रिकामे स्टेडियम... तरीही लाखो प्रेक्षक!

दक्षिण कोरियातील जीओंजू वर्ल्ड कप स्टेडियममध्ये फुटबॉल लीग पुन्हा सुरु झाली तेव्हा तेथे प्रेक्षक उपस्थित नव्हते, पण त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांवर सी यु सून (लवकरच पुन्हा भेटूया) आणि स्टे स्ट्रॉंग (खंबीर रहा) असे संदेश लिहिण्यात आले होते. फोटो सौजन्य: cyprus-mail.com

हे सतत घरात बसणे जरा जास्तच झाले हं. कंटाळा आला आता. रोजच्या रोज नवीन काय करायचे, कुठले काम काढायचे, असे प्रश्न जगभरातील जवळपास साऱ्याच देशांतील लोकांना पडलेत. रोजच्या व्यवहाराला तर आता 'सकाळपासून रात्रीपर्यंत, तेच ते आणि तेच ते' असे स्वरूप आले आहे. खेळाडूदेखील त्याला अपवाद नाहीत. ते खरं तर नेहमीच इतरांपेक्षा जास्त उत्साही आणि चलनवलन करणारे. त्यांना तर अगदी हात पाय बांधून ठेवल्यागत झाले आहे. काहीही करा, अटी घाला, पण आम्हाला खेळू द्या, अशी विनवणी ते आता करू लागले आहेत. आपल्या काही सवयी बदलाव्या लागतील, याची त्यांना जाणीव आहे, आणि त्यासाठी ते तयार आहेत. कारण, 'हे आणखी किती काळ चालायचंय?' या प्रश्नाला आज तरी कुणाकडेच उत्तर नाही.

पण आता त्यातून मार्ग काढण्याचे, स्पर्धा सामने सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत. काही ठिकाणी तर तशी सुरुवातही झाली आहे. गेल्या काही दिवसांतील बातम्यांवर नजर टाकली, तर हे सहज समजू शकते. बघा ना!

कोरियामध्ये रिकाम्या स्टेडियममध्ये फुटबॉल लीगचा सामना झाला. रिकाम्या स्टेडियममध्ये! तरीही त्याला लाखो प्रेक्षक लाभले होते. कारण छत्तीस देशांतील, (यात भारताचाही समावेश होता); असंख्य प्रेक्षकांनी दूरचित्रवाणी वाहिनीवरून तो सामना पाहिला.

जर्मनीमध्येही 16 मे पासून बुंडे स्लिगा फुटबॉल लीग सुरू होणार. फॉर्म्युला वन मोटार शर्यती सुरु करण्याचा विचार सुरु आहे. कदाचित कोणत्या तरी नव्या ठिकाणी. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मालिका खेळण्यासाठी चौदा दिवस विलगीकरणात राहण्याचीही भारतीय खेळाडूंची तयारी आहे. कारण मालिका व्हायलाच हवी असे खेळाडूंबरोबर सर्वांनाच वाटते आहे.  खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्येच सप्टेंबरमध्ये घेण्याची तयारी सुरु आहे. खुली फ्रेंच टेनिस स्पर्धा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय अशा वेगवेगळ्या बातम्याही येऊ लागल्या आहेत.  

एकप्रकारे लोकांचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवणाऱ्याच या बातम्या आहेत, हे कुणालाच नाकारता येणार नाही. सध्याच्या काळात त्याला फार महत्त्व आहे. टाळ्या वाजवा, दिवे ओवाळा किंवा विमाने, हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून, हॉस्पिटलबाहेर मिलिटरी बँडवादन करा, असल्या 'इव्हेंटस' पेक्षा तर हे खूपच चांगले वाटते. अशा प्रकारे उत्साह आल्याने प्रकृती चांगली राहायला मदत होते, हाही एक फायदा आहे. लोकांचा, खेळाडूंचा दीर्घकाळचा (सामन्यांचा) उपवास आता सुटणार आहे. फक्त उपवास  सुटताना त्यांना नेहमीचे पदार्थ न खाता उपवासाचे पदार्थच खावे लागणार आहेत! 

म्हणजे नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसमोर, त्यांचा जल्लोष सुरू असताना खेळता येणार नाही, करोना महामारीच्या संदर्भात घालण्यात आलेली, शारीरिक अंतर पाळण्यासारखी काही बंधने पाळावी लागतील. संघातील सर्व खेळाडूंनी राखीव खेळाडूंबरोबर एकत्रित विजय साजरा करण्याच्या पद्धतीही बदलाव्या लागतील, सामन्याआधी सर्व खेळाडूंनी कोंडाळे करून संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, मैदानावर थुंकणे इ. सवयी बदलाव्या लागतील. कारण त्यांनी विलगीकरणाचे नियम मोडले जातील.

