1971- आठवणींचा पेटारा

हा आकडा म्हणजे माझा व्यवसाय आणि छंद या दोहोंचा अनोखा संगम...

फोटो सौजन्य : The Hindu Photo Archive

भारताबाहेरचं मला सगळ्यात जास्त आवडणारं शहर म्हणजे लंडन आणि तिथली सर्वोत्तम गोष्ट म्हणजे ब्रिटिश लायब्ररी. तीस वर्षांहून अधिक काळ मी या लायब्ररीचा उपयोग करतो आहे. भारताच्या वासाहतिक इतिहासाबद्दलचे संदर्भ असोत की इतर तपशील... या लायब्ररीचा मला नेहमीच खूप उपयोग झाला आहे. मी तिथं किमान तीनेक वर्षं तरी काम केलं आहे. माझा दिनक्रम ठरलेला होता. आपलं सभासद कार्ड दाखवण्याआधी तिथल्य़ा तळमजल्यावरच्या लॉकर्समध्ये स्वतःचं सामान ठेवून द्याय़चं आणि चौथ्या मजल्यावर असलेल्या वाचनकक्षात जायचं. तिथे मग तत्कालीन भारताच्या वासाहतिक राजवटीबाबत माहिती देणारे, भारतीय दप्तरात नोंद असलेले संदर्भ - जे 'इंडिया ऑफिस' म्हणून ओळखले जायचे ते - शोधायचे. 

लायब्ररीतले लॉकर्स उघडबंद करण्याकरता एक चार-अंकी पासवर्ड असायचा. आमच्यापैकी अनेक जण मग आपल्या वाढदिवसाची तारीख, जन्मवर्ष, लग्नाचं वर्ष किंवा आईवडलांचं जन्मवर्ष असा काहीतरी आकडा तो पासवर्ड म्हणून ठेवायचे. इथल्या तीन वर्षांच्या काळात माझा पासवर्ड होता 1971.

1971मध्ये मी तेरा वर्षांचा होतो आणि त्यानंतर तेरा वर्षांनी माझं लग्न झालं. पण पासवर्ड ठेवण्यामागे हे कारण नव्हतंच मुळी. तर 1971 हे क्रिकेटच्या दृष्टीनं महत्त्वाचं वर्ष होतं. क्रिकेटमध्येही भारतावर ‘राज्य’ करणाऱ्या वसाहतवाद्यांना खणखणीत उत्तर देण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं वर्ष. इतिहासाचा अभ्यासक म्हणून या साम्राज्याच्या तळाशी दडलेलं वास्तव समजून घेणाऱ्या आणि क्रिकेटचा चाहता असणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी हा आकडा म्हणजे व्यवसाय आणि छंद या दोहोंचा अनोखा संगम होता.          

भारताच्या इंग्लडमधल्या कसोटी मालिकेच्या ऐतिहासिक विजयाला नुकतीच 15 वर्षं पूर्ण झाली. त्याबद्दल मी बोलणार आहेच, पण त्याआधी एक तितकीच खास आठवण. 1971मध्येही भारतानं पहिल्यांदा वेस्ट इंडीजला त्यांच्याच देशात जाऊन धूळ चारली होती. ती कसोटी मालिका जिंकणं हाही एक लक्षणीय विजय होता. त्याआधी 1962मध्ये आपण कॅरेबिअन दौरा केला होता आणि त्यात पाचही कसोटी सामन्यांत भारताचा पराभव झाला होता. त्यानंतर नऊ वर्षांनी भारतानं त्या पराभवाचं उट्टं काढलं. दरम्यान तेव्हाचे काही खेळाडू निवृत्त झाले होते तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते... मात्र गॅरी सोबर्स तोवर निवृत्त झालेला नव्हता आणि कर्णधार म्हणून त्याच्या ताफ्यात कन्हाय, लॉयड आणि गिब्ज यांच्यासारखे खेळाडू होते. विंडीजचा पराभव करणं सोपं नव्हतं तरी भारतानं एक सामना जिंकला आणि उर्वरित चार सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामधली ही मालिका 1971च्या फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होती. तेव्हा मी देहरादूनच्या बोर्डिंग शाळेत होतो. या सामन्यांबद्दलचा सगळा तपशील मी टाइम्स ऑफ इंडियाच्या क्रीडावृत्तांच्या पानांवर वाचत असे. त्या काळात के.एन. प्रभू सामन्यांचं दररोजचं वार्तांकन लिहीत असत. खेळातले इत्थंभूत बारकावे आणि काव्यात्मक शैली यांमुळे त्यांचे वृत्तांत अगदी वाचनीय असायचे. माझ्या डॉर्मिटरीत एक वृत्तपत्र येत असे. शंभर किंवा त्याहून अधिक लोकांसाठी एक पेपर. ती टाइम्स ऑफ इंडियाची डाक आवृत्ती होती. मधल्या सुट्टीनंतरचे अभ्यासाचे सगळे तास संपल्यावर आणि खेळाचे तास सुरू होण्याआधी मिळालेल्या मोकळ्या वेळात माझे मित्र गप्पा मारत, खोड्या काढत, मस्ती करत असत. मी या वेळात बाकावर बसून वर्तमानपत्र, खासकरून त्यातलं प्रभूंचं क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन वाचत असे. विकेट्स कशा पडल्या, डाव कसा आकाराला आला असे सगळे तपशील त्यात अतिशय सुंदरपणे गुंफलेले असत. 

