'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन' सह अनुभवलेला काश्मीर - पूर्वार्ध

ते परीकथेतल्या शहरासारखे दिसणारे टुमदार श्रीनगर मी भारावलेल्या डोळ्यांनी पाहत होते. 

व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली डॉ. ऐश्वर्या रेवडकर सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहते. विविध सामाजिक उपक्रमांत तिचा सक्रीय सहभाग असतो. किशोरवयीन आणि महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी Menstruation, Sex Education, Feminism and Gender Equality या विषयांवर ती सेशन्स घेते. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील आदिवासी भागात रुग्णसेवा करत असताना अनुभवलेले आदिवासी जनजीवन, तिथले सकारात्मक बदल आणि झालेले सर्जनशील प्रयोग तिने शब्दबद्ध केले. 'बिजापूर डायरी' या नावाने प्रसिद्ध झालेल्या साधना प्रकाशनाच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार नुकताच मिळाला. ऐश्वर्याने  29 मार्च ते 10 एप्रिल असा वीस दिवसांचा काश्मीर दौरा केला. आणि या भेटीत तिने पाहिलेला, अनुभवलेला काश्मीर शब्दबद्ध केला. दोन भागांत प्रसिद्ध होणाऱ्या रिपोर्ताजरुपी अनुभवाचा हा पूर्वार्ध. उत्तरार्ध उद्या प्रसिद्ध होईल.  

भारताच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी काश्मीरची दोन चित्रे कायम रंगवली आहेत. एक- म्हणजे भारतातील स्वर्ग तर दुसरे- काश्मीर म्हणजे भारताची भळभळणारी जखम. या दोन टोकांच्या मध्ये नक्की काय वसले आहे ते पाहण्यासाठी काश्मीरला जाण्याची माझी उत्सुकता मला कधीच शांत बसू देत नाही. भारतामध्ये मी कुठेही असले तरी मनामध्ये काश्मीर दबा धरून बसलेले असते. चार वर्षांपूर्वी मी ट्रेकिंगसाठी काश्मीरला गेले होते आणि परतले ते परत पुन्हा जायचे हे नक्की करूनच... परंतु पहिल्या भेटीत हिमालयाच्या कुशीत जाऊन आलेल्या मला या वेळी मात्र तेथील जनमानसात राहायला जायचे होते. 

काश्मीरमध्ये कुठेही म्हणजे अगदी श्रीनगरच्या भर गर्दीच्या रस्त्यावर अथवा छोट्या गावामध्येही बंदूकधारी सैनिक सतत गस्तीवर असतात. ते डोळ्यांत भरल्याखेरीज राहत नाही. माझ्यासोबतचे ट्रेकिंग गाईड मला एकदा म्हणाले होते, ‘आमची मुले लहानपणापासून दररोज प्रत्येक क्षणी हे बंदूक घेतलेले शिपाई पाहतच मोठी होतात. याचा परिणाम त्यांच्या मनावर झाल्याखेरीज राहत नाही.’ त्या वेळी मी श्रीनगरमध्ये असताना न्यूज चॅनेलवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या या भडक रंगवलेल्या होत्या. श्रीनगरमधील परिस्थती तणावग्रस्त असून कशी हाताबाहेर चालली आहे वगैरे. परंतु तिथे असणारे आम्ही महाराष्ट्रीय लोक मात्र प्रत्यक्ष पाहत होतो की, तिथे तसे काहीच नाहीये. उलट आम्ही तिथे गाडीने फिरतही होतो. सर्वत्र शांत वातावरण होते. 

तिथून परतल्यावर मी दिल्लीत मुक्काम केला. दिल्लीला बीबीसी न्यूजमध्ये ब्रॉडकास्ट जर्नालिस्ट म्हणून काम पाहणारी माझी तडफदार मैत्रीण प्राजक्ता धुळप, तिच्याशी मी याबाबत चर्चा केली. तिने स्वतः कामानिमित्त काश्मीरमध्ये शोधदौरा करून तेथील लोकांच्या अस्वस्थतेबद्दल लोकमतमध्ये लेखमालिका लिहिली होती. ती 2016मध्ये महाराष्ट्र 1 वरील ‘ग्रेट भेट’ कार्यक्रमाची प्रोड्युसर होती. ग्रेट भेटमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी घेतलेली अधिक कदम या तरुणाची मुलाखत तिने मला दाखवली. 

एस. पी. महाविद्यालयात पॉलिटिकल सायन्स शिकणारा, नगरच्या शेतकरी कुटुंबातील हा तरुण 19 वर्षांचा असताना अभ्यासदौऱ्यासाठी म्हणून 1997मध्ये काश्मीरच्या कुपवाडा या भारत-पाक सीमेवर असणाऱ्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात गेला, तेथील हिंसाचार त्याने प्रत्यक्ष पाहिला... परंतु ते पाहून घाबरून जायचे सोडून उलट याला ‘काश्मीर’ नावाच्या सुंदर परंतु पोरक्या स्वप्नाची मोहिनी पडली. त्याचे जीवन आणि कर्त्यव्य तिथेच रुजले, उगवले, फोफावले. 

