चित्रपट कसाही असो, त्यातून हिंसेचा फोलपणा आणि अहिंसेचे महत्त्वच अधोरेखित होईल!

'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटाच्या निमित्ताने...

indiatoday.in

खासदार अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेला 'व्हाय आय किल्ड गांधी' या अलिकडेच येऊ घातलेल्या चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. त्या चित्रपटात कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका केली आहे. त्यात अगदी काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीदेखील अशाच प्रकारच्या एका चित्रपटाची घोषणा केलेली होती. गांधीजींना खलनायक ठरवून त्यांच्या मारेकऱ्याला नायक ठरवण्याचा हा ससेमिरा अजून किती काळ चालू राहणार आहे आणि त्यातून नक्की काय साध्य होणार आहे हे येणारा काळच दाखवून देईल.

2 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे जगाला सत्य-अहिंसेच्या यशस्वी आणि व्यापक राजकीय प्रयोगाचे दान देणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या येऊ घातलेल्या 'गोडसे' या चित्रपटाची घोषणा प्रसिद्धीमाध्यमांवर केली आणि समाजातील अनेक गटांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले. या समाजगटांची विभागणी केली तर 'गांधीविरोधी' आणि 'गांधीप्रेमी' असे हे दोन गट दिसून येतात. या घोषणेनंतर गांधीविरोधकांत आनंदाची लहर आली आणि दरवर्षीची परंपरा कायम राखत पुन्हा तेच कालबाह्य झालेले गांधीद्वेषाचे मुद्दे ते रंगवू लागले. दुसरीकडे गांधीप्रेमीदेखील गांधीजींचे समर्थन करीत गांधीविरोधकांचे तोंड चूप करण्याचा प्रयत्न करू लागले.  

तसे पाहिले तर महात्मा गांधींवर आजवर हजारांहून जास्त पुस्तके लिहिली गेलेली आहेत आणि कित्येक प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांच्यावर चित्रपट, नाटके देखील बरीच आलेली आहेत. काहींमध्ये त्यांच्यातील यशस्वी राष्ट्रपित्याला उजळवले गेले; तर काहींमध्ये हरीलाल गांधींच्या अयशस्वी पित्यावर बोट ठेवले गेले! 2000 साली आलेल्या कमल हसन यांच्या 'हे राम' या चित्रपटाद्वारे तर गांधींची हत्या करू पाहणाऱ्या एका तरूणाचा 'गांधीविरोध ते गांधीप्रेम' असा प्रवास उलगडवून दाखवण्यात आला होता. आणि अशाप्रकारे 'गांधीप्रेम विरूद्ध गांधीद्वेष' असा वाददेखील गेली कित्येक वर्षे भारतात रंगलेला आहे. अर्थातच अशा वादामुळे एखाद्या महान व्यक्तिमत्त्वाबाबत सखोल चर्चा घडवून आणली जाते. मात्र ही चर्चा पूर्वग्रहरहीत शास्त्रीय विश्लेषणाने झाली तरच त्या चर्चेला अर्थ असतो. किंबहुना त्यामुळे त्या महान व्यक्तिमत्वाबद्दलचे सर्व हेवेदावे स्पष्ट होत असताना ते स्पष्ट करून घेणाऱ्या व्यक्तींचाही विचार प्रगल्भ होत असतो.

परंतु सद्यस्थितीत ज्या प्रकारे प्रसिद्धीमाध्यमांत अशा विषयांवर चर्चा रंगवली जाते, ती पाहताना आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या समिक्षेपासून दूर जात आहोत असेच चित्र पुढे उभे राहते. त्यात स्वतःच्या धर्ममतांना, तत्त्वांना कुरवाळत बसल्यामुळे, आपल्या विरोधकाला शह देण्यासाठी केला जाणारा अपशब्दांचा वापर तर सर्रास चालतो. वैज्ञानिक शोध-अभ्यासाच्या आजच्या युगात हे निश्चितच खेदजनक ठरते. या प्रकारांमुळे बंधुत्व, सभ्यता, शांती अशा सर्वच मूल्यांना गालबोट लागत जाते. त्यानंतर मग एकदा का ते मुद्दे राजकीय बनले, की त्यांचा काळीमा सगळ्या समाजालाच विद्रूप करू शकतो.

आता गांधीजींबाबत बोलायचे झाले तर, आधुनिक इतिहासातील गांधी हे एकमेव असे महात्मा असतील की, ज्यांच्या जीवनाला महानतेचे जितके पैलू आहेत; तितकेच अवहेलनेचे आणि निर्भत्सनेचे घाव त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या हयातीत व त्यानंतरदेखील सोसावे लागलेले आहेत. त्यांचे वैयक्तिक आयुष्य असो वा सामाजिक अथवा राजकीय! त्यामध्ये नेहमीच वैगुण्य शोधण्याचा प्रयत्न टीकाकारांनी केलेला आहे; मग ते त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग असोत वा त्यांची अहिंसा. आता हे टीकाकारही दोन प्रकारचे आहेत. एक गट त्यांच्यावर द्वेषाची गरळ ओकणारा तर दुसरा त्यांचे माहात्म्य मानतच, त्यांच्यावर सौम्य शब्दांत टीका करीत दुसऱ्या एखाद्या महापुरूषाला गांधींपेक्षा मोठा करू पाहणारा!

