पाथर्डी तालुक्यातील एकलव्याचा वारस

बबनराव ढाकणे यांच्या निधनानंतर आलेल्या पहिल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने..

केवळ देशाच्याच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालेला बबनराव ढाकणे हा पाथर्डी तालुक्यातील एकमेव नेता आहे. एका बाजूने त्यांचे हे भाग्य म्हणायचे आणि स्वातंत्र्योत्तर पाऊण शतकात पाथर्डी तालुक्यातील अन्य कोणालाही तशी संधी मिळालेली नाही, हे त्या तालुक्याचे दुर्भाग्य म्हणायचे. त्यामुळेच, महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात पाथर्डी हे नाव उच्चारले गेले की, ‘पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला दुष्काळी तालुका ना?’ आणि ‘बबनराव ढाकणे यांची पाथर्डी ना?’ असाच प्रतिप्रश्न 1975 नंतरचे पाव शतक विचारला जात असे.

तब्बल 50 वर्षे सार्वजनिक जीवनात वावरलेल्या आणि 86 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बबनराव ढाकणे यांचे कालच्या 26 ऑक्टोबरला निधन झाले. आज 10 नोव्हेंबर, त्यांच्या मृत्यूनंतर आलेला त्यांचा पहिला जन्मदिवस. दोन दशकांपूर्वी ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले, वयाच्या 67 व्या वर्षी म्हणजे तुलनेने लवकरच. पण त्या आधीची पाच दशके एक प्रकारच्या झंझावाताची म्हणता येतील. वयाच्या विशीत त्यांनी अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील वाड्या, वस्त्या, तांडे यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पायपीट करायला सुरुवात केली. प्रश्न तरी कोणते? तर, जगण्यासाठी पिण्यापुरते पाणी मिळावे, अर्धे-कच्चे का होईनात रस्ते व्हावेत, रात्री काही वेळ का होईना विजेचे दिवे लागावेत, असे अगदीच चिल्लर वाटावेत असे.. पण आरोग्य, शिक्षण व रोजगार यांच्या किरकोळ सुविधांबाबत बोलणे म्हणजे चैनीच्या वस्तू मागण्यासारखे होते.. कारण महाराष्ट्रातील सर्वाधिक व कायम दुष्काळी तालुक्यात अव्वल स्थानी पाथर्डीची गणना होत होती. तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य सदान्कदा होते, त्यामुळे शेतीला फारसा वाव नव्हता, आणि कोणत्याही उद्योगाला किंचितही अनुकूलता नव्हती. त्यामुळे पर्यटन व सेवा क्षेत्र तर कोणाच्या स्वप्नातही येणे शक्य नव्हते..

अशा या पाथर्डी तालुक्यातील अकोला या हजार-पाचशे लोकवस्तीच्या गावात, निरक्षर आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेला, कोरडवाहू शेतजमीनही तुटपुंजी असलेला, आठवीपर्यंतचे शिक्षण कसेबसे घेऊ शकलेला, किरकोळ शरीरयष्टी आणि सव्वा पाच फूट उंची असलेला बबन दादाबा ढाकणे हा तरुण 1957 नंतर गावोगाव फिरू लागला. प्राथमिक व मूलभूत गरजा असलेले प्रश्न प्रशासनाकडे पोटतिडकीने मांडू लागला. घरातून चटणी-भाकरी बांधून बाहेर पडायचे, बैलगाडी व सायकल ही वाहने मिळाली तर मोठेच सुख समजायचे. मिळतील ते सवंगडी आणि जमतील ते अंगठेबहाद्दर सोबत घेऊन तो धडपडत होता. तो लढत होता ते प्रश्न आज अगदीच मामुली वाटतील, पण केवळ दुष्काळी नाही तर पूर्णतः अलक्षित व दुर्लक्षित प्रदेशातील लोकांसाठी ते प्रश्न त्या वेळी त्यांचे जगणे-मरणे सुसह्य वा असह्य करणारे होते. कारण अख्ख्या तालुक्यातील प्रत्येक गावातील अर्ध्याहून अधिक जनता ऊसतोड कामगार होती. त्या काळात महाराष्ट्रातील अगदीच थोडे कारखाने असे असतील, जिथे पाथर्डी तालुक्यातून कोयते आलेले नसतील. (होय, ऊस तोडणाराला ‘कोयता’ हेच संबोधन होते, कामगार हे संबोधन जरा उच्च दर्जाचे ना!) दरवर्षी सहा महिने तालुक्यातील बहुतांश गावे ओस पडत होती. पाठीमागे राहत होती - म्हातारी माणसे, कारखान्यावर सांभाळता येणार नाहीत अशी लहान मुले आणि भुंकणारी कुत्री... अशा पार्श्वभूमीवर बबनराव ढाकणे या नेतृत्वाचा उदय झाला. 

