प्रिय राजाभाऊ,

ज्येष्ठ लेखक, सामाजिक कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांचं आज निधन झालं. त्यांना अनावृत्त पत्रातून वाहिलेली आदरांजली..

आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या तरुण मुलामुलींना आधार देणारे राजाभाऊ हे मी स्वत:देखील अनुभवलेत. आंतरजातीय लग्नानंतर कोणत्या सामाजिक अडचणी येतात, त्याला तोंड कसं द्यायचं, कुटुंबात समानतेनं कसं वर्तन करायचं, सामाजिक कामात स्वतःला कसं झोकून द्यायचं हे आपुलकीनं सांगणारे राजाभाऊ मला आपले पालक वाटतात. आपलं दु:ख ज्याला सांगावं, हलकं व्हावं असा निखळ मैत्री करणारा माणूस मी तुमच्या जाण्यानं गमावला. आपल्या वयात जवळपास 30-32 वर्षांचं अंतर होतं, पण मैत्रीत मात्र हे कधीच आडवं आलं नाही.

प्रिय राजाभाऊ,

तुम्ही हे जग सोडून गेलात हे मान्य करायला मन तयार होत नाही. तुमच्या कितीतरी भेटी, आठवणी, तुमच्या सोबतचे प्रवास, वादविवाद, भाषणं मनात घर करून आहेत. लेखक, प्राध्यापक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, विद्रोही नेता, वंचितांचा मित्र या नात्याने तुमची समाजासाठीची धडपड कधीच विसरता येणार नाही. माझ्यासारख्या कितीतरी युवक-युवतींच्या जडणघडणीत तुम्ही मोलाची भूमिका बजावली आहे. आमच्या पाठीमागे तुम्ही सदैव खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या भेटीतले एकेक प्रसंग आठवत तुमची पुस्तकं, साधनेतले तुमचे लेख समोर ठेवून बसलोय.

तुमचं जाणं केवळ माझंच नाही तर महाराष्ट्रातल्या माझ्या पुढच्या पिढीचं नुकसान मानतो मी. सामाजिक चळवळीत विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते जेव्हा येतात, तेव्हा त्यांचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आकलन खूप कमी असतं. तुमच्यासारखा कार्यकर्ता ही बौद्धिक जडणघडण करण्याचं काम करतो. बसवण्णा, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांविषयी, कितीतरी सामाजिक - राजकीय संकल्पनांविषयी तुम्ही सोप्या शब्दांत आम्हाला सांगितलं. हे विचार केवळ बोलायचे, लिहायचे नाहीत तर अंगिकारायचे कसे हे तुम्ही आम्हाला शिकवलं. ‘महात्मा बसवेश्वर’ हे नाव फक्त मी ऐकून होतो; तुम्ही आम्हाला ‘महात्मा बसवण्णा’ सांगितलेत. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळणं हा अनुभव एकट्या माझा नाही, तर कितीतरी तरुण-तरुणींचा आहे. तुमच्या जाण्यानं मार्गदर्शक हरवल्याचं दु:ख आमच्या वाट्याला आलं आहे.

तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ते गडहिंग्लजच्या घाळी कॉलेजवर आणि भेटलो आजरा विकास परिषदेत. तुमच्या वागण्या-बोलण्यातला साधेपणा कायम लक्षात राहणारा आहे. कुर्ता, पायजमा, रूमाल आणि एक शबनम पिशवी. त्या पिशवीत चार-दोन पुस्तकं, कार्यक्रमाची पत्रकं, एखादा कपड्याचा जोड. मुद्दामहून वाढवलेली दाढी, जेमतेम अंगकाठी, डोक्यावरचे केस तर केव्हाचेच गेले होते. सदैव हसरा चेहरा आणि ‘कसा आहेस...’ म्हणून मायेनं जवळ घेणं. मग मनमोकळेपणानं गप्पा मारणं.. तुम्ही आलात की प्रसन्नता यायची. मनमोकळेपणानं बोलावं वाटायचं. वाचलेल्या पुस्तकांवर तुम्ही हमखास काहीतरी विचारायचा. मग गप्पा अधिकच रंगायच्या. कुठल्या विषयावर सध्या लिहितोयस, कुठल्या आंदोलनात भाग घेतलास.. हे तुमचे प्रश्न खूप बोलतं करायचे.

‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकात काम करतोय म्हणून मला रिपोर्ताज लिहिण्यासाठी तुम्ही आजऱ्याला बोलावलं. मी ‘आजरा विकास परिषद’ अनुभवली. शाश्वत विकास, पश्चिम घाटात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न, विकासाचा असमतोल, शाश्वत विकास, छोटी धरणे, विकासाचे प्रकल्प, शासनाची भूमिका, जल-जमीन-जंगल अशा कितीतरी गोष्टींची चर्चा या परिषदेत झाली. सामान्य कष्टकरी वर्गातील मुलांना, महिलांना तुम्ही बोलतं केलं होतं. तुम्हा विद्रोही कार्यकर्त्यांच्या आधारामुळे महिला प्रश्न मांडत होत्या, तरुणांमध्ये जाणीव जागृती दिसून येत होती. मिलिंद बोकील, धनाजी गुरव, मेधा पाटकर आणि एन. डी. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन तिथं झालं. आपापल्या घरून भाकरी घेऊन आलेले हजारो कष्टकरी लोक आपल्याला पुढं कसं जायचंय हे शांततेत ऐकत होते. तुमच्यातला कार्यकर्ता मी इथं अनुभवला. जवळच चंदगडच्या दिशेने बाबू धनगर (बाबू दा) यांच्या पाड्यावर जाऊन तुमचं काम पाहता आलं. तुमचं काम एकाच वेळी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरही होतं आणि लेखक, साहित्यिक म्हणून बौद्धिक स्वरूपाचंही होतं. तो रिपोर्ताज तर निमित्त झाला, पण तुमच्याशी त्यानिमित्ताने आयुष्यभर मैत्री झाली.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीने बसवकल्याण (कर्नाटक) ते देहू (महाराष्ट्र) अशी ‘समतेची युगदिंडी’ काढली होती. यामध्ये शेकडो युवक-युवती सहभागी झाले होते. संतवाङ्मय, परिवर्तनवादी विचारवंतांचे विचार रूजवत ही दिंडी दहा दिवस सुरू होती. धनाजी गुरव, पार्थ पोळके, दत्ता चौगले ही मंडळी यात अग्रेसर होती. या युगदिंडीशी मला तुमच्यामुळेच जोडून घेता आलं. वेगवेगळ्या सभांमधून बसवेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या कार्याची तुम्ही सर्वांना सद्यस्थितीतली गरज सांगत होता. कितीतरी भोंदू साधू, धर्ममार्तंडांवर तुम्ही टीका केली. त्यांचा बुरखा फाडला. काही विद्रोही लोक संत ज्ञानेश्वरांचं नाव जरी घेतलं तरी कपाळावर आठ्या आणायचे, पण तुम्ही इतक्या कोत्या मनाचे कधीच नव्हता. आम्ही नामदेवांपासून ते चोखामेळ्यापर्यंत आणि बसवण्णांपासून ते महात्मा फुलेंपर्यंत बहुजन समाजातील विचारपरंपरा समाजात मुद्दामहून का रूजवतोय याचा तुम्ही जो सौम्य शब्दांत खुलासा करून सांगायचा. मला तुमच्यातला हा संवादी लेखक, विचारवंत आपलासा वाटायचा. समतेच्या युगदिंडीत तुम्ही जे काम केले, जे विचार दिले ती माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी न सरणारी शिदोरी आहे. हा माझ्या सोशलायझेशनचा महत्त्वाचा टप्पा समजतो मी. माझ्यासारख्या अनेक युवक-युवतींच्या सोशलायझेशनच्या प्रक्रियेत तुम्ही भेटल्याने मोलाची भर पडली आहे.


