‘पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्री’वर दृष्टिक्षेप

पाकिस्तानी चित्रपटांच्या तुलनेत मालिकांची संख्या, दर्जा आणि आशय सशक्त वाटतो!

2002 मध्ये पाकिस्तानात ‘जियो’ या खासगी वाहिनीचा उगम झाला आणि चित्र पालटायला सुरुवात झाली. नंतर हळूहळू ‘आर्या’, ‘हम’, ‘ग्रीन टिव्ही’ इत्यादी खासगी वाहिन्या तिथं दिसू लागल्या आणि वाहिन्यांमध्ये एकापेक्षा एक सरस कंटेंट देण्याची स्पर्धा लागली. ज्यातून आजची सकस पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्री उभी राहिली. कुठल्याही कलाकृतीवर त्या त्या समाजाचा मोठा प्रभाव होतो. पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्रीही यातून सुटलेली नाही. पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र असल्याने इस्लामी संस्कृती, इस्लामी श्रद्धास्थान, राहणीमान सशक्त पद्धतीने बहुतांश मालिकांमधून दिसतं.

सध्या भारतात ‘तेरा मेरा हे प्यार अमर’ गाणं जाम व्हायरल आहे. गाणं भारतातील सिनेसंगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून देतं. हे गाणं फक्त ‘ऐकलं’च जात नाही, तर या गाण्यावर काळा सूट घालून कोटची बटणं काढत नजाकतीने चालण्याच्या म्युझिक रील्स बनवणंही ‘ट्रेंडिंग’मध्ये आहे.. हे गाणं कुठल्या चित्रपटातील नाही किंवा कुठल्या म्युझिक अल्बममधील नाही, हे गाणं आहे पाकिस्तानी मालिका ‘इश्क मुरशीद’मधील, या गाण्याच्या रील्स व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी ड्रामा मोठ्या प्रमाणावर ‘सर्च’ केला जातो आहे. या मालिकांचे विषय हे मोठ्या प्रमाणात मानवी नातेसंबंध, मानसिकता, सामाजिक प्रथा-परंपरा यांच्यावर भाष्य करणारे आहेत. बऱ्याचदा अगदी थेट भाष्य केलेलं नसलं तरी आडवाटेने का होईना चुकीच्या प्रथांना चुकीचं म्हटलं जाण्याचं धाडस दाखवलं जात आहे, जे नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण पाकिस्तानच्या सर्वाधिक चर्चित राहिलेल्या ‘जॉयलँड’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला विरोधाच्या कुठल्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं याची मला कल्पना आहे...

आज सगळीकडे बोलबाला असणारी ‘पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्री’ आधीपासूनच अशी होती का? तर याचं उत्तर नकारार्थी आहे. आपल्याकडे 15 सप्टेंबर 1959 ला दूरदर्शन अवतरलं. त्यानंतर जवळपास सहा वर्षानंतर ‘ptv’ (पाकिस्तान टेलिव्हिजन) ही सरकारी दूरचित्रवाणी पाकिस्तानमध्ये 1964 ला अवतीर्ण झाली. त्याद्वारे फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या किंवा मूळचे तिथलेच असणाऱ्या कलावंत, लेखकांना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, तोवर नाटक हेच तिथं मनोरंजनाचं मुख्य माध्यम होतं. ‘ptv’च्या आगमनानंतर ‘खुदा की बस्ती’, ‘अनकही’, ‘धूप किनारे’ असे कैक आशयघन कार्यक्रम सुरू झाले. त्यांना लोकप्रियताही मिळत गेली. विशेष म्हणजे, भारतातही हे कार्यक्रम दाखवले जात होते. पण बहुधा 2009 च्या आसपास भारतात पाकिस्तानी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. तोवर या मालिकांनी भारतातही लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून ही बंदी उठवण्यासाठी अधिकृतरीत्या विनंती करण्यात आली. तदनंतर 2014 मध्ये ‘झी’ ग्रुपने ‘जिंदगी’ नावाचा चॅनेल ऑन एयर करून पाकिस्तानी मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली. कालांतराने हेही बंद पडलं.

