क्रिकेटच्या मैदानावरील राजकीय ‘नाम-महात्म्य’

मोदी हयात व सत्तेत असताना त्यांच्या नावाने स्टेडियम अस्तित्वात आलं आहे, ही बाब क्रिकेटची पत खालावणारी आणि आपल्या देशासाठी शरमेची ठरणारी आहे!

नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक गोपनीयता बाळगणारे पंतप्रधान आहेत. त्यांचा भूतकाळ व वर्तमानकाळ, त्यांचं वैयक्तिक जीवन व राजकीय जीवन या संदर्भातील अनेक बाजूंची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. परंतु, विश्वसनीय माहिती उपलब्ध नसते, तेव्हा बुद्धीच्या बळावर बांधलेली अनुमानंही रास्त ठरू शकतात. अहमदाबादेतील मैदानावरील अदानी व अंबानी यांची नावं खोडण्याची कल्पना संबंधित उद्योगपतींऐवजी पंतप्रधान कार्यालयातूनच पुढे आली असण्याची मोठी शक्यता आहे. साट्यालोट्याच्या भांडवलशाहीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर केले जात असलेले आरोप आता नरेंद्र मोदींपर्यंत जाऊन पोचले आहेत. हे आरोप टिकून राहिले, आणि त्यांना अधिक विश्वासार्हता लाभली, तर त्याची राजकीय किंमत मोजावी लागू शकते, हे मोदींना माहीत आहे.

क्रिकेटमध्ये गोलंदाज ज्या दोन बाजूंनी (एन्ड्स) गोलंदाजी करतात त्यांना सर्वसाधारणतः काही नावं दिलेली असतात. लॉर्ड्स मैदानावर एका बाजूचं नाव ‘पॅव्हेलियन एन्ड’ आहे, तर दुसऱ्या बाजूचं नाव ‘नर्सरी एन्ड’ असं आहे. लंडनमधील ओव्हल या दुसऱ्या एका महान मैदानातही सभासदांच्या पॅव्हेलियनचं नाव एका बाजूला दिलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला तिथून अगदी जवळ असणाऱ्या व्हॉक्सहॉल या भूमिगत स्थानकाचं नाव दिलेलं आहे. मेलबोर्न क्रिकेट ग्राउन्डवर ‘मेम्बर्स एन्ड’ आणि ‘ग्रेट सदर्न स्टँड एन्ड’ अशा दोन बाजू दिसतात. कोलकात्यातील ईडन गार्डन्स या मैदानावर ‘पॅव्हेलियन एन्ड’ आणि ‘हाय कोर्ट एन्ड’ आहेत.

ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावरील दोन बाजूंना देण्यात आलेली नावं बहुधा सर्वांत सुंदर ठरावीत- ब्रायन स्टॅदम व जिमी अँडरसन या दोन महान वेगवान गोलंदाजांसाठी हे घरचं मैदान होतं, त्यामुळे त्यांचीच नावं तिथल्या अशा दोन बाजूंना देण्यात आली आहेत. वानखेडे स्टेडियमवरील दोन बाजूंना दिलेली नावं कमी आकर्षक असली तरी आकलनसुलभ आहेत, आणि या खेळाला प्रायोजकांची गरज असते ही वस्तुस्थिती लक्षात घेता तिथली नावं बहुधा स्वीकारार्हसुद्धा ठरतात- तर वानखेडे स्टेडियमवरच्या दोन बाजूंची नावं ‘गरवारे एन्ड’ आणि ‘टाटा एन्ड’ अशी आहेत.

गोलंदाज ज्या दोन बाजूंनी गोलंदाजी करतात त्या बाजूंना नावं देण्यातून किमान तीन उद्देश साध्य होतात. एक, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करून आपापल्या तिकिटांनुसार स्वतःची जागा शोधण्यासाठी ही खूण उपयोगी पडते. दोन, मैदानावर उपस्थित नसलेल्या चाहत्यांच्या दृष्टीने ही खूण निवेदन अधिक रंगतदार करणारी ठरते. विशेषतः थेट प्रक्षेपण करणारा टीव्ही घरोघरी येण्याआधीच्या काळात, ओव्हलवर होत असलेल्या एखाद्या कसोटी सामन्यात ‘व्हॉक्सहॉल एन्डवरून धावत येणाऱ्या’ गोलंदाजाबद्दल रेडिओवरून ऐकणं विस्मयकारक असायचं. तीन, खेळाडूंना- विशेषतः संघाच्या कप्तानांना स्थानिक भूगोलाच्या व सूक्ष्म हवामानाच्या माहितीवरून कोणती बाजू कोणत्या प्रकारच्या गोलंदाजाला अनुकूल ठरेल आणि सामन्यातील कोणत्या टप्प्यावर याचा वापर करता येईल, हे ठरवण्यासाठी सदर खूण मदतीची ठरते.

