श्रद्धा आणि चार्वाक

चार्वाक लेखमालेचा भाग - 14

फार वर्षांपूर्वी डॉ. जयंत नारळीकर या खगोलशास्त्रीय विद्वानाची दोन भाषणे प्रस्तुत लेखकाच्या अध्यक्षतेखाली नागपुरात झाली. आपल्या भाषणात सारे खगोलशास्त्रीय ज्ञान त्यांनी उलगडून दाखवले. ते तिथे जमलेल्या हजारांहून अधिक श्रोत्यांपैकी किती लोकांच्या पचनी पडले असेल ते सांगता येत नाही. प्रत्यक्ष प्रस्तुत लेखकालाही त्यांतले काही अंश उलगडले नाहीत. त्या वेळी प्रस्तुत लेखक विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष व लोकसत्ताचा संपादक होता. आपला अध्यक्षीय समारोप करताना नारळीकरांचे मनःपूर्वक आभार मानून तो म्हणाला, ‘डॉक्टरसाहेब तुमचे सारेच सांगणे माझ्यासकट अनेकांना समजले असेलच असे नाही. अमुक तारा तमुक ताऱ्यापासून पाच हजार प्रकाशवर्षे दूर आहे असे तुम्ही सांगितले. ते अंतर तीन हजार वर्षांचे आहे असे जरी तुम्ही म्हटले असते तरी त्यामुळे आम्हाला त्यातला काही फरक जाणवला नसता… मात्र तुमच्या भाषणाने माझ्यावर व सर्व श्रोत्यांवर ठसवलेली बाब आहे ती तुमच्या विनम्रपणाची. आपला ज्ञानाधिकार बाजूला सारून तुम्ही एखाद्या प्राथमिक शिक्षकासारखे आम्हाला ते आकाशाचे व अंतरिक्षाचे ज्ञान समजून देण्याचा प्रयत्न केला. आमची क्षमता कमी असली तर दोष आमचा आहे. तुम्ही विज्ञानाच्या व संशोधनाच्या क्षेत्रातले शास्त्राभ्यासक आहात. आपले आजचे संशोधन उद्याच्या नव्या संशोधनाने चुकीचे वा अपुरे ठरू शकेल याची जाणीव असल्याने तुम्ही कोणतेही अंतिम सत्य सांगत नाहीत व सांगितले नाही. उलट हे आजचे संशोधन आहे हे नम्रपणे सांगितले. त्याच वेळी उद्या यात काही नवे घडू शकेल हेही सांगितले... आम्ही वृत्तपत्राच्या व साहित्याच्या क्षेत्रातील माणसे थोडेसे धर्मशास्त्रही वाचतो… मात्र आम्ही आमचे प्रत्येकच वाक्य, ते अंतिम सत्य असल्याच्या आविर्भावात उच्चारतो. विज्ञान विनम्र असते, अर्धज्ञान अभिमान व आविर्भाव शिकवते. आम्ही अंतिम सत्याचे धनी असल्याचे स्वतःला समजतो. तसे तुम्ही मानत नाही हे तुमचे मोठेपण आणि आमचे अर्धवटपण. त्यावर प्रचंड हशा पिकला व नारळीकरही त्यात सामील झाले.

धर्मग्रंथ असेच ‘अंतिम सत्य’ सांगतात. त्यात काही चूक असेल वा अपुरे असेल असे त्यांच्या कर्त्यांना वाटत नाही. आपले सांगणे हे प्रत्यक्ष ईश्वराचे सांगणे हे त्यांना ठामपणे वाटत असते... त्यामुळे पुरोहित, पुजारी, धर्मगुरू वगैरे मंडळी नेहमी संपूर्ण अंतिम सत्याची भाषा बेधडकपणे बोलत असते. याउलट शास्त्रज्ञांना त्यांचे आजचे सत्यच तेवढेच सांगता येत असल्याने ते नम्रपणा धारण करतात. ज्ञान नम्र तर अज्ञान वा श्रद्धा नेहमीच अहंकारी असतात. 

ज्ञानविज्ञानाचा फारसा विस्तार झाला नसलेल्या प्राचीन काळात लिहिले गेलेले धर्मग्रंथ थेट भविष्याची भाषा बोलतात. जगाचा आरंभ व त्याचा विनाशही सांगतात. माणसांच्या आयुष्याची गती त्याच्या आरंभ व शेवटापर्यंत सांगतात. त्यांचे सांगणे अखेरचे असते व त्यांचा प्रतिवाद करणे हे पाखंड  ठरते. ज्ञान आणि श्रद्धा यांतला हा फरक आहे. बायबलच्या मते हे जग नऊ हजार वर्षांपूर्वी जन्माला आले. ज्यूची आणि इस्लामची मूळ श्रद्धाही हीच आहे. वैदिकांच्या मते या जगाची उत्पत्ती पुरुष सूक्तातील कवितासदृश वर्णनानुसार झाली आहे. 