अशाच काही कारणांचा कांगावा करीत गांधीजींची हत्या केली गेली. पुढे त्यावर आधारित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक देखील गाजले. मुळात या नाटकात ठोस मुद्द्यांपेक्षा काव्यमय भाषा, आकर्षक संवाद आणि उत्तम अभिनयाचाच भरणा जास्त होता. सदर नाटक पाहणारा कुठलाही विवेकवादी मनुष्य जर त्या नाटकाची समिक्षा करू लागला तर तो एकच प्रश्न उपस्थित करेल, "आखिर कहना क्या चाहते हो?" उदाहरणच द्यायचे तर यातील काही प्रसंगांत नौखालीतील दंगलींवर दंतकथा रचत, त्यांचे खापर गांधीवर फोडण्याचा प्रयत्न केला जातो. भावूक झालेल्या प्रेक्षकासदेखील ते पटू लागते. मात्र त्या परिस्थितीसाठी नक्की गांधी कसे जबाबदार, यावर काही बोलले जात नाही. कदाचित गांधींची अहिंसा त्याला जबाबदार असावी असा त्या नाट्यलेखकाचा आक्षेप असेल. मात्र गांधीची अहिंसा हीच मुळात अशी एक गोष्ट होती जिने नौखालीतील दंगे थांबवून दाखवलेले होते; जे पंजाबमध्ये पंचावन्न हजार सैन्यदेखील करू शकले नव्हते. आणि ज्यामुळे भारावलेल्या लॉर्ड माऊंटबॅटन यांनी महात्माजींना 'वन मॅन आर्मी' संबोधले होते. असो!


हेही वाचा : वैष्णव जन तो... -  मॅक्सवेल लोपीस


असे हे नाटक नथुरामसमर्थकांनी  डोक्यावर घेतले; तर गांधी समर्थकांनी त्याचा कडाडून विरोध केला. परंतु या गांधीविरोधी नाटकाचा सर्वात जास्त फायदा कुठला झाला असेल तर तो 'पंचावन्न कोटी आणि फाळणी' या बाबतीतील गांधीजींवर केलेल्या खोट्या आरोपांना खोडून टाकणाऱ्या माहितीचा प्रसार! या नाटकामुळेच हे मुद्दे ऐरणीवर आले आणि गोंधळून गेलेल्या लोकांना जगन फडणीस, रामचंद्र गुहा, चुन्नीभाई वैद्य अशा लेखकांचे वस्तुनिष्ठ लिखाण वाचून सदर नाटकात दाखवलेला फोलपणा समजून घेता आला. 

शहीद भगदसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या फाशीसंदर्भातील भूमिकेबाबतही गांधीजींवर टीका करण्यात आली.  'गांधींनी एक सही दिली असती तर या क्रांतिकारकांची फाशी रद्द झाली असती' अशी बाळबोध टीका गांधीजींवर केली गेली. या विषयावरदेखील श्री. चंदर पाल सिंग यांनी शोधनिबंध सादर करून पटवून दिले की, या क्रांतिकारकांना वाचवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करणारे हे गांधीच होते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, हे चंदर पाल सिंग काही गांधीवादी नाहीत तर ते भगतसिंगांचे अभ्यासक आहेत. 

गांधीजींच्या हत्येबाबत (ज्याला त्यांचे विरोधक 'वध' म्हणतात) केलेले सगळे दावे आज चिकित्सक पद्धतीने खोडून टाकण्यात आलेले आहेत. त्यानंतर गांधीवादी लेखकांनी मांडलेले दावे आजवर खोडले गेलेले नाहीत, हे विशेष!

