बाबा आणि मी 

'बहुआयामी' या साधना प्रकाशनाच्या नव्या पुस्तकातील एक प्रकरण 

संकेश्वरच्या घरी - (डावीकडून) शोभना शिपूरकर, दिनकर साक्रीकर, डॉ. अनिल अवचट, डॉ. बाबा आढाव, रमेश. मागे चैतन्य आणि समीर 

रमेश शिपूरकर यांचे पंचवीस वर्षांपूर्वी निधन झाले, तेव्हा ते वयाच्या पन्नाशीत होते. त्यांच्यातील माणूस व कार्यकर्ता किती विलोभनीय होता, याची चर्चा कोल्हापूर बेळगाव परिसरातील जुने जाणते लोक आजही करीत असतात. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या व्यक्तित्वाची व कार्य कर्तृत्वाची ओळख करून देणारे 'बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता' हे पुस्तक 28 नोव्हेंबर रोजी, निपाणी येथे प्रकाशित होत आहे. शोभना शिपूरकर यांनी त्याचे लेखन व संपादन केले असून, साधना प्रकाशनाकडून ते आले आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करीत आहोत.

मुलगा सोळा वर्षांचा झाला की मित्र बनतो, असं बाबा नेहमी म्हणायचे. मी 16 ते 25 या वयात बाबाशी मैत्री अनुभवली आहे. बाबाला असं वाटायचं, की मी आणि माझा भाऊ चैतन्य दोघांनी त्याला अरेतुरे संबोधावं; पण त्याने हे आम्हाला सांगितलं तेव्हा बराच उशीर झाला होता. आजूबाजूला असलेल्या पारंपरिक आणि एकसुरी वातावरणात वडिलांना असं संबोधणं ही आम्हालाच संकोच वाटायला लावणारी कृती होती. बाबा असेपर्यंत ते जमलं नाही. बाबा गेल्यानंतर मात्र मी त्याची इच्छा पूर्ण करतोय! 

मी पंचवीस वर्षांचा असताना बाबा गेला, त्याला आता पंचवीस वर्षं झाली. बाबाची पोकळी अजून भरून निघालेली नाहीय. निघणार नाहीय याची आता खात्री आहे. छोट्या छोट्या अनेक घटनांमधून, प्रसंगांमधून त्याने त्याचं असणं आमच्यात अजून जागं ठेवलंय. 

काही आठवणी आधी सांगतो. 

आजूबाजूला अनेक वाईट आणि विचित्र घटना घडायच्या त्या आमच्यापर्यंत पोचवण्याची बाबाची खास पद्धत होती. ज्या माणसाने ते वाईट काम केलं त्याचं नाव बाबा कधीच सांगायचा नाही. ‘एक माणूस होता बरं का-’ अशी सुरूवात करून जी चुकीची घडली ती घटना मात्र तो पूर्ण सांगायचा. व्यक्ती वाईट नसते, प्रवृत्ती असते, हे तो असं सहजपणे पोचवायचा. आम्हाला नंतर कळायचं तो माणूस कोण होता ते, पण बाबा शेवटपर्यंत त्याचं नाव सांगायचा नाही. बाबाची कशावर इतकी श्रद्धा होती? त्या माणसातल्या उर्वरित चांगुलपणावर? 

घरातल्या महत्त्वाच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आमचा सहभाग असायचा. मी (वय वर्षे 13-14) आणि चैतन्य (वय वर्षे 10-11) या निर्णयांमधे सहभागी व्हायचो, की शांतिनिकेतनमध्ये बाबाने शिक्षकाची नोकरी पत्करावी की नाही, संकेश्वर सोडून गुलबर्ग्याला स्थायिक व्हावं की नाही, पुण्याला स्थायिक होता येईल त्याचं काय करायचं, घरची शेती विकावी की तशीच ठेवावी इत्यादी. आपल्याला मोठे लोक जमेत धरतात त्याअर्थी आपण बरे माणूस आहोत असं वाटायला लावणारी ही प्रक्रिया होती. त्याचा फायदा पुढे कायमच होत आला. आईने आणि बाबाने घरी जे शांत, खेळीमेळीचं, उत्साही वातावरण राखलं होतं त्याने मनाला एक प्रकारची स्थिरता येत गेली आणि अनेक गोष्टी आम्हाला आमच्या गतीने अनुभवता आल्या. ही भावनिक सुरक्षितता फार मोलाची आहे. 

