शहरे- गांधींना घडवणारी आणि गांधींनी घडवलेली

आपल्या लिखाणातून गांधींनी ग्रामीण जीवनाचे उदात्तीकरण केले असले तरी त्यांच्या कृतींमधून मात्र शहरी जीवनाशी असलेले त्यांचे घट्ट नाते दिसून येते.

कर्तव्य साधना

‘खरा भारत खेड्यांत वसतो’ हा महात्मा गांधींचा दावा सर्वश्रुत आहे. गांधींच्या सामाजिक व राजकीय कार्यात आणि तात्विक लेखनात, भारतीय संस्कृती कृषिप्रधान होती व पुढेही ती तशीच राहावी यावर विशेष भर दिला गेला.  

खरे तर भारत हा शहरांमध्येदेखील वसला आहे. आपल्या महाकाव्यांमध्ये अयोध्या आणि इंद्रप्रस्थ या शहरांचा उल्लेख आला आहे. तर बनारस जगातील सर्वात प्राचीन शहर असल्याचे सांगितले जाते. मध्ययुगीन कालखंडात उत्तर भारतात मुघलांनी दिल्ली, आग्रा आणि लाहोर अशी शहरे वसवली. तर दक्षिण भारतात निर्माण झालेल्या महान साम्राज्याचे नावच ‘विजयनगर’ म्हणजेच ‘विजयाचे नगर’ असे होते. या साम्राज्याची राजधानी असलेले हंपी हे शहर तुंगभद्रेच्या काठावर अनेक मैलांपर्यंत पसरलेले होते. (आता या शहराचे भग्नावशेष पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना याची कल्पना असेलच.) अगदी ब्रिटिशांनी बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास अशी प्रांतिक राजधान्यांची शहरे वसवण्याआधीपासूनच भारत ही नागर संस्कृतीच राहिली आहे.

गांधींची खेड्यांविषयीची मते केवळ ऐतिहासिकदृष्ट्याच चुकीची आहेत असे नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांशी ताडून पाहिल्यासही ही बाब लक्षात येते. त्यांचे बालपण काठेवाड या शहरात गेले, तर शिक्षणासाठी ते जगातील सर्वांत महान शहरात, म्हणजेच लंडनला राहिले. दक्षिण आफ्रिकेत असतानाही आपल्या कामानिमित्त ते दर्बन आणि जोहान्सबर्ग या शहरातच वास्तव्यास होते. या शहरांतच त्यांच्या राजकीय जडणघडणीला सुरुवात झाली. येथेच त्यांना अतिशय जवळचे सहकारी लाभले आणि  त्यांच्या भावी आयुष्याची दिशाही गवसली.

दर्बन ते जोहान्सबर्ग या रेल्वे प्रवासात गांधींच्या वाचनात योगायोगाने जॉन रस्किन यांचे ‘अनटू धीस लास्ट’ हे पुस्तक आले. याच पुस्तकामुळे गांधी ग्रामीण जीवनातील साध्या राहणीमानाकडे आकर्षित झाले. रस्किन यांच्याच पुस्तकापासून प्रेरणा घेत गांधींनी दक्षिण आफ्रिकेत ‘फिनिक्स सेटलमेंट’ आणि ‘टॉलस्टॉय फार्म’ या उपक्रमांची सुरुवात केली. भारतात परत आल्यावर अहमदाबाद शहरात साबरमती नदीच्या काठावरील हिरव्या शेतांच्या भवताली गांधींनी आश्रम सुरु केला. विस्तारलेल्या अहमदाबादने हा निसर्गसंपन्न परिसर गिळंकृत करण्याच्या अनेक दशके अगोदरची ही घटना होती. या अतिक्रमणाची पूर्वकल्पना असल्यामुळेच कदाचित, 1930 च्या दशकातच त्यांनी मध्य भारतातील वर्धा शहरातील ‘सेवाग्राम’ येथे आपले बस्तान हलवले.  

