सव्यसाची

साधना प्रकाशन - शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या 150 व्या जयंतीवर्षात पाच कादंबऱ्यांच्या मराठी अनुवादाची नवी आवृत्ती

बंगालीतील प्रख्यात कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय (15 सप्टेंबर 1876 - 16 जानेवारी 1938 ) यांचे 150 वे जयंती वर्ष 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाले आहे. भारतातील विविध भाषांमध्ये आणि इंग्रजी व अन्य परदेशी भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झालेले आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांवर अनेक चित्रपट आणि मालिका आलेल्या आहेत. 1940 च्या दशकात शरच्चंद्र यांच्या कादंबऱ्या मराठीमध्ये मामा वरेरकर यांनी अनुवादित केल्या. गेली काही वर्षे ती अनुवादित पुस्तके उपलब्ध नव्हती. सुप्रिया सहस्रबुद्धे यांच्या विनंतीवरून साधना प्रकाशनाकडून त्यापैकी पाच अनुवादित कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत आहोत. नव्या आवृत्त्यांची संपादन प्रक्रिया, प्रस्तावना, आणि लेखक व अनुवादक यांचा परिचय यांचे लेखन त्यांनी स्वतःच केले आहे. 15 सप्टेंबर 2025 ला 'श्रीकांत' व 'सव्यसाची' या दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. आगामी वर्षभरात 'शेषप्रश्न', 'चरित्रहीन' व 'देवदास' या तीन कादंबऱ्यांच्या नव्या आवृत्त्या आणणार आहोत.

सव्यसाची म्हणजेच मूळ बंगालीतील 'पथेर दाबी' या कादंबरीने स्वातंत्र्यलढ्याला आणि सशस्त्र लढा देण्यासाठी भूमिगत राहून काम करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना बळ दिले. या अनुवादित कादंबरीच्या नव्या आवृत्तीची ही प्रस्तावना. 


'पथेर दाबी'चा अर्थ पथ निवडण्याचा अधिकार. 'पथेर दाबी' कादंबरीच्या मराठी अनुवादाचे नाव म्हणजेच तिच्या व पथेर दाबी संघटनेच्याही नायकाचे नाव सव्यसाची. 'सव्यसाची'च्या वरेरकरांच्या प्रस्तावनेनंतर पंचाहत्तर वर्षे आणि सव्यसाची कादंबरीनंतर शंभर वर्षे लोटली आहेत. या प्रस्तावनेची तारीख 28 जून 1948 असली तरी ती त्यापूर्वीच लिहिली गेली असली पाहिजे हे निश्चितपणे म्हणता येते, कारण जानेवारी 1948 मध्ये घडलेल्या महात्मा गांधींच्या हत्येचा उल्लेख वरेरकरांनी प्रस्तावनेत न करणे केवळ अशक्य होते. सव्यसाचीचे क्रांती व शांतीचे तत्त्वज्ञान, त्याचे अतिमानवी वाटावे असे व्यक्तिमत्त्व, वर्णाश्रमधर्माला त्याचा विरोध, त्याला वाटणारे महाराष्ट्राचे महत्त्व वगैरे गोष्टींचे विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी असे मत मांडले आहे की, शरच्चंद्रांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राच्या योगदानाचा अप्रत्यक्ष गौरव केला आहे व त्यांना आणि सव्यसाचीलाही मराठी क्रांतिकारकांबद्दल आदर होता. वरेरकरांचा शरच्चंद्रांशी परिचयच नव्हे तर स्नेहही होता. त्यामुळे हे त्यांना प्रत्यक्ष चर्चेतून दिसून आले होते.

असे वाटते की, शंभर वर्षांनंतरच्या आजच्या स्वातंत्र्योत्तर परिस्थितीतही या कादंबरीचे मोल कमी होत नाही. कारण सव्यसाची हा केवळ राजकीय बंडखोर नाही. त्याला राजकीयप्रमाणेच सामाजिक स्वातंत्र्याची व परिवर्तनाचीही आस आहे. कादंबरीच्या 'पथेर दाबी' शीर्षकातूनही हेच सूचित होते. शरच्चंद्र हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिणारे लेखक नव्हतेच, शिवाय या स्वातंत्र्यलढ्याचे दूरस्थ वा तटस्थ निरीक्षक नव्हते, त्यांची लढ्याला केवळ शाब्दिक सहानुभूती होती आणि ते जमेल तेवढी आर्थिक मदत होती, असे नव्हे, तर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काही काळ सक्रिय सदस्यही होते. संवेदनशील कलावंत मनाला न पटणाऱ्या काही राजकीय गोष्टींच्या दर्शनाने अस्वस्थ झाल्यामुळेच ते त्यातून बाहेर पडले. देशबंधू चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस व इतर अनेक स्वातंत्र्यसेनानींशी त्यांची मैत्री होती, त्यांचा तसाच सल्ला त्यांना मिळाला होता. त्यामुळे जवळून पाहिलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या विविध आयामांचे वास्तववादी दर्शन शरच्चंद्र घडवतात, म्हणून, वरेरकर म्हणतात, त्याप्रमाणे ही ऐतिहासिक कादंबरी आहे. 

