‘परेडस्’च्या प्रशंसेखातर

बंगळूरुमधील माझे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे हा कॅफे... 

1995 मध्ये मी बंगळूरुला कायमचा राहायला गेलो तेव्हा तिथल्या विशेषतः पाच संस्थांशी असलेली माझी जुनी ओळख मला पुन्हा दृढ करायची होती. त्यात दोन पुस्तकांची दुकाने होती. ‘प्रीमियर’ हे दुकान कोकण किनारपट्टीवरील एका भिडस्त स्वभावाच्या हिंदूचे होते, तो नवी पुस्तके विकत असे. ‘सिलेक्ट’ नावाचे दुकान एका गप्पिष्ट कानडी अभियंत्याचे होते, तो वापरलेली किंवा सेकंडहँड पुस्तके विकत असे. स्वतःकडील ग्रंथसंग्रहाबद्दल आणि आपापल्या नेहमीच्या गिऱ्हाईकांच्या ध्यासविषयांबद्दल (obsessions) दोघा मालकांना चांगलीच माहिती होती.  

बंगळूरुमधील मला ठाऊक असणाऱ्या इतर दोन संस्थादेखील मुद्रित शब्दांशीच संबंधित होत्या. पहिली होती, ‘व्हरायटी न्यूज’; संपूर्ण भारतातील (आणि जगभरातील) विविध प्रकारच्या नियतकालिकांचा संग्रह तिथे असे. ते दुकान एका मुस्लिम कुटुंबाचे होते. आपसांत ते लोक दखनी भाषेत बोलत आणि गिऱ्हाईकांशी इंग्लिश, कन्नड किंवा तमिळमध्ये बोलत. ‘प्रीमियर’ आणि ‘सिलेक्ट’प्रमाणेच 'व्हरायटी'च्या मालकाचेदेखील त्यांच्या नेहमीच्या गिऱ्हाईकांशी चांगलेच जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या आवडीनिवडी त्यांना ठाऊक होत्या. आणि व्यावसायिक सहजतेने ते त्यांच्याशी व्यवहार करत. त्याशिवाय वसाहतकालीन साम्राज्यशाहीच्या काही उपकारक वारशांपैकी एक असणारी ब्रिटीश लायब्ररीही तिथे होती. अमेरिकेत प्रकाशित झालेली पुस्तके तिथे संग्रहित केलेली होती. निष्ठावंत आणि कार्यक्षम अशा देशी ग्रंथपालांकरवी ती देशी सभासदांना वाचायला दिली जात होती.

ही सर्व ठिकाणे मला आवडत होती; मात्र माझ्या सर्वात आवडीचे ठिकाण होते, ‘कोशीज् परेड कॅफे’. शहरातील नवखे रहिवासी त्याला 'कोशीज्' या नावाने ओळखतात; माझ्याकरता मात्र ते कायमच 'परेडस्' होते. 'सेंट मार्क'कडे जाणाऱ्या रस्त्यावर, 'साऊथ इंडियन चर्च'च्या मालकीची एका दुमजली इमारत आहे. तिच्या तळमजल्यावर हे रेस्टॉरंट आहे.    

केरळमधील पी ओ कोशी नावाच्या सायरीयन ख्रिश्चन व्यक्तीने 1952 मध्ये परेडस् सुरु केले. बरोबर 50 वर्षांपूर्वी, 1970 मध्ये मला पहिल्यांदा या रेस्टॉरंटविषयी समजले. उन्हाळ्यात मी माझ्या काकांसोबत बंगळूरुमध्ये राहिलो होतो. कांतिरव (Kanteerava) स्टेडियमच्या विरुध्द बाजूला असणाऱ्या मैदानात 'युनियन क्रिकेट क्लब' होता. तिथे मी रोज दुपारी मित्रांसोबत सराव करण्यासाठी काकांसह जात असे. सरावानंतर आम्ही सर्व क्रिकेटपटू कॅफेमध्ये जात असू. मोठी माणसे तिथे कॉफी घेत. आणि तेव्हा 12 वर्षांचा असणारा मी लिंबू सरबत घेत असे. 

