संग्रहालयांच्या आणि पुराभिलेखापालांच्या गौरवार्थ

संशोधनासाठी नेहरू स्मृती संग्रहालय ही माझी नेहमीच सर्वांत आवडती जागा राहिलेली आहे

नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय (एनएमएमएलम), नवी दिल्ली. | फोटो सौजन्य : nehrumemorial.nic.in

बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 2020 मधील जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मी नवी दिल्लीमध्ये नेहरू स्मृती संग्रहालयाच्या व ग्रंथालयाच्या (एनएमएमएलच्या) संकलनामध्ये संशोधन करत होतो. नेहरू स्मृती संग्रहालयामध्ये जतन केलेली ऐतिहासिक दस्तऐवजांची संपदा 1980 च्या दशकाच्या पूर्वार्धात मला पहिल्यांदा सापडली. 1988 व 1994 च्या दरम्यान मी दिल्लीमध्ये राहत होतो तेव्हा मी ती सगळी चिकित्सेने धुंडाळली होती. नेहरू स्मृती संग्रहालयामध्ये इतिहासातील प्रमुख (आणि इतरही) व्यक्तींच्या खासगी कागदपत्रांचा संग्रह चाळण्यात आणि जुन्या वृत्तपत्रांच्या संपत्तीमध्ये खोल बुडी मारण्यात मी आठवड्यातील दोनेक दिवस घालवत असे. 

1994 मध्ये मी बेंगळूरू इथे राहायला गेलो... त्यामुळे नेहरू स्मृती संग्रहालयाशी माझा दैनंदिन संपर्क राहिला नाही... तो वर्षातील काही भेटींपुरताच उरला. त्या भेटी शक्यतो जानेवारी, एप्रिल, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या महिन्यांत होत... त्यामुळे उन्हाळ्यातील भयंकर उकाडा आणि मान्सुनचा तुरळक चिकचिकाट सरलेला असे.

नवी दिल्ली येथील बोर्डिंग हाऊसमध्ये, नेहरू स्मृती संग्रहालयापासून चालत जाता येण्याजोग्या अंतरावर मी स्वतःसाठी आठवडाभराचे किंवा दहा दिवसांसाठीचे आरक्षण करून ठेवत असे. हस्तलिखितांच्या खोलीपाशी मी सकाळी नऊ वाजता पोहचत असे आणि ती उघडताक्षणीच खिडकीशेजारचा टेबल बळकावत असे. मला लागणारी कागदपत्रे मागवत असे आणि दिवसभराचे काम एकाग्र चित्ताने करण्याकरता स्थिर होत असे. जेवणासाठी अल्प आणि चहासाठी दोनदा अत्यल्प अशी विश्रांती सोडली तर मी पाच वाजेपर्यंत टिपणे काढत बसे आणि अधिक टिपणांसाठी दुसऱ्या दिवशी परत येत असे. 

जगभरातील डझनावारी अर्काइव्ह्जमध्ये मी काम केले आहे... मात्र संशोधनासाठी एनएमएमए ही नेहमीच माझी सर्वांत आवडती जागा राहिलेली आहे. याची विविध कारणे आहेत (किंवा होती) - तिथली बैठकव्यवस्था, भव्य अशा तीन मूर्ती, वैविध्यपूर्ण पक्षिजीवन असलेला असा हाऊसच्या मागचा वृक्षाच्छादित परिसर, आपल्या इतिहासाच्या सर्व पैलूंवरील प्राथमिक साधनांची विपुल उपलब्धता; कार्यक्षम आणि मदतशील कर्मचारिवर्ग, तिथे कामानिमित्ताने येणाऱ्या इतर अभ्यासकांच्या पूर्वनियोजित आणि अनियोजित भेटी इत्यादी. 

