कॅन्सरविषयी सर्वकाही

'कॅन्सर म्हणजे... डोकं फिरलेल्या पेशी' या पुस्तकाचा परिचय.

‘पहिलं पान उलटण्यापूर्वी’ या निवेदनपर लेखात पुस्तकाचे दोन लेखक डॉ. सतीश नाईक आणि डॉ. दुर्गा गाडगीळ पुस्तकाचं स्वरूप स्पष्ट करताना म्हणतात, ‘कॅन्सरला कर्करोग हा उत्तम प्रतिशब्द असला तरी पुस्तकात कॅन्सर हाच शब्द वापरला आहे, कारण तोच सर्वसाधारणपणे वापरला जातो. इतर अनेक रोगांना आपण फारसे घाबरत नाही, पण ‘कॅन्सर झालाय’ म्हटलं की, चुकचुकायला लागतो. असं का? तर मुळात कॅन्सरविषयी लोकांना पुरेसं ज्ञान नाही. याबाबत हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. या घडीला लोकांना त्याविषयी अधिक माहिती देणं आवश्यक आहे. हे पुस्तक त्यादृष्टीनं टाकलेलं एक छोटंसं पाऊल आहे.’

खरं तर कोणताही आजार तसा गंभीरच. पण कर्करोग-कॅन्सर म्हटलं की सर्वजणच का कोण जाणे, खूपच घाबरतात. ‘आता काय सारं संपलं’ किंवा ‘आता नशिबानं मिळेल ते आयुष्य आपलं समजून जगायचं’ असा विचार कॅन्सर रुग्णाच्या, तर ‘आता हा बिचारा थोड्या दिवसांचाच सोबती आहे’ असा विचार त्याच्या नातेवाईकांच्या आणि अन्य जिवलगांच्या मनात येतो. याला कारणही तसंच असतं. कारण या रुग्णाला अनेकजण केवळ कॅन्सरचे परिणाम आणि तो झाल्यानं जग सोडून गेलेल्या लोकांबाबतच सांगतात. तसं पाहिलं तर ही केवळ एकच बाजू असते. कारण या आजाराशी मुकाबला करून त्याच्यावर मात करणारे अनेकजण आहेत. अगदी अलीकडेच टेनिसपटु मार्टिना नवरातिलोवा हिनं ‘मी दुसऱ्यांदा कॅन्सरवर मात केली’ असं जाहीर केलंय. कारण हा रोग अनेकदा पुन्हा उद्भवतो आणि मार्टिनाच्या बाबतीतही तसंच झालं होतं. क्रिकेटपटु युवराज सिंग, अभिनेत्री मनीषा कोइराला, सोनाली बेंद्रे अशी उदाहरणं तर वाचकांना नक्कीच आठवत असतील. प्रख्यात नसलेल्या व्यक्तींचीही असंख्य उदाहरणं आहेत. आणि त्यापैकी काहींनी आपल्या कॅन्सरबरोबरच्या लढाईबाबतचे अनुभव पुस्तकरूपाने जगापुढे आणले आहेत. थोडक्यात, कॅन्सर झाला असं कळलं की लगेच धीर सोडायचं काहीच कारण कारण नाही, हे या रुग्णांच्या मनावर बिंबवलं पाहिजे, म्हणजे त्यांची लढण्याची इच्छा बळकट केली पाहिजे. त्यांच्यासाठी हा रोग, त्याचं स्वरूप, त्याच्याशी लढा कसा द्यायचा याबाबतची अतिशय चांगली माहिती देणारं आणि रुग्ण, त्याचे नातेवाईक, आप्त वगैरेंना सल्ला देणारं पुस्तक म्हणजे ‘कॅन्सर म्हणजे... डोकं फिरलेल्या पेशी’.

या पुस्तकातील सुरुवातीच्याच ‘पहिलं पान उलटण्यापूर्वी’ या निवेदनपर लेखात पुस्तकाचे दोन लेखक डॉ. सतीश नाईक आणि डॉ. दुर्गा गाडगीळ पुस्तकाचं स्वरूप स्पष्ट करताना म्हणतात, ‘कॅन्सरला कर्करोग हा उत्तम प्रतिशब्द असला तरी पुस्तकात कॅन्सर हाच शब्द वापरला आहे, कारण तोच सर्वसाधारणपणे वापरला जातो. इतर अनेक रोगांना आपण फारसे घाबरत नाही, पण ‘कॅन्सर झालाय’ म्हटलं की, चुकचुकायला लागतो. असं का? तर मुळात कॅन्सरविषयी लोकांना पुरेसं ज्ञान नाही. याबाबत हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. या घडीला लोकांना त्याविषयी अधिक माहिती देणं आवश्यक आहे. हे पुस्तक त्यादृष्टीनं टाकलेलं एक छोटंसं पाऊल आहे.’