अधिक कदमने त्याच्या सहकाऱ्यांसोबत 2002मध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन (बीडब्ल्यूएफ) या संस्थेची स्थापना केली. काश्मीरमध्ये सततच्या चालणाऱ्या हिंसाचारात अनाथ झालेल्या मुलींसाठी ही संस्था वसतिगृह चालवते. सुरुवातीला कुपवाडा जिल्ह्यात चार मुलींना घेऊन संस्थेची सुरुवात झाली. सध्या काश्मीर खोऱ्यात चार आणि जम्मूमध्ये एक अशी पाच वसतिगृहे ही संस्था चालवते. अगदी दीड वर्षांच्या असल्यापासून काही मुली तिथे वास्तव्यास आहेत. त्यांची बारावीपर्यंतची सर्व सोय, शिक्षण वसतिगृहात राहून होते. बारावीनंतर त्यांची गुणवत्ता, गरज आणि इच्छा पाहून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. गुणवत्ता असलेल्या मुलींना बीडब्ल्यूएफकडून पुणे, कन्याकुमारी, बेंगलोर येथील इंजिनिअरिंग, ग्राफीक डिझायनिंग, इतर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम यांसाठी पाठवले जाते. अधिकच्या संस्थेने पालकाची भूमिका पार पाडत कित्येक मुलींची लग्नेही लावली आहेत. निखिल वागळे यांनी घेतलेली अधिकची मुलाखत मी पाहिली आणि तेव्हाच ठरवले की, एके दिवशी याचे काम पाहायला जायचे. फेसबुकवरून अधिक कदमचा नंबर घेऊन फोन केला आणि तोही आत्मीयतेने ‘ये’ म्हणाला. 

माझे नियोजन असे होते की, अधिक कदमच्या संस्थेचे काम प्रत्यक्ष पाहायचे, त्यातून जितके शिकता येईल तितके शिकायचे, ज्याचा उपयोग मला छत्तीसगडमधील मुलींसाठी काम करताना होईल. मी या मुलींसाठी काही सेशन्स घ्यायचे ठरवले... जे मी जिथे जाईल तिथे वाढत्या वयातील आणि महाविद्यालयीन मुलामुलींसाठी घेते. त्यामध्ये मी गुड टच बॅड टच, मासिक पाळीमागचे विज्ञान आणि त्याला जोडल्या गेलेल्या गैरसमजुती, कुमारावस्थेतील बदल, लैंगिक शिक्षण, लैंगिक अपराध, लिंग समानता, शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्रीवाद या सर्व विषयांवर मुलांच्या भाषेत गोष्टीरूपात चर्चा करते. 

स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचा फायदा हा की, विज्ञानवादी मानसिकता व आरोग्य शिक्षणयांचा योग्य मेळ घालून बोलता येते. अधिक सरांनी मला बीडब्ल्यूएफसोबत जोडल्या गेलेल्या आणि संस्थेच्या ज्येष्ठ सल्लागार असलेल्या जया अय्यर यांचा नंबर दिला. फोनवर बोलून त्यांनी माझ्या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन करून दिले, सखोल माहिती दिली. प्रेमाने काश्मीरमध्ये माझे स्वागत केले. त्यांच्याशी बोलल्याने मला वाटणारी थोडीफार काळजी दूर झाली. 

29 मार्चला संध्याकाळी मी श्रीनगर विमानतळावर उतरले. बाहेर पडताच समोर गुलाबी नाजूक फुलांचा बहर फुललेल्या पीचच्या झाडाने माझे स्वागत केले. श्रीनगरचे बीडब्ल्यूएफचे मुलींचे होस्टेल ‘बसेरा-ए-तबस्सुम’चा पत्ता सांगून मी प्रिपेड टॅक्सी केली. टॅक्सीचालकाशी गप्पा मारताना त्याने प्रश्न केला, ‘मॅडमऽ बताइये, कैसे लग रहा है आपको हमारा श्रीनगर? मिडिया में दिखाते है वैसा कुछ है क्या यहाँ?’

