अतिशय महत्त्वाच्या (पण दुर्लक्षित) विषयावरील बहुमोल पुस्तक...

प्रख्यात हिंदी लेखक आणि पत्रकार सोपान जोशी लिखित 'जल थल मल' या पुस्तकाचा परिचय 

फोटो सौजन्य: bytwodesign.com

नुकत्याच झालेल्या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने (22 मार्च) एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरील बहुमोल पुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘जल थल मल’. प्रख्यात हिंदी लेखक आणि पत्रकार सोपान जोशी यांनी 2016मध्ये हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्राजक्ता अतुल यांनी केला असून तो 2019मध्ये प्रकाशित झाला आहे. (अनुवाद मराठीमध्ये थोडा उशिराच आला असला तरी तो येणे महत्त्वाचे आहे.) सध्या आपण कोणत्या वातावरणात जगत आहोत आणि त्याची जबाबदारीही बहुतांश आपल्यावरच कशी आहे हे निदान हे पुस्तक वाचणाऱ्याला कळेल. 

वाचकाने याबाबत विचार करण्यास सुरुवात केली तरीही या पुस्तकाचे काम काही प्रमाणात साध्य झाले असे म्हणता येईल... कारण प्रत्यक्ष उपाययोजनेचे मार्ग एकट्यादुकट्याने करता येतीलही... पण ते प्रचंड मोठ्या संख्येच्या वस्त्यांत, शहरांत होणे गरजेचे आहे आणि ही काही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही.

साध्या-साध्या गोष्टींतून आपण या पृथ्वीची हानी घडवत आहोत आणि त्यामुळे आपल्या मानव जातीचाच अंत जवळ आणत आहोत, असा इशारा लेखकाने या पुस्तकातून दिला आहे. तो म्हणतो की, शौचालयांचे असणे वा नसणे हा या पुस्तकाचा विषय नाही. हा तर एक छोटासा पैलू आहे - शुचितेच्या त्रिकोणी विचारमालिकेचा! ज्याचा एक कोन आहे पाणी, दुसरा माती आणि तिसरा शरीर. अर्थात जल, थल व मल. 

प्रश्न पृथ्वीच्या रक्षणाचा अजिबात नाही. रक्षण मानवजातीला स्वतःचेच करायचे आहे... तेदेखील स्वतःपासूनच. कोणताही राजकीय पक्षाच्या किंवा शासनाच्या किंवा नगरपालिकेच्या भल्याबुऱ्या धोरणांवरून हे ठरणार नाही. ते साध्य  होईल समाजाच्या मानसिक शुचितेतून! जल, थल आणि मल यांच्या संतुलनातून!  ...आणि याबाबतच लेखकाने पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे, तिला चित्रांची जोड आहे... त्यामुळे विषय सुलभतेने समजण्यास मदत होते.

साडेतीन अब्ज वर्षांच्या या ग्रहाच्या इतिहासाची सुरुवात करून मग सध्याचा प्रश्न का निर्माण झाला आहे ते लेखक सांगतो. एकपेशीय जीव होते तेव्हापासून ते आज पृथ्वीची अवस्था काय आहे हे सांगितले आहे. जीवनाचे चक्र बऱ्याच काळपर्यंत यशस्वीपणे चालले... पण नंतर मात्र प्रदूषणाचा उपद्रव जाणवू लागला. 

त्या काळातील सर्वात भीषण प्रदूषण हा कदाचित सर्वात मोठा प्रलय होता आणि आश्चर्य म्हणजे तेव्हाचा तो विषारी वायू होता प्राणवायू! ऑक्सिजन!!! हाच प्राणवायू नंतर जीवसृष्टीसाठी जीवनाचा स्रोत ठरला. जीवनाप्रमाणेच मृत्यूदेखील ऑक्सिजनच्या लीलेचा भाग आहे. प्राणिमात्राचे शरीर हा उर्वरकांचा, पोषक द्रव्यांचा छोटासा संग्रह असतो. मृत्यूनंतर शरीरातील उर्वरके दुसऱ्या जिवाच्या अवतारात पुन्हा भूतलावर येतात. उदाहरणार्थ, जमिनीतून उगवणारे धान्य, भाज्या यांपासून तयार होणाऱ्या खाद्यातून मातीतील उर्वरके आपल्या पोटात जातात. मरणानंतर शरीर जाळले वा पुरले तरी उर्वरके जिथून आली, त्याच मातीत पुन्हा मिसळतात. जीवन पुनर्जन्माच्या या सूत्रावर चालू राहते.