इतकं सगळं होत असताना दस्तुरखुद्द पाकिस्तानमध्ये मात्र ड्रामा इंडस्ट्रीची प्रचंड पडझड झाली होती, कारण ptv सोडलं तर तिथे दुसरा सशक्त पर्याय नव्हता. आणि 2000 च्या दशकातच ‘स्टार प्लस’ने पाकिस्तानमध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. ‘स्टार प्लस’च्या चकाचक, ‘लॅव्हिश सेट’च्या मालिकांसमोर ptv नेस्तनाबूत झाली होती. पण यातून पाकिस्तानी कलावंत, लेखक वर्गासमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली. ‘स्टार’वरील मालिकांचा मोठा प्रभाव जनमानसात पडत होता, काही प्रमाणात त्यांचं अनुकरणही समाज करत होता. हे पाकिस्तानी मुस्लीम संस्कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. कारण तेव्हा ‘स्टार’वर ‘सास भी कभी बहू थी’, ‘मै तुलसी’ छापाच्या मालिका सुरू होत्या. (जिथं स्त्रिया कायम मोकळे केस सोडून, डिझायनर साड्या नेसून किचनमध्ये गाजर/सुजीचा हलवा बनवत असत किंवा पुऱ्या तळत असत!)

2002 मध्ये पाकिस्तानात ‘जियो’ या खासगी वाहिनींचा उगम झाला आणि चित्र पालटायला सुरुवात झाली. नंतर हळूहळू ‘आर्या’, ‘हम’, ‘ग्रीन टीव्ही’ इत्यादी खासगी वाहिन्या तिथं दिसू लागल्या. आणि वाहिन्यांमध्ये एकापेक्षा एक सरस कंटेंट देण्याची स्पर्धा लागली. ज्यातून आजची सकस पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्री उभी राहिली. कुठल्याही कलाकृतीवर त्या त्या समाजाचा मोठा प्रभाव होतो. पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्रीही यातून सुटलेली नाही. पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र असल्याने इस्लामी संस्कृती, इस्लामी श्रद्धास्थान, राहणीमान सशक्त पद्धतीने बहुतांश मालिकांमधून दिसतं. बऱ्याचदा मालिकांतून चुकीचं वागणाऱ्याला प्रथम अल्लाहची भीती घातली जाते. ‘अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळं ज्यादिवशी तुम्ही त्याच्या समोर उभे राहाल त्यावेळी तुमच्या प्रत्येक कृतीचं उत्तर द्यावं लागणार आहे’ असं सांगून नैतिकतेने वागण्याचा आग्रह केला जातो. ‘कुरान-ए-पाक’ची शपथ आजही अंतिम मानली जाते. लिंग गुणोत्तर, स्त्रियांचा सामाजिक दर्जा यावरही भाष्य केलं जातं. वेगवेगळ्या रानटी अमानवी प्रथांच्या विरुद्ध आवाजही उठवला जातो.

पाकिस्तानी मालिकांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या उगीचच लांबड लावत नाहीत. सरासरी तीसेक भागात मालिका संपते. ‘सुनो चंदा’सारख्या मोजक्या मालिका आहेत, ज्यांचे भाग याहून अधिक आहेत. विनाकारण शंभर किंवा हजार भाग नसल्याने मालिकांचा वेग चांगला असतो. मालिकांतली पात्रंही वास्तववादी वाटतात. थोडेसे भडक, चुरगळलेले कपडे, पायात साधारण चपला इतक्या बारकाईने खेडुताचे पात्र चितारले जाते. मध्यमवर्गीय पात्राच्या कपड्यांनाही - घडी फिरवली तर कातडी कापली जाईल इतकी - कडक इस्त्री नसते. घरात वावरणाऱ्या महिलांनी भडक मेकअप केलेला नसतो. त्यांचे गाल उगीचच गुलाबी नसतात. केस मोकळे सोडून, उंच टाचेच्या चपला घालून किचनमध्ये कुणी वावरत नाही. खाद्यसंस्कृती अभिमानाने मिरवली जाते. बायका जितक्या सहजतेने ‘साग’साठी पालेभाज्या निवडताना दिसतात, तितक्याच निगुतीने बिर्याणीसाठी मांस शिजवताना दाखवल्या जातात. ‘करेले गोश्त’ही सहजतेनं दाखवलं जातं, स्क्रीन ब्लर होत नाही. पाकिस्तानमध्ये उर्दूसोबतच पंजाबी, पश्तू, बलुची भाषांमध्येही कलाकृती निर्माण होतात. ज्या मुख्यप्रवाहातील वाहिन्यांवर दाखवल्या जातात. तिथं उर्दू बऱ्यापैकी चलनात असली, तरी पठाण टोळीवर मालिका असेल तर त्यांच्या भाषेचा लहेजा शेवटच्या फ्रेमपर्यंत कायम राहतो. मध्येच प्रमाण उर्दू घुसवली जात नाही. यामुळे मालिका वास्तववादी वाटतात.