ऐतिहासिक संशोधकांसाठी तीर्थक्षेत्र असलेल्या या पवित्र स्थळाच्या गेल्या 25 वर्षांच्या काळात मी किमान चार आणि काही वेळा पाच व सहादेखील तीर्थयात्रा केल्या आहेत. मागच्या जानेवारी महिन्यात मी तिथे होतो तेव्हा 2020 हे वर्ष काही वेगळे असेल याचा अजिबात अंदाज मला नव्हता. त्यानंतर ही साथ आली आणि उर्वरित वर्षभरासाठी मी दक्षिण भारतात अडकून पडलो. कसेतरी करून एखादे वेळी मला नवी दिल्लीचे विमान उपलब्ध झाले असते तरी मला नेहरू स्मृती संग्रहालय बंद अवस्थेतच पाहायला मिळाले असते. 

...तरीदेखील ज्या अर्काइव्हवर मी प्रेम केले त्याने मला या वर्षभरातही साथ केली. या काळात एक पुस्तक मी वाचून संपवले, जे स्वातंत्र्यलढयात सहभाग घेणाऱ्या परदेशी व्यक्तींवर होते. त्यासाठीच्या एकूण संशोधनातले बरेचसे संशोधन नेहरू स्मृती संग्रहालयामध्ये व ग्रंथालयामध्ये केले गेले होते. 

त्याचबरोबर एका तरुण अभ्यासकाचे हस्तलिखित मी वाचत होतो. तेदेखील नेहरू स्मृती संग्रहालयामधील संग्रहावर आधारलेले होते. 2020 च्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात मी समाजवादी नेते राहुल रामागुंडम यांनी लिहिलेले जॉर्ज फर्नांडीस यांचे चरित्र आणि अभिषेक चौधरी यांनी लिहिलेले, भाजपचे प्रेरणास्थान अटल बिहारी वाजपेयी यांचे चरित्र यांतील प्रकरणे वाचत होतो. अक्षय मुकुल यांच्याशीही माझी काही दीर्घ संभाषणे झाली, ते जयप्रकाश नारायण यांच्या नव्या चरित्रावर काम करत आहेत.  

या तीन पुस्तक प्रकल्पांमध्ये चार बाबी समान आहेत. पहिली... जेव्हा ही पुस्तके प्रकाशित होतील तेव्हा ती सगळी महत्त्वाची आणि कदाचित त्या-त्या व्यक्तीच्या बाबतीतला अंतिम शब्द म्हणता येईल अशा प्रकारची चरित्रे असतील. दुसरी... ही पुस्तके महत्त्वाच्या (आणि वादग्रस्त) ऐतिहासिक व्यक्तींविषयी असल्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग लाभेल. तिसरी... या तिन्ही पुस्तकांचे चरित्रनायक हे काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेसचे अग्रगण्य नेते जवाहरलाल नेहरू यांचे (काही प्रसंगी अतिशय कठोर) विरोधक होते... आणि चौथी बाब म्हणजे यातील कोणत्याही पुस्तकाची कल्पना सुचणे, त्यासाठीचे संशोधन करणे आणि ते प्रत्यक्ष लिहिणे हे फर्नांडीस, वाजपेयी आणि जेपी यांच्याशी संबंधित त्या दुर्मीळ आणि समृद्ध साधनांच्या अभावी शक्य झाले नसते... जी साधने त्या तिघांचाही राजकीय विरोधक असणाऱ्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या अर्काइव्हमध्ये जतन केली गेली आहेत.

हा काही अपघात नव्हता. नेहरूंचे नाव दिले गेलेले असले तरी विशिष्ट विचारांविषयी पक्षपाती असणे नेहरू स्मृती संग्रहालयाचे लक्ष्य नव्हते... त्यामुळेच जेपी, फर्नांडीस आणि वाजपेयी यांच्या चरित्रकारांनी त्यांचे पुष्कळ संशोधन तिथे केले. यासोबतच श्यामा प्रसाद मुखर्जी आणि सी राजगोपालाचारी यांच्यासारख्या इतर काँग्रेसविरोधी (आणि नेहरूविरोधी) विख्यात राजकारण्यांच्या चरित्रकारांनीही तेच केले. 