अन्य रोगांचं निदान करण्याची पद्धत आणि कॅन्सरचं निदान करण्याची पद्धत यांतील मोठा फरक लेखकद्वयीनं स्पष्ट केला आहे. कॅन्सरचं निदान करणं हे काम किती अवघड आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात आणि त्याबरोबरच त्या का कराव्या लागतात, हे सारं बारकाईनं समजावून सांगितलं आहे. खरं तर कॅन्सरचं निदान मुळात खूपच क्लिष्ट आहे, कारण त्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणूनच अनेक प्रकारच्या वर्गीकरणाशिवाय निदान पूर्ण होत नाही. मुख्य म्हणजे इतर रोगांच्या निदानासारखं कॅन्सरचं निदान सरळसोट नसतं. त्यामुळंच त्या निदानाच्या वाटेत अनेक अडथळे असतात आणि त्यापैकी सर्वात मोठा अडसर म्हणजे कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात वैविध्य जपणारा रोग आहे.

एकाच इंद्रियापासून झालेले कॅन्सरदेखील व्यक्तिगणिक थोडा थोडा फरक असलेले असू शकतात, असं ते म्हणतात. एकाच गाठीमध्ये- म्हणजे ‘ट्यूमर’मध्ये दिसणारी पेशीपेशींमधील ही विविधताच कॅन्सरला पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बनवते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या कॅन्सरबाबत वेगळा विचार करायला, आणि अर्थातच वेगळे उपचार करायला भाग पाडते. म्हणूनच कॅन्सरकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्तिगणिक, प्रत्येक ट्यूमरगणिक वेगळा हवा, ही महत्त्वाची गोष्ट ते सांगतात. सोप्या शब्दांत सांगायचं तर कॅन्सरमध्ये आपल्याच पेशींनी आपल्याविरुद्ध बंड पुकारलेलं असतं. त्यामुळंच हा मुद्दा स्पष्ट करताना, देशाचा बाहेरचा शत्रू आणि आपल्याच देशाचे नक्षली यांचं चपखल उदाहरण ते देतात. या कारणामुळेच बंडखोर पेशींना फोफावू देणं परवडणारं नसतं. अशा बंडखोर पेशींचा नायनाट करावाच लागतो. मग यात बंडखोर, चुकार पेशींबरोबर काही प्रमाणात चांगल्या उपयुक्त पेशीही गमवाव्या लागणार. म्हणून चांगल्या पेशींचं कमीतकमी नुकसान आणि कॅन्सरग्रस्त पेशींचं पूर्ण उच्चाटन, ते न जमलं तर जास्तीत जास्त पेशींचा विनाश करणं ही तारेवरची कसरत औषध आणि अन्य उपचार करताना करावी लागते. अर्थात त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ज्ञांची गरज आणि त्यांच्यातील समन्वय जरुरीचा असतो.

या रोगावरील उपचारांत कॅन्सरच्या पेशींवर शस्त्रक्रिया, औषधं म्हणजे कीमोथेरपी आणि एक्स रे किंवा रेडिओथेरपी अशा अनेक बाजूंनी मारा करण्याची गरज असते. म्हणजेच उपलब्ध साऱ्या शस्त्रास्त्रांचा वापर करणं आणि तो करत असतानाच, त्यातील सुसूत्रता महत्त्वाची हे न विसरणं आवश्यक असतं. बऱ्याचदा वेगवेगळ्या अनेक डॉक्टरांना एकत्र येऊन उपचार करावे लागतात आणि एकमेकांशी सुसंवाद राखावा लागतो. कारण शरीरातीलच काही पेशींवर हल्ला करताना, निरोगी पेशींचं कमीतकमी नुकसान करतच कॅन्सरच्या सर्व पेशी काढून टाकायच्या ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. या तीन तज्ज्ञांबरोबरच फॅमिली डॉक्टर, नर्स, औषध देणारे फार्मसिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, पेशंट आपल्या पायावर उभा राहावा यासाठी मदत करणारे फिजिओ आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट असं हे सांघिक काम असतं. इतर कोणत्याही आजारात उपचार करणाऱ्या चमूत इतक्या लोकांचा सहभाग असत नाही, कारण खरे तर तशी गरजच पडत नाही. या साऱ्याबरोबरच कॅन्सर हा आजार मानसिक कसोटी पाहणारा आहे, हेही ध्यानात ठेवायला हवं. ‘मलाच हे का झालं?’ इथपासून ‘आता शेवट अटळ आहे’, इथपर्यंत विचारांची उलघाल सुरू होते, होतच राहते. आणि कॅन्सर बरा झाल्यावरही तो ‘पुन्हा तर होणार नाही ना?’ या दडपणाखालीच कित्येकजण जगतात. त्यामुळंच रुग्णाच्या शरीराबरोबरच त्याचं मनही बरं करणं, कणखर बनवणं आवश्यक आणि तितकंच महत्त्वाचं बनतं.


