Move, Djokovic. Alcaraz has come!

यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अत्यंत अटीतटीनं लढवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझने नोवाक योकोविचचा पराभव केला.

ही अंतिम लढत दीर्घकाळ स्मरणात राहील अशीच झाली हे कुणीही नाकारणार नाही. कारण त्यामुळेच बोर्ग – मॅकेन्रो, फेडरर नदाल, तसंच फेडरर आणि योकोविच यांच्यातील येथेच झालेल्या लढती आठवल्या. यातील फेडरर आणि योकोविच यांचा अंतिम सामना तर चार तास 58 मिनिटे चालला होता. तो आजवरचा विक्रम आहे. कालचा सामना तितकाच रंगतदार होता. मात्र तो त्याहून थोडा कमी वेळ म्हणजे चार तास 46 मिनिटे चालला. तरीही महत्त्वाची बाब म्हणजे त्यातील चुरस अखेरपर्यंत कायम होती.

नाही, हा लेख इंग्रजीत नाहीय. पण इंग्रजीत असं म्हटलं की आपल्याला काय म्हणायचंय ते अचूक सांगितलं जातं. म्हणजे बाजूला ‘हो, योकोविच अल्काराझ आलाय’ असं म्हणता येईलही, पण ते तितकंसं बरोबर वाटत नाही, निदान मला तरी! कुणाला अगदी छान काहीतरी सुचेलही. करा प्रयत्न.

ते असो, सांगायचं काय तर ग्रँड स्लॅम मालिकांतील स्पर्धांत 23 अजिंक्यपदं मिळवणारा विक्रमवीर सम्राट, नोवाक योकोविचचं स्वप्न कार्लोस अल्काराझ गार्फिआमुळे यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तरी पुरं होऊ शकलं नाही. या स्पर्धेत एकेरीची आठ अजिंक्यपदं मिळवण्याचा रॉजर फेडररचा विक्रम, आणि मार्गारेट कोर्टचा ग्रँड स्लॅम मालिकांतील स्पर्धांतील 24 अजिंक्यपदांचा विक्रम यांची बरोबरी योकोविचला करायची होती. पण त्याचा तो बेत अल्काराझनं यशस्वी होऊ दिला नाही... पुरुष एकेरीच्या अत्यंत अटीतटीनं लढवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात त्यानं योकोविचचा 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6 आणि 6-4 असा पराभव केला.

तसं पाहता अनेक जाणकारांचं मत योकोविच ही स्पर्धा जिंकणार असं होतं आणि स्वतः योकोविचही ‘मीच फेव्हरिट’ असं म्हणाला होता. का कोण जाणे, त्यामुळे त्याच्या बोलण्यात गर्वाचा भाव जाणवला होता. खरं तर तो आत्मप्रौढी मिरवणाऱ्यांपैकी नाही, पण गतेतिहास पाहता त्याला तसं वाटणं स्वाभाविकच होतं, असंही म्हणता येईल. एकीकडं 36 वर्षांचा अनुभवी योकोविच आणि दुसरीकडं केवळ 20 वर्षांचा अल्काराझ. पण गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेतील जेतेपदानंतर अल्काराझ क्रमवारीत अग्रक्रमांकावर पोहोचला होता आणि त्याने तो 28 आठवडे टिकवला होता. योकोविचनं फ्रेंच स्पर्धा जिंकून तो हिसकावून घेतला, तरी क्वीन्स स्पर्धेचं विजेतेपद मिळवून अल्काराझ पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला. त्यामुळे त्याला पहिलं मानांकन- 'सीडिंग', तर गेल्या वर्षीचा विजेता असूनही योकोविचला दुसरं मानांकन मिळालं होतं. क्वीन्स स्पर्धेचा लौकिक असा आहे की, विम्बल्डन आधीची ही स्पर्धा जिंकणारा बहुधा विम्बल्डन स्पर्धेचाही विजेता बनतो. तशी अनेक उदाहरणं आहेत. आणि हे वर्षही त्या लौकिकाला अपवाद ठरलं नाही.

