12 वर्षांपूर्वीचा युवा अभिव्यक्ती अंक 

राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्ताने साधना साप्ताहिकाच्या एका विशेषांकाची पुनर्भेट

प्रिय वाचकहो, 

आज 12 जानेवारी 2022. राष्ट्रीय युवक दिवस. या निमित्ताने दिवसभरात बरेच वेगवेगळे लेख प्रसिद्ध झाले आहे, होत आहेत. युवकांसाठी सतत काही ना प्रसिद्ध करणे ही साधना साप्ताहिकाची परंपरा पूर्वीपासून आहे. मागील आठ वर्षांपासून तर स्वतंत्र युवा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. मात्र डिजिटल माध्यमाच्या वरदानामुळे आज 12 वर्षांपूर्वीचा 'युवा अभिव्यक्ती अंक' पुनर्भेट म्हणून सादर करीत आहोत.. त्या अंकाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो, म्हणजे त्यातील लेख वाचण्यात अधिक गंमत येईल..

2007 ते 2009 ही तीन वर्षे मी साधनाचा 'युवा संपादक' होतो, त्यानंतर मला 'कार्यकारी संपादक' हे लेबल लागणार होते. तर माझे 'युवा संपादक' हे लेबल काढले जाणार आहे, हे ठरले तेव्हा त्या लेबलखाली काढलेला हा शेवटचा अंक आहे. यात नऊ युवांची अभिव्यक्ती आहे. यातील सर्वजण तेव्हा आपापल्या आयुष्याच्या नवीन पर्वात प्रवेश करत होते. आता सर्वजण स्थिरस्थावर झाले आहेत, सर्वजण आपापल्या क्षेत्रांत कमी-अधिक प्रसिद्ध आहेत.. यातील काहींना तर चांगलेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. 

हा अंक काढला तेव्हा हे सर्वजण वय वर्षे 16 ते 32 या गटात बसणारे होते. यातला सर्वांत तरुण विनायक पाचलग होता, तेव्हा तो कोल्हापुरात इयत्ता 12वी विज्ञान शाखेत होता. तो एका लग्नसमारंभासाठी पुण्यात आला होता, ज्या मंगल कार्यालयात लग्न होते त्याच्या समोर साधनाचे ऑफिस दिसले म्हणून तो तिथे आला. आणि अतिशय धीटपणे स्वतःची ओळख करून देऊन तो कोल्हापुरात काय व किती प्रकारची शालाबाह्य कामे करतोय हे सांगत राहिला. तेव्हा त्याची ओळख झाली आणि त्याच वेळी तो चेतन भगतच्या प्रेमात पडून, नंतर त्याच्याविषयी चिकित्सक विचारही करायला लागला होता. तेव्हा त्याने चेतनला लिहिलेले अनावृत्त पत्र या अंकात घेतले होते. त्यानंतर विनायक इंजिनियर झाला आणि मग माध्यम क्षेत्रांत बऱ्याच आघाड्यांवर काम करीत राहिला. आता त्याचे 'थिंक बँक' हे युट्युब चॅनल मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय मानले जाते. अनेक दिग्गजांच्या मुलाखती हे 'थिंक बँक'चे प्रमुख वैशिष्ट्य झाले आहे.

त्याच दरम्यान दुसरा एक तरुण साधना कार्यालयात भेटला होता. त्याचे नाव संकल्प गुर्जर. तेव्हा तो फर्ग्युसन कॉलेज मध्ये एफ. वाय. बी. ए. करीत होता. तो आधीच्या वर्षी  बदलापूरला असताना त्याला तेथील ग्रंथालयात साधना साप्ताहिक थोडेबहुत माहीत झाले होते. त्यामुळे, पुण्यात आल्यावर तो साधनात आला तेच मुळी युवा संपादक आपल्यासाठीच असणार तर त्याला भेटून येऊ या हेतूने. तेव्हा तो कविता करीत होता आणि त्याचे तोपर्यंतचे वाचनही बरेच जास्त व गहन-गंभीर होते. त्यानंतरच्या भेटीत त्याने फर्ग्युसनमधील एका उपक्रमात तो सहभागी झाला तेव्हाची लगबग सांगितली होती. त्यावरच त्याने लिहिलेला '2 ऑक्टोबर' हा लेख त्या युवा अभिव्यक्ती अंकात घेतला होता. नंतर संकल्पने खूप लेखन साधनात केले. पुढे तो दिल्लीत गेला, सार्क विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयात पीएच डी घेतली आणि आता दिल्लीतच एका थिंक टँकमध्ये काम करतो आहे.

