बंगालीतील प्रख्यात कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय (15 सप्टेंबर 1876 - 16 जानेवारी 1938 ) यांचे 150 वे जयंती वर्ष आज, 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. भारतातील विविध भाषांमध्ये आणि इंग्रजी व अन्य परदेशी भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट आणि मालिका आलेल्या आहेत. 1940 च्या दशकात शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्या मराठीमध्ये मामा वरेरकर यांनी अनुवादित केल्या. गेली काही वर्षे ती अनुवादित पुस्तके उपलब्ध नव्हती. सुप्रिया सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून साधना प्रकाशनाकडून त्यापैकी पाच अनुवादित कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत आहोत. नव्या आवृत्त्यांची संपादन प्रक्रिया, प्रस्तावना, आणि लेखक व अनुवादक यांचा परिचय यांचे लेखन त्यांनी स्वतःच केले आहे. आज 'श्रीकांत' व 'सव्यसाची' या दोन कादंबऱ्यांचा प्रकाशन समारंभ साधनाच्या सभागृहात पार पडला. आगामी वर्षभरात 'शेषप्रश्न', 'चरित्रहीन' व 'देवदास' या तीन कादंबऱ्यांच्याही नव्या आवृत्त्या आणणार आहोत.
आजच्या कार्यक्रमाला सुप्रिया सहस्रबुद्धे, ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी, प्राध्यापिका विजया देव, लेखिका वर्षा गजेंद्रगडकर आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांची विशेष उपस्थिती होती. विनोद शिरसाठ यांनी नव्या आवृत्तीमागची प्रकाशकीय भूमिका स्पष्ट केली. भारतातल्या अनेक भाषांमधल्या साहित्यावर ज्यांचा प्रभाव आहे, सामाजिक स्वातंत्र्य आणि स्त्रीवाद याविषयी ज्यांची काळाच्या पुढची भूमिका राहिली आहे अशा एका महत्त्वाच्या लेखकाची महत्त्वाची पुस्तके पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचा मानस यांनी बोलून दाखवला. सुप्रिया सहस्रबुद्धे यांनी शरच्चंद्रांच्या साहित्यातले वेगवेगळे विचार त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आणि त्यांच्या साहित्याचा एकूण भारतीय साहित्यावर असलेला प्रभाव याविषयी विवेचन केले. उमा कुलकर्णी यांनी मामा वरेरकर यांची अनुवादक म्हणून असलेली श्रेष्ठता दाखवून दिली. विजया देव आणि वर्षा गजेंद्रगडकर यांनी या प्रकारचे महत्त्वाचे साहित्य पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी साधना करत असलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.
श्रीकांत हे शरद बाबूंचे आत्मचरित्रही आहे. त्याच्या नव्या आवृत्तीची प्रस्तावना येथे प्रसिद्ध करत आहोत.
'श्रीकांत' हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो.नी. दांडेकरांच्या 'कुण्या एकाची भ्रमणगाथा'वर याची दाट छाया जाणवते, पण तिथे 'श्रीकांत'मधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट्य, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व 'आवारा मसीहा' चे जगणे दोघांच्यात समान दिसते. इथे "मेरा हर शेर है अख्तर मेरी जिंदा तस्वीर देखनेवालों ने हर लब्ज में देखा है मुझे" या ओळींची आठवण होते. स्थितप्रज्ञता, अलिप्तता या स्वभावछटा असल्या तरी श्रीकांत जीवनाकडे जिवंत माणुसकी आणि कुतूहल घेऊन पाहतो. माता-पित्यांअभावी आत्याबाईकडे वाढलेल्या श्रीकांतचे बालपणातले साहसांचे वेधक अनुभव त्याच्या पुढच्या आयुष्यातल्या कृतींची दिशा दर्शवतात.
शाळेतल्या इंद्रनाथ या धाडसी मित्राच्या सोबतीतल्या संस्कारांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडला. भर रात्री नदीत मासे पकडायला दोघे जातात. पाण्यात वाहत आलेले एका बालकाचे शव कोल्ह्या-कुत्र्यांनी फाडू नये, म्हणून इंद्रनाथ ते बाजूला ठेवायला लागतो. श्रीकांत शिवाशिवीचे, अंधश्रद्धेचे संस्कार घरात पाहात असतो. आत्याबाई गरिबांना मदत करायच्या खऱ्या, पण रोज पंचांग बघून भाजी कुठली करायची ते ठरवत असतात. त्यामुळे तो विचारतो, "तू शिवणार? त्याची जात कोण?" त्यावर इंद्र म्हणतो, "मढ्याला जात असते का रे? आता ही आपली होडी. हिला जात आहे का? कसल्या तरी आंब्याच्या किंवा जांबाच्या लाकडाची बनवली आहे. आता हिला कुणी आंब्याचं किंवा जांबाचं झाड म्हणेल का? काय समजलास? तसंच आहे हे."