मात्र या दोघांची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल पाहिली, तर ती अगदी सहज सोपी म्हणता येईल अशी नव्हती. कारण अगदी पहिल्या फेरीपासूनच त्यांना प्रतिस्पर्धी काही प्रमाणात झुंजवत होते. अल्काराझची वाटचाल विजयी विरुद्ध चार्डी 6-0, 6-2, 7-5; विजयी विरुद्ध मुलर 6-4, 7-6 (7-2), 6-3 विजयी विरुद्ध जॅरी 6-3, 6-7 (6-8), 6-3, 7-5; विजयी विरुद्ध बेरेट्टिनी 3-6, 6-3, 6-3, 6-3 विजयी विरुद्ध रुन 7-6 (7-3), 6-4, 6-4 आणि विजयी विरुद्ध मेदवेदेव 6-3, 6-3, 6-3 अशी होती. योकोविचनं अंतिम फेरी गाठताना मिळवलेले विजय असे : विजयी विरुद्ध काचिन 6-3, 6-3, 7-6 (7-4), विजयी विरुद्ध थॉम्पसन 6-3, 7-6 (7-4), 7-5; विजयी विरुद्ध वावरिंका 6-3, 6-1, 7-6 (7-5) विजयी विरुद्ध हुरकाझ 7-6 (8-6), 7-6 (8-6), 5-7, 6-4; विजयी विरुद्ध रुब्लेव 4-6, 6-1, 6-4, 6-3 आणि विजयी विरुद्ध सिनर 6-3, 6-4, 7-6 (7-4). कदाचित यामुळंच त्यांना अंतिम फेरीतही दीर्घकाळ झुंजावं लागलं असेल.

मात्र ही अंतिम लढत दीर्घकाळ स्मरणात राहील अशीच झाली हे कुणीही नाकारणार नाही. कारण त्यामुळेच बोर्ग – मॅकेन्रो, फेडरर नदाल, तसंच फेडरर आणि योकोविच यांच्यातील येथेच झालेल्या लढती आठवल्या. यातील फेडरर आणि योकोविच यांचा अंतिम सामना तर चार तास 58 मिनिटे चालला होता. तो आजवरचा विक्रम आहे. कालचा सामना तितकाच रंगतदार होता. मात्र तो त्याहून थोडा कमी वेळ म्हणजे चार तास 46 मिनिटे चालला. तरीही महत्त्वाची बाब म्हणजे त्यातील चुरस अखेरपर्यंत कायम होती.

पहिला सेट योकोविचनं 6-1 असा जिंकला तेव्हा हा अजिंक्यवीर सामना झटपट संपवणार, त्याच्यापुढं अल्काराझचं काय चालणार, असं अनेकांना वाटत होतं. कारण मियामीमध्ये क्ले कोर्टवर अल्काराझनं योकोविचला हरवलं होतं, तर यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेत क्ले कोर्टवर योकोविचनं अल्काराझला सहजी पराभूत केलं होतं. पण असं असलं तरी, अव्वल मानांकन मिळलेला अल्काराझ सहजी पराभव पत्करणार नाही, हे दुसऱ्याच सेटमध्ये कळलं. त्या सेटच्या पहिल्याच गेममध्ये त्यानं दीर्घकाळ चाललेला, तब्बल 13 ड्यूस झालेला गेम जिंकून आपला इरादा स्पष्ट केला आणि नंतरही त्याच जिद्दीनं खेळून सेट 6-6 अशा बरोबरीत आल्यावर टायब्रेकर 8-6 असा जिंकून सामना 1-1 अशा बरोबरीत तर आणलाच पण नंतरचा सेट तर जोरदार धडाक्यानं अगदी कमी श्रमांत आणि कमी वेळेत 6-1 असा जिंकला.

आता तो 2-1 असा आघाडीवर होता. विक्रमांसाठी खेळणारा योकोविच सहजी हार पत्करणार नाही हे तर सगळ्यांचंच मत होतं आणि योकोविचनंही त्यांची निराशा केली नाही. त्यानं तो चौथा आणि त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा सेट अल्काराझची सर्व्हिस दोनदा भेदून, 6-3 असा जिंकला खरा, पण दरम्यान त्याचा संयम सुटत चालला होता. तो स्वतःवरच चिडत होता, गुण गमावल्यावर वारंवार हताशपणे भावना व्यक्त करत होता. शिवाय तो निर्णयावरून पंचांबरोबर वाद घालत होता. एकदा तर रागाच्या भरात त्याने रॅकेट जाळ्याच्या खांबावर आदळली. त्याबद्दल त्याला नंतर दंडही झाला. दरम्यान त्यानं टॉयलेट ब्रेकही घेतला होता आणि ठरलेल्या वेळेत कोर्टवर येण्याला उशीर लावला होता. त्याबद्दल त्याला ताकीदही मिळाली होती. पण इतकं सारं झालं तरी न डगमगता शेवटी तो सेट त्यानं जिंकून सामना 2-2 अशा बरोबरीत आणला. अल्काराझचे परतीचे फटके नेटमध्ये जात होते आणि त्याच्याकडून सर्व्हिसच्या दुहेरी चुकाही झाल्यानं त्याला सेट गमवावा लागला.


