ही आगामी काळाची चाहूल असेल?

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत इगा स्विआटेक आणि कार्लोस अल्काराझ यांना विजेतेपद.

कार्लोस अल्काराझ

टेनिसमध्ये नव्या युगाची नांदी झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश करणारे चारही खेळाडू प्रथमच उपान्त्य फेरीत खेळत होते. असे बहुधा प्रथमच घडत होते. आता ते नवोदित चौघे फेडरर, नदाल, योकोविच यांच्यानंतर प्रेक्षकांना त्या त्रिमूर्तीची उणीव भासू देणार नाहीत, अशी आशा करायला हरकत नसावी, एवढ्या अटीतटीच्या लढती या नवोदितांमध्ये झाल्या. अगदी संस्मरणीय म्हणावे अशाच.

याआधी एका लेखात, स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस अल्काराझकडे लक्ष ठेवायला हवे असे लिहिले होते. आणि आता त्याचा प्रत्यय येतो आहे. कारण अमेरिकन खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीचे अजिंक्यपद संपादन करताना 19 वर्षांच्या अल्काराझने इतिहास घडवला आहे. ग्रँड स्लॅम मालिकेतील त्याचे हे पहिलेच विजेतेपद. आणि ते मिळवणारा या स्पर्धेचा तो पीट सॅम्प्रसनंतरचा सर्वात लहान वयाचा विजेता आहे. ग्रँड स्लॅम मालिकेतील 2005 मध्ये झालेल्या खुल्या फ्रेंच स्पर्धेचे विजेतेपद स्पेनच्या राफा नदालने जिंकले, तेव्हा तोही 19 वर्षांचाच होता हा एक योगायोग. या विजयामुळे आता अल्काराझ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 1973 मध्ये व्यावसायिक खेळाडूंची क्रमवारी जाहीर करण्याची प्रथा सुरू झाली, तेव्हापासूनच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा मान मिळवणारा तो सर्वात लहान वयाचा खेळाडू आहे. तसेच ग्रँड स्लॅम मालिकेत अजिंक्यपद मिळवणारा स्पेनचा तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी कार्लोस फेरेरो, कार्लोस मोया आणि अर्थातच राफा नदाल हे ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पेनचे विजेते होते.

महिलांच्या एकेरीचे विजेतेपद मिळवले इगा स्विआटेकने. या वर्षातील तिचे हे ग्रँड स्लॅम मालिकेतील दुसरे विजेतेपद. याधी तिने रालाँ गॅरोवरील खुली फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. अल्काराझने अंतिम सामन्यात 3 तास 20 मिनिटांच्या लढतीनंतर नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर 6-4, 2-6, 7-6, 6-3 अशी मात केली. तर पोलंडच्या इगा स्विआटेकने ट्युनिशियाच्या ओन्स जब्युरला सरळ सेटमध्ये 6-2, 7-6 असे हरवले. ओन्स ज्युबरला विम्बल्डन स्पर्धेनंतर लागोपाठ दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण आपण निराश न होता, विजेतेपदासाठी झुंजण्याचे प्रयत्न सोडणार नाही असे तिने सांगितले. या स्पर्धेला एकेरीत दोन्ही गटात नवे विजेते मिळाले आहेत.

अल्काराझचा विजय तसा आश्चर्यकारकच म्हटला पाहिजे. यंदाच्या वर्षात त्याची कामगिरी दखल घेण्याजोगी होती हे खरेच. पण या स्पर्धेत त्याने खेळातील कौशल्याबरोबरच चिकाटी आणि जबरदस्त दमछाक यांचे जे प्रदर्शन केले ते थक्क करणारे होते. अंतिम फेरीआधीच्या तीनही फेऱ्यांत त्याला विजयासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले होते. उपउपान्त्यपूर्व फेरीत त्याने मॉरिन सिलिचचा 6-4, 3-6, 6-4, 4-6, 6-3 असा, उपान्त्यपूर्व सामन्यात यान्त्रिक सिनरचा 3-6, 6-7, 6-7, 7-5, 6-3 असा आणि उपान्त्य लढतीत फ्रन्सिस टिआफोचा 6-7, 6-3, 6-2, 6-7, 6-3 असा पराभव केला होता. हे सामने अनुक्रमे सव्वाचार तास, सव्वापाच तास आणि चार तास पंचेचाळीस मिनिटे चालले होते यावरूनच त्याच्यावर किती ताण असेल, त्याची कशी दमणूक झाली असेल, याची कल्पना येईल. कारण त्या सामन्यांदरम्यान त्याला विश्रांतीसाठी फार वेळ मिळाला नव्हता. सव्वापाच तासांच्या लढतीनंतर साधारण 18 तासांनी त्याला उपान्त्य फेरीसाठी कोर्टवर उतरावे लागले होते. त्यामानाने अंतिम सामना लवकर म्हणजे तीन तास वीस मिनिटांत संपला.