क्रिकेटच्या मैदानावरील दोन बाजूंना असणारी नावं कुठे कोरून ठेवलेली असतात असं नाही. ती बदलण्याची शक्यता असते, आणि काही वेळा ती बदलली जातातही. चेन्नईपासून दोन हजार मैल उत्तरेला असणाऱ्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो, पण रेडिओवरची निवेदनं आणि छापील माध्यमांमधील वार्तांकनं यांमुळे चेन्नईतील चेपॉक स्टेडियममधील एक बाजू ‘वालजाह रोड एन्ड’ म्हणून ओळखली जात होती, हे माझ्यापर्यंत पोचलं होतं. हे नाव भुरळ घालणारं आणि गूढ वाटणारं होतं. मी पस्तीस वर्षांचा असताना चेन्नईत वालजाह रोडवर जाण्यासाठी रिक्षात बसलो, तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उठले होते, याची मला आजही आठवण आहे.

काही वर्षांपूर्वी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने ‘वालजाह रोड एन्ड’चं नाव बदलून व्ही. पट्टाभिरामन या एका माजी क्रिकेट प्रशासकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन नाव द्यायचं ठरवलं. परंतु, लोकसंवादामध्ये आणि लोकजाणिवेमध्ये जुन्या नावाचा ठसा कायम असल्यामुळे अजूनही ते वापरलं जातं. 

गुजरातमध्ये 2021 ला नरेंद्र मोदी स्टेडियम लोकांसाठी खुलं झालं आणि त्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तिथे पहिला कसोटी सामना झाला, तेव्हा तिथल्या दोन बाजूंना अदानी व अंबानी यांची नावं देण्यात आल्याचं दिसलं. हे पाहिल्यावर मला एकाच वेळी हसायला आलं, संताप आला आणि उदासीनताही आली. क्रिकेटच्या मैदानावरील बाजूंना स्वतःचं नाव असावं यासाठी उद्योगपतींनी देणग्या दिल्याची उदाहरणं आधीही झालेली आहेत- वानखेडे स्टेडियमवरील ‘टाटा एन्ड’ व ‘गरवारे एन्ड’ ही त्याची उदाहरणं- पण आधीच्या सरदार पटेल स्टेडियमला मोदींचं नाव देणाऱ्यांमध्ये आणि त्यात भर म्हणून मैदानावरील दोन बाजूंना अदानी व अंबानी यांची नावं देणाऱ्यांमध्ये सजगतेचा ठळक अभाव दिसून येतो. अलीकडच्या काळात अदानी व अंबानी या दोन उद्योजकांनी देदिप्यमान प्रगती साधली असली तरी त्यांच्यावर बरीच टीकाही झालेली आहे. भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी तर देशात रूढ झालेल्या ‘दोन ‘एं’च्या (अंबानी व अदानी यांच्या नावांमधील आद्याक्षरं) कलंकित भांडवलशाही प्रारूपा’चाही उल्लेख केला होता. पूर्वी कुटुंबनियोजनासाठी ‘हम दो, हमारे दो’ ही घोषणा वापरली जात होती, त्याचा हुशारीने वापर करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी विद्यमान सरकारवर टीका केली होती- यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचा उजवा हात असणारे गृहमंत्री अमित शाह अदानी व अंबानी या दोन उद्योजकांना विशेष मदत करत असल्याचा गर्भितार्थ सूचित होत होता.  

वानखेडे स्टेडियम 

तर, अहमदाबादेतील त्या नवीन मैदानावर झालेला पहिला सामना मी टीव्हीवर पाहिला, तेव्हा दोन्ही बाजूंना स्कोअरबोर्डच्या वरच्या बाजूला प्रायोजकांची नावं ठळकपणे दिसतील अशी कोरल्याचं दिसलं. त्याच्या वरील बाजूला, आणि अधिक ठळक अक्षरांमध्ये ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ हे शब्द इंग्रजीमध्ये कोरलेले होते. अशा रितीने या दोन उद्योगपतींची नावं जाहीररित्या पंतप्रधानांच्या नावाशी जोडण्यात आली. त्यांच्यातील प्रतीकात्मक आणि बहुधा भरीव जवळीकीचं हे एक स्पष्ट प्रदर्शन होतं.

