नोवाक योकोविच : आजचा सर्वश्रेष्ठ टेनिस खेळाडू

फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करत योकोविचने कारकीर्दीतील 23 वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.

आजवर टेनिसमध्ये कोणत्याही पुरुष खेळाडूने ही मजल गाठली नव्हती व त्यामुळेच नोवाक योकोविच सार्वकालिक सर्वश्रेष्ठ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) टेनिसपटू आहे का, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. केवळ आकडेवारीत नव्हे तर गुणवत्तेतही. कारण त्याने 36 व्या वर्षीही फ्रेंच स्पर्धेत यंदा उपान्त्य आणि अंतिम सामन्यात अनुक्रमे 20 वर्षांचा अल्काराझ आणि 26 वर्षांचा रूड यांना हरवून आपण अजूनही कुठे कमी पडत नाही, हे दाखवून दिले आहे.

नोवाक योकोविच हा आजचा सर्वोत्तम टेनिसपटू आहे. या वर्षीच्या फ्रेंच खुल्या स्पर्धेत कॅस्पर रूडचा सरळ सेटमध्ये पराभव करून त्याने ग्रँड-स्लॅम मालिकेतील स्पर्धांतील 23 वे विक्रमी विजेतेपद मिळवले. ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत अंतिम सामन्यात त्याने 34 वेळा प्रवेश केला आहे आणि त्यातील 23 सामने जिंकले आहेत, ही आकडेवारी त्याचे प्रभुत्व सिद्ध करण्यास पुरेशी आहे. रॉजर फेडररने 31 तर राफा नदालने 30 वेळा या ग्रँड-स्लॅम मालिकेतील स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. जानेवारी महिन्यात यंदाची ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकून त्याने विजयी सुरुवात करताना राफा नदालच्या 22 विजेतेपदांची बरोबरी केली होती. आणि आता तो एकटाच सर्वोच्च स्थानावर आहे...

या विजयाबरोबरच या मालिकेतील सर्व चार म्हणजे ऑस्ट्रेलियन 10, फ्रेंच 3, विम्बल्डन 7 आणि अमेरिकन 3 अशी विजेतीपदे त्याने मिळवली आहेत. या प्रत्येक स्पर्धांत तीन विजेतीपदे मिळवणारा तो पहिलाच खेळाडू आहे. आणि त्याबरोबरच आता तो रोलाँ गॅरो येथे विजेतेपद मिळवणारा सर्वात वयस्क खेळाडूही बनला आहे. या विजयाने व्यावसायिक टेनिसपटुंच्या क्रमवारीत त्याने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. एकूण ३८८ आठवडे या स्थानावर असणे हाही एक विक्रम आहे. या मालिकेतील पहिले जेतेपद त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत 2008 मध्ये जिंकले होते, त्यानंतर 15 वर्षांनी हे 23 वे जेतेपद. फेडररने पहिले अजिंक्यपद विम्बल्डनला 2003 मध्ये तर अखेरचे 20 वे अमेरिकन स्पर्धेत 2019 मध्ये मिळवले होते. नदालने 2005 मध्ये फ्रेंच स्पर्धेत जेतेपद मिळवून प्रारंभ केला आणि गेल्या वर्षी आजवरचे अखेरचे, 22 वे, जेतेपद मिळवले होते... आजवरचे म्हणण्याचे कारण म्हणजे त्याने पुढील वर्षी निवृत्त होणार असल्याचे सांगितले आहे.

आजवर टेनिसमध्ये कोणत्याही पुरुष खेळाडूने ही मजल गाठली नव्हती व त्यामुळेच नोवाक योकोविच सार्वकालिक सर्वश्रेष्ठ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) टेनिसपटू आहे का, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. केवळ आकडेवारीत नव्हे तर गुणवत्तेतही. कारण त्याने 36 व्या वर्षीही फ्रेंच स्पर्धेत यंदा उपान्त्य आणि अंतिम सामन्यात अनुक्रमे 20 वर्षांचा अल्काराझ आणि 26 वर्षांचा रूड यांना हरवून आपण अजूनही कुठे कमी पडत नाही, हे दाखवून दिले आहे. तो मात्र म्हणतो की, ‘अशा चर्चेला फारसा अर्थ नाही. ज्या काळात खेळाडू खेळत असतो, त्याचे प्रतिस्पर्धी कोण असतात, त्यावर त्याचे श्रेष्ठत्व ठरते.’