पाकिस्तानी मालिका लोकप्रिय होण्यामागची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पार्श्वसंगीताचा सुरेख वापर, राहतसोबतच शूजा हैदर, साहिल बग्गा अशा लोकांच्या संगीताने या कार्यक्रमांना ‘चार चाँद’ लावले आहेत.

या मालिकांमध्ये दाखवण्यात आलेल्या काही प्रथांविषयी थोडक्यात जाणून घेणं उपयुक्त ठरेल.
1.    वन्नी
पाकिस्तानातील काही भागांत ही कुप्रथा होती. एखाद्या व्यक्तीकडून एखाद्याचा चुकून जरी खून झाला तरी 'खुनाच्या बदल्यात खून' हा नियम आहे. यातून वाचायचं असेल तर ज्याच्याकडून खून झाला आहे, त्याच्या घरातील थोरली मुलगी ज्याचा खून झाला आहे, त्याच्या घरात वन्नी म्हणून जाते. जिला कुटुंबात दर्जा नसतो, जिला भोगवस्तू म्हणून बघितलं जातं.
2.    गग
उत्तरेकडच्या काही भागांत ‘गग’ प्रथा होती. एखाद्या तरुणाला एखादी मुलगी आवडली, तर तिच्या दारासमोर उभं राहून तीन वेळा बंदुकीची गोळी हवेत झाडायची. त्यानंतर ती मुलगी त्याची मालमत्ता होई. दुसऱ्या मुलाला तिच्यासोबत लग्न करायचं असेल तर आधी त्याला पहिल्याला संपवावं लागेल. याविरुद्ध पख्तुन विधानसभेने 2011 मध्ये कायदा आणला.
3.    खै
दोन कुटुंबांत जर भांडणं असतील, तर विरुद्ध कुटुंबातील कुणालाही शिल्लक ठेवायचं नाही, या प्रथेला खै म्हणतात.
4.    कुरान-ए-पाक से शादी
घरंदाज/सरंजामी कुटुंबातील मुलीचं ती वयात आल्यावर कुराणसोबत लग्न लाऊन दिलं जातं. याला ‘अल्लाह के रस्ते पे’ असं गोंडस नाव जरी दिलं, तरी खरं कारण संपत्तीचं विभाजन होऊ नये, हे होतं. कारण ‘इस्लाम’मध्ये मुलींना बापाच्या संपत्तीत वाटा मिळतो.

मला आवडलेल्या काही प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका (त्यांच्या पहिल्या भागाच्या लिंकसह) पुढे दिल्या आहेत..

1.    रक्स ए बिस्मिल
सिंध प्रांतातील सामाजिक वातावरणात ही मालिका घडते. पिर साईच्या (धार्मिक गादी चालवणारं एक कुटुंब) धार्मिक कुटुंबातील पुढचा वारसदार मुसा (इम्रान अश्रफ) - जो वडिलांइतकाच कट्टर आहे - कोठ्यावर राहणाऱ्या झोया (सारा खान) हिच्या प्रेमात पडतो. आणि सुरू होतं एक द्वंद्व - गादी की प्रेम?
दिग्दर्शक - वजाहत रौफ
लेखक - हाशिम नदीफ
https://youtu.be/HOUXO4yI7po?si=3DZTf9R7VEs-WBow

2.    रांझा रांझा कर दी
एक मतिमंद मुलगा भोले (इम्रान अश्रफ) आणि समाजातील कनिष्ठ वर्गात जन्माला आलेली, पण सगळे बंध तोडून शिकून समाजात इज्जत मिळवण्याच्या ध्यासाने पछाडलेली मुलगी नुरी (इकरा अझिज) हिची गोष्ट.
लेखक - फैजा इफ्तीफार
दिग्दर्शक - कासिफ निसार
पहिल्या भागाची लिंक
https://youtu.be/eEbT-p8KOO8?si=vZuJ2cTWEoaAF52l  

सानिया सैद

3.    बदजात
समाजातील चौकटीबाहेरील विवाह आणि त्यातील मुलांचं आयुष्य यावर ही मालिका भाष्य करते. इम्रान अश्रफ मुख्य भूमिकेत आहे.
लेखक - मिसबह नौशीन  
दिग्दर्शक- सिराज उल हक
https://youtu.be/QkujrvPh_sw?si=67XWMbmQDlGirVDW

4.    चौधरी अँड सन्स
हलका फुलका विनोदी कौटुंबिक कार्यक्रम आहे हा. इम्रान अश्रफ लीड करत असला, तरीही सोहेल अहमद या अभिनेत्यासाठी हा कार्यक्रम बघाच. त्याचं बेयरिंग, लहेजा, देहबोली भन्नाट आहे!
लेखक - सायमा अक्रम चौधरी
दिग्दर्शक - साइद वजाहत हुसेन

