अहमदाबादमध्ये गांधींसमवेत

सीएए-एनआरसी कायद्यांच्या विरोधात अहमदाबाद येथील रखीयाल परिसरात आंदोलन करणाऱ्या स्त्रिया Photo Courtesy: Indian Express

30 जानेवारीला मी अहमदाबादमध्ये होतो. महात्मा गांधीना हे शहर इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक जवळचे होते. त्यांच्या विख्यात आश्रमांपैकी एक आश्रम त्यांनी इथेच, साबरमती नदीच्या काठी स्थापन केला. स्वतःचे राजकीय व नैतिक तत्त्वज्ञानाचे पुनरावलोकन व संस्करण त्यांनी याच शहरात केले. इथेच त्यांनी रौलट कायदा विरोधी सत्याग्रह, असहकार आंदोलन आणि मिठाच्या सत्याग्रहाची यात्रा, इत्यादींची निश्चिती आणि नियोजन केले.

कधी काळी अहमदाबाद हे गांधींचे शहर होते. एकेकाळी आपला महानतम निवासी असलेल्या व्यक्तीच्या वारशाकडे हे शहर गेल्या काही दशकांपासून जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर पाठ फिरवते आहे. हिंदू व मुस्लिमांमध्ये सलोखा राहावा यासाठी गांधींनी आपले आयुष्य वेचले; त्याचसाठी ते मृत्यूलाही सामोरे गेले. मात्र, त्यांनी ज्या शहराला स्वतःचे घर म्हटले होते ते शहर आज बहुसंख्याकांच्या पूर्वग्रहदूषित, अविचारी अभिव्यक्तीची प्रयोगशाळा बनले आहे. भारतात इतरत्र कुठेही हिंदुत्वाच्या ताकदीचे प्रदर्शन इतक्या बेधडक नागवेपणाने झालेले नाही. 2002 पासून अहमदाबादमधील मुस्लिमांची राजकीयदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक उपेक्षा केली गेली आहे; तसेच त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक शोषणही करण्यात आले आहे. जिथे-कुठे त्यांना राहण्याची व पूर्वानुमती असलेलेच काम करण्याची परवानगी आहे (आणि जिथे त्यांना काम करण्याची अनुमती नाही), अशा सर्व ठिकाणी त्यांना, ते दुय्यम दर्जाचे नागरिक असल्याची जाणीव सतत करून दिली जाते.

2002 पासून अहमदाबाद इतर अर्थांनीही हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनले आहे. गुजरात राज्याचा आणि गुजरातच्या संस्कृतीचा एकमेवाद्वितीय प्रतिनिधी संबोधून एका अस्खलनशील - दोषातीत नेत्याच्या पंथाची घडण इथेच झाली. आता त्या व्यक्तीला भारतीय संघराज्याचा आणि भारताच्या राष्ट्रवादाचा प्रतिनिधी म्हटले जाते. अहमदाबादमध्येच (आणि सामान्यतः गुजरातमध्ये) नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी पद्धतशीरपणे प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे, विद्यापीठे तसेच सामाजिक संस्था यांचा ताबा बळकवण्याचा व त्यांचे नियंत्रण करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. 2014 च्या मे महिन्यानंतर संपूर्ण भारतभर केल्या गेलेल्या प्रयत्नांची ती पूर्वतयारी होती.

गेल्या चाळीस वर्षांहूनही अधिक काळापासून अहमदाबाद माझ्या परिचयाचे (आणि आवडते ठिकाण) आहे. फेब्रुवारी 1979मध्ये मी या शहराला पहिल्यांदा भेट दिली आणि पुढे अनेकदा तेथे जाणे झाले. माझ्या राहत्या शहराप्रमाणे – बंगलोरप्रमाणेच - 2002 पूर्वी अहमदाबादची बौद्धिक संस्कृतीही वाद-चर्चा घडवणारी व अनौपचारिक होती. 2002 नंतर मात्र वादविवाद आणि मतभेदांसाठी मोकळा असणारा अवकाश हळूहळू संकुचित होत गेला. काही नामांकित लेखक, कार्यकर्ते, वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी अहमदाबादमध्येच राहणे पसंत केले. पण बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, दिल्ली किंवा कोची या शहरांच्या तुलनेत इथे त्यांना त्यांच्या कामात मोठ्या अडथळ्यांना व निर्बंधांना तोंड द्यावे लागले आहे.