लोकांचे प्रश्न उचलत, शासनदरबारी धडका मारत, पंचायत समिती व जिल्हा परिषद गाजवून सोडत बबनरावांनी वयाच्या ऐन चाळिशीत असताना विधानसभेत तर प्रवेश मिळवलाच, पण राज्याच्या पुलोद मंत्रिमंडळातही (1977-78) स्थान पटकावले. तेही एक वेळ समजून घेता येईल, पण त्या वेळच्या जनता पक्षाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे चालत आले. 1978 नंतरच्या दशकभरात त्यांनी दोन वेळा विधानसभा जिंकली, पण विरोधी पक्षात राहणेच पसंत केले. विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्याच काळातले. 1989 मध्ये वयाची पन्नाशी नुकतीच ओलांडली असताना, अगदी अनपेक्षितपणे बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलाकडून निवडून येणे आणि त्यानंतर वर्षभराने चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून सामील होणे, हा चमत्कारही त्यांच्या नावावर जमा झाला. त्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील हे एकमेव मंत्री होते. त्यानंतरच्या दशकभरात एकदा विधान परिषद, तेव्हा काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात दुग्ध विकास मंत्रीपद. आणि मग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव. 

त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी विचार दल हा स्वतःचा पक्ष असा झाला. दरम्यान केदारेश्वर सहकारी साखर कारखाना आणि एकलव्य शिक्षण संस्था त्यांनी उभारली होती. पण 2004 मध्ये वयाच्या 67 व्या वर्षी ते निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झाले. त्याचे एक कारण सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव, दुसरे कारण पत्नीचा मृत्यु झाल्यानंतर आलेली एकाकीपणाची भावना, आणि तिसरे कारण चिरंजीव प्रताप यांना राजकारणात पुढे जाता यावे म्हणून. पण खरे कारण वेगळे होते. बदलत्या राजकीय गदारोळात निभाव लागत नाही, मन रमत नाही, हेच होते. आयुष्यभर लढत राहणाऱ्या या नेत्याला तडजोडी तरी किती करायच्या असा प्रश्न पडला होता आणि निवडणुकीच्या राजकारणाचा उबग आलेला होता. राजकारणातल्या कोलांट्याउड्या अगदीच परिचयाच्या असलेल्या या नेत्याला, आता आपली नाळ मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशीही जुळत नाही हे पूर्णतः लक्षात आले होते. 

