मतदारांचा कौल यंदा बदलेल?

न मो ... न मो ... अर्थात नको मोदी नको मोदी! हा विचार वास्तवात येण्याची शक्यता आहे.

वांद्रे वरळी सी लिंक

भाजप आणि त्यांच्या युतीतील नेत्यांचा धीरही सुटला आहे, असे वाटण्यासारखी त्यांची वक्तव्ये आहेत. चंद्रकांत पाटील शरद पवारांबाबत जे काही बोलले, ते अजित पवारांनाही मान्य नव्हते. त्याआधी विश्वगुरुंनी भटकणारा असंतुष्ट आत्मा वगैरे म्हटल्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या फलकांवरून विश्वगुरुंचे फोटो हटवले आहेत हेही मतदारांनी पाहिले. अजित पवारांनी माझ्या मागे लागणाऱ्यांचा बंदोबस्त करतो असा दमच दिला आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर त्यांच्या गटाला धनुष्य बाण हे चिन्ह दिल्याबद्दल थेट मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

अडचणीतून सुटण्याचे सर्व मार्ग संपलेले दिसू लागले की, नाइलाजाने अखेरचा मार्ग धरावा लागतो. हा मार्ग नेहमीचा असतो. त्यामुळे तो योग्य स्थळी पोहोचवील असा विश्वासही असतो. अर्थात मार्ग चुकलेल्याला किंवा योग्य मार्गावरून भरकटलेल्याला वाटते की, हाच उपाय आपला तारणहार आहे. कारण पूर्वी अनेकदा याच मार्गाने आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवले आहे. यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत आणि चार बाकी आहेत. या तीन टप्प्यांत साधारण निम्म्या जागांसाठी मतदान झाले आहे. पण यावेळी मतदारांचा कौल गेल्या दोन निवडणुकांपेक्षा वेगळा असल्याचे बोलले जात आहे. आणि वरवर कितीही आव आणला तरी भाजपलाही याची जाणीव झाली असावी, असे दिसते आहे.

भारतीय मतदार यावेळी कसलाच थांगपत्ता लागू देत नाहीयेत. त्यामुळे निवडणूक तज्ज्ञांची, विश्लेषकांचीही पंचाईत झालेली दिसते. एक मात्र आहे, या वातावरणातही विरोधकांची उमेद वाढलेली दिसते आहे. सत्ताधाऱ्यांनाही त्यांच्या खास यंत्रणा, सूत्रांकडून काही माहिती मिळाली असेल आणि ते त्यांच्यात झालेल्या बदलाचे चिन्ह असू शकेल. एक गोष्ट मात्र नक्की आहे. ती म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही उरलेल्या चार टप्प्यांत आपली बाजू अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार. यात भाजप वाकबगार असल्याचा समज आहे. त्यामुळे ते आपल्या पोतडीतून काहीतरी वेगळे काढून, किंवा एखादा अनपेक्षित धक्का देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतील असा अंदाज आहे. 

आपले इप्सित स्थळ गाठायचे आहे आणि मार्गात आपण भरकटलो आहोत, हा अंदाज विश्वगुरुंना आला आणि त्यांनी विचार केला असणार की, नेहमीची वाट लगेच सापडणे तर अवघड आहे. त्यामुळे आता नवीन कोणतातरी जवळचा मार्ग, म्हणजे शॉर्ट कट, वा जुमला शोधायला हवा. काय करावे ही चिंता वाढत असतानाच अचानक त्यांच्या डोक्यात एक क्रांतिकारक विचार आला. तो असा की, ज्या मुद्द्यावरून विरोधकांनी आपल्याला सळो की पळो करून सोडले, ज्याच्यामुळे साधारण दीडशे खासदारांचे निलंबन करावे लागले, (आणि तरीही ज्या विषयाची धार कमी झाली नाही) तो विषय आपणच काढून विरोधकांवर उलटवायचा, म्हणजे आपोआप आपण निरपराध आणि ते सारेच दोषी ठरतील! स्वतःच्या या अफलातून कल्पनेवर ते नेहमीप्रमाणे खुश झाले. आणि कधी एकदा हा रामबाण उपाय वापरतो, असे त्यांना झाले. तो त्यांनी कुणालाही सांगितला नाही. पण सर्वांना तो कळण्यासाठी फार वेळ वाट पाहण्याची गरजच नव्हती. कारण प्रचारसभा अव्याहत सुरूच होत्या आणि त्यात आपण या रामबाणाने लक्ष्यभेद करायचा असे त्यांनी ठरवले होते. 