1980 मध्ये मी जेव्हा बंगळूरुमध्ये काम करत होतो तेव्हा मला परेडस् अधिक चांगल्याप्रकारे माहीत झाले. एम जी रोडवर 'ट्रिनिटी सर्कल साईड' शेजारी आमचे घर होते आणि तिथून कॅफेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच 'सिलेक्ट' आणि 'प्रीमियर' ही दुकाने होती. कोशीज् समोरच्या रस्त्यावर 'व्हरायटी न्यूज' होते आणि 'कोशीज्'च्या वरतीच ब्रिटीश लायब्ररी होती. 

मुद्रण संस्कृतीच्या या चार वैविध्य – मी म्हणेन, झळाळणारे वैविध्य – बाळगणाऱ्या भांडारांना भेटी देण्यात 'परेडस्'पर्यंतची माझी वाट आनंदाने सरायची. कॅफेमध्ये प्रवेश केला की, नुकतीच खरेदी केलेली पुस्तके आणि नियतकालिके माझ्या झोळीतून बाहेर काढत, ती प्रेमाने उघडून, उत्सुकतेने पानं चाळत मी कॉफी आणि कधीतरी स्नॅक्स मागवायचो . 'कोशीज्'मध्ये साधारण अर्धा तास व्यतीत करून मी घरी परतायचो. 

1989 मध्ये माझी पत्नी सुजाता आणि मी दिल्लीला राहायला गेलो. आणि सहा वर्षांनी बंगळूरुला परत गेलो. 1995 मध्येही बंगळूरुमधली मला माहीत असलेली आणि माझ्या आवडीची ही सर्व ठिकाणे चांगलीच भरभराटीला आलेली होती. 2020 मधली स्थिती मात्र काहीशी वेगळी आहे. प्रीमियर, व्हरायटी न्यूज आणि ब्रिटीश लायब्ररी बंद झाल्या आहेत. 'सिलेक्ट'देखील पुन्हा त्याच्या गतकाळातील दुर्दैवी स्थितीच्या छायेत आहे. बंगळूरुमधील माझ्या 25 वर्षांच्या वास्तव्यात केवळ एका संस्थेने मला नेहमी सोबत केली आहे, ती म्हणजे कोशीज् परेड कॅफे.

परेडस् ज्यांनी सुरू केले त्यांचे नातू, संतोष आणि प्रेम आता हा कॅफे चालवतात. संतोष हा शांत आणि संकोची स्वभावाचा आहे; बव्हंशी पडद्यामागे राहून काम करणारा, संस्थात्मक कामे मार्गी लावणारा. आणि प्रेम मात्र मनमिळावू आहे; बाहेरची कामं पाहणारा, टेबलाटेबलावर जाऊन गिऱ्हाईकांशी गप्पा मारणारा आणि मेनूमधील नवीन पदार्थांवर (आणि त्याशिवाय इतरही अनेक गोष्टींवर) प्रतिक्रिया घेणारा.

प्रेम कोशी हा माझी पत्नी सुजाताच्याच वयाचा आहे. आणि ते अगदी एकमेकांशेजारी असलेल्या रस्त्यांशेजारच्या घरांत वाढले आहेत. प्रेम जेव्हा तरुण हिप्पी होता, त्या काळात त्याच्या वयाच्या पण एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीशी त्याचा परिचय करून देताच तो म्हणत असे, 'माझं नाव आहे प्रेम, It means luvvhh'. त्या काळी नेमबाजी हा त्याचा ध्यास होता. त्यानंतर तो बँकिंग तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी लुईसाना येथे गेला आणि दारुडा बनला. घरी परतल्यानंतर बंदूक आणि बाटली या दोन्ही गोष्टी त्याने सोडून दिल्या. आणि संतोष या आपल्या भावासोबत, आपले वडील आणि आजोबा यांच्या कॅफेला, सतत बदलणाऱ्या आणि गजबजलेल्या शहरातील एक सदैव स्वागतशील असणारे ठिकाण बनवण्यात त्याने स्वतःला झोकून दिले.  

