निवडणुकीचे लोकमानसावरील प्रतिबिंब

लोकांचे लक्ष त्यांच्या प्रश्नांवरून अन्यत्र वळवण्यासाठीच ईश्वरांचे प्रश्न हाती घेतले जातात हे या निवडणुकीने साऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

निवडणुकीच्या काळात प्रादेशिक पक्षांनी जनतेचा प्रवाह ओळखलेला दिसला. निवडणुकीपूर्वी किंवा नंतर स्थानिक पक्षांना राष्ट्रीय पक्षांजवळ जावे लागेल ही भाषा प्रथम पवारांनी बोलून दाखवली. आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांचा दिल्लीकडे होणारा प्रवास याच संदर्भात पाहायचा आहे. ‘आम्ही मोदीविरोधी पक्षाला त्याचे सरकार आले तरी बाहेर देऊन पाठिंबा देऊ’ ही ममता बॅनर्जींची भाषाही याच संदर्भात पाहण्यासारखी आहे. 

आताची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून तिच्या निकालापर्यंत आपण ती पाहिली. दरम्यानच्या काळात लक्षात आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी अशा होत्या, 

1. ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतली होती. तीत उमेदवार, नेते व पक्ष महत्त्वाचे राहिले नव्हते. जनतेचे प्रश्न व मूल्यांविषयीची जनतेची धारणाच महत्त्वाची झाली होती. मतदारांचा वर्ग प्रथम मूक होता पण पुढल्या काळात तो कमालीच्या अभिनिवेशानिशी बोलताना दिसू लागला. 

2. जनतेला दिसलेली या निवडणुकीतील एक बाजू अहंतेची तर दुसरी विनम्रतेची होती. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे इतर नेते अंगावर धर्मगुरुचा पोशाख चढवल्यासारखे लोकांना आज्ञार्थक स्वरुपाचे उपदेश करताना वा निर्देश देताना दिसले. तर दुसरी बाजू ‘आम्ही तुमचे प्रश्न समजून घ्यायला आलो आहोत आणि त्यासाठी देशभर फिरत आहोत’ हे सांगणारी व दर्शविणारीही होती. राहुल गांधींची पदयात्रा, पूर्व-पश्चिम प्रवास आणि त्या साऱ्यात त्यांनी जनतेशी साधलेला संवाद महत्त्वाचा आणि परिणामकारकही होता. काँग्रेस पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत झालेली वाढही या निवडणुकीच्या निकालात स्पष्ट झाली. भाजपची घसरलेली टक्केवारीही या संदर्भात पाहण्याजोगी आहे. 

3. निवडणुकीतील एक बाजू धर्म, देव, मंदिर, मशीद, मंगळसूत्र आणि म्हैस यांसारख्या प्रश्नांवर बोलताना दिसली. माणसांचे सारे प्रश्न जणू सुटले आहेत आणि आता आपल्याला मानवेतरांचेच प्रश्न सोडवायचे आहेत असे चित्र त्या बाजूने उभे केले. तर दुसरी बाजू महागाई, बेरोजगारी, संविधानाचे संरक्षण, ‘अग्निवीर’सारख्या योजना, महिलांना करावयाची आर्थिक मदत यांसारख्या प्रश्नांवर बोलताना दिसली. 

4. मोदींच्या भाषणात अरेरावी तर राहुलची भाषणे आर्जवी होती. मोदींची भाषणे त्याचमुळे प्रवचनाच्या उपदेशासारखी तर राहुलची भाषणे ‘मी तुमचे प्रश्न समजून घेऊ इच्छितो’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यासारखी होती. शिवाय यात प्रियंकाच्या भाषणांची अधिकची भावनात्मक भर पडलेलीही दिसली. 

5. देशाचा पंतप्रधान समुद्राच्या तळाशी, हिमालयाच्या पायथ्याशी किंवा कन्याकुमारीतील विवेकानंदांच्या खडकावर एकाकी उभे राहून आणि त्याचवेळी तीन हजार सैनिकांचा गराडा सुरक्षेसाठी सोबत ठेवून ध्यानधारणा करतानाही देशाने प्रथमच पाहिला. अशा आराधनेची गरज ज्यांना वाटली नाही त्यांना ईश्वराचा आशीर्वाद नको असतो की माणसांचाच आशीर्वाद पुरेसा वाटत असतो, याचाही विचार अशावेळी मनात येतो. 

6. अनेक जाहीर सभांमधून भाजपचे उमेदवार पातळी सोडून व कमालीची अज्ञानमूलक भाषणे करताना दिसले. विरोधकांपैकी एकाही नेत्याने तशी पातळी सोडल्याचे या काळात दिसले नाही. 