वाढत्या लोकसंख्येमुळे मलमूत्राचेही प्रमाण वाढले आहे... परंतु त्याच्या नियोजनात त्यापटीने वाढ झालेली नाही. जगात चारशे कोटी लोकांकडे शौचालयाची सोय नाही. असली तरी मैलापाण्याचा सुरक्षित निचरा होईल अशी व्यवस्था नाही म्हणजे साधारण साठ टक्के मलमूत्राचे योग्य निस्सारण होत नाही. उघड्यावरील मलातून अनेक रोग पसरतात. लाखो लोक मरण पावतात हे सांगून लेखक म्हणतो, ‘निसर्गनियमानुसार जमिनीतून आलेली उर्वरके शेवटी जमिनीतच परतायला हवीत... पुन्हा खाद्यरूपात त्यांचे रूपांतर होण्यासाठी.’ 

...पण आज स्वच्छतेचे परमोच्च साधन समजल्या जाणाऱ्या फ्लशच्या वापरामुळे उर्वरके मातीत परतण्याऐवजी पाण्यात ढकलली जात आहेत. या नासाडीने मातीचा कस कमी होतो व कृत्रिम खतांवर अमाप पैसा खर्च होतो आणि एवढे करूनही दरवर्षी शेतजमिनीच्या एक कोटी टन उर्वरकांचा नाश होतच आहे... कारण उर्वरके गटारांमध्ये वाहवली जात आहेत.

दाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील पाण्याचे स्रोत अधिकच हलाखीच्या स्थितीत आहेत. त्या गंगेसारख्या पवित्र नद्या असोत, तलाव वा भूजल. त्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर मलनिस्सारण प्रक्रिया यंत्रे हा एकमेव उपाय समजला जात असला तरी ती तयार करण्यास महागडी आहेत व चालवण्यास किचकट आहेत. कितीतरी धनाढ्य देशांत ही यंत्रणा कशी कुचकामी ठरली आहे हे लेखकाने सांगितले आहे. 

मलमूत्राचे ओझे उचलण्याचे काम मानवसमूहांवरही टाकले जाते, ज्यांच्या जन्मजात दुर्दैवाचा फायदा इतर जण घेतात. स्वच्छतेच्या नावाखाली त्यांना कसे गुलाम केले आहे हे लेखक सांगतो... पण याबरोबरच मलमूत्राने व्यापलेल्या आपल्या विश्वाचे सोने करण्याचे जे प्रयत्न किमयागार सातत्याने करत आहेत... त्यांच्या कामाची माहितीही देतो. आपण या साऱ्यांकडून बरेच शिकू शकतो असेही तो म्हणतो.

एक महत्त्वाची बाब लेखक दृष्टोत्पत्तीस आणतो... ती म्हणजे प्रत्येकासाठी शौचालय या मोहिमेच्या कार्यकर्त्यांचा आणि पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी काम करणाऱ्यांचा एकमेकांशी संवाद फार कमी आहे. जमिनीला उर्वरके परत मिळावीत यासाठी काम करणाऱ्यांचा वरील दोघांशी संवाद आणखी कमी आहे आणि मलमूत्र उचलावे लागत असणाऱ्या जातींना त्या कामातून मुक्ती मिळवून देण्यासाठी झटणारे लोक तर अगदीच एकाकी पडले आहेत याबद्दलची हळहळ लेखक व्यक्त करतो.

