कॉंग्रेस अध्यक्षाची डेमोक्रेटिक निवड

Photo Courtesy: Hindustan Times

अमेरिकेत दोन आठवडे वास्तव्य करून मी नुकताच भारतात परतलो. माझ्या वास्तव्याच्यावेळी तेथे येत्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीचा डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार निवडण्याची प्राथमिक प्रक्रिया सुरु होती. अमेरिकेतील मित्रांसोबत माझी मुख्यत्वे चर्चा झाली ती या निवडणुकांवरच. तिथल्या संभावित उमेदवारांच्या गुणवत्तांमधल्या फरकांची तुलना हाच आमच्या चर्चेचा मुख्य विषय होता. संध्याकाळी हॉटेलमधील खोलीत बसून मी टेलिव्हिजनवरील चर्चा आणि टाऊन हॉल पहायचो. त्यात उमेदवार अगदी थेट युक्तिवाद करायचे. बर्नी सँडर्स यांचा उमदेपणा, एलिझाबेथ वॉरेन यांची बुद्धिमत्ता, पेट बुटेजज (Pete Buttigeg) यांची मोहकता या सगळ्याने मी प्रभावित झालो. मात्र त्याचवेळी जो बिडेन यांचा पूर्वेतिहासही दुर्लक्ष करण्याजोगा नव्हता.          

मी अमेरिकेत असताना, इथे भारतात ‘मुख्य विरोधी पक्षाचा अध्यक्ष कोण असेल’ हा विषय चर्चिला जात होता. कॉंग्रेस अध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक घ्यावी अशी मागणी कॉंग्रेसचे काही वरिष्ठ खासदार करत होते. तर ‘भारतातील सर्वात जुन्या पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी, नव्या चेहऱ्याला नेतृत्वाची संधी देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे’ असे वृत्तपत्रातील लेखांतून अधिकृतपणे मांडत युवा कॉंग्रेस नेतेही आपल्या वरिष्ठांचा आवाज बुलंद करत होते.  

अशा रीतीने नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी एककलमी कार्यक्रम गृहीत धरावा लागेल. त्यात  इच्छुक उमेदवारांनी व्यक्तिशः पुढे येतील आणि ऑल इंडिया कॉंग्रेस समितीच्या 1200 मासलेवाईक उमेदवारांना एकत्रितपणे मतदान करतील. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्ष मात्र वेगळा आणि अधिक लोकशाहीवादी (जो खरोखरच तसा आहे) पर्याय समोर ठेवत आहे. टेलीव्हिजनवर ते उमेदवारांच्या जाहीर वादविवाद मालिका घेतात. उमेदवार आपला दृष्टिकोन, संभाव्य नेतृत्व क्षमता दाखवू शकतील अशा टाऊन हॉल चर्चांचे आयोजन करतात. त्याच धर्तीवर कॉंग्रेसही पक्षांतर्गत निवडणूक घेण्यापूर्वी चर्चा-वाद विवाद आयोजित करण्याचे मनावर का  घेत नाही? 

ही सर्व प्रक्रिया कशी असू शकेल याविषयी अधिक भाष्य करण्यापूर्वी मला भारतीय राजकारणाविषयी दोन महत्त्वाची तथ्ये सांगायची आहेत. पहिले तथ्य, भारतातील सार्वत्रिक निवडणुकांना वेगाने अध्यक्षीय निवडणुकीचे स्वरूप येत चालले आहे. त्यामुळे 2014 व 2019 मध्ये नरेंद्र मोदींसमोर टिकाव धरू न शकणारी व्यक्ती 2024 मध्ये यशस्वी होईल अशी अपेक्षा करणेच चूक आहे. या निकषावर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीतून राहुल गांधी आधीच बाजूला पडतात. आणि त्यांच्या भगिनी प्रियांका गांधीदेखील त्याचमुळे हे पद स्वीकारू शकणार नाहीत. विशेषतः भारतीय तरुणांना ही कौटुंबिक वारसाहक्काची भावना आणि या मंडळींना दिली जाणारी खास वागणूक यांविषयी तीव्र तिरस्कार आहे. दिल्लीतील साधारणतः 80 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी नुकतीच माझी भेट झाली. त्यांपैकी जवळपास सगळेच भाजपच्या बहुसंख्यांकवादी राजकारणाच्या विरोधी होते. जेव्हा मी त्यांना विचारले की, राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना प्रभावीपणे टक्कर देऊ शकतील असे तुमच्यापैकी किती जणांना वाटते; त्यावेळी संमतीदर्शक एकही हात वर आला नाही.    

