पेले : त्याच्यासारखा केवळ तोच!

जगात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या आणि तेवढाच लोकप्रिय असलेल्या फुटबॉलचा तो सम्राट होता.

तो फुटबॉलचा अनभिषिक्त सम्राट होता. तो फुटबॉलचा राजदूत होता, असंही म्हटलं जात असे. तो तीन वर्षं देशाचा क्रीडामंत्री होता. त्यानं चित्रपटांतही काम केलं होतं. केवळ फुटबॉलचा अमेरिकेत प्रसार व्हावा आणि तुझं आणि तुझ्या देशाचंही त्यात हित आहे, असं चतुर राजकारणी हेन्री किसिंजर त्याला म्हणाले होते; आणि लाखो डॉलरच्या या न्यूयॉर्क कॉसमॉस बरोबरच्या कराराला त्यानं मान्यता दिली होती. ‘हा आमच्या देशाचा खजिना आहे’, असं प्रचंड रकमेची लालूच दाखवून त्याला करारबद्ध करू पाहणाऱ्या युरोपियन क्लब्जना बजावणाऱ्या ब्राझीलच्या पंतप्रधानांनी त्या देशाला त्याच्याबाबत काय वाटतं, ते जाहीरपणे बोलून दाखवलं होतं. जाईल तेथे त्याचं प्रचंड स्वागत होई; केवळ त्याला पाहण्यासाठी विमानतळांवरही गर्दी होई आणि त्याचे सामने पाहण्यासाठी तर फुटबॉलप्रेमी काहीही करण्यास तयार असत. जाईल तेथे तो प्रेक्षकांची मनं जिंकून घेई. आणि जगातील बहुतेक फुटबॉलपटूंसाठी तर - बायचुंग भुतियानं म्हटल्याप्रमाणं - तो साक्षात देवच होता.

आता मात्र त्याच्या केवळ असंख्य आठवणीच उरतील कारण तो आता आपल्याला सोडून गेला आहे. एडसन अरांटेस दु नसिमेंटों, हे त्याचं खरं नाव. साक्षात थॉमस अल्वा एडिसनवरून त्याच्या आईबाबांनी ठेवलेलं. कारण त्याचा जन्म होण्यापूर्वी, म्हणजे 23 ऑक्टोबर 1940 पूर्वी काही दिवसच त्यांच्या गावात वीज आली होती आणि तेव्हा ते अप्रूपच होतं. म्हणूनच हे नाव त्याला मिळालं. आणि आता ते थॉमस अल्वा एडिसन एवढंच सर्वांच्या परिचयाचं झालं आहे. तरीही त्याला त्या नावापेक्षा लोक ओळखतात ते पेले या छोट्या नावानं. पण त्या छोट्या नावाची कीर्ती मात्र अमाप आहे कारण जगात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या आणि तेवढाच लोकप्रिय असलेल्या फुटबॉलचा तो सम्राट होता. अनेक खेळाडूंनी नंतर प्रचंड प्रसिद्धी मिळवली पण तरीही पेलेला कुणीच विसरू शकलं नाही, शकणारही नाही. त्याचा प्रत्यय यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यानही आला. तेव्हा पेले आजारी होता. तरीही सर्व प्रेक्षकांबरोबर खेळाडूही त्याला आराम पडावा म्हणून प्रार्थना करत होते. शुद्धीवर आल्यावर तोही स्पर्धेबाबत विचारणा करून चाहत्यांना दिलासा देत होता. पण आता स्पर्धा संपून दोन आठवडे उलटण्याआधीच त्याने हे जग सोडले आहे. असंख्य फुटबॉलप्रेमी शोकसागरात बुडाले आहेत.

त्याचे वडील व्यावसायिक फुटबॉल खेळाडू होते. पण दुखापतीमुळे त्यांना खेळ सोडावा लागला होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं पेले लहानपणी सातव्या वर्षापासूनच रेल्वे स्टेशनवर बूटपॉलिश करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी त्याचं फुटबॉलप्रेमही कमी झालं नव्हतं. वेळ मिळेल तेव्हा तो चिंध्यांपासून बनवलेल्या चेंडूने खेळत असे आणि त्यातलं त्याचं कौशल्य सर्वांचंच लक्ष वेधून घेत असे. तो दहा वर्षांचा असताना ब्राझीलमध्ये विश्वचषक फुटबॉल स्पर्धा झाली आणि अंतिम सामन्यात ब्राझीलला उरुग्वेकडून 1-2 अशी हार पत्करावी लागली. साऱ्या देशावर शोककळा पसरली. तेव्हाच या मुलानं मनोमन ठरवलं की, ‘मी विश्वचषक माझ्या देशाला मिळवून देईन’. आता खेळातील कौशल्याच्या जोडीला या निश्चयाची जोड मिळाली.

