टेनिसचे 'फेडरर युग' संपले!

23 सप्टेंबरला स्वित्झर्लंडचा अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडररने टेनिसमधून निवृत्ती घेतली.

खेळाडू येतात आणि जातात. खेळापेक्षा कोणताही खेळाडू मोठा नसतो. फेडररचा 20 अजिंक्यपदांचा विक्रम नदालनं आणि आता योकोविचनंही मागे टाकला आहे. पण म्हणून फेडररचं महत्त्व आणि मोल काही कमी होणार नाही. फेडरर निवृत्त झाला असला, कोर्टवर खेळताना दिसणार नसला, तरी तो प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात कायमच घर करून राहील हे वेगळं सांगायची गरजच नाही.

'मी तुझ्यावर प्रेम करतो, मी कधीच तुला सोडून जाणार नाही'; असं सांगणारा कोण हा प्रियकर? आणि त्याचं एवढं अतूट प्रेम कुणावर आहे? असा प्रश्न वाचकांना पडला असेल. हे उद्गार आहेत, अद्वितीय टेनिसपटू रॉजर फेडररचे. 42 व्या वर्षी (त्याचा जन्म 8 ऑगस्ट 1981 ला झाला.) लेव्हर चषक सामन्यात दुहेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यावर काढलेले. आणि तो हे कुणा प्रेयसीला नाही तर साक्षात टेनिस (देवते)लाच म्हणाला. अर्थात त्याच्या या टेनिसप्रेमाबाबत दुमत होणं शक्यच नाही. म्हणूनच सामना हरल्यानंतर तो म्हणाला की, आता मी निवृत्त होणार याचं मला वाईट वाटत नाहीय. सुरुवातीला तसं वाटलं खरं पण नंतर जाणवलं की माझा निवृत्त होण्याचा निर्णय सर्वोत्तम आहे.

या सामन्याआधी फेडरर चांगलाच भावुक झाला होता. तो म्हणाला, "मी यापूर्वी हजार वेळा हे केलं आहे, पण यावेळी हे खरोखरच खूप वेगळं आहे." या शब्दांत, सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांचे आभार त्यानं आधीच मानले होते. फेडरर निवृत्त झाला. टेनिसमधील एक सुवर्णयुग समाप्त झालं. आता पुन्हा असं होणं अवघडच आहे. कारण जवळपास 15 वर्षं तीन महान खेळाडू वर्चस्वासाठी झुंजत होते. ते म्हणजे, अर्थातच, रॉजर फेडरर, राफा नदाल आणि नोवाक योकोविच. या तिघांच्या नावावर ग्रँड स्लॅम मालिका स्पर्धांतील एकूण 63 विजेतीपदं आहेत. फेडरर 20, नदाल 22 आणि योकोविच 21. आता फेडरर निवृत्त झाला आहे. आणि त्याची जागा भरून काढणारा, इतकं सातत्यपूर्ण दर्जेदार टेनिस खेळणारा खेळाडू आजतरी दिसत नाही. कदाचित पुढंमागं कुणी तसा पराक्रम करीलही. पण त्यावेळी उरलेले दोघंही निवृत्त झालेले असतील. आणि एकाच कालखंडात असे तीन शिलेदार झुंजताना पाहण्याची संधी रसिकांना मिळण्याची शक्यता आजतरी अगदी दुर्मिळच दिसते.

फेडररबद्दल अमेरिकन खुल्या स्पर्धेनंतर चार दिवसांनीच त्यानं आपला निवृत्तीचा बेत जाहीर केला. तेव्हापासून बरंच काही लिहिलं, बोललं गेलं आहे. आता त्याच्या प्रत्यक्ष निवृत्तीनंतर त्यात आणखी भर पडेल. अशा वेळी काय लिहायचं असा प्रश्नच आहे. पण फेडररवरील प्रेमामुळं अधेमधे काही पूर्वी लिहिलं गेलेलं या लेखात पुन्हा आढळलं तर माफ करा. कारण आकडेवारी तर निवृत्तीनंतर काही बदलत नाही. ती ऐतिहासिक नोंद बनून जाते. त्यामुळं ती देणं अपिरहार्यच असतं. त्यामुळं अगदी थोडक्यात रॉजर फेडररच्या कारकिर्दीचा हा सारांश:

ग्रँड स्लॅम मालिका स्पर्धांतील विजेतीपदं एकूण 20. 2003 ते 2018 या कालावधीतील. (या आधी सर्वाधिक जेतेपदं जिंकण्याचा मान पीट सॅम्प्रसला होता. त्यानं 14 अजिंक्यदं मिळवली होती. पण त्याला फ्रेंच स्पर्धेत एकदाही यश मिळालं नव्हतं.)

ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा : एकूण 6 विजेतीपदं. 2004, 6, 7, 8, 17, 18 मध्ये. फ्रेंच खुली स्पर्धा फक्त एकदा. 2009 मध्ये. (नदालच्या अनुपस्थितीत).

विम्बल्डन स्पर्धा एकूण 8 विजेतीपदं. 2003, 4, 5, 6, 7, 9, 12, 17.

अमेरिकन खुली स्पर्धा एकूण 5 विजेतीपदं. 2004, 5, 6, 7, 8.

व्यावसायिक टेनिसपटुंच्या क्रमवारीत तब्बल 310 आठवडे पहिला क्रमांक. त्यातील 237 आठवडे तो सलग पहिल्या क्रमांकावर होता.. 2008 : बीजिंग ऑलिंपिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक. (वॉवरिंकाच्या साथीनं). 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये एकेरीचं रौप्यपदक. (सुवर्णपदक अँडी मरेनं मिळवलं होतं.)

2014 मध्ये डेव्हिस चषक विजेतेपद स्वित्झर्लंडला मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. ग्रँड स्लॅम मालिका स्पर्धांतील पहिलं विजेतेपद 2003 मध्ये, अमेरिकेच्या अँडी रॉडिकला हरवून विम्बल्डन स्पर्धेत. अखेरचं 20 वं विजेतेपद 2018 मध्ये मार्टिन सिलिचला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत हरवून. विजेतेपद तर राखलंच, पण संपूर्ण स्पर्धेत त्यानं एकही सेट गमावला नव्हता. स्पर्धेचा तोवरचा सर्वाधिक वयाचा विजेताही तोच होता. 2017 चं विजेतेपद मिळवताना त्यानं राफा नदालला 2008 नंतर प्रथमच अंतिम सामन्यात हरवलं होतं. 2004 हे त्याच्यासाठी ग्रँड स्लॅम मालिका स्पर्धांतील सर्वात चांगलं वर्ष होतं. त्यानं त्या वर्षी तीन ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धांत विजेतेपद मिळवलं होतं. 2006 मध्ये त्यानं पुन्हा एकदा असं यश मिळवलं. त्यानं दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धेत विजेतेपद संपादन केलं होतं. व्यावसायिक टेनिसपटुंच्या ए. टी. पी. रॅकिंग महत्त्वाच्या स्पर्धांत त्यानं एकेरीचे एकूण 103 करंडक जिंकले आहेत. त्या स्पर्धांत एकेरी आणि दुहेरीचे मिळून तो 1381 सामने खेळला आहे. खेळ म्हटलं की, जय पराजय असणारच. पराभवांच्या आठवणीनं तुला दुःख होतं का, या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता की, विजयाच्या आठवणी त्यापेक्षा ठळक आहेत! स्वतःबद्दल तो म्हणाला होता, "मला टायगर वूडस आणि मायकेल शुमाकरसारखं दीर्घकाळ सर्वोच्च पदावर राहायचं होतं... आणि नंतर मला कळलं की, मी आता त्या गटाचाच झालो आहे!"