श्रीकांतप्रमाणे शरदबाबूंनीही आयुष्यात हिंदू-मुस्लीम, जातपात भेद कधी मानले नाहीत. श्रीकांतला दिसणाऱ्या समाजस्थितीत स्त्रीजातीची दुःखे त्याला प्रकर्षाने जाणवली, म्हणून त्याच्या गाथेचा मोठा भाग त्यांनी व्यापला आहे. अन्नदा, राजलक्ष्मी, अभया, कमललता व सुनंदा या पाच मनस्विनींची व्यक्तिमत्त्वे मुख्यतः आपल्याला विसरता येणारी नाहीत. अन्नदेची कथा जगावेगळी आणि त्या काळाचा विचार केला तरी विलक्षण वाटते. सर्व पापे करणाऱ्या, मुसलमान होऊन साप खेळवणारा गारुडी झालेल्या पतीवरही निष्ठा ठेवून त्याच्यापाठोपाठ ती जंगलात जाऊन त्याच्यासाठी कष्टत राहिली. हे आज अकल्पनीय आहे. पण अशा या दुबळ्या वाटणाऱ्या स्त्रीने तो मेल्यावर इंद्र व श्रीकांतकडून त्याचे दफन केले, स्वतः लपवून ठेवलेले डूल विकून त्याची सगळी कर्जे फेडली, श्रीकांतने दिलेले रुपयेही त्याला परत केले आणि उरलेले चार आणे घेऊन ती कुठे तरी निघून गेली. इंद्र कळवळून त्याच्या घरी बोलावत असून त्याच्या आईच्या आधारासाठी गेली नाही.
एका बाजूला 'पती परमेश्वर' संकल्पनेचे आंधळेपणाने पालन करणाऱ्या, कुलटा ठरलेल्या या स्त्रीचा हा कणखर स्वाभिमान आपल्याला विस्मित करतो. त्यामुळे श्रीकांत जन्मभर तिला कधी विसरू शकला नाही. कमललतेची संसाराची कथा थोडीशी अशीच, पण तिने निवडलेला मार्ग कृष्णमंदिराच्या आखाड्यात कृष्णाची भक्ती करीत राहण्याचा आहे, व तीही झुकणारी नाही. त्या काळच्या बंगालचा हा आखाड्याचा भाग सविस्तर दाखवणारे शरच्चंद्र कुठे कुठे फिरले आणि निरीक्षणे करीत ती साठवून साहित्यात मांडत राहिले, याचे नवल वाटते. सुनंदाने धर्मग्रंथांचा अभ्यास केला आहे. सुखवस्तू सासरी सुखाने संसार करताना एके दिवशी तिला कळले की, ही सासरची सारी मालमत्ता लुबाडून मिळवलेली आहे. ती ज्याची त्याला द्यायला सासू-सासरे तयार नाहीत, म्हटल्यावर त्या क्षणी पती व लहान मुलाला घेऊन बाहेर पडून साध्या घरात गरिबीत ती दिवस काढू लागते. राजलक्ष्मीच पुढे त्यातून मार्ग काढून त्यांच्यात समेट घडवून आणते.
ब्रह्मदेशच्या बोटीच्या प्रवासात श्रीकांत अभया व रोहिणीबाबू यांना मोठीच मदत करतो. तिची कथा अनोखी आहे. लग्नानंतर ब्रह्मदेशात नोकरीला जाऊन तिकडेच गायब झालेल्या नवऱ्याच्या शोधात ती रोहिणीबाबूच्या साथीने तिकडे निघाली आहे. नवरा सापडतो. त्याने एका ब्रह्मी बाईशी घरोबा केला आणि नोकरीतल्या अफरातफरीत अडकला आहे. श्रीकांतमुळे तो त्यातून सुटला आणि श्रीकांतच्या अटीप्रमाणे तिला नांदवण्यासाठी घेऊन गेला. त्यानंतर श्रीकांतला ती पुन्हा परतून रोहिणीबाबूबरोबर तिच्या घरी आलेली आढळली.