नेहरू स्मृती संग्रहालयदेखील तिची उभारणी करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत भाग्यवान ठरली आहे. असे भाग्य इतर अनेक भारतीय संस्थांना लाभलेले नाही. तिचे पहिले दोन संचालक बी. आर. नंदा आणि रवींदर कुमार हे अभ्यासक म्हणून आणि प्रशासक म्हणूनही अतुलनीय होते. नंदा आणि कुमार यांच्यासोबत उत्कृष्ट पुराभिलेखापालांचा गट काम करत होता. त्यांनी देशभरातील हस्तलिखिते, वृत्तपत्रे जमवून त्यांची क्रमवारी लावली, सूची तयार केली व त्यांचे संवर्धन केले... आणि ते सगळे सर्व अभ्यासकांना उपलब्ध करून दिले. 

गेल्या अनेक दशकांत,नेहरू स्मृती संग्रहालयामधील संग्रहाच्या आधारे शेकडो पुस्तके आणि प्रबंध लिहिले गेले आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासातील कोणत्याही पैलूवर गांभीर्याने काम करणाऱ्या प्रत्येकाला इथे काही काळ व्यतीत करावाच लागतो. मग तो देशी असो किंवा विदेशी; तरुण असो, वृद्ध असो किंवा मध्यमवयीन; तो सामाजिक इतिहासकार, आर्थिक इतिहासकार, सांस्कृतिक इतिहासकार, विज्ञानविषयक इतिहासकार, चित्रपटांचा किंवा माध्यमांचा इतिहासकार किंवा क्रीडाविषयक इतिहासकार; स्त्रीवाद, पर्यावरणवाद, समाजवाद, किंवा कम्युनिझमचा विद्यार्थी यांपैकी कुणीही असो... एखाद्याचे संशोधन नेहरू स्मृती संग्रहालयापासूनच सुरू होते आणि पुष्कळदा तिथेच संपते.

नेहरू स्मृती संग्रहालय आणि ग्रंथालय उभे करणाऱ्या इतर स्त्री-पुरुषांचा अनादर न करता नमूद करावेसे वाटते की, ज्यांच्यामध्ये या संस्थेचा आत्मा आणि तिचे व्यक्तिमत्त्व उत्कृष्टपणे प्रतिबिंबित झाले ते अभ्यासक म्हणजे डॉ. हरी देव शर्मा. ते पंजाबमधून आलेले इतिहासकार होते. ही संस्था स्थापन झाल्याच्या काहीच काळानंतर म्हणजे 1966 मध्ये ते इथे आले आणि पुढे साडेतीन दशके त्यांनी इथे काम केले. 

नेहरू स्मृती संग्रहालयामध्ये ज्या अतिशय महत्त्वाच्या दस्तऐवजांचे संकलन झाले आहे त्यांपैकी पुष्कळसे हरी देव शर्मा यांचे कौशल्य, त्यांची मेहनत आणि निःस्वार्थी वृत्ती यांतून साधले गेले आहे. यामध्ये वर उल्लेखलेली फर्नांडीस, जेपी आणि राजगोपालचारी यांच्यावरील कागदपत्रे आहेत... त्याचप्रमाणे महात्मा गांधींवरील कागदपत्रांचे विस्तृत संकलनही आहे. मौखिक इतिहासाचे संकलन करण्यावरही शर्मा यांचा कटाक्ष होता. हे संकलन त्यांनी स्वतः घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखतींवर बव्हंशी आधारलेले होते. 

फेब्रुवारी ते डिसेंबर 2020 दरम्यान नेहरू स्मृती संग्रहालयाच्या प्रत्यक्ष संपर्कापासून वंचित झालो असलो तरी मी वाचत असलेल्या हस्तलिखितांच्या माध्यमातून मी या महान संस्थेच्या सहवासात होतो. फर्नांडीस यांच्याविषयी राहुल रामगुंडम यांच्याशी बोलताना, वाजपेयींबद्दल अभिषेक चौधरी यांच्याशी किंवा अक्षय मुकुल यांच्याशी बोलताना हरी देव शर्मा यांची मूर्ती कित्येकदा माझ्या मनात आली. हे सर्व अभ्यासक फारच तरुण आहेत... त्यामुळे त्यांची शर्मा यांच्याशी भेट झालेली नाही... मात्र ते जाणून आहेत की, शर्मा यांच्यासारख्या पुराभिलेखापालामुळेच त्यांचे संशोधन आणि त्यांचा अभ्यास या दोन्ही गोष्टी शक्य झाल्या आहेत. 

