जन्मघडी, फाळणी आणि आणीबाणी या तीन कालबिंदूंतील संघर्ष मांडणारे आत्मकथन

'कमबख्त निंदर' या डॉ. नरेन्द्र मोहन यांच्या आत्मकथेच्या अनुवादाचे परीक्षण

एका भाषेतल्या साहित्याचा दुसऱ्या भाषेत केलेला अनुवाद हा साहित्यनिर्मितीमधील एक असा दुवा असतो, जो त्या दुसऱ्या भाषेला अधिकाधिक समृद्ध करत असतो. त्यामुळे त्या साहित्यातले विशिष्ट स्थळ, संस्कृती, व्यक्तिजीवन, जीवनशैली अशा अगणित घटकांबद्दलची माहिती दुसऱ्या भाषेतल्या वाचकाला मिळून त्याच्या जीवनजाणिवा समृद्ध होतात. परंतु खरी समृद्धी मिळते ती त्या भाषेला! कारण, पहिल्या भाषेतली लिखाणशैली अनुवादित होताना आपल्या मूळ ढाच्याचे काही अंश कायम ठेवते. त्यामुळे अनुवाद जर चपखल झाला तर त्या दुसऱ्या भाषेला एक नवीन लिखाणशैली मिळत असते. या अनुषंगाने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नरेन्द्र मोहन यांच्या ‘कमबख्त निंदर’ या हिंदीमधल्या आत्मकथेचा यशोधरा काटकर यांनी केलेला अनुवाद मराठी भाषा आणि साहित्याची समृद्धी निश्चितच वाढवणारा आहे.

काव्य, नाटक, साहित्यशास्त्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, संपादन आणि डायरीलेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये मोलाची कामगिरी करणारे डॉ. नरेन्द्र मोहन हे हिंदी साहित्यातले प्रख्यात व्यक्तिमत्व. त्यांच्या कविता फाळणीचा रक्तपात अनुभवलेल्या निर्वासिताच्या वेदना आणि आणीबाणीच्या टप्प्यापर्यंतच्या कालखंडात पसरलेल्या अस्वस्थतेच्या घुसमटीत साकार होत जातात. अशा साहित्यिकाचे आत्मकथन मराठीतून वाचणे म्हणजे विचारप्रवण करणारी काव्यमय पर्वणीच!

त्यांनी आपल्या आत्मकथेची सुरूवातच महात्मा गांधींच्या 'सत्याचे प्रयोग'मधल्या या वाक्यांनी केली आहे – ‘लिहिण्याच्या दिवशी अंतर्यामी मला जो मार्ग दाखवतो मी तसाच लिहीत जातो. तरीसुद्धा, अशा रीतीने त्याची अनुभवाच्या रूपात ओळख करून देणे म्हणजे सत्यावर एक प्रकारे प्रहार करण्यासारखे आहे. म्हणून त्याची शुद्ध रूपात ओळख करून देऊ शकतील असे शब्दच माझ्यापाशी नाहीत’. पण ‘अनुभव’ आणि ‘सत्य’ यांना वेगवेगळे मानण्याचा बापूंचा दृष्टिकोन अमान्य करत, त्या एकमेकांत प्रविष्ट होणाऱ्या सहयोगी प्रक्रिया आहेत अशी धारणा ठेवत, आपल्या अनुभवांतूनच घडलेले जीवनाचे खरे दर्शन नरेन्द्र मोहन मांडू पाहतात. सीमित आणि असीमित, जाणीव आणि नेणीव, वास्तव आणि अद्भुत यांची सरमिसळ करत ते आपल्या बालपणीच्या ‘निंदर’ला अंतर्यामीची चेतना मानत, नरेन्द्र मोहनचे जीवनचित्रण उभे करतात. फाळणीच्या अग्निकांडात होरपळ सोसून भारतात आलेल्या निर्वासित निंदरपासून चतुरस्र, बहुआयामी साहित्यिक म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्याच्या परिवर्तनकालातल्या संघर्षमय प्रवासाचे चित्रण इथे उमटत जाते. स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या, आजच्या पाकिस्तानातल्या पंजाबी भाषिक परिवारात जन्म घेतल्यामुळे असेल वा सततच्या स्थित्यंतरांमुळेही असेल, बोलीभाषांचे संस्कार घेतलेली त्यांच्या निवेदनाची भाषाशैली सुरुवातीच्या टप्प्यात हिंदीच्या साचेबद्ध प्रवाहापेक्षा थोडी अलग वाटते पण पुढे त्यांच्या शिक्षण, वाचन आणि व्यासंगामुळे ती प्रमाणभाषेशी जवळीक साधत जाते असे जाणवते. 

