'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन' सह अनुभवलेला काश्मीर - उत्तरार्ध

अनाथ काश्मीरला कर्मभूमी मानून, प्रेमाने स्त्रीशिक्षणाचे रोप रुजवणाऱ्या अधिक कदमच्या कार्याला मनापासून सलाम

व्यवसायाने स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली डॉ. ऐश्वर्या रेवडकर सामाजिक प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहते. विविध सामाजिक उपक्रमांत तिचा सक्रीय सहभाग असतो. किशोरवयीन आणि महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी Menstruation, Sex Education, Feminism and Gender Equality या विषयांवर ती सेशन्स घेते. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील आदिवासी भागात रुग्णसेवा करत असताना अनुभवलेले आदिवासी जनजीवन, तिथले सकारात्मक बदल आणि झालेले सर्जनशील प्रयोग तिने शब्दबद्ध केले. 'बिजापूर डायरी' या नावाने प्रसिद्ध झालेल्या साधना प्रकाशनाच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ताराबाई शिंदे ललित गद्य पुरस्कार नुकताच मिळाला. ऐश्वर्याने 29 मार्च ते 10 एप्रिल असा वीस दिवसांचा काश्मीर दौरा केला. आणि या भेटीत तिने पाहिलेला, अनुभवलेला काश्मीर शब्दबद्ध केला. दोन भागांत प्रसिद्ध होणाऱ्या रिपोर्ताजरुपी अनुभवाचा हा उत्तरार्ध. काल प्रसिद्ध झालेला पूर्वार्ध इथे वाचता येईल.  

6 एप्रिलला दुपारी मी बिरवामध्ये पोहोचले खरी परंतु तोपर्यंत रोजच्या प्रवासाने थकवा आला होता. त्यात वाटेत बाहेरचे खाल्ल्याने पोट बिघडले. मग पूर्ण दिवस आराम केला. अनंतनागवरून सुरैय्याने व्हिडिओ पाठवला, त्यात छोटी गुड्डी तबल्यावर थाप वाजवत होती आणि मोठ्या मुली त्यावर छानसा भांगडाटाईप नाच करत होत्या. मी खूश झाले. बिरवा येथील हाऊस मॅनेजर खालिदा आणि हाऊस मदर अफरोजा दोघीही खूप मनमिळाऊ आहेत. तसेच येथील कुक अफरोजा ही बारावीनंतर दोन वर्षे पुण्यामध्ये ॲनिमेशन शिकायला होती. तिने मला हवा तसा आले टाकून, कमी साखरेचा चहा करून दिला. त्याच्या वासानेच मला उत्साह आला. तिने  माझ्यासाठी आलू पराठे केले. तिला भेटून मी खूश झाले. 

येथील हाऊस मॅनेजर खालिदा ही सायन्स शिकलेली असल्याने विचारांनी पुढारलेली दिसली. माझ्या सेशन्समध्ये तिने मुलींसोबत स्वतःही मनापासून सहभाग घेतला, उत्तरे दिली. संध्याकाळी मी मुलींच्या खोलीत डोकावले तर दोनतीन छोट्या मुली चेस घेऊन बसलेल्या दिसल्या. मी खूप आनंदित झाले. मग त्यांना ते कसे खेळायचे ते शिकवले. दुसरीतील तबस्सुम आणि पाचवीतील सहर यांनी तत्काळ शिकून खेळून दाखवले आणि माझ्या मनावर सकारात्मक ठसा उमटवला. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने मुलींना शाळेला सुट्टी असल्यामुळे सकाळी आम्ही शेजारच्या भैरम नावाच्या पहाडावर ट्रीपसाठी गेलो. सोबत जेवण घेऊन गेलो. पहाडावर गाणी म्हटली, नाच केला, खेळ खेळलो, फुगडी खेळलो. दुपारी थकूनभागून परतलो. मुलींना शिकवणीला जायचे होते पण कोणीच गेले नाही. आम्ही दुकानात जाऊन होस्टेलसाठी गिझर आणि गॅस शेगडी विकत घेतली. 