आपापल्या वैयक्तिक आयुष्यात या साऱ्यांकडे डोळे झाक करून चालत राहणारे लोक म्हणजे केवळ गर्दीच! ही अफाट गर्दी कधीतरी सैरभैर होऊन माणसाची ती दुर्दशा करील... जी ऑक्सिजन तयार करणाऱ्या प्रागैतिहासिक काळातील जीवाणूंची झाली. स्वतःच्या श्वासातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यामुळेच ते नष्ट झाले... पण त्यांच्या विनाशामुळे पृथ्वीवरील जीवन नष्ट झाले नाही, त्याचे रूप तेवढे बदलले हे सांगून लेखक म्हणतो, ‘कुणास ठाऊक... आपल्या मलाची योग्य विल्हेवाट लावायला आपण शिकलो नाही... तर आपणही विलुप्त होऊ. आज नाही तर उद्या! शंभर नाही, दोनशे नाही, कदाचित चारशे वर्षांनंतर! असे काही झाले तर पुढची पिढी प्रलयाच्या काठावर उभी राहून तिच्या पूर्वजांच्या म्हणजे आपल्या मूर्खपणाला दूषणे देईल. मनुष्यजातीला कुठल्याही अणुसंहारापासून, प्रलयापासून वा युद्धापासून विनाशाची जेवढी भीती नाही... त्यापेक्षा कितीतरी अधिक भीती त्याला स्वतःच्या मलापासून आहे. मंदगतीने का होईना... हा विनाश अटळ आहे.

पुढे तो म्हणतो, ‘पृथ्वीचे रक्षण आपणच करू शकतो असे समजणे ही आपली घोडचूक ठरेल. पृथ्वीवरचे जीवन आपल्या काही करण्याने किंवा न करण्याने आलेले नाही. तसेच आपण संहार करायचा म्हटले तरी नष्ट होणारे नाही. आपण कळत-नकळत कितीही प्रयत्न केले, कितीही प्रजातींचा समूळ नायनाट केला तरी हे होणे नाही. जीवनाचे स्वरूप तेवढे बदलेल. अशा काही जिवांची उत्पत्ती होईल... ज्यांच्यासाठी मानवनिर्मित कचरा, मानवी मल हे जगण्याचे साधन असेल. असे कीटक, जे आपण निर्माण करत असलेल्या विषाने मरणार नाहीत. काँग्रेस गवत वा विलायती बाभूळ यांसारखे तण... जे कितीही प्रयत्न केले तरी नष्ट होणार नाही. असे रोगाणू जे आपण करत असलेल्या औषधांना जुमानणार नाहीत. 

समुद्रमंथनातून विषही निघाले आणि अमृतही! हे सत्य जसे समुद्रजलास लागू होते... तसेच मातीस म्हणजे थलास आणि तसेच आपल्या मलासही लागू होते. आपला मल विषाचे रूप घेऊ शकतो वा अमृताचे. मग क्रांती होईल वा प्रलय. विषय सामाजिक शुचितेचा आहे. जल-थल-मल यांच्या परस्परसंबंधांचा आहे आणि हेच लेखकाने पुस्तकातील दहा प्रकरणांमधून समजावून सांगितले आहे.

विषयाची ओळख करून देणारे ‘जल थल मल’ हे प्रारंभीचे प्रकरण आहे. जल, थल व मल यांचे संबंध शाश्वत आहेत हे त्यात सांगितले आहे. आपल्या सामाजिक व्यवहाराशी याचे नाते जोडले आणि ते निभावले तर आयुष्य सोपे होईल. ते नाते आपण निभावले नाही तर अमूल्य अशा आपल्या जमिनी नापीक होतील, नद्या प्रदूषित होतील आणि आजार बळावतील असा इशारा त्याने दिला आहे. शौचालयातून निघालेले काही विचार  या प्रकरणामध्ये त्याने भारतात दरवर्षी पंधरा लाखांहून अधिक मुले मृत्युमुखी पडतात... कारण रुग्णाच्या मलाचे कण या ना त्या मार्गाने इतर कुणाच्या पिण्याच्या पाण्यात वा अन्नघटकांत मिसळतात... त्यामुळेच रोगाणू पसरतात. 

आपल्याकडे मलाच्या घाणीमुळे व शुद्ध पाण्याच्या अभावामुळे 45 टक्के मुलांचा शारीरिक विकास हवा तसा होत नाही. मुले हडकुळी व खुजी राहतात. शौचालये तयार करण्यासाठी शासनाकडे पैसा असतो... पण शौचालयांसाठी पाणी पोहोचवण्यासाठी नसतो. खूप ठिकाणी लोक शौचालयांचा उपयोग कोठारासारखा वा खोलीसारखा करतात. शासन फुकटात चार भिंती व छप्पर बांधून देत असेल तर कोण आक्षेप घेणार? खरेतर या चार भिंतींच्या मागे दैनंदिन आयुष्याशी संबंध असणारा महत्त्वाचा विचार आहे हे उमगणे गरजेचे आहे हे सांगितले आहे.