हे सारे मान्य करून खेळाडू सामन्यांसाठी तयार आहेत. अशा नव्या प्रकारच्या अटी पाळून ते कसे कौशल्य दाखवतात ते पाहण्यास त्यांचे चाहते आणि क्रीडाप्रेमीही उत्सुक आहेत. सुरुवातीला, 'स्टेडियममध्ये प्रेक्षक नसले तर खेळाला काय मजा?', असे बोलले जात होते. पण मग (कदाचित दीर्घकाळ) सामने, स्पर्धा होऊच शकणार नाहीत हे जाणवले, मग मात्र खेळाडू आणि प्रेक्षक दोघांनाही जास्त जास्त अस्वस्थ वाटायला लागले. अनेकांच्या दिवसाचे वेळापत्रक त्यावरूनच ठरवले जात होते, त्यात आता खंड पडला होता. हे असेच सुरू राहिले तर काही खरं नाही, ही भावना साऱ्यांच्याच मनात होती.

खेळाडूंनी नीटपणे विचार केला, तेव्हा त्यांना जाणवायला लागले की, खरं तर सामना सुरू असताना, अनेकदा आपले प्रेक्षकांकडे, त्यांच्या आरडाओरड्याकडे लक्षच नसते. कारण अधिक काळ तर खेळावरच आपले ध्यान केंद्रित झालेलं असते. सामना वा स्पर्धा जिंकायची हेच उद्दिष्ट असते. प्रेक्षकांचे उत्तेजन, जल्लोष जाणवतो, पण कधी, तर ज्यावेळी प्रत्यक्ष अ‍ॅक्शन सुरू नसेल त्यावेळी! म्हणजे फलंदाजाने एकदा का पवित्रा घेतला आणि तो चेंडू खेळण्यासाठी सिद्ध झाला की त्याला प्रेक्षकांचा आवाज नकोसा असतो. प्रेक्षकांच्या हालचालीही त्याला विचलित करू शकतात म्हणून तो त्यांना जागीच थांबायला विनवतो, प्रसंगी पंचांकडून ताकीदही देववतो. क्षेत्ररक्षकाला वेगाने जाणारा चेंडू थोपवायसाठी धावताना फक्त चेंडूच दिसतो. त्यानं चांगली फेक केल्यावर प्रेक्षकांनी दिलेली दाद मात्र त्याला सुखावते. पण उंच उडालेला झेल घेताना जराही आवाज त्याला अस्वस्थ करतो, याचे कारण अशा वेळी खेळाडूंची एकाग्रता भंगते. आपले पूर्ण कौशल्य दाखविण्यात हा अडथळा नको, असे त्यांना वाटते.

टेनिस खेळाडूंनाही आता काही गोष्टी, काही काळासाठी का होईना, विसराव्या लागणार आहेत. प्रेक्षागार रिकामे असेल, आणि चेंडू कोर्टबाहेर गेला, तर आणून देण्यासाठी, सर्व्हिसच्या आधी चेंडू देण्यासाठी, गेममध्ये किंवा गेम संपल्यानंतर टॉवेल देण्यासाठी बॉल-बॉइज, गर्ल्स नसतील. अर्थातच ही कामे त्यांना स्वतःलाच करावी लागतील. या बदलांशी जुळवून घेणे अपरिहार्य होणार आहे. फुटबॉल खेळाडूंनाही वारंवार कोंडाळे करणे, गोल लावणाऱ्याला सर्वांनी येऊन दाद देणे, एकमेकांवर उड्या मारून आनंद व्यक्‍त करणे, किंवा सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूनी जर्सींची अदलाबदल करणे, हे सारे काही काळ तरी विसरावे लागेल.

क्रीडाप्रेमी सुजाण प्रेक्षकांनाही केव्हा ओरडायचे आणि केव्हा गप्प राहायचे ते कळते. कळत नाही ते केवळ मनोरंजन म्हणून आलेल्या प्रेक्षकांना. असे असले तरी, प्रेक्षकांची उपस्थिती खेळाडूंना हुरूप देते हे मान्य करायला हरकत नाही. सुरुवातीला त्यांना चुकल्या-चुकल्यासारखं वाटेल हे नक्की. आपल्याला दाद मिळावी म्हणून खेळाडू प्रयत्न करतो आणि एखाद्या चांगल्या फटक्याला, महत्त्वाचा बळी मिळाल्यावर किंवा अप्रतिम झेल घेतल्यावर ती मिळतेही! तसंच गोल करणाऱ्याला, वा चांगला पास देणाऱ्याला, टेनिसमध्ये अप्रतिम फटका लगावला, वा चांगला फटका परतवला, तर प्रेक्षक जी दाद देतात ती सर्वांनाच उल्हसित करणारी असते. त्याने त्यांना खूप समाधान लाभते.