नरेन्द्र मोहन यांचा जन्म 1935 साली लाहोर शहरात दंगे पेटलेले असताना एका भयकातर प्रहरी झाला. पुढे फाळणीचे जीवघेणे आघात सोसत मायभूमीतून परागंदा होण्याची घटिका त्यांच्या वाट्याला आली. बालपणात अचानक आलेले वाणीविहीन दिवस, झोपेत चालण्याचा आजार आणि शक्ती शोषून घेणारे दीर्घकालीन आजारपण, पुढे मायभूमी दुरावल्याची वेदना सोसत हा मुलगा मोठा होत गेला, अचानक गेलेली वाचा काही काळाने परत आली; परंतु तोतरेपणाची संगत घेऊन. या सर्वांमुळेच असेल त्यांना व्यक्त होण्याची निकड भासू लागली, पुढे आणीबाणीचे बंधनदेखील त्यांना त्यांच्या वेदना अभिव्यक्त करण्यापासून रोखू शकले नाही. बालपणीच्या मौनातून ‘द्वार दया का जब तू खोले, पंचम सूर में गूंगा बोले...’ असे शब्दसूर उमटत ते त्यांच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनले. त्यातून त्यांच्या सर्जनशीलतेचा काव्य, नाटक, साहित्यशास्त्र, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, संपादन आणि डायरीलेखन असा बहुआयामी विकास होत गेला. एक कवी म्हणून त्यांना ओळख मिळवून देणारा कॉलेजशिक्षणाचा काळ ते अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा श्वास गुदमरून टाकणाऱ्या आणीबाणीच्या (1975-77) कालखंडाचे चित्रण इथे उमटत जाते. जन्मघडी, फाळणी आणि आणीबाणी या तीन कालबिंदूमधल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय धुमश्चक्रीत मोठा होत जाणाऱ्या नरेन्द्रचा संघर्ष त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनला. पण हा साहित्यिक रावीच्या किनाऱ्यापासून दुरावल्याची कविता गात बसला नाही. तो वास्तवाशी नाते जोडत सत्ताधीशांच्या दडपशाहीविरुद्ध प्रत्यक्ष खडाही ठाकला; तर कधी गर्दीतून बाहेर पडत एकटाच आपले म्हणणे मांडत राहिला. या सर्व घटितांचे वास्तवदर्शी चित्रण या आत्मकथनात उमटले आहे.

फाळणीच्या जखमा सहन करत त्यांचा परिवार भारतात आला, पण भारतातले त्यांचे आयुष्य स्थिर असे नव्हतेच. सुरूवातीला वडिलांना सतत बदलत्या नोकरीधंद्यानिमित्त निमित्ताने करावी लागलेली स्थलांतरे, आजारामुळे थबकलेले शिक्षण, स्वकष्टाने घेतलेले कॉलेज शिक्षण ते पीएच डी, प्राध्यापक म्हणून स्थिर होतानाही सतत बदलत राहावे लागणारे मुक्काम, त्यात अनेक सहाध्यायी हिंदी लेखक-कवींशी जुळलेले मैत्र आणि विचारांची देवाणघेवाण, विद्यापिठीय कर्मचाऱ्यांमधले राजकारण अशा घटनांनी या आत्मकथेचा मधला भाग व्यापला आहे. त्यातून तत्कालीन सुशिक्षित तरुणाईला भेडसावणाऱ्या बेकारी, महागाई, भ्रष्टाचार असा समस्यांचे व्यापक चित्रण उभे राहते आणि त्यात संघर्ष करत असतानाही सर्जनशील काम करत राहणारा एक लहानसा का होईना वर्ग आहे/असतो, हेही दिसू लागते. कायमस्वरूपी नोकरी नसल्याने हेलपाटणार्‍या प्राध्यापक वर्गाच्या अवमूल्यनाचे चित्रण करणारे डॉ. मोहन ‘असा कधीपर्यंत आणि किती वेळा विस्थापित होत विभागला जाणार आहे मी?’ असा प्रश्न शासनयंत्रणा, पर्यायाने समाजासमोर खडा करतात. आत्मकथा असल्यामुळे हे अनुभव लिहिणे त्यांना गरजेचे वाटत असले तरी हा भाग काहीसा विस्कळीत झाल्यासारखा वाटतो.

