सारे काही झाले ते कशासाठी... आयपीएलसाठी?

संयुक्त अरब अमिरातीमध्ये तीन ठिकाणी खेळवण्यात येणारी आयपीएल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे

आठवड्यापूर्वीची गोष्ट. स्थळ - मँचेस्टर.  शुक्रवार 10 सप्टेंबर. अतिशय चुरशीने खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या क्रिकेट कसोटी मालिकेतील अखेरच्या पाचव्या सामन्याची सुरुवात कधी होते याची सारे जण आतुरतेने वाट बघत होते. कारण या मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर होता त्यामुळे इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवणार का... ही उत्सुकता होती. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर नेहमीच इंग्लंडचा दबदबा राहिला आहे. सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला तरच भारताला मालिकेत विजय मिळवता येणार होता. त्यामुळेच या सामन्यात दोन्ही संघ जिद्दीने खेळतील आणि सामना रंगतदार होईल अशी दोन्ही संघांच्या चाहत्यांची अपेक्षा होती. संघांची निवड जाहीर झाली होती. खेळपट्टीबाबत वेगवेगळे अंदाज केले जात होते. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण सामना सुरू होण्याआधी अगदी थोडा काळ बाकी असतानाच सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सारे जण आश्चर्यचकित झाले. असे काय झाले की, सामना रद्द करावा लागला हा प्रश्न सर्वांना पडला होता.

थोड्याच काळानंतर खुलासा करण्यात आला. आधीच्या ओव्हल कसोटीदरम्यानच प्रशिक्षकांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा भारतीय संघातील सर्व खेळाडूंची चाचणी करण्यात आली होती आणि भारताने सामना जिंकल्यानंतरही पुन्हा चाचणी झाली. त्यात सर्व खेळाडू निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच संघ आणि सपोर्ट स्टाफ मँचेस्टरला आले होते. मात्र त्यानंतर सपोर्ट स्टाफमधील सहायक फिजिओ योगेश परमार याला करोनाची लागण झाली. 'दोन दिवसांनंतर परमारला लागण झालीच कशी?' या प्रश्नाने भारतीय खेळाडू अस्वस्थ झाले होते. पुन्हा एकदा चाचणी झाली. तीही निगेटिव्ह असल्याचा निर्णय आल्याने इंग्लंडचे क्रिकेट मंडळ कसोटी सामना खेळवण्याच्या तयारीत होते. दुसरीकडे भारतीय खेळाडू मात्र सामना सुरू झाल्यानंतर चुकून कोणी दुसरा खेळाडू करोनाबाधित निघाला तर काय करायचे या विचाराने चिंताग्रस्त होते. आधीच खेळाचे, त्यातही मालिकेचा निकाल अवलंबून असलेल्या कसोटीत खेळण्याचे दडपण त्यांच्यावर होते आणि त्यात भर घालणारे करोना चाचणीचे दडपण त्यांना सहन होत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी मैदानावर न उतरण्याचा निर्णय घेतला होता.

खेळाडूंना वाटणाऱ्या भीतीमुळेच सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असे वेल्स क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनीही सांगितले. ते म्हणाले, 'मला चाहत्यांसाठी खूपच वाईट वाटते आहे. या सामन्याला जगभरचा प्रेक्षकवर्ग लाभणार होता आणि मैदानावरही मोठ्या संख्येने प्रेक्षक आले असते. सामना खेळण्यासाठी भारतीय खेळाडू उत्सुक नाहीत हे आदल्या दिवशीच आमच्या लक्षात आले होते. करोनाच्या उद्रेकामुळे नाही तर सहायक फिजिओची चाचणी सकारात्मक आल्यामुळे पुढे काय होणार या भीतीने भारतीय खेळाडूंना ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी सामना खेळण्यास नकार दिला. विविध आश्वासने देऊनही खेळाडूंची भीती कमी करण्यात आम्हाला यश आले नाही. त्यामुळेच सामना रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता.'