येथील कोणत्याही दुकानात जा, मी बाहेरून आलेली पाहुणी आहे हे पाहताच प्रत्येक दुकानदाराने मला चहा पाजला आणि सोबत काहीतरी स्नॅक्स खायला दिले. एकाही दुकानदाराने बिनाचहाचे जाऊ दिले नाही. मला हा पाहुणचार खूप भावला. सर्वांचे एकच म्हणणे असायचे की, ‘बाहर हमारे काश्मीर के बारे में बहुत गलत चीजे बोली जाती है, लेकिन यहाँ ऐसा बुरा कुछ नही है ।’ संध्याकाळी मी बिरवा सोडून पुढे निघणार होते. पाहिले तर मी जाणार म्हणून पोरी शिकवणी बुडवून माझ्यासाठी ग्रिटिंग कार्ड करत बसल्या होत्या. मग सर्वांनी मला ग्रिटिंग्ज, कोणी भेटवस्तू दिल्या. त्या प्रेमाने माझे मन गहिवरून गेले. 

मी अधिक सरांना मेसेज केला की, ‘मला वाटले मी इथे मुलींना खूप काही द्यायला आले आहे परंतु आज मुलींनीच उलट मला इतके काही देऊ केले की, मी कृतज्ञ आहे या प्रेमाप्रति.’

बिरवाहून रात्री मी तंगमर्गला जया अय्यर यांच्याकडे पोहोचले. अधिक यांना प्रेमाने ‘आई’ म्हणतो. ही व्यक्तीपण एक वेगळीच भन्नाट वल्ली आहे. वंशाने केरळीय परंतु जन्म आणि शिक्षण बंगालमध्ये झाले. एमएसडब्ल्यू झाल्यावर सामाजिक काम करायला दिल्लीला पोहोचल्या. काही महिने बनारसच्या विधवा स्त्रियांसाठी काम केले. दिल्लीवरून काश्मीरमध्ये ‘राहतघर’ या मुलामुलींसाठी असलेल्या वसतिगृहाच्या वॉर्डन म्हणून दाखल झाल्या. आजतागायत त्या काश्मीरमध्येच पूर्ण अर्पण वृत्तीने कार्यरत आहेत. राहतघरचे वसतिगृह बंद झाल्यानंतर दोनतीन वर्षांपासून त्या अधिक कदमसोबत बीडब्ल्यूएफमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तंगमर्गला बीडब्ल्यूएफ एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चालवते. त्यात 150 मुलींना कॉम्प्युटरचे आणि टेलरिंगचे प्रशिक्षण दिले जाते. या कामाची निगराणी आणि इतर सर्व होस्टेल्सवर देखरेख करण्याची जबाबदारी जयादीदी सांभाळतात. त्यांच्याबरोबर गप्पा करून माझा सर्व थकवा गेला, नवीन प्रेरणा मिळाली. 

दुसऱ्या दिवशी त्यांनी मला साकिब या लोकल मुलाबरोबर गुलमर्ग फिरायला पाठवून दिले. साकिबचे वडील गंडोला राईडच्या ठिकाणी काम करतात. साकिब सांगत होता, ‘पहलगाम तर गुलमर्गसमोर काहीच नाही परंतु पहलगाम श्रीनगरपासून जवळ आहे, रोडवर आहे म्हणून तिथे जास्त फिल्म्सचे चित्रीकरण होते. गुलमर्ग थोडे आत असल्याने लोकांना इथे येणे अवघड जाते.’ मग मी दिवसभर गुलमर्गमध्ये बर्फाचा आनंद लुटला. संध्याकाळी थंडीने गारठून जयादीदींच्या घरी परतले. त्यांनी मला गरमगरम वरणभात, वरून तूप असे छान खाऊ घातले. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील अनेक आठवणी, कामातील समस्या सांगितल्या. सुरुवातीला कसे लोक मुलांना वसतिगृहात पाठवायला, विशेषतः मुलींना शिकवायला तयार नसायचे. त्यांनी काम सोडून कायमचे निघून जावे म्हणून त्यांच्या राहत्या घरासमोर दहशतवाद्यांनी गोळीबारसुद्धा केला होता. मी त्यांना म्हटले, ‘तुम्हाला या सर्व वातावरणात एकटे वाटत नाही का?’ त्यावर त्यांचे उत्तर, ‘माझा देव आहे सोबत. मी जिथे जाईल तिथे तो आहे.’