शिवाय शरच्चंद्रांच्या सर्वच साहित्यात सामाजिक विषमतेवरची टीका प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे येत असतेच. इथे ते जातिभेद, अंधश्रद्धा व मजुरांचे दारिद्र्य यावर अनेक उदाहरणांतून प्रकाश टाकतात. अपूर्वचे शिवाशिवीचे स्तोम ते या कादंबरीत सातत्याने दाखवतात, त्याचा हेतू या सामाजिक दोषाकडे लक्ष वेधण्याचाच असावा. स्वामी विवेकानंदही तेव्हा म्हणालेच होते की, आपली संस्कृती ही सध्या 'शिवू नका संस्कृती' झाली आहे.

अपूर्वने आपली नोकरी वाचवण्यासाठी पोलीस कमिशनरला पथेर दाबीची सर्व माहिती दिली. त्याला 'डेथ' हीच शिक्षा सर्व सदस्यांनी सांगितली, पण सव्यसाचीने संघटनेच्या सर्वांचा तीव्र विरोध पत्करून अपूर्वच्या विश्वासघाताच्या गुन्ह्याची शिक्षा रद्द केली. हा सर्व विषय कदाचित समीक्षकांच्या चर्चांना पुरून उरणारा ठरेल. सव्यसाचीच्या त्या निर्णयाला भारती हे एक कारण होते. सव्यसाचीच्या निर्णयाचे आणखी एक कारण असू शकेल. कराल ब्रिटिश राजसत्तेच्या अन्यायी व तुच्छतावादी वसाहतवादाच्या टाचेखाली चिरडल्या जाणाऱ्या, तडफडणाऱ्या, तळमळणाऱ्या पण प्रतिकार करण्याचे धैर्य नसलेल्या सामान्य जनतेचा अपूर्व हा प्रतिनिधी आहे. त्याने केलेला विश्वासघात ही घटना अपूर्व नाही. जगाच्या व भारताच्याही इतिहासात अशी उदंड उदाहरणे सापडतील. तसेच, जालियनवाला बाग काय किंवा इतरत्रही भारतीयांवर गोळ्या चालवणाऱ्या बंदुकांवरचे हात फक्त व जास्तकरून ब्रिटिश नव्हते, तर भारतीयही होते. 

सव्यसाची, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, अरविंद घोष असे महामानव विरळे असतात. सामान्य जन असंख्य असतात. अफाट जनसमूह एकत्र येतो तेव्हा महाशक्तिशाली असतो, पण त्याचे सुटे सुटे घटक अशक्त, दुर्बलच असतात. याची यथार्थ जाणीव सव्यसाचीला होती. दुसरे म्हणजे, स्वातंत्र्यासाठी हिंसा त्याला वर्ज्य नव्हती तरी त्या हिंसेच्या उष्णतेने त्याच्या हृदयाची कोमलता व स्त्री-पुरुषांच्या सच्च्या प्रेमाची, त्याच्या कोवळिकेची बूज हरपलेली नव्हती. कदाचित अशा नात्याची पात्रता व शक्यता असूनही जाणीवपूर्वक त्यावर पाणी सोडावे लागल्यामुळे अपूर्व व भारतीच्या या नात्याचे त्याला अप्रूप वाटत असावे. त्याचे त्याने जबर किंमत देऊन रक्षण केले. काव्याची किंमत त्याला कळते, म्हणून शशी या कवीचा जीव तर त्याने वाचवला आहेच, पण तो त्याला दुर्मीळ स्नेह देतो. त्याला सामाजिक बंडाची गाणी गायला सांगतो. सर्व विरोध पत्करून व त्याचे परिणाम मान्य करून अपूर्वला जीवदान देण्यामागे सव्यसाचीच्या हृदयाचा असाच निर्णय असला पाहिजे.

अपूर्व व भारती यांच्या नात्याला या कादंबरीत मिळालेला अवकाश थोडा अधिक आहे, असे वाटू शकते. पण त्याचे कारण ब्रिटिशांच्या राजसत्तेचा वरवंटा कादंबरीच्या प्रकाशनावर फिरणार याचा अंदाज त्यांना होताच, तो प्रकाशनानंतर लगेच फिरू नये, सौम्य राहावा, याची काळजी त्यांनी घेतली असावी. कादंबरी नेहमीच्या रूपात छापण्यापूर्वी 'वंगवाणी' मासिकात धारावाहिक स्वरूपात आणण्यामागेही हाच हेतू होता. वरेरकरांनी हे प्रस्तावनेत स्पष्ट केले आहेच. चार महिन्यांत नऊ हजार प्रती खपल्यानंतर ती बंदी आलीच. पण तोपर्यंत बंगालच्या क्रांतिकारकांनी गीतेबरोबर ही कादंबरी हृदयाशी धरली होती. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस कमिशनर शरच्चंद्रांना म्हणाले होते, "शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, 'गीता' आणि 'पथेर दाबी'. पथेर दाबीनं क्रांतिकारकांना वेड लावलं आहे." 1946 मध्ये ही बंदी उठली, पण त्या वेळी प्रकाशकाने नवीन आवृत्ती काढली नव्हती आणि महाराष्ट्रात मात्र मराठी भाषांतर उपलब्ध होते.