त्याच्या प्रश्नामागची कळकळ मला स्वच्छ जाणवली आणि समजलीही. (हा प्रश्न मला पुढच्या काही दिवसांत अनेकवेळा विचारला गेला.) ते परीकथेतल्या शहरासारखे दिसणारे टुमदार शहर श्रीनगर मी भारावलेल्या डोळ्यांनी पाहत होते. मी त्याला सांगितले की, ‘बिलकुल वैसा नही है। बहुत सुंदर और शांत है आपका श्रीनगर।’ 

खूश होऊन त्याने मला एका छानशा चहा टपरीवर नेले. काश्मीरमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे चहा मिळतील, एक नमकीन ‘नून’ चाय- गुलाबी रंगाचा, जो मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून करतात. हा इथे मोठ्या प्रमाणात प्यायला जातो... तर दुसरा आपला महाराष्ट्रीय चहा, ज्याला तिथे लिप्टन चाय असे म्हटले जाते. तिथे मैद्याची एक प्रकारची रोटी मिळते. तिला ‘गिर्दा’ असे म्हणतात. पुढचे काही दिवस मी नून चाय व गिर्दा यांवरच जगले. श्रीनगरच्या ‘बसेरा ए तबस्सुम’ला म्हणजे मुलींच्या होस्टेलमध्ये पोहोचले तेव्हा तेथील प्रोजेक्ट मॅनेजर निसार मीर यांनी माझे आनंदाने स्वागत केले. बीडब्ल्यूएफकडून चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या  प्रत्येक होस्टेलला एक प्रोजेक्ट मॅनेजर (पुरुष/स्त्री); एक हाऊस मॅनेजर (स्त्री); हाऊस मदर (स्त्री), जी मुलींची काळजी घेते; कुक; वॉचमन असा स्टाफ कमीअधिक प्रमाणात गरजेनुसार आहे. काही ठिकाणी हाऊस मॅनेजर असलेल्या मुली या पूर्वी इथे विद्यार्थी म्हणून आलेल्या आणि मोठ्या झाल्यावर शिकून या पदावर पोहोचलेल्या आहेत. 

निसार मीर यांनी मला मुलींच्या ताब्यात सोडले आणि मी सर्व पोरींशी ओळख करून घेतली. थंडीपासून बचावासाठी मध्ये कांगरी किंवा हिटर ठेवून सर्वांनी त्याकडेने पाय ठेवून बसायचे आणि वरून एकच मोठी चादर सर्वांनी पांघरून घ्यायची अशी पद्धत. असे बसल्यावर जवळीक निर्माण व्हायला किती वेळ लागणार? त्यात आमची एक आवड जुळली. ती म्हणजे कोक स्टुडिओची गाणी. अतीफ अस्लमचे माझे आवडते गाणे ‘ताजदार-ए-हरम’ हे पोरींनी गोड सुरात गाऊन दाखवले. मग रात्र होईपर्यंत आम्ही वेगवेगळे खेळ खेळत राहिलो. त्यातील अकरावी-बारावीतील मुली राबिया, इकरा, शहदा, निदा यांच्या तल्लख बुद्धीने आणि समजूतदारपणाने माझे मन जिंकून घेतले. सर्व 18 मुलींनी माझ्याकडून प्रत्येकीचे नाव तोंडपाठ करवून घेतले. 

गप्पांमध्ये मी म्हणून गेले की, ‘तुम्ही काश्मीरमध्ये जन्माला आला आहात कारण तुम्ही नशीबवान आहात, इतके सुंदर आहे काश्मीर.’ त्यावर एकीचे उत्तर आले की, ‘मला नाही आवडत इथे काश्मीरमध्ये कारण खूप भेदभाव केला जातो मुलामुलींमध्ये. माझ्या भावाला माझ्यापेक्षाही कमी मार्क्स मिळाले तरी त्याला घरी भेटवस्तू दिल्या जातात. मला पुष्कळ जास्त मार्क्स मिळूनही घरी कोणी माझे कौतुकसुद्धा केले नाही.’ तिनेच मग मला विचारले की, ‘दीदीऽ तुला कसा नवरा हवा?’ या अनपेक्षित प्रश्नातून मी सावरायच्या आधी तिने स्वतःच उत्तर दिले की, ‘मला अमेरिकेतला जन्टलमन नवरा हवा... जो मला पाहिजे तो जॉब करू देईल.’ मी तिला अमेरिकेत जायचे कारण विचारले तर ती उत्तरली की ‘शिक्षण घेऊन आम्ही स्मार्ट होतो. इथे श्रीनगरमध्ये शहरी राहणीमानातल्या स्वतंत्र मुली पाहून आम्हालाही तसे राहावेसे वाटते परंतु घरच्यांची अपेक्षा असते की, आम्ही मात्र गावातील दबून राहणाऱ्या मुलींसारखेच राहावे. असे कसे शक्य आहे?’

मुलींचा हा प्रश्न केवळ काश्मीरचा नसून भारतीय समाजाचा प्रातिनिधिक प्रश्न होता. पहिल्या दिवशी मी मुलींचे सर्व ऐकायचे ठरवले होते. त्या रात्री मुली ‘शब-ए-बरात’ असल्याने प्रार्थना करत जागणार होत्या. एक मुलगी म्हणत होती, ‘मैं आज अल्लाह से बहुत सारी दुवाये माँगनेवाली हूँ ।’ ती काय काय मागेल याचा विचार करत-करत प्रवासाच्या थकव्याने मी झोपून गेले. 