दुसरे तथ्य म्हणजे, गेल्या काही वर्षांत उतरती कळा लागलेली असूनही कॉंग्रेस हा भाजपव्यतिरिक्त असा एकमेव पक्ष आहे ज्याचा देशभर ठसा उमटला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या पंतप्रधान कार्यालयातील तिसऱ्या कारकीर्दीला विरोधी पक्षाकडून रोखण्याच्या सगळ्या आशा या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर निर्णायकरित्या अवलंबून आहेत. आणि म्हणूनच कॉंग्रेसने आपला अध्यक्ष शक्य तितक्या व्यापक सल्लामसलतीतून, आणि पारदर्शी व खुल्या प्रक्रियेतून निवडला पाहिजे. डेमोक्रेटिक पक्षाच्या निवडणूकपूर्व प्राथमिक प्रक्रियेने एक उत्तम, अनुकरणीय नमुना समोर ठेवला आहे. कदाचित त्या प्रक्रियेतील बारकावे तसे अनुकरणीय नसतीलही; पण तिची मूळ चौकट निश्चितीपणे अमलात आणावी अशीच आहे.  

कॉंग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व्यक्तीशः पुढे येतील किंवा येऊ शकतील अशा कोण व्यक्ती आहेत? ओडीसामधून एका विद्यार्थ्याने नुकतीच मला दोन नावे लिहून पाठवली– कॅप्टन अमरीन्दर सिंग व शशी थरूर. पहिले अनुभवी प्रशासक तसेच लष्करातील कामाचाही मोठा अनुभव असणारे आहेत; तर दुसरे, अतिशय बुद्धिमान व वक्तृत्वकुशल. तिसरी शक्यता कदाचित भुवनेश बघेल यांच्या नावाची असू शकेल, जे सध्या छत्तीसगढचे मुख्यमंत्री आहेत. अधिक जबाबदारीचे आव्हान स्वीकारणे त्यांना आवडू शकेल याची साक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांची पहिल्या वर्षातील कामगिरी देते. चौथे उमेदवार कदाचित सचिन पायलट असू शकतील. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला विजयी करण्यात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते खासदार व केंद्रीय मंत्रीही राहिलेले आहेत. पाचवे उमेदवार कदाचित कर्नाटकातील सिध्दरामैय्या. सिध्दरामैय्या हे ग्रामीण जनतेशीही निकटचा संबंध असणारे आणि अफाट प्रशासकीय अनुभव असलेले एक स्वयंसिध्द राजकारणी आहे. 

वर नमूद केलेले सर्वच उमदेवार कॉंग्रेस पक्षाचे सभासद आहेत. पण प्रस्तुत लेखात सुचवलेली प्रक्रिया जर जुन्या सदस्यांसाठीही खुली केली गेली तर ते अधिक अर्थपूर्ण ठरेल. मला हे मुख्यतः ममता बॅनर्जींसंदर्भात म्हणायचे आहे. त्यांची जडणघडण कॉंग्रेस पक्षातच झाली आणि याच पक्षातून त्या नावारूपालाही आल्या. मात्र पक्षातील बुजुर्गांनी वाढीसाठी पुरेसा अवकाश न दिल्याने त्यांनी पक्ष सोडला होता. त्या जर वादविवादासाठी उतरल्या; आणि त्यांनी जर 'पुन्हा एकत्र आलेल्या पक्षाचे अध्यक्षपद त्यांनी का घेतले पाहिजे?' याविषयी स्वतःची बाजू मांडली तर त्याने चर्चा अधिक विश्वासार्ह होईल, आणि रंगतदारही!

खरे तर, जे कधीही कॉंग्रेस पक्षाचे सभासद नव्हते अशांसाठीही (अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाचा आदर्श समोर ठेवून) या पद्धतीची प्राथमिक चाचणी का खुली करत नाही हे कळायला मार्ग नाही. उदाहरणार्थ, एखादा यशस्वी उद्योजक किंवा आकर्षणाचे केंद्र असणारा सामाजिक कार्यकर्ता यांनाही आखाड्यात उतरू दिले तर ही स्पर्धा अधिक चित्तवेधक होऊ शकेल.

