पहिली ट्रान्सजेन्डर खेळाडू डॉ. रेनी रिचर्डस

ट्रान्सजेंडर्स खेळाडूंबाबतची चर्चा नव्याने सुरू झाली असताना, याबाबत प्रारंभ करण्याचा मान डॉ. रेनी रिचर्डस या टेनिसपटुला आहे.

pinterest.com

रेनी ही आधीची डॉ. रिचर्ड रस्किंद. रिचर्ड रस्किंद डोळ्यांचा डॉक्टर होता. त्याचा जन्म 1934 मध्ये झाला. नंतर तो टेनिस खेळू लागला. ‘फॉरेस्ट हिल्स’चा निवासी असलेला, सहा फूट दोन इंच उंचीचा रिचर्ड संसारी होता आणि त्याला निकलस नावाचा मुलगाही होता. तो टेनिसपटु होता आणि 1972 मध्ये त्याने अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकेरीची उपान्त्य फेरी गाठली होती. परंतु नंतर 1975 मध्ये त्याने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली आणि त्यानंतर त्याची ओळख डॉ. रेनी रिचर्ड अशी झाली. त्यानंतर काही काळ ती रेनी क्लार्क म्हणून खेळली. डावखुऱ्या रेनीची सर्व्हिस जबरदस्त होती आणि तिच्या जोरदार फोरहॅन्ड फटक्यांचाही दरारा होता. तिच्या एका मैत्रिणीने म्हटले होते की, तुझा जबरदस्त फोरहॅन्ड फटका पाहूनच लोकांना संशय येईल. तसेच होत होते.

जागतिक जलतरण संघटनेने (FINA) एक महत्त्वाचा निर्णय त्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घेतला आहे. त्यानुसार आता ट्रान्सजेन्डर, म्हणजे लिंग बदललेल्या-बहुलिंगी खेळाडूंना काही अटींची पूर्तता करून महिलांच्या स्पर्धा-शर्यतींमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. जे वयाच्या बाराव्या वर्षाआधीच शस्त्रक्रिया करून घेऊन महिला बनले असतील त्यांना ही परवानगी असेल. हा निर्णय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आता त्यांना क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवता येईल. एल.जी.बी.टी, म्हणजे लेस्बियन (एक-दुसरीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या स्त्रिया), गे (समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष), बायसेक्शुअल्स (उभयलिंगी), आणि ट्रान्सजेंडर्स (लिंगपरिवर्तन करून घेतलेले-बहुलिंगी) या सर्वांना दीर्घकाळ समाज दूरच ठेवत आला होता. ते कुणीतरी वेगळेच असावेत अशी वागणूक देण्यात येत होती. जणू काही त्यांना वाळीत टाकल्यासारखे दूरच ठेवण्यात येत होते. क्रीडा क्षेत्रातही त्यांना सहभागी होता येत नव्हते.

हे प्राधान्याने ट्रान्सजेंडर्सबाबत होते. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक यातनाही सहन कराव्या लागत होत्या. लेस्बियन वा गे अनुक्रमे महिला व पुरुष गटांत खेळत. त्याबाबत भले काही वेळा चर्चा झाली असेल. पण त्यांच्या सहभागाबाबत कुणीही आक्षेप नोंदला नव्हता. पण अलीकडे समाजाच्या या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून तीदेखील माणसेच आहेत, कुणी वेगळे जीव नाहीत याची जाणीव सर्वांना, हळूहळू का होईना होत आहे. त्यांना आणि त्यांच्या मागण्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच मतदानाचा अधिकार, निवडणुकीला उभे राहण्याची परवानगी मिळाली आहे. काही ठिकाणी ते अधिकारपदावही निवडून आले आहेत. त्यांना नाटक, चित्रपट, गायन, नृत्य अशा मनोरंजन क्षेत्रात सहभागी होता येत आहे. तसेच अन्य क्षेत्रांमध्येही त्यांच्या कौशल्यानुसार नोकऱ्याही मिळत आहेत. समाजाची त्यांच्या संदर्भातील वागणूक बदलत चालल्याचेच यावरून दिसते. आपल्यालाही या समाजात स्थान आणि मान आहे, ही सुखद जाणीव त्यांना होऊ लागली आहे.