एक प्रकारची टोकाची श्रद्धा माणसाला विनाशकारी कृती करायला लावते तर तीच भान असलेली, माणुसकीला मानणारी ही अशी श्रद्धा जया अय्यर यांना इतक्या टोकाच्या परिस्थितीतही काम करण्यास बळ देते. 62 वर्षांच्या असणाऱ्या या भन्नाट माउलीने माझ्या मनावर गारुड केले. त्यांना म्हटले, ‘मला तुमच्यासारखे व्हायला आवडेल.’ तर त्यांची घाई की, तू लग्न करायला लवकर मुलगा शोध.

दुसऱ्या दिवशी जयादीदी मला त्यांच्यासोबत कुपवाडा इथे घेऊन गेल्या. त्यांची कामाची चर्चा चालू असताना माझा कधी डोळा लागला ते लक्षातच आले नाही. रात्री झोपेतून उठले तर मुलींनी माझ्याभोवती प्रेमाने विचारपूस करायला गराडा घातला. आत्तापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक होमचे स्वतंत्र व्यक्तित्व दिसून आले होते. श्रीनगर शहरी असल्याने तेथील मुली धीट आणि पुढारलेल्या विचारांच्या होत्या, बाहेरच्या जगाकडे पाहण्याची त्यांची स्वतंत्र दृष्टी तयार झाली होती. अनंतनाग इंटेरिअर भागात असल्याने मुलींच्या मनांवर धार्मिक विचारांचा, मौलवीच्या शिकवणीचा पगडा जास्त होता. बिरवाची खालिदा विज्ञानाची पदवीधर असल्याने तिने मुलींना स्वातंत्र्य दिले होते, मुली मोकळेपणाने व्यक्त होत होत्या, गात होत्या, नाचत होत्या... परंतु सर्व मुलींमध्ये दोनतीन गोष्टी समान होत्या. त्या म्हणजे एकतर त्यांची कमालीची स्वयंशिस्त... मग त्यात सकाळी उठून अभ्यासाला बसण्यापासून, राहायची जागा स्वच्छ ठेवण्यापर्यंत सर्वच आले. दुसरे म्हणजे त्यांची प्रेमाची भूक, तसेच लाघवी स्वभाव. तिसरे व महत्त्वाचे म्हणजे सर्वच मुली अभ्यासात हुशार दिसल्या. बीडब्ल्यूएफ त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवते आहे. 

पुढे आता कुपवाडाबद्दल मला उत्सुकता होती. इथे पॉलिटिकल सायन्स शिकलेली जमिला हाऊस मॅनेजर आहे. ती मुलींना शिस्तही लावते आणि सोबत स्वातंत्र्यही देते. अभ्यासही करायला लावते; त्याचबरोबर मुलींना खेळायची, मस्ती करायची मुभाही देते. कुपवाडामध्ये जयादीदींनी तेथील लोकल हितचिंतक जाना भैय्याशी माझी भेट करून दिली होती. जाना भैय्या, जमिला आणि मी, आम्ही सारे कुपवाडाचे सीएचसी रुग्णालय पाहायला गेलो. रुग्णालयाची मोठी इमारत पाहून मी खूश झाले. तेथील चीफ मेडिकल ऑफिसरना भेटायला ऑफिसमध्ये गेलो तर आणखी एक सुखद धक्का बसला. सीएमओ एक महिला अधिकारी होती. त्यांनीही प्रेमाने आमचे स्वागत केले. नंतर मी रुग्णालयाचा प्रसूतिकक्ष पाहायला गेले. तेथील नर्सेसने आत्मीयतेने माहिती दिली आणि नंतर कॅन्टीनमध्ये नेऊन चहा-बिस्कीट खाऊ घातले.