त्याच दरम्यान नीलेश मोडक हा वाशिम येथून आलेला तरुण मला भेटला. तेव्हा तो पुण्यात आला होता, एम. एससी. मायक्रोबायलॉजी झाला होता. तो साधना ऑफिसमध्ये आला होता, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना भेटायला आणि 'अंनिस'च्या उपक्रमांत सहभागी व्हायला. पण तिथे बैठकीला येता येता तो मला भेटू लागला, तेव्हा डॉ. दाभोलकर त्याला गंमतीने म्हणाले होते, "तू विनोदला जास्त भेटू नकोस, तो माझा होऊ शकणारा अंनिसचा एक कार्यकर्ता पळवील.." नीलेश साधनात अधून मधून लिहायला लागला आणि त्याच दरम्यान त्याने कोकणात केलेल्या सहलीवर लिहिलेला लेख त्या अंकात घेतला होता. पुढे हा नीलेश बंगलोर येथे स्थायिक झाला आणि संशोधन क्षेत्रांत त्याने बरीच वेगळी वाट निवडली. ती इतकी अनोखी व रोचक आहे की, पुढे कधी तरी त्यावर त्याचा स्वतंत्र लेखच मागवायचा आहे. 

पुणे विद्यापीठातील जे थोडे चमकदार व सिन्सियर तरुण त्या आधीच्या दोन-तीन वर्षांत साधनात अधून मधून भेटत होते, त्यातील एक होता दीपक जाधव. पुणे विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र) करून एका दैनिकात तो नोकरी करू लागला होता.. त्याने गणपत धुमाळे या त्याच्या मित्राविषयी त्या अंकात लिहिले आहे. तो गणपत आता जळगाव येथे लॉ कॉलेजवर विदयार्थीप्रिय प्राध्यापक आहे. आणि दीपकने सुरू केलेले 'जागल्या' हे वेबपोर्टल आता चांगलेच बाळसे धरू लागले आहे, अलीकडच्या काळात त्याने पुणे विद्यापीठातील अनेक गैरप्रकार ज्या निर्भयपणे पुढे आणले आहेत, ते कौतुकास्पद आहे.

नांदेड येथून आलेला चंद्रशेखर पाटील हा तरुण मात्र माझा कॉलेज काळापासूनचा मित्र आहे. तो आता चार्टर्ड अकाऊंटंट आहे. तो आणि मी बारावीनंतर एकाच हॉस्टेलवर राहत होतो तेव्हा मित्र झालो. त्याचे वाचन उत्तम आहे आणि राजकीय, सामाजिक समज खूपच रॅशनल आहे. 'लाटा लहरी' व 'थर्ड अँगल' ही माझी साधनेतील सदरे लिहिताना जे प्रॅक्टिकल मित्र माझ्यापेक्षा परिपक्व आहेत असे मला वाटत होते, त्यातील हा एक. माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे निधन झाले तेव्हा (2007 मध्ये) 'हरिभाऊंच्या सहवासातील ते दिवस' हा लेख त्याने माझ्या आग्रहास्तव लिहिला होता, आणि तो खूपच गाजला होता. इतका की, ग. प्र. प्रधान सरांनी त्याला कौतुकाचे पत्र पाठवले होते. त्यानंतर त्याने चार्टर्ड अकाऊंटंट एस. बी. झावरे यांच्यावर लिहावे असा आग्रह मी केला, तेव्हा त्याने लिहिलेला लेख त्या युवा अभिव्यक्ती अंकात घेतला होता. त्याने आतापर्यंत लिहिलेले तेवढेच दोन लेख. नंतरच्या कोणत्याही आग्रहाला त्याने अद्याप दाद दिलेली नाही..

