त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली!

विम्बल्डनचे विजेतेपद मिळवत नोव्हाक योकोविचने नदाल आणि फेडरर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली...

त्रिमूर्ती - नोव्हाक योकोविच, राफा नदाल आणि रॉजर फेडरर | Getty Images

अपेक्षेप्रमाणे नोव्हाक योकोविचने यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अपेक्षेप्रमाणे म्हणण्याचे कारण असे की, त्याचे प्रमुख प्रतिस्पर्धी फेडरर आणि नदाल हे अनुक्रमे उपउपान्यपूर्व आणि उपान्त्य फेरीतच गारद झाले होते त्यामुळे काही आश्चर्य घडले नाही तर तोच यंदाचे विम्बल्डन विजेतेपद मिळवणार असा बहुतेकांचा अंदाज होता. या विजेतेपदामुळे ग्रँड-स्लॅम टेनिस मालिकेच्या स्पर्धांतील त्याच्या अजिंक्यपदांची संख्या वीसवर पोहोचली आहे. त्याने आता रॉजर फेडरर आणि राफा नदाल यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे म्हणजे खऱ्या अर्थाने टेनिसची अव्वल खेळाडूंची त्रिमूर्ती आता साकार झाली आहे... फेडरर, नदाल आणि योकोविच!

गेले किमान दशकभर थ्री मस्किटिअर्स म्हणा वा तीन शिलेदार म्हणा वा ही त्रयी म्हणा... टेनिस विश्वावर आपले आधिक्य टिकवून आहे. टेनिसच्या दीर्घ इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. मुळात रॉजर फेडररचा 20 अजिंक्यपदांचा विक्रम कुणी गाठेल का अशी शंका वाटत होती कारण त्यानेही 2017मध्ये ही मजल गाठली तेव्हा याबाबतीत राफा नदालवर पाच अजिंक्यपदांची मोठी आघाडी घेतली होती. नोवाक योकोविच तर तेव्हा नदालच्याही मागे होता पण नंतरच्या काळात फेडररच्या वयामुळे म्हणा, क्वचित दुखापतींनी सतावल्यामुळे म्हणा, त्याचा खेळ थोडा फिका पडला असल्याने किंवा त्याचे हे दोन प्रतिस्पर्धी अधिक प्रगल्भ आणि खेळ करू लागल्याने म्हणा हे अंतर झपाट्याने भरून काढले जाऊ लागले. कोरोनाचे सावट असलेल्या गेल्या वर्षातील अमेरिकन आणि फ्रेंच ओपन स्पर्धांत तो खेळलाच नाही. यंदाही त्याने फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी फ्रेंच ओपन जिंकून नदालने त्याला गाठले तेव्हा नदालने योकोविचवर तीनची आघाडी मिळवली होती तरी यंदाच्या आत्तापर्यंतच्या तीनही स्पर्धा जिंकून, योकोविचने फेडरर आणि नदाल यांच्या 20 अजिंक्यपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याच्या खेळाला नवी धार आली आहे आणि अजिंक्यपदांची त्याची भूक कायमच आहे! 

वारंवार झालेल्या दुखापतींमुळे होणारा त्रास गेली काही वर्षे फेडररला जाणवू लागला होता. कदाचित वाढत्या वयामुळे असेल तो जाणवतच आहे. कदाचित त्यामुळेच त्याच्या खेळातील पूर्वीचे सातत्य कमी झाले असावे. तसे पाहायला गेले तर त्याची फटक्यांमधील सफाई तशीच होती आणि फटक्यांवरील हुकमतही तीच होती. परतीच्या अचूक फटक्यांनी प्रतिस्पर्ध्याला हैराण करण्याचे कसबही किंचित कमी झाले असले तरी कायम होते पण आता त्याच्या फटक्यांना उत्तर देण्याची कला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी अवगत करून घेतली होती... शिवाय वयाची आणि अधिक चांगल्या शारीरिक तंदुरुस्तीची साथ त्यांना होती. 