या निर्णयामुळे नियमानुसार सामना इंग्लंडला बहाल करण्यात आला असता. इंग्लंडची तशी मागणी होती पण तसे करण्यास भारतीय कर्णधार विराट कोहलीने नकार दिला. याबाबत विराट कोहली सकाळ या वृत्तपत्राचे क्रीडालेखक सुनंदन लेले यांना म्हणाला, 'सततच्या जैवसुरक्षेच्या वातावरणात राहून खेळाडू कंटाळले आहेत. सर्व काळजी घेऊनही योगेश परमारला करोनाची लागण झाली आहे हे समजल्यावर सगळे खेळाडू खूपच अस्वस्थ झाले. म्हणून अखेरीस सामना आत्ता नको, असे म्हणावे लागले. भारतीय खेळाडूंनी सामन्याचा पहिला दिवस म्हणजे शुक्रवार हॉटेलच्या खोलीतच कोंडून घालवला. कुठलाही धोका पत्करायची कोणाचीही तयारी नव्हती. मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असतानाही सामना न खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे आम्ही निराश झालो आहोत तर इंग्लिश माध्यमात असे वृत्त प्रसिद्ध झाले की, सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय खेळाडूंची करोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी एकदोन दिवसांत काही खेळडूंना लक्षणे दिसू शकतील.' असे विराट कोहलीचे म्हणणे होते. (त्याची ही भीती नंतर अमिरातीकडे जातानाच आपोआप नाहीशी झाली का असाही एक प्रश्न आहे कारण खेळाडू तर तेच होते!)

अशा प्रकारे सामना सुरू होण्यापूर्वी जेमतेम दोन तास आधी हा निर्णय घेतला गेला. असे अचानक आणि विचित्र कारणाने सामना रद्द होण्याचे प्रसंग कसोटी इतिहासात अगदी कमी आहेत. इंग्लीश आणि क्रिकेट मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणाले, 'आमचा नाइलाज झाला. आम्ही सामना खेळायला तयार होतो आणि खेळाडूही सज्ज होते पण भारतीय संघाच्या नकाराने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आता इंग्लंडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या वाद निवारण समितीकडे हा प्रश्न सोपवला आहे. सामना पुन्हा कधीतरी खेळवायचा की पूर्णपणे रद्द करायचा की सामना भारताने सोडला म्हणून इंग्लंडला विजयी घोषित करायचे आणि मालिका बरोबरीत सोडवायची याबाबतचा निर्णय ही समिती घेईल. ते सारे ठीक आहे. पण या निर्णयाने आणि भारतीय खेळाडूंच्या खेळण्यास नकार देण्याने बरेच प्रश्न निर्माण होतात.'

सर्वसाधारणपणे पहिली प्रतिक्रिया होती की, आयपीएल याला कारणीभूत आहे की काय? कारण असे की, नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाचवी कसोटी 15 सप्टेंबरपर्यंत चालणार होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये तीन ठिकाणी खेळवण्यात येणारी आयपीएल स्पर्धा आजपासून (19 सप्टेंबर ) सुरू होत आहे. अमिरातीतील नियमांनुसार खेळाडूंना तिथे पोहोचल्यावर सहा दिवस विलगीकरणात राहावे लागणार होते. म्हणजे स्पर्धा तोवर सुरूही झाली असती. सामना रद्द झाल्यामुळे खेळाडू तिथे तीन दिवस आधीच पोहोचल्याने ही अडचण आपोआपच दूर होणार म्हणून तर हा निर्णय झाला नसेल? कारण भारतीय चमूतील जवळपास सर्वच खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. आधीच बऱ्याच महत्त्वाच्या परदेशी खेळाडूंनी या-ना-त्या कारणाने माघार घेतली आहे, त्यामुळेच भारतीय खेळाडूंना असे करावे लागले असेल का? खरेतर चौथ्या कसोटीदरम्यानच भारतीय संघाचे व्यवस्थापक करोनाबाधित असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर आणखी काही जणांनाही लागण झाल्याचे समजले होते. तरीही ती कसोटी खेळली गेली. मग पाचव्या कसोटीच्या वेळीही तसे करता आले नसते का?