प्रस्तुत लेखकाचा बबनराव ढाकणे यांच्याशी संबंध आला तो मागील दीड दशकांत. म्हणजे त्यांच्या वयाच्या सत्तरीनंतर, म्हणजे ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरचा हा कालखंड. या काळात आमच्या बारा-तेराच भेटी झाल्या असाव्यात. मात्र ज्या भेटी झाल्या, त्या बऱ्याच निवांत आणि ऐसपैस म्हणाव्यात अशा. बहुतांश भेटींमध्ये अन्य कोणी एखादाच असायचा. त्यातील दोन-तीन वेळा भेटी झाल्या त्या, साधे शाकाहारी जेवण करण्यासाठी साध्याशा हॉटेलात. प्रत्येक वेळी अगदी मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. आपल्या तालुक्यातून आलेला मुलगा पुण्यामध्ये येऊन ‘साधना’चा संपादक झालेला आहे, याचे त्यांना कौतुक; त्याच्याशी अधूनमधून गप्पा माराव्यात एवढाच सरळ हेतू. यापलीकडे आमची कसलीच देवाणघेवाण नव्हती. अर्थात, साधनाशी निगडीत एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, सदानंद वर्दे, भाई वैद्य व अन्य अनेक समाजवादी नेत्यांच्या संदर्भातील आठवणी हा एक वेगळा दुवा आमच्या गप्पांमध्ये असायचा. पण ते जे काही बोलायचे, त्यात आडपडदा असा कशाचाच नव्हता. एक-दोन अपवाद वगळता सर्व भेटीगाठी एकांतात व निवांत असताना झाल्या. पण ते जुन्या काळात रमलेत असे मला कधीच दिसले नाही. माझ्याशी बोलताना तरी त्यांना वर्तमानाविषयी बोलण्यात जास्त रस असायचा आणि मी मात्र प्रत्येक भेटीत त्यांच्या जुन्या काळातील काही घटना/प्रसंग विचारून घेत राहायचो. त्या-त्या वेळी वस्तुस्थिती काय होती, निर्णयप्रक्रिया कशी होती हे जाणून घेण्यात मला अधिक रस असायचा. त्याबाबत सांगताना त्यांनी ना कधी आढेवेढे घेतले, ना कधी त्यांना अवघडलेपण आले. अर्थातच, आज-उद्याच्या राजकारणाकडे ते कसे पाहतात हे जाणून घेता यावे असे एक-दोन प्रश्न तरी मी प्रत्येक भेटीत विचारीत होतोच.

एकंदरित काय तर, दुहेरी पद्धतीने आमच्या गप्पा होत होत्या. पण स्वतःच्या कामाबद्दल सांगताना त्यांनी बढाया मारल्यात असे मला आठवत नाही. उलट, त्यांनी विधानसभेतून राजदंड पळवला, गॅलरीतून उडी मारून पत्रके कशी फेकली, वयाच्या चौदाव्या वर्षी विनातिकीट प्रवास करून दिल्लीत जाऊन थेट नेहरूंची भेट कशी घेतली इत्यादी आख्यायिकांसंदर्भात त्यांनी अगदीच साधी व सरळ उत्तरे दिली. त्यात नाट्यमय भाग कमी होता. अख्ख्या पाथर्डी तालुक्यात आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी त्या घटनांची रसभरीत वर्णने करून सांगितली जातात. पण मनाच्या उद्विग्न किंवा निराश अवस्थेत त्या कृती घडल्या, असाच त्यांच्या म्हणण्याचा सारांश होता. त्या बेधडक कृतीचे गांभीर्य त्यावेळी मला पुरेसे होते असे नाही आणि तसेही त्यावेळी गमावण्यासारखे माझ्याकडे होतेच काय, असेच त्यांचे सांगणे होते. 

“उमेदवाराकडून गाडी व पैसे घेऊन बाहेर पडलेले कार्यकर्ते त्याच उमेदवाराचा प्रचार करतील याची आज खात्री नाही आणि उमेदवाराकडून पैसे घेणारा मतदार त्याच उमेदवाराला मतदान करील याचीही खात्री नाही, असा आजचा काळ आहे. अशा काळात राजकारण करणे खूप अवघड आहे..” इतक्या घसरणीची खंत ते बोलून दाखवत होते. पण, “समाजाला पूर्वपदावर यावेच लागेल” असा आशावादही त्यांच्यात होताच. ‘भाजप’चा अक्राळविक्राळ चेहरा आणि रा. स्व. संघाचा विळखा देशासाठी कसा घातक आहे, अशी चिंता त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून येत होती. पण आहे हे असे दीर्घकाळ चालणार नाही, हे आज ना उद्या बदलणार, याबाबत त्यांच्या मनात शंका दिसत नव्हती. भाजपने कुठे-कुठे किती राज्यं काबीज केलीत, असे कोणी सांगितले तर कुठे-कुठे भाजपचा प्रभाव नाही याची आठवण ते तात्काळ करून देत होते. ते जरी विविध राजकीय पक्ष फिरून आले असले तरी भाजपमध्ये मात्र ते स्वतः कधीच गेले नव्हते. त्यांचा राजकीय पिंड ‘काँग्रेस’च्या विचारांवरच पोसलेला होता. एका अर्थाने ते नेहरुवादीच होते.