प्रसन्न जोशी याने पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण घेऊन त्या वेळी मुंबईतील 'एबीपी माझा' या टीव्ही चॅनेलवर काम करायला सुरुवात केली होती. त्या दरम्यान एकदा त्याने अचानक फोन करून स्वतःची ओळख करून देऊन रानडे इन्स्टिट्यूट कॅन्टीनमध्ये भेट ठरवली होती. भेट संपल्यावर तो म्हणाला, डॉ. दाभोलकर यांच्यासोबत वावरणारा युवा संपादक आहे तरी कसा (म्हणजे कितपत खोल आहे?) हे मला समजून घ्यायचे होते, म्हणून मी तुझी ओळख करून घेतली. नंतर प्रसन्न टीव्ही चॅनलवरील डायनॅमिक पत्रकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला. स्पष्टवक्ता आणि थेट व आखीव रेखीव मांडणी यासाठी तो ओळखला जातो. आता तो 'साम टीव्ही'वर संपादक आहे. त्याने त्या अंकात तरुणाईविषयी लिहिले आहे, आजही त्याची मांडणी तशीच धारदार असते.. युवांना अपील होणारी!

त्याच दरम्यान अशोक पवार या तरुणाला राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'संस्कृती सन्मान' मिळाला होता, त्या निमित्ताने त्याची ओळख मी स्वतःहुन करून घेतली होती. आणि त्याला साधनात सदर लिहायला सांगितले होते. त्याचे वयाच्या पंचविशीपर्यंतचे आयुष्य भटक्या विमुक्तांच्या पालावर गेले होते आणि त्यावर आधारित 'बिराड' हे त्याचे आत्मकथन बरेच गाजले होते.. त्याचे अनुभवविश्व मध्यमवर्गीय जाणिवांच्या खूपच पलीकडचे होते. त्याने त्या अंकात लिहिलेला लेख त्याचीच झलक दाखवणारा होता.. पुढे अशोकच्या पाच कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्याच्या आयुष्यावर एक नाटक निघाले आणि आता एक चित्रपटही आला आहे..

त्या काळात तरुणाईमध्ये 'रेडिओ मिर्ची' लोकप्रियतेच्या शिखरावर होते. आणि त्यातील आरजे शुभ्रा व आरजे स्मिता यांच्या आवाजाच्या व मांडणीच्या प्रेमात हजारो तरुण होते. त्या दोघींविषयी अनेकांप्रणानेच माझ्याही मनात बरेच कुतुहल होते. म्हणून त्यांची मुलाखत घेण्याचे काम तेव्हा स्नेहा अवसरीकरकडे सोपवले होते. तेव्हा स्नेहा अंतर्नाद मासिकात भानू काळे यांची सहायक होती.. त्यानंतर शुभ्रा व स्मिता काही काळ खूप चर्चेत राहिल्या, आता त्या कुठे आहेत व काय करतात हे माहीत नाही.. स्नेहा मात्र नंतर आकाशवाणी, नियतकालिके व प्रकाशनसंस्था यांच्यामध्ये काम करीत राहिली.. अक्षरधारा दिवाळी अंकाची संपादक म्हणून अलीकडच्या तीन-चार वर्षांत तिची जास्त ओळख आहे..

मी 2004 पासून साधनात लिहू लागलो तेव्हा डॉ. हमीद दाभोलकर मानसोपचरतज्ज्ञ म्हणून काम करू लागला होता. साधनातील माझ्या लेखनाच्या निमित्ताने त्याचा माझा परिचय झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर साधनाचे संपादक होते, त्यामुळे भेटी अधूनमधून होऊ लागल्या. पण आपण समांतर व जवळपास सारखाच विचार करत आहोत असे आम्हाला पहिल्या भेटीपासूनच वाटू लागले, साहजिकच आम्ही मित्र म्हणण्याइतपत जवळ आलो.. तो अन्यत्र थोडेबहुत लिहू लागला होता, मात्र मी अधून मधून आठवण करून देत असूनही साधनात त्याने पुढील पाच-सहा वर्षांत एकही लेख लिहिला नव्हता. त्या युवा अभिव्यक्ती अंकासाठी त्याने लिहावे असा आग्रह मी धरला. तेव्हा फोनवरच त्याने मला पुरोगाम्यांच्या बैठकीतून बाहेर आल्यावर मनात आलेले काही विचार बोलून दाखवले. तेव्हा तोच सर्व आशय त्याने अनावृत्त पत्र या स्वरूपात लिहावा असे मी सुचवले, तो लेख त्या अंकात घेतला. तेव्हा हमीद अंनिसच्या विवेकवाहिनीचेही काम करत होता. त्यानंतरच्या 12 वर्षांत त्याला किती आघाड्यांवर लढावे लागले हे आता सर्वपरिचित आहे.

