जिद्दीचा महामेरू : राफा नदाल

स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला हरवत 21वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावले.

cntraveler.com

राफेल अर्थात राफा नदाल आता टेनिस जगताच्या सर्वोच्च शिखरावर आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेआधी या शिखरावर रॉजर फेडरर, नदाल आणि नोवाक योकोविच हे तिघेजण होते. त्या प्रत्येकाने ग्रँड स्लॅम मालिकेतील, म्हणजे ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन या स्पर्धांतील एकूण 20 विजेतीपदे मिळवली होती. पण रविवारी (30 जानेवारी 2022 रोजी) नदालने यंदाची खुली ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकली. आता तो फेडरर आणि योकोविच यांना मागे टाकून आणखी एक पायरी वर चढला आहे. एवढे मोठे यश मिळवणारा आता तो एकमेव टेनिसपटु आहे. आजवर कोणाही पुरुष खेळाडूने ही मजल गाठली नव्हती. पण नदालने ती करामत करून दाखवली आहे. तीही वयाच्या 35 व्या वर्षी! या वयात ग्रँड स्लॅम मालिकेतील स्पर्धेत असे यश मिळवणारा तो तिसराच खेळाडू आहे. अर्थातच तो आता अद्वितीय म्हणवून घेण्यासाठी पात्र ठरला आहे.

इतर खेळाडू आणि नदाल यांच्यात महत्त्वाचा फरक असा आहे की, इतर कोणाही खेळाडूपेक्षा त्याला दुखापतींनी वारंवार सतावले आहे आणि तरीही दरवेळी जिद्दीने प्रयत्न करून त्याने शारीरिक तंदुरुस्ती मिळवली आहे आणि इतकेच नाही तर स्पर्धांमागून स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याच्या पायाच्या तळव्याच्या आणि गुडघ्याच्या दुखापती, त्यांवरील उपचार, त्यामुळे वाया जाणारा वेळ आणि तरीही दरवेळी कोर्टवर नव्या जोमाने आगमन करण्याची त्याची वृत्ती खरोखरच अनुकरणीय म्हणावी लागेल. म्हणूनच 21व्या विजेतेपदाबद्दल त्याचे अभिनंदन करताना फेडररने त्याला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे : 'कट्टर प्रतिस्पर्ध्याला मात देऊन 21वे ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवणारा पहिला पुरुष खेळाडू बनल्याबद्दल माझ्या मित्राचे अभिनंदन. काही महिन्यांआधीच आपल्या दोघांनाही कुबड्यांच्या आधारे चालावे लागत असल्याने आपण एकमेकांची टिंगल केली होती. एका महान खेळाडूला कधीच कमी लेखू नये. तुझी कामगिरी अद्वितीय आहे. तुझी झोकून देण्याची वृत्ती आणि लढाऊ बाणा प्रेरणादायी आहे. या युगात तुझ्याबरोबर खेळता आले, याचा मला अभिमान आहे. तुझ्या यशामध्ये लहानसे योगदान देण्याची संधी मला मिळाली आणि तुही माझ्या कारकिर्दीत गेल्या 18 वर्षांपासून असेच योगदान देत आला आहेस. मला खातरी आहे की, भविष्यात तू आणखी यश मिळवशील.'

कदाचित हे खरेही होईल कारण पुढील स्पर्धा खुली फ्रेंच स्पर्धा आहे आणि तिच्यात नदालने आजवर 13 वेळा अजिंक्यपद प्राप्त केले आहे. कुणी सांगावे, यंदाही तो विजेता बनेल आणि आपल्या अजिंक्यपदांची संख्या 2022 मध्येच 22 वर नेईलही! पहिले विजेतेपद त्याने त्याच स्पर्धेत सतराव्या वर्षी 2005 मध्ये मिळवले होते आणि नंतर तेथे  2006,7,8,10,11,12,13,14,17,18,19 आणि 2020 मध्ये तो विजयी झाला होता. विम्बल्डनचे विजेतेपद त्याने 2008 आणि 10 मध्ये, तर अमेरिकन स्पर्धेचे 2010,13,17 आणि 19 मध्ये मिळवले होते. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत याआधी तो 2009 मध्ये विजेता होता.