प्रतिस्पर्ध्याबाबत बोलताना तो म्हणाला की, राफा नदाल हा माझा (मात करायला) सर्वात अवघड आणि कट्टर प्रतिस्पर्धी आहे. त्याचा डावखुरा अगदी भयानक वाटावा असा स्पिन माझ्या बॅक हॅन्डला यायचा आणि ते प्रचंड आव्हानात्मक होते एवढंच मी सांगेन. नदालविरुद्ध खेळणं हा सुपर स्पेशल अनुभव असायचा. राफा नदाल, योकोविच आणि काही प्रमाणात मरे हे माझे प्रमुख प्रतिस्पर्धी होते आणि अनेकदा त्यांनी माझ्यापुढं अडचणी निर्माण केल्या होत्या. 24 वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत त्यांच्याखेरीज वावरिंका आणि युआन मार्टिन डेल पोट्रो हेही माझे तगडे प्रतिस्पर्धी होत. या साऱ्या गटात मी असणं हे माझं नशीबच म्हणायला हवं. खरं सांगायचं तर मला अशी रायव्हलरी - तीव्र स्पर्धा - नकोशी वाटायची. कायम जिंकतच राहावं अशी माझी इच्छा होती. पण मागं वळून पाहताना वाटतं की, या साऱ्यांबरोबरच्या त्या अमूल्य, अविश्वसनीय, अवर्णनीय आणि अटीतटीच्या लढतीच्या आठवणींनी मला कधी नाही एवढा आनंद घेता येतो. आमच्यात तीव्र स्पर्धा होती. पण खरं तर ती मित्रत्वाची स्पर्धा होती. फ्रेंडली रायव्हलरी! म्हणूनच लेव्हर स्पर्धेत माझ्या महान, कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या - राफा नदालच्या - साथीने अखेरचा सामना खेळायला मिळणार म्हणून मला समाधान झालं होतं. योकोविच हा ग्रेट अ‍ॅथलीट सर्वोत्तम खेळाडू आहे.

फेडररचा खेळावर प्रचंड प्रभाव होता. त्याची सहज खेळण्याची शैली प्रशिक्षकांच्या दृष्टीनं अगदी बिनचूक ठरणारी होती. या त्याच्या सुंदर शैलीमुळंच तो दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याची कोर्टवर असतानाची आणि कोर्टबाहेरची प्रचंड लोकप्रियता बरंच काही सांगून जाते. तो म्हणतो, "माझ्या या दोस्त दुश्मनांबरोबर आमचा एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप आहे. तोच आम्हाला नेहमी एकत्र ठेवतो. शेवटच्या युरोप विरुद्ध शेष जग यांच्यात झालेल्या लेव्हर चषक स्पर्धेत नदाल, योकोविच, मरे सह कॅस्पर रूड आणि स्टिफानो त्सित्सिपास हेही त्याच्याबरोबर होते. रूड आणि त्सित्सिपासने एकेरीचे सामने जिंकले. मात्र या निरोपाच्या दुहेरीच्या सामन्यात फेडरर नदाल या जोडीला अमेरिकन फ्रान्सिस टिआगो आणि जेम्स सॉक या जोडीकडून 6-4, 6-7 (टायब्रेकरमध्ये 2-7) आणि 9-11 असा पराभव पत्करावा लागला. खरं तर त्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीला दृष्ट लागू नये म्हणुनच हे गालबोट लागलं असं वाटतं.

5 जुलै 1998 :  लंडनमधील विम्बल्डन लॉन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये एकेरीचे विजेतेपद पटकावलेला 16 वर्षीय रॉजर.

मला आता दीर्घकाळची स्पर्धा खेळता येणार नाही, तेवढी कुवत आता राहिलेली नाही, म्हणूनच मी यावेळी केवळ दुहेरीचा सामनाच खेळणार आहे, असं त्यानं स्पर्धेआधीच सांगितलं होतं. इच्छा कितीही तीव्र असली, तरी वयपरत्वे आता शरीर साथ देणार नाही, हे त्यानं ओळखलं होतं.

आता कोर्टवर अनेक खेळाडू येतील, जिंकतील हे खरंच. पण फेडररची - प्रचंड ताकदीची नसूनही - भेदक आणि अचूक सर्व्हिस आता पाहायला मिळणार नाही. सॅम्प्रसही महान खराच. पण त्याचा कल आणि खेळही सामना झटपट संपवण्याकडेच असायचा. सर्व्हिस करून नेटकडे धावायचं आणि जोरात स्मॅश वा अलगद प्लेसिंगच्या सहाय्यानं गुण मिळवायचा ही त्याची खासियत. पण त्यामुळं त्याचे सामने काहीसे साचेबंद व्हायचे. तो विजयी व्हायचा हे खरं आहे, पण फटक्यांचं वैविध्य त्याच्याकडं असलं तरी तो त्यांचा वापर क्वचितच करायचा. त्याचा सारा भर जोरदार फटक्यांवर आणि जबरदस्त सर्व्हिसवर असायचा. 2001 मध्ये फेडररनं विम्बल्डनवर तिसऱ्या फेरीत सम्प्रसवर मात केली खरी पण नंतर उपान्त्यपूर्व फेरीत त्याला टिम हेन्मनकडून हार पत्करावी लागली होती. तरी त्यावेळीच आता टेनिसच्या क्षितिजावर एक नवा तारा उगवला असल्याचं सर्वांनी मान्य केलं होतं. त्याच वर्षी त्यानं मार्टिना हिंगिसच्या साहाय्यानं अंतिम सामन्यात अमेरिकेच्या मोनिका सेलेस आणि यान मिसाएल बॅम्बिलला पराभूत करून स्वित्झर्लंडला हॉपमन चषक मिळवून दिला होता.