काही दिवसांपूर्वी कंगनाच्या वक्तव्यासंबंधात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सध्या प्रसिद्धीमाध्यमातून नेहरू तसेच अन्य राष्ट्रपुरूषांबाबत होत असलेल्या चारित्र्यहननाच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केलेली होती. आणि आता त्यांचीच मुख्य भूमिका असलेला तशाच आशयाचा सिनेमा येत आहे ही बाब निश्चितच धक्कादायक आहे. या प्रकरणाबद्दल बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, हा चित्रपट 2017 साली चित्रित झालेला होता आणि मी नथुरामाच्या कृतीचा 100 टक्के निषेधच करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एक उत्तम अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंच्या मताचा आदर करताना नाना पाटेकर यांच्या 1986च्या 'माऊंटबॅटन - द लास्ट विक्टरी' या चित्रपटातील किंवा अ‍ॅटर्नबरोच्या 'गांधी'मधील हर्ष नय्यर यांनी केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेचे स्मरण होते. परंतु नानांनी किंवा नय्यर यांनी त्या-त्या सिनेमांत नथुरामाला 'नायक' म्हणून साकारले नव्हते हे लक्षात घ्यावे लागेल. नथुरामाला नायक म्हणून साकारण्यासाठी जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना विचारले गेले असता त्यांनी, "नट म्हणून कुठल्याही भूमिकेचा मी आदर करायला पाहिजे; परंतु असे खोटारडे नाटक करून मला समाजात कीड पसरवायची नाही" असे म्हणत सदर भूमिकेसाठी नकार दिलेला होता; ही घटनादेखील आज प्रकर्षाने आठवून जाते. अमोलजींनी 2017मध्ये केलेली ती भूमिका, वैयक्तिक पातळीवर त्यांना नथुरामाच्या विचारांशी असलेली तेढ हे सगळे मुद्दे मान्य! परंतु दोन्हीही छत्रपतींना हुबेहूब साकारताना आम्ही ज्यांना पाहिले, त्यांनाच 'प्रार्थनेसाठी निघालेल्या एका वयोवृद्ध महात्म्याचा मारेकरी नायक' म्हणून पाहणे आम्हाला निश्चितच कठीण जाईल. असो!

आता नवीन येऊ घातलेला 'गोडसे' या सिनेमाबद्दल म्हणायचे तर तो गांधीप्रेमी वा गांधीविरोधी यांमधील नक्की कुठल्या भूमिकेतून लिहिला गेला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. अशावेळी इतक्यातच त्यासाठी आनंदून जाणे अथवा क्रुद्ध होणे उचित नाही. या चित्रपटात काही नव्या गोष्टी पुढे आणल्या जातील असा दिग्दर्शकाचा दावा आहे. त्यामुळे जर हा सिनेमा गोडसेच्या समर्थनात असेल तर त्यामुळे गोडसेचा अजूनही एखादा दावा पुढे येईल आणि गांधी अभ्यासक त्याची चिकित्सा करू शकतील; ज्यामुळे गांधींना अधिक समजून घेण्यात मदतच होईल. जर हा सिनेमा गांधीप्रेमातून निर्माण झालेला असेल तर नथुरामचे खोडून काढलेले दावे जे आजही केवळ पुस्तकस्वरूपात असल्याने बहुजनांपर्यत पोहोचू शकलेले नाहीत ते चित्रपटामार्फत पुढे येतील. त्यामुळे चित्रपट कसाही असो; त्यातून हिंसेच्या फोलपणाला आणि अहिंसेच्या महत्त्वाला अधोरेखित करण्याची प्रक्रियाच वेग धरेल.

एका अर्थाने पाहिले तर गांधी जयंतीच्या दिवशीच या चित्रपटाची घोषणा करून दिग्दर्शकाने एकप्रकारे गांधीजींचे माहात्म्य मान्य केलेले आहे. कारण नथुरामाशी संबंधित एखाद्या दिवशी अशी घोषणा करण्याइतके ना त्याचे काही कर्तृत्व आहे ना स्वातंत्र्ययुद्धातील कुठले कार्य! तो देशभक्त होता असे सांगणाऱ्यांकडे त्याने देशसेवेसाठी केलेल्या एखाद्या तरी महान घटनेची वा तशा दिवसाची नोंद मिळेल का? 'गांधीजींची हत्या करणारा आणि स्वतंत्र भारतात पहिला फाशी चढवला गेलेला' इतकीच काय ती त्याची ओळख!

गांधीजींना मारण्याचे प्रयत्न 1935 पासून झालेले होते व त्यात नथुराम गोडसे सहभागी होता ही माहिती आता नवी राहिलेली नाही. नथुरामला गांधीजींनी संवादासाठी बोलावले होते (ज्यासाठी तो कधीच गेला नाही) हादेखील त्यातलाच एक भाग. म्हणजे विरोधकाचे स्वागत करत त्याला प्रेमाने जिंकण्याची गांधींजींची भूमिकाच या चित्रपटाबाबत स्विकारावी लागेल. सारांश, चित्रपट कसाही असू द्या; त्यामुळे गांधी जिवंतच होत जातील... अस्ताला जाऊन पुन्हा पुन्हा उगवणाऱ्या सुर्याप्रमाणे...!

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com 
(लेखक, नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)

Tags: नथुराम गोडसे अहिंसा अमोल कोल्हे महेश मांजरेकर सिनेमा Load More Tags

Comments:

Jostna Vijay Dabre

गांधी आणि गांधीजींचे विचार त्यांच्या विरोधात कितीही नाटकं ,चित्रपट आणि पुस्तके आले तरीही कधीच अस्ताला जाणार नाहीत , हे अतिशय उत्तम प्रकारे समजावून देणारा उत्तम लेख.

कोमल केळकर

उत्तम लेख.

लतिका जाधव

धन्यवाद!

Vishwas Sutar

विवेकी विचार मांडणी !

Add Comment