सकाळी उठले तेव्हा पोरी झोपेत होत्या. इकरा मात्र उठून माझ्यासाठी दुकानातून गिर्दा रोटी घेऊन आली. नून चहा आणि गिर्दा रोटी खाऊन मी होस्टेल सोडले. आज मी अनंतनागला जाणार होते. काश्मीरच्या या भेटीत पब्लिक ट्रान्सपोर्टनेच पूर्ण प्रवास करायचा मी ठरवलं होतं त्यामुळे स्थानिक लोकांशी बोलाचाली होतात, त्यांचे राहणीमान पाहायला मिळते असे मला वाटते... म्हणून मग दोन वेळा टॅक्सी बदलून मी अनंतनाग जिल्ह्यातील ‘मट्टण’ या गावी पोहोचले. तेथील बसेरा-ए-तबस्सुमचे प्रोजेक्ट मॅनेजर झहूर भैय्या यांनी माझे स्वागत केले. हाऊस मॅनेजर असलेली सुरैय्या सुरुवातीला इथे लहान असताना विद्यार्थिनी म्हणून आली होती, नंतर हाऊस मदर झाली आणि मग तिच्या कामाचा अनुभव पाहून तिला हाऊस मॅनेजर करण्यात आले. आमची लगेचच गट्टी जमली. अनंतनाग हा जिल्हा मी ‘हैदर’ या सिनेमामुळे ऐकून होते. याचे बरेच शुटिंग इथे झाले आहे. मट्टणपासून काही किलोमीटरवर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले पहलगाम आहे. 

बीडब्ल्यूएफच्या मट्टण इथल्या होस्टेलला स्वतःचे मैदान नाहीये... (सध्या झहूर भैय्या मैदान असलेली दुसरी इमारत शोधत आहेत, कोविडमुळे देणगीचा निधी कमी मिळतो आहे...) म्हणून मुली काही अंतरावर असलेल्या सरसोच्या शेतीमधील मोकळ्या जागेत खेळायला जातात. दुपारी मुली मला तिथे सोबत घेऊन गेल्या. खोखोपासून बॅडमिंटनपर्यंत आम्ही बरेच खेळ खेळलो. मुलींनी मला विचारले की, तुझा आवडता खेळ कोणता? मी सांगितले की, मी चेसची विजेती होते महाराष्ट्रामध्ये. मी त्यांना विचारले की, ‘कुणाला येते का चेस खेळता?’ उत्तरात नकार आले. मी म्हणाले की ‘मी शिकवेन तुम्हाला.’ 

संध्याकाळी किचनमध्ये एकत्र जमून सर्व जण नून चाय आणि गिर्दा रोटी खात होते. मला आपल्या चहाचपातीची आठवण आली. मग मी मुलींना स्टडी हॉलमध्ये गोळा करून बसले. प्रत्येक मुलीचे नाव आणि तिला मोठी झाल्यानंतर काय व्हायचे आहे ही सर्वसामान्य ओळखीची फेरी पद्धत जी कुठेही उपयोगी पडते ती वापरली. मग त्यांना माझीही ओळख सांगितली की, पुण्यात शिकलेली असले तरी मी छत्तीसगडमध्ये का काम करते, तिथे लोकांना काय समस्या आहेत, नक्षलवादी म्हणजे काय. मुलींसोबत पुढे दोन तास मासिक पाळी, लैंगिक शिक्षण, गुड टच बॅड टच या गप्पा रंगल्या. रात्री जेवण झाल्यावर गाणी म्हणतच आम्ही सर्व झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर मुली पहाटेच उठून अभ्यासाला बसल्या होत्या. त्या दिवशी काहींची परीक्षा होती. येताजाता प्रत्येक जण मी काय करतेय हे गेस्ट रूममध्ये डोकावून पाहून जात होती. रोज सकाळी अंघोळ करून, प्राणायाम आणि ॐकार करायची माझी सवय आहे. मुलींनी येऊन विचारले की, ‘तू हे काय करतेयस?’ मी सांगितले की, ‘मनाची एकाग्रता वाढावी म्हणून मी हे करते. ज्या दिवशी अवघड शस्त्रक्रिया असते तेव्हा तर मी हे जास्त करते. त्याने माझी शस्त्रक्रिया जास्त चांगली होते असे मला वाटते.’ पोरी लगेच माझ्यासमोर ठाण मांडून बसल्या की, ‘आम्हालाही हे शिकव.’