पूर्वी ट्रान्सजेंडर्स -पुरुषाची महिला बनलेले खेळाडू, मात्र खड्यासारखे वगळले जात होते. शिवाय कुणा महिला स्पर्धकाबाबत शंका आली तर तिला वैद्यकीय आणि अन्य प्रकारच्या चाचण्यांना तोंड द्यावे लागत होते. त्या स्पर्धकाच्या तपासणीमध्ये टेस्टॉस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाची (हार्मोन्सची) पातळी तपासून, ती ठराविक मर्यादा उल्लंघन करत नसेल, तरच तिला महिला गटात सहभागी होण्याची परवानगी दिली जात असे. या चाचणीचा फटक काही अव्वल कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंना बसल्याचे अनेकांना आठवत असेल. (यामुळेच दक्षिण आफ्रिकेची जागतिक आणि ऑलिंपिकमधील धावण्याच्या शर्यतींत सुवर्णपदके मिळवणारी कॅस्टर सेमेन्या आणि भारताची राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांत धावण्याच्या शर्यतींची विजेती द्युती चंद या धावपटूंना यामुळे मनस्ताप सोसावा लागला होता. अशा चाचण्या होत राहतील, पण त्यांबाबतची धास्ती आता नक्कीच कमी होईल.)

हा प्रश्न मुख्यतः ट्रान्सजेंडर्सबाबतच होता. कारण त्यात लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर पुरुषाची महिला, महिलेचा पुरुष असा बदल होतो. अशांना क्रीडाक्षेत्रात कशा प्रकारे सामावून घ्यायचे याबाबत विचार सुरू असताना, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने सांगितले होते की, त्या त्या खेळांच्या जागतिक संघटनांनी याबाबत निर्णय घ्यावा. आणि रविवारी (19 जूनला) फिना (FINA) या जागतिक जलतरण संघटनेने याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार महिला गटात कुणाही ट्रान्सजेंडरला सर्रास प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. असा निर्णय घेणारी ती पहिलीच जागतिक संघटना आहे. याबरोबरच यापुढे विविध स्पर्धांत ‘खुला गट’ निर्माण करावा का, याबाबत विचार करण्यासाठी एका वेगळ्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

बुडापेस्ट येथे गेल्या 18 जूनपासून जागतिक जलतरण स्पर्धा सुरू झाली आणि तेव्हाच या चर्चेला सुरुवात झाली. अमेरिकन संघटनेने या विषयाला तोंड फोडले होते. लिसा थॉमस या स्पर्धकामुळे हे झाले. लिसा जन्माला आली होती पुरुष म्हणून. थॉमस फ्रीस्टाइल या प्रकारात वाकबगार असून त्याने पेनसिल्वानिया विद्यापीठ संघातून 2017-2019 दरम्यान पुरुषांच्या संघातून भाग घेतला होता. नंतर त्याने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. तो महिला बनला. आवश्यक हार्मोन्स (संप्रेरके) उपचारपद्धती पार पाडल्यानंतर ती लिसा थॉमस म्हणून यंदा महिला संघातून स्पर्धांत सहभागी झाली. लिंगबदल झाल्यानंतर तिने अटलांटा येथे झालेल्या अमेरिकन अव्वल महाविद्यालयांच्या जलतरण स्पर्धेत, वैयक्तिक मिडलेमधील ऑलिंपिक रौप्यपदक विजेती एम्मा वेयांटचा 500 मी. फ्रीस्टाइल शर्यतीत पराभव केला. त्यामुळे जन्मतः महिला असणाऱ्यांच्या स्पर्धेत शस्त्रक्रियेनंतर महिला झालेल्यांना परवानगी द्यावी का, असा प्रश्न अमेरिकन जलतरण संघटनेने फिनाच्या बैठकीत उपस्थित केला.

संघटनेच्या विशेष बैठकीत बोलताना फिनाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष हुसेन अल-मुसल्लाम म्हणाले, “कोणत्याही खेळाडूला तू अव्वल स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीस, असे सांगितले जाऊ नये, असे माझे मत आहे.” त्यासाठी आम्ही समिती स्थापन करू असेही ते म्हणाले होते.


हेही वाचा : फोर डेज ऑफ नेपल्स : युद्ध येता दारी - आ. श्री. केतकर


त्यानंतर संघटनेच्या खास सर्वसाधारण सभेमध्ये बुडापेस्ट येथे जागतिक स्पर्धा सुरू असताना, वैद्यकीय, कायदा आणि क्रीडाक्षेत्रातील जाणकारांशी बोलून निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ज्यांनी महिला बनण्यासाठी वयाच्या 12व्या वर्षांआधी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली असेल, त्यांना महिला गटात सहभागाची मान्यता देण्यात येईल. फिनाचे अधिकारी ब्रेंट नोविकी म्हणाले, “पुरुष आणि महिला अशा दोन प्रकारात स्पर्धा घेण्याचा आमचा निश्चय आहे. यामुळे काही व्यक्तींना त्यांच्या अनुरूप वर्गात समभागी होता येणार नाही, हे आम्ही मान्य करतो. नव्या नियमानुसार पुरुष स्पर्धा ही सर्वांसाठी खुली असेल. परंतु जे ट्रान्सजेंडर पुरुषाची महिला बनले आहेत त्यांना मात्र महिलांच्या स्पर्धा-शर्यतींत सहभागी होण्यासाठी, आपल्यात वयात आल्यानंतरची पुरुषत्वाची कोणतीही शारीरिक लक्षणे नाहीत हे सिद्ध करावे लागेल.” चर्चेत भाग घेताना डॉ. क्रिस्तर मॅगनुसन म्हणाले, “अगदी 10 वर्षाच्या मुलांनाही शस्त्रक्रिया करून घेऊन आपण ट्रान्सजेंडर व्हायचे की नाही, हा निर्णय घ्यावा लागेल.” 

