आनंदाचा शोध

आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या (20 मार्च) निमित्ताने...

polygon.com | प्रातिनिधिक चित्र

‘डिस्टोपिया’ हा प्राचीन ग्रीकमधून आलेला एक असा शब्द - जो या जगातील एखाद्या राष्ट्रात किती भयावह परिस्थिती असू शकते त्याचे भयकंपित करणारे चित्र मानवजातीला दाखवत, त्या कल्पनेला वास्तविक रूप घेण्यास अटकाव करणारा एक दिशादर्शकच! दुःख, दारिद्रय, अंदाधुंदी कारभार, पूर्ण एकाधिकारशाही, भ्रष्टाचार अशा असंख्य व्याधींनी जडलेल्या ‘डिस्टोपिया’ या कल्पित राष्ट्रापासून प्रत्यक्षातील सर्व राष्ट्रांची अधिकाधिक फारकत होत जावी आणि जगातील प्रत्येकाला जीवनाच्या मूलभूत आनंदाचा उपभोग घेता यावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंम्ब्लीने दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2012 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक आनंद दिन’ म्हणून पाळण्यास सुरूवात केली. खरे तर या दिवसाचे संस्थापक असलेले जेम इलियन आणि लुईस गॅलर्डो यांनी त्या अगोदरही 2006 ते 2012 या काळात ‘हॅपीटॅलिझम’ नावाची चळवळ संयुक्त राष्ट्रसंघात रुजवलेली होती. आपल्या आप्तस्वकीयांसोबत आयुष्याच्या सुंदर क्षणांचा उपभोग घेत, जीवनाच्या या अमूल्य दानाबद्दल कृतज्ञ होत, छोट्याछोट्या गोष्टींमधून आनंद उपभोगण्याची कला साऱ्या जगाला गवसावी हे या दिनाचे खरे प्रयोजन!

परंतु सुखादुःखाच्या नश्वर फेऱ्यात अडकलेल्या मानवसमुदायाला आज ‘आनंद’ म्हणजे नक्की काय हा यक्षप्रश्न सतत छळत आहे. आपल्या वेदपरंपरेने तर भौतिक आनंद आणि आध्यात्मिक आनंद असे दोन प्रकार पाडून भौतिक आनंदाला ‘सुखा’च्या नजरेतून पाहिले. हे नश्वर सुख उपभोगण्याची अमर्याद हाव मनुष्याला दुःखाच्या फेऱ्यात कशाप्रकारे अडकवू शकते यावर आपल्या दार्शनिकांनी सखोल चिंतन केले. तैत्तिरीयोपनिषदाच्या आठव्या अध्यायात नश्वर असलेल्या मानवी आनंदापासून शाश्वत अशा ब्रह्मानंदापर्यंत आनंदाच्या अकरा अवस्था वर्णन केलेल्या आहेत. तरीही या तत्त्वज्ञानाच्या जंजाळातून आनंदरूपी जगाची खरी व्याख्या देतो तो गरूड पुराणातील एक श्लोक,

सर्वेषां मंगलं भूयात् सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भागभवेत्।।

जगातील सर्व प्राणीमात्रांचे मंगल होवो. सर्व निरामय जीवनाचा उपभोग घेवोत. सर्वांना सर्वदा मंगलाचे दर्शन घडो असे वैश्विक पसायदान मागणारा शास्त्रकारांचा हा आशावाद! ‘घोटभर पाणी, घासभर चारा, मायेचा उबारा मिळो सर्वां’ ही कल्पना जर वास्तवात आली तर पूर्ण जग नंदनवन बनून जाईल. याच विश्वानंदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारावे म्हणून हा दिवस पाळला जाऊ लागला. त्यानंतर वॉशिंग्टनच्या गॅलप कंपनीद्वारे जगातील 149 राष्ट्रांतील आनंदी जीवनाचे सर्वेक्षण केले जाऊ लागले. त्यासाठी त्या त्या राष्ट्राच्या ‘जीडीपी’ची पातळी, निरोगी आरोग्य व्यवस्था, सामाजिक सहकार्य, नागरिकांमधील परोपकाराची भूमिका, भ्रष्टाचाराचा अभाव आणि मनोवांच्छित गोष्टीच्या निवडीचे स्वातंत्र्य असे अनेक निकष ग्राह्य धरले जाऊ लागले. यामध्ये या निकषांच्या अनुषंगाने एखाद्या राष्ट्राला ‘आनंदी राष्ट्र’ ठरवताना दहा पैकी गुण दिले जातात. अलीकडील 2021 च्या जागतिक आनंदाच्या अहवालानुसार फिनलँड हा जगातील सर्वात जास्त आनंदी देश आहे. (दहा पैकी 7.842 गुणांनी) या देशाच्या नागरिकांतील सहिष्णुता आणि परस्परविश्वास त्यांना या आनंद उपभोगण्याच्या पातळीपर्यंत नेण्यास कारणीभूत ठरलेला आहे हे विशेष! फिनलँडनंतर डेनमार्क, स्विट्जरलँड, आइसलँड, नेदरलँड, नॉर्वे अशी उत्तर युरोपियन राष्ट्रे या यादीत येतात. 