रूडची वाटचाल देखील काही सोपी नव्हती. तिसऱ्या फेरीत त्याला टॉमी पॉलने चांगली झुंज दिली होती आणि रूडने ती 7-6, 6-7, 7-6, 5-7, 6-0 अशी जिंकली होती. चौथ्या फेरीत त्याने कॉरेंटिन मॉलेटला 6 1, 6-2, 6-7, 6-2 असे, उपान्त्यपूर्व फेरीत मॅट्टओ बेरेट्टिनीला 6-1, 6-4, 7-6 असे, तर उपान्त्य फेरीत करन खाचानोवला 7-6, 6-2, 5-7, 6-3 असे पराभूत केले होते. खाचानोवविरुद्धच्या सामन्याचे वैशिष्ट्य असे की, त्यात पहिल्या सेटच्या टायब्रेकरमध्ये शेवटच्या गुणासाठी उभय खेळाडूंना 55 फटके मारावे लागले होते. त्यात त्यांच्या दमछाकीची परीक्षाच झाली होती. तरीही रूडला अल्काराझपेक्षा तुलनेने जास्त विश्रांती मिळाल्याने अल्काराझच्या तुलनेत तो कमी थकला होता. अंतिम सामन्यात दोघेही आक्रमक खेळत होते. प्रतिस्पर्ध्याच्या दुसऱ्या सर्व्हिसवर हल्ला करत होते. आधीच्या फेऱ्यांत रूडच्या फोरहॅन्ड फटक्यांचा प्रभाव पडत होता पण अल्काराझपुढे त्याचे हे शस्त्र फारसे चालू शकले नाही. कारण चपळाईने अल्काराझ कोर्टच्या कोणत्याही भागात पोहोचून त्याचे फटके परतवण्याचा निकराचा प्रयत्न करत होता इतकेच नाही, तर त्यात यशस्वीही होत होता. बराच काळ ते बेसलाइनवरूनच खेळत होते.

पहिला सेट अल्काराझने 49 मिनिटांत तर दुसरा रूडने 35 मिनिटांतच घेतला. तिसरा सेट मात्र दीर्घकाळ चालला म्हणजे तब्बल 80 मिनिटे. खरे तर त्यावेळीच खरी परीक्षा झाली. 6-6 बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये मात्र अल्काराझने निर्विवाद वर्चस्व राखताना केवळ एक गुण गमावून तो 7-1 असा जिंकला. त्यामुळे त्याची उमेद नक्कीच वाढली असणार तर रूड मात्र हताश झालेला दिसत होता. पण म्हणून त्याने प्रयत्न सोडला नाही. पण त्याची सर्व्हिस भेदून अल्काराझने आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम राखली. रूडला दुसऱ्यांदा विजेतेपदाने चकवले होते. विजयानंतर अल्काराझ कोर्टवरच आडवा झाला आणि नंतर पालथे पडून त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नंतर तो रूडला भेटला आणि नंतर प्रेक्षकांत बसलेल्या त्याच्या टीमकडे तो धावला. त्या सर्वांनी या इतिहास घडवणाऱ्या युवकाचे त्याला मिठीत घेऊन कौतुक केले. गेल्या वर्षी उपान्त्यपूर्व फेरीतच पायाच्या दुखापतीमुळे अल्काराझला सामना सोडून द्यावा लागला होता. त्यामुळे आपण वर्षभर फिटनेस, आहार आणि दमछाक यांवर लक्ष दिले, असे तो म्हणाला.