तेथील दोनतीन डॉक्टरांना मी भेटले परंतु रुग्णांच्या गर्दीने सर्व हैराण झालेले असल्याने आम्ही तिथून बाहेर पडलो. जाना भैय्याला विचारले, ‘तुमच्या कुपवाडाची काय विशेष गोष्ट आहे?’ ते म्हणाले, ‘चला तुम्हाला भारत-पाकिस्तान बॉर्डर दाखवून आणतो.’ ते ऐकून आम्हाला सर्वांनाच उत्साह आला. बोलताना मी म्हणाले की, ‘आप लोग तो जन्नत में रहते हो ।’ तर त्यांचे उत्तर, ‘ये सुनके मेरा तो खून खौलता है । यहाँ सब जगह बंदूक लेके सिपाही खडे है । ऐसी थोडी ना होती है जन्नत...।’ त्यांनी मग हिंसाचाराच्या काही घटना सांगितल्या की, कसे गावातील सामान्य नागरिकांचे जीवन नरकासमान झाले. तेव्हा मला त्यांच्या बोलण्यामागची तडफड समजली. 

यापुढे मी काश्मीरला रोमॅन्टिसाईज करणे बंद करायचे ठरवले. आपण शेवटी बाहेरून पाहणार. हे लोक तर इथेच राहून सर्व भोगत आहेत. गाडीने जाताना त्यांनी दगडफेकीसाठी कुप्रसिद्ध असलेले गाव दाखवले. रस्त्यात अनेक ठिकाणी जवानांचे नाके होते, चौकशी केली जात होती. जाना भैय्या आमच्या गाडीचा पास काढून आले. आम्ही साधना टॉप या ठिकाणी पोहोचलो. समोर सर्वत्र बर्फ पसरला होता. चारी बाजूंनी भोवताली बर्फाने आच्छादित पहाड पसरले होते. अवर्णनीय दृश्य होते ते. मला ओळी आठवल्या की, धरतीवर स्वर्ग कुठे असेल तर इथेच आहे, इथेच आहे. परतता-परतता आम्हाला संध्याकाळ झाली. मग काश्मिरी हॉटेलमध्ये जाऊन आम्ही काश्मीरचे प्रसिद्ध 'वाजवान' खाल्ले. मला भौगोलिकदृष्ट्या कुपवाडा सर्वात जास्त आवडले. मुली तर सर्वच ठिकाणच्या हुशार आणि आत्मविश्वासू होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी मुलींसोबत सेशनला बसले. येथील मुलींना ‘गुड टच, बॅड टच’बद्दल माहिती होती. त्या म्हणाल्या की, ‘जमिलाने त्यांना शिकवले.’ खरेच... एक चांगली शिक्षित हाऊस मॅनेजर मुलींनाही जबाबदारीने घडवते. दोन तास सेशन चांगलेच रंगले. दुपारी बाजारात जाऊन आम्ही होस्टेलसाठी वॉशिंग मशीनची खरेदी केली. संध्याकाळी वारे सुटले, हलक्या पावसाच्या सरी आल्या. मग मी तेथील कुक हसीनासोबत सर्व मुलींसाठी गरमगरम कांदा भजी केली. रात्री केक आणून आम्ही जाहिदाचा वाढदिवससुद्धा साजरा केला. पोरींनी एकाचढ एक डान्स करून दाखवले. माझ्यासाठी तयार केलेले ग्रिटिंग्जही दिले.