खेळ कोणताही असो, एखादा खेळाडू कितीही अव्वल असो, तो सतत विजयी होऊ शकत नाही हे खरेच. मग कारणे काहीही असोत... पण असे असले तरी महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये मात्र हे खेळाडू आपला खेळ उंचावतात. अंगभूत कौशल्याला, दीर्घ काळच्या अनुभवाची जोड देतात आणि काही वेळा अनपेक्षित फटक्यांचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांना चक्रावून सोडतात तर कधी अनपेक्षित डावपेचांनी प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करून सोडतात.

...त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून फेडरर ग्रँड-स्लॅम मालिकेतील अजिंक्यपदाला दुरावला होता तरीही तो संपला असे म्हणण्याची कोणाची टाप नव्हती. कारण सोपे होते. विजेतेपद त्याला हुलकावणी देत होते हे खरेच पण तरीही तो बहुतेक वेळी उपान्यपूर्व, उपान्त्य वा अंतिम फेरी गाठतच होता म्हणजेच अव्वल खेळाडूंमधील त्याचे स्थान कायम होते हे कुणीही मान्य करील. तीच गोष्ट नदाल आणि योकोविच यांची त्यामुळेच या तिघांची ही दादागिरी आणखी किती काळ चालणार असाच प्रश्न सर्वांना पडत होता. 

अँडी मरेने 2012मध्ये विम्बल्डन आणि पाठोपाठ ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले तेव्हा या त्रयीची मक्तेदारी आता संपुष्टात येणार की काय असे वाटायला लागले होते पण तसे काही झाले नाही. मरेला तो दर्जा, ते सातत्य टिकवता आले नाही. परिणामी अव्वल 1, 2, 3 म्हणजे फेडरर, नदाल, योकोविच असेच राहिले. त्याचे चार होऊ शकले नाहीत. ही त्रयीच कायम अव्वल स्थानावर राहिली आणि आता तर त्या तिघांचीही नावे या ग्रँड-स्लॅम मालिकेतील 20 अजिंक्यपदांच्या विक्रमावर नोंदली गेली आहेत. 

टेनिस स्पर्धांमध्ये या तिघांचे वर्चस्व किती असावे? साधा विचार करा. ग्रँड-स्लॅम मालिकेतील ऑस्ट्रेलिअन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या चार स्पर्धा दर वर्षी होतात आणि या चारही स्पर्धा एका वर्षात क्रमाने सलग जिंकणाऱ्याने ग्रँड स्लॅम केले असे म्हणतात. या मालिकेतील विजेतेपद फेडररने प्रथम 2003मध्ये जिंकले होते. तेव्हापासून म्हणजे गेल्या 18 वर्षांमध्ये एकूण 71 स्पर्धा झाल्या. (गेल्या वर्षीची विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली होती.) आणि त्यांमध्ये या तीन खेळाडूंनीच प्रत्येकी 20 म्हणजे एकूण 60 वेळा अजिंक्यपद संपादन केले आहे. म्हणजे केवळ 11 स्पर्धांतील विजेते अन्य कोणी खेळाडू होते. मात्र त्या खेळाडूंची नावेही आठवावी लागतात. याचे कारण या तीन खेळाडूंचे निर्विवाद वर्चस्व. खरेतर मक्तेदारीच म्हणायची. जणू काही आपल्या तिघांखेरीज अन्य कोणी या स्पर्धांत विजयी होणार नाहीच अशी खबरदारी ते घेतात की काय अशी शंका वाटावी. 