'कोशीज्'ची विविध आकर्षणस्थळे आहेत : इथला प्रकाश, माहोल, पदार्थ, जागा आणि इतरही अनेक. त्यापैकीच एक म्हणजे दोन मालकांपैकी अधिकवेळा तिथे दिसणारा प्रेम. तो उंचीने लहानखुरा पण दणकट प्रकृतीचा आहे. बहुतेकदा तो जीन्समध्ये असतो. आणि नेहमी त्याच्या कमरेशी चाव्यांचा मोठा जुडगा असतो. गिऱ्हाईकांशी त्याचे वागणे अमर्याद स्नेहाचे असते; पहिल्यांदा येणारे गिऱ्हाईक एक कप कॉफीसह तासनतास इथे थांबू शकते. आणि जुनी गिऱ्हाईके त्यांच्या इच्छेनुसार धमाल मेजवान्या झोडू शकतात. त्याला मी कधी आवाज चढवताना पाहिलेले नाही किंवा त्याने वैतागलेला चेहरा धारण केल्याचेही पाहिलेले नाही; कॅफेची जागा एम जी रोड या तथाकथित राष्ट्रीय महामार्गापासून फारच जवळ आहे या कारणास्तव मद्यविक्री करण्यास अटकाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा अविचारी आदेश त्याला मिळाला तेव्हादेखील. (काही महिन्यांपूर्वी हा आदेश रद्द झालेला होता - या काळात 'कोशीज्'ने सहन केलेले आर्थिक नुकसान नक्कीच प्रचंड असले पाहिजे)

'परेडस्'ला एकाहून अधिक वेळा भेट देणाऱ्या कुणालाही प्रेम अधिकाधिक आवडू लागतो. काही वर्षांपासून जे तिथे जातात त्यांना हे ठाऊक आहे की, या कॅफेची ओळख प्रेमशी जोडली गेलेली असली तरी त्याच्या आयुष्याला केवळ या कॅफेने व्यापून टाकलेले नाही. रुबी नावाची त्याची पत्नी व जोश नावाचा मुलगा, त्याचं नाटकवेड, बिल्डिंगमध्ये शिरलेल्या सापांची सुटका आणि पुनर्वसन करण्याची त्याची क्षमता, तसेच व्यक्तींनाही सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याची क्षमताही त्याच्यापाशी आहे.

त्याचे रेस्टॉरंट मद्यविक्री करत असले तरी अमेरिकेतून परतल्यानंतर त्याने मद्याच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. 'अल्कोहोलिक्स ऍनॉनिमस'च्या बंगळूरु शाखेशी तो घनिष्ट संपर्कात असतो. वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या वर्गाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांच्या व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी आणि त्यांना स्वतःला व त्यांच्या परिवाराला पुन्हा सुरळीत करण्यासाठी त्याने व्यक्तीशः मदत केली आहे. 

माझ्यापाशी माझ्या स्वतःच्या दोन 'प्रेम'कथा आहेत ज्या त्याचे खास व्यक्तिमत्त्व दर्शवतात. पहिली प्रतिभावान तरुण छायाचित्रकार जी राघव याच्याशी संबंधित आहे. त्याने कॅफेमधील लोकांच्या छायाचित्रांची मालिकाच केली होती. (ज्यामध्ये महान नाटककार गिरीश कार्नाडदेखील होते.) जेव्हा राघवचे वयाच्या तिशीतच कॅन्सरने निधन झाले तेव्हा त्याच्या कामाला श्रद्धांजली म्हणून प्रेमने एक सभा आयोजित केली होती. त्यासाठी त्याने कॅफेचे कामकाज दुपारनंतर पूर्ण बंद ठेवले होते. त्याच्या घरी आम्ही राघवविषयी आणि त्याच्या वारशाविषयी भाषणे केली तेव्हा प्रेम सर्वांना चहा आणि स्नॅक्स देत होता. तुलनेने अपरिचित असणाऱ्या एखाद्या कलावंताच्या स्मृतींचा गौरव करण्यासाठी दिल्ली किंवा मुंबईतील एखाद्या रेस्टॉरंटचा मालक काही तासांच्या आपला धंद्याचा त्याग नक्कीच करणार नाही. आम्ही सर्वच फार भारावलेलो होतो, पण राघवच्या आई सर्वांत अधिक भारावलेल्या होत्या.