'कर्तव्यसाधना'वर प्रसिद्ध झालेले क्रीडाविषयक लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


त्यामुळे आता निर्णायक पाचवा सेट कोण जिंकणार, याची उत्सुकता सामना पाहणाऱ्या सर्वांनाच होती. दोघांचीही दमछाक जबरदस्त आहे, हे आधीच्या स्पर्धांत वारंवार दिसून आलं होतं. कारण याआधी योकोविचनं येथील पाच सेट चाललेल्या 10 सामन्यांत कधीच हार पत्करली नव्हती. त्याचबरोबर अल्काराझही छोट्या कारकिर्दीत अशा दीर्घकाळ चाललेल्या सामन्यांत हरला नव्हता. सामना अतिशय रंगतदार अवस्थेला पोहोचला होता. खेळाडूंच्या कौशल्याबरोबरच ते तणावाला कसं तोंड देतात याचीही परीक्षा आता होणार होती.

निर्णायक पाचवा सेट सुरू झाला आणि पहिलाच सर्व्हिस गेम अल्काराझनं सहज जिंकला. योकोविचनंही आपली सर्व्हिस राखत 1-1 अशी बरोबरी साधली. पुन्हा अल्काराझनं सर्व्हिस गेम जिंकला आणि नंतरच्या गेममध्ये योकोविचची सर्व्हिस भेदण्यात यश मिळवलं. योकोविचचे फटके परतवण्यासाठी तो कोर्टवर इकडून तिकडं धावत होताच पण योग्य वेळी ‘क्रॉसकोर्ट’ फटका अगदी सीमारेषेलगत मारून त्यानं गुण वसूल करून 2-1 अशी आघाडी घेतली आणि हाच या सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. कारण त्यानंतर अल्काराझ चुका करत होता आणि त्याचे फटके नेटमध्ये जात होते. पण तरीही लगेच अप्रतिम क्रॉसकोर्ट वा ‘डाऊन द लाइन’ फटका लगावून भरपाईही करत होता. संपूर्ण सामन्यात सर्व्हिसच्या दुहेरी चुका त्यानं आठदा केल्या आणि अनेकदा बिनतोड सर्व्हिस (एस) करून त्या चुका महाग पडणार नाहीत याचीही दक्षता घेतली. त्यामुळे सामना सर्व्हिस गेमवर पुढे जात राहिला. त्यामुळे अल्काराझनं त्याची आघाडी 3-2, 4-3, 5-4 अशी टिकवली आणि नंतर दहाव्या गेममध्ये 30-30 अशी बरोबरी असताना योकोविचकडून अनपेक्षित चूक झाली आणि त्याचा परतीचा फटका कोर्टबाहेर गेला. आता अल्काराझ मॅच जिंकण्यासाठी सर्व्हिस करत होता. त्यानं चूक न करता सर्व्हिस केली आणि योकोविचनं ती अचूक परतवली. अल्काराझनंही परतीचा फटका मारला. त्याला हलकेच जाळ्याजवळ परतवण्याच्या प्रयत्नात योकोविचचा फटका जाळ्यातच गेला. सामना संपला. अल्काराझ विजेता बनला. 

अल्काराझ आणि योकोविच

प्रेक्षकांचा एकच जल्लोष झाला. कारण इतिहास घडताना त्यांनी पाहिला होता. योकोविचची विम्बल्डनवरील सद्दी संपली होती. खरं तर अल्काराझनं संपवली होती. इथं लागोपाठ पाचवं जेतेपद मिळवण्याचा त्याचा प्रयत्न फसला होता. विम्बल्डनला नवा विजेता मिळाला होता. दीर्घकाळ प्रेक्षकांच्या टाळ्या सुरूच राहिल्या. ही दाद अल्काराझच्या हळुवार मारलेल्या ‘ड्रॉप शॉट’ना होती, त्याच्या कलात्मक ‘टॉप स्पिन’ला होती, जोरदार सर्व्हिसला होती; तशी जबरदस्त ताकदीच्या फोरहँडलाही होती. पण सर्वात जास्त त्याच्या सहज हार न मारण्याच्या जिद्दीला आणि चिवट प्रयत्नांना होती. याआधी त्याच्या देशाचे, स्पेनचे दोन विम्बल्डन विजेते होते. बियाँ बोर्ग, बोरिस बेकर आणि या शतकात 2008 आणि 2010 मध्ये राफा नदाल यांच्या नंतरचा अल्काराझ हा 21 वर्षांआतील विम्बल्डन विजेता आहे. ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत जेता बनल्यावर दुसरे विजेतेपदही त्याने या मालिकेतील सर्वात कमी स्पर्धांनंतर मिळवले आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत दुखापतीच्या कारणानं तो उतरला नव्हता आणि फ्रेंच स्पर्धेत योकोविचकडूनच हरला होता. पण त्या पराभवाची परतफेडही त्यानं आता केली आहे..