वडलांच्या संघातला बी-ले नावाचा खेळाडू हा त्याचा आदर्श होता. त्याच्यासारखं खेळायचा तो नेहमीच प्रयत्न करायचा. त्यामुळे त्याचे साथीदार त्याला बीले बीले म्हणून चिडवत. पण त्याचं पेले कधी झालं हे कुणालाच नेमकं सांगता येत नाही. कुणी सांगतात, ‘तो सारखा फुटबॉलबरोबरच असायचा त्यामुळं त्याला दोना द पेलादा म्हणूनही चिडवत आणि त्यावरूनच पेले हे नाव मिळालं’. खरं काय ते कुणीच सांगू शकत नाही. पण पेले हे नाव त्यानं अजरामर केलं, हे मात्र कुणीही अमान्य करणार नाही. बीलेचा आदर्श, वडलांचं प्रोत्साहन आणि अंगभूत कौशल्य यामुळं त्याची खेळामध्ये झपाट्यानं प्रगती होत गेली. लवकरच सांतोस (सँटोस) या प्रख्यात क्लबच्या ज्युनियर संघामध्ये त्याला प्रवेश मिळाला आणि तिथं त्याच्या कौशल्याला अनेक पैलू पडले. त्याचा खेळ कलात्मक तर होताच पण आता अधिक दर्जेदार बनला. म्हणूनच केवळ आडदांडपणाचा, दांडगाईचा समजल्या जाणाऱ्या फुटबॉल या खेळाला कला बनवणारा म्हणूनही तो ओळखला जातो. त्याच्या प्रकृतीनं आता त्याच्याबाबत लोकांना कुतूहल तर वाटू लागलंच, पण त्याबरोबरच त्याच्याबाबत अपेक्षाही वाढू लागल्या. त्यानं खेळातील नैपुण्यही प्राप्त केलं. केवळ 15 व्या वर्षीच त्यानं सँटोसकडून पहिला सामना खेळला. या पहिल्याच व्यावसायिक खेळाडूंच्या सामन्यात त्यानं तब्बल चार गोल केले. सँटोसनं तो सामना 7-1 असा जिंकला. त्यानंतर मात्र त्याच्या यशाची कमान उंचावतच गेली. 1957 च्या जुलै महिन्यात त्यानं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि त्यानंतर त्याच्या अव्वल खेळामुळं त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालं.

स्वीडनमध्ये 1958 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड झाली तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता. तो सांगायचा की, ‘त्यावेळी मी इतका हडकुळा होतो की ते लोक गमतीनं मला ब्राझीलचा शुभंकर-मॅस्कॉट म्हणत. पण प्रत्यक्षात तो ज्यावेळी मैदानात उतरला तेव्हा प्रेक्षकांच्या साऱ्या समजुती, शंका दूर झाल्या. त्याचा खेळ पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता आणि हे काहीतरी वेगळंच रसायन आहे हे त्यांच्या ध्यानात आलं. विश्वचषक स्पर्धेत खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू हा त्याच्या नावावरचा विक्रमच होता. वेल्सबरोबरच्या सामन्यातला एकमेव गोल त्यानंच केला आणि ब्राझीलला विजयी केलं. हा गोल ज्यांनी पाहिला होता ते थक्क झाले होते. गोलकडे त्याची पाठ असतानाच चेंडू त्याच्याकडं आला. त्यानं तो छातीवर झेलला आणि तेथून घोट्यावर पडताच मागील बाजूस (गोलच्या दिशेन) स्कूप केला. आणि विद्युतवेगानं गिरकी घेऊन चेंडू खाली पडून जेमतेम फुटभरही उसळला नसेल, तोच तो गोलमध्ये मारला. विश्वचषक स्पर्धेतला हा त्याचा पहिलाच गोल, यामुळं या स्पर्धेत गोल नोंदवणारा सर्वात लहान वयाचा खेळाडू तोच ठरला. हा आणखी एक विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. मुख्य म्हणजे या गोलमुळं त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.