माझे पाहून त्यांनी पद्मासन घातले आणि आम्ही सर्वांनी मिळून 11वेळा ॐकार केले. मला खूप आनंद झाला... सर्वांच्या एकत्र ॐकाराचा नाद ऐकून. पोरी मग शाळेला पळाल्या. सुरैय्या मला त्या दिवशी पहलगाम पाहायला घेऊन गेली. मट्टणपासून काही किलोमीटर पुढे पहलगाम आणि चंदनवाडी ही पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली गावे आहेत. विविध सिनेमांचे शुटिंग येथे झाले आहे. आम्ही तेथील प्रसिद्ध झियारतही पाहायला गेलो, जिथे बजरंगी भाईजान या फिल्मची कव्वाली चित्रित झाली आहे. सर्वांसाठी तिथून प्रसाद म्हणून खूप मोठ्ठा पराठा आणि शिरा घेतला. घरी आल्यावर सर्वांनी तो वाटून खाल्ला. दुपारी जेवायला म्हणून आम्ही एक बिर्याणी आणि आठ कबाबचे तुकडे हॉटेलमधून पार्सल घेतले होते परंतु ते खायचे राहून गेले होते. ते सुरैय्याने आम्हा एकूण वीस जणांमध्ये समसमान वाटून दिले. खूप छान वाटले ते पाहून. लीडर असावा तर असा सर्वांना सोबत घेऊन चालणारा. मी जेव्हा तिचे कौतुक केले तेव्हा उत्तरादाखल ती म्हणाली की, ‘कदाचित मी स्वतःसुद्धा या सर्व मुलींसारखीच इथे लहानाची मोठी झालेय त्यामुळे मला प्रत्येकीचे मन चटकन समजते.’  

तिथे मला मेंढीचे, बैलाचे मांसही प्रेमाने खाऊ घातले गेले. मला एवढे आवडले नाही परंतु त्यांचे मन मोडायला नको म्हणून मी खाऊन घेतले. संध्याकाळी सुरैय्या मला तेथील प्रसिद्ध गुरुद्वारा पाहायला घेऊन गेली. या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या अनंतनाग जिल्ह्यात सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. जसे शिखांचे गुरुद्वारा आहे, तसेच एक शिवमंदिरही दिसले. काही किलोमीटर अंतरावर अतिप्राचीन व प्रसिद्ध मार्तंड मंदिरही आहे.   

अधिक कदम सरांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, ‘काश्मिरी पंडितांनी नव्हते जायला पाहिजे काश्मीर सोडून. जर सर्व धर्म काश्मीरमध्ये एकत्र नांदले तरच शांतता प्रस्थापित होऊ शकेल. केवळ एकाच धर्माच्या टोकाच्या विचारसरणीमुळे विघातक शक्तींना विनाशकारी काम रुजवायला सोपे जाते.’

संध्याकाळी आम्ही परतलो तेव्हा सर्व मुली नून चहा आणि रोटी खायला किचनमध्ये एकत्र जमल्या होत्या. त्यांचे हसणे, खिदळणे चालू होते परंतु दुसरीतील एक लहान मुलगी मात्र जोरजोरात रडत होती. तिच्या शेजारी तिची मोठी बहीण बसली होती. ती तिचे डोळे पुसत होती. हाताने तिला रोटी भरवायचा प्रयत्न करत होती. मी काळजीने त्या दोघींजवळ जाऊन बसले. बाकीच्या मुली मात्र निवांत होत्या, त्यांच्यासाठी हा प्रकार नित्याच्या सवयीचा होता. त्या मला म्हणाल्या की, ‘तिला भूतबाधा झाली आहे, तिला पीरकडे नेऊन फुंक मारायची आहे, मग ती ठीक होईल.’ मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला की, शाळेत काहीतरी होऊन तिला टेन्शन आले असेल, माझ्याकडे औषध आहे ते मी तिला देऊन ती ठीक होईल... परंतु कोणीही ते ऐकले नाही. उलट सर्वांनी पुन्हा मला समजावले की, ही भूतबाधा आहे, याला औषध चालत नाही. 

या सर्व गोंधळात एक व्यक्ती मात्र कमालीचा समंजसपणा दाखवत होती. ती म्हणजे रडणाऱ्या लहानीची मोठी बहीण. ती चेहऱ्यावर शहाणे स्मित ठेवून माझ्याशी बोलतच लहानीचे डोळे पुसत होती. कोणाकडेही लक्ष न देता, ती तिच्या बहिणीला मानसिक आधार देण्यात व्यग्र होती. हळूहळू लहानगी शांत झाली आणि बहिणीच्या हाताने रोटी खाऊ लागली. मग मीही शांत झाले. थोड्या वेळाने मी गेस्टरूममध्ये गेले तर हसतखेळत ती लहानगीसुद्धा आली. मी विचारले की, ‘कशी काय बरी झालीस तू?’ बाकी पोरी उत्तरल्या, ‘तिने थंड पाण्याने अंघोळ केली म्हणून.’ मग मी त्या पाचसहा पोरींना जवळ बसवून थोडे समजावले की, मानसिक आघाताने कसा काय असा त्रास होतो व ही भूतबाधा नसून याला मानसिक कारण आहे. त्यांना ते किती पटले काय माहिती परंतु त्या दिवशी तिला पीरकडे नेण्याचे मात्र टळले. मी तिच्या मोठ्या बहिणीला सर्वांसमोर सांगितले की, ‘आज तू तुझ्या बहिणीची काळजी घेऊन तिला बरे केले. मला तुझा अभिमान वाटला आज.’ तिचा तो गोड समजूतदार चेहरा माझ्या मनामध्ये कायमसाठी रुजला.  