5.    अलिफ, अल्ला और इन्सान
ही एक ‘सुफीझम’वर आधारित मालिका आहे. ज्यात वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पण समांतर गोष्टी आहेत. इम्रान अश्रफने यात तृतीयपंथीय शम्मोचा रोल केलाय, जो नितांत सहजतेने त्याने साकारला आहे.
दिग्दर्शक - मौमीन दुरेद
लेखक - कैसर हयात 
https://youtu.be/pY5CMhN8Aew?si=AhWP2ZdgdnGcQm46  

6.    मुष्क  -
ही पारंपरिक पद्धतीची, रहस्यमय प्रकारातली मालिका आहे, ज्यात रुढीवादी कुटुंबातील मुलगी आणि तशाच कुटुंबातील मुलगा परदेशात शिकत असताना लग्न करून संसार थाटतात, तो मुलगा घरच्यांना भेटायला म्हणून पाकिस्तानात येतो. त्याच्याशी पुन्हा संपर्क होत नाही म्हणून सैरभैर होऊन मुलगी पाकिस्तानची वाट धरते. पण येताना सोबत असतं ते तिचं बाळ... इम्रान अश्रफ आणि मोमीन खान या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
लेखक - इम्रान अश्रफ
दिग्दर्शक - अहसन तालिश
https://youtu.be/ZtWRDnmUApk?si=5NVgNhwIXq-qj3TJ 

7.    सामी 
‘वणी’ या प्रथेवर ही मालिका आहे, जी लिंगभेदावर भाष्य करते. मावरा, अदनान सिद्दीकी, नादिया अफगाण, सानिया सैद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मला स्वतःला यात सानिया सैद प्रचंड आवडल्या होत्या. त्यांचं पात्र त्यांनी जिवंत केलं आहे.
लेखक - नुर उल हुदा शाह
दिग्दर्शक - सैफ हसन
https://youtu.be/2UsgK6MBYSQ?si=p65apWVTpsLVQ3wV  

8.    निम
काश्मीर खोऱ्यात शिकलेली तरुणी झिमल (मावरा होकेंन), जिला समाज सुशिक्षित करायचा आहे, जिला गावातील दूरदर्शी गाव प्रमुख वृद्धाची अशद आलिमची (अमीर गिलानी) साथ आहे. पण त्याचा मुलगा (सय्यद जिब्रान) मात्र कट्टर पितृसत्ताक मानसिकतेचा आहे. त्याची झिमलवर वाईट नजर आहे.
लेखक - काशिफ अन्वर
दिग्दर्शक - शहजाद काश्मिरी
https://youtu.be/Z7fewl4Gdno?si=f7vlfI11XL1dCpyT  

9.   गैरत
समाजात आजही बाई ही घराण्याचा मापदंड मानली जाते. 'आपण म्हणू तेच तिनं करावं' अशी मानसिकता असते, जी पुरुषापेक्षा बाईच जास्त मानते. अशाच एका घराची गोष्ट म्हणजे गैरत.
इकरा अजीज, सैद जिब्रान, समन अन्सारी, समीना अहमद या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
लेखक - एडिसन इंद्रिस मसिह
दिग्दर्शक - अहमद भट्टी
https://youtu.be/PXF8SltcAKg?si=J0hYIR7qakAjF4sh  

10.   संग ए माह
उत्तर पाकिस्तानमधील हिमालयीन खोऱ्यात वसलेलं, पठाण लोकांचं एक छोटंसं गाव. जिथं हिलमन (अतिफ अस्लम) हा तरुण आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा उलगडणाऱ्या रहस्यांभोवती ही मालिका फिरते. ही मालिका गग या प्रथेवर भाष्य करते. यात नौमन इजाज, अतिफ अस्लम, सानिया सईद, सामिया मुमताज आणि ओमेर राणा यांच्यासोबत कुब्रा खान, झवियार नौमन इजाज आणि हानिया आमिर प्रमुख भूमिकांत आहेत. नौमीन आणि सानिया सैद यात भाव खाऊन जातात. यात नौमीन ईजाजचा मुलगा झेवीयर याने नौमीनच्याच मुलाची भूमिका केली आहे.
लेखक - मुस्तफा आफ्रिदी
दिग्दर्शक - सैफ हसन

https://youtu.be/XrmRQ2rRytY?si=oMiyOEa1YU8CmqL0  

11.    संग ए मर मर
ही मालिका गावगाड्यातील पारंपरिक प्रथा-संस्कृती यांवर भाष्य करते, यात नौमन इजाज, सानिया सईद, मिकाल झुल्फिकार, कुबरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पारस मसरूर, उजमा हसन, टिपू शरीफ आणि कैफ गजनवी व उमर राणा आहेत.
लेखक - मुस्तफा आफ्रिदी
दिग्दर्शक - सैफ हसन
https://youtu.be/X-P0nPLaT-0?si=5cbdIowL8nfhG9Mo 