पुरुषांच्या दुहेरीत अमेरिकेचा राजीव राम आणि ब्रिटनचा जो सॉलिसबरी यांनी लागोपाठ दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवले. असे यश मिळवणारी वूडकॉक आणि वूडब्रिज या प्रख्यात जोडीनंतरची पहिलीच जोडी. त्यांनी अंतिम सामन्यात वेस्ली कूलॉफ आणि नील स्कुप्स्की या हॉलंडच्या जोडीचा 7-6, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महिला दुहेरीत कॅटरीना सिनिआफोवा आणि बार्बोरा क्रायचिकोवा या झेकोस्लोव्हाकियाच्या जोडीने अजिंक्यपद मिळवताना केरी मॅकनेली आणि टेलर टाऊनसेंड यांना 3-6, 7-5, 6-1 असे हरवले. या जोडीने अशा प्रकारे कारकिर्दीत करिअर ग्रँड स्लॅम केले. मिश्र अंतिम सामन्यात स्ट्रॉम सँडर्स आणि जॉन पीर्स या ऑस्ट्रेलियन जोडीने क्रिस्तीन पलिपकेन आणि रॉजर लॅसीन एडुआर्द या बेल्जियम - फ्रान्सच्या जोडीवर 4-6, 6-4 आणि 10-7 अशी मात केली. स्पर्धेच्या नियमांनुसार प्रत्येकी एक-एक सेट अशी बरोबरी झाल्यानंतर मॅच टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला.


हेही वाचा : रोलाँ गॅरोवर कार्लोस अल्काराझवर सर्वांचे लक्ष असेल - आ. श्री. केतकर


अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची सुरुवातच झकास, खरे तर सनसनाटी म्हणावी अशी झाली होती. बरेच काही नोंद घ्यावे असे घडले होते, निवृत्तीच्या उंबरठ्यावरील, ग्रँड स्लॅम मालिकेत एकेरीची 23 अजिंक्यपदे जिंकणाऱ्या, अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने पहिल्या फेरीत माँटेनेग्रोच्या डांका कोविनिकवर 6-3, 6-3 अशी मात केली. याचे महत्त्व असे की, या स्पर्धेत ती पहिल्या फेरीत कायमच विजयी झाली आहे. या स्पर्धेतील सामन्यांतला तिचा हा 106 वा विजय. ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिऑसने त्याचा दुहेरीतील जोडीदार तातासी कोक्किनिसला 6 3, 6-4, 7-6 असे हरवले. ही जोडी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील दुहेरीची यंदाची विजेती जोडी होती. किर्गिऑस म्हणाला, “आम्हाला एकमेकांविरुद्ध खेळायला आवडत नाही, त्यामुळे हा सामना मला एखाद्या भयस्वप्नासारखाच वाटला.” पात्रता फेरीतून वाइल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या 22 वर्षांच्या ब्रॅन्डन होल्टने अमेरिकेच्याच 12 व्या मानांकित टेलर फ्रिट्झचा 6-7, 7-6, 6-3, 6-4 असा पराभव करून प्रेक्षकांना चकित केले. सांगायची गोष्ट अशी की ब्रॅन्डन हा येथील स्पर्धेत 1979 अणि 1981 मध्ये अजिंक्य ठरलेल्या ट्रेसी ऑस्टिनचा मुलगा.

खरी कमाल केली कोलंबियाच्या डॅनिएल गालानने. त्याने ग्रीसच्या चौथे मानांकन असलेल्या स्टेफानोस त्सित्सिपासला धक्का दिला. गालान 6-0, 6-1, 3-6, 7-5 असा विजयी झाला. तर स्पेनच्या कारेनो बुस्टाने 2020च्या विजेत्या डॉमनिक थिएमला 7-5, 6-1, 5-7, 6-3 असे गारद केले. महिलांमध्ये कोको गॉफने येथे पहिल्यांदाच विजय मिळवला. तिने फ्रान्सच्या लिओलिआ जिनजिनचा 6-2, 6-3 असा पराभव केला. चीनच्या यिबिंग व याने जॉर्जियाच्या निकलस बसिलाश्विर्लला 6-3, 6-4, 6-0 असे हरवले. त्याच्या विजयाचे महत्त्व वू म्हणजे चीनच्या स्पर्धकाने 63 वर्षांनंतर ग्रां प्री मालिकेतील स्पर्धेत विजय नोंदवला. 1959 मध्ये फी ची मेईने विम्बल्डन स्पर्धेत पहिल्या फेरीत रॉन बार्न्सला पराभूत केले होते. पण वू हा येथील कुमार गटातील 2017 मधील एकेरी आणि दुहेरीचा विजेता होता. मोठ्या स्पर्धेतील चीनचे हे सर्वात मोठे यश होते. नंतर मात्र त्याच्या हातावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागल्याने काही काळ त्याला स्पर्धांपासून दूर राहावे लागले होते.