पण पेले तेवढ्यावर थांबला नाही, त्याने उपान्त्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सविरुद्ध खेळताना हॅटट्रिक नोंदवली. (हाही विक्रमच) ब्राझीलनं तो सामना 5-1 असा जिंकला. आता त्याचं नाव जगभर झालं होतं. अंतिम सामन्यात स्वीडनविरुद्ध त्यानं दोन गोल केले तर व्हाव्हानंही दोन गोल केले आणि झगाल्लोनं एक गोल करून यजमान स्वीडनला 5-2 असं पराभूत करून विश्वचषक जिंकला. 1962 च्या चिलीमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतही त्याचा प्रभाव जाणवतच होता. मात्र या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर केवळ एक गोल नोंदला गेला. त्या स्पर्धेनंतर फ्रान्सचा गोलरक्षक म्हणाला होता की, ‘मला 10 जर्मनांविरुद्ध खेळावं लागलं तरी चालेल पण मी एकाही ब्राझीलियन विरुद्ध खेळणार नाही!’

पण त्याच्या या अविश्वसनीय खेळामुळे आता प्रतिस्पर्धी चेंडूऐवजी त्यालाच लक्ष्य करू लागले होते आणि त्याचा प्रत्यय 1966 च्या इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत आला. युरोपियन खेळाडू जणू त्याला घेरा घालत होते आणि धटिंगणाप्रमाणे कसलाही मुलाहिजा न ठेवता दांडगाईचा खेळ करत होते. त्यांचे सारे प्रयत्न त्याला रोखण्यासाठीच होते आणि त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबण्यास ते कमी करत नव्हते. याचा प्रत्यय पोर्तुगालबरोबरच्या सामन्यात आला. पोर्तुगालच्या खेळाडूनं त्याला जाणूनबुजून जबरदस्त धडक दिली. सध्या अशा प्रकारचा खेळ केला, तर त्या खेळाडूला बाहेर काढलं जातं. पण त्यावेळी त्या खेळाडूवर काहीच कारवाई झाली नाही, मात्र जखमी झालेल्या पेलेलाच नाइलाजानं बाहेर पडावं लागलं होतं. बल्गेरियाविरुद्ध 20 विजय मिळवल्यानंतर दांडगाईचा खेळ करणाऱ्या हंगेरी आणि नंतर पोर्तुगालकडूनही ब्राझील 1-3 अशा फरकानं पराभूत झाला. ब्राझीलच्या खेळण्याच्या पद्धतीनं युरोपियन संघांना सुरुवातीला अचंबित केलं होतं कारण त्यांना खेळाडूनं नेमून दिलेल्या जागेवरच खेळण्याची सवय होती. पण ब्राझीलचे खेळाडू मात्र कुठेही जात. त्यांच्या मध्यफळीतील दोघेजण एकदम आघाडी फळीची उजवी आणि डावी बाजू बनत तर कधी कधी बचाव फळीतील खेळाडूही त्यांच्या मदतीसाठी धावत. त्यानंतर युरोपियन संघांनी आघाडीला चार खेळाडू खेळवण्यास सुरुवात केली. 

या अनुभवानं तो निराश झाला व निवृत्तीचा विचारही करू लागला होता. पण नंतर त्यानं तो विचार बदलला आणि मेक्सिकोतील 1970 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी तो सिद्ध झाला. यावेळी ब्राझीलकडं आघाडी फळीत जायरझिन्हो, आल्बर्तो आणि गर्सनसारखे अतिशय गुणी खेळाडू होते आणि त्यामुळे पेलेवर प्रतिस्पर्ध्यांनी लक्ष केंद्रित केले, तरीही प्रतिस्पर्ध्यांनाच पस्तावावे लागत होते. ब्राझीलने एकापाठोपाठ एक सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. चेकोस्लोव्हाकिया, रुमानिया आणि इंग्लंडला सहज हरवून त्यांनी बाद फेरी गाठली. उपान्त्यपूर्व फेरीत पेरुला त्यांनी 4-2 असं, उपान्त्य फेरीत उरुग्वेला 3-1 असं हरवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात इटलीविरुद्ध पहिला गोल पेलेनंच नोंदवला आणि नंतर गर्सन, जयरझिन्हो आणि अल्बर्तोनं गोल करून 4-1 असा विजय मिळवला. ब्राझीलनं तिसऱ्यांदा ‘ज्यूल्स रिमे विश्वचषक’ जिंकला आणि तेव्हाच्या नियमानुसार तो कायमचा त्यांच्याकडे आला. (आता मात्र हा नियम बदलला गेला आहे.) पेलेनं लहानपणीच ठरवलं होतं, त्याप्रमाणं ब्राझीलसाठी त्यानं नुसता विश्वचषक जिंकला इतकंच नाही, तर तो कायमचा ब्राझीलकडे सोपवला. खेळाच्या इतिहासात अजरामर व्हायला! तिन्ही विश्वचषकांत खेळून विजय मिळवणारा तो आजवरचा एकमेव खेळाडू आहे. पेले कधी केवळ अप्पलपोटेपणानं खेळला नाही. सहकाऱ्याना संधी आहे असं दिसलं, की तो चेंडू त्यांच्याकडं द्यायचा. अशा प्रकारं अनेक गोलमध्ये त्याचा सहभाग होता. विश्वचषक स्पर्धेत त्यानं 12 गोल केले आणि 10 गोल होण्यास मदतही केली.