राजा शिरगुप्पे यांनी कर्तव्यसाधना साठी लिहिलेले सर्व लेख येथे वाचा.


‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ सर तुम्हाला गंमतीने म्हणायचे, “राजाभाऊ, तुम्ही विद्रोही कार्यकर्ते नाही आहात.” तुम्ही नुसते हसायचा. मला पण कधीकधी तसंच वाटायचं, पण मी विद्रोही आहे म्हणजे नेमका कोण आहे, हे तुम्ही कामातून, विचारांतून दाखवून द्यायचा. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार स्वीकारताना तुम्ही भर स्टेजवरून सांस्कृतिक मंत्र्यांसमोर सरकारला न घाबरता खडे बोल सुनावले होते. मला एक तुमच्यातली गोष्ट जाणवली, तुमचा विद्रोह हा विद्रोही विचारवंताच्या जागी असायचा. त्या पलीकडे जाऊन तुम्ही दोस्ती, प्रेम करायचा. तुमच्यात खूपच सौम्यता आणि मृदूपणा होता. जो माणूस आपल्या विचारांचा नाही, त्यांच्याबद्दलही आदर बाळगायचा ही शिकवण तुम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांकडून घेतली होती. एक प्रसंग मला आठवतोय. साधना साप्ताहिकाच्या एका अंकात तुमच्या लेखाचा प्रतिवाद नांदेडच्या बालाजी चिरडे यांनी केला होता. अनेक वाचकांना तो प्रतिवाद खटकला होता. पण तो प्रतिवाद वाचून तुम्ही त्यांच्यावर राग धरला नाही, उलट प्रत्यक्ष भेटीत तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, तुमची मतं शांतपणे त्यांना ऐकवली आणि त्यांचंही शांतपणे ऐकलं. तुमच्यातला हा संवादी माणूस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर संस्कार करत गेला.

तुम्ही अभिमानानं सांगायचा, “मी साधनेचा लेखक आहे, मी डॉ. दाभोळकरांचा लेखक आहे.” डॉ. दाभोळकरांनी तुमच्याकडून लिखाण करवून घेतले. त्या लिहिण्याला बळ दिले. ‘शोधयात्रा महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागाची’, ‘शोधयात्रा ईशान्य भारताची’, ‘न पेटलेले दिवे..’ ही तुमची पुस्तकं पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून आम्हाला लिखाणाची दिशा दाखवणारी आहेत. पायाला भिंगरी बांधून फिरणारा, कसलंही नियोजन न करता दिशा मिळेल तसं फिरून, शोध घेऊन लिखाण करणारा पत्रकार, लेखक, कार्यकर्ता म्हणून तुम्ही लिहिलं. तुमचं ‘साधनाचा लेखक’ असणं हे मला सगळ्यात आवडलेलं बिरूद होतं. बिहारवरचं तुमचं लिखाण, काश्मीरचा प्रवास हा तर मनात रूतून बसलेला आहे. हा माणूस ‘प्रॉमिथिअस’ या नावाने एका बाजूला कविता लिहितो, ‘कफान’ सारखी नाटकं लिहितो, रिपोर्ताज लिहितो, प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रणं लिहितो आणि त्याच वेळी कार्यकर्ता म्हणूनही झोकून देऊन काम करतो, गंभीर भाषणंदेखील करतो हे मला खूप भावायचं. विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाशी आपली मैत्री आहे, हे मला खूप अभिमानाचं वाटायचं. साहित्यिक म्हणून तुम्ही केलेल्या कार्याची दखल घेऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तुमचा हा यथोचित सन्मान केला होता. विद्रोहीशी बांधिलकी तुम्ही कधीही सोडली नाही. गणेश देवींसोबत लेखक-साहित्यिकांच्या दक्षिणायन चळवळीत, कोल्हापूर परिसरातल्या देवदासी चळवळीत, विडी कामगारांच्या आंदोलनात, शेतकरी चळवळीत, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत तुम्ही मोलाची भूमिका बजावली.

आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलेल्या तरुण मुलामुलींना आधार देणारे राजाभाऊ हे मी स्वत:देखील अनुभवलेत. आंतरजातीय लग्नानंतर कोणत्या सामाजिक अडचणी येतात, त्याला तोंड कसं द्यायचं, कुटुंबात समानतेनं कसं वर्तन करायचं, सामाजिक कामात स्वतःला कसं झोकून द्यायचं हे आपुलकीनं सांगणारे राजाभाऊ मला आपले पालक वाटतात. आपलं दु:ख ज्याला सांगावं, हलकं व्हावं असा निखळ मैत्री करणारा माणूस मी तुमच्या जाण्यानं गमावला. आपल्या वयात जवळपास 30-32 वर्षांचं अंतर होतं, पण मैत्रीत मात्र हे कधीच आडवं आलं नाही. माझ्यापेक्षा वयाने लहान असणारे कितीतरी मित्र तुम्हाला होते. मी माझ्या प्रेमविवाहाबद्दलही तुम्हाला सांगितलं. पाठीवरती थाप देऊन मला तुम्ही शुभेच्छा तर दिल्याच पण प्रेमविवाह केल्यानंतर येणाऱ्या अडचणी, त्यांना कसं सामोरं जायचं आणि भविष्यात कसं चांगलं काम करायचं हेही सांगितलं.

अलीकडच्या काळात तर तुमच्यातला कुटुंबवत्सल माणूस मी अनुभवला होता. आपल्या नवोदित कार्यकर्त्याची बायको आजारी आहे म्हणून तिला खायला नाचणी घेऊन जाणारा तुमच्यातला बाप मी अनुभवला. जशी तुम्ही रोहन आणि अनुजाची काळजी घ्यायचा तशीच तुम्ही कार्यकर्त्यांची काळजी घ्यायचा. संजिवनीताईंबद्दल तुम्ही किती प्रेमाने बोलायचा. तुमचा संसार म्हणजे आमच्यासाठी आदर्श सहजीवन होते. तुमच्या वाट्याला वेदनादेखील आल्या, लोकांनी टीका केली, हिणवलं, जवळच्या लोकांनीही दु:ख दिलं, पण त्याची फारशी वाच्यता तुम्ही कधी केली नाही.

राजाभाऊ, तुमच्याकडून खूप काही करायचं राहून गेलं. तुम्हाला अक्कमहादेवीवर कादंबरी लिहायची होती, महात्मा बसवण्णांवर पुस्तक लिहायचं होतं, संचित नावाचं मासिक काढायचं होतं, नाटक-चित्रपटासाठीही काहीतरी प्रयोग करायचा होता... पण तब्येत ढाळसत गेली. लिखाण कमी होत गेलं. आणि आता ते सगळंच राहून गेलं. तुमची प्रत्यक्षात कधीच भेट होणार नाही. मात्र तुमच्यातला कार्यकर्ता, लेखक, मित्र सदैव स्मरणात राहील.

शरणु शरणार्थी!

- सतीश देशपांडे
sdeshpande02@gmail.com 
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)


'साधना'कडून आलेली राजाभाऊंची तीन महत्त्वाची पुस्तके :

 

Tags: राजा शिरगुप्पे श्रद्धांजली स्मृतीलेख कार्यकर्ता देवदासी आदिवासी चळवळ raja shirguppe obituary Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Worth reading article. Real tribute to the dear and good friend. Thanks

संदीप बर्वे

प्रभावी लेख. खुप आवडला

अनंत तडवळकर

खूप भावणारे लेखन!

Deepak Borgave

खूप छान लिहिलं आहे

Add Comment