सफाई कामगारांची अवस्था स्वच्छतेच्या मंदिरातील वेदीवरचे बळी या प्रकरणात वर्णन केली आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मल उपसणाऱ्यांच्या परिस्थितीबद्दल विचारणा केली. राज्य सरकारांनी आपली जबाबदारी झटकली. राज्यातून कोरडी शौचालये व मैला उपसण्याची कुप्रथा कधीचीच बंद झाली असून ते काम करणाऱ्या कामगारांना अन्य रोजगारही मिळाले असल्याचे दावे राज्य सरकारांनी केले. हे सगळे या प्रकरणात आले आहे. 

न्यायालयाने केलेल्या निर्भर्त्सनेनंतर राज्य सरकारांनी कबूल केले की, त्यांच्या राज्यांत आजही मल उपसण्याचे  काम लोकांकडून करून घेतले जात आहे. या स्वीकृतीनंतरही या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. अन्याय होत असल्याचे स्वीकारायलाच जिथे सरकार तयार नाही, तिथे अन्यायाला थांबवण्याचे काम ते करणार तरी कसे? हा लेखकाचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. पण त्याहीपेक्षा अस्वस्थ करतो त्याचा पुढचा प्रश्न. तो विचारतो, ‘समजाऽ नगरपालिकेकडे खूप धन आले आणि शहरातील सर्व शौचालये गटारांना जोडली गेली तर मैलापाण्याने आधीच प्रदूषित झालेल्या आपल्या जलस्रोतांचे काय होईल?

लोकांना पाण्यासाठी दूर जावे लागत असल्याची चिंता आपण सगळेच करतो आणि घराघरांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी झटतो... पण आपण हे विसरतो की, जेव्हा आपल्याला पाण्यापर्यंत जावे लागत होते, तेव्हा आपले जलस्रोत स्वच्छ राहत होते. हे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवून शरीरापासून नदीचे अंतर या प्रकरणात शौचालयांचा इतिहासच दिला आहे. 

युरोपातील शहरांत चालताना मलमूत्रात पाय बरबटण्याचा धोका असायचा. उपाय म्हणून रस्त्यांवर दगड ठेवले जात. फ्रान्सची राजधानी पॅरिस इथे महिलांसाठी उंच टाचेच्या चपला वा बूट घालण्याची पद्धत सुरू झाली... कारण त्यामुळे रस्त्यावरचा मल कपड्यांना चिकटत नसे. 

1858मध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे व तीव्र गरमीमुळे लंडनच्या टेम्स नदीत सोडले जाणारे मलमूत्र सडून खदखदू लागले होते. जनतेला त्रास सहन करावा लागलाच... शिवाय सम्राज्ञीलाही महालात बंद व्हावे लागले. संसद भवनातील काम कित्येकदा असह्य दुर्गंधीमुळे थांबवावे लागत होते अशी माहितीही आहे.

‘गोदी में खेलती हैं, जिसकी हजारों नालियां!’  या प्रकरणात चार महिन्यांचा पावसाळा ही आपल्या उपखंडाची जीवनप्रणाली आहे हे मांडले आहे. आपण पाण्याच्या आवकजावकीवर लक्ष केंद्रित केले नाही वा त्याकडे दुर्लक्ष केले तर उद्या इथे कुठलीही जीवसृष्टी टिकून राहणे कठीण होईल असा इशारा दिला आहे. नाली हा शब्द संस्कृत प्रणाली या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ आहे कालवा.

भारतीय उपखंडात मान्सूनच्या काही दिवसांतील काही तासांतच वर्षभराचा पाऊस पडतो. हे पाणी व्यवस्थित टिकवून धरण्याच्या प्रणालीवरच आपले जीवन टिकून आहे. चार महिन्यांचा पावसाळा ही आपली जीवनप्रणाली आहे. पाण्याच्या आवकजावकीवर लक्ष केंद्रित केले नाही वा दुर्लक्ष केले तर उद्या इथे कुठलीही जीवसृष्टी टिकून राहणे कठीण होईल. 