हेही वाचा : वाढत्या आत्महत्या रोखायच्या असतील तर...! - हमीद दाभोलकर


कुणी सतत तंबाखू खातो, कुणी धूम्रपान करतो पण त्यांना कॅन्सर होत नाही आणि असेही अनेकजण आहेत की जे पूर्णपणे निर्व्यसनी असूनही त्यांना कॅन्सरची बाधा झाली आहे, हे कसं असू शकतं ? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा करणं हाच या पुस्तकाचा उद्देश आहे, असं लेखक स्पष्ट करतात.

पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात कॅन्सर या विषयाचा एकंदर आवाका आहे. अर्थातच तो सर्वात मोठा भाग आहे. याचं स्वरूप त्यांच्या स्वाती या तरुण मैत्रिणीचे कॅन्सरबाबतचे प्रश्न आणि त्याला लेखकद्वयीनं दिलेली उत्तरं असं या भागाचं स्वरूप आहे. तिच्या जवळच्या दोघांना कॅन्सर झाल्यामुळं ती अस्वस्थ आहे. आणि म्हणून या रोगाबाबत जाणून घेण्यासाठी ती या तिच्या परिचयाच्या आणि मित्रत्वाचं नातं जुळलेल्या दोघा डॉक्टरांकडं येत असते. या त्यांच्या स्वातीबरोबरच्या चर्चा, त्यांची प्रश्नोत्तरं तसंच शंकानिरसनाच्या संवादात्मक बैठका दर रविवारी होतात. (त्या वाचताना ‘ट्यूसडेज विथ मॉरी’ या जीवन कसे जगावे याबाबतचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या पुस्तकाची आठवण होते. त्यातही दर मंगळवारी विद्यार्थी आपल्या आजारी गुरूच्या भेटीला आणि ज्ञानग्रहणाला जातो आणि मॉरीगुरुजींनी सांगितलेलं जीवनोपनिषद समजून घेतो.) अशा सात रविवारच्या सात बैठकांतून झालेली चर्चा यात आहे. त्यात ‘कॅन्सर म्हणजे काय’, ‘जीन्स आणि कॅन्सर’, ‘कॅन्सर का व कसा होतो’, ‘कॅन्सर होऊ नये म्हणून’, ‘कॅन्सरचं निदान’, ‘कॅन्सरचे उपचार’ व ‘उपचार आणि नंतर’ असे विषय असून, त्यात अगदी सहज, सोप्या प्रकारे, कुणालाही समजेल अशा भाषेमध्ये या विषयांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणात विषय समजावून सांगितल्यावर नंतर अधिक आवश्यक माहितीच्या नोंदी शेवटी दिल्या आहेत, त्यामुळं तर विषयाची सखोल जाण होण्यास चांगलीच मदत मिळते. 