केवळ देशाच्याच नाही तर राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालेला बबनराव ढाकणे हा पाथर्डी तालुक्यातील एकमेव नेता आहे. एका बाजूने त्यांचे हे भाग्य म्हणायचे आणि स्वातंत्र्योत्तर पाऊण शतकात पाथर्डी तालुक्यातील अन्य कोणालाही तशी संधी मिळालेली नाही, हे त्या तालुक्याचे दुर्भाग्य म्हणायचे. त्यामुळेच, महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात पाथर्डी हे नाव उच्चारले गेले की, ‘पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला दुष्काळी तालुका ना?’ आणि ‘बबनराव ढाकणे यांची पाथर्डी ना?’ असाच प्रतिप्रश्न 1975 नंतरचे पाव शतक विचारला जात असे. अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जुनी माणसे तो प्रश्न विचारतात. 

महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संस्थानिक म्हणावे असे किमान दोन नेते असतातच. शिक्षण संस्था आणि साखर कारखाने या दोन निकषांवर बबनराव ढाकणे यांचेही एक छोटे संस्थान आहे असे कदाचित म्हणता येईल. पण बबनराव ना कधी साखर सम्राटासारखे वागले, ना शिक्षण सम्राटासारखे ! विशेष म्हणजे, त्यांची दुसरी पिढीही तशी वागली नाही आणि तिसरीही तसे वागताना दिसत नाही. हा परिणाम जसा त्या तालुक्याचा आहे तसाच बबनराव यांच्या कार्यपद्धतीचा आहे. आपण कुठून आलेलो आहोत आणि आपला समाज व आपल्या तालुक्याची परिस्थिती काय आहे याचे भान त्यांना कायम राहिले, त्यामुळे त्यांनी अन्य बलाढ्य नेत्यांची नक्कल कधी केली नाही..

बबनराव हे अखेरपर्यंत वृत्तपत्रे नियमितपणे वाचत होते, टीव्हीवरच्या बातम्या पाहत होते.. विविध राज्यांतील निवडणुका व त्यांचे निकाल यांबाबतचे कुतूहल त्यांना सतत होते. राष्ट्रीय व वेगवेगळ्या राज्यांतल्या युत्या, आघाड्या व प्रमुख राजकीय घडामोडी जाणून घेण्यात त्यांना कमालीचा रस होता. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये गेल्यावर दोन-चार तासांत देश कळतो, तिथे दोन-चार तास वावरलो तर देशात कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत याचा अंदाज येतो, असे ते म्हणत असत. 

1978 च्या पुलोद मंत्रिमंडळात तुम्हाला मंत्रीपद कसे मिळाले, असा प्रश्न मी एकदा विचारला; तेव्हा ते सहजतेने म्हणाले, “दुष्काळी भागातून आलेलो होतो म्हणून”. 1978 ला जनता पक्षाचे अध्यक्षपद कसे मिळाले, या प्रश्नावर ते तात्काळ म्हणाले, “अनेक दिग्गज नेते परस्परांमध्ये भांडत होते म्हणून.” बीड जिल्ह्यात तुम्हाला अगदी ऐनवेळी उभे राहून जनता दलाच्या वतीने खासदार कसे होता आले, या प्रश्नाला त्यांचे उत्तर होते, “तिथे केशर काकू काँग्रेसवाल्यांनाही नको झाल्या होत्या म्हणून.” केंद्रीय मंत्रीपद कसे मिळाले, याबाबत ते म्हणाले, “जनता दल तसेही फुटलेच होते, तेव्हा मला वाटले ही अशी संधी मला स्वतःला तर सोडाच आपल्या तालुक्याच्या वाट्याला कधी येणार नाही म्हणून.” अर्थातच, त्यांचे हे सरळ सांगणे आयुष्याच्या उत्तरार्धात होते आणि ज्याला ते सांगत होते तो तसा पूर्णतः निरुपद्रवी होता. पण स्वतःविषयी व स्वतःच्या कर्तृत्वाविषयी त्यांच्या मनात भ्रम नव्हते, हे यातून स्पष्ट होते. 