9 एप्रिललला सकाळी जाना भैय्याने मला श्रीनगरला जाणाऱ्या शेअर सुमोमध्ये बसवून दिले. कुपवाडाचा निरोप घ्यायचे जिवावर आले होते परंतु माझी रजा संपत आल्याने श्रीनगरला निघणे जरुरी होते. श्रीनगरमध्ये मी एक दिवस हाऊसबोटवर मुक्काम केला. हाऊसबोट ही श्रीनगरची शान व जान आहे. प्रसिद्ध डल लेक 25 किलोमीटरमध्ये पसरलेले असून यात अंदाजे 1200 हाऊसबोट्स आहेत. या व्यवसायाशी संबंधित लोकांना ‘हांजी’ म्हटले जाते. हिवाळ्यात पाण्याचे बर्फ झाल्याने पर्यटन बंद असते तेव्हा हे लोक पूर्ण देशभर फिरतात, हस्तकला प्रदर्शनामध्ये काश्मीरच्या प्रसिद्ध पश्मीना शाली, चिकन कारागिरीचे कपडे विकायला. एक हाऊसबोट तयार करायला एकदोन करोड खर्च येतो आणि दरवर्षी दुरुस्तीच्या कामासाठी लाखभर रुपये खर्च होतात. अनेक सिनेमांचे चित्रीकरण इथे झाले आहे. 

काश्मीरचा मुख्य व्यवसाय पर्यटन हा आहे. 370 कलम  काढले गेले तेव्हा एक वर्ष कर्फ्यू आणि मागच्या वर्षी कोविडमुळे लॉकडाऊन यांत काश्मिरी लोकांचे कंबरडे मोडले आहे. तेथील लोकांचे म्हणणे पडले की, ‘कसेतरी आम्ही ही दोन वर्षे काढली परंतु आता बचतीचे पैसे संपले आहेत. या वर्षीही पर्यटन बंद राहिले तर आमचे खूप वाईट हाल होतील.’गेल्या दोन वर्षांत मुलामुलींच्या शिक्षणाचे पण खूप नुकसान झाले. 370 कलमानंतर कित्येक महिने मोबाईल बंद होते. नंतर मोबाईल सुरू झाले परंतु इन्टरनेट टूजी... त्यामुळे ऑनलाईन शिक्षण अशक्यप्राय ठरले. आत्ताशी कुठे तिथे पुन्हा फोरजी नेटवर्क सुरू झाले आहे. 

दुपारी प्रसिद्ध तुलीप बगीचा पाहायला गेले तर पर्यटकांची एकच तुफान गर्दी. कंटाळून मी बोटीवर परतले. हाऊसबोटीचा ओनर बिलाल हा मला प्रसिद्ध हजरत दर्गाह पाहायला घेऊन गेला. तिथे मन आपसूक शांत झाले. बिलालचे स्वप्न आहे हिरो होण्याचे. माझ्यासाठी शिकारा चालवत तो त्याची कहाणी सांगत होता. त्याचे पर्यटनव्यवसायाचे ऑफिस आहे दिल्लीमध्ये कनौट प्लेसला परंतु कोविडमुळे ते बंद करून तो वडिलांच्या या हाऊसबोटीचे काम पाहायला परतला. त्याच्यावर त्याच्या लहान भावंडांची जबाबदारी आहे. तरीही हिरो किंवा मॉडेल व्हायला मुंबईला येऊन काय काय करावे लागेल हे तो मला विचारत होता. ‘काश्मीरमध्ये ना सिनेमा हॉल आहे, ना तरुणांसाठी इतर करमणुकीची ठिकाणे त्यामुळे बोअर होते आम्हाला इथे.’ बिलाल त्याची खंत व्यक्त करत होता. त्याची स्वप्ने ऐकत मी डल लेकचे सौंदर्य अनुभवत होते. 