मी कसोटी क्रिकेटच्या बाजूने पक्षपाती आहे आणि मी इंडियन प्रीमियर लीगचे सामने पाहत नाही. त्यामुळे 2022 च्या आयपीएल स्पर्धेवेळी नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्स या संघाचं घरचं मैदान म्हणून वापरण्यात आलं आणि अंतिम सामनाही तिथे खेळवण्यात आला, तेव्हा तिथल्या दोन बाजूंना काय म्हटलं जात होतं, ते मला माहीत नाही. मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना अहमदाबादमधील या मैदानावर खेळवण्यात आला तेव्हा, ‘अदानी एन्ड’ शाबूत असल्याचं मला दिसलं, पण ‘अंबानी एन्ड’चं नाव बदलण्यात आलं होतं- त्या बाजूचं नामकरण आता ‘जिओ एन्ड’ असं करण्यात आलं होतं. नाव बदलण्याचा हा कुशल निर्णय होता- त्यात एक व्यावसायिक उत्पादन ठळकपणे पुढे आणण्यात आलं, पण त्यातून लाभ मिळणारं कुटुंब मात्र अंतर राखून होतं. अदानींनी मात्र या मैदानाशी असलेला स्वतःचा संबंध तसाच जाहीररित्या नोंदवण्यात समाधान मानलं- ही निष्ठा दाखवणारी खूण होती की गर्विष्ठपणाची खूण होती, हा वेगळा मुद्दा.


Read Also : Cricket, Caste, and Caste Blindness - Rushikesh Gawade


मला आयपीएलविषयी तिटकारा वाटत असला तरी, देशांच्या संघांमध्ये खेळले जाणारे मर्यादित षटकांचे सामने मी कधीतरी बघतो. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना मला पाहायला मिळाला नाही, पण 14 ऑक्टोबरला भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामना मला काही वेळ बघता आला. अहमदाबादेतील या मैदानावरच्या दोन बाजूंना आता कोणतीच नावं नसल्याचं मला आढळलं. साइटस्क्रिनशेजारी असणाऱ्या काँक्रिटच्या स्तंभांवर आधी ‘अदानी एन्ड’ आणि ‘अंबानी/जिओ एन्ड’ अशी नावं दिसत होती, ते स्तंभ आता पूर्ण पांढरे होते आणि त्यावर कोणतीही अक्षरं नव्हती. त्याच्या वरील बाजूला असणारी ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ ही अक्षरं मात्र तशीच झळकत होती.

क्रिकेटप्रेमी आणि त्याचवेळी सत्यान्वेषी असणाऱ्या व्यक्तीला सदर मैदानावरील दोन बाजूंची नावं अचानक पुसली गेल्याचं पाहून अनेक प्रश्न पडतील. सुरुवातीला या दोन बाजूंना स्वतःची नावं देण्यासाठी अदानी व अंबानी यांनी किती रुपये दिले? नंतर त्यांची नावं काढण्यात आली तेव्हा त्यांना त्यासाठी भरपाई देण्यात आली का? याबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत तरी करण्यात आली होती का? क्रिकेट, उद्योगक्षेत्र व राजकारण यांच्यातील संबंधांचं धडधडीत प्रदर्शन अहमदाबादेतील मैदानावर मांडलेलं होतं, ते पूर्णतः पुसून टाकण्याला कोण जबाबदार आहे?

नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक गोपनीयता बाळगणारे पंतप्रधान आहेत. त्यांचा भूतकाळ व वर्तमानकाळ, त्यांचं वैयक्तिक जीवन व राजकीय जीवन या संदर्भातील अनेक बाजूंची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. (त्यांच्या कार्यकाळात माहिती अधिकार कायदा पूर्णतः पोकळ करून टाकण्यात आला, हे त्यांच्या व त्यांच्या राजवटीच्या स्वभावाशी तंतोतंत जुळणारं आहे). परंतु, विश्वसनीय माहिती उपलब्ध नसते, तेव्हा बुद्धीच्या बळावर बांधलेली अनुमानंही रास्त ठरू शकतात. अहमदाबादेतील मैदानावरील अदानी व अंबानी यांची नावं खोडण्याची कल्पना संबंधित उद्योगपतींऐवजी पंतप्रधान कार्यालयातूनच पुढे आली असण्याची मोठी शक्यता आहे. साट्यालोट्याच्या भांडवलशाहीसंदर्भात मोठ्या प्रमाणावर केले जात असलेले आरोप आता नरेंद्र मोदींपर्यंत जाऊन पोचले आहेत. हे आरोप टिकून राहिले, आणि त्यांना अधिक विश्वासार्हता लाभली, तर त्याची राजकीय किंमत मोजावी लागू शकते, हे मोदींना माहीत आहे.