मागील 20-25 वर्षांतील आर्थिक विकासाचे प्रतिबिंब मैलापाण्यामध्ये दिसते. योग्य पद्धतीची गटार व्यवस्था व मलनिस्सारण प्रक्रिया संयंत्रांसाठी शहरांना  ढोबळ अंदाजाप्रमाणे दीडलाख कोटी रुपयांची गरज आहे. ते कोठून येणार? शहराचे नागरिक आपले मैलापाणी स्वच्छ करण्याचा थोडा तरी खर्च उचलतील का... हा प्रश्न आहे. 

भारतातील कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार या रोगाचे सर्वात भयावह स्वरूप गंगेच्या खोऱ्यात आहे... उत्तर प्रदेश, बिहार व प. बंगाल इथे. पवित्र गंगेला आपण आजारांचा स्रोत केले आहे. झोपडपट्ट्या हटवण्याचा आदेश जे देतात त्यांनी ते स्वतः वापरत असलेल्या शौचालयांतून बाहेर पडणारे मैलापाणी कुठे जाते हे जाणून घ्यायला हवे. 

धनाढ्य वस्त्यांत पाण्याचा वापर झोपडपट्ट्यांपेक्षा तुलनेने कितीतरी जास्त असतो... त्यामुळे जलप्रदूषणातही त्यांचा वाटा मोठा असतो. लेखक म्हणतो, ‘खूप पाणी वापरून खूप मैलापाणी तयार करणे हे गेल्या काही दशकांत आम्ही वेगाने शिकलो... पण इतक्या मैलापाण्याचे करायचे काय ते आम्हाला माहीत नाही.’

मैलापाण्याचे योग्य प्रकारे नियोजन किती फायदेशीर होऊ शकते हे लेखक ‘मैलापाण्याचे सोनेरी रहस्य’ या प्रकरणात कोलकाता येथील भेरी प्रयोगाची माहिती देऊन सांगतो. मुदीअलीच्या व कोलकात्याच्या पूर्व भागाच्या या भेरी शहराला पावसाळी पुरापासूनदेखील वाचवत आहेत. शहर वसवतानाच हा भाग पुरापासून सुरक्षित राहण्यासाठी मोकळा सोडला होता. या महानगराला होणारा निम्म्याहून जास्त मत्स्यपुरवठा तिथून होतो ही माहितीही तो सांगतो. हे सारे मुळातूनच वाचायला हवे. 

आपल्या एक ग्रॅम मलामध्ये एक कोटी विषाणू, दहा लाख जीवाणू आणि काही सहस्र परजीवी कृमी आणि शंभर कीटकांची अंडी असू शकतात. एक व्यक्ती दिवसाला अंदाजे दोनशे ते चारशे ग्रॅम मलविसर्जन करते. आपले शरीर पचनक्रियेसाठी आवश्यक अनेक रसायने स्वतः बनवू शकत नसल्याने ते स्वतःमध्ये उपयुक्त जीवाणूंचे पोषण करते इत्यादी माहिती ‘मातीचेच पुतळे आम्ही’ या प्रकरणात आहे.

फ्रिट्‌झ हेबर यांनी शोधलेली अमोनियाच्या निर्मितीची प्रक्रिया हाच मागच्या शतकातला सर्वात महत्त्वाचा शोध आहे हे खरे असले तरी त्याच्या अतिवापराचा किती धोका आहे हे लेखकाने खाद्यसुरक्षेची थलसेना या प्रकरणात सांगितले आहे.  चीनमध्ये एकेकाळी प्रचंड किंमत चुकवून मलमूत्र खरेदी करण्यात येत होते. दिल्लीजवळील शेतकरीही मैला विकत घेत... कारण या लोकांकरता मलमूत्राची उर्वरता हेच अस्सल बावनकशी सोने होते. हे सगळे वाचून अचंबित व्हायला होते... पण त्याबरोबरच मलाचा योग्य वापर करण्याचे महत्त्वही अधोरेखित होते. 