याच कारणामुळे 'रिकाम्या स्टेडियममध्ये खेळायचे' हा विचारच खेळाडूंना अस्वस्थ करत होता, आणि क्रीडाप्रेमी प्रेक्षकांनाही प्रत्यक्ष खेळ बघता येणार नाही म्हणून वाईट वाटत होते. पण आपण सारेच परिस्थितीशरण आहोत, हे हळूहळू त्यांना पटवून घ्यावे लागले, कारण हे काही अत्यल्पकालीन संकट नाही, हे त्यांना उमगत होते. पण त्यांच्याएवढेच आयोजक तसेच क्रीडा-साहित्य तयार करणारे उद्योजक, तसेच स्टेडियममध्ये आपल्या उत्पादनाच्या जाहिराती लावणारे व्यावसायिकही अस्वस्थ होते. 

खरं तर आता क्रीडा हा हौसेबरोबरच एक मोठा उद्योग बनला आहे. अनेकांचे पोट, रोजगार त्यावर अवलंबून आहेत. म्हणूनच फुटबॉल लीगवाल्यांना आपल्याला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान सोसावे लागेल ही काळजी होती. आपल्याकडेही आयपीएलचे आयोजक, संघांचे मालक ही मंडळीसुद्धा खेळाडूंप्रमाणे आपल्यालाही पैशांवर पाणी सोडावे लागणार का, या चिंतेत होते. सर्वांनीच काही विम्बल्डन स्पर्धेच्या आयोजकांप्रमाणे विम्याचे संरक्षण मिळवले नव्हते. त्यामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत तर साऱ्या गुंतवणुकीवर पाणी सोडावे लागेल, ही भीती त्यांना अस्वस्थ करत होती.

शेवटी यातून मार्ग निघाला. नव्हे काढला गेला. ज्या खेळांमध्ये खेळाडूंची शारीरिक झटापट होते अशा बॉक्सिंग, कुस्ती, ज्यूदो, कबड्डी यांसारखे खेळ वगळता बऱ्याच खेळांच्या स्पर्धा, सामने, शर्यती होऊ शकतात हे ध्यानात आले. प्रेक्षक स्टेडियममध्ये नसले, तरी घरोघर प्रचंड संख्येने असतात, ही गोष्टही ध्यानात आली. मुख्य म्हणजे दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपण करण्यासाठी वाहिन्यांना हक्क विकताना मिळणारी मोठी रक्‍कम ही मोठी बाब होती. कारण त्याने आयोजनाचा खर्च भरून निघत होता. शिवाय स्टेडियममध्ये प्रेक्षक नसले, तरीही थेट प्रक्षेपण असल्याने तेथेही जाहिरातदार मिळतील अशी अपेक्षा होती, म्हणजे ते उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होते. त्यामुळेच रिकाम्या स्टेडियममध्ये का असेना सामने खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. आणि एकापाठोपाठ अनेक आयोजकांनी तशी तयारी सुरूही केली.

खेळाडूंनाही अलीकडे सामन्यांतून मोठी कमाई होते, त्यामुळे त्यांचीही तयारी होती. अर्थातच आता अशा सामन्यांना सुरुवातही झाली आहे. काही शर्यती वगैरेही रिकाम्या स्टेडियममध्येच आयोजित केल्या जातील. 'टूर द फ्रान्स' सारख्या शर्यतीही होतील, फक्त स्पर्धकांना रस्त्याच्या दुतर्फा प्रेक्षक दिसणार नाहीत, मात्र तेही घरात बसून शर्यत बघताना आधीच्या स्पर्धांच्या आठवणी काढतील.

एकूणच काय, तर येईल त्या परिस्थितीबरोबर जुळवून घ्यायला लागते, याची आता नव्याने जाणीव होईल. खेळाडूंनाही या बदलाची सवय लावून घ्यावी लागेल. आणि... स्टेडियम रिकामे असले तरी आपल्याला लाखो प्रेक्षक आहेत, ही जाणीव मात्र सुखावणारी असेल!

- आ. श्री. केतकर 
aashriketkar@gmail.com

Tags: क्रीडा कोरोना A S Ketkar Sports Corona Load More Tags

Add Comment