माजी ज्युनियर खेळाडू आणि आता तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक बेन ब्रैंबल म्हणतात की, ‘आकडेवारी फसवी असते. केवळ तेवढ्यावरून तुम्ही एखाद्याला सार्वकालिक सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरवू शकत नाही.’ आपला मुद्दा स्पष्ट करताना बँबल म्हणतात की, ‘तुम्ही सर्व बाजू विचारात घ्यायला हव्यात. म्हणजे फेडररच्या कारकिर्दीचा बहराचा काळ 2004 ते 2009 हा होता आणि योकोविचचा 2011 ते 2016 हा होता. त्यामुळे त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या कारकिर्दीच्या बहरात त्यांच्या लढती झाल्या असत्या तर फेडररने योकोविचला पराभूत केले असते आणि योकोविचने नदालला. पण गंमत अशी की तेव्हा नदालने फेडररला हरवले असते. अशा परिस्थितीत सर्वोत्तम कुणाला ठरवायचे? शिवाय खेळाडूची सर्व्हिस, परतीचे व अन्य फटके, प्रतिस्पर्ध्याला कोर्टवर तो किती पळवतो, महत्त्वाच्या गुणांच्या वेळी तो कसा खेळतो (आणि फेडरर, नदाल आणि योकोविच तिघेही या कसोटीला उतरतात), अशा सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात. म्हणूनच सार्वकालिक सर्वश्रेष्ठ खेळाडू ठरवण्यासाठी सर्व दृष्टींनी विचार करणे महत्त्वाचे ठरते.’

ते काहीही असले तरी निदान आज तरी नोवाक योकोविच सर्वश्रेष्ठ टेनिसपटू आहे, याबाबत दुमत होणार नाही. प्रमुख प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर आणि राफा नदाल यांच्याविरुद्ध तो जेवढे सामने हरला आहे, त्यापेक्षा जास्त सामने त्याने जिंकले आहेत आणि ही बाब त्याचे वर्चस्व दाखवून देणारीच आहे. फेडररची निवृत्ती आणि राफा नदालला ऑस्ट्रेलियन स्पर्धेतच दुखापतीमुळे बाहेर पडावे लागल्यानंतर तो अद्यापही खेळू शकत नाही. त्यामुळे टेनिसच्या प्रख्यात तीन शिलेदारांपैकी केवळ योकोविच हाच यंदाच्या स्पर्धांत खेळत (आणि जिंकत) आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदाच्या ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच स्पर्धेत त्याने सलग एकूण 14 सामने जिंकले आहेत, यावरूनच त्याचे वर्चस्व ध्यानात येते.

यंदा त्याला आणखी एक संधी आहे. एका वर्षात या चारही प्रमुख स्पर्धा जिंकून ग्रँड स्लॅम करण्याची. दुसऱ्या महायुद्धाआधी डॉन बज आणि महायुद्धानंतर हा पराक्रम रॉड लेव्हरचा अपवाद सोडता कोणत्याही पुरुष खेळाडूने केलेला नाही. फेडरर अणि नदालप्रमाणे या चारही स्पर्धांत योकोविचनेही विजेतेपद मिळवले असले, तरी एकाच वर्षी या चार स्पर्धा जिंकणे याला खूपच महत्त्व आहे. या वयातही त्याचा स्टॅमिना हेवा वाटण्याजोगा आहे, आणि ती त्याची मोठीच जमेची बाजू आहे. फिटनेस तर आहेच पण हालचालींतील चापल्य आणि लवचीकपणा यामुळे त्याला ‘रबर मॅन’ असेही संबोधले जाते. परतवण्यास अशक्य वाटणारे फटके तो सहज परतवतो आणि प्रतिस्पर्ध्याला हादरवून टाकतो. फटके परतवण्यासाठी तो सहजपणे कोर्टवर कोठेही पोहोचतो. मुख्य म्हणजे सध्याचा त्याचा फॉर्म पाहता त्याला पराभूत करणे हे सध्याच्या दर्जेदार, तरुण खेळाडूंपुढे जबरदस्त आव्हानच असणार आहे. हे विचारात घेतले, तर नोवाक योकोविच आपला 23 जेतेपदांचा विक्रम आणखी उंचावू शकतो आणि त्याच्या जवळपास पोहोचणे ही अल्काराझ, मेदवेदेव, रुड, रुन, झ्वेरेव इत्यादी खेळाडूंसाठी आव्हानात्मक बाब असेल. अर्थात तो अजिंक्य, अजेय आहे. असे मुळीच नाही. मोठ्या सामन्यात त्याला हरवताही येऊ शकते, हे मेदवेदेवने 2021मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत दाखवून दिले आहे. त्यामुळेही या तरुण खेळाडूंना नक्कीच आशा बाळगता येईल.

व्यावसायिक टेनिसपटु म्हणून त्याने सोळाव्या वर्षी, 2003 मध्ये कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2006 मध्ये 19 व्या वर्षी त्याने प्रथमच फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरी गाठताना तीन सीडेड मानांकित खेळाडूंना हरवले होते. त्यात जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या फर्नांडो गोन्झालेसचा समावेश होता. मात्र त्यावेळी प्रथमच ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व सामन्यात त्याची गाठ 20 वर्षांच्या, आदल्या वर्षीचा विजेता राफा नदालशी पडली. हा सामना आज कुणी अंदाज करेल त्याप्रमाणे दीर्घकाळ चालला नाही. कारण नदालने पहिले दोन्ही सेट 6-4; 6-4 असे जिंकून आघाडी घेतली असताना, पाठीच्या दुखापतीमुळे योकोविचिला तो सामना सोडून द्यावा लागला होता.