12.    खुदा और मोहोब्बत
सुफी आध्यात्मिकतेला प्रेमाची जोड देत ही मालिका पुढे येते. या मालिकेचे तीन सिझन आले आहेत. पहिल्या सिझनमध्ये इम्रान अब्बास आणि सादिया खान आहेत. दुसऱ्यात हे दोघे आणि कुब्रा खान आहे. तर तिसऱ्यात इकरा अझीझ आणि फिरोज खान आहे. यातील तिसरा सिझन सर्वात जास्त लोकप्रिय झाला. कथा, संगीत याला अभिनयाची भन्नाट जोड मिळाली. हा ड्रामा फक्त आणि फक्त इकरा अझीझचा आहे. तिने तिसरा सिझन शब्दशः खाऊन टाकला आहे.
लेखक - हाशिम नदीम
दिग्दर्शक - 
1) अंजुम शहजादा
2) अली उस्मान
3) सायेद वजाहत
1.    https://youtu.be/nN0RHzkwuj0?si=LthIqiystTnXrs0Q 
2.    https://youtu.be/V9CCPpF5dE4?si=dXU4bv1vihL7majt 
3.    https://youtu.be/zvXxQoLpZqQ?si=v6EbuFmmHq9VHOMO   

13.    परिझाद
परिझाद हा आई-वडिलांचा तीन नंबरचा मुलगा ज्याच्या जन्मापासून त्याच्या वडिलांना त्याचा राग आहे. कारण थोरल्यांच्या तुलनेत त्याचा रंग सावळा आहे. घरातून अवहेलना झाल्याने आत्मविश्वास गमवलेला परिझाद ते एका बिजनेस टायकूनच्या (नौमीन एजाज) हाताखाली काम करून एका बलाढ्य साम्राज्याचा मालक होणारा परिझाद अहमद अली अकबरने साकारून त्या वर्षीचे बहुतांश पुरस्कार पटकावले होते. गंमत म्हणजे हा रोल पाकिस्तानमधील बव्हंशी अभिनेत्यांनी नाकारल्यावर अहमदकडे आला होता.
लेखक - हाशिम नदीम
दिग्दर्शक - शहजाद काश्मिरी
https://youtu.be/fwZ6JNfXezg?si=kJ2JoKz9-5hpwsjo

14.    ईडीएट
ही मालिका गुलझारच्या (अहमद अली अकबर) भोवती फिरते. जो रूढार्थाने नॉर्मलही आहे आणि अबनॉर्मलही. कारण त्याला प्रश्न विचारण्याची सवय असते. माणसांच्या स्वार्थीपणाला कंटाळून तो प्राण्यांच्यात खरं प्रेम शोधतो.
लेखक - किफायत रोडणी
दिग्दर्शक - अंजुम शहजादा

15.    अलिफ
सुफीझमवर आधारित ही मालिका प्रेम, अध्यात्म, प्रश्न, मानवी विचारसरणी यावर भाष्य करते. मुख्य भूमिकेत हमजा अली अब्बास, मंझर सेहब, कुब्रा खान, इत्यादी आहेत. हमजा अली चित्रपट दिग्दर्शकाची भूमिका शब्दशः जगतोय या मालिकेत.
लेखक - उमरा अहमद
दिग्दर्शक - हासीब हसन
https://youtu.be/0Sk2mRRzPCw?si=PNL8tylZbgV13Y4J 

16.    मोहिनी मॅन्शन कि सिंड्रेला
हे एक जबरी रसायन आहे. म्हटलं तर कॉमेडी, म्हटलं तर ग्रे शेड दाखवणारी मालिका, म्हटलं तर माणसांचं अंतरंग दाखवणारी ही मालिका आहे. माणूस आपल्यापुरता विचार करताना कुठल्या पातळीवर जाऊ शकतो याचं हे नर्मविनोदी शैलीतील चित्रण आहे. लाहोरच्या मध्यवर्ती भागातील एका जुन्या हवेलीत एकेक कुटुंब, पात्र हळूहळू सेट होतं आणि स्वभावानुरूप गुण उधळायला सुरू करतं... सगळ्यांचं बाँडिंग भारी जमलं आहे. शबनमसारखी ज्येष्ठ अभिनेत्रीही यात आहे. सोबतीला फरयाल गोहर, रुबिया चौधरी, हिना खान, नैम ताहिर असे कलाकार सोबत आहेत.
https://youtu.be/W3huzdtWfts?si=VmkJQnrBRwfwehQi  