विंडीजमधले सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसातला सुरू होत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या दिल्ली आवृत्तीच्या वर्तमानपत्रांमध्ये अगोदरच्या दिवशी – दुपारी जेवणापर्यंतच्या (तिथल्या वेळेनुसार) सामन्याचे वार्तांकन असे पण टपालाने पाठवण्याची पेपरांची आवृत्ती लवकर निघत असल्याने त्यात हेही तपशील समाविष्ट केलेले नसत... त्यामुळे दररोज सामन्यात काय काय झालं याचे तपशील मला त्या दिवसाच्या खेळानंतर जवळपास दोन दिवसांनी वाचायला मिळत. के.एन. प्रभूंच्या विस्तृत आणि वाचनीय लिखाणामुळे हा विलंब माझी तगमग आणखी वाढवत असे.     

आत्ताच्या पिढीचं मात्र असं नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट ‘लाइव्ह’ बघायला मिळते. मी वेगळ्या पिढीचा आहे, वेगळ्या काळात वाढलो. त्याची अशी एक खास मजा होती. त्याबाबत आता धन्यता वाटते. गावसकर, सरदेसाई यांची बॅटिंग; बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन यांची बॉलिंग, आणि या सगळ्यांनीच एक संघ म्हणून वाडेकरच्या नेतृत्वात पन्नास वर्षांपूर्वी विंडीजमध्ये केलेली कामगिरी मला स्क्रीनवर पाहता आली असती तर कदाचित तिच्या आठवणी इतक्या खोलवर मनात रुजल्या नसत्या. 

त्या वर्षीच्या उन्हाळ्यात वाडेकरचा संघ विंडीजमध्ये जिंकला असला तरी इंग्लीश समरमध्ये झालेल्या दौऱ्यात तो डळमळीत झालेला होता. चाळीस वर्षं झगडूनही आपण इंग्लंडमध्ये अद्याप कसोटी मालिका जिंकू शकलेलो नाही. 1959मध्ये आणि 1967मध्ये झालेल्या दोन्ही कसोटी मालिका आपण गमावल्या. गॅरी सोबर्स आणि त्याच्या संघाची कामगिरी उतरणीला लागली तेव्हाच रे इंलिगवर्थच्या नेतृत्वात खेळणारा इंग्लंडचा संघ जगातला सर्वोत्तम संघ म्हणून मान्यता पावत होता. दबदबा असलेल्या ऑस्ट्रेलिअन संघाला त्याआधीच्या वर्षी हिवाळ्यात याच इंग्लंडच्या संघानं आरामात नमवलं होतं.   

तर तेव्हा (1971मध्ये) उन्हाळी सुट्टीत मी  घरी गेलो होतो. इंग्लडबरोबरची कसोटी मालिका सुरू झालेली होती. घरी रेडिओ होता. मी पोहोचलो तेव्हा इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिका संपत आली होती. तेव्हाचं काही वार्तांकन मी रेडिओवर ऐकलं. त्यानंतर सुरू झालेल्या लॉर्ड्सच्या मैदानावरच्या भारत आणि इंग्लड यांच्यामधल्या पहिल्या कसोटी सामन्याचं अगदी बॉल टू बॉल प्रक्षेपण मी रेडिओवर ऐकलं. तो सामना खूप अटीतटीचा होता. चौथ्या डावात 183 धावांचं आव्हान गाठायचं होतं आणि भारताची परिस्थिती 100 धावांवर तीन बाद अशी होती. पण लगेचच एकापाठोपाठ विकेट्स पडायला लागल्या. डाव संपायला तासभर अवकाश होता तेवढ्यात आभाळ आलं आणि खेळ थांबवावा लागला. या स्थितीत भारताला जिंकण्यासाठी चाळीस धावांची गरज होती आणि हातात दोन विकेट्स होत्या. पण आभाळ आल्यानं खेळ थांबवला आणि सामना अनिर्णित राहिला.     