रात्री मुलींसोबत पुन्हा बसून माझे उरलेले सेशन मी पूर्ण केले. त्यात मी मानसिक त्रास, आजार यांबाबतही माहिती दिली. मुलींचा खूप छान प्रतिसाद मिळाला. मी त्यांना मासिक पाळीच्या सुरुवातीच्या अनुभवांवर निबंध लिहायला सांगितला. तोयबा आणि बिल्कीश या अकरावी-बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलींनी दुसऱ्या दिवशी निबंध लिहून माझ्याकडे सोपवलाही. बिल्कीशला बारावीनंतर इंजिनिअरिंगला जायचे आहे. आम्ही चर्चा केली की, तुझे मार्क्स आले की सांग, आपण प्रयत्न करू चांगले कॉलेज शोधायचा. येथील सर्वच्या सर्व 18 मुलींनी त्यांची नावे माझ्याकडून रोज वदवून घेतली. दुसरीतील गुड्डी माझ्याजवळ तिचे इंग्लीशचे पुस्तक घेऊन आली आणि तिने इंग्लीशचा धडा घडाघडा वाचून दाखवला. तिची हुशारी पाहून मी चाटच पडले. बोलताना तिने टेबलावर तबल्यासारखी बोटे सुरेख वाजवून दाखवली, म्हणाली की अधिकभैय्याने शिकवले आहे असे वाजवायला. 

दुसऱ्या दिवशी मग मी पोरींसाठी बॅडमिंटनचे रॅकेट्स, फूल यांसोबतच छोटासा तबलाही घेतला. मुलींना म्हणाले की, ‘चेस शिकवते.’ तर एक लहान मुलगी म्हणे, ‘चेस खेळणे गुनाह आहे.’ बाकीच्या मुलींनीही त्याला पुष्टी जोडली. माझे मन मोडले पण मी त्यात ढवळाढवळ न करण्याचा निर्णय घेतला. सुरैय्याने सांगितले होते की, त्यांना मोठ्या फ्रीझरची गरज आहे भाज्या, फळे, मांस ठेवायला. मग आम्ही दोघींनी बाजारात जाऊन फ्रीझर विकत घेतला. एका छोट्या हत्तीमध्ये मागे टाकून, सोबत मागे उभे राहून आम्ही अनंतनागच्या बाजारातून मट्टणमधील होस्टेलला परत निघालो. समोर बर्फशिखरे दिसत होती. मला सुरैय्याच्या नेतृत्वगुणांचे कौतुक वाटले. एक पोरगी होस्टेलमध्ये येऊन शिकते काय, स्वावलंबी होते काय आणि आज होस्टेलच्या इतर मुलींची जबाबदारी इतक्या सक्षमपणे पार पडते काय, भारीच. तेही हा सर्व स्टाफ कमी पगारामध्ये काम करतो. कोविडमुळे बीडब्ल्यूएफला मिळणाऱ्या देणग्यांवर बराच परिणाम झाला आहे त्यामुळे पगार आणखी कमी मिळतोय पण तरीही अधिक सरांचा स्टाफ मात्र पूर्ण अर्पणभावाने हे जबाबदारीचे काम करतोय. 

त्यानंतरच्या सकाळी मी पुढे बिरवा या ठिकाणी निघणार होते. पोरी ‘जाऊ नको’ म्हणून मागे लागल्या होत्या. मी मुद्दाम जीन्स आणि सुपरमॅनचा लोगो असलेला टी-शर्ट असा पेहराव केला होता. एकदोन मुली म्हणाल्या की, ‘दीदीऽ दुपट्टा घे.’ मी निक्षून सांगितले की, ‘मला आवडत नाही दुपट्टा.’ (इस्लाममध्ये हिजाबची पद्धत आहे, ज्यात दुपट्ट्याने केस कायम झाकलेले ठेवायचे असतात.) मी मुलींना विचारले सुपरमॅनबद्दल तर त्यांना माहिती नव्हते. काश्मिरी भागात मुलींना बाहेरच्या जगाचे एक्स्पोजर खूपच कमी आहे. एकतर दोन वर्षांपासून मोबाईलचे 4G नेटवर्क ही बंद होते. सतत कर्फ्यू लावलेला असतो. कसे वाहणार मोकळे वारे इथे?