त्यानंतर मात्र तो विश्वचषक स्पर्धेत खेळला नाही, मात्र तो निवृत्त झाला नव्हता. खेळत होता. प्रेक्षकांना आनंद देत होता. त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेकदा संघाला अडचणीही येत. अशाच एका सामन्यासाठी इजिप्तला जात असताना त्यांचा संघ बेरुतच्या विमानतळावर थांबला असताना फुटबॉलप्रेमींनी एकच गर्दी केली होती. आमच्या संघाबरोबर खेळा असा त्यांचा आग्रह होता आणि खेळला नाहीत, तर आम्ही पेलेचंच अपहरण करू अशी धमकी ते देत होते. सुदैवाने पोलिसांनी मध्यस्थी केली आणि आमचा ब्राझीलचा संघ इजिप्तला पोहोचला असं त्यानं लिहिलंय. एकदा त्रिनिदादमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सामन्यानंतर प्रेक्षक त्याला सोडायलाच तयार नव्हते, ब्राझीलचे व्यवस्थापक म्हणाले, “एक प्रकारं त्यांनी त्याचं अपहरणच केलं होतं”. तो निवृत्त झाला 1977 मध्ये. तरीही नंतर अनेक ठिकाणी तो प्रदर्शनीय वा मित्रत्वाच्या सामन्यांत खेळला. तो ‘न्यूयॉर्क कॉसमस’मध्ये दाखल झाला त्याच वर्षी 1977 मध्ये तो फुटबॉलवेड्या कलकत्त्यात मोहन बागानविरुद्ध मित्रत्वाच्या सामन्यात न्यूयॉर्क कॉसमस संघाकडून खेळला. तो सामना 2-2 अशा बरोबरीत सुटला होता. त्या सामन्यात बागानकडून मध्यफळीत खेळणाऱ्या गौतम सरकारवर पेलेला रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यानं ती अतिशय कुशलतेनं पार पाडली. सामन्यानंतर तो गौतम सरकारला म्हणाला, “तूच का तो मला थोपवून धरणारा तो 14नंबर? कमाल केलीस हं!” त्यांचं हे संभाषण ऐकणारा भारताचा महान खेळाडू नंतर गौतम सरकारला म्हणाला की, “गौतम आता तू निवृत्त हो! कारण याहून अधिक प्रशस्ती तुला कधी मिळेल का?”

पेले लोकांमध्ये सहज मिसळायचा. त्यांच्या मागण्या मान्य करून सही द्यायचा. त्यांच्याबरोबर फोटो काढू द्यायचा. मुलांबरोबर तर तो त्यांच्यातलाच एक बनायचा. त्यांनाही ते खूप आवडायचं. 21 वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं 1363 सामने खेळले आणि 1281 गोल नोंदवले. वर्तमानपत्रांतून त्यांच्या विक्रमांची आकडेवारी वाचकांनी पाहिलीच असेल, त्यामुळं ती देण्याची आवश्यकता नाही.