7. प्रस्थापित माध्यमे विकली गेली होती. त्यात वर्तमानपत्रांचा, दूरदर्शनवरील वाहिन्यांचा आणि प्रचारकांचा वाटा मोठा आणि सारखा होता. याउलट सामाजिक माध्यमे या काळात अधिक विश्वसनीय बनलेली दिसली. त्यांच्याकडे श्रोत्यांचा आणि वाचकांचा ओढाही वाढलेला दिसला. या ठिकाणी दोन उदाहरणे सांगण्याजोगी आहेत. एकेकाळी अमेरिकेत निक्सन या अध्यक्षाला त्याच्या पदाचा राजीनामा द्यायला ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने भाग पाडले होते. तर अलिकडे तेथील माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले आहे. हा प्रकार भारतातही झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसमूहाचे मालक रामनाथ गोएंका हे म्हणायचे, “आमच्या वृत्तसंस्थेने या देशातली तीन सरकारे खाली खेचली आहेत. पहिले - 1977 मध्ये - इंदिरा गांधींचे, दुसरे - 1979 मध्ये - जनता पक्षाचे आणि पुढे राजीव गांधींचे.” ही परिणामकारकता आणि विश्वसनीयता भारतीय माध्यमांनी आता गमावलेली दिसली.

8. जनतेच्या जवळ जाणारे पक्ष कोणते आणि तिच्यासकट आपल्या जवळच्या संघटनांनाही दूर ठेवणारे पक्ष कोणते ते यावेळी देशाला दिसले. काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांसारखे आणि ‘द्रमुक’ व ‘तृणमूल’सारखे पक्ष जवळ आणलेले दिसले तर भाजपने ‘अकाली दला’कडे दुर्लक्ष केले पण त्याहून महत्त्वाची बाब, त्याने आपल्यावरील संघाचे पितृत्वही जाहीरपणे झुगारून दिलेले दिसले.

9. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैगुण्य हे की, तीत आंतरराष्ट्रीय प्रश्नांची, शेजारी देशांची किंवा त्यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या वा दुराव्याच्या संबंधांची चर्चा कोणताही पक्ष करताना दिसला नाही. देशाच्या सीमेवरील सारे देश दुरावले असताना त्याविषयी केंद्र सरकारात जाऊ इच्छिणाऱ्या नेत्यांनी निवडणूक काळात काहीएक न बोलणे ही बाब गंभीर मानावी अशी आहे. 

10. याच काळात प्रादेशिक पक्षांनी जनतेचा प्रवाह ओळखलेला दिसला. निवडणुकीपूर्वी किंवा नंतर स्थानिक पक्षांना राष्ट्रीय पक्षांजवळ जावे लागेल ही भाषा प्रथम पवारांनी बोलून दाखवली. आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांचा दिल्लीकडे होणारा प्रवास याच संदर्भात पाहायचा आहे. ‘आम्ही मोदीविरोधी पक्षाला त्याचे सरकार आले तरी बाहेर देऊन पाठिंबा देऊ’ ही ममता बॅनर्जींची भाषाही याच संदर्भात पाहण्यासारखी आहे. 

11. आताची निवडणूक पूर्वीसारखी एकतर्फी झाली नाही. तरीही तीत संघ भाजपच्या बाजूने उतरल्याचे दिसले नाही. काँग्रेस पक्ष मात्र साऱ्या ताकदीनिशी आणि मित्रपक्षांच्या सोबतीने हिरीरीने तीत उतरलेला दिसला. 

12. लोकशाही हे लोकांचे राज्य आहे. त्यात लोकांचे प्रश्न महत्त्वाचे असतात. ती ‘ईश्वरशाही’ नाही. लोकांचे लक्ष त्यांच्या प्रश्नांवरून अन्यत्र वळवण्यासाठीच ईश्वरांचे प्रश्न हाती घेतले जातात हेही या निवडणुकीने साऱ्यांच्या लक्षात आणून दिले. 

-  सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक आहेत.)


हेही वाचा : 

 

Tags: loksabha suresh dwadashiwar election narendra modi bjp rahul gandhi INDIA Load More Tags

Comments:

Anil Farakate

द्वादशीवार सरांचा हा लेख नेहमीप्रमाणे सुबोध तर आहेच, शिवाय त्यातील precision महत्त्वाचे आहे. मोदींच्या भक्तांच्या डोक्यातून मोदींची हवा अजून गेलेली नाही. त्यांचा विघातक उपद्रव मात्र चालूच राहील, असे वाटते. सरांनी चांगली चर्चा घडवून आणली आहे. --अनिल फराकटे, गारगोटी

Yogesh Vasantrao Bhose

I am big admirer of Mr. Dwadashiwar. He pens the right thing, in right way and in the right and simple words.

Anup Priolkar

Perfect analysis of both the side of election strategy.

Anil Khandekar

श्री . सुरेश द्वादशीवार यांचा लेख थोडक्यात पण महत्त्वाचे मुद्दे मांडतो . साधी सोपी भाषा , मार्मिक , नेमकं भाष्य . धन्यवाद.

Add Comment