डॉ. सतीश नाईक आणि डॉ. दुर्गा गाडगीळ

पहिल्याच प्रकरणाच्या शेवटी ते कॅन्सर आणि इतर आजार यांतील वेगळेपण समजावून सांगतात. इतर आजारांत एखाद्या इंद्रियाच्या रचनेत बदल होतो. आपण त्या त्या इंद्रियाला दोषी धरतो. या बदलांसाठी काही कारण असतं. म्हणजे इंद्रिय खराब होण्यासाठी बाहेरची कुठची तरी गोष्ट कारणीभूत असते. कॅन्सर निराळा आहे. यात इंद्रियांतल्या पेशींमध्येच बदल झालेले असतात. अर्थात या बदलांसाठी तंबाखू, काही व्हायरस विषाणू, वगैरे गोष्टींचा हातभार लागतो. परंतु पुढचे सगळे बदल मात्र स्वतःच्याच पेशीत झालेले असतात. इतक्या सोपेपणानं हे सारं सांगितलं आहे. या प्रमाणे अन्य प्रकरणांमध्येही गेन ऑफ फंक्शन - लॉस ऑफ फंक्शन, जीन्स काय करतात, एपिजेनेटिक्स, कुटुंब कॅन्सर, जीन्स आणि कॅन्सरचे उपचार, स्टॅबिलिटी, उत्क्रांती, पुरावा, धूम्रपान सोडताना... गेल रिस्क मॉडेल, ज्यापासून कॅन्सर होऊ शकतो अशी रसायनं (कार्सिनोजेन), पुरुष अथवा स्त्री यांच्यासाठीचे आणि फक्त स्त्रियांसाठीचे प्रश्न, कॅन्सर उपचाराचे तीन प्रकार, उपचारांच्या वेगवेगळ्या पद्धती, उपचारांचे दुष्परिणाम : साइड इफेक्टस्, शस्त्रक्रिया, ऑपरेशनचे काही परिणाम, शस्त्रक्रियेदरम्यान आहाराच्या गरजा, केमोथेरपीचे परिणाम, रेडिओथेरपीनं होणारे दुष्परिणाम, लैंगिक समस्या, दुष्परिणाम किती काळ राहतात, इमर्जन्सी : आपल्या डॉक्टरांना त्वरित कधी भेटावे, सपोर्ट ग्रुप, नॅशनल कॅन्सर ग्रीड, जीवनशैलीतील बदल, तणावमुक्ती, क्लिनिकल ट्रायल इत्यादींबाबतची माहिती आहे. त्यामुळं स्वातीबरोबर वाचकाचंही आपोआपच शंकानिरसन होतं...

दुसरा भाग विस्तृत विवेचनाचा आहे. त्यात प्रत्येक इंद्रियाचा आढावा घेऊन, शरीराच्या त्या त्या भागातील कॅन्सरच्या वैशिष्ट्यांबाबत बारकाईने माहिती देण्यात आली आहे. त्या त्या इंद्रियाच्या कॅन्सरची वैशिष्ट्यं स्पष्ट व्हावीत, यासाठी हा भाग आहे. हा धांडोळा थोडक्यात आणि मुद्द्यांच्या स्वरूपात आहे. कित्येक प्रकारचे कॅन्सर क्वचितच आढळतात, त्यांचा उल्लेख डॉक्टरांनी मुद्दामच टाळला आहे. कारण पुस्तकाचा तो उद्देश नाही. आपण देत असलेली माहिती सर्वांसाठी उपयुक्त व्हावी, पेशंटना स्वतःची काळजी घेताना उपयुक्त ठरावी इतकाच त्यांचा हेतू आहे, हे विभागाच्या प्रारंभीच स्पष्ट करण्यात आले आहे. यात तोंडाचे आणि डोळ्यांचे कॅन्सर, थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर, रेटिनोब्लास्टोमा, त्वचेचे कॅन्सर, रक्ताचे कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या आतल्या आवरणाचा कॅन्सर, स्त्रीच्या अंडाशयाचा कॅन्सर, मेंदूतल्या गाठी, एंडोक्राइन ग्रंथींचे कॅन्सर, फुप्फुसांचे कॅन्सर, पोटातले कॅन्सर : अन्न नलिकेचा कॅन्सर, जठराचे कॅन्सर, गॅस्ट्रिनोमा, लहान आतड्याचे कॅन्सर, मोठ्या आतड्याचे कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा कॅन्सर, गुदद्वाराचा कॅन्सर, आतड्यातले मस्से, कॅन्सरमुळे पोटात पाणी भरणं, प्रोस्टेट कॅन्सर, पुरुषी अंडाशयाचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर, मूत्रपिंडाचा कॅन्सर अशा कॅन्सरच्या विविध प्रकारांची ओळख करून देण्यात आली आहे.