नवऱ्याने केलेल्या मारहाणीच्या खुणा दाखवून तिने विचारले, "अत्याचारी पतीसाठी मी सारं जीवन पांगळं करू? मला सतीची पदवी खरेदी करायची नाही, श्रीकांतबाबू, पतीनं माझ्याचबरोबर नातिचरामि मंत्राचा उच्चार केला होता ना? ते सर्व बंधन, सर्व उत्तरदायित्व मी स्त्री असल्यामुळे फक्त माझ्यावरच आहे का?" अन्नदेच्या त्या काळातच अभयेने हे प्रश्न विचारलेले आहेत. पुढे श्रीकांत प्लेगने आजारी पडून इस्पितळात निघालेला असताना तिच्या दारात उभा राहिला. त्याला नेणारी गाडी दाखवून म्हणाला की गाडी उभी आहे. तिने जायला सांगितले तर तो जाईल. तेव्हा ती त्याला घरात घेऊन गेली, त्याची सेवा करून तिने त्याला मरणाच्या दारातून परत आणले. राजलक्ष्मीला अभयेबद्दल वाटणारी भावना तिच्याही व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भता दर्शवते. ती श्रीकांतला म्हणते, "अग्नी कशाला म्हणतात माहीत आहे? त्या दिवशी प्लेगनं भडकून जाऊन तुम्ही जेव्हा तिच्या नुकत्याच मांडलेल्या गृहसंसारात एकाएकी जाऊन उभे राहिलात त्या वेळी थोडेही भय किंवा संकोच वाटल्याशिवाय ज्या वस्तूच्या बळावर ती तुम्हाला घरात घेऊन गेली, त्याला मी तिच्या हृदयातील अग्नी म्हणते, तेज म्हणते. तिनं आपल्या सुखाचा मुळीच विचार केला नाही. पाप, दोष जे काही असेल, ते त्या तेजानं जाळून टाकून ती शुद्ध व निर्मळ होऊन राहिली आहे."
राजलक्ष्मी ही त्यातली प्रमुख मनस्विनी आहे व संपूर्ण कादंबरीच्या पार्श्वभूमीला ती उभी असते. श्रीकांतच्या बालपणातली ही मैत्रीण आहे व पुढे योगायोगाने पुन्हा भेट झाल्यानंतर ती मैत्री म्हणजे जन्मभराचे प्रेम असे दोघांना जाणवते. विवाहसंस्थेतल्या विटंबनेतून मार्ग काढून ती श्रीमंत गाणारीण बनली आहे. त्या समाजस्थितीत दोघांना एकत्र येणे शक्य नाही, पण दोघे आंतरिक प्रेमाने कायमचे बांधले गेलेले आहेत. श्रीकांत अभयेला सांगतो तसे आपण त्याला कधीही गमावणार नाही, याची तिला मनोमन खात्री आहे. ती बुद्धिमान, समजूतदार, कनवाळू व उदात्त विचारांची आहे. तिच्यासारख्याच उद्ध्वस्त झालेल्या स्त्रियांसाठी तिची संपत्ती ती वापरते. संन्यासी बनून गावोगावी फिरत सेवा करणाऱ्या वज्रानंदला भाऊ बनवून त्याच्या कार्याला मदत करते. नोकरीसाठी ब्रह्मदेशात जाणाऱ्या श्रीकांतला तिच्याजवळच्या एका पैचाही मोह नाही. हे तिला ठाउक आहे. हे दोघांचे असामान्य संयमी, प्लेटॉनिक प्रेम आहे.