आणि अखेर तो दिवस उजाडला. दक्षिण भारतातील तेलंगण राज्यातील करीमनगर येथील एका सभेमध्ये विश्वगुरुंनी विरोधकांवर, खरे तर काँग्रेसवर आणि राहुल गांधींवरच तो रामबाण सोडला. त्यांनी (धीर एकवटून) गर्जना केली की, ‘अडानी आणि अंबानी यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा साठवला आहे. पाठोपाठ त्यांनी आणखी एक बाण (बाण कसला, ब्रह्मास्त्रच ते!) सोडला की, अडानी आणि अंबानी हा चोरीचा माल किंवा काळा पैसा मोठ्या प्रमाणात एखाद्या सौद्याचा भाग म्हणून काँग्रेसकडे गेला असणार. टेंपोच्या टेंपो भरून हा काळा पैसा काँग्रेसकडे पोहोचला आहे. या सौद्याचा भाग म्हणूनच आता राहुल गांधी अडानी आणि अंबानी यांच्याबाबत काहीच बोलत नाहीयेत.’

विश्वगुरुंच्या या गर्जनेने विरोधक नाही, तर भाजपचेच सदस्य, भक्त, पाठीराखे इतकेच काय पण गोदी माध्यमे आणि ट्रोलसेनाही हादरली. नेहमीप्रमाणे लगोलग त्या सर्वांकडून या आरोपाचा पुनरुच्चार झाला नाही. आणि पाळलेली माध्यमे एकदम सायलेंट मोडवर गेल्यासारखी झाली. अगदी विश्वगुरुंचा उजवा हात समजले जाणारे गृहमंत्रीही! संरक्षणमंत्र्यांना बहुतेक आता आपल्या एकमेव नेत्याचे रक्षण कसे करायचे हा प्रश्न पडला असावा. अचानक भाजपच्या गोटात, कानठळ्या बसवणारी म्हणतात तशी, शांतता पसरली. आश्चर्याची बाब म्हणजे विश्वगुरुंच्या अपेक्षेनुसार विरोधक मात्र गप्प झाले नाहीत. उलट त्यांच्यात नवा जोमच आला. कारण दीर्घकाळ राहुल गांधी अडानी आणि अंबानी यांच्याबाबत सतत प्रश्न विचारून विश्वगुरुंना हैराण करत होते. आता विश्वगुरुंची समजूत होती की, त्यांनी डाव उलटवला आहे. राहुल गांधींना जाळ्यात पकडून निरुत्तर केले आहे. पण त्यांचा अंदाज सपशेल चुकला.

विश्वगुरुंनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देणे हे आपले कर्तव्यच आहे असे रास्तपणे काँग्रेसजनांना वाटले. आणि त्यांनी असे सणसणीत उत्तर दिले की सत्ताधाऱ्यांचे नेते, त्यांची पहिली बाजू मांडणारे विद्वान यांच्याबरोबर त्यांची ट्रोल आर्मीरूपी तैनाती फौज देखील गलितगात्र झाली. त्यांनी लगेच सांगितले की, ‘पंतप्रधानांना खरोखरच अडानी आणि अंबानी हे ‘काळा पैसा साठवणारे’ वाटत असतील तर त्यांनी लगेचच पुढचे पाऊल टाकून कारवाई करायला हवी. म्हणजे त्यांची तपास यंत्रणांमार्फत अगदी बारकाईने चौकशी करायला हवी.’

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या "सतत दहा वर्षे भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्यानंतर आता मोदींमध्ये अडानी आणि अंबानी यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचे सामर्थ्य निर्माण झाले आहे. कदाचित, कोणतेही सरकारी पद नसताना राहुल गांधी भ्रष्टाचार आणि भांडवलदारांच्या लुटीबाबत सतत आक्रमकपणे बोलत असतात, हे पाहून त्यांना (मोदींना) असे धाडस करण्याची शक्ती प्राप्त झाली असावी. राहुल गांधी कोणालाही घाबरत नाहीत. म्हणून मोदींनीही धैर्य एकवटून अडानी आणि अंबानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टेंपोमध्ये बॅगा की पोती, भरभरून (काळा) पैसा वाटण्यासाठी ते नेत आहेत. अर्थात तार्किकदृष्ट्या पुढचे पाऊल म्हणजे त्यांनी ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांच्यामार्फत अडानी आणि अंबानी यांनी साठवलेल्या या प्रचंड काळ्या पैशाची चौकशी करावी. आता पुढे टाकलेले पाऊल मागे घेण्यात काय अर्थ आहे? तर ताबडतोब धाडी सुरू होऊ देत.’ 