सपोर्ट स्टाफमधील अनेक जण बाधित झाले होते हे खरे पण तशीही आयोजकांतर्फे फिजिओची व्यवस्था करणे शक्य होते. दुसरे म्हणजे नव्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूला मोठी दुखापत झाली तर त्याच्या जागी राखीव खेळाडूंमधील एक खेळाडू बदली घेण्याची परवानगी आहे. करोनामुळे राखीव खेळाडूंची संख्या नऊ आहे. तरीही हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला गेला व यामुळेच संशयाला बळकटी येते.

असेही सांगण्यात येत होते की, जैवसुरक्षित वातावरणात दीर्घकाळ राहून खेळाडू कंटाळले होते. ते सहज शक्य आहे कारण जूनपासूनच ते इंग्लंडमध्ये होते आणि सतत जैवसुरक्षित वातावरणातच राहत होते. दौऱ्याच्या कार्यक्रमात ठरल्यानुसारच हे होते. मग आताच ते कारण का दिले गेले हा प्रश्न आहे... कारण असे की, आयपीएलसाठी अमिरातीत गेले तरी तिथेही खेळाडूंना जैवसुरक्षित वातावरणातच राहावे लागणार आहे. आता जागा बदलल्याने तो कंटाळा गेला की काय... मग कसोटीच्या चार दिवसांनी काय फरक पडला असता? म्हणजे संशायाची सुई पुन्हा वळते ती आयपीएलकडेच!

करोनाबाबतची भीती आपण समजू शकतो. सर्वांनाच ती वाटते आहे आणि अद्याप तिच्यातून कोणीही पूर्णपणे बाहेर पडलेले नाही. सामना सुरू झाल्यावर एखादा खेळाडू बाधित झाला तर काय... असे खेळाडूंना वाटले तेही बरोबरच होते पण मग सर्वांनी बरोबरच प्रवास करून अमिरातीत जाताना भीती वाटत नव्हती का? की त्यांना तशी खातरी देण्यात आली होती? आयपीएलच्या एकेका संघात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ व अन्य धरून साधारण चाळीस ते पन्नास जण असतात म्हणजे तशी गर्दीच म्हणायची.. त्यातच त्यांच्यापैकी कधी एखादा जैवसुरक्षित वातावरणातून बाहेर गेला किंवा कुणाला बाहेरची कुणी व्यक्ती अचानक भेटली (आणि ते कुणाच्याच ध्यानात आले नाही) तर तो धोकाच नाही का? शिवाय विविध देशांतून आलेले खेळाडू तिथे असणार. मग त्यांतील कुणाला तरी बाधा झालेली आढळली तर? कारण निगेटिव्ह चाचणीनंतरही काही काळाने भारतीय व्यवस्थापकांना आणि सपोर्ट स्टाफमधील लोकांना तसेच फिजिओला बाधा झाली होतीच ना? तर मग इंग्लंडमध्ये जी भीती सामना रद्द करण्यास कारणीभूत ठरली होती ती आता कुठे गेली? का अमिरातीत तसे काही होण्याची भीती भारतीय खेळाडूंना वाटली नाही आणि आताही वाटत नाही? हा प्रश्नच आहे. असे आहे का की, आयपीएलच्या केवळ नावानेच त्यांची भीती दूर पळते? तसे असले तर ते चांगलेच आहे म्हणा!

