गांधीवाद, लेनिनवाद आणि लोकशाही

लोकशाहीच्या ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या सिद्धान्तांचा घेतलेला मागोवा

'राजकीय विरोधकांना सामोरं जाताना त्यांना चिरडून टाकण्याव्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग लेनिन यांना ठाऊक नव्हता, शोषणविहरित, वर्गहीन जगाची इच्छा राखणाऱ्या लेनिन यांना त्यांचं उद्दिष्ट साधण्यासाठी उघड पाशवी बळाव्यतिरिक्त इतर कोणतंही साधन सापडलं नाही, ही त्यांच्या नियतीमधील अत्यंत शोकात्मक गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला, गांधींचा अहिंसेच्या वैश्विक सत्यावर दृढ विश्वास होता. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिगत व राजकीय शत्रूंविरोधात लढण्यासाठी केवळ प्रेमाचा मार्ग अनुसरण्याचा निर्णय त्यांनी याच सत्याच्या आधाराने घेतला,' असं फ्यूलॉप-मिलर नमूद करतात. 

अलीकडे ‘लेनिन अँड गांधी’ असं एक काहीशा गूढ शीर्षकाचं पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्याचे लेखक रेने फ्यूलॉप-मिलर हे ऑस्ट्रियन होते. मूळ पुस्तक फ्रेंच होतं, आणि मी वाचलेलं भाषांतर १९२७ साली प्रकाशित झालं. गांधी आणि लेनिन यांची तुलना करण्यासाठी १९२०च्या दशकामध्ये अख्खं पुस्तक लिहिलं जाणं स्वाभाविकच होतं. ही दोन्ही व्यक्तिमत्वं साधारणपणे समकालीन होती. त्यांच्या जन्मतारखांमध्ये सहा महिन्यांचं अंतर आहे. दोघेही मध्यमवर्गीय होते. गरिबांची मुक्ती साधणं आणि अन्याय संपुष्टात आणणं, यांसाठीचा ध्यास दोघांनीही घेतला होता. परंतु, त्यांच्यात काही कळीचे मतभेदही होते. लेनिन यांचं लेखन अत्यंत कठोर वितंडा उभी करणारं होतं, तर गांधी सार्वजनिक जीवनात आणि खाजगी जीवनातही सभ्यता राखून व्यक्त होत असत. या दोघांमधला आणखी एक भेद अधिक महत्त्वाचा होता : लेनिन क्रांतीच्या वेदीवर हिंसाचाराला स्थान देत होते, तर गांधी अहिंसेच्या आचरणावर श्रद्धा राखणारे होते. 

माझ्या माहितीनुसार, मुंबईतील कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी पहिल्यांदा गांधी आणि लेनिन यांची तुलना छापील रूपात प्रकाशित केली. डांग्यांनी एप्रिल १९२१मध्ये ‘गांधी विरुद्ध लेनिन’ असं सरळसोट शीर्षक असणारा सुमारे साठ पानांचा निबंध प्रकाशित केला. स्वतः कम्युनिस्ट असल्यामुळे डांग्यांना गांधीवादापेक्षा लेनिनवाद पसंत होता, पण बहुधा त्यांनी गांधींना प्रत्यक्ष पाहिलेलं असल्यामुळे आपल्या या देशबांधवाविषयी त्यांच्या मनात काहीएक सहानुभूती टिकून होती. ‘हे दोन्ही सिद्धान्त व्यावहारिक जीवनात संपूर्णपणे उतरवणं अशक्य आहे. मानवी स्वभावातील नैसर्गिक चांगुलपणावर अवाजवी श्रद्धा ठेवणं, ही गांधीवादामधली उणीव आहे; तर, मानवी हितसंबंध व संवेदना यांच्याकडे अवाजवी दुर्लक्ष करणं, ही बोल्शेव्हिझममधली उणीव आहे,’ असं निरीक्षण डांगे यांनी नोंदवलं. 

डांगे यांच्या लेखाचं प्रकाशन झाल्यावर चार वर्षांनी, एप्रिल १९२५मध्ये अमेरिकी मेथडिस्ट पंथातले ‘मिनिस्टर’ हॅरी वॉर्ड यांनी ‘द वर्ल्ड टुमारो’ या नियतकालिकात ‘लेनिन अँड गांधी’ या शीर्षकाचा लेख लिहिला. लेनिन आणि गांधी यांनी आपापली मध्यमवर्गीय पार्श्वभूमी ओलांडून ‘अगदी साध्या जीवनमार्गासह’ सर्वसामान्य लोकांशी जोडून घेतलं, असं वॉर्ड यांनीही नोंदवलं आहे. त्यानंतर त्यांनी या दोघांमधील भेदांची चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘लेनिन यांचं तत्त्वज्ञान हे सत्तेचं तत्त्वज्ञान असून त्यांचा कार्यक्रम बळाचा आहे. गांधींचं तत्त्वज्ञान हे प्रेमाचं तत्त्वज्ञान असून त्यांचा कार्यक्रम अहिंसेचा आहे... शोषकाच्या बळावर आपण तशाच प्रकारच्या अधिक मोठ्या बळाद्वारे मात करू, असं लेनिन म्हणतात. गांधी निराळ्या प्रकारच्या शक्तीद्वारे शोषकाच्या बळावर मात करण्याविषयी बोलतात.’