इगा स्विआटेक

बड्या खेळाडूंना हरवणाऱ्या नवोदित, पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवणाऱ्यांची चमक आणि जिद्द दुसऱ्या दिवशीही दिसली. गतसालच्या विजेत्या, यंदा 11 वे सीडिंग मिळालेल्या एम्मा राडुकानुला फ्रान्सच्या अ‍ॅलिझ कॉर्नेटने सरळ सेडमध्ये 6-3, 6-3 असे हरवले, तर पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवणाऱ्या फ्रान्सच्याच क्ला ब्लुरेलने कझाकस्तानच्या, यंदा विम्बल्डन जिंकणाऱ्या एलेना रिबाकिनाचा सरळ सेटमध्येच 6-4, 6-4 असा पराभव केला. पाठोपाठ येथे 2018 आणि 2020 ला विजेतेपद मिळवणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकावर 7-5, 6-3 अशी मात केली.

चौथ्या म्हणजे उपउपान्त्यपूर्व फेरीत तर अनेक बड्यांना धक्के बसले. पहिल्या क्रमांकाच्या डानिल मेदवेदेवला किर्गिऑसने 7-5, 4-6, 7-5, 6-7, 6-4 असे तर दुसऱ्या सीडेड राफाएल नदालला अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोने 6-4, 4-6, 6-4, 6-3 असे हरवले. नदालला आता 23 व्या विजेतेपदासाठी आणखी वाट पाहावी लागणार. टिआफो चांगलाच खेळला. माझ्याकडे पराभवाला देण्यासाठी कोणतीही कारणे नाहीत, तो नक्कीच माझ्यापेक्षा वरचढ होता. असे नदालने सांगितले.

पण नदाल काहीही म्हणाला (कारण तो स्वतःच्या पराभवाची कारणे देऊन कधीच त्याचे समर्थन करत नाही, हा अनुभव आहे.) तरी तो या स्पर्धेत उतरताना पुरता फिट नव्हता असे जाणकारांनी बोलून दाखवले. विम्बल्डननंतर काही काळ त्याने विश्रांती घेतली होती, तरीही तो हवा तेवढा तंदुरुस्त नव्हता असे सांगण्यात आले. मौलेटला रूडने आणि सिलिकला अल्काराझने पराभूत केले. नॉरीवर रुब्लेवने मात केली. सिनरने इवाष्काला नमवले. खाचानोव्हने कॅरेरिओवर, तर सिनरने नाकाशिमावर मात केली. उपान्त्यपूर्व फेरीत मात्र किर्गिऑसची आगेकूच खाचानोवने रोखली. प्रथम सीडेड मेदवेदेवला हरवल्यामुळे किर्गिऑसकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण तो पुढे मजल मारू शकला नाही. खाचानोवने 3 तास चाळीस मिनिटांच्या अटीतटीच्या झुंजीत त्याला 7-5, 4-6, 7-5, 6-7, 6-4 असे गारद केले. टिआफोने रुब्लेवचा 7-6, 7-6, 6-4 असा पराभव केला. अँडी रॉडिक नंतर प्रथमच अमेरिकन खेळाडू उपान्त्य फेरीत दाखल झाला होता. तर तब्बल सव्वापाच तासांच्या कडव्या झुंजीनंतर अल्काराझने इटलीवया 21 वर्षाच्या यान्त्रिक सिन्नरचा दीर्घकाळ चाललेल्या 6-3, 6-7, 6-7, 7-5, 6-3 हरवून उपान्त्य फेरी गाठली. बेरट्टिनीवर 6-1, 6-4, 7-6 अशी मात करून रूडनेही उपान्त्य फेरी गाठली.

महिलांच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यांत गार्सिआने कोको गॉफला सरळ सेटमध्ये 6-3, 6-4 असे, तर ज्युबरनेही टोमन्यानोविकला 6-4, 7-6 असे हरवले. पहिल्या मानांकित स्विआटेकने पेगुलाला 6-3, 7-6 असे पराभूत केले तर सबलेंकाने पिस्कोवर 6-1, 7-6 अशी मात करून उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला होता.

तर आता टेनिसमध्ये नवनवे खेळाडू जुन्यांची जागा घेण्याचा जिद्दीने प्रयत्न करीत आहेत, त्याने खेळाची रंगत वाढणारच आहे. प्रेक्षकांनाही समाधान मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

- आ.श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: कार्लोस अल्काराझ अमेरिका खेळ क्रीडा US Open 2022 Carlos Alcaraz Casper Ruud Grand Slam final Iga Swiatek Load More Tags

Comments:

Manjiri Dandekar

नवीन खेळाडू जिंकताना पाहून बरे वाटले. हे यश टिकवता आले पाहिजे

Add Comment