या संकोचलेल्या गुजराती मनाचा प्रत्यक्ष अनुभव मी ऑक्टोबर 2018मध्ये घेतला - जेव्हा राज्यकर्त्या पक्षाने अहमदाबादमध्ये प्राध्यापकी करणे (उपरोधाचा भाग म्हणजे - गांधीविषयक अध्यासनामध्ये) मला अशक्य करून टाकले. त्यानंतर 15 महिन्यांनी जेव्हा माझे एका अनौपचारिक भाषणासाठी त्या शहरात माझे जाणे झाले तेव्हा मी ‘गांधींनी आजचा भारत कशा स्वरूपाचा घडवला असता’ याच विषयावर बोललो.

अहमदाबाद येथे 30 जानेवारी 2020 रोजी मी दिलेले भाषण ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. त्या भाषणातील मुद्दे मी इथे पुन्हा उद्धृत करणार नाही. त्यापेक्षा, भाषणापूर्वी आणि भाषणानंतर त्या शहरात मी जे पाहिले, त्याविषयी इथे लिहिणार आहे. 29 तारखेला मी दुपारी तिथे पोचलो; आणि आकसत चाललेल्या मुक्त आणि स्वायत्त विचारांच्या परंपरांचे प्रतिनिधी असणाऱ्या काही व्यक्तींशी उर्वरित दिवसभरात मोकळेपणाने संवाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एकटाच साबरमती आश्रमात गेलो आणि आश्रमाच्या आसपास थोडा फेरफटका मारला. वर्षानुवर्षे या जागेविषयीचे माझे प्रेम वाढत गेले आहे, ते इथल्या साधेपणामुळे आणि एकांतामुळे. मात्र या जागेच्या 'आधुनिकीकरणाच्या' वर्तमान सरकारच्या आक्रमक-आग्रही संकल्पामुळे हे वैशिष्ट्य आता नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

30 तारखेला संध्याकाळी, महात्म्याच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून करण्यात आलेल्या मानवी साखळी उपक्रमात सामील होण्यासाठी यजमानांनी मला नेहरू पुलावर नेले. 72 वर्षांपूर्वी याच दिवशी एका हिंदू मूलतत्त्ववाद्याने महात्म्याची हत्या केली होती. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन; स्त्री, पुरुष, मुले; वकील, कामगार संघटनांतील कार्यकर्ते, शिक्षक, कार्यकर्ते असे आम्ही सर्वजण त्या पुलावर एकत्र उभे होतो. पाच वाजून 17 मिनिटांच्या आसपास आम्ही तिथे राष्ट्रगीत म्हटले.

हे सर्व पुरेसे हेलावून टाकणारे होते. माझ्या व्याख्यानानंतर रखीयाल इथल्या जाहीर सभेसाठी मला नेण्यात आले. साबरमती जलप्रकल्पाच्या ‘विकासा’साठी विस्थापित करण्यात आलेल्या लोकांची ती वस्ती होती. मुख्यतः मुस्लिम असणाऱ्या त्या निर्वासितांनी निमुटपणे आपले जीवन इथे पुन्हा उभारले आहे. आणि आता राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या व नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मंजुरीनंतर अन्यायाच्या दुसऱ्या चक्रात सापडण्याची भीती त्यांना वाटते आहे. त्यामुळे चौखूर उधळलेल्या बहुसंख्याकवादाला विरोध करण्यासाठी ते अहिंसक मार्गाने एकत्र आले आहेत. रोज संध्याकाळी स्वातंत्र्य, मुक्तता, न्याय, व आंतरधर्मीय सलोखा या विषयांवरील कविता ते म्हणतात; गाणी गातात; भाषणे ऐकतात. तिथल्या मुख्य पोडियमवरती गांधींचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून रखीयालमध्ये दररोज या सभा होत आहेत, आणि त्यांतली उपस्थिती वाढते आहे. त्याचबरोबर सभांना होणाऱ्या गर्दीतले वैविध्यही वाढते आहे. या सभांमध्ये अग्रस्थानी असणारा स्थानिक रहिवाशांचा वर्ग, हा श्रमजीवी मुस्लिम पुरुष त्यांच्या स्त्रिया आणि मुलांचा आहे. नदीच्या पलीकडच्या बाजूला असणारा मध्यमवर्गीय हिंदू नोकरदारांचा वर्गही परस्परऐक्याची भावना दर्शवण्यासाठी तेथे येतो आहे. त्याचबरोबरीने शहरातील ख्यातनाम शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक व विद्यार्थीही तेथे आहेत.

