिलमध्ये उद्यानं फुलली. 


हेही वाचा : विद्येविना विकासाचा ‘अर्थ’बोध - अतुल देऊळगावकर


शहरातील शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीत. गावातही काही फार वेगळी परिस्थिती नाही. मुलांना आपण चार भिंतींच्या कोंडवाड्यात आणि पडद्याच्या जगात अडकवून टाकलं आहे. 'दक्ष' पालकांना मुलांनी बागेत खेळणं असुरक्षित वाटू लागलं आहे. मुलं दिवसेंदिवस एकलकोंडी होत चालली आहेत. निसर्गापासून फारकत घेतलेल्या मुलांच्या मानसिक व शारीरिक क्षमता मर्यादित होत आहेत. आत्मविश्वास कमी होऊन त्याची जागा मनोविकार घेत आहेत. मुलांच्या ह्या अवस्थेला देऊळगावकर 'निसर्ग कमतरतेचा विकार' असे संबोधतात. शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना आपण या चराचरसृष्टीचा एक चिमुकला भाग आहोत ही व्यापक जाणीव करून देणे आवश्यक आहे. पर्यावरणाची तत्वे, किमानतावाद, टिकाऊ विकास, शाश्वत शेती व वृक्ष संगोपन, पर्यावरणीय नितीशास्त्र या विषयाचे प्राथमिक धडे शालेय शिक्षणातच मुलांना मिळायला हवे.

समाजात पर्यावरणीय बुद्धिमत्ता खुलत जाणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडण्यात लहानपणी घेतलेल्या निसर्गानुभवाचा फार मोठा वाटा असतो. बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले नाही तर त्याचा विपरीत परिणाम व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. निसर्गासोबत बालक ज्या घरात आपला बहुतेक वेळ घालवतो त्या गृहरचनेशी त्याची एक जवळीक निर्माण होत जाते. घरातील रंगसंगती, अंगणातील मोकळी जागा, परसबाग, सजावट या सर्वांचा बालकाच्या बौद्धिक विकासात महत्त्वाचा सहभाग असतो. "घराची रचना उदास व विषण्ण करणारी असेल तर काही आठवड्यातच नवविवाहितांचा घटस्फोट देखील होऊ शकतो" असं फ्रॅंक लॉईड एकदा म्हणाले होते. गावाची, घरांची नगररचना कशी असावी याबद्दल अचूक मार्गदर्शन अतुल देऊळगावकर लिखित 'लॉरी बेकर' या चरित्रग्रंथात वाचायला मिळते. हवामान बदलाच्या काळात अतिवृष्टी व ढगफुटी सर्रास व सर्वत्र होत असते. आपल्याकडे शहर नियोजनात अशा पावसाला सामोरे जाण्याचा विचारच केला जात नाही त्यामुळे अशी रचनाही सहज दिसत नाही. जगातील सर्वाधिक 30 प्रदूषित शहरात 22 भारतीय शहरांचा समावेश आहे. जगातील 100 स्वच्छ शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश होत नाही. 

एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतर शहरी जीवनशैलीतून शहरवासीयांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा अनेक समस्या निर्माण होत आहेत. पाश्चात्य देशात अनेक व्यक्ती विद्यापीठं, कलादालन व वस्तुसंग्रहालये निर्माण करण्यासाठी मोठ्या देणग्या देतात. वर्षानुवर्षे असे संस्कार झाल्यामुळे तशी संस्कृती घडत जात असते. आपल्याकडे मात्र फक्त धनिकांचीच संख्या वाढत आहे. त्या तुलनेत कलादालने, संग्रहालये यांचं काय? आपल्याकडे नेहमीच 'विकास पाहिजे की पर्यावरण?' असा रोकडा सवाल विचारून 'विकासालाच' झुकते माप दिले गेले आहे. पण हा विकास काय व कोणाची कुर्बानी देऊन साधला जातो हे कधी आपण पाहणार आहोत की नाही? निसर्गाला खरवडून जो विकास केला जातो आहे किमान तो तरी सर्वांपर्यंत पोहोचतो आहे का? मुळात आम्हाला हे प्रश्नच पडू द्यायचे नाहीत. बऱ्याच वेळा केला जाणारा विरोध हा अपुऱ्या माहितीवर आधारलेला असतो. आपल्या सार्वजनिक जीवनात पर्यावरणस्नेही धोरणे राबविण्यात अनेक अडथळे आहेत. पर्यावरणविषयक जाणीव अधिक सखोल करत जाणे ही प्रक्रिया आहे. या मर्यादा लक्षात घेऊन त्या काळातील सर्वोत्तम तेथे स्वीकारत पुढे गेले पाहिजे.

2006मध्ये जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ सर निकोलस स्टर्न यांनी 'हवामानबदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम' हा अहवाल सादर केला होता. त्यात ते म्हणतात, "येणाऱ्या दोन दशकांत आपण कसे वागतो, यावर आपले भविष्य ठरणार आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही अशा आपत्तींच्या विळख्यात आपण सापडणार आहोत. दोन महायुद्धे आणि महामंदीनंतर परिस्थिती क्षुल्लक वाटावी, अशी आर्थिक व सामाजिक उलथापालथ होऊ शकते. कर्बवायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी निधीही भरमसाठ लागणार आहे. परंतु तो वाचविण्याचा विचार जगासाठी विघातक ठरणार आहे. विचार करण्यासाठीही सवड नाही, अशी युद्धजन्य आणीबाणीची स्थिती हवामानबदलाने आणली आहे." निसर्गाचा विनाश वाचवण्यासाठी निसर्गाने मानवाला ही शेवटची संधी दिली आहे. कारण हा सर्व विनाशास केवळ मानवच जबाबदार आहे आणि हा विनाश होण्यापासूनही मानवच पृथ्वीला वाचवू शकतो. 

- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com 

Tags: atul deulgaonkar environment marathi books carbon monoxide ajinkya kulkarni पर्यावरण नवे पुस्तक साहित्य Load More Tags

Add Comment