एखाद्या दुखापतीनंतर खेळाडूला स्पर्धात्मक खेळातून माघार घ्यावी लागल्याची उदाहरणे आहेत पण दुखापतींवर अनेकदा मात करणारा मात्र नदाल हा एकमेवच खेळाडू असावा. खेळामध्ये यश मिळवायचे तर खेळाडूकडे जिद्द असायला हवी हे सर्वांनाच माहीत आहे, त्याशिवाय विजेता बनणे अवघडच नाही तर अशक्यप्रायच असते. आणि आपल्याकडे जिद्दीचा तुटवडा नाही, हे त्याने दरवेळी दुखापतींवर मात करून दाखवून दिले आहे. याबाबतीत त्याची बरोबरी फार तर सेरेना विल्यम्सबरोबर करता येईल. आणि अशा अफाट जिद्दीमुळेच या दोघांनी मोठे यश मिळवले आहे. नदालच्या ग्रँड स्लॅम मालिकेतील अजिंक्यपदांची संख्या आता 21 झाली आहे, तर सेरेना विल्यम्सने त्याच स्पर्धांत 23 वेळा विजेतेपद संपादन केले आहे.


हेही वाचा : त्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली! - आ. श्री. केतकर


लहानपणापासूनच खेळांची आवड असलेला राफा वडलांप्रमाणेच फुटबॉलचा चाहता होता, आजही आहे. आणि त्याला टेनिसही आवडत असे. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने टेनिसला पसंती दिली आणि काकाच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. स्वप्न होते कोणत्याही टेनिस खेळाडूप्रमाणे विम्बल्डन स्पर्धेच्या विजेतेपदाचे. काकाने त्याला टेनिसचे धडे दिलेच पण वडलांनी बरोबर कसे वागायचे तेही शिकवले. म्हणजे सामना जिंकला तरी प्रतिस्पर्ध्याला भेटायचे, हरला तरी प्रतिस्पर्ध्याचे अभिनंदन करायचे, हे त्याला पटवून दिले. वयाच्या अगदी चौथ्या वर्षापासून तो टेनिस खेळू लागला होता, पण तेव्हा त्याचा फुटबॉलकडेही ओढा होता. तो फुटबॉलही चांगला खेळायचा आणि गोलही करायचा. फुटबॉलमुळेच माझ्यात संघभावना निर्माण झाली आहे, असे तो सांगतो आणि त्यामुळेच स्पेनने डेव्हिस चषक स्पर्धेचे मिळवलेले विजेतेपद त्याला मोलाचे वाटते. देशासाठी खेळणे हा मोलाचा आणि हवाहवासा अनुभव आहे, असे तो म्हणतो. त्याला तितकेच मोलाचे वाटते ऑलिंपिक सुवर्णपदक. ऑलिंपिकमध्ये इतर खेळाडूंबरोबर राहायला आणि खेळायला मिळाल्याचे त्याला अप्रूप आहे.

आठव्या वर्षी एकदा टेनिसची निवड केल्यावर मात्र त्याने सर्वस्व पणाला लावून त्याकडे लक्ष दिले. काका टोनी हाच त्याचा मार्गदर्शक. त्याने सुरुवातीलाच एक गोष्ट केली. उजवाखुरा असलेल्या राफाला डावखुरा बनण्याचा सल्ला दिला; कारण डावऱ्या खेळाडूंना त्यामुळे काही फायदे मिळतात, असे त्याचे म्हणणे होते. राफाने मनोमन त्याचा सल्ला मानला आणि त्याचे फळ त्याला मिळाले. तो यशाच्या पायऱ्या चढत असतानाही तो कुणीतरी मोठा आहे, असे घरच्यांनी त्याला कधीच भासू दिले नाही. उलट त्याच्या वागण्यात कधी चूक आढळली तेव्हा त्याच्या वडलांनी ती त्याला सुधारायला लावली. यंदाच्या स्पर्धेआधीच आपल्या बेजबाबदारपणाने आणि खोटे बोलण्याने सध्याचा प्रथम क्रमांकाचा खेळाडू योकोविच याला स्पर्धेला मुकावे लागले. अर्थात त्यामुळे नदालच्या यशाचे मोल कमी मानायचे कारण नाही, कारण योकोविच स्पर्धेत असतानाही त्यानेे स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेत पहिल्या फेरीत त्याने गिरॉनचा 6-1, 6-4, 6-2 असा , तर दुसऱ्या फेरीत त्याने हांफमानचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-3, 6-4 असा सहज पराभव केला. तिसऱ्या फेरीत चांगली झुंज देणाऱ्या काचानोव्हला 6-3,6-2, 3-6, 6-1 असे हरवले. चौथ्या फेरीत मान्नारिओवर 7-6, 6-2, 6-2 अशी मात केली तर उपान्त्यपूर्व सामन्यात चांगली लढत देणाऱ्या शापोवालोवला पाच सेटच्या लढतीत 6-3, 6-4, 4-6, 3-6 आणि 6-3 असे नमवले आणि चुरशीच्या उपान्त्य सामन्यामध्ये बेरेट्टिनीचे आव्हान 6-3, 6-2, 3-6, 6-3 असे परतवले. 