तिसऱ्या, म्हणजे परिशिष्टाच्या भागात कॅन्सरच्या उपचारांमध्ये सहभागी असणाऱ्या वैद्यकीय संस्था आणि त्याचबरोबर उपचारासाठी येणाऱ्या पेशंटच्या मदतीला उभ्या असलेल्या संस्था यांची यादी दिली आहे. ‘व्ही केअर’ या बिगर सरकारी संस्थेने दिलेली ही यादी आहे आणि नॅशनल कॅन्सर ग्रीडमधल्या संस्थांबद्दल इंटरनेटची मदत झाली आहे, असं स्पष्ट केलं आहे. महत्त्वाची आणि उपयोगी पडणारी बाब म्हणजे या रोगाच्या उपचारांमध्ये मानसिक, शारीरिक व उपचारांसाठी आर्थिक मदत करणाऱ्या सेवाभावी, सरकारी, बिनसरकारी, धर्मादाय संस्थांची नावे, पत्ते, संपर्क क्रमांक वगैरे दिले आहेत. कॅन्सर ग्रीडबाबतही वेगळी यादी आणि संकेतस्थळेही दिली आहेत. यामुळे पुस्तकाला परिपूर्णता लाभली आहे.

डॉ. आर. ए. बडवे यांनी तर प्रस्तावनेत म्हटलं आहे की, ‘एकाच ठिकाणी शास्त्रीय संकल्पना, उपचारपद्धती, रोगाविषयी संपूर्ण माहिती, रुग्णास गरज असलेल्या सर्व बाबींची कल्पना जी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत मांडल्यामुळे हे पुस्तक म्हणजे प्रत्येकाने जवळ बाळगावे असे अमूल्य ज्ञानभांडार आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.’ पुस्तकाचं महत्त्वच त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे.

या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्राबाबत चित्रकार गोपी कुकडे यांचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. पुस्तकाच्या विषयानुरूप असं अतिशय समर्पक चित्र त्यांनी तयार केलं आहे आणि त्यातील कल्पकता खरोखर दाद देण्यासारखीच आहे. अलिबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट तर लहानपणापासूनच सर्वांना ठाऊक असते. अलिबाबाकडून आपली संपत्ती मिळवण्यासाठी चोरांचा सरदार तेलाच्या व्यापाऱ्याचं रूप घेऊन आपल्या सहकाऱ्यांना बादल्यांत बसवून अलिबाबाच्या घरी जातो. अलीबाबावर हल्ला करण्यासाठी या बादल्यांत लपलेल्या चोरांप्रमाणेच आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशी आपल्यावर हल्ला करायला, मारायला टपून बसलेल्या असतात, हे त्यांनी अफलातून पद्धतीने या चित्रातून सूचित केलं आहे. आणि त्यामुळे मार्जिनाप्रमाणे आपल्यालाही त्या चोर पेशींचा वेळेवर शोध घ्यायला हवा, हे नकळतच वाचणाऱ्याच्या मनावर बिंबवलं जातं...

सध्या एकूणच कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे, अगदी जगात सर्वत्रच. त्यामुळेच त्या रोगाबाबतचं ज्ञान थोड्या प्रमाणात तरी सर्वांना हवं. वर्तमानपत्रांतून तर अनेकदा या रोगावर चाललेल्या संशोधनाबाबत नवनवीन औषधांबद्दल बातम्या येतच असतात. तेव्हा कॅन्सरबाबत योग्य माहिती असणं महत्त्वाचंच. त्यामुळेच, अतिशय महत्त्वाच्या अशा या रोगाविषयी सोप्या भाषेमध्ये, योग्य प्रकारे माहिती करून दिल्याबद्दल आणि 'उगाचच घाबरून न जाता वेळीच तज्ज्ञांचे सहाय्य घेतले तर खूपच फायदा होईल' असा दिलासाही देणाऱ्या या लेखक डॉक्टरद्वयीचे आणि त्यांची ही - प्रत्येकाच्या संग्रही असावी अशी - कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल 'ग्रंथाली'चेही आभार.

कॅन्सर म्हणजे... डोकं फिरलेल्या पेशी
लेखक : डॉ. सतीश नाईक आणि डॉ. दुर्गा गाडगीळ
प्रकाशक : ग्रंथाली, माहीम (प.) मुंबई 400016.
पाने: 18 + 170. किंमत : 250 रुपये.

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: उपचार कर्करोग आरोग्य नवे पुस्तक आरोग्यविषयक पुस्तके कॅन्सरवर उपचार cancer health management chemotherapy Load More Tags

Comments:

Dhakalu Mahadev Davari

उपयुक्त माहिती.

Add Comment