गेल्या शतकात टेनिसविश्वात अशी तिहेरी चुरस सातत्याने, एवढा दीर्घ काळ कधीच दिसून आली नव्हती. त्या काळात जास्त करून चुरस होती ती दोन खेळाडूंमध्ये. मग ते बियाँ बोर्ग-मॅकेन्रो असोत, मॅकेन्रो-कॉनर्स असोत (यांच्यामध्ये बऱ्याचदा इवान लेंडलही असायचा), वा पीट सॅम्प्रस-आंद्रे अगासी असोत. त्याच काळात एकांडे शिलेदार म्हणावे असे बोरीस बेकर, मॅट्‌स विलँडर, स्टीफन एडबर्ग, पॅट कॅश, केव्हिन करन इत्यादी खेळाडू आपले वर्चस्व अधूनमधून दाखवत. यांपैकी बोर्ग आणि सॅम्प्रस वगळता सातत्याच्या बाबतीत इतर खेळाडू त्यामानाने कमीच पडत होते. 

...शिवाय जाणवण्याजोगी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांपैकी कुणालाच या चारही स्पर्धांत यश मिळवता आलेले नव्हते. बोर्ग अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकू शकला नाही आणि ऑस्ट्रेलिअन ओपनपासून दूरच राहिला. मॅकेन्रो सर्व स्पर्धा खेळला पण त्याला फ्रेंच ओपनने कायमच हुलकावणी दिली. तीच गोष्ट कॉनर्सची आणि सॅम्प्रसची. नाही म्हणायला अगासीने मात्र या चार स्पर्धांत कधी ना कधी अजिंक्यपद मिळवले होते. करिअर ग्रँड-स्लॅम पुरे केले होते.

सध्याच्या या तीन शिलेदारांनी मात्र या चारही स्पर्धांमध्ये कमीत कमी एकदा तरी विजेतेपद मिळवले आहे म्हणजे कारकिर्दीतील ग्रँड-स्लॅम पुरे केले आहे. ते करणारा योकोविच हा आठवा खेळाडू पण अद्याप तरी त्यांच्यापैकी कुणीही खऱ्या अर्थाने म्हणजे एकाच वर्षात ओळीने या चार स्पर्धा जिंकून ग्रँड-स्लॅम केलेले नाही. यंदा मात्र योकोविचने, ऑस्ट्रेलिअन ओपन, फ्रेंच ओपन आणि आता विम्बल्डन स्पर्धा जिंकून त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता त्याने या वर्षीची अमेरिकन ओपन स्पर्धादेखील जिंकली तर तो ग्रँड-स्लॅम करणारा केवळ दुसरा पुरुष खेळाडू ठरेल. 

याआधी फक्त रॉड लेव्हरने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात हा पराक्रम केला आहे... तोही एकदा नाही, तर दोनदा! प्रथम या स्पर्धा केवळ हौशी खेळाडूंकरता असताना आणि नंतर त्या खुल्या झाल्या तेव्हा. मधली साधारण आठ वर्षे तो केवळ व्यावसायिक स्पर्धांत खेळत होता आणि तिथेही त्याचा दरारा होताच. जरतरची भाषा करायची तर ती मधील आठ वर्षे खुल्या स्पर्धा असत्या आणि लेव्हर त्यांत खेळला असता तर त्याने आणखी किती विजेती पदे जिंकली असती? उत्तर अवघड आहे पण सहजच वाटते की, किमान 12-15 वेळा त्याने अजिंक्यपद मिळवले असते शिवाय तेव्हाही त्याला आठ वर्षांनंतर कडवा प्रतिस्पर्धी लाभला नव्हता... त्यामुळेच आठ वर्षांनंतरही तो पुन्हा अजिंक्यच राहिला होता. त्याने दुसरे ग्रँड-स्लॅम पूर्ण करून आपणच शतकातील अद्वितीय खेळाडू असल्याचे दाखवून दिले होते. 