10 एप्रिलला सकाळी बिलालने मला श्रीनगरच्या बीडब्ल्यूएफच्या ‘बसेरा ए तबस्सुम’ला सोडले. मला पाहताच पोरी गळ्यात पडल्या. खरेतर 30 मार्चला सकाळी श्रीनगर सोडलेली मी, नियोजनानुसार 6 एप्रिलला इथे परतणार होते परंतु दिवस कसे, कुठे गेले कळलेच नाही. आज मी मुलींना पुन्हा भेटत होते त्यामुळे मुली माझ्यावर रुसल्या होत्या. ‘हम पाँच तारीक से आप की राह देख रहे है ।’ त्यांची गोड तक्रार. 

मग मुलींसोबत मी दोन तास सेशन घेतले. इथे सेशन खूपच चांगले रंगले. मुलींना बायोलॉजीबद्दल शाळेतून भरपूर माहिती मिळाली होती त्यामुळे पोरी उत्तरे देऊन सहभाग घेत होत्या... मात्र फेमिनिझम, एलजीबीटीक्यू हे विषय त्यांच्यासाठी नवे होते. तेही त्यांनी जिज्ञासू वृत्तीने, प्रश्न विचारून समजून घेतले. शहदा म्हणाली की ‘मी राजकारणात जाऊन या विशेष लोकांसाठी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करेन.’ मजा आली सेशन घ्यायला. प्रत्येक सेशनमध्ये मी मुलींना जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची गोष्ट जरूर सांगते... त्यांच्यामुळे आज आपण शिक्षण घेऊ शकतोय. तसेच मुलींना मलाला, कल्पना चावला, सानिया मिर्झा अशा महिला लीडर्सची उदाहरणेही देते. बाकी होम्समध्ये मुलींना या महिला माहीतच नव्हत्या. इथे त्या माहीत होत्या. उलट कोणाला नोबेल मिळाले आहे, कोणाला आलिम्पिक्स मेडल मिळाले आहे हेही पोरींनी मला सांगितले.

अनंतनागला एक गंमत घडली होती. गांधीजींचा फोटो असलेली माझी डायरी मुलींनी पाहिली. त्यावर मागच्या बाजूला कस्तुरबा गांधींचा फोटो आहे. मुली म्हणाल्या, ‘या कोण?’ मी सांगितले, ‘या गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा.’ तर मुली शांत. नंतर म्हणे की, ‘आम्हाला वाटले होते की, गांधीजींचे लग्न नव्हते झाले.’ हे ऐकून मी चाटच. मग त्यांना सांगितले की, त्यांना मुलेसुद्धा होती.

पोरींशी बोलताना कळले की, रात्री राबियाचा आणि खुशबूचा वाढदिवस आहे. आम्ही मग एकत्र साजरा करण्याचा बेत आखला. रात्री सर्व मिळून संगीताच्या तालावर उशी पास करायचा खेळ खेळलो. कर्फ्यूमुळे केक मिळू शकला नाही. मग गडबडीत  कॅडबरी घेतल्या आणि बिस्किटांसोबत केक केला. पोरींनी दोन मिनिटांत केक संपवला. आमच्या जोराच्या आवाजाने, गडबड-गोंधळाने शेजाऱ्यांची तक्रार आली. मग सर्वांनी निमूट झोपायचे ठरवले. रात्री मी हाऊस मॅनेजर हादिसाला म्हणाले की, ‘मी मुलींसोबत झोपते. राबियाने, शहदाने त्यांच्याजवळच माझीपण गादी टाकली. डोळे मिटले तर गळ्यात राबियाच्या हातांचा विळखा पडला. बऱ्याच वर्षांनी असे निरागस प्रेम मला लाभत होते. इथून परत गेल्यावर या पोरींची किती आठवण येईल या विचारातच मी झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पोरींना न उठवताच होस्टेल सोडले कारण पोरींचा निरोप घेण्याचा धीर होत नव्हता. राबिया म्हणाली होती की, ‘सब बोलते है कि फिर से मिलने आयेंगे । लेकिन कोई नही आता ।’ परंतु तिचे बोलणे खोटे ठरून मी पुन्हा यावे असे मलाच वाटत होते. श्रीनगर ते दिल्ली आणि तिथून रायपूर अशी विमानाने प्रवास करून मी छत्तीसगडला घरी पोहोचले परंतु मनाला मात्र काश्मीरची बाधा झाली आहे अजूनही.