17.    बेगम बादशाह
अनेक कुप्रथांपैकी एक म्हणजे बादशाह बेगम प्रथा. ज्यात सरंजामी धार्मिक घरातील मुलगी बेगम बादशाह म्हणून पिढी दर पिढी गादीवर बसते. जी त्या गावाची नामधारी बादशाह असते. वास्तविक तिचा भाऊच सगळा कारभार हाकतो. यातून दोन पिढ्यांमधील संघर्ष, ‘बीबी पाक दामन’ म्हणवून घेताना होणारी घुसमट, याचं सुंदर चित्रण यात आहे. कलाकारांमध्ये जरा नुर अब्बास, फरहान सैद, यासीर हुसेन, हमजा सोहेल, कोमल मीर अशी तगडी नावं आहेत.
लेखक - साजी गुल
दिग्दर्शक - खिजर इंद्रिस
https://youtu.be/tx-AU_kHViM?si=T0u5JBcE0nbrLjCf  

18.    मेरे हमसफर
नितांत लोकप्रियता लाभलेली ही मालिका तशी ‘वन लायनर’मध्ये संपते. पण हाला (हानिया अमीर) आणि हमजा (फरहान सैद) मात्र आयुष्यभर तुमच्या काळजात घर करतात. पुरुष पण म्हणजे नेमकं काय? इनोसन्स नैसर्गिकरीत्या कसा माणसाला कसा घडवतो, हे या मालिकेत सांगितलं आहे.
लेखक - कासीम अली,सायरा रंझा
दिग्दर्शक - कासीम अली
(‘आर्या डिजीटल’च्या अ‍ॅपवर ही मालिका पाहता येईल)

19.    सुनो चंदा
एकाच घरात चुलत भावंडं म्हणून वाढलेले अर्सलन आणि अजिया वयात आल्यावर त्यांच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार विवाहबंधनात अडकतात. पण दोघांच्यात जन्मजात हाडवैर आहे. दोघांनाही हे लग्न नको आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आघाडीवर आपलं लग्न तोडण्याचे त्यांचे प्रयत्न नेहमीच अयशस्वी होतात. त्यांच्या ‘टॉम अँड जेरी’सारख्या नात्याची गोष्ट म्हणजे सुनो चंदा. अजिया म्हणून इकरा अजीज तर अर्सलन म्हणून फरहान सैद आहे. सोबतीला फरहान अली आघा, नादिया अफगाण, सोहेल समीर, तारा मोहम्मद, मशेल खान आहेत.
लेखक - सायमा अक्रम चौधरी
दिग्दर्शक - एहसंन तालिश
https://youtu.be/ODl-DYTyNyM?si=g9GH-tG-GIwSTwcb   

20.    झोक सरकार
मध्यमवर्गीय घरातून पोलीस अधिकारी बनलेल्या अर्सलनचं (फरहान सैद) पहिलं पोस्टिंगच झोक सरकारला होतं. हे गाव म्हणजे तिथल्या सरंजामी पिरल (असिफ रझा मीर) आणि त्याच्या मुलाच्या मालकी हक्काचं गाव. तिथं कायदा ही तेच आणि न्यायाधीशही तेच. लोकांच्यावरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असताना अर्सलानची पोस्टिंग तिथं होते. आता त्याच्या पुढे काय वाढलेलं असतं याची गोष्ट म्हणजे झोक सरकार.
फरहान मुख्य भूमिकेत असला, तरी अख्खी मालिका असिफ रझा खाऊन टाकतात!
लेखक - हाशिम नदीम
दिग्दर्शक - सैफ हसन

21.    रकीब से...
मालिका तयार करण्यासाठी उच्चभ्रू सेट लागतात, गाड्या लागतात, डिझायनर कपडे लागतात. या सगळ्या गोष्टींना मिथक ठरवत फक्त तुमच्याकडे एखादी सुंदर गोष्ट असेल, ती सांगण्याची उत्तम पद्धत असेल आणि सोबत कसलेले कलाकार असतील; तर तुम्ही किती उच्च दर्जाची कलाकृती तयार करू शकता याचं उदाहरण म्हणजे रकीब से. नौमीन इजाज, सानिया सैद, हदीका कियानी, रकीब समीर आणि इकरा अजीज एकदम नंबरी पद्धतीने ही मालिका चालवतात. यात मोजकी मुख्य पाच पात्रं आणि अधेमध्ये इतर पात्रं आहेत. पण आपल्याला कंटाळा येत नाही. 