विज्ञानाच्या मते विश्वाच्या उत्पत्तीचे कारण व स्थिती अजूनही संशोधनाच्या क्षेत्रात आहे. त्यांच्या बिग बँगचा याबाबतचा प्रयोग फसला. तरीही फ्रान्समध्ये, इटलीत व स्वित्झर्लंडमध्ये जमिनीच्या खोलवर सव्वीस मैल लांबीची गोलाकार वेधशाळा बांधून तेथील हजारो वैज्ञानिकांनी त्यांचे संशोधन चालू ठेवले आहे. अंतिम सत्याचा दावा ते करत नाहीत. धर्मग्रंथ मात्र अंतिम सत्याखेरीज दुसरे काही सांगत नाहीत. 

वास्तव हे की, धर्माचे ज्ञान ग्रंथातून, ग्रंथकर्त्याच्या शब्दातून येते. त्यालाच ते घेणाऱ्याच्या प्रत्यक्ष अनुभवाची जोड असतेच असे नाही. अनुभव ही न संपणारी जगासोबत असणारी व दिसणारी बाब आहे. नारळीकर त्याचमुळे त्याविषयीचे अखेरचे सत्य सांगत नाहीत. तसा कोणताही विज्ञानाचा अधिकारी व विद्यार्थी ते सांगणार नाही. ज्ञान हा ऐकण्याचा व वाचण्याचा विषय नाही. तो अनुभूतीचा विषय आहे आणि अनुभूतीवर आधारलेले ज्ञान हा धर्माचा नसून चार्वाकांचा विषय आहे. तो न संपणारा आहे व जोपर्यंत या पृथ्वीतलावर जीव आहे तोवर त्यांची साथ करणारा व त्यांना दिशा दाखवणारा आहे. 

मन आणि मेंदू यांच्यातील यांविषयीचा वाद जोपर्यंत हे दोन्ही स्रोत अस्तित्वात आहेत तोवर राहील. पास्कलचे एक प्रसिद्ध वचनही इथे नोंदवण्याजोगे आहे. तो म्हणाला, 'मनाचे प्रश्न मेंदूला कळत नाहीत.' त्याच तालावर श्रद्धेचे पुढे विज्ञान व ज्ञान यांनाही उलगडता येत नाही असे म्हणावे लागेल. न संपणाऱ्या या वादाला शेवट असणारे तो काही विज्ञाननिष्ठ लेखकांनी भविष्याच्या भाषेत वर्तवला आहे. विल्यम ब्लेक म्हणाला, 'धर्माचे जग संपत आहे आणि ज्ञानाचे जग अवतरत आहे.' ब्लेक हा संशोधक वा शास्त्रज्ञ नाही. तो विज्ञाननिष्ठ पण प्रतिभाशाली लेखक व कवी आहे. सबब त्याला दिशा दाखवता येते. ही दिशा समाज स्वीकारीलच असे मात्र ठासून सांगता येत नाही. 

धर्माचे ज्ञान हे ग्रंथांतून वा गुरूच्या वचनातून येणारे म्हणजे द्वारे येणारे आहे. याउलट अनुभव प्रत्यक्ष व खरा आहे. तो ज्याचा त्याला घेता येणारा आहे. या अनुभवात श्रद्धा वितळणाऱ्या आहेत, ईश्वर, धर्म व त्यांनी निर्माण केलेल्या परंपराही अस्तंगत होणार आहेत. माणूस जसजसा स्वतंत्र होईल व स्वतःचा अनुभव विचारपूर्वक स्वीकारू लागेल तसतसे हे लवकर होईल… मात्र त्याच वेळी श्रद्धेच्या बाजूने उभे होणारे जमाव व त्याच्या संघटनांनी शक्तिशाली होतील. या संघर्षाचा अंत दिसत नाही… परिणामी सत्यशोधकाला यातली आपली बाजू आपल्या अनुभवजन्य शहाणपणातूनच निवडावी लागेल. 