गंमत अशी की, या अंकात चार-पाच पानांचा लेख आपण लिहावा असा विचार मी केला होता. 'हम है नये, अंदाज क्यूँ हो पुराना', ही मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून लिहिणार होतो. पण तो अंक अवघ्या आठ-दहा दिवसांत जुळवून आणण्याच्या नादात तो लेख लिहिण्यासाठी मी वेळ काढू शकलो नाही. परिणामी, त्या शीर्षकाचे प्रास्ताविक स्वरूपात संपादकीय लिहिले. मात्र ती कसर भरून काढण्यासाठी श्री. म. माटे यांचा 'देशोदेशीचे ज्ञानेश्वर' हा माझा विशेष आवडता लेख रिप्रिंट केला. त्या अंकाचे प्रकाशन विवेक सावंत यांच्या हस्ते झाले. तेव्हा त्यांनी या अंकातील सर्वच लेखांचे कौतुक करून माटे यांच्या लेखाचा उल्लेख मास्टरस्ट्रोक असा केला होता. तो लेख माटे यांच्या 'साहित्य मंजरी' या पुस्तकातून घेतला होता. मात्र अगदी अलीकडे साधनाचे अर्काइव्ह करताना लक्षात आले की, 1957च्या साधना कुमार अंकात तो लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता..

12 वर्षांपूर्वीच्या या अंकाची पीडीएफ आणि युनिकोडमधील मजकुर असलेली लिंक खाली दिली आहे. हा अंक आताही वाचनीय वाटेल यात तर शंका नाहीच, पण या तरुणाईकडे आणि त्यांच्या अभिव्यक्तीकडे वेगळ्या नजरेने पाहता येईल असा विश्वास वाटतो. साधना साप्ताहिकाचे 45 वर्षांचे डिजिटल अर्काईव्ह आता सर्वत्र उपलब्ध आहे, म्हणूनच हा अंक सर्वदूर पोहचवता येतो आहे. आणि म्हणूनच या अंकाची पार्श्वभूमी जरा विस्ताराने सांगण्याची संधी घेता आली! 

- विनोद शिरसाठ

युवा अभिव्यक्ती अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

Tags: साधना साप्ताहिक संपादकीय राष्ट्रीय युवक दिन विनायक पाचलग संकल्प गुर्जर नीलेश मोडक दीपक जाधव चंद्रशेखर पाटील प्रसन्न जोशी अशोक पवार स्नेहा अवसरीकर Load More Tags

Comments: Show All Comments

Anjali Mulay

विनोद, तू १००% उत्तम संपादक आहेस. १२ वर्षांपूर्वीचा अंक उत्सुकतेने वाचावासा वाटायला लावणं हे खरंच कौशल्याचं काम आहे. म्हणून अंक वाचायच्या आधीच comment टाकली. अंक छानच असणार याची कल्पना तुझ्या लेखावरून आलीच आहे. मनापासून धन्यवाद !

हिरा जनार्दन

बोलूनचालून जाणत्या संपादकाने लिहिलेला वाचनीय, ओघवता, संक्षिप्त इतिहास.

संदीप रतन कांबळे

विनोद सर, आपला युवा संपादक, कार्यकारी संपादक, संपादक हा प्रवास उत्तरोत्तर उंचीवर जाणारा आहे, यात काही शंकाच नाही. साधनेतील आपले संपादकीय तर उत्तमच असते. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या नंतर एक ताकदीचा, निर्भीड संपादक साधनेला मिळाला आणि डिजीटल माध्यमातून साधना एका क्लीकवर उपलब्ध करून दिला, हे वाखाणण्याजोगे आहे. खूप छान.

संजय मेश्राम. पुणे

नवीन वर्षाची सुंदर भेट. खूप धन्यवाद.

vasudev shirsath

विनोद, खरचं तुझा अभिमान आहे, 1994 पासून तू जास्त जवळ आलाअसल्याने, खूपच छान लेख, संपूर्ण वाचला आहे तुझाच वासू

विष्णू दाते

प्रशंसनीय उपक्रम विनोदजी!

Add Comment