महिलांमध्येही मर्केटा व्हाँड्रोसोवा ही नवी विजेती बनली आहे. अंतिम सामन्यात तिनं ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युरचा 6-4, 6-4 असा पराभव केला. अंतिम सामना तसा एकतर्फीच झाला. ओन्सकडून खूप अपेक्षा होत्या कारण तिनं दोन वेळच्या विजेत्या पेट्रा क्विटोवाला हरवलं होतं तसं तिसऱ्या सीडेड रिबाकिना आणि दुसऱ्या सीडेड सबालेंकालाही. त्यामुळंच साऱ्या अरबी आणि आफ्रिकी लोकांचं लक्ष आपल्याला विजेती मिळेल का याकडं होतं. सीडेड - आणि त्याही पहिल्या दहातील - खेळाडूंना हरवताना ओन्सनं अप्रतिम खेळ दाखवला होता. पण अंतिम फेरीत मात्र तिला ती पातळी गाठणं जमलं नाही. ती थोडी नर्व्हस वाटत होती. कदाचित अंतिम फेरी आणि चाहत्यांच्या अपेक्षांचं दडपण असावं. काय असेल ते असो, पण अंतिम सामन्यानं प्रेक्षकांना समाधान दिलं नाही. मर्केटाचं वर्चस्व असं होतं की, तिनं ओन्सला डोकं वर काढायला संधीच दिली नाही. 

मर्केटा व्हाँड्रोसोवा

मर्केटाच्या या विजयानं चेकोस्लोव्हाकियाचा दबदबा वाढला आहे. क्विटोवा आणि नोवोटना या त्यांच्याच खेळाडू. क्रमवारीतील पहिल्या पन्नास खेळाडूंत त्यांच्या दहाजणी आहेत, यावरून हेच स्पष्ट होतं. मर्केटा ही बोरिस बेकर आणि इव्हानसेविक यांच्याप्रमाणे सीडिंग नसतानाही विजेती बनलेली खेळाडू. ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत ती याआधी तीनदा पराभूत झाली होती. क्रिस एव्हर्ट आणि किम क्लायस्टर्सप्रमाणेच. आणि आता त्यांच्याप्रमाणेच ती विजेती बनली आहे. गेल्या वर्षी ती या स्पर्धेत दुखापतीमुळं खेळू शकली नव्हती. आता सर्वांच्या नजरा अमेरिकन खुल्या स्पर्धेकडं असतील.

अंतिम फेरीच्या अन्य गटातील सामन्यांचे निकाल असे :

पुरुष दुहेरी : डब्ल्यू. वूलहॉफ आणि एन. स्कुप्री विजयी विरुद्ध झेबोलॉस आणि ग्रॅनोलर्स 6-4, 6-4.

महिला दुहेरी : स्ट्रिफोवा आणि हसिए विजयी विरुद्ध मर्टेन्स आणि सँडर्स 7-5, 6-4.

मिश्र दुहेरी : एम. पाविक आणि एल. किपेनॉक विजयी विरुद्ध वाय. क्षू आणि जे लिजेन 6-4, 6-7 (9-11), 6-3.

मुली : क्लर्व्ही एगौनोऊ विजयी विरुद्ध निकोला बार्टुकोवा 6-2, 6-2.

मुले : हेन्री सीरल विजयी विरुद्ध यारस्लाव डेमिन 6-4, 6-4.

- आ. श्री. केतकर 
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: टेनिस आ. श्री. केतकर विम्बल्डन कार्लोस अल्काराझ खेळ wimbledon tennis usopen rolandgarros australianopen atp federer rogerfederer tennisplayer wta london atptour djokovic nadal novakdjokovic tennislife grandslam nike tenis tenniscourt frenchopen tennisfan atpworldtour rafaelnadal ausopen tennislove sport sports sw babolat Load More Tags

Add Comment