मॅंचेस्टरमध्ये खेळवलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचं प्रक्षेपणही मी रेडिओवर बऱ्यापैकी ऐकलं. या सामन्यातही भारतानं समजून-उमजून बरा खेळ केला होता. पण इथेही पाऊस मदतीला धावून आला. ओवलवर सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी मात्र शाळा सुरू झाली होती आणि मी होस्टेलला परत गेलो होतो. तिथे रेडिओ फक्त मोठ्या वर्गातल्या मुलांनाच मिळायचा. ते रोज संध्याकाळी रेडिओ ऐकायचे. रात्री दहा वाजता सगळे दिवे बंद केले जाईपर्यंत त्यांना रेडिओ ऐकता यायचा. पण आम्हा लहान वर्गांतल्या मुलांना मात्र आमच्या कक्षात बसून अभ्यास करायला लागायचा. पण आमचा हाऊस-कॅप्टन विवेक बम्मी चांगला होता. तो आम्हाला कधीकधी बुलेटिन्समधल्या महत्त्वाच्या काही घडामोडी सांगायचा. त्या दिवशीही आम्ही नेहमीच्या शिस्तीप्रमाणे झोपायला जात होतो तेवढ्यात तो आला आणि त्यानं बातमी दिली – इंग्लड सर्व बाद – 101. चंद्रशेखरनं 38 रन्स देऊन सहा विकेट्स घेतल्या.  

त्या दिवशी आमच्या कॅप्टनकडून ती बातमी ऐकलेला तो प्रसंग तब्बल पन्नास वर्षांनंतरही जसाच्या तसा आठवतो आहे. क्रिकेटच्या काही अविस्मरणीय आठवणींपैकी एक असलेली ही आठवण कधीही साजरी करावी अशीच आहे. त्या दिवसानंतर मी अगणित वेळा चंद्रानं इंग्लीश खेळाडूंच्या काढलेल्या विकेट्स, एडरिकला टाकलेले यॉर्कर, इंलिग्वर्थची विकेट घेण्यासाठी अतिशय कौशल्यानं टाकलेला बॉल, स्नोची विकेट, जॉन प्राईसला एलबीडब्लू केलेला बॉल, फ्लेचरसाठी सोलकरनं रचलेला सापळा आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे स्लीपमध्ये वेंकटनं लुकर्स्टचा घेतलेला अप्रतिम झेल हे सगळं अजूनही आठवणीत आहे... काळाच्या स्मृतिचित्रांमध्ये कैद झाल्यामुळे. मी या विकेट्सचा आनंद घेतला. पण बी.एस. चंद्रशेखरनं एकगठ्ठा घेतलेल्या विकेट्स पाहणं ही या आनंदाची परमावधी होती.

दरम्यानच्या त्या बारा वर्षांच्या काळात असे खेळाडू बघितले नव्हते. त्यापुढेही एक तपात असे खेळाडू पाहायला मिळाले नाहीत. असं इयान पिबल्सनंही लिहून ठेवलं आहे. 1971मध्ये एप्रिलअखेर मी तेरा वर्षांचा झालो. तोवर वेस्ट इंडीजमधली मालिका संपली होती. आताही आपण दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लडवर विजय मिळवला तेव्हाही मी मनानं पुन्हा भूतकाळात गेलो आणि या दोन कसोटी मालिकांबद्दल बोलताना पुन्हा त्या बारा वर्षांच्या मुलाच्या निरागसतेनंच याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. 

आता हा लेख लिहीत असताना भारत-इंग्लडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. जरी भारतानं ही मालिका जिंकून पतौडी चषकही आपल्या नावावर केला तरी 2021मधल्या या विजयाबद्दल मला बालपणी वाटायची तितकी उत्सुकता वाटेल का... हा प्रश्नच आहे. मला वाटतं, याला आयपीएलसाठीचा हव्यास जबाबदार आहे. याशिवाय आपण अलीकडे अनेक कसोटी सामने जिंकले असल्यामुळे त्यातला स्मरणात राहणारा सामना विरळाच. दुसऱ्या बाजूला माझ्या पिढीच्या क्रिकेटप्रेमींसाठी 1971 हे वर्ष नेहमीच खास असेल कारण याच वर्षी आपण वेस्ट इंडीजमध्ये आणि इंग्लडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकल्या होत्या.  

हा करोनाकाळ सरण्याची मी फार आतुरतेनं वाट पाहतोय. तसं झालं तरच मला पुन्हा एकदा ब्रिटिश लायब्ररीत जाता येईल. त्याच दिमाखात तळमजल्यावरच्या लॉकर्सकरता माझा पासवर्ड टाकता येईल. या कृतीला दोन पैलू आहेत. खेळाबाबत सकारात्मकता आणि त्याच वेळी वासाहतिक राजवटीचा वैचारिक विरोध हे ते दोन पैलू. एक कृती वासाहतिक राजवटीची टीका करणारी तर दुसरी 1971मध्ये आपल्या क्रिकेटर्सनी चांगला खेळ करत इंग्लडवर विजय मिळवून अपयशाला मूठमाती दिल्याचा आनंद साजरी करणारी.  

(अनुवाद : प्रियांका तुपे)

- रामचंद्र गुहा, बेंगळूरू

(इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात 'India after Gandhi', 'Gandhi before India', 'Gandhi: The Years That Changed the World' ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)

Tags: अनुवाद रामचंद्र गुहा क्रिकेट इंग्लड ब्रिटीश लायब्ररी वेस्ट इंडीज Ramchandra Guha Cricket England West Indies British Library Colonialism 1971 Sports Priyanka Tupe प्रियांका तुपे Load More Tags

Add Comment