आता त्या काळातील स्पर्धेच्या तुलनेत स्पर्धा अधिक तीव्र आहे, अनेक नवनवीन आणि तरुण खेळाडू पुढे येत आहेत व अधूनमधून कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत या तिघांना पराभूतही करत आहेत. हे पाहता या तिघांचे यशही कमी दर्जाचे समजता येणार नाही. दुसरे असे की, तुलना करायची झालीच तर ती एकाच कालखंडातील खेळाडूंचीच करायची असते कारण तेव्हा सर्व गोष्टी समान असतात त्यामुळे ती योग्य ठरते... पण वेगळ्या काळातील खेळाडूंची तुलना केल्यास तो कुणा ना कुणावर अन्याय होऊ शकतो. दरम्यानच्या काळात तंत्रे बदललेली असतात. परिस्थिती वेगळी असते. स्पर्धेतील तीव्रता वाढलेली असते आणि अनेक स्पर्धांचा ताण खेळाडूंना, आपले क्रमवारीतील स्थान टिकवण्याकरता किमान स्पर्धांत खेळावेच लागत असल्याने, जाणवत असतो... त्यामुळे वारंवार प्रवास वा बदललेले वातावरण आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या टेनिस कोर्टवर म्हणजे ग्रास, क्ले, हार्डकोर्ट, कारपेट कोर्ट इत्यादींवर खेळावे लागते. खेळाच्या तंत्रात, डावपेचांत बदल करावा लागतो आणि अशा सर्व परीक्षांना सामोरे जाऊन हे खेळाडू जेव्हा आपले अव्वल स्थान कायम राखतात तेव्हा त्यांना मनापासून दाद द्यावी लागते... त्यांच्या यशाला, खेळातील कौशल्याला, फिटनेसला आणि मनोधैर्याला.

थोडा भविष्यकाळाचा अंदाज करायचा तर काय दिसते? फेडरर संपला नसला तरी पुढे खेळणार की नाही याबाबत ‘मलाच काही ठाऊक नाही.’ असे आताच तो सांगत आहे. नदाल तर नेहमीच दुखापतींनी ग्रस्त असतो आणि तरीही दर वेळी काही काळानंतर तो पुन्हा उसळी घेऊन वर येतो. त्यामानाने योकोविच फिटनेसच्या बाबतीत अव्वल म्हणता येईल. एखादाच अपवाद असेल पण त्याला दुखापतीने वारंवार सतावले असे कधी झालेले नाही त्यामुळेच त्याने अल्पावधीत हे मोठे यश मिळवले आहे. नदालपेक्षा तो केवळ वर्षभरानेच लहान आहे म्हणून नदाल एकदा म्हणाला होता, ‘योकोविच हाच माझा प्रमुख प्रतिस्पर्धी राहणार आहे कारण फेडरर माझ्याहून पाच वर्षांनी मोठा आहे त्यामुळे माझ्याआधी तो निवृत्त होईल पण योकोविच एका वर्षाने लहान असल्यामुळे अखेरपर्यंत तो मला सतावणार आहे. (खरेतर नदालला कायमच इतर कोणत्याही प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुखापतींनीच जास्त सतावले आहे आणि तरीही तो दरवेळी जोमात पुनरागमन करत आला आहे.) योकोविच माझा मित्र आहे आणि मी त्याला इतर मित्रांप्रमाणेच नोल या नावानेच हाक मारतो असेही त्याने म्हटले होते. ही गोष्ट 2012ची. तीच आत्ता प्रत्यक्ष घडत आहे की काय असे वाटते. 

या त्रयीतील फेडररचे वर्चस्व विंम्बल्डन व अमेरिकन आणि आस्ट्रेलिअन स्पर्धेत दिसते. फ्रेंच ओपनमध्ये तो फक्त एकदाच अजिंक्य ठरला आहे. उलट त्याच फ्रेंच ओपनवर नदालचाच अधिकार, नव्हे हक्कच असल्यासारखी परिस्थिती या वर्षीपर्यंत होती. (त्याने ती स्पर्धा 13 वेळा जिंकून एक आगळाच विक्रम नोंदला आहे. इतर तीन स्पर्धांत मात्र त्याला मोजकेच यश मिळाले आहे.) यंदा मात्र त्याला फ्रेंच विजेतेपदाने हुलकावणी दिली. तिथेही योकोविच विजेता ठरला. योकोविचचे यश अधिककरून ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये आहे पण त्याने इतर तीन स्पर्धांत म्हणजे फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धेतही चांगले यश मिळवून इतर दोघांच्या तुलनेत अधिक चतुरस्रपणा दाखवला आहे म्हणजेच इतर दोघांच्या तुलनेत वेगवेगळ्या पृष्ठभागांच्या कोर्टवरही आपण त्याच सफाईने खेळू शकतो हे सिद्ध केले आहे व त्याच्या या यशाचे तेही एक कारण आहे म्हणूनच पहिले विजतेपद मिळवल्यानंतर केवळ दहा वर्षांत त्याने वीस वेळा या मालिकेतील स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे... तेही तुलनेने त्याची कारकिर्द थोडी उशिरा सुरू होऊन. 