आता थोडं त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत. त्यानं तीन विवाह केले आणि त्याचबरोबर इतर अनेक संबंधही होते असं बोललं जात होतं. ते काही खोटं नव्हतं. कदाचित त्याच्या लोकप्रियतेचा आणि स्वभावाचा तो परिणाम असू शकेल. रोझमेरी चोल्बी ही त्याची पहिली पत्नी. त्यांना केली क्रिस्तीना, एडसन आणि जेनिफर ही तीन मुलं. एडसन काही काळ गोलरक्षक म्हणून खेळला पण आजोबांप्रमाणं जखमी झाल्यानं त्यालाही खेळ सोडावा लागला. नंतर तो व्यसनी बनला आणि अमली पदार्थांच्या सेवनाबद्दल तुरुंगातही गेला. 1982 मध्ये पेलेनं घटस्फोट घेतला. 1994 मध्ये दुसरा विवाह केला तो मनोविकारतज्ज्ञ ॲसिरिया लेमॉसशी. त्यांना जोशुआ आणि सेलेस्टा ही त्यांची जुळी मुलं. पण पुन्हा 2008मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिसरा विवाह 2016 मध्ये मार्सिआ औसीशी झाला होता. सँड्रा या त्याच्या अनौरस मुलीनं ‘द डॉटर द किंग डिडंट अ‍ॅक्सेप्ट’ (मुलगी, जिला राजानं नाकारलं) या नावाचं पुस्तक लिहिलं. ते चांगलंच गाजलं. ते वाचल्यामुळं मला खूपच शरमल्यासारखं झालं, असं पेले म्हणाला होता.

शाळा सुटल्यानंतर शिक्षणाला मुकावे लागले याची खंत त्याला होती. म्हणून सँटोसकडून खेळत असतानाच त्यानं आधी पदविका आणि नंतर पदवीही मिळवली होती. 1995 ते 98 या काळात तो ब्राझीलचा क्रीडामंत्री होता. त्यानं काम केलेल्या चित्रपटांत ज्यो ह्यूस्टनचा ‘व्हिक्टरी’, जो आपल्याकडं ‘एस्केप टु व्हिक्टरी’ या नावानं प्रदर्शित झाला होता, तो महत्त्वाचा होता. त्यात त्यानं मायकेल केन आणि सिल्व्हेस्टर स्टॅलनबरोबर काम केलं होतं. त्यात खरं तर तो गोलरक्षकाची भूमिका करणार होता. तसं आधीही त्यानं स्पर्धा खेळतानाही चार सामन्यांत गोलरक्षण केलं होतं आणि प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करू दिला नव्हता. सर्व सामने ब्राझीलनंच जिंकले हे वेगळं सांगायलाच नको. तर चित्रपटातील त्या सामन्यात एकदा स्टॅलनला बायसिकल किकनं गोल करायचा होता. पण ते काही त्याला जमत नव्हतं. अखेर त्यांनी भूमिकांची अदलाबदल केली होती. पण त्यामुळे प्रेक्षकांना पेलेची खास बायसिकल किक पाहायला मिळाली.

गेली काही वर्षं तो अधनंमधनं आजारीच असायचा. त्याला कर्करोगानं ग्रासलं होतं आणि त्याच्याबरोबरच्या त्या सामन्यात मात्र कर्करोगानं विजय मिळवला. देहानं पेले आता भूतलावर नाही, पण त्याच्या आठवणी, त्याच्यावरील लेखन, त्यांचं आत्मचरित्र, त्याची चरित्रं, त्याचे फोटो, आणि त्याच्या सामन्यांचं चित्रण याद्वारे तो असणारच आहे.

अमेरिकन कलाकार आणि चित्रपट निर्माता अ‍ॅन्डी वॉहोल म्हणाला की, Pele is one of the few who contradicted my theory. Instead of 15 minutes he will have 15 centuries! - Andy Warhol. American Artist and Film-maker.

(म्हणजे माझा सिद्धांत खोटा ठरवणाऱ्या मोजक्या लोकांपेकी तो एक आहे. त्याचा (लौकिक) 15 मिनिटे नाही, तर 15 शतकं राहणार आहे! - अ‍ॅन्डी वाहोल.) याहून अधिक सांगायचं?

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: messi football ronaldo futbol neymar maradona ronaldinho worldcup2023 worldcup respect kaka freekick cafu robertocarlos raul maldini ibrahimovic rivaldo playstation legend game figo footballroni barcelona realmadrid cr7 leomessi cristianoronaldo halamadrid pele brazilian soccer legend Load More Tags

Comments:

Dattatraya Parashuram Joshi

श्री. आ. श्री. केतकरांनी लिहीलेला एक लेख आहे तो एका सिनेमाबद्दल "एस्केप टु व्हिक्टरी". हा एक आगळा क्रीडा - युद्ध (कैदी) चित्रपट आहे. (कर्यव्यसाधना - युद्धपटांवरील लेखमाला : 10) व तो या संदर्भात वाचनिय आहे. 'पेले' यांने या चित्रपटात एका फुटबाॅल खेळाडूची भूमीका केली आहे. लेख जरूर वाचावा आणि चित्रपटही बघावा.

Add Comment