20 वर्षांपूर्वीची गोष्ट पाच मिनिटांत समजते; जेव्हा फ्लॅशबॅक सांगितला जातो. काही फ्रेम्समधून 20 वर्षांपूर्वीची घटना पाच मिनिटांत आपल्याला उमगते.
लेखक - बी गुल
दिग्दर्शक - कासिफ निसार
(‘हम टिव्ही’च्या अ‍ॅपवर पाहता येईल.)

22.    कैसी तेरी खुदगर्जी
कथा जुनीच आहे. म्हणजे श्रीमंत घरातील हट्टी मुलगा, आजी, मध्यमवर्गीय घरातील तत्त्वनिष्ठ मुलगी... पण नौमीन ईजाज, दानिश तैमुर, दुर-ए-फिशन सलीमने प्रचंड उत्कंठावर्धक बनवलं आहे या मालिकेला.
लेखक - रदन शहा
दिग्दर्शक - अहमद भाटी
https://youtu.be/bCeO3EViVU0?si=a0t4zH5OnJcvvvCk  

23.    मंटो
मंटोच्या कथांची बांधणी करून ही सुंदर कलाकृती तयार केली गेली आहे. ‘लीड’मध्ये सानिया सैद आणि दस्तुरखुद्द सरमद खुसट आहे.
लेखक - शाहिद नदीम
दिग्दर्शक - सरमद खुसट 

सरमद खुसट

24.    बाघि
कंदील बलोच हे नाव बऱ्यापैकी लोकांना आठवत असेल, संघर्षांतून पाकिस्तान फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव कमावलेल्या कंदील बलोचची तिच्या सख्ख्या भावाने गैरतच्या नावाखाली हत्या केली होती. तिच्या आयुष्यावर बाघि ही मालिका बेतलेली आहे. मुख्य भूमिकेत ‘नन अदर दॅन’ सबाह कमर आहे.
लेखक - शजिया खान
दिग्दर्शक - फारुक रिंद
https://youtu.be/nQPHMq-IcOg?si=j3DTg5tzqssjUawt  

25.    मन्नत मुराद
हा थोडासा कॉमेडी, थोडासा गंभीर हलका-फुलका ड्रामा आहे. चार मुलींच्या पाठीवर झालेला मुलगा. थोरल्या मुलीचा नवरा बिनकामाचा, दुसरीने नात्याबाहेर केलेलं लग्न. बाकी दोघींची लग्नं जमत नाहीत. अशात सर्वसाधारण घरातील मुलाला गर्भश्रीमंत घरातील एकुलती एक असलेल्या लाडक्या मुलीवर प्रेम होतं. आणि मुलाविषयी अति काळजी करणारी आई आणखीनच हवालदिल होते. आणि मग सुरू होतो टॉम अँड जेरीचा गेम.. इकरा अजिझ तलहा चाहोर मुख्य भूमिकेत आहेत. नुर उल हसन, रुबिया कुलसुम, उझ्मा हसन, टिपू शरीफ, फैझ गिलानी इतर कलाकार आहेत. पण अख्खा ड्रामा इस्रा गझल राज्य करते. तिचं बेयरिंग जबरी आहे!

26.    उल्लू बनाये फिरकोत नहीं
एका लहान गावात, दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबांमध्ये दीर्घकाळ चाललेलं एक भांडण आहे. मोठा भाऊ मियां याकूब आणि धाकटा भाऊ मियांजी. त्यांच्या मुलांचं लग्न ‘वट्ट सत्ता’ (साटलोट) पद्धतीनं केलं जाते. (तुझी मुलगी माझ्या मुलासोबत लग्न करेल, माझी मुलगी तुझ्या मुलासोबत लग्न करेल.) पण या सगळ्यांचं आयुष्य एक गडद वळण घेतं. त्या वळणाची गोष्ट म्हणजे उल्लू बनाये फिरकोत नही. यात सबा कमर, नौमीन एजाज, सोहिल अहमद, इस्त्रा गझल यांच्या अभिनयाची जुगलबंदी भन्नाट आहे. इस्त्रा गझल अंगावर येते अक्षरशः.