ग्रामीण जीवनाविषयीच्या गांधीजींच्या संकल्पना अतिउत्साही स्वरूपाच्या असल्या तरी, हव्यासाने ओतप्रोत जोहान्सबर्ग या सुवर्णनगरीतच गांधींना अहिंसक प्रतिकाराचे तंत्र सापडले. राजकीय कृती आणि विचारात गांधींच्या अनेक योगदानांपैकी ‘अहिंसक प्रतिकार’ हे तंत्र सर्वात महत्त्वपूर्ण आणि मूलगामी ठरले. गांधींना आयुष्यातील पहिल्या अटकेला सामोरे जावे लागले ते याच जोहान्सबर्ग शहरात. येथेच त्यांनी पहिला तुरुंगवास भोगला आणि याच शहरात त्यांना जीवे मारण्याचा पहिला प्रयत्न झाला होता.  

भारतात परतल्यानंतर गांधींचे संपूर्ण आयुष्य शहरांभोवतीच गुंफले गेले होते. त्यांच्या चळवळींना सढळहस्ते मदत केली ती बॉम्बेच्या व्यापारी वर्गानेच. त्यांच्या चळवळींना पाठिंबा देण्यासाठी या शहरातील सामान्य जनतेने मोठ्या उत्साहाने तुरुंगवास पत्करला होता. त्यांच्या पहिल्या भारतव्यापी सत्याग्रहाचे-रौलेट सत्याग्रहाचे मुख्य केंद्र बॉम्बेच होते. चले जाव या त्यांच्या शेवटच्या भारतव्यापी सत्याग्रहाचे केंद्रही बॉम्बेच होते.      

गांधींची तीन महत्त्वाची उपोषणे देखील भारतातील तीन प्रमुख शहरातच म्हणजे- सप्टेंबर 1932 मध्ये पुण्यात, सप्टेंबर 1947 मध्ये कलकत्त्यात आणि जानेवारी 1948 मध्ये नवी दिल्ली येथे- झाली होती. या उपोषणांपूर्वी आणि नंतरही गांधींनी या शहरांना अनेकदा भेटी दिल्या होत्या. येथे त्यांचे अनेक मित्र आणि सहकारीही वास्तव्यास होते. इतकेच नव्हे तर या प्रत्येक शहरात त्यांचे काही प्रतिस्पर्धी आणि विरोधकसुद्धा होते.

कलकत्ता या शहरात सप्टेंबर 1947 मध्ये त्यांनी केलेल्या उपोषणाने या दंगलग्रस्त शहरात शांती प्रस्थापित होऊ शकली होती. दिल्लीतही याचीच पुनरावृत्ती करून शांती प्रस्थापित करण्याचा त्यांचा उद्देश होता. दिल्लीतील हरिजन कॉलनीमध्ये ते पूर्वीही थांबले होते. यावेळीही तेथेच थांबण्याचा गांधींचा मानस होता. परंतु त्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यामुळे त्यांना बिर्ला हाऊस येथे थांबण्यासाठी राजी करण्यात आले. बिर्ला हाऊस येथील वास्तव्यात चरख्याने सूत कातणे, ध्यान करणे आणि आलेल्या आगंतुकांना भेटणे यातच त्यांचा दिवस जात असे. सायंकाळी प्रार्थना म्हणण्यासाठी ते बिर्ला हाऊसच्या प्रशस्त प्रांगणात येत असत. 30 जानेवारी 1948 च्या सांयकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी प्रार्थनासभेकडे जात असताना त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

कलकत्ता, बॉम्बे, पुना अथवा दिल्ली या शहरांप्रमाणे मद्रास हे काही महात्मा गांधींच्या चळवळींचे अथवा उपोषणाचे ठिकाण राहिले नव्हते. परंतु तरीही या शहराविषयी त्यांना अतिशय आपुलकी होती. याच तमिळ प्रदेशातून दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहात त्यांना साथ देणारे तोलामोलाचे सहकारी त्यांना लाभले. गांधींच्या लिखाणाला प्रसिद्धी देण्यामध्ये मद्रास येथील संपादक जी. ए. नातेसन यांच्याइतकी मोलाची भूमिका इतर कोणीच निभावली नाही. मद्रासचे तत्त्वज्ञ आणि संतपुरुष सी. राजगोपालाचारींविषयी जितका आदर गांधींना होता, तितका भारतातील इतर कोणत्याही राजकारण्याविषयी नव्हता.