अंतिम सामन्यात त्याची गाठ दुसरे मानांकन असलेल्या डॅनिल मेदवेदेव या गतसालच्या उपविजेत्या आणि अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या विजेत्याबरोबर होती. ग्रँड स्लॅम मालिकेतील, लागोपाठ दुसरे विजेतेपद मिळवण्याच्या तयारीनेच मेदवेदेव कोर्टवर उतरला होता. परंतु गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही त्याला या स्पर्धेत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. नदालने त्याच्यावर 2-6, 5-7, 6-4, 6-4 आणि 7-5 अशी मात करून विक्रमी 21 वे विजेतेपद मिळवले. पाच सेटमध्ये झालेली ही लढत तब्बल पाच तास 24 मिनिटे चालली होती यावरूनच हा विजय सहज मिळाला नव्हता हे स्पष्ट होईल.

याला दोन कारणे होती. मेदवेदेवने उपान्त्य सामन्यात त्सित्सिपासला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले होते, त्यामुळे त्याला चांगलाच आत्मविश्वास होता शिवाय उपान्त्य फेरीतच बेरेट्टिनीने नदालला चांगले झुंजवले होते. त्यामुळेही मेदवेदेवची उमेद वाढली असणार. शिवाय नदालला (गेल्य काही स्पर्धांतील अनुपस्थितीमुळे) सहावे मानांकन होते, तर मेदवेदेवला दुसरे. अर्थातच सुरुवातीला तोच विजयी होणार असे सांगणाऱ्यांची संख्या 6 टक्के होती, यावरूनच त्याच्या खेळाने प्रेक्षक किती प्रभावित झाले होते ते कळते. त्याने सुरुवातीलाच जोर केला आणि नदालची सर्व्हिस भेदण्यात यश मिळवले. नदालचे फटके तो नुसतेच परतवत नव्हता तर त्यांची पेरणी व्यवस्थित करत होता. सीमारेषेलगतून जाणाऱ्या त्याच्या परतीच्या फटक्यांनी (डाउन द लाइन रिटर्नस) त्याला आघाडी मिळवून दिली. त्यातच, नदालला सूर गवसला नसावा असाच त्याचा खेळ होता. पहिल्याच काय पण अगदी निर्णायक पाचव्या सेटमध्येही त्याची पहिली सर्व्हिस त्याला दगा देत होती. परतीच्या फटक्यांवर त्याची नेहमीप्रमाणे हुकूमत नव्हती. ते वारंवार नेटमध्येच जात होते आणि तो जास्त जास्त पिछाडीवर पडत होता, त्याबरोबरच मेदवेदेवचा उत्साह वाढत होता. त्याने पहिला सेट 6-2 असा जिंकला. दुसरा सेटही याच धर्तीवर जाणार असे वाटत होते. पण पहिल्या सेटनंतर नदाल जरासा सावरला होता. अर्थात त्याच्या चुका कमी झाल्या नव्हत्या तरी त्याच्या काही अचूक फटक्यांनी त्याला गुण मिळवून दिले होते. त्यामुळेच या सेटमध्ये 6-6 अशी बरोबरी त्याला साधता आली. मात्र टाय-ब्रेकरमध्ये पुन्हा मेदवेदेवने आक्रमक खेळ केला आणि तो 7-5 असा जिंकून दुसरा सेटही 7-6 असा खिशात टाकला.