बाबाने आयोजित केलेल्या एका कथाकथन स्पर्धेत मीही भाग घेतला होता. इतर स्पर्धकांच्या तुलनेत माझी कथा खरोखरच चांगली झाली होती. पण संयोजकांच्याच मुलाला पहिला नंबर मिळाला असता तर ते योग्य दिसलं नसतं. परीक्षकांनी मला पहिला नंबर न देता तिसरा दिला होता. त्या वेळीसुद्धा ती भूमिका मला पटली होती आणि तो निर्णय योग्य होता असंच माझ्या मनात चित्र उभं राहिलं होतं. घरी आल्यावर मात्र माझं छान कौतुक झालं होतं. 

सोनी, लाल्या आणि इतर बरीच मांजरं घरात नेहमी असायची. सोनीला कसलासा रोग लागला. अंगावरचे केस झडून जायला लागले. घरगुती उपाय करून झाले, पण आजार कमी होईना. मांजराला डॉक्टरकडे नेणं त्या काळी थट्टेचं होतं. पण बाबाने तिला व्हेटर्नरी डॉक्टरकडे नेलं. मीही बरोबर होतो. डॉक्टरने एक चिकट औषध दिलं. त्याचा घाण वास घरभर पसरायचा, तरी बाबा ते औषध तिला लावायचाच. एरवी नको असलेलं मांजर दूर नेऊन सोडायचं म्हणजे दुःखाला फक्त नजरेपासून दूर ढकलायचं, ही रुळलेली प्रथा होती. 

एकदा घटप्रभा गावी असलेल्या कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट या हॉस्पिटलला भेट द्यायला गेलो होतो. लोहियावादी मंडळींनी उभी केलेली संस्था म्हणून या संस्थेवर बाबाचं विशेष प्रेम होतं. तिथे बाबाने रक्तदान केलं. लगेच परतीच्या बसच्या गर्दीत शिरावं लागलं. तुफान गर्दी, चेंगराचेंगरीत बाबाच्या हाताची चिकटपट्टी निघाली आणि संपूर्ण प्रवासात रक्त वाहत राहिलं. आम्ही लहान होतो. बाबाने देशासाठी रक्त सांडलं वगैरे भावना बराच काळ मनात तरंगत होती. 

आमच्या घरी सतत अनेक प्रकारच्या लोकांची वर्दळ असायची. गप्पांसाठी, कामासाठी लोक येत-जात असायचे. मी साधारण सात-आठ वर्षांचा असेन. जातपात भानगड नीट माहीत नव्हती. सरकारी प्राथमिक शाळेतला माझ्या वर्गातला एक मुलगा आणि त्याचे वडील काही कामानिमित्त आमच्या घरी आले होते. घरी आल्यानंतर ते खुर्चीवर बसेचनात. चहा, खाणं करताना ते अतिशय अवघडलेल्या अवस्थेत होते. बाबाने त्यांना आग्रहाने वर बसवलं आणि अतिशय आपुलकीने त्यांच्या कामाबाबत चर्चा केली हे आठवतं. नंतर कळलं की ते डुक्कर पाळण्याच्या व्यवसायातले होते. नंतर बाबाने आम्हाला कोणतंही लेक्चर दिलं नाही, पण हे मित्र आणि आपण एकाच लेव्हलचे आहोत हा ठसा आपोआप उमटून गेला. आपल्या मित्रांमधे विविध जातींच्या आणि धर्मांच्या लोकांचा समावेश असायला पाहिजे याची तो नेहमी आठवण द्यायचा. बाबाचा समाजातल्या सगळ्या स्तरांमधे आंतरभारती वावर असायचा. मित्रही अनेक प्रकारचे होते. 