बीडब्ल्यूएफचे आरोग्य विभागातही योगदान आहे. कामाच्या सुरुवातीला अधिक सरांनी पाहिले की, सरकारी ॲम्ब्युलन्स खराब प्रतीच्या होत्या. तेव्हा बीडब्ल्यूएफने सरकारी आरोग्ययंत्रणेला अद्यायवत, सर्व सोयींनी युक्त ॲम्ब्युलन्स दिल्या... ज्यात स्त्रीची प्रसुतीही सुरक्षितपणे होऊ शकेल. अशा आत्तापर्यंत 14 ॲम्ब्युलन्स त्यांनी प्रशासनाला दान म्हणून दिल्या आहेत. अनेक वेळा बीडब्ल्यूएफतर्फे संवेदनशील भागात आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. महाराष्ट्रातील अनेक डॉक्टर्स या कामात अधिक सरांशी जोडले गेले आहेत. मी परत येते वेळी पुण्यावरून रोटरी क्लबचे डॉक्टर्स इथे आरोग्य शिबिरासाठी येणार होते. 2016मध्ये काश्मीरमध्ये जी अशांतता निर्माण झाली होती त्यात अस्वस्थ तरुणांनी दगडफेक केली. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पेलेट गनचा वापर झाला. आकाराने लहान पेलेट्समुळे शरीरावर जखमा होतात. वेळेत जर ऑपरेशन झाले नाही तर डोळ्यांना झालेल्या इजेमुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. 

अशा वेळी अधिकने पुढाकार घेऊन इजा झालेल्या तरुणांसाठी बीडब्ल्यूएफतर्फे ऑपरेशनचे नियोजन केले. प्रसिद्ध नेत्ररोगविशारद डॉ. नटराजन यांची टीम मदतीला धावली. 1400 पैकी 1320 तरुणांच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन दृष्टी वाचली. अनेकांनी अधिकच्या या कामाला विरोध केला की, तुम्ही राष्ट्रविरोधी लोकांना का मदत करत आहात? दगडफेक करणाऱ्या लोकांचे कशाला करायचे उपचार? हे तर देशद्रोही काम झाले. यावर अधिकचा हा विचार की, जर या सर्व तरुणांना अंधत्व आले असते तर त्यांच्या मनात राग निर्माण होऊन त्याने त्यांच्या मनात बदल्याची आणि हिंसाचाराची भावना निर्माण झाली असती. त्यातून उलट दहशतवादाला आणखी खतपाणी घातले जाईल. जर आपण प्रेमाचे रोपटे लावले तरच कुठेतरी शांती निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु हे असे प्रेमाचे आणि शांतीचे विचार कधी कोणाला पटावेत?

अधिक सर सांगतात, ‘माझी 99 टक्के शक्ती ही इथल्या नकारात्मकतेशी लढण्यातच जाते. जे काही काम उभे आहे ते केवळ  एक टक्काच होऊ शकले आहे कारण इथे विरोधच खूप होतो. हेच काम मी महाराष्ट्रामध्ये करायला गेलो असतो तर आत्तापर्यंत भरपूर मोठे काम उभे राहू शकले असते... परंतु काश्मीरमधला संघर्षच खूप वेगळ्या प्रकारचा आहे. अनेक धार्मिक शक्ती, दहशतवादी शक्ती आणि काश्मीरकडे दहशतवादामुळे भेदभावाच्या दृष्टीने पाहणाऱ्या नकारात्मक शक्ती कामात व्यत्यय आणत राहतात.' अशा प्रतिकूलतेतही अधिक कदमचे काम सकरात्मक ऊर्जेने फुलले आहे. 