मूत्र हा फॉस्फरसचा एक अमूल्य स्रोत आहे... शिवाय त्यात नायट्रोजनही खूप असते. खरेतर मलमूत्र हा जैविक खतांचा मोठा स्रोत आहे. मानवी मलमूत्र हे कचरा नसून साधन आहे. त्यातील उर्वरकांना काळजीपूर्वक शेतांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. हे कुशलतापूर्वक व कमी खर्चात करण्यासाठी कारखान्यांत असते तशी परिस्थिती हवी... म्हणजे कच्च्या मालाची म्हणजे मलमूत्राची एकाच ठिकाणी मुबलक उपलब्धता हवी. ती दाट लोकवस्तीच्या शहरांतच साध्य होऊ शकते असे लेखक म्हणतो. जैविक खतासाठी सोनखत हा शब्द आहे. मॅन्युअर या फारसी भाषेतून आलेल्या शब्दाचा मूळ अर्थ आहे जमिनीची मशागत करणे, अर्थात शेण आपल्या हाताने मातीत टाकणे. शेतकऱ्यांना माहीत होते की, खत आपल्या हातांनीच मातीत टाकायचे असते. असे लोक आजही आहेत. 

‘मलाचे थलात विसर्जन’ या प्रकरणात याबाबत माहिती दिली आहे. इकोसॅनबाबत माहिती व त्याची उपयुक्तता देतानाच  शहरी इकोसॅनसारखा प्रकल्प अपयशी ठरल्याची नोंदही घेतली आहे व त्याची कारणेही दिली आहेत. मैलापाण्यावर त्याच्या उगमस्थानीच होणारे उपचार शुचितेसाठीही आहेत. छागरासारख्या शौचालयाचे महत्त्व लडाखच्या वाळवंटी रेताड मातीतच उमगते असे लेखक म्हणतो.

पुस्तकाच्या अखेरचे प्रकरण ‘मलदर्शन’ हे आहे. त्यात महाकाय देवमाशाची स्वतःची अन्नसुरक्षाही त्याच्या विष्ठेवर कशी अवलंबून आहे याचे विवेचन आहे. शेवटी लेखक म्हणतो... मलविसर्जन हे नितांत व्यक्तिगत कर्म असले तरी त्याच्याशी जुळलेली, अभिन्न असलेली शुचिता ही एक महत्त्वाची सामाजिक बाब आहे. नंतर संदर्भमध्ये दिलेली माहितीही अभ्यासूंना उपयुक्त वाटेल. प्रत्येकाने एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे.

(लेखातील सर्व चित्रे - By Two Design)

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


जल थल मल
संशोधक व लेखक : सोपान जोशी.
मराठी अनुवाद : प्राजक्ता अतुल.
अनुवाद सहयोग : माधुरी कानेटकर, अतुल उपाध्याय.
प्रकाशक : ट्री इम्प्रिन्ट्‌स, डोंबिवली पूर्व, ठाणे - 421201
पाने : (मोठा आकार) : 216, किंमत : 300 रुपये.

Tags: पुस्तक परिचय पुस्तक आ श्री केतकर जल थल मल सोपान जोशी Book A S Ketkar Jal Thal Mal Load More Tags

Comments:

imp book

imp book

प्राजक्ता अतुल

ह्या पुस्तकातील महत्त्वाचा एक आणखी भाग आहे, तो म्हणजे संदर्भसूची. अनेक पुस्तके, संदर्भग्रंथ, या विषयावर काम करणारे, त्यासाठी झटणारे अनेक महाभाग, ठिकठिकाणी झालेले, होत असलेले प्रयोग, त्या प्रयोगांची सिद्धता वा त्यातील अपयशाच्या जागा याबद्दलचे संदर्भ असे सारे तेथे वाचायला मिळते. समविचारी लोकांचे परस्परसंबंध बनणे आणि ते वाढणे हेच यातून लेखकाला अभिप्रेत आहे. पुस्तकाच्या समीक्षेबद्दल मनःपूर्वक आभार.

Hirajanardan

रासायनिक खतांच्या वापरापूर्वी शेतकरी शहरातून खतांचे ट्रक्स भरून नेत. सोनखत हे सर्वोत्तम खत मानले जाई.

Hira

महत्वपूर्ण!

Add Comment