हेही वाचा : Rafa Rules Supreme! -  A. S. Ketkar


एक मात्र झाले. दुसरा सेट टायब्रेकरवर गेल्यामुळे नदालचा आत्मविश्वास वाढला होता. लवकरच सूर गवसणार असे त्याला वाटू लागले असणार आणि तसेच झाले. तिसऱ्या सेटमध्ये तो नव्या जोमाने कोर्टवर उतरला होता आणि त्याने मेदवेदेवची सर्व्हिस भेदून आघाडी घेतली. त्याची पहिली सर्व्हिस दगा देतच होती, काही फटके नेटमध्ये जातच होते पण आता त्यांचे प्रमाण कमी झाले होते आणि अचूक फटक्यांनी त्यांची जागा घेतली होती. परिणामी त्याने हा सेट 6-4 असा जिंकला. मात्र हे काही सहज झाले नाही, सेटमध्ये अनेकदा 4-4 (ड्यूस) अशी गुणसंख्या होत होती आणि अगदी ब्रेक पॉइंटपर्यंत म्हणजे सर्व्हिस भेदण्याच्या गुणापर्यंत येऊनही मेदवेदेव त्याला लगेच यश मिळू देत नव्हता. पण नदालचा अनुभव त्याला तारत होता. तिसऱ्या-चौथ्या सेटमध्येही याचीच पुनरावृत्ती होत होती पण आता नदालला यशाची चाहूल लागली असावी कारण त्याच्या खेळात नवा जोम दिसू लागला होता. दुसरीकडे आता चुका करण्याची वेळ मेदवेदेववर होती आणि त्याचे परतीचे फटके नेटमध्ये जाऊ लागले होते. शिवाय त्याला त्याचा पायही त्रास देऊ लागला होता. तो विश्रांतीच्या काळात मसाज करून घेत होता आणि कोर्टवरही त्याचा तापट स्वभाव डोके वर काढू लागला होता. तो पंचांबरोबर वाद घालत होता. 

कदाचित यामुळे त्याची एकाग्रताही भंग झाली असणार. नदाल मात्र शांत होता. त्याला आत्मविश्वास वाटू लागला होता आणि त्याच्यावरील दडपणही कमी झाल्यासारखे दिसू लागले होते. मात्र तरीही दोघे दुसऱ्याला सहजी सेट जिंकू देत नव्हते. त्यामुळेच अनेक ड्यूस आणि तितकेच ब्रेक पॉइंट खेळावे लागत होते व सामना लांबत चालला होता. पण चुरसच एवढी होती, की गच्च भरलेल्या प्रेक्षागारातील एकही प्रेक्षक जागा सोडायला तयार नव्हता. अजूनही सामना सर्व्हिसबरोबरच जात होता. आणि एकाने सर्व्हिस भेदली की दुसरा त्याची परतफेड करत होता. अशा स्थितीत सामना 5-5 अशा स्थितीत आला. नदालने आपली सर्व्हिस राखली आणि 6-5 अशी आघाडी घेतली. आता मेदवेदेवने गेम जिंकून 6-6 अशी बरोबरी केली असती तर सामना आणखी काही काळ चालला असता कारण निर्णायक सेटमध्ये टाय-ब्रेकरचा वापर होत नाही, तर दोन गेमच्या फरकाने विजय मिळवावा लागतो. सामना सुरू होऊन पाच तास होऊन गेले होते आणि तशी वेळ आली तर सामना आणखी लांबला असता, अर्थात प्रेक्षकांची त्यालाही तयारी होती, अशी वेळ पुन्हा येणार नव्हती. पण नदालला मात्र आता पुरे असे वाटत असावे. त्याने सारा अनुभव पणाला लावला आणि फटक्यांची योग्य निवड केली आणि त्याच्या या नव्या तंत्राने मेदवेदेव गडबडून गेला आणि नमला. नदालने हा सेट 7-5 जिंकला आणि आजवर कुणीही न मिळवलेले यश संपादन केले.

महिला एकेरीचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या ॲशली बार्टीने मिळवले. या स्पर्धेला तब्बल 44 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन विजेती मिळाली. तिने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सला सरळ सेटमध्ये 6-3, 7-6 (टाय ब्रेकर 7-2) असे हरवून हा ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वीची या स्पर्धेची ऑस्ट्रेलियन विजेती 197 मध्ये ख्रिस्तीन ओनिल ही होती. पुरुषांच्या एकेरीत एकेकाळी वर्चस्व असलेले अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता दिसत नाहीत, तर त्यांच्याऐवजी आता युरोपियन खेळाडूंची छाप टेनिसवर दिसते आहे. फेडरर, नदाल आणि योकोविच यांची ग्रँड स्लॅम मालिकेतील एकूण 61 विजेतीपदे याचीच साक्ष आहेत.

- आ. श्री. केतकर 
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: काका टोनी अजिंक्यपद टेनिस डॅनिल मेदवेदेव Load More Tags

Add Comment