आम्ही मोठे झालो तरी आमची स्पर्शाची भाषा जिवंत होती. खूप दिवसांनी भेटल्यानंतर मिठी मारणं, डोक्यावर तबला वाजवणं, गुदगुल्या करून हसवणं, अंगावर पाणी ओतून चिडवणं-हसवणं हे सर्रास चालायचं. पोरकटपणाला सहज स्थान होतं. 

12 ते 13 च्या वयात आरेसेसच्या शाखेत मी काही काळ खेळायला जायचो. एके दिवशी ‘आता मोठा झालास, पुढचा निर्णय समजून-विचार करून घे’ असं म्हणून बाबाने तो निर्णय माझ्यावरच सोपवून दिला. 

वाढत्या वयात शरीरातले बदल आणि वादळी भावनांना समजून घ्यायला मदत व्हावी म्हणून आई-बाबांनी लीना मोहाडीकर आणि विठ्ठल प्रभूंची लैंगिकतेवरची पुस्तकं सहज हाताला येतील अशा ठिकाणी ठेवली होती. अर्थातच ‘ती वाच’ असं त्यांनी सांगण्याआधीच माझी वाचून झाली होती. आई-बाबा संध्याकाळी फिरायला जायचे त्या बहुमोल काळात मी हा बहुउद्देशी प्रकल्प संपवला होता! मानवी आयुष्याची व्यापकता आणि त्यातलं लैंगिकतेचं केंद्रस्थान हा महत्त्वाचा विषय असा सोप्या पद्धतीने माझ्यासमोर पोचला. 

बाबाचं मोठेपण हे होतं, की समाजाबरोबर आपली नाळ घट्ट ठेवताना त्याने आमची तडफड होऊ दिली नाही. कुटुंबाला वाऱ्यावर सोडून त्याने बाहेरची कामं केली नाहीत. उलट, बाबा आमटे यांच्यासारख्या तुफानाशी आमची अतिशय योग्य वेळी गाठ घालून दिली. वसंत पळशीकर यांचा ठाम लयीतला, खोलात जाऊन चिकित्सा करणारा आणि विषयाचे सगळे पापुद्रे उलगडत गाभ्याचा वेध घेणारा विचार जसा समोर आणला, तसाच बाबा आढावांचा रचनात्मक संघर्ष सहज समोर ठेवला. निपाणीचं शेतकरी आंदोलन, औरंगाबादचा राष्ट्रीय स्तरावरचा बालआनंद मेळावा, भारत जोडो यात्रा आणि अशा अनेक चळवळींच्या निमित्ताने भेटणारे यदुनाथ थत्ते, आचार्य केळकर, इंदुमती केळकर, शरद जोशी, शिवाजी कागणीकर, अनिल अवचट, राम आपटे, छाया दातार, ओल्गा टेलिस, मृणाल गोरे, पुष्पा भावे, गजानन खातू, श्रीपतराव शिंदे, सुभाष जोशी, नरेंद्र दाभोलकर, ग. प्र. प्रधान, भीमराव गस्ती, वेणूताई पळशीकर, दिवाकर हरिदास, गो. मा. पवार, न पाहिलेले हमीद दलवाई, माझे काका सुरेश शिपूरकर अशा माणसांच्या अवतीभवती वाढणारं बालपण आमच्यात एकाच वेळी आधार, धीर आणि त्याचबरोबर अस्वस्थता रुजवून गेलं. 