या भ्रमणात श्रीकांतला आणखी असंख्य माणसे भेटलेली आहेत. वाट चुकून एका घरात आश्रय घेतला, नवऱ्याने अगत्य दाखवले, पण बाई आदळआपट करते. पण हा पाहुणा आजारी पडल्यावर तीच मायेने शुश्रूषा करते. दुसऱ्या एका गावात, स्त्री कसली, मुलगीच ती भेटते. ती सांगते, "माझ्या आई-वडिलांनी माझी खबर घेतलेली नाही. माझ्याकडे त्यांना पत्र पाठवायला कार्डाचे पैसेही नाहीत. तुम्ही त्यांना सांगा मला घेऊन जा, नाही तर माझ्या आक्काला जसं यांनी मारलं, तसं हे लोक मला पण मारून टाकतील." मग श्रीकांतच एक कार्ड विकत घेऊन तिच्या आई-बापाला ते लिहून पाठवतो. या स्त्रियांप्रमाणे वज्रानंदसारखा तरुण समाजसेवक साधुपुरुषही त्याला भेटतो. लहानपणचा एक मुस्लीम मित्र, आखाड्याचे निर्मळ मनाचे प्रमुख साधू, राजलक्ष्मीचे गुरू, तिचा इमानी सेवक रतन, नातीचे लग्न श्रीकांतशी ठरवण्यासाठी यक्त्या व आटापिटा करणारे आजोबा, अभयेसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा रोहिणीबाबू वगैरे यात आहेत. किशोरवयात त्याने एका रात्री एकट्याने एकाकी निरुआक्काच्या झोपडीत तिचा मृत्यू होताना पाहिला आणि पुढे ब्रह्मदेशात पैसे वाचवण्यासाठी प्लेगच्या इस्पितळात न जाणाऱ्या व जवळच्या गिनी जिवापाड जपणाऱ्या एकाकी मनोहरबाबूची एकट्याने सेवा करूनही उपयोग न होता त्याला प्राण सोडताना पाहिले. मरताना त्याने हवाली केलेल्या त्या गिनी त्याच्या बायकोला पाठवण्याचा व्यापही केला. अशा अनेकविध माणसांनी ही कादंबरी गजबजलेली आहे आणि या माणसांच्या दुनियेत राजलक्ष्मी सोडल्यास कोणामध्ये फारसे न गुंतता पण प्रत्येकाच्या दुःखात सहानुभूतीने समरस होत श्रीकांतचे भ्रमण चालू राहते. आणि आपणही स्वतःला विसरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होत राहतो.
सुप्रिया सहस्रबुद्धे, पुणे
नरहर कुरुंदकर यांनी मराठी कादंबरीची समीक्षा करणारे पुस्तक 1971 मध्ये 'धार आणि काठ' या नावाने लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे 'मराठी कादंबरीचा विचार करताना भारतीय कादंबरीकार शरच्चंद्र चटर्जी हा मानदंड गृहीत धरून विचार करणे सोईचे पडते.' त्या पुस्तकाच्या समारोपाचा लेख त्यांनी 'शरच्चंद्रांचे साहित्य' या विषयावर लिहिला आहे. त्यातील हा वेचक अंश
शरद बाबूंचे मन परंपरेने किंवा सुधारणावादाने भारलेले नाही. त्यांच्यासाठी जीवन हा एक अखंड वाहता प्रवाह आहे. या प्रवाहाला आरंभ किंवा शेवट नाही. या दृष्टीने त्यांची 'श्रीकांत' ही कादंबरी पाहण्याजोगी आहे, तिचा आरंभ नेमका कोणत्या ठिकाणाहून होतो हे सांगता येणे फार कठीण आहे. तिच्यातील वेगवेगळ्या व्यक्ती मध्येच केव्हातरी येतात, त्या आल्यानंतर उपऱ्या वाटत नाहीत. त्या व्यक्ती मध्येच केव्हातरी निघून जातात, त्या गेल्या तरी चिंता वाटत नाही. कारण त्यांचे येणे आणि जाणे याला कथानकात महत्त्व नसते. त्या व्यक्ती न पुसणारे कायमचे ठसे उमटवितात, त्याला महत्त्व असते. त्यामुळे 'श्रीकांत'मधील एखादी व्यक्ती पहिल्याच खंडात संपली तरी तिचे अस्तित्व पुढच्या खंडातही जाणवत राहते. आणि ही कादंबरी तशी कुठे संपतही नाही. या कथानकाला आरंभ आणि शेवट नसतो याचे महत्त्वाचे कारण, हे कथानक घटनांवर अवलंबून नसते. काही घडणे वा न घडणे, काही मिळणे वा न मिळणे हे या कथानकात गौण असते.
- नरहर कुरुंदकर ('धार आणि काठ' मधून)
शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्या साधना प्रकाशनाच्या वेबसाइटवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.

Tags: शरच्चंद्र शरच्चंद्र चट्टोपाध्याय शरच्चंद्र चट्टोपाध्याय 150 श्रीकांत आत्मचरित्र अनुवाद मामा वरेरकर स्त्रिया बंगाली कादंबरी स्त्रीवाद स्त्री व्यक्तिरेखा राजलक्ष्मी शरच्चंद्र चटर्जी Load More Tags
Add Comment