आपल्या लिखाणातून गांधींनी ग्रामीण जीवनाचे उदात्तीकरण आणि शहरांचा उपमर्द केला असला, तरी त्यांच्या कृतींमधून मात्र शहरी जीवनाशी असलेले त्यांचे घट्ट नाते दिसून येते. सुदैवाने गांधींच्या ऐतिहासिक योगदानाची समीक्षा करताना विद्वान अभ्यासकांनी त्यांच्या विचारांपेक्षा त्यांच्या कृतीवर जास्त भर दिला आहे. गांधींनी शहरांना कसे घडवले आणि या शहरांमुळे गांधी कसे घडले या विषयावर अनेक चांगली पुस्तके आता उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने जेम्स हंट यांचे ‘गांधी इन लंडन’ एरीक इट्झकीन यांचे ‘गांधीज् जोहान्सबर्ग’ आणि उषा ठक्कर व संध्या मेहता यांचे ‘गांधी इन बॉम्बे’ या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांच्या प्रमाणेच विपुल संदर्भ आणि छायाचित्रे असलेले गोपालकृष्ण गांधी यांचे ‘अ फ्रॅंक फ्रेंडशीप’ हे पुस्तक महात्मा गांधीचे बंगालशी विशेषतः कलकत्त्याशी असलेल्या नात्यावर भाष्य करते. ‘गांधी इन अहमदाबाद’ या शीर्षकाचे कोणतेच पुस्तक अजूनतरी आलेले नाही. मात्र या शहरावर लिहिल्या गेलेल्या इतर पुस्तकांमध्ये या विषयावर प्रकाश टाकला गेला आहे. यात केनेथ गिलियन, हॉवर्ड स्पोडेक आणि अच्युत याग्निक व सुचित्रा सेठ यांच्या पुस्तकाचा समावेश करता येईल.

असे असले तरी, या विषयात एक मोठी उणीव भासते. गांधींनी आपले अंतिम काही दिवस ज्या शहरात घालवले, त्या दिल्लीशी असलेल्या गांधींच्या संबंधावर अजूनही फारसा प्रकाश टाकण्यात आलेला नाही. गांधींचा दिल्लीशी उत्तम परिचय होता. येथे त्यांना अनेक जिवलग मित्रही लाभले. प्रख्यात हकीम- अजमल खान, प्रेमळ ख्रिस्ती धर्मगुरू- चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज, नि:स्वार्थ हिंदू समाजसेवक- ब्रीजकृष्णा चांदीवाला ही त्यांपैकी काही महत्वाची नावे. गांधींनी आपल्या असंख्य सत्याग्रहांच्या पूर्वी आणि नंतर तत्कालीन ब्रिटिश व्हाइसरॉयच्या भेटी घेतल्या, त्या याच दिल्लीत शहरात. याच शहरात त्यांनी प्रथम १९२४ साली आणि नंतर १९४८ साली धार्मिक दंगलींनंतर शांती प्रस्थापित करण्यासाठी उपोषण केले होते. मला आशा आहे की, कुठेतरी कोणी विद्वान अभ्यासक, मग तो तरुण असो अथवा वृद्ध, भारतीय असो वा विदेशी, ‘गांधींनी दिल्लीला कसे घडवले आणि गांधीच्या जडणघडणीत दिल्लीचा वाटा' या विषयावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकावर काम करत असेल. या प्रकारचा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय राहील याविषयी शंका नाही.        

-  रामचंद्र गुहा, बंगळूरू
(अनुवाद: साजिद इनामदार)

 

ताजा कलम : 

विवेक शुक्ला लिखित Gandhi's Delhi हे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झाले आहे, ते गुहा यांच्या पाहण्यात आले नसावे. म्हणून या लेखासोबत त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ वापरले आहे.

- संपादक, कर्तव्य साधना

Tags: Mahatma Gandhi Cities Freedom Struggle अनुवाद रामचंद्र गुहा महात्मा गांधी शहरे Load More Tags

Add Comment