साधना, दिनांक, मनोहर, किर्लोस्कर, स्त्री, बायजा, ललित, मौज, नवभारत, आजचा सुधारक, समाज प्रबोधन पत्रिका, षट्‌कार, चंदेरी, जनता, प्रेरक ललकारी, सोबत, गगनभेदी, रविवारची जत्रा, मुलांसाठीचे किशोर, बालवाडी, चांदोबा, विचित्रवाडी असा भरगच्च खजिना दर आठवड्याला, महिन्याला घरात यायचा. शिवाय सकाळ, बेळगावचा तरुण भारत, केसरी, इंग्रजीतला हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, कन्नडमधला संयुक्त कर्नाटक ही वर्तमानपत्रं रोज यायची. त्यामुळे संकेश्वरात राहूनसुद्धा जगभर काय चालू आहे हे सतत समोर येत राहायचं. 

विवेक परांजपेचा ‘आपली सृष्टी आपले धन’ हा मराठी एन्सायक्लोपेडिया, नामदेव ढसाळच्या गोलपिठापासून इंदिरा संतांच्या कविता, मर्ढेकर, सुरेश भटांच्या गजला, कॉलिन्स आणि लापिएचं ‘फ्रीडम ॲट मिडनाइट’, नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं, सुंदर बांधणी असलेली मीर आणि प्रगती प्रकाशनाची रशियन मराठी पुस्तकं, विविध विचारसरणींमधे असलेले वादविवाद; निरनिराळ्या विचारांची साहित्यिक, वैचारिक, समीक्षात्मक पुस्तकं, कविता, नाटकं यांनी घरातली कपाटं भरलेली असायची. ही सगळी पुस्तकं सहज नजरेला पडतील अशा पद्धतीने समोरून जात-येत असायची. फिरत्या तबकडीचा रेकॉर्डप्लेअर घरात होता. त्यात बिस्मिल्ला खान, विलायत खानांपासून मदनमोहन, सुमन कल्याणपूर, अरुण दाते यांच्यापर्यंत अनेकांच्या रेकॉर्ड्‌स असायच्या. 

आपला समाज, हे विश्व खूप मोठं आहे आणि आपण त्यात खूप छोटे आहोत, आपल्या भावनांना अतिरेकी महत्त्व न देता आपण सगळ्यांबरोबर वाढलो पाहिजे असं यातून आपोआप आमच्यापर्यंत पोचायचं, सहजपणे. 

संघर्ष, रचना, प्रबोधन, संवाद, समुपदेशन, दोस्ती या सगळ्या जबाबदाऱ्या बाबाने स्वतःहून अंगावर घेतल्या होत्या. निपाणी, संकेश्वर, बेळगाव, गडहिंग्लज, कोल्हापूर आणखी कुठे कुठे तो भिंगरी लागल्यागत फिरायचा.हमीद दलवाईंची व्याख्यानमाला असो, विषमता निर्मूलन शिबिर असो, शेतकरी आंदोलन असो किंवा पथारीवाल्या- टपरीवाल्या कष्टकऱ्यांची संघटना असो- कोणत्याही बाबतीत त्याने पुढाकारच घेतला. ज्या सहजतेने तो जॉर्ज फर्नांडिस किंवा भालचंद्र नेमाडे यांच्या मुलाखती घ्यायचा, त्याच सहजतेने तो कॉलेजमधल्या शिपायांबरोबर गप्पाटप्पा-चहापाणी करायचा. बाबासाठी आयुष्य तुकड्या-तुकड्याचं नव्हतं. हे सगळं मिळूनच आयुष्य बनतं ही त्याची धारणा होती. यातलं काही तरी सोडून द्यायला पाहिजे, मोजकंच पेललं पाहिजे असं त्याला वाटलं नाही. या सगळ्याचं आपल्याला ओझं होऊ शकेल असा कधी विचारच त्याने केला नाही. मजेत आणि एक प्रकारच्या आवेगात तो सगळी कामं करत राहिला. 