मला निघायचे होते म्हणून मग जाण्याआधी भरपूर फोटो काढले. मग पोरी म्हणाल्या, ‘आम्ही तू शिकवलेले योगा करून दाखवतो.’ म्हणून पद्मासन घालून त्यांनी ‘इकरा’ या शब्दाचा उच्चार केला. (इकरा या शब्दाचा अर्थ शिक्षण घेणे. या शब्दाला इस्लाममध्ये महत्त्व आहे.) पण मला आत कुठेतरी ते खटकले. मला हिंदू धर्माभिमान नाहीये परंतु तरीही वाईट वाटले की, जर आपण एकदुसऱ्याचा धर्म स्वीकारू नाही शकलो तर समाजात सहिष्णुता कशी येईल?

मी मुलींना विचारले की, मी तर तुम्हाला ‘ॐकार’ शिकवले तर मुली म्हणाल्या, ‘मौलवीसाहब म्हणाले, ॐकार म्हणणे गुनाह आहे म्हणून आम्ही ‘इकरा’ म्हणणार.’ गुनाह हा शब्द सारखा ऐकून मी वैतागले होते. मग मी पोरींना गोळा केले आणि समजवायचा प्रयत्न केला की, ‘मी जरी धर्माने हिंदू असले तरी मी एक वेगळा धर्म मानते. तो म्हणजे माणुसकीचा धर्म, हा धर्म मी इतर सर्व धर्मांच्या वर मानते. या माणुसकीच्या धर्माची शिकवण एकच की, एकदुसऱ्याला मदत करा, प्रेम द्या. माझ्यासाठी हॉस्पिटल हेच मंदिर आहे, माझे रुग्ण माझा देव आहे आणि त्याची सेवा हीच माझी इबादत आहे.’पोरी शांतपणे ऐकत होत्या. ‘गुनाह म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे, वाईट वागणे, खोटे बोलणे, चोरी करणे. बास एवढेच गुनाह. बाकी ज्या गोष्टीने कोणाला काही त्रास किंवा इजा होत नाही त्या गोष्टी करायला कोणताच देव मनाई करत नाही.’ 

तिथून निघाले तरी माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली होती, रडू आले होते मला. हा प्रश्न फक्त इस्लाम धर्माचा नाहीये. कोणताही धर्म असो, धार्मिकता टोकाची असेल तर ती नुकसानकारकच आहे. मागे एकदा बनारसला  गेले होतेतिथे उपवास आहे म्हणून औषधे न खाणाऱ्या स्त्रिया भेटल्या होत्या. हिंदू धर्मातील सणावारातील 70-80टक्के कामांची जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडते. मोल नसणारे काम म्हणजे साफसफाई, स्वयंपाक, उपवासतापास, पूजेची तयारी हे सर्व स्त्रियांवर येते तर सोवळे नेसून देवाजवळ बसायचा मान मात्र ब्राह्मण पुरुषाला असतो. आत्तापर्यंत मी हिंदूमंदिरात मंत्रोच्चार करणारी एकही स्त्री पाहिलेली नाही. सर्वत्र पुरुषच. स्त्रियाच अनेकदा पुरुषसत्ताक पद्धतीच्या वाहक ठरतात आणि धर्माच्या रुढी, परंपरा, चालीरिती या गोष्टी गुलामगिरी कशी साजरी करायची याचे धडे त्यांना देतात. 

भावनिक त्रास होत होता म्हणून अधिक सरांना फोन करून ॐकार अनुभव सांगितला. त्यांनी छान समजावले. ते म्हणाले  की, ‘ॐकार नुसते नाही म्हणायचे, त्यामागची भावना समजून घ्यायची. आपला प्रत्येक शब्दच ॐकार झाला पाहिजे. मी तो प्रयत्न करतो म्हणून लोक मला म्हणतात की, तुमचा आवाज पोटातून, गाभ्यातून आल्यासारखा येतो. मुलींनी ॐकारऐवजी इकरा म्हटले तर वाईट कशाला वाटायला हवे? तू शिकवलेले त्यांच्यापर्यंत पोहोचले ना? मग ते कोणत्याही रूपात असो.’ अधिक सरांचे बोलणे ऐकून माझे मन मोकळे झाले, वाईट वाटायचे थांबले, उलट स्वतःच्या मनाचा कोतेपणा लक्षात आला. पुन्हा त्यांना म्हणाले की, ‘मुलींना चेस खेळायचा हक्क तरी मिळायला हवा ना? त्यांना नाही आवडला तर न खेळू देत. परंतु गुनाह आहे म्हणून खेळायचा नाही हे चुकीचे नाही का?’