त्यामुळे पंतप्रधान आणि दोन उद्योगपती यांच्यातील संबंधांचं जाहीर प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय झाला असावा. परंतु, पंतप्रधानांच्या भोवती उभी राहिलेली व्यक्तिपूजा मात्र कायम राहायलाच हवी, आणि हे व्यक्तिस्तोम पुढे नेण्यासाठी सर्व संभाव्य साधनांचा वापर सुरू ठेवायलाच हवा- मग त्यात क्रिकेटसारखा प्रचंड लोकप्रिय खेळ सोडून कसं चालेल! त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना, आणि विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना- असे दोन अत्यंत महत्त्वाचे सामने नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जात आहेत.

लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफोर्ड, ईडन गार्डन्स व चेपॉक यांच्याप्रमाणे अहमदाबादेतील या महत्त्वाच्या क्रिकेट मैदानावरील दोन बाजूंना दोन विशिष्ट नावं होती. आता मात्र त्या बाजू निनावी आहेत. हीच परिस्थिती पुढेही कायम राहील का? गुजरातमधील व भारतातील क्रिकेटची सूत्रं हाती असणाऱ्यांनी आधी स्वतःची प्रतिष्ठा दोन उद्योगपतींशी जोडलेली असल्याचं जाहीरपणे व आनंदाने दाखवलं होतं, मग आता ते त्यासाठी पर्यायी नावं शोधतील का? अहमदाबादेतील मैदानाच्या दोन बाजूंना विनू मंकड व के. एस. रणजीत सिंहजी या गुजरातमधून आलेल्या दोन बहुधा सर्वांत महान क्रिकेटपटूंची नावं दिली जावीत, असं माझ्या एका क्रिकेटप्रेमी मित्राला वाटतं. दुसरा एक (राजकीयदृष्ट्या अधिक सजग असणारा) मित्र म्हणाला की, मोदी सरकार मतं खेचून घेण्याच्या उद्देशाने या मैदानावरील बाजूंना कदाचित आंबेडकर व सावरकर यांची नावं देईल.

वरीलपैकी पहिली सूचना उदात्त हेतूने केलेली आहे, तर दुसरी सूचना उपहासगर्भ आहे. परंतु, या सूचना मुख्य मुद्द्याला हात घालणाऱ्या नाहीत. मुळात या मैदानाला अशा रितीने देशाच्या विद्यमान पंतप्रधानांचं नाव देणं, हेच कोणत्याही लोकशाहीवादी माणसाच्या मनात तिटकारा उत्पन्न करणारं ठरायला हवं. जाहीररित्या भाटगिरी करण्याचे हे प्रकार पूर्वी केवळ एकाधिकारशाही राजवटींपुरते मर्यादित होते. उदाहरणार्थ, हिटलरच्या काळातील जर्मनी, स्टॅलिनच्या काळातील रशिया व किम योंग दुसरे यांच्या कार्यकाळातील उत्तर कोरिया, इथे क्रीडास्थळांना सत्ताधारी हुकूमशहाची नावं दिली जात होती. लोकशाही असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही देशात असं काही अजिबातच शक्य नव्हतं. आपल्याकडे मात्र नरेंद्र मोदी हयात असताना व सत्तेत असतानाच त्यांच्या नावाने नरेंद्र मोदी स्टेडियम अस्तित्वात आलं आहे, ही बाब क्रिकेट खेळाची पत खालावणारी आणि आपल्या देशासाठी शरमेची ठरणारी आहे.

(अनुवाद - प्रभाकर पानवलकर)

- रामचंद्र गुहा, बंगळूरू
ramachandraguha@yahoo.in
(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: politics narendra modi stadium ramchandra guha sports worldcup 2023 vallabhbhai patel Load More Tags

Comments:

हिरा जनार्दन

अत्यंत चीड आणणार्‍या vishyavaril अत्यन्त धीरगंभीर व उद्बोधक विवेचन.

Sanjay Nana Bagal

एकटा माणूस लाटेला बदलू शकत नाही. यांची जाणीव असताना धाडसाने विचार मांडणे. काळाची गरज आहे.

आनंद गोसावी

हुकुमशाहीची ही नक्कीच लक्षणे आहेत आणि ह्याला उत्तर भक्त गण देतील की वानखेडे स्टेडियम चं काय? पंडित नेहरूंनी भारत रत्न स्वतःच्या कारकीर्दीत स्वत:ला घेतला, त्याचं काय? असो. तर म्हणून वाटतं, ह्या आपल्या देशात लोकांची मानसिकता हुकूमशहा हवा, अशीच गुलामी वृत्तीची आहे की काय? आगरकर म्हणत असतं, आपण ब्रिटिश लोकांकडून समाज सुधारणा करून घेऊ...कारण आपली वृत्ती स्वातंत्र्यात लोकशाही मूल्ये संवर्धित करणारी नाहीयेय.

Add Comment