खरे तर आत्मकथा हा साहित्यप्रकार भारतीयांसाठी नवा वा दुर्मिळ नाही. स्वतःच्या जीवनाकडे न्यायनीतीचा उत्सव म्हणून पाहत त्यातून वाट्याला आलेला अन्याय मांडत, कधी चुकींची कबुली देत स्वतःचे मोठेपण सिद्ध करत आत्मकथा गुंफणाऱ्या साहित्यिकांची अनेक उदाहरणे आढळतात. परंतु गांधींनी आत्मकथेचे रूपच बदलून टाकले. केवळ चुकाच नाहीत; तर मनातील भावभावनांचे विकार आणि त्यातून घडलेले अपराध स्वीकारण्याची नवी प्रयोगपद्धती त्यांनी आपल्या आत्मकथेतून मांडली. गांधीजींप्रमाणे नरेन्द्र मोहनदेखील स्वतःबद्दल निर्मम होण्याची, स्वतःची चिरफाड करण्याची आणि स्वतःकडे खुलेपणाने बघण्याची तयारी दाखवतात. म्हणून ते बालपणी केलेल्या पंचवीस रूपयांच्या चोरीची कबुली देत; स्वतःच्या गुणदोषांसकट स्वतःचे चित्रण करत जातात. त्याहीपलिकडे जात ते स्वतःचे आईवडील, भाऊ, यूसुफमास्तर आणि बालमित्र आफताब, बालमैत्रिण नन्हो आणि पुढच्या टप्प्यामधल्या महीपसिंह, रामदरश मिश्र, गिरिजाकुमार माथुर असे साहित्यिक-मित्र अशा व्यक्तिरेखांच्या अंतरंगातले स्वभावरंग प्रांजळपणे उलगडून दाखवतात. त्यांच्या बीजी, नन्हो, पत्नी अनुराधा आणि कन्या सुमन या त्यांच्या आयुष्यातल्या प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा इथे ठळकपणे उमटतात. नन्हो हे त्यांच्या अबोध वयातले आकर्षण पुढे नंदिताच्या रूपात वारंवार सामोरे येते. तिच्याबद्दल लिहिताना वा त्यांच्याशी जवळीक साधू पाहणाऱ्या स्त्रीचा उल्लेख करताना ते त्या क्षणी मनात उद्भवलेल्या विकारांची कबुली देताना दिसतात आणि ही कहाणी खऱ्या अर्थाने आत्मकथेचे रूप घेत जाते.


हेही वाचा : निसर्गात रमलेला एक आधुनिक गांधीवादी - मॅक्सवेल लोपीस


आणीबाणीमुळे निर्माण झालेल्या राजकीय-सामाजिक अस्वस्थतेमुळे त्यांचे लिखाण त्यांना पुन्हा संघर्षाच्या वेगळ्या वळणावर घेऊन जाते. आणि एक कवी आणि नाटककार म्हणून झालेला त्यांचा प्रवास, तसेच भावना, विचार आणि कल्पनांचा संगम त्यांच्या लिखाणात कसा जोपासला गेला ते जाणून घ्यायला मदत होते. त्यांच्या साहित्यनिर्मितीवर आईचा शांत स्वभाव आणि वडिलांच्या तापटपणाला विरोध करण्याचा लेखकाचा सुप्त भाव या घटकांचा प्रभाव होता. त्यामुळे एका चर्चासत्रात त्यांना ‘तुमच्या कवितेत प्रतिकार आहे परंतु त्याची अभिव्यक्ती शांत का? तुमच्या मांडणीत उत्तेजितता आणि आक्रोशाचा अभाव का दिसून येतो?’ असा थेट सवाल विचारण्यात आला. त्यांच्या मवाळ विरोधाची झलक पाहायची असेल तर आणीबाणीदरम्यानची त्यांची कविता पाहावी,