मी दोन्ही बाबतींत भाग्यवान आहे - डॉ. शर्मा यांच्याशी माझी ओळख होती आणि त्यांचे काम व त्यांची विद्वत्ता यांचाही मला प्रत्यक्ष लाभ झाला आहे.

हरी देवजी उंचीने लहानखुरे मात्र मजबूत बांध्याचे होते. ते नेहमी पांढऱ्या रंगाचा, खादीचा कुर्ता-पायजमा परिधान करत. सरकारी वाहनाचा प्रस्ताव ठामपणे नाकारून ते त्यांची स्कूटर चालवत येत. 

आत्ता हे लिहिताना जानेवारी महिन्यातील हिवाळ्यात एके सकाळी ग्रंथालयाच्या इमारतीच्या पायऱ्यांवर झालेल्या आमच्या भेटीचे मी वर्णन करत आहे. मी नुकताच ऑटो-रिक्षामधून खाली उतरलो होतो आणि त्यांनीही नुकतीच त्यांची व्हेस्पा वाहनतळावर लावून त्यांचे हेल्मेट उतरवले होते. एकमेकांसमोर आल्यानंतर आमच्यात पुढीलप्रमाणे संभाषण झाले...

पुराभिलेखापाल (फर्ड्या हिंदीत) - कहो राम, कैसे हो? बंगsलोर से कब आये? 
अभ्यासक (अडखळत हिंग्लिशमध्ये) - मेरी फ्लाईट कल रात को पहुंची हरिदेवजी.
पुराभिलेखापाल - तो इस बार क्या देख रहे हो?
अभ्यासक - मैं गांधीजी के डिसायपल्स पर कुछ काम स्टार्ट करना चाहता हूँ ।
पुराभिलेखापाल - तब आओ मेरे साथ कमरे में...

ग्रंथालयाच्या पायऱ्यांवर असताना हरी देवजींकडे धावत गेलो नसतो, तर मी थेट हस्तलिखितांच्या खोल्यांकडे गेलो असतो, आणि अंधारात गोळ्या झाडाव्या तसे माझे संशोधन कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय आणि साहाय्याशिवाय सुरू झाले असते. त्यांना भेटल्यामुळे आणि त्यांच्या कार्यालयात गेल्यामुळे नेहरू स्मृती संग्रहालयामधील संग्रहांसोबतचा माझा काळ अधिक कार्यक्षमतेने व्यतीत झाला. 

गांधींच्या अतिशय निकटच्या अनुयायांनी महात्म्याच्या हत्येनंतर काय केले हे जाणून घेण्याची मला इच्छा होती. त्यांनी सांगितले की, असे असेल तर मी जे. सी. कुमारप्पा या अर्थतज्ज्ञाचे  संग्रह पाहिले पाहिजेत आणि त्यांचा विनोबा भावे व मीरा बहन यांच्याशी असलेला पत्रव्यवहार विशेष लक्षपूर्वक पाहिला पाहिजे. 

त्यानंतर त्यांनी सुचवले की डी. जी. तेंडुलकर आणि कमलनयन बजाज यांच्याकडील कागदपत्रांतील सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्यावरील साहित्य मी पाहिले पाहिजे... अशा प्रकारची शिफारस करणाऱ्या सल्ल्यांचा प्रवाह वाहत असे आणि संशोधकाचे काम अधिक सोपे होत असे.

हरी देव शर्मा हे नेहरू स्मृती संग्रहालयाच्या उपसंचालकपदावरून २०००च्या सुरुवातीला निवृत्त झाले आणि त्यानंतर काही काळातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर आजतागायत जेव्हा-जेव्हा मी नेहरू स्मृती संग्रहालयामध्ये प्रवेश केला आहे तेव्हा प्रत्येक वेळी मी त्यांच्या भेटीची कल्पना केली आहे. त्यांच्या हातात हेल्मेट असेल... मग ते मला सूचना देण्यासाठी त्यांच्या खोलीत नेतील... 