त्यांनी त्यावर सांगितले की, ‘आज त्यांच्यासाठी शिक्षण मिळणे सर्वात महत्त्वाचे आहे. उद्या शिक्षण घेऊन त्या आत्मनिर्भर होतील तेव्हा त्यांच्या आयुष्याचे निर्णय त्या घेतील परंतु आज सर्व समाजाचे लक्ष आपल्या होस्टेलकडे आहे. धर्माच्या विरोधात जाण्याच्या नादापायी उद्या जर मुलींचे होस्टेल बंद करावे लागले तर ते परवडेल का? मुलींना इथे होस्टेलला मिळणारे मोकळे अवकाश जपायलाच हवे कसेही करून... तर त्या शिकू शकतील, मोठे होऊन त्यांचे निर्णय त्या घेऊ शकतील.’

अनेक नवे संभ्रम रोज डोक्यात निर्माण होत होते, अधिक सरांचे बोलणे समजून घ्यायचा प्रयत्न मी माझ्या परीने करत होते. स्त्रीवादी लेखन करणाऱ्या माझ्या प्रोफेसर आईला फोन करून मी माझी चरफड व्यक्त केली तर तिनेही अधिक सरांच्या बोलण्याला पुष्टी दिली. साधी सायकल चालवणे ही आपल्याकडे सहजसोपी गोष्ट पण काही कट्टर मुस्लीम लोक मुलींनी सायकल चालवायलाही प्रतिबंध करतात...सबुरीनेच घ्यावं लागेल. 

अधिक कदम यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, कित्येक वेळा त्यांना दहशतवाद्यांशी चर्चा करण्याचा प्रसंग आला आहे. एकूण 18-20  वेळा तर जीवावर बेतले आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत विघातक शक्तींनी बसेरा-ए-तबस्सुम बंद करण्यासाठी, त्याच्या विरोधात फतवे काढले होते. एक हिंदू तरुण पुण्यातून काश्मीरमध्ये येऊन मुस्लीम, अनाथ मुलींसाठी वसतिगृह चालवतो ही धर्मांध शक्तींना, मौलवींना न पचण्यासारखी गोष्ट होती. त्यांनी अधिक कदमच्या कामाला प्रचंड विरोध केला. त्याला समाजातून बहिष्कृत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. काहींना वाटले की, हा हेरगिरी करायला आलाय तर काहींना वाटले की, हा मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतोय. सतत मौलवींनी त्यांच्याविरोधात फतवे काढले. 

या सर्व विरोधी, शंकाखोर आणि दहशतीच्या वातावरणात अधिक कदम यांनी समाजाच्या, तेथील रहिवासी लोकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे एका वसतिगृहापासून सुरुवात करून आज काश्मीरमध्ये पाच वसतिगृह उभे केले आहे. कित्येक मुली शिकून बाहेर पडल्या आहेत, स्वतःच्या कमाईद्वारे आपली कुटुंबे पोसत आहेत. कित्येक मुलींच्या लग्नाचा खर्चही संस्थेने स्वतः उचलला आहे. इथे येणाऱ्या मुली या हिंसाचारात आईवडील गमावून अनाथ झालेल्या आहेत किंवा अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या घरातून आलेल्या आहेत. कित्येकींच्या घरी सातआठ भावंडे आणि घरात एकच कमावती व्यक्ती. अशा वेळी संस्था मुलींचे पूर्ण वेळ पालकत्व स्वीकारते. बीडब्ल्यूएफ संस्थेचे सर्व काम हे देणगीदारांच्या पैशातून चालते. अधिक सर सांगतात की, 80 टक्के देणग्या या महाराष्ट्रातून येतात. महाराष्ट्रीय लोकांचे भक्कम पाठबळ अधिकच्या कामाला लाभले आहे.

- डॉ. ऐश्वर्या रेवडकर, बिजापूर (छत्तीसगड)
zerogravity8686@gmail.com


या लेखाचा उत्तरार्ध उद्या प्रसिद्ध होईल

Tags: रिपोर्ताज काश्मीर डॉ. ऐश्वर्या रेवडकर अधिक कदम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन Reportage Dr. Ayshwarya Revadkar Adhik Kadam Borderless World Foundation Kashmir Load More Tags

Comments:

Munjewar bk

Very nice

विष्णू दाते

अतिशय उद्बोधक, माहितीपूर्ण लेख! अधिक सरांच्या कामाचे मोल काय वर्णावे? छान.! डाॅ. ऐश्वर्याचे सुंदर लेखनाबद्दल अभिनंदन!

Vivek Date

You and the work of your organization is hope of secular India

Arun Taukari

Very well written. I congratulate for UR courage & confidence to travel through Kashmir for educating girls over there. Best wishes....

Add Comment