हेही वाचा : शांततेचा घंटानाद - मॅक्सवेल लोपीस


आपल्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहयोग संघटनेतील राष्ट्रांबाबत बोलायचे तर नेपाळ (5.268  गुण), मालदीव (5.198 गुण), बांगलादेश (5.025 गुण), पाकिस्तान (4.934 गुण), श्रीलंका (4.325 गुण) भारत (3.819 गुण), अफगाणिस्तान (2.523 गुण) ही राष्ट्रे अनुक्रमे 87, 89, 101, 105, 129, 139, 149 अशा क्रमांकावर आहेत. यात सर्वात चिंतेची बाब म्हणजे अफगाणिस्तान हे जगातील सर्वात कमी आनंदी असलेले राष्ट्र गणले गेलेले आहे. आणि त्यावर लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हा अहवाल तेथील तालिबानी सत्तेच्या पुर्नस्थापनेपूर्वीचा आहे. तालिबानींच्या स्थापनेनंतर 2022 चा अहवाल तिथली बिकट परिस्थिती कशाप्रकारे दर्शवेल हे न सांगताही समजू शकते! तसेच 76 व्या क्रमांकावर असलेले रशिया (5.477 गुण) आणि 110 व्या क्रमांकावरील युक्रेन (4.875 गुण) आता आनंदप्राप्तीत कुठवरचा निचांक गाठतील हे देखील येणारा काळच ठरवेल! 

या सर्व राष्ट्रांमध्ये जगातील एक आनंदी राष्ट्र म्हणून गणल्या जाणाऱ्या भूटान या आपल्या शेजारी राष्ट्रात 2020 मध्ये काही तांत्रिक कारणांमुळे गॅलप पोल घेतले गेले नाही. त्यामुळे या यादीत भूटान हे नाव नसले तरीही अहवाल बनवणाऱ्यांनी या राष्ट्रातील एकूण परिस्थिती विचारात घेऊन अतिशय सकारात्मक असे मत मांडले- ‘आनंद आणि आरोग्य यांची योग्य हातमिळवणी कशी होते त्याचा आदर्श या राष्ट्राने अजून एकदा दिला. ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ या तत्त्वाचा स्पष्टपणे उपयोग करून साऱ्या नागरिकांना कोविड-19 विरूद्धच्या लढ्यात सामील केले आणि 2020 मध्ये या राष्ट्राने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची सतत ये-जा असूनही मृत्यूदर शून्यावरच अडवून ठेवला.’

1970 साली भूटान या राष्ट्रानेच आनंदशोधनाचा प्रयोग देशपातळीवर करण्याची अभिनव संकल्पना ग्रॉस नॅशनल हॅपीनेस या प्रणालीद्वारे मांडली होती. याच प्रणालीला अधोरेखित करत संयुक्त राष्ट्रसंघाच्या 66 व्या अधिवेशनात सचिव बॅन की मुन यांनी ध्वनीत केले, ‘या जगाला एका नवीन आर्थिक तत्त्वप्रणालीची गरज आहे, जिच्यामध्ये शाश्वत विकासाच्या तीन स्तंभांचा अंतर्भाव होतो. सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणाचा विकास अशा या तीनही गोष्टी अभिन्न आहेत, आणि त्यांचे त्रैक्यच दर्शवून देते- ‘स्थूल वैश्विक आनंद’.

आनंदाच्या या शोधवाटेवर सारे जगच आज एक पथिक बनून उभे असताना चिरंतन आनंदाच्या तत्त्वज्ञानाचा वारसा लाभलेल्या आपणा भारतीयांचे कर्तव्य काय आहे? पाकिस्तान आणि बांगलादेशापेक्षाही आपला देश आज जास्त दुःखात आहोत हा गॅलप पोलचा निष्कर्ष स्वीकारणे कित्येकांना कठीण जाईल. त्यांच्या मतानुसार गॅलप पोलच्या सर्वेक्षणात काही त्रुटीही असू शकतील ज्यांच्यामुळे आज आपण कागदोपत्री आनंदापासून दूर असू. परंतु वास्तवात आपला देश आज त्या आनंदाचा अनुभव घेतो आहे का? जीडीपीची उंचावलेली पातळी, निरोगी आरोग्य व्यवस्था, सामाजिक सहकार्य, नागरिकांमधील परोपकाराची भूमिका, भ्रष्टाचाराचा अभाव आणि मनोवांच्छित गोष्टीच्या निवडीचे स्वातंत्र्य अशा निकषांत आपला देश सक्षम ठरला आहे की नाही? फिनलँडप्रमाणे आपल्याकडे समूहबांधणी आज दिसून येते का? अथवा भूटानप्रमाणे आनंद आणि आरोग्याची किल्ली प्रत्येक नागरिकाला गवसलेली आहे का? जर या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर मग आता वेदपरंपरेतील शाश्वत आनंदाचा शोध आपण सुरू करायला हरकत नसावी! परंतु त्या प्रश्नांची उत्तरे जर ‘नाही’ अशी असतील तर मग आपल्या देशातील प्रत्येक नागरिक जीवनाच्या मूलभूत आनंदाला मुकलेला आहे हे कटू वास्तव आपल्याला मान्य करावे लागेल आणि त्या आनंदाचा प्रथमतः शोध घेणे हीच प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक आणि राष्ट्रीय जबाबदारी ठरेल. 

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com

(लेखक नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)

Tags: Ban Ki-moon dystopia utopia UN conference Load More Tags

Add Comment