प्रत्येक मुलीच्या तोंडी अधिक भैय्याचे नाव होते. मुलींवरच्या त्याच्या निस्सीम प्रेमाचे कित्येक किस्से मला ऐकायला मिळायचे. मुली लहान असताना त्यांना चमचावाटीने दूध पाजणारा अधिक, कुक आली नाही म्हणून स्वतः सर्व मुलींसाठी भाकरी करणारा अधिक, समोर मृत्यू दिसल्यावर डोळे मिटून शांतपणे जप करणारा अधिक आणि मला फोनवर, ‘मीसुद्धा नास्तिक आहे परंतु माणसाच्या आयुष्यातील धर्माचे महत्त्व मी मानतो.’ हे सांगून गळ्यात विष धारण केलेल्या महादेवाचे उदाहरण देणारा अधिक. अशी त्याची निरनिराळी रूपे मला बर्फाच्छादित शिखरांइतकीच मनोरम्य व ठाम वाटली. बंदुकीच्या दहशतीमध्ये वावरणाऱ्या अनाथ मुलींना हक्काचा निवारा आणि शिक्षण देऊन, त्यांना त्यांच्या पायावर उभे राहायचे बळ देणे; आत्मविश्वासाचे पंख देऊन, भरारी घ्यायला स्वतंत्र मोकळे अवकाश द्यायचे याहून आणखी मोठी गोष्ट काय असू शकेल? 

मुलाखतीत अधिक सर एके ठिकाणी म्हणतात, ‘काश्मीरला पूर्ण जगाने मिळून अनाथ केले आहे, भारत यात बळी पडला आहे.’ अशा या अनाथ काश्मीरला कर्मभूमी मानून, प्रेमाने स्त्रीशिक्षणाचे रोप रुजवणाऱ्या अधिक कदमच्या कार्याला मनापासून सलाम. आपण या कार्यात कसा हातभार लावू शकतो?एका मुलीच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी उचलणे, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मुलींना मदत करणे, बीडब्ल्यूएफचे वसतिगृहाचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी आर्थिक साहाय्य करणे, संस्थेच्या कामाला भेट देऊन मुलींसोबत काही उपक्रम करणे इत्यादी.

- डॉ. ऐश्वर्या रेवडकर,  बिजापूर (छत्तीसगड)
zerogravity8686@gmail.com


बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन 
अधिक कदम 
9422323569
adhik@borderlessworldfoundation.org


या लेखाचा पूर्वार्ध इथे वाचता येईल. 

Tags: रिपोर्ताज काश्मीर डॉ. ऐश्वर्या रेवडकर अधिक कदम बॉर्डरलेस वर्ल्ड फाउन्डेशन Reportage Dr. Ayshwarya Revadkar Adhik Kadam Borderless World Foundation Kashmir Load More Tags

Comments:

purushottam

I appreciate work of BWF and Adhik Kadam Sir. I also read BIJAPUR DIARY written by Dr.Aishwarya Rewadakar mam. your work has like sunrise in life of those peoples who arrest in darkness. Education is biggest toll to overcome all type of depriveness and give enlightment to those who cut from main source. best wishes to BWF and Dr. Rewadkar mam.

chhaya Datar

I had read Dr. Aishwarya's posts from Chattisgarh. She has a real knack to make a breakthrough with all kinds of borders. Here too she has managed to reach the souls of all these girls. Will like to definitely contribute to these efforts made by Adhik Kadam. It is a great work.

नम्रता

डाॅ ऐश्वर्यानी लिहिल्याप्रमाणे.. अधिक कदमचे काम सकरात्मक ऊर्जेने फुलले आहे. लेख वाचताना याचा अनुभव येतो. BWF अनेक वर्षापासुन करत असलेल्या कामाला साहाय्य करणे आपली जबाबदारीच.

Add Comment