बाबाकडे बघून बऱ्याच गोष्टी समजायच्या. फार पुढे पुढे न करता, दाखवेगिरी न करता भरपूर काम करता येतं हे लहानपणीच बघायला मिळालं. कार्यकर्त्यांच्या अहंकारीपणामुळे चळवळ कशी मार खाते, गट कसे फुटतात हेही बघायला मिळालं. आणि बाबाचा हेतू चांगला असूनही तो काही वेळा एकाकी पडतोय हे पिळवटून टाकणारं दृश्यही बघायला मिळालं. 

ज्या माणसांना तुमची किंमत नाही त्यांच्यात तुम्ही राहायची काय गरज आहे, अशी भावना माझ्या मनात त्या वेळी यायची. नंतर लक्षात आलं, की आपला कोणताही भवताल न नाकारता तिथेच ठामपणे राहून, तिथलं वास्तव स्वीकारून काम करणं यातच खरी मजा आहे. एका ठिकाणाहून पळून गेलं की अशी एस्केपिस्ट पळापळ कायम चालू राहणार. बाबा संकेश्वरातच घट्ट राहिला. त्याची भूमिका योग्यच होती असं आता वाटतं. 

आता, 2020 मधे जो जाती-जातींत संघर्ष पेटला आहे, धर्माच्या आधारे जी मनांची फाळणी झाली आहे ते बघून बाबाची अवस्था काय झाली असती हा प्रश्न हल्ली नेहमी पडतो. तो हळवा असला तरी संघर्षशील, मोठ्या दमाचासुद्धा होता. आताच्या वातावरणात कुणाकुणाला काय काय समजवायला गेला असता? आभाळाला ठिगळ लावण्याचं काम त्याने किती काळ केलं असतं? तो दमला असता का? त्याची पडझड झाली असती का? नरेंद्र दाभोलकर या आपल्या मित्राचा सामाजिक सुधारणांपायी खून होतो ही गोष्ट त्याने कशी स्वीकारली/नाकारली असती? अनेक प्रश्न येत राहतात. 

राजकारण आणि समाजकारण करण्याच्या विविध पद्धती असतात आणि माणूस आपापल्या वृत्तीप्रमाणे त्याला भिडत असतो. कुणी लोकांच्या भावनांचा वापर करत काम करतं, कुणी लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत काम करतं वगैरे. बाबाचा मार्ग हा माणसाच्या भावनेला किंमत देत, त्याला आदर देत आपलं म्हणणं हळूहळू त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा होता. 

एक निश्चित आहे, की आपल्या भवतालातल्या माणसांना बाबाने खरोखरच आपलं मानलं होतं. ‘खरं तर आपली मानवतावादी जाणीव वैश्विक स्तरावरची आहे आणि केवळ एक स्ट्रॅटेजी म्हणून मी या लोकांबरोबर त्यांना घाणीतून बाहेर काढण्यासाठी इथे गाडून घेऊन काम करतोय’ अशा टाइपची लबाड अहंकारी वृत्ती बाबाकडे नव्हती. निर्व्याज प्रेम आणि अस्सलपणा ही बाबाची वैशिष्ट्यं होती. त्याचा परिणाम असा व्हायचा, की जगण्यातल्या अनेक अमंगल गोष्टी थेट त्याच्या काळजापर्यंत पोचायच्या. आघात पचवण्याची त्याची म्हणून एक वेगळी पद्धत असली तरी प्रत्येक आघात त्याच्या आयुष्याचा एकेक लचका तोडत असेल का, असा प्रश्न मला कधी कधी पडतो. 

बाबाचा जो अनेक क्षेत्रांमधे वावर होता तो कमी करून त्याने काही कामांवर लक्ष केंद्रित करावं, वृत्तपत्रीय लिखाणात जीव न ओतता भरीव लिखाण करावं असा आग्रह त्याला आई अनेकदा करायची. पुढच्या काळात तसं होऊही शकलं असतं. अनेक चळवळींमध्ये प्रत्यक्ष सहभाग, अनेक विचारसरणींशी झालेली घुसळण, विविध प्रकारचे लोक कसे विचार करतात याची जाण, जागतिक साहित्याचं भान, अशा सगळ्या गोष्टींमधून बाबाचं लिखाण सकस नक्कीच होऊ शकलं असतं; पण बाबाला ती संधी मिळाली नाही. 