दुसरी गोष्ट याहूनही अधिक चांगली आहे. एकदा रात्री सुजाता आणि मी घरी आलो. आणि आम्हाला आमच्या गॅरेजमध्ये एक मोठे घुबड दिसले. ते अजिबात हालचाल करत नव्हते आणि आम्हालाही त्याला त्रास द्यायचा नव्हता. आम्ही त्याच्या पुढ्यात उभे राहिलो, त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर हेडलाईटस टाकून पाहिले. मात्र ते जागचे अजिबात हलले नाही. आता काय करावे? "प्रेमला कॉल करा" सुजाता म्हणाली. "नक्की? साडेदहा वाजलेत" मी म्हटलं. "कॉल करा त्याला. त्याला पक्षी आणि प्राण्यांविषयी माहीत आहे आणि त्यांना मदत करायला तो कुठेही जाईल."

त्यामुळे मी प्रेमला कॉल केला. सुदैवाने तो जागाच होता. पुढच्याच रस्त्यावर तो राहत असल्यामुळे तो लगेच आला. मण्यासारख्या डोळ्यांचा, तीक्ष्ण चोच असणारा, आणि अजूनही आमच्याकडे रोखून पाहणारा तो मोठ्या आकाराचा पक्षी त्याला दिसला. तो पुढे चालत गेला आणि आपल्या एका हाताने त्याला उचलण्यापूर्वी मिनिटभर त्यानेही त्याच्याकडे रोखून पाहिले. त्यानंतर त्याला घेऊन तो बाहेर मुख्य रस्त्यावर आला. आणि त्याला आकाशात भिरकावले. त्या घुबडाने आपले पंख फडकवले, डोके झटकले आणि सुरक्षित ठिकाणाकडे तो उडत गेला. जेव्हा आम्ही या सगळ्याचे कारण विचारले तेव्हा प्रेम म्हणाला की, पाम वृक्षाच्या मुळांशी खोलवर (असलेले द्रव्य) शोषल्यामुळे तो गरीब बिचारा जीव नशेत होता. असा प्रकार या प्रजातीच्या पक्ष्यांच्या बाबतीत वर्षाच्या याच काळात चंद्रप्रकाशी रात्रींमध्ये घडतो. घुबड नशेत असल्यामुळेच प्रेम त्याला सहजपणे उचलू शकला; प्रेमने त्याला इतक्या जोरात आणि उंचावर भिरकावल्यामुळेच ते त्याच्या धुंदीतून बाहेर आले व स्वतःला मनुष्यांपासून वाचवू शकले आणि आम्हालाही घरी जाऊन झोपण्याचा मार्ग त्याने मोकळा केला. 

बंगळूरुमधील इतर बहुसंख्य व्यावसायिकांप्रमाणेच 'कोशीज् परेड कॅफे'वरही या कोरोना साथीचा गंभीर व नुकसानकारक परिणाम झाला. साधारण एप्रिलपासून हे रेस्टॉरंट बंदच होते, मात्र मागच्या आठवड्यात ते पुन्हा उघडले. कडक सुरक्षा अटींसह ते आता सुरु आहे. निदान ते पुन्हा उघडले आहे ही बाब दिलासादायक आहे आणि उपकारकही. वय जसजसे वाढते, तसतसे स्वतःसाठीच्या आशा व आकांक्षा कमी होत जातात. माझे एक मन मला सांगते की, कदाचित माझ्या आवडत्या कॅफेच्या आधी मीच मृत्यु पावेन. संगीत, क्रिकेट आणि पुस्तकांशिवायदेखील मी कदाचित (कसाबसा) जिवंत राहू शकेन, पण 'परेडस्'शिवाय जगण्याचा विचारही करवत नाही.

(अनुवाद: सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा बेंगलोर बंगळुरू कॅफे हॉटेल कोशीज Ramchandra Guha Bangalore Cafe Parade Koshys बंगळूरु Load More Tags

Comments:

anjani Kher

Nice to get to read something in lighter vein and meaningful at the same time.

Add Comment