माझ्या अहमदाबाद दौऱ्याच्या दोन आठवडे आधी, उत्तरायण महोत्सवाच्या दिवशी, गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी सी. ए. ए. विरोधातील घोषवाक्य छापलेले पतंग उडवले होते. आंदोलनाची ही अभिनव (आणि शांततापूर्ण) कृती दाबून टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्याकरता विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांना धाकदपटशा दाखवण्याची परवानगी विश्वस्तांनी त्यांना दिलेली होती. नीतिनियम गुंडाळून ठेवणारी ही कृती सोशल मीडियावरती उपहासाचा विषय बनली. ‘सेक्शन 144 इन द एअर?  मोदी है तो मुमकिन है!’ अशी त्यावरची  प्रतिक्रिया होती.

गांधियन इन्स्टिट्युशन ऑफ अहमदाबादच्या विश्वस्तांचा हा डरपोकपणा, ते ज्या व्यक्तीचा वारसा सांगतात त्या व्यक्तीच्या धाडसी वृत्तीशी पूर्णतः विसंगत आहे. दुसरीकडे रखीयालमध्ये होणारी आंदोलने, गांधींच्या स्वतःच्या शहरात प्रदीर्घ काळ ज्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अभाव होता त्याला कौतुकास्पदरित्या पुन्हा चेतना देणारी आहेत.  नेहरू पुलावर 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली मानवी साखळीदेखील त्याच ध्येयाने प्रेरीत होती. गुजरातमधल्या गांधीवाद्यांनी गांधींचा त्याग केला असेल, गुजरातच्या राजकारण्यांनी गांधींचा विश्वासघात केला असेल; मात्र असंख्य सामान्य अहमदाबादवासियांच्या मनांमध्ये आणि हृद्यांमध्ये तो महात्मा अजूनही जिवंत आहे.

(अनुवाद : सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा 

Tags: रामचंद्र गुहा गांधी मुस्लीम सीएए एनआरसी अहमदाबाद Load More Tags

Comments:

Naina anil patkar

समाजवादी विचार का मांडले जात नाहित

Manjiri deshmukh

गांधींचे विचार आज कुणालाही ऐकण्याची इच्छा नाही आपण त्यांच्या विचाराचा खून केला आहे.. मी ९ ते १२ च्या मुलांना शिकवते ९ वी ची मुलं तर गांधी चा फोटो केवळ २ आॅक्टोबर ला पाहतात.. गांधींची तत्व नको, विचार नको फोटो .. त्यांच विश्लेषण करण्याचा तर प्रश्न नाही. इतके वषॅ गांधींना जाऊन झाले तरीही आज आपण त्यांना रोज मारतो आहेत.. खरंतर गांधीच्या विचारांनी कित्येक वर्षे आपलं जीवन प्रकाशित झालं होतं..त्यांच जाणं आपल्याला क्लेशकारक होईल... माझ्या मनात ह्या महापुरूषाचे नाव कायमचे कोरलेले आहेच मंजिरी देशमुख..

Add Comment