पण नुसते आरोप करून मोदी थांबले नाहीत; तर ते पुढे म्हणाले की, ‘राहुल गांधी आणि अडानी-अंबानी यांच्यात एक गोपनीय करार झाला आहे आणि त्यामुळेच आता निवडणुका जाहीर झाल्यावर (त्या करारानुसार) काँग्रेस आणि राहुल गांधींनी अडानी-अंबानी यांच्यावर टीका करणे थांबवले आहे.’ म्हणजे खरेतर आता तपास यंत्रणांची जबाबदारी आहे की त्यांनी गुन्हे नोंदवून अडानी-अंबानींचा तपास करण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण पंतप्रधानांनीच त्या दोघांवर काळ्या पैशाच्या संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. एरवी मोदी काहीही बोलले तरी सारा संघ परिवार त्यावर जोरदार प्रतिक्रिया देतो. पण या वेळी मात्र त्यांनी हा विषय (त्यापासून गंभीर धोका असल्याच्या भीतीने) टाळला आहे. 

तसे पाहिले, तर विश्वगुरू बरोबरच बोलत आहेत. या निवडणुकीत अडानी-अंबानी हा मुख्य मुद्दा असायलाच हवा. पण ज्यावेळी ते खोटेपणाने सांगतात की, काँग्रेस अडानी-अंबानींबद्दल बोलत नाहीय; त्याच वेळी हेही ध्यानात घेतले पाहिजे की, त्यांनी स्वतः देखील या दोघांबरोबरचे त्यांचे संबंध आणि सरकारच्या यंत्रणेबरोबरचे त्यांचे नाते त्यांनी कधीच स्पष्ट केलेले नाही. हे दोघे व्यावसायिक गुजरातचेच आहेत. आणि मोदी सरकारने त्यांच्यावर मेहेरनजर करून त्यांना आपल्या कालखंडात झुकते माप दिले आहे, आणि पंतप्रधानांनी या दुक्कलीला देश विकला आहे, असा आरोप विरोधक करतात. मोदींनी म्हटले की, ‘शहाजादे (राहुल गांधी) सुरुवातीला राफेलबाबत बोलत होते, पण नंतर त्यांनी पाच बडे व्यावसायिक असा जागर सुरू केला आणि नंतर सूर बदलला आणि ते फक्त अडानी अंबानींबाबतच बोलू लागले होते. पण निवडणुका जाहीर होताच त्यांनी या दोघांबाबतचे बोलणे थांबवले आहे. म्हणून मी त्यांना तेलंगणातून विचारतो की, त्यांनी काळ्या पैशाच्या किती गोण्या त्या दोघांकडून घेतल्या आहेत. पण विश्वगुरू याबाबतीतही सवयीने खोटेच बोलत आहेत कारण 24 एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले होते की, ‘या देशात काय होत आहे. येथे फक्त दोन विक्रेते आणि दोनच खरेदीदार आहेत. विक्रेते आहेत मोदी आणि अमित शहा आणि खरेदीदार आहेत अडानी आणि अंबानी’. त्याआधी 12 एप्रिलला कोइंबतूर येथे प्रचार सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, ‘नरेंद्र मोदी आणि अडानी यांच्या धोरणांमुळे दोन भारत निर्माण झाले आहेत. एक भारत अब्जाधीशांचा तर दुसरा गरीब लोकांचा.’ भारत जोडो न्याय यात्रेतही त्यांनी दोन अब्जाधीशांच्या सतत वाढत्या संपत्तीचा मुद्दा उठवला होता. आणि एका ताज्या पाहणीत असे आढळले आहे की, 52 टक्के लोकांना आर्थिक धोरणे ही या दोन मित्रांना मदत करण्याकरताच आखली जात आहेत, याची खात्री वाटते आहे.