फेडरर जणूकाही विनासायास खेळत असावा, असं त्याचा खेळ पाहताना वाटायचं. त्याचे अचूक फटके तर प्रतिस्पर्थ्यांना अवाक करून सोडणारे असत आणि अवघड वाटणारे परतीचे फटके तो एवढ्या अचूकतेनं कोर्टच्या सीमारेषेवर पेरायचा, की प्रतिस्पर्ध्यांना आपला वाटणारा गुण हातातून निसटल्याचंच पाहावं लागे. कारण त्यांना तेथपर्यंत पोहोचायला वेळच उरत नसे. त्याचं पदलालित्य आणि चापल्य असं की, चेंडू कोर्टच्या कोणत्याही भागात पडला तरी तो तेथपर्यंत सहज पोहोचत असे; आणि इतकंच नाही तर तो परतीचा फटका अशा शिताफीनं मारायचा की, प्रेक्षक आपोआपच टाळ्यांचा कडकडाट करायचे. आणि हे एवढ्या चपळाईनं होई की, तो तिथं कधी पोहोचला असा प्रश्न कुणालाही पडावा. आणि त्याच्या नेटजवळच्या नाजूक फटक्यांत तर एवढा हळुवारपणा असे की, जणू जोर लावला तर चेंडूला इजा होईल अशी भीती त्याला वाटत असावी. पण त्याचा फोरहँड मात्र प्रतिस्पर्धी वा चेंडू कोणाचीच तमा न बाळगता चांगल्याच ताकदीचा असे. कोर्टच्या मागील भागातून, बेस लाइनवरून खेळताना तो कोर्टच्या दोन्ही टोकांना दिसायचा. तो तिथं एवढ्या अचूक अंदाजाने पोहोचायचा, की वाटायचं, हा लहरतच तिथं गेला की काय.

एक गोष्ट मात्र खरी की, सामना संपताच तो बदलून जायचा. नेटजवळ जाऊन प्रतिस्पर्ध्यांना थोपटायचा, धीर दिल्यासारखं. त्याच्या या कृतीनं तो त्यांच्याबरोबर प्रेक्षकांची मनंही काबीज करायचा. खरं तर त्याच्या खेळाचं वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील. तेव्हा आता थांबू या.

"टेनिसनं मला खूप खूप अगदी भरभरून दिलं आहे. म्हणूनच मी यानंतर बियाँ बोर्गसारखा 'अदृश्य' होणार नाही." (असं म्हणण्याचं कारण म्हणजे, बोर्गनं 1981 मध्ये अखेरचं विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यानंतर 25 वर्षं तो विम्बल्डनवर आला नव्हता.) "त्याच्या कृतीने चाहते दुखावले गेले होते. पण माझं तसं नाहीय. तुम्ही मला नक्कीच पाहाल. मात्र कोणत्या भूमिकेत ते मी आजच सांगू शकत नाही", असंही तो म्हणाला होता. 