एकलव्य शिक्षण संस्था आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखाना चालवतानाही, पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसारखे आपण बलाढ्य नाही याची त्यांना पुरेपूर जाण होती. आपला भाग दुष्काळी आहे, त्याच्या विकासाला अनेक मर्यादा आहेत, आपल्या धडपडीलाही अनेक मर्यादा पडल्या, याचे त्यांना भान होते. आणि त्यामुळेच कदाचित, केवळ शिक्षणामुळेच पुढे गेलेल्या, विविध क्षेत्रांत चमकणाऱ्या मुलांना-मुलींना पाहून त्यांना निर्हेतुक आनंद मिळत असावा. ज्या लहान खेड्यांपाड्यांतून आपण पूर्वी पायी किंवा सायकलवरून फिरत होतो आणि तिथले रस्ते, बंधारे, पाणी यांसाठी आपल्या कुवतीनुसार लढत होतो, तिथली ही मुले आहेत याचे समाधान त्यांना निश्चित वाटत असावे. म्हणून अशा मुलांशी त्यांना संवाद साधावासा वाटत असावा. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून जानेवारी 2010 मध्ये त्यांनी मला फोन केला होता. तेव्हा मी साधनाचा कार्यकारी संपादक झाल्याचे त्यांना कळले होते. “वेळ असेल तर चहा आणि गप्पांसाठी थोडा वेळ ये, मी पुण्यातच एकलव्य संस्थेच्या ऑफिसमध्ये आलो आहे”, हे विचारतानाही त्यांचा सूर बराच खालचा होता. 

ती आमची पहिलीच भेट होती.. तो दिवस साधना अंक छापायला सोडण्याचा होता आणि त्याच्या आदल्याच दिवशी ज्योती बसू यांचे निधन झाले होते, त्यामुळे संपादकीय लेख लिहून झाल्यावर, त्या संध्याकाळी भेटायला गेलो होतो.

त्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांनी ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ न देणे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची ऐतिहासिक चूक याबद्दल ठळकपणे छापले होते.. स्वतः ज्योती बसूंनीही ती ब्लंडर मिस्टेक होती, अशा प्रकारचे विधान आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात केलेले असल्यामुळे, सर्व वृत्तपत्रांनी तीच री ओढली होती. मात्र माझे मत वेगळे होते, त्यामुळे, ‘ज्योती बसूंना पंतप्रधान होऊ न देणे ही ‘माकप’ची ऐतिहासिक चूक होती काय?’ याच शीर्षकाचा लेख मी लिहिला होता. त्यामुळे आमच्या त्या पहिल्या भेटीच्या अखेरीस बबनरावांना मी तोच प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, “मी वाचलेत आजचे सगळे पेपर. पण मला तसे अजिबात वाटत नाही. कारण काँग्रेसने चंद्रशेखर आणि चरणसिंग यांचे जे काही केले तेच ज्योती बसू यांचेही केले असते. चंद्रशेखर आणि चरणसिंग यांचे पक्ष त्यांच्या बरोबरच संपणार होते, त्यामुळे त्यांचे ठीक आहे..पण कम्युनिस्टांनी तसे का करावे? ज्योती बसू यांच्या बरोबर तो पक्ष थोडाच संपणार आहे? तो केडर असलेला पक्ष आहे, त्याला काही एक तत्त्वं आहेत. त्यामुळे पेपरवाले काहीही म्हणोत, मी त्यांच्याशी सहमत नाही.” बबनरावांचा हा गावरान शहाणपणा मला आश्चर्यचकित करून गेला.. आणि त्या क्षणी माझा स्वतःवरचा विश्वास किंचित का होईना वाढला. त्यानंतरही प्रत्येक भेटीमध्ये मला त्यांच्याकडून, प्रचलित राजकीय समजुतीपेक्षा वेगळे असे काही ना काही ऐकायला मिळाले. 