तथापि 2020 चे शेवटचे अकरा महिने माझ्या आवडत्या अर्काइव्हजमध्ये पाउल टाकल्याविनाच गेले. 2021 मध्येही मला तिथे जाता येईल का हे ठाऊक नाही... कारण गेल्या काही वर्षांपासून त्या ग्रंथालयाच्या, कदाचित पुन्हा भरून न काढता येण्याजोग्या पतनाला सुरुवात झाली आहे. निवृत्त झालेल्या पुराभिलेखापालांची पदे अद्याप रिक्त आहेत. अनेक सन्माननीय भारतीयांनी दान केलेले महत्त्वाचे संग्रह वर्गवारी केल्याविना धूळ खात पडून आहेत. 

त्याचबरोबर नेहरू स्मृती संग्रहालयाच्या व्यवस्थापनाने अभ्यासकांची व अभ्यासवृत्तीची उपेक्षा करून त्याऐवजी सारे लक्ष परिसरातील हिरवळीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या भयानक इमारतींकडे पुरवावे असे आदेश त्यांच्या राजकीय वरिष्ठांनी दिले आहेत. 

वरवर पाहता हे संग्रहालय भारताच्या सर्व पंतप्रधानांकरता भूषणावह राहिले आहे... मात्र नवी दिल्लीत सुरू असलेल्या इतर अनेक कुरूप इमारतींच्या बांधकामाप्रमाणे — सध्याच्या पंतप्रधानांच्या पोकळ डामडौलाकरता प्रत्यक्षात ती केवळ एक ऐतिहासिक वास्तू आहे.  

मोदीकालीन अराजकात नेहरू स्मृती संग्रहालय कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या आकारात टिकून राहील हे सांगता येणार नाही. जिथे एकेकाळी हरी देव शर्मा यांच्यासारखे पुराभिलेखापाल होते असे हे एके काळी कोणत्याही पिढीतील, कोणत्याही विचारसरणीतील आणि कोणत्याही राष्ट्रातील अभ्यासकांसाठी स्वागतशील आणि आतिथ्यशील असणारे वैचारिक उत्कृत्ष्टतेचे केंद्र सर्जनशीलतेअभावी आणि स्वयं-नूतनीकरणाअभावी आज उदास आणि अनाथ असे ठिकाण झाले आहे. 

नेहरू स्मृती संग्रहालयाला त्याच्या सर्वोत्कृष्ट स्थितीतील काळापासून पाहिलेली एक व्यक्ती म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो... कारण तिथून मला टिपणांचे गठ्ठेच्या गठ्ठे मिळवता आले आहेत... जे माझ्या उर्वरित आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील... मात्र वयाने तरुण असणारे किंवा अद्याप न जन्मलेले अभ्यासक, या एके काळच्या महान अर्काइव्हमध्ये मी जसे काम करू शकलो तसे आता फार गांभीर्याने काम करू शकणार नाहीत याबद्दल मला अपराधीही वाटत राहील.
  

(अनुवाद : सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)


 

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा सुहास पाटील नेहरू मेमोरियल लायब्ररी म्युझियम नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालय एनएमएमएलम Ramchandra Guha Archives Archivist Nehru Nehru Memorial Museum and Library NMML Delhi Load More Tags

Comments:

sunil datye

आपल्या देशाला ललामभूत असणारी ही ज्ञानगंगोत्री अशीच अव्याहतपणे वहात रहावी यासाठी सजगपणे प्रयत्न करणे आवश्यकच आहे.याचे सरकारी करणं होऊ नये.

दीपक पाटील

अभ्यासकांसाठी आवश्यक पूरक वातावरण व संदर्भ साहित्य देणा-या अशा संस्था वाढल्या पाहिजेत...त्या संक्रमण अवस्थेत जाणं म्हणजे मोठा मौलिक सामाजिक इतिहास संपवला जाणं...दुर्दैवानं "सध्या कुंपणंच शेत खातंय !"

Add Comment