लहानपणी अतिशय रागीट असलेला फेडरर नंतर मात्र बदलला. कोर्टवर त्यानं क्वचितच असमाधान वा चीड व्यक्त केली असेल. या बाबतीत त्याचं सॅम्प्रसशी साम्य होतं. स्थितप्रज्ञ म्हणावं अशी त्यांची वागणूक असायची. अगदी कोर्टवरील बऱ्याच हालचालींमध्येही त्यांच्यात खूप साम्य होतं. दोघंही अशा संथपणे कोर्टवर येत, की जणू काही त्यांना मोठे प्रयास होत आहेत. पण एकदा का सामना सुरू झाला की, त्यांचा जणू काही कायापालट होई. विजेसारख्या चपळाईनं खेळणारा हा खेळाडू म्हणजे काही काळापूर्वी कोर्टवर आळशासारखा आलेला तो खेळाडू हाच का, असा प्रश्न पडावा एवढा हा बदल असायचा. पंचांच्या निर्णयाबाबत समाधान नसलं, तर केवळ क्षणभरच ते तो आपल्या नजरेनं, हालचालींतून व्यक्त करायचा. त्यांच्याशी वाद घालायच्या फंदात पडायचा नाही. पूर्ण खात्री असली की, मात्र तो तो शंकास्पद वाटणारा गुण पुन्हा पाहण्याचं किंवा चेंडू कोर्टच्या आत पडला होता की बाहेर हे दाखवण्याचं आव्हान द्यायचा. टीव्हीच्या अद्ययावत तंत्रज्ञानानं आता सर्वच खेळांत ही सुविधा उपलब्ध झाली आहे. पण तिची मागणी केव्हा करायची याचा त्याचा निर्णय तो तारतम्यानं घ्यायचा आणि त्यामुळंच बहुतेक वेळा तो अचूक ठरायचा आणि तो गुण त्याला मिळायचा.

खेळाडू येतात आणि जातात. खेळापेक्षा कोणताही खेळाडू मोठा नसतो. पाहा ना, फेडररचा 20 अजिंक्यपदांचा विक्रम नदालनं आणि आता योकोविचनंही मागे टाकला आहे. पण म्हणून फेडररचं महत्त्व आणि मोल काही कमी होणार नाही. अशा खेळाडूंमुळंच खेळाची गुणवत्ता वाढते. अधिकाधिक मुलांना या खेळाची ओढ लागते. त्यांना फेडररसारखं व्हायचं असतं. अशा खेळाडूंना पाहण्यासाठीच प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात. वारेमाप भावानं तिकिटं विकत घेतात कारण आम्ही त्यांना प्रत्यक्ष खेळताना पाहिलंय असं त्यांना आपल्या नातवंडांनाही सांगावं असं वाटत असतं. म्हणून एरवीपेक्षाही जास्त भावात तिकिट खरेदी करून प्रेक्षक लेव्हर चषक स्पर्धेला उपस्थित राहिले होते. त्यांना फेडरर त्याचा अखेरचा सामना, भले तो दुहेरीचा का असेना, खेळताना पाहायचं होतं. त्यातच त्याचा साथीदार नदाल असल्यानं तिकिटांचे भाव आकाशाला भिडले होते आणि तरीही कोर्टवर प्रेक्षागार पुरेपूर भरलं होतं.

सामन्याच्या आदल्या दिवशी फेडररनं आपल्या सहकाऱ्यांना डिनरला बोलावलं होतं, तेव्हा ते सर्वजणच भावुक झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी सामना संपल्यानंतर त्यांना भेटल्यावर फेडररला रडू आवरेना, तसं त्या साऱ्यांचंच झालं होतं. अगदी अनेक प्रेक्षकांचे डोळेही पाणावले होते. एका युगाचा अस्त होताना त्यांनी पाहिला होता.

फेडरर निवृत्त झाला असला, कोर्टवर खेळताना दिसणार नसला, तरी तो प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात कायमच घर करून राहील हे वेगळं सांगायची गरजच नाही.

दोन दशकं आम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना खेळाचं पुरेपूर सुख आणि आनंद देणाऱ्या फेडररला धन्यवाद आणि उर्वरित आयुष्यासाठी तुम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: rogerfederer tennis federer wimbledon rafaelnadal atp usopen novakdjokovic tennisplayer rolandgarros tennislife australianopen nadal djokovic wta tenis atptour tenniscourt atpworldtour tennisfan rafanadal tennislove tennispro instatennis nike tennistraining sports babolat sport tennisworld Load More Tags

Comments:

Suyog Kawale

Mr. Ketkar, Nadal was part of French Open 2009 and he was defeated with the hands of Robin Soderling! Federer defeated Soderling in Final!! Gather proper information before writing....

Add Comment