त्यावेळी सामन्यानंतर योकोविच म्हणाला होता, “मला सांगण्यात आले होते की, येथील क्ले कोर्टवर नदालला हरवणे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण पाठीला दुखापत झाली नसती तर मी अधिक चांगल्या प्रकारे सर्व्हिस करू शकलो असतो आणि मी चांगली लढत दिली असती, कारण मी चांगला खेळत होतो. अगदी त्याच्या बरोबरीने, तोडीस तोड खेळ करत होतो. मात्र तेव्हा त्याच्यावर भरपूर टीका तर झालीच पण त्याच्या बोलण्याची चांगलीच थट्टा झाली होती.

आज सर्वाधिक फिट समजल्या योकोविचच्या बाबतीत खरेही वाटणार नाही, पण त्या स्पर्धेनंतरच्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धांतील सामन्यांमध्ये त्याला त्याच्या दुखापतींनी वारंवार सतावले होते आणि त्यामुळे काही सामने त्याला सोडून द्यावे लागले होते. काहीतरी चुकत होते, हे त्याला कळत होते. खूप विचार, मेहनत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या मदतीने त्याने त्या कममकुवत दुव्यावर मात केली आणि आता नदालचा विक्रम मागे टाकून त्याने त्याला असलेल्या स्वतःच्या कुवतीचा विश्वास खरा ठरवला आहे आणि त्यावेळी त्याची टिंगल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे..

वारंवार दुखापतींनी बेजार होणारा योकोविच आता त्याच्या कणखरपणाबद्दल ओळखला जाऊ लागला आहे आणि 36 व्या वर्षीही त्याची कारकिर्द बहरात आहे, हे स्पष्ट झाले आहे. कारकिर्दीत दीर्घकाळ त्याने फेडरर आणि नदाल यांच्या विक्रमांचा पाठलाग केला आहे. तत्कालीन तीव्र स्पर्धेमुळे ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेतल्या पहिल्या विजेतेपदानंतर त्याला दुसऱ्या जेतेपदासाठी 2011 पर्यंत वाट पाहावी लागली. यंदाच्या विजयानंतर बोलताना तो म्हणाला की, ‘त्या दोघांनी - फेडरर आणि नदाल यांनी - 15 वर्षे माझ्या मनाचा मोठा भाग व्यापला होता. त्यामुळेच आता मी ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत त्या दोघांच्याही पुढे आहे, ही बाब आश्चर्यकारकच म्हणायला हवी.’ एवढे बोलून त्याने स्मितहास्य केले.

सामन्यानंतरच्या मुलाखतीत निवृत्तीबाबत बोलताना तो म्हणाला की, सध्यातरी मी तो विचार करत नाहीये. कारण मी तर अजून मोठे सामने जिंकत आहे, मग जवळपास 20 वर्षे चाललेल्या कारकिर्दीनंतर निवृत्तीचा विचार एवढ्यातच का करायचा? तो आता अर्थातच या वर्षी ग्रँड स्लॅम पुरे करण्याचा विचार करत असणार. कारण त्यासाठी आवश्यक पहिल्या दोन स्पर्धा त्याने जिंकल्या आहेत. त्यामुळे ते साहजिकच आहे. पण दोन वर्षापूर्वीही (2021 मध्ये) त्याला अशी संधी आली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धा त्याने पाठोपाठ जिंकल्या होत्या. पण त्यावेळी ग्रँड स्लॅम पुरे करण्याचे त्याचे मनसुबे डानिल मेदवेदेवने उधळून लावले होते. अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने योकोविचचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला होता.

अमेरिकन स्पर्धा हार्ड कोर्टवर होते. आणि तेथे खेळणे त्याला आवडते. योकोविचचा खेळ तेथे वरच्या पातळीचा होतो. क्ले कोर्टवरील विजयाने त्याला आणखी उमेद येईल आणि तो सर्वस्व पणाला लावून तेथे झुंजेल हे नक्की. तेथे त्याने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे, ही बाबही विसरून चालणार नाही. तो म्हणतो की, ‘बाकी कोणत्याही मोठ्या स्पर्धांपेक्षा मला ग्रँड स्लॅम मालिकेतील या स्पर्धा जास्त महत्त्वाच्या वाटतात व तेथे मी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.’ तशी तो अमेरिकन स्पर्धेत करणार हे निश्चित!

पुढे काय होते ते पाहायचे काम आपले!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: Serbian’s French Open] Sports Roger Federer Rafael Nadal greatest men’s tennis player GOAT Load More Tags

Add Comment