अशा या बबनराव ढाकणे यांना त्या-त्या वेळी विविध राजकीय नेत्यांनी या ना त्या प्रकारची मदत केलीच आहे. पण तरीही त्यांचे नाते एकलव्याशीच सांगता येईल. पाथर्डी तालुक्यात पार्थ (अर्जुन) आला होता आणि रडला होता, अशी एक आख्यायिका खूप वेगवेगळ्या प्रकारे रंगवून सांगितली जाते. त्याची सत्यता कळायला आता कोणताच मार्ग नाही. कदाचित, प्राचीन काळात अर्जुन नाही, तर एकलव्यच पाथर्डीत येऊन गेला असावा. कारण अर्जुनाचे राजकीय वारस पाथर्डीमध्ये गेल्या अर्धशतकात तरी आढळले नाहीत. पण एकलव्याचा राजकीय वारस जर कोणी असेल तर ते बबनराव, यावर पाथर्डीकरांचे एकमत होईल. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन!

- विनोद शिरसाठ
kartavyasadhana@gmail.com
(संपादक, साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन आणि कर्तव्य साधना)

Tags: बबनराव ढाकणे काँग्रेस राजकारण स्मृतीलेख अहमदनगर Load More Tags

Comments:

प्रा. भागवत शिंदे

बबनरावजी ढाकणे यांच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचा आलेख असणारा एक सुंदर लेख या निमित्ताने वाचायला मिळाला. संपादकांची अशा व्यक्तीमत्त्वांकडे पाहण्याची निरक्षर विवेकदृष्टीही आवडली. बबनरावांचा सच्चेपणा व प्रामाणिकपणा मनाला स्पर्शून जातो. शेवटी लेखकाने त्यांना एकलव्याची दिलेली उपमा देखील सार्थ वाटते. आजच्या संकुचित, द्वेष पूर्ण राजकारणात मात्र अशा एकलव्यांचा आक्रसत चाललेला अवकाश मन हेलावून लावून टाकतो.

Dr. Pralhad Jaybhaye

अगदी सुंदर लेख झाला आहे सामान्य लोकांच्या सध्याच्या उथळ माध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेल्या विश्लेषणापेक्षा माननीय बबनराव ढाकणे यांच्या कार्य आणि कर्तुत्वाच्या व स्वभावाच्या अगदी जवळ जाणारा असा लेख आणि मजकूर झाला आहे या लेखाचा शेवट तर अतिशय सुंदर आणि लेखाचे टायटल करावे असा आहे. किंबहुना बबनराव ढाकणे यांचे कोणी चरित्र लिहिले तर त्याचे शीर्षक "एकलव्याचा राजकीय वारस - बबनराव ढाकणे" असे असावे. इतका अचूक आणि त्यांच्या कार्यकर्तुत्वाला व भौगोलिक स्थितीला पूरक असा शेवट केला आहे.

किशोर गोरे

सुंदर लेख विनोदजी! नगर जिल्ह्यातूनच असल्याने लहान पणा पासून ढाकणे साहेबांबद्दल ऐकून व वाचून होतो. तरीही आपल्या लेखातून बरीच गोष्टींचा चांगला उलगडा झालाय! दुष्काळी भागातून येऊन लांब पल्ल्याचे समाज कारण आणि राज कारण आजच्या "राजकारण म्हणजे पैसा आणि पैसा हेच राजकारण" ह्या जमान्यात शक्य नाही. व त्यांचा पिंड तसा नसल्याने ढाकणे साहेबानी गेली दोन दशके "पाण्या वाचून मासा", अशा पद्धतीने राजकीय विजनवासात काढली पण कधीहि "उगवत्या सूर्याला नमस्कार" म्हणून नवीन प्रवाहाचा होण्याचा प्रयत्त्न केला नाही. आमचे मित्र महेशजी भागवत साहेबांकडून आपल्याविषयी ऐकिवात आहेच. आपले लेख व साधना संपादकीय वाचनीय असतात. - किशोर गोरे, प्रिन्स्टन, न्यू जर्सी, अमेरिका

Add Comment