भा. वि. वरेरकरांच्या प्रस्तावनेचा शेवटचा परिच्छेद असा आहे, "महाराष्ट्रीयांच्या दृष्टीने ही कादंबरी फार महत्त्वाची आहे असे मला वाटते. सव्यसाचीचे बंडाचे तत्त्वज्ञान जितके महाराष्ट्रीयाला पटेल तितके ते दुसऱ्या कोणत्याही प्रांताला आकलनीय होणार नाही. तसे पाहिले तर ही कादंबरी एक प्रकारे महाराष्ट्रीय स्वरूपाचीच आहे. अपूर्व आणि सव्यसाची या दोन भूमिकांची तुलना केली, तर सव्यसाचीवर महाराष्ट्रीय तत्त्वज्ञानाचा पगडा चांगलाच बसलेला आहे असे दिसून येते. त्या दृष्टीने या कादंबरीचे यथायोग्य मूल्यमापन आजच्या कालात केले जाईल अशी मला बळकट आशा आहे."

हे सर्व लक्षात घेता 'सव्यसाची' च्या या मराठी अनुवादाच्या पुनः प्रकाशनाला आजच्या मराठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी बळकट आशा वाटते.

- सुप्रिया सहस्रबुद्धे, पुणे


नरहर कुरुंदकर यांनी मराठी कादंबरीची समीक्षा करणारे पुस्तक 1971 मध्ये 'धार आणि काठ' या नावाने लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे 'मराठी कादंबरीचा विचार करताना भारतीय कादंबरीकार शरच्चंद्र चटर्जी हा मानदंड गृहीत धरून विचार करणे सोईचे पडते.' त्या पुस्तकाच्या समारोपाचा लेख त्यांनी 'शरच्चंद्रांचे साहित्य' या विषयावर लिहिला आहे. त्यातील एक वेचक अंश - 

"आरंभापासून शरच्चंद्र काही महान व भव्य पात्रे निर्माण करण्याचा प्रयोग करीत आहेत. पण त्यांना आपली पात्रे जितकी महान वठविण्याची इच्छा होती, तितकी महान होऊ शकली नाहीत. 'सव्यसाची' हे पात्र त्याला अपवाद आहे. सव्यसाचीत हिमालयाची शांतता आहे, ज्वालामुखीची आग आहे. तो सुखांनी फुलत नाही, दुःखाने खचत नाही. पण तो क्रांतीच्या व स्वातंत्र्याच्या एका भव्य स्वप्नाने भारलेला आहे. त्याच्या या जागेला स्पर्श झाला की, तो तीव्र मानसिक कल्लोळाचे अधिष्ठान होऊ लागतो. सर्व शुभमूल्यांनी जिथे आत्मविसर्जन करावे असे सव्यसाची हे शुभमूल्य आहे. तो भव्य स्वप्न पाहणारा, पण आपल्या मर्यादांची जाणीव असणारा महात्मा आहे. जे त्याच्या पायावर आपले जीवन उजाड करण्यासाठी झटतात, त्यांचे जीवन फुलविण्यासाठी आपण आहोत; पायदळी तुडविण्यासाठी नाही, हे सव्यसाची ओळखतो. भव्य पात्रांची भव्यता भव्य घटनेत नसते, भव्य जाणीवेत असते, भव्य कल्लोळात असते. म्हणून सव्यसाचीच्या जीवनात फारसे काही घडत नाही, तरीही ज्वालामुखीच्या सहवासात आपण वावरतो आहोत हे भान कधी मावळत नाही."
- नरहर कुरुंदकर ('धार आणि काठ')

 

शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्या साधना प्रकाशनाच्या वेबसाइटवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत -

Tags: शरच्चंद्र चट्टोपाध्याय शरदबाबू बंगाली कादंबरी मामा वरेरकर अनुवाद साधना प्रकाशन Load More Tags

Comments:

Suresh sadashiv gurav

मला दोन्ही पुस्तके घ्यायची आहेत. गुगल पे नंबर पाठवा . मी आपणास पेमेंट करतो. निदान व्हाट्सअप नंबर तरी पाठवा.

Pratibha Kanekar

मला 'श्रीकांत' आणि 'सव्यसाची' कादंबऱ्या हव्या आहेत. पैसे कसे पाठवू?

Suresh sadashiv gurav

खुप छान लेख. दोन्ही पुस्तके वाचनीय.

Add Comment