मी जेव्हा सामाजिक विषयांवर डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवायला सुरूवात केली त्या वेळी मला बाबाची मोठी उणीव भासली. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी, घडामोडी याबाबत बाबाकडून मला कोणतेही आकस आणि पूर्वग्रह नसलेली मौलिक माहिती मिळाली असती आणि मी व बाबा एकत्र काम करू शकलो असतो, ही ठसठस माझ्या मनात कायमच राहिली. 

बाबा गेला तेव्हा आई, आजी सगळे बेसावध होते. आम्ही दोघं भाऊ स्वप्नाळू वयात होतो. अशी एक कविकल्पना मनात यायची, की आत्मा, पुनर्जन्म वगैरे थोडी जरी फट शिल्लक असती तर बाबा कोणत्या ना कोणत्या मार्गाने एकदा तरी आम्हाला भेटायला आला असता आणि ‘मी चुकलो’ असं सांगून डोक्यावरून हात फिरवून परत गेला असता. ज्याअर्थी बाबा एकदाही आला नाही त्याअर्थी मृत्यूनंतरचा धूर सोडून बाकी सगळं भंपक आहे याची मला खात्री पटली. 

मुकेश हा बाबाचा आवडता होता. विशेषतः ‘सारंगा तेरी याद में’ त्याला खूप आवडायचं. बाबा गेल्यावर कित्येक वर्षं ‘सारंगा तेरी याद में’ आकाशात कुठेही ऐकू आलं की आतून सहन होत नाहीत अशा वेदना व्हायच्या. अजूनही त्रास होतो. खूप. 

माझ्या वयाचा हिशोब घातला तर बाबाच्या नसण्याची वर्षं आताशा त्याच्या असण्याच्या वर्षांपेक्षा जास्त होत चालली आहेत. म्हणजे बाबा पुसट पुसट होत जायला पाहिजे ना? पण उलटं होतंय. बाबाची माया, त्याचा स्पर्श, त्याने दिलेली जगण्याची मूल्यं आणखी ठळक होत चालली आहेत. 

बाबाइतका अस्सलपणा आपल्यातही कधी येवो, अशी माझी मनोमन इच्छा आहे. 

-आणि मला आनंद आहे, की अशा बापाच्या खांद्यावर मी उभा आहे!

- समीर शिपूरकर 
sameership007@gmail.com


बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता
लेखन आणि संपादन - शोभना शिपूरकर 
प्रकाशक - साधना प्रकाशन 
पृष्ठे - 348 
मूळ किंमत - 300 | सवलतीत - 240


हे पुस्तक अ‍ॅमेझॉनवरही उपलब्ध असून ते खरेदी करण्यासाठी क्लिक करा.   

Tags: पुस्तक नवे पुस्तक बहुआयामी रमेश शिपूरकर : माणूस आणि कार्यकर्ता समीर शिपूरकर साधना प्रकाशन रमेश शिपूरकर New Book Sadhana Prakashan कार्यकर्ता | Bahuayami Ramesh Shipurkar : Manus aani Karyakarta Sameer Shipurkar Marathi Load More Tags

Comments:

सत्येंद्र सिंह

बहुत सुंदर जानकारी। मैंने पहली बार पढ़ा। बहुत बहुत धन्यवाद।

अतुल पेठे

समीर, बाप या विषयावर अतिशय उत्तम लेखन मराठीत तेंडुलकर, एलकुंचवार आदी लोकांनी केलं आहे. त्या पंगतीत तुझा हा लेख आहे. विचारशील, अलिप्त आणि त्याच वेळी व्याकुळ करणारा !

Add Comment