लेनिन आणि गांधी हे ‘त्या काळातील दोन सर्वांत प्रभावशाली पुरुष’ होते, असं हॅरी वॉर्ड नमूद करतात. ‘लेनिन व गांधी यांनी मांडलेल्या कल्पनांमधील व आदर्शांमधील संघर्ष मानवतेच्या भविष्यासंबंधीचे संकेत देतात. तळामध्ये असणाऱ्या लोकांनी व्यापक स्तरावरील जगण्याच्या अवकाशात यायला हवं. सध्या अधिक विशेषाधिकार व संधी असलेल्यांनी आपल्या लाभांचं वाटप करावं आणि तळपातळीवरच्यांनी हळूहळू संचय करावा, अशा मार्गाने हे घडेल का? की, त्यांच्यात सत्तासंघर्ष होणं अपरिहार्य आहे आणि त्यातून आपल्या सभ्यतेचा पायाच उद्ध्वस्त करावा लागेल?’

रेने फ्यूलॉप-मिलर यांनी गांधी आणि लेनिन यांच्यावर १९२७ साली पुस्तक लिहिलं, तेव्हा डांगे व वॉर्ड यांनीसुद्धा याच मार्गाने जात मांडणी केल्याचं त्यांना माहीत नसावं. गांधी व लेनिन या दोघांनीही व्यक्तिमत्वाच्या बळावर आपापल्या देशामध्ये व इतिहासाच्या मार्गामध्ये परिवर्तन घडवल्याचं फ्यूलॉप-मिलर सुचवतात. लेनिन व गांधी या दोघांकडेही स्वतःच्या मतांनुसार मार्गक्रमणा करण्यासाठीचं धाडस होतं, आणि आपल्या सहकाऱ्यांनी हात सोडले तरी एकट्याने संघर्ष करत राहण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात होती. समाजातील विभिन्न घटकांमध्ये रचनात्मक ऐक्य साधण्यासाठी दोघांनीही अथक प्रयत्न केले. लेनिन यांनी रशियात शेतमजूर व कामगार यांच्यात असं ऐक्य साधण्याचे प्रयत्न केले, तर गांधींनी भारतात हिंदू व मुसलमान यांच्यात ऐक्य साधण्यासाठीचे प्रयत्न केले.

एका अर्थी फ्यूलॉप-मिलर यांनी केलेलं विश्लेषण डांगे व वॉर्ड यांच्या धर्तीवरचंच आहे. परंतु, राजकीय व्यवहारासंदर्भात लेनिन व गांधी यांच्यात दिसणाऱ्या नैतिक फारकतीबाबत फ्यूलॉप-मिलर अधिक स्पष्टपणे बोलतात. ‘द्वेष हा लेनिन यांच्या संदर्भातील मूळ घटक होता... राजकीय विरोधकांना सामोरं जाताना त्यांना चिरडून टाकण्याव्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग लेनिन यांना ठाऊक नव्हता,’ असं ते नोंदवतात. शोषणविहरित, वर्गहीन जगाची इच्छा राखणाऱ्या लेनिन यांना ‘त्यांचं उद्दिष्ट साधण्यासाठी उघड पाशवी बळाव्यतिरिक्त इतर कोणतंही साधन सापडलं नाही, ही त्यांच्या नियतीमधील अत्यंत शोकात्मक गोष्ट आहे.’

दुसऱ्या बाजूला, गांधींचा ‘अहिंसेच्या वैश्विक सत्यावर दृढ विश्वास होता. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिगत व राजकीय शत्रूंविरोधात लढण्यासाठी केवळ प्रेमाचा मार्ग अनुसरण्याचा निर्णय त्यांनी याच सत्याच्या आधाराने घेतला,’ असं फ्यूलॉप-मिलर नमूद करतात. ‘गांधींची क्रांती इतिहासामध्ये दुर्मिळ आहे, कारण ही चांगुलपणाची व अहिंसेची क्रांती आहे. या क्रांतीचं नेतृत्व करणारा मनुष्य समजुतीचा उपदेश करतो आणि “शत्रूवर प्रेम करावं” हे त्याचं बोधवाक्य आहे.’