खरेतर ही अमिरातीतील आयपीएल म्हणजे यंदाच्या आयपीएलचा दुसरा भाग आहे. आता तिथे 31 सामने होणार आहेत. आधीचे पहिल्या टप्प्यातील सामने भारतात झाले पण दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यानंतर स्पर्धा पुढे ढकलावी लागली... तीही खेळाडू बाधित होऊ लागल्याने काळजी निर्माण झाली म्हणून. त्या वेळी झाले त्याप्रमाणे (तसे न होवो, अशी सर्वांचीच इच्छा आहे.) आता झाले तर काय ? असे काही महत्त्वाचे प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढे असतील आणि त्यांची उत्तरे शोधणे हे काही सोपे काम नसेल. सामना रद्द झाल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला चांगलाच फायदा होणार आहे. एरवी त्यांचे मोठे नुकसान झाले असते. (कसोटी रद्द झाल्याने इंग्लीश क्रिकेट मंडळाचेही तीन हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.) बरे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा फायदातोटा असतो तो काही हजार कोटींमध्ये. अर्थातच कुणालाही त्याचे मोल किती हे वेगळे सांगावे लागणार नाही. म्हणूनच मंडळ आयपीएलबाबत अत्यंत आग्रही होते, त्यांच्या दृष्टीने ते बरोबरच होते पण त्यांना एकूण परिस्थितीचा विसर पडल्यासारखे झाले असे वाटते.

इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेनने तर या परिस्थितीसाठी या भरगच्च कार्यक्रमालाच जबाबदार ठरवले आहे. आयपीएलवर निशाणा धरताना तो सरळच म्हणाला की, आयपीएल नावाचा हत्ती घरामध्ये घुसला आहे व त्याच्यामुळेच भरगच्च कार्यक्रमाचा हा सर्व गोंधळ झाला आहे. पाचवा कसोटी सामना होण्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळाकडून भारतीय मंडळाशी संपर्क साधून प्रयत्न केले जात होते पण त्यांनी यातून काही मार्ग काढला नाही. आता ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननेदेखील असाच सूर लावला आहे. अनेक जण हलक्या आवाजात चर्चा करत आहेत पण थेट बोलण्याचे धाडस कुणी करत नाही.

माध्यमेही याबाबत 'तेरी भी चुप मेरी भी चुप' असेच धोरण बाळगत आहेत. (एरवीही ते आयपीएलबाबत स्वतंत्रपणे लिहीत, बोलत नाहीतच, मंडळाच्या मर्जीनेच सारे काही वृत्त येते आणि तेच छापले जाते असे म्हटले जाते. खरेखोटे तेच जाणोत!) पण शेवटी त्यांनाही आयपीएल स्पर्धा झाली की बराच पैसा मिळणार आहे. तेव्हा ते असे काही करणार नाहीत हे स्पष्टच आहे. खेळाडूंनाही मंडळाला दुखवून चालण्यासारखे नाही कारण त्यांची कारकिर्दच मंडळाच्या मर्जीवर अवलंबून असते. अगदी बड्याबड्या माजी खेळाडूंचे हितसंबंधदेखील यामध्ये गुंतले आहेत. कुणी समालोचन करतो, कुणी संघाचा प्रशिक्षक व्यवस्थापक मेंटॉर असतो शिवाय मंडळातील अनेक पदेही त्यांना खुणावत असतात. अशा परिस्थितीत ते गप्पच राहणार... कारण पुन्हा पैसाच!

शेवटी आता सारे काही करोनाच्या हाती असेच म्हणायचे. स्पर्धा विनाविघ्न पार पडो अशीच सर्व क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल हे मात्र नक्की. आपणही तसेच म्हणू या. शेवटी काहीही झाले तरी खेळाडू आपलेच आहेत आणि ते आपल्याला भरपूर आनंद देतात आणि देत राहतील अशी आशा करू या!

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com 

(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)

Tags: भारत-इंग्लंड कसोटी सामना इंग्लंड दौरा विराट कोहली आ. श्री. केतकर क्रीडा cricket india-england test match A. S. Ketkar virat kohali sports IPL आयपीएल Load More Tags

Add Comment