बंद दरवाज्याआड नवा अध्यक्ष निवडण्यापेक्षा, इथे सुचवलेल्या या प्रक्रियेचा विचार कॉंग्रेसने करायला हवा. वेगवेगळ्या शहरांतील उमेदवारांमध्ये हिंदी आणि इंग्रजीमध्ये अशा वादविवादाच्या मालिका आयोजित केल्या जायला हव्यात. आणि सर्वांच्याच आदरास पात्र असणाऱ्या रविशकुमार यांच्यासारख्या टेलिव्हिजन निवेदकाने त्यांचे सूत्रसंचालन करायला हवे. मात्र त्याचवेळी हे उमेदवार आपापली भूमिका थेट मुलाखतीतून पत्रकारांसमोर मांडण्यासाठी, जाहीर भाषणासाठी, आणि स्वतःचा स्वतंत्र जाहीरनामा मांडण्यासाठी मुक्त असायला हवेत.  

या सगळ्या प्रक्रियेसाठी काही महिने लागू शकतात. ती जर तत्काळ सुरु केली तर या वर्षंअखेरीपर्यंत–म्हणजेच पुढील निवडणुकीच्या साडेतीन वर्षे आधी– संपू शकेल. विजयी उमेदवाराने त्याचा हा विजय खुल्या आणि पारदर्शी पद्धतीने मिळवला असेल तर त्याला पक्षाचे नेतृत्व करण्यासाठीचे आवश्यक ते अधिकार देता येतील. आणि मग तुकड्यांत विखुरलेल्या तृणमुल, राष्ट्रवादी आणि वायएसआर कॉंग्रेस यांना पुन्हा मुख्य पक्षात आणणे हे कदाचित नव्या अध्यक्षासमोरचे प्राधान्याने करायचे काम असेल. दुसरे काम, प्रादेशिक पक्षांशी जवळीकीचे आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे हे असू शकेल. अशा पक्षांसह आघाडी स्थापन करण्याची त्यांची इच्छा असू शकेल. आणि हे सर्व एकदा आपापल्या ठिकाणी स्थिर झाले की, सार्वत्रिक निवडणुकांना तोंड देण्यासाठीचा निधी गोळा करण्याकडे व निवडणूकपूर्व पक्षबांधणीकडे कॉंग्रेस लक्ष पुरवू शकेल.  

एकेकाळच्या महान परंतु सध्या मरणोन्मुख असणाऱ्या या पक्षाला पुन्हा पल्लवित कसे करता येईल व त्यात कोणकोणत्या सुधारणा करता येतील अशा चिंतनात विहरत हा लेख लिहिणे देखील आनंदाचाच भाग होता. हा लेख कदाचित वाचला जाईल मात्र त्यातील शिफारसी कितपत अमलात आणल्या जातील  याविषयी मला  शंकाच आहे! 

(अनुवाद- सुहास पाटील)

- रामचंद्र गुहा

Tags: अनुवाद कॉंग्रेस अमेरिका निवडणुका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रियांका गांधी अमरिंदर सिंग सचिन पायलट ममता बॅनर्जी नरेंद्र मोडी भाजप Ramchandra Guha Congress Elections Presidential Elelctions America India Rahul gandhi Sachin Pilot Capt Amrinder Singh Priyanka Gandhi Shashi Tharoor शशी थरूर Load More Tags

Comments:

अनंत देशमुख

या नुसत्या सूचना किंवा विशफुल थिंकिंग म्हणावे लागेल. गांधी घराण्याच्या पेचातून काँग्रेस ला सोडवणे हे महामुश्कील काम आहे. गांधी घराण्याने तशी इच्छा दर्शवून त्यानुसार कृती राबवली तरच हे शक्य आहे. सोनिया असे पर्यंत हे शक्य नाही वाटत.

Anup Priolkar

With the interest of the country too good suggestion. I liked your opinion.

Subhash Lomte

याने किमान भारतीय समाज मन ढवळून निघेल... मात्र त्यातून काय निष्पन्न होईल हे आजतरी सांगणे कठीण.... मात्र ही प्रक्रिया ( process ) करून बघायला हरकत नाही....... या प्रक्रियेतून पुन्हा गांधी घराण्यातून च एखादे नाव येणार नाही याची कोण खात्री देणार...??

Sanjay bagal

लोकशाही सक्षम करण्यासाठी लेखातील विचार अप्रतिम आहे. पृथ्वीराज चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांना देशपातळीवरील अनुभव व पक्षनिष्ठा आहे यांचा विचार व्हावा

विश्वास पेंडसे

मला आपले लेख नेहमीच वैचारिक वाटतात.

Add Comment