हॅरी वॉर्ड यांचा लेख प्रकाशित झाल्यानंतर वर्षभराने, पण रेने फ्यूलॉप-मिलर यांचं पुस्तक प्रकाशित होण्याच्या आदल्या वर्षी, १९२६ साली ब्रिटनमधील तरुण कम्युनिस्ट फिलिप स्प्रॅट भारतात क्रांतीचं बीज रोवण्यासाठी आले. ते केवळ लेखक नव्हते, तर कार्यकर्ता होते, आणि त्यांच्याकडे समतोल दृष्टी राखण्यासाठी किंवा अनिश्चित स्वरूपाची मांडणी करण्यासाठी उसंत नव्हती. त्यांनी लेनिनचा मार्ग निवडला होता. दोनेक वर्षं स्प्रॅट भारतीय उपखंडात भटकले, भारतीय क्रांतिकारकांशी त्यांनी संपर्क प्रस्थापित केला आणि इथल्या क्रांतीच्या शक्यतांचा अदमास घेतला. त्यानंतर मे १९२९मध्ये त्यांना अटक करून इतर भारतीय साथींसोबत ‘मीरत कट’ खटल्याच्या सुनावणीसाठी उभं करण्यात आलं.

स्प्रॅट जवळपास वर्षभर तुरुंगात होते. कैदेत असताना त्यांनी भारतीय इतिहासाविषयी व तत्त्वज्ञानाविषयी बरंच वाचन केलं. आधी त्यांना या विषयाबाबत फारशी माहिती नव्हती. या वाचनानंतर ते गांधींकडे अधिक सहानुभूतीने पाहू लागले. आधी त्यांच्या लेनिनवादी ठाम मतांमुळे त्यांना हे शक्य झालं नव्हतं. तुरुंगातून सुटल्यावर स्प्रॅट गांधींना भेटण्याकरता सेवाग्रामला गेले. त्यांच्यातील संभाषणांचा आधार घेत, पण त्यापेक्षा अधिक प्रमाणात खुद्द गांधींच्या लेखनाचा आधार घेत, स्प्रॅट यांनी गांधींचं मूल्यमापन करणारं एक पुस्तक लिहिलं. लेनिन यांचा आदर राखण्याची शिकवण त्यांना मिळाली होती आणि आता गांधींविषयी त्यांना अधिक कौतुक वाटू लागलं होतं. या दोघांमध्ये धाडसाने समन्वय साधायचा प्रयत्न स्प्रॅट यांनी ‘गांधीझम : ऍन अनॅलिसिस’ या त्यांच्या पुस्तकात केला. 

स्प्रॅट लिहितात, ‘भारतीय गावांमधील करोडो लोकांना एक दिवसही त्यांच्या सद्यस्थितीच्या भरवशावर सोडून देणं, हा एक गुन्हा असेल. अशा प्रकारच्या हलाखीवर मात करण्यासाठी रशियनांना बरीच घाईगडबड करावी लागली आणि कठोर दडपणुकीच्या उपाययोजना वापराव्या लागल्या. परकीय आक्रमणाचा धोका, हे यामागचं मुख्य कारण होतं. कर्मण समाजवादाला अशी असाधारण पावलं उचलणं टाळता आलं,... तर पन्नास वर्षांमध्ये भारतही राहण्यायोग्य देश होईल, इथली लोक बऱ्यापैकी शिक्षित, आनंदी व संपन्न होतील. गांधींच्या पद्धतीचा वापर केला तर यासाठी बहुधा आणखी वेळ लागेल. पण त्याचा परिणाम इतका मूल्ययुक्त असेल आणि अहिंसेचा प्रयोग म्हणून तो अत्यंत महत्त्वाचा असेल; मानवी व्यवहारांमधून द्वेषाचं उच्चाटन करणं आणि सत्याचं पालन करणं, हा या प्रयोगाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कोणीही बहुतांशाने याच मार्गाला पसंती देईल.’

लेनिन यांच्या पद्धती कदाचित अधिक परिणामकारक ठरण्याची शक्यता असली तरी, गांधींच्या पद्धती निश्चितपणे अधिक मानवीय आहेत, असं स्प्रॅट सुचवतात, तेव्हा त्यांच्या लेखनात हॅरी वॉर्ड यांच्या मांडणीचे अप्रत्यक्ष प्रतिध्वनी उमटल्यासारखं वाटतं.