ट्रान्सजेंडर्स खेळाडूंबाबतची ही चर्चा नव्याने सुरू झाली असताना एक प्रश्न निर्माण होतो की, ही गोष्ट आताचीच आहे का आणि नसेल, तर पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू कोण. याबाबत प्रारंभ करण्याचा मान डॉ. रेनी रिचर्डस, या टेनिसपटुला आहे. रेनी ही आधीची डॉ. रिचर्ड रस्किंद. रिचर्ड रस्किंद डोळ्यांचा डॉक्टर होता. त्याचा जन्म 1934 मध्ये झाला. नंतर तो टेनिस खेळू लागला. ‘फॉरेस्ट हिल्स’चा निवासी असलेला, सहा फूट दोन इंच उंचीचा रिचर्ड संसारी होता आणि त्याला निकलस नावाचा मुलगाही होता. तो टेनिसपटु होता आणि 1972 मध्ये त्याने अमेरिकन खुल्या स्पर्धेत एकेरीची उपान्त्य फेरी गाठली होती. परंतु नंतर 1975 मध्ये त्याने लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली आणि त्यानंतर त्याची ओळख डॉ. रेनी रिचर्ड अशी झाली. त्यानंतर काही काळ ती रेनी क्लार्क म्हणून खेळली. डावखुऱ्या रेनीची सर्व्हिस जबरदस्त होती आणि तिच्या जोरदार फोरहॅन्ड फटक्यांचाही दरारा होता. तिच्या एका मैत्रिणीने म्हटले होते की, तुझा जबरदस्त फोरहॅन्ड फटका पाहूनच लोकांना संशय येईल. तसेच होत होते. त्यामुळे अनेकदा महिला खेळाडू तिच्याशी खेळण्यास नकार देत. एका स्पर्धेत तर 32 पैकी 25 जणींनी माघार घेतली होती. नंतर तिच्याबाबत तक्रारी होऊ लागल्याने प्रकरण न्यायालयात गेले. न्यूयॉर्क काउंटी कोर्टाने ती महिलाच असून तिला स्पर्धांत सहभागी होण्याचा अधिकार आहे, असे सांगून अमेरिकन टेनिस असोसिएशन विरुद्ध निकाल दिला. नंतर ती रेनी रिचर्ड नावाने खेळू लागली. दोन वर्षांनी म्हणजे 1976 मध्ये रेनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र विभागात खेळली.

एकेरीच्या पहिल्याच फेरीत तिला अपयश आले. व्हर्जिनिया वेडने तिला 6-1; 6-4 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुहेरीमध्ये मात्र बेटी ॲन ग्रब स्टुअर्टच्या साथीने खेळताना तिने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत या जोडीला मार्टिना नवारातिलोवा आणि बेटी स्टोव्हने हरवले. इली नस्तासेच्या साथीने ती मिश्र स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. 1979 मध्ये याच स्पर्धेत ती 35 वर्षांवरील महिला गटात विजेती बनली. क्रमवारीत तिचे सर्वोच्च स्थान 20वे होते. एकेकाळी ट्रान्स्जेंडर्स हे फसवाफसवी करणारेच आहेत असे म्हणणाऱ्या नवारातिलोवाची प्रशिक्षक म्हणूनही रेनीने काम केले आणि त्या काळात मार्टिना दोनदा विम्बल्डन विजेती झाली होती. 1981 मध्ये ती निवृत्त झाली व तिने पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला. आजवर तिने डोळ्याच्या हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉ. रेनी रिचर्डसला 2000 साली अमेरिकन टेनिस असोसिएशनच्या ‘ईस्टर्न हॉल ऑफ फेम’मध्ये स्थान देण्यात आले. 2013 मध्ये ‘नॅशनल गे ॲन्ड लेस्बियन स्पोर्ट हॉल ऑफ फेम’मध्ये तिचा समावेश केला गेला.  

- आ.श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: टेनिस ट्रान्सजेन्डर LGBTQ खेळाडू एलजीबीटी FINA जलतरण Load More Tags

Add Comment