नदालने ही मजल गेल्या वर्षी तर फेडररने 2018मध्ये गाठली होती. एक गोष्ट मात्र जाणवण्याजोगी आहे. ती म्हणजे ही विक्रमी मजल गाठली तेव्हा या तिघांचेही वय जवळजवळ सारखेच होते. 

आता यापुढे काय? या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. हे तिघे अजून किती काळ स्पर्धात्मक टेनिस खेळत राहतील; त्यांचा फॉर्म, चापल्य, कौशल्य, फटक्यातील वैविध्य, मोक्याच्या क्षणी बिनतोड सर्व्हिस करण्याची कुवत, दोन सेटने पिछाडीवर असतानाही हार न मानता जिद्दीने खेळण्याचे मनोधैर्य आणखी किती काळ टिकू शकेल? मुख्य म्हणजे त्यांना सध्या असलेली जेतेपदाची ओढ कायम राहील का? नवे खेळाडू किती वेगाने आपला दर्जा सुधारतील, स्पर्धा किती तीव्र होत जाईल या साऱ्याचा अंदाज आजच करणे खूपच अवघड आहे. त्यामुळे आता हा ग्रँड-स्लॅम मालिकेतील स्पर्धांतील 20 अजिंक्यपदांचा विक्रम कधी मागे टाकला जातो, तो प्रथम कोण मागे टाकतो आणि तो आणखी किती उंचावला जाऊ शकतो, असे प्रश्नही अवघडच आहेत.

याच ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये महिलांची 24 विजेती पदे मिळवण्याचा मार्गारेट कोर्टचा विक्रम अद्यापही अबधित आहे. प्रयत्न करूनही सेरेना विल्यम्सला त्याची बरोबरी करण्यात यश आलेले नाही. पुरुष खेळाडू तेवढी मजल गाठू शकतील का? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे येणारा काळच देऊ शकेल. या तिघांनी आपल्या खेळाने सर्वांना जो आनंद दिला त्याबद्दल तूर्त आपण त्यांचे आभार मानू आणि या यशाबद्दल नेवाक योकोविचचे अभिनंदन!

शेवटी म्हणायचे ‘कीप इट अप. थ्री चिअर्स फॉर थ्री मस्किटिअर्स!’ तुम्हा सर्वांच्या भावी काळातील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा... आणि सर्वोच्च शिखरावर फेडररला आणि नदालला गाठल्याबद्दल योकोविचचे मनःपूर्वक अभिनंदन!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: क्रीडा आ श्री केतकर टेनिस रॉजर फेडरर राफा नदाल नोव्हाक योकोविच विम्बल्डन A S Ketkar Sports Tennis Wimbledon Roger Federer Rafael Nadal Novak Djokovic Load More Tags

Comments:

YUVRAJ MHASKE

Nice article! Single correction is there.... Don Budge, United States, (in 1938) was the first man who won all four Grand Slams in the same year instead of Rod Laver (in 1962 and 1969).

a s ketkar

I have mentioned that Rod Laver was the first player AFTER the Second world war. Of Course Don Budge was the first to record a grand slam, in fact the Term Grand-Slam was used for the first time to describe his great feat. The term is from a cards game Bridge. Thank Vishnuji for reading the article.

Add Comment