हेही वाचा - गांधी विरुद्ध लेनिन: त्यांच्या काळात आणि आपल्या काळात - रामचंद्र गुहा


स्प्रॅट तुरुंगात गेले तेव्हा ठामपणे मार्क्सवादी होते. तुरुंगातून बाहेर येताना मात्र ते काहीसे संभ्रमित मार्क्सवादी झाले. त्यांना लेनिनवाद व गांधीवाद यांच्यातील मध्यम मार्ग हवा होता. यातच ते मानवेंद्रनाथ रॉय यांच्या भोवती निर्माण झालेल्या वर्तुळात सहभागी झाले. लेनिनचे माजी सहकारी असणाऱ्या व दीर्घ काळ गांधींचे टीकाकार राहिलेल्या रॉय यांनी १९३०च्या दशकाअखेरीला ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’ची स्थापना केली. या पक्षाद्वारे ‘इंडिपेंडन्ट इंडिया’ या नावाचं वृत्तपत्र चालवलं जात असे. या वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या मजकुरावर स्वतः रॉय यांचं लक्ष असायचं. 

एका भारतीय महिलेशी लग्न केलेले स्प्रॅट भारतातच बंगळुरूमध्ये राहू लागले. त्यांनी डिसेंबर १९४१मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांच्या वृत्तपत्राकडे एक लेख प्रकाशनार्थ पाठवला. हा लेख गांधींविषयी अवाजवी सहानुभूती राखणारा असल्याच्या कारणावरून रॉय यांनी नाकारला. या लेखाचं हस्तलिखित दुर्दैवाने आता उपलब्ध नाही, पण स्प्रॅट यांनी रॉय यांना लिहिलेल्या पत्रातून या पत्राच्या आशयाचं स्वरूप स्पष्ट होतं. गांधीवादाद्वारे ‘स्वावलंबन, प्रामाणिकपणा, सार्वजनिक व्यवहारांविषयीची आस्था, सहकार्याची क्षमता आणि सांप्रदायिकतेपासून मुक्ती’ या मूल्यांची जोपासना होते, असं प्रतिपादन स्प्रॅट यांनी केलं. गांधीवाद हा ‘भारताला स्वातंत्र्यासाठी सज्ज करण्याकरता लागणारी प्रमुख शक्ती ठरू शकतो (मी समाजवादासाठी देशाला सज्ज करण्याबाबत बोलत नाही)’, असं त्यांना वाटत होतं. स्प्रॅट यांनी जाताजाता लेनिन यांची एक ‘चूक’ही दाखवून दिली. ते म्हणाले, ‘बूर्झ्वा लोकशाही म्हणजे पूर्णपणे फसवेगिरी आहे, तिचा वापर क्रांतिकारक उद्देशाने करून घेता येईल, पण तिला स्वतःचं काही मूल्य नाही, असं लेनिन यांना वाटत होतं. प्रत्यक्षात ही लोकशाही म्हणजे सर्वांत मूल्यवान उपलब्धी असते, आणि तिची प्रमुख वैशिष्ट्यं जतन केली नाहीत, म्हणजे राजकीय लोकशाही, नागरी स्वातंत्र्यं, विचारस्वातंत्र्य, इत्यादींचं जतन केलं नाही, तर समाजवादाचं काहीच हित साधलं जाणार नाही.’

फिलिप स्प्रॅट यांनी लोकशाहीचं गुणगान केल्यानंतर ऐंशी वर्षांनी आता जगभरातील लोकशाही राजवटींसमोर धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प यांची अमेरिका, ओर्बान यांचा हंगेरी, नेतान्यहू यांचा इस्राएल, एर्दोगान यांचा तुर्कस्तान, आणि (त्याच प्रमाणात) मोदींचा भारत, हे देश उजव्या शासनव्यवस्थांखाली आहेत. त्या-त्या देशांमधील सार्वजनिक संस्थांची स्वायत्तता मोडून काढण्यासाठी आणि सत्ताधारी पक्षाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी या शासनव्यवस्था अथकपणे प्रयत्न करत आहेत. लोकशाही अशा तऱ्हेने ओसरणीला लागलेली असताना त्यावर उपाय करण्यासाठी मात्र लेनिन यांच्या पद्धतीने रक्तरंजित क्रांती कामाची नाही. त्यातून एकाधिकारशाहीची एकपक्षीय राज्यसंस्था निर्माण होते. त्यापेक्षा ‘बूर्झ्वा लोकशाही’ला मानवतेची ‘सर्वांत मूल्यवान उपलब्धी’ ठरवणाऱ्या खरोखरच्या निष्पक्षपाती निवडणुका, मुक्त प्रसारमाध्यमं, स्वतंत्र न्यायव्यवस्था, स्वतंत्र नागरी सेवा यांच्यातील ऊर्जा व आश्वासकता नव्याने रुजवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

- रामचंद्र गुहा
(लेखक विख्यात इतिहासकार आणि राजकीय  - सामाजिक विश्लेषक आहेत.)
भाषांतर- प्रभाकर पानवलकर

Tags: gandhi Lenin गांधी महाताम गांधी गांधीवाद लेनिन साम्यवाद कालपरवा रामचंद्र गुहा इतिहास Load More Tags

Add Comment

संबंधित लेख