काही लक्षणीय बाबी अशा आहेत. एकीकडे अडानी-अंबानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होत असल्याने नुकसान सामान्य आणि गरीब लोकांचेच होत आहे. अगदी कोविड-19च्या काळातही करोडो भारतीय काहीतरी कमवण्यासाठी झगडत होते तेव्हा या दोघांच्या संपत्तीत मोठी, अनेक पटींनी वाढ होत होती. आज अंबानी आशियातील सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत तर अडानी त्यांच्या पाठोपाठ आहेत. दोघेही जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या 15 जणांत आहेत. पण भारतात मात्र लोकांच्या बचतीत प्रचंड घट झाली आहे, रोजगारामध्ये घट झाली आहे आणि बेकारीचे प्रमाण तर गंभीर वाटण्याजोगे आहे. अडानींबाबतची चौकशी गोगलगायीच्या गतीने होत आहे आणि यासाठी विरोधकांची संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. हिंडेनबर्ग अहवालात उघड करण्यात आलेल्या बाबींसंबंधात ‘सेबी’नेही काही त्रुटी असल्याचे मान्य केल्यावरही आजवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व, त्या अडाणी ग्रुपबाबत प्रश्न उपस्थित करत असल्याने रद्द करण्यात आले. पण महुआंचे प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. अडानींचा उल्लेख भाषणांत केल्यामुळे राहुल गांधी यांचेही सदस्यत्व रद्द केले गेले होते, पण नंतर ते परत त्यांना देण्यात आले. मुळात अडानी अंबानींचा विषय निघाला तो मोदींनी सत्ताकालात या दोघांना अनुकूल निर्णयच घेतले. अगदी शेतीबाबतच्या नियमांपासून विमानतळांचे खाजगीकरण, खाणकामांच्या नियमातील बदल असे अनेक निर्णय. 

भाजपच्या सोयीसाठी सात टप्प्यांत मतदान घेण्याचे ठरवण्यात आले, हे सर्वमान्य आहे. कारण विश्वगुरुंना सर्वत्र संचार करता यायला हवा होता. पण आता मात्र याचा फायदा विरोधकांनाच मिळत आहे अशी धाकधूक भाजपच्या गोटात आहे. त्यातच आता त्यांचा मुख्य आधार जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तो आता प्रचारापासून दूर राहतो आहे किंवा त्याने प्रचारातून अंग काढून घेतले आहे असे जाणकार निरीक्षकांकडून बोलले जात आहे. खरोखरच तसे असेल तर भाजपसाठी परिस्थिती गंभीर आहे. कारण संघाला अंदाज आल्यानेच त्याने हा निर्णय घेतला असणार आणि संघाचा अंदाज क्वचितच चुकतो याची भाजपला जाण आहे. संघाला कदाचित दुसरा कुणीतरी भाजप नेता पंतप्रधान बनावा असेही वाटत असण्याची शक्यता आहे. म्हणजे जेमतेम बहुमतासाठीच त्यांची मदत राहणार असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दुसरीकडे या भीतीने भाजप आणि त्यांच्या युतीतील नेत्यांचा धीरही सुटला आहे, असे वाटण्यासारखी त्यांची वक्तव्ये आहेत. चंद्रकांत पाटील शरद पवारांबाबत जे काही बोलले, ते अजित पवारांनाही मान्य नव्हते. त्याआधी विश्वगुरुंनी भटकणारा असंतुष्ट आत्मा वगैरे म्हटल्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या फलकांवरून विश्वगुरुंचे फोटो हटवले आहेत हेही मतदारांनी पाहिले. अजित पवारांनी माझ्या मागे लागणाऱ्यांचा बंदोबस्त करतो असा दमच दिला आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर त्यांच्या गटाला धनुष्य बाण हे चिन्ह दिल्याबद्दल थेट मोदी आणि अमित शहा यांचे आभार मानल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

पण ... गेल्या दोन निवडणुकांत भाजपचा आधारस्तंभ असलेला मध्यमवर्ग आता विचार करू लागला आहे. आपण केले ते बरोबर की चूक अशी शंकाही त्याला येत आहे. तो आता जागरूकतेने काय घडत आहे हे बघत आहे. मुंबईतच मराठी लोकांनी आमच्याकडे नोकरीसाठी अर्ज करू नये अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत, आमच्या सोसायटीत मराठी पत्रके वाटायला यायचे नाही अशी तंबीही दिली जात आहे. पण ‘खळ्ळ SSS खटॅक’ फेम नेते मात्र निपचीत आहेत. वारंवार बाळ ठाकरे यांची आठवण काढणारे, त्यांचे खरे वारसदार आम्हीच असा दावा करणारे सत्तारूढ मराठी नेते याबाबत मिठाची गुळणी धरूनच बसले आहेत. पण आता मतदार आता स्वस्थ बसणार नाहीत. निदान मुंबईत आणि महाराष्ट्रातील बाकी राहिलेल्या मतदारसंघांत तरी याचा प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे.

कदाचित न मो ... न मो ... अर्थात नको मोदी नको मोदी!
हा विचार वास्तवात येण्याची शक्यता आहे.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


हेही वाचा :

 

Tags: narendra modi RSS congress voting assembly elections 2024 political analysis a s ketkar निवडणूक भाजप राहुल गांधी नरेंद्र मोदी विश्लेषण Load More Tags

Add Comment