‘विश्वास ठेवण्यासाठी पात्र नाही दिल्ली
असेल कधी ती रेशमी नगरी,
आज आपल्या औद्धत्त्यासह
कशी उघडी पडली आहे…’

‘मरणं आणि वाचणं
किती वेगळं, तितकंच सारखं आहे या वातावरणात
भेदरलेला मी
माझ्या सत्यासाठी लज्जित होणं
शिकतोय आता…’

डॉ. नरेंद्र मोहन यांनी बालपणापासून आणीबाणीपर्यंतचा काळ मांडताना घटनाक्रम काटेकोरपणे जोपासलेला नाही हे खटकते. परंतु ते मुळात कवी आहेत आणि कवीचे मन हे सतत त्रिकालात गिरक्या घेणारे असते हे लक्षात घेतले तर या साहित्यकृतीच्या आस्वादात बाधा येत नाही. या आत्मकथेच्या अनुवादासंबंधी बोलायचे झाले तर अगदी सुरूवातीलाच उल्लेखलेल्या अनुवादाच्या फायद्यांच्या सर्व निकषांत यशोधरा काटकर यांनी केलेला अनुवाद उतरत असल्याने, हे लेखन मराठीतही एक उंची गाठत जाते. या आत्मकथेत वेळोवेळी अवतरलेल्या मूळ हिंदी कवितांचा मराठीतील अनुवाद ही तर एक नवनिर्मितीच आहे .

या आत्मकथेमधला ‘निंदर’ हा नरेन्द्र मोहन यांचा सखा, सहोदरच आहे. या आत्मकथेत नरेन्द्रबरोबर श्वास घेणारा, जन्मघडीपासून सहप्रवासी असणारा निंदर मोठा बहुरूपी आहे. तो कधी त्याच्या बीजींची वात्सल्यमय साद आहे, तर कधी गांधीजी ज्याला ‘अंतर्यामी’ म्हणतात तो आहे. हे रूपक जितके मनोज्ञ आहे, तितकेच अर्थवाहीदेखील. त्यांच्या अंतर्यामीचा निंदर त्यांना छळत राहतो, प्रत्येक गोष्टीत लुडबूड करतो; परंतु नरेन्द्र-निंदरच्या द्वंद्वातूनच जीवनाचे मर्म उलगडत जाते. स्वतःच्या गुणगानात मश्गुल झालेले नरेन्द्र मोहन निंदरच्या उपस्थितीने स्वतःच्याच नजरेत थिटे होऊ लागतात, त्यांना निंदरच्या अमाप ऊर्जेची आणि स्वतःमधल्या पोकळपणाची जाणीव होते. निवेदनाच्या शेवटी आलेले त्यांचे एक वाक्य खूपच महत्त्वाचे ठरते- ‘माझी सावली बनून सतत साथ देणारा निंदर शेवटच्या क्षणी माझ्या संगती असेल की नाही, तेही मला ठाऊक नाही’. म्हणजे त्यांच्या अंतरंगात वसणारा निंदर आहे चैतन्यमय प्राणतत्त्व, विश्वात भरून राहिलेले! म्हणजे ज्या परमसत्याला गांधीजी अनुभवांपासून पृथक करतात त्यालाच ते निंदर मानतात. ज्यांना हे समजेल त्यांना निंदर समजेल, डॉ. नरेन्द्र मोहनही समजतील.

कमबख्त निंदर (आत्मकथा)
लेखक : नरेन्द्र मोहन
अनुवाद : यशोधरा काटकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या : 174  मूल्य: रू. 250/-

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com

(लेखक, नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून साहित्याचे अभ्यासक आहेत.)

Tags: नवे पुस्तक आणीबाणी नरेंद्र मोहन हिंदी आत्मकथा पुस्तक परिचय Load More Tags

Add Comment

संबंधित लेख