याव्यतिरिक्त सध्या हाय रेटिंग असणारे काही ड्रामा ‘ऑन एयर’ आहेत. त्यांच्या फक्त लिंक्स या ठिकाणी देत आहे.
1.    इशक मुर्शीद
https://youtu.be/j1j91RAoM8Y?si=2tut5tdl9LHNTO2J  
2.    नमक हराम
https://youtu.be/H7g4vmZ_G1Q?si=eM03CgnfvcGSinuR  
3.    पागलखाना
https://youtu.be/fuDROgOiK0c?s  
4.    स्टँड अप गर्ल
https://youtu.be/qTnlesoGQhg?si=bXOYR1Wu4gzRvQUm 
5.    खै
https://youtu.be/-Q7llGMTsR4?si=6wlk0H-MQQIMC2n3 

पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्रीच्या तुलनेत मला तिथले चित्रपट सशक्त वाटले नाहीत. काही अपवाद वगळता तिथं मला निराशा वाटणीला आली. कमली, जिंदगी तमाशा, जॉयलँड, बोल यांसारखे चित्रपट वगळता चांगला म्हणावा असा फारसा कंटेंट मला मिळाला नाही. पण या तुलनेत टेलिफिल्म्स, शॉर्ट स्टोरीज, शॉर्टफिल्म्स मात्र संख्येने विपुल आणि दर्जेदार आहेत. वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले आहेत. ‘कुरान-ए-पाक’सोबत मुलीचं लग्न लावलं जातं, हे मला शॉर्ट फिल्मधूनच समजलं. जुन्या बऱ्याच टेलिफिल्म्स आता आपल्याला यूट्युबवर सहज मिळतात. पाकिस्तानात ईदच्या दिवशी टेलिफिल्म्स आवर्जून प्रदर्शित केल्या जातात.

सरमद अली सुलतान खुसट हा अभिनेता/ दिग्दर्शक काही बंडखोर फिल्म्स आणतो आहे. जॉयलँड हा चित्रपट सरमद अली सुलतान यांनीच निर्माण केला होता. ऑस्करवारीसाठी तो पात्र ठरलाच, पण देशांतर्गत विरोधाचीही चादर ओढून आला. देशात प्रदर्शनावर बंदी मात्र परदेशात पुरस्कारांची खैरात अशी या चित्रपटाची परिस्थिती होती. सरमद यांनी नंतर मर्यादा लक्षात घेत गुनाह, बेगुनाह अशा कमी भागांच्या मालिका निर्माण केल्या. मुलांची लैंगिकता, त्यामागील कारणं व परिणाम यांचं चित्रण या मालिकांमध्ये अगदी तरल पातळीवर केलं आहे. यातल्या काही फ्रेमच अशा आहेत, ज्यांत थेट लैंगिकतेबद्दल बोललं गेलं आहे. 

सानिया सैद ही एक बंडखोर अभिनेत्री आहे. समी, संग ए माह, संग ए मर मर, मंटो अशा बऱ्याच मालिकांमधील तिचं काम मी पाहिलं आहे. ‘संग ए माह’मध्ये एक प्रसंग आहे, ज्यात गावातील जिरगा (पंचायत) जरघुना (सानिया) यांच्या नवऱ्याच्या खुनाच्या बदल्यात तिला अपेक्षित न्याय मिळत नाही. (अपेक्षित न्याय म्हणजे खुनाच्या बदल्यात खून!) त्यावेळी ती त्वेषाने डोक्यावरची चादर फेकते आणि एवढ्या जिर्ग्यात म्हणते, "मी माझ्या पोरीच्या डोक्याची शपथ घेऊन सांगते, आजपासून मी चादर घेणार नाही. उघड्या डोक्याने फिरेन आणि जेव्हा लोक मला विचारतील तेव्हा मी त्यांना सांगेन की, गावातील वडीलधाऱ्यांनी माझ्यासोबत न्याय केला नाही, माझं डोकं झाकलं नाही." एका बाईनं जिर्ग्यात चादर काढणं म्हणजे 'न भूतो न भविष्यति' अशी बंडखोरी! आणि त्यानंतरचं उभं आयुष्य ती विना चादर वावरून आपला निग्रही स्वभाव दाखवते. पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत - नौमीन एजाज, नुर-उल-हसन, सबा कमर, इस्रा गझल - ज्यांच्यावर कितीही लिहिलं तरी कमी आहे. 

भविष्यात पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्री एक आशादायी चित्र उभे करते आहे, एवढं निश्चित! 

-   शशिकांत हिवरकर
h.shashi43@gmail.com  


हेही वाचा : 

 

Tags: television pakistani films drama industry मालिका चित्रपट पाकिस्तान मनोरंजन संस्कृती Load More Tags

Comments:

Saeed Khan

Sundar vishleshan..

Add Comment