ही बाजू चार्वाकांची आहे व ती दिवसेंदिवस बळकट होत जाणारी असे. आजच्या जगात ख्रिश्चन धर्म सर्वात मोठा (अडीच कोटी लोकांचा) आहे. त्याखालोखाल इस्लामचा स्वीकार दीड कोटी लोकांनी केलेला आहे. त्यानंतरचा क्रमांक सेक्युलरांचा आहे. त्यांची संख्या एक कोटी पंधरा लाखांहून अधिक आहे. ती हिंदूंच्या व बौद्धांच्या अनुयायांहून मोठी आहे. जगाच्या वाटचालीची दिशा दाखवणारे हे आकडे आहेत. सबब नाकारता येतात, वास्तव नाकारता येत नाही. ते नाकारण्याचा प्रयत्न करणारे असत्याग्रहीच केवळ असू शकतील. 

एक गोष्ट आणखीही लक्षात घ्यायची. सत्य, ज्ञान, मेंदू, विज्ञान, संशोधन व शास्त्रे यांच्या बाजूने जाणारी माणसे श्रद्धाशील नसली तरी ती कोरडीही असणार नाहीत. ती भावनाशील असतील. वात्सल्य, स्नेह, मैत्री, प्रेम, सहवासासारखे आकर्षण या गोष्टी त्यांच्यातही असते. सत्याचा वा प्रत्यक्षाचा अनुभव ज्ञान देतो… मात्र ते देताना तो माणसांच्या भावना वा माणूसपण हिरावून घेत नाही. ईश्वर वा धर्म न मानणारी, स्वतःला सेक्युलर समजणारी अशी अनेक थोर माणसे जगाने पाहिली आहेत. त्यांच्यातले प्रेमळपण व माणुसकी त्याने अनुभवली आहे… त्यामुळे धर्म व ईश्वर न मानणारे जग हे केवळ दगडविटांचे वा झाडांचे आहे असे समजणार नाहीत. ते अज्ञानी व अंधश्रद्ध माणसांचेही असणार नाही. ज्ञानाने ज्यांचे डोळे, मन व बुद्धी पूर्णपणे स्वतंत्र, स्वयंपूर्ण आणि सारे काही पाहून समजू शकणारी केली आहे… तेच जगाच्या, सत्याच्या व अनुभवाच्या जवळ असणाऱ्या राहतील. 

विल्यम ब्लेक ईश्वर व धर्म अमान्य करणारा होता… पण दया, क्षमा, सेवा यांसारखे सद्‌गुण जाणणारा व ते ज्यांच्यात आहे त्या शुभशक्तींना व स्त्री-पुरुषांना मानणारा होता. त्यांचा तो आदर करत होता. शुभ, मंगल, पवित्र आणि माणुसकी यांसह सगळ्या चांगल्या गोष्टींना बळ देणाऱ्या बाबी नव्या जगातही राहतील. त्यांना धर्माच्या व ईश्वराच्या प्रमाणपत्राची गरज राहणार नाही. सारे शुभ व सगळे मंगल हे स्वयंपूर्णच असेल. अशा जगात ज्ञान असेल… पण त्याचा अहंकार नसेल. शस्त्रे असतील पण त्यांच्या उत्पाताची जाणीव असल्याने शांततेची आराधना मोठी असेल. 

समाज असतील व त्यात वर्ग आणि गट असतील… पण त्यांच्या झुंडी नसतील. व्यक्ती स्वयंपूर्ण असली तर ती तिचे निर्णय स्वतः घेईल. ते पक्षांवर, समूहांवर वा नेत्यांवर ती सोपवणार नाही. नेतेही जमिनीवर राहतील आणि खऱ्या लोकशक्तीचा विकास होऊन लोकशाही अधिक व्यापक व सर्वसमावेशक होईल. झुंडी व जमाव नसले तर युद्धे व हाणामाऱ्या नसतील.  ज्ञानी माणसे त्यांचे वाद विचारांनी निकालात काढतील. श्रद्धांच्या पाट्या घेऊन ते रस्त्यावर येणार नाहीत. एका चांगल्या व उद्याच्या समाजाची ही पायाभरणी असेल.

तशीही महायुद्धे आता इतिहासजमा झाली आहेत. धर्मांची युद्धे संपली आहेत. सत्तेच्या लढाया निवडणुकांत परिवर्तीत झाल्या आहेत. जातिधर्मांचे वेगळेपण कायम असले तरी त्यांच्यातील तेढ कमी होऊन ती सौम्य झाली आहे. जग लहान झाले ते गतिमान साधनांच्या साहाय्याने झाले असे म्हणतात… मात्र जग लहान होण्याचे वा होत जाण्याचे खरे कारण माणूस मोठा होत जाणे हे आहे. हे बदल माणसांना परस्परांच्या जवळ आणणारेही असतील. धर्म, जात व वेगळे ईश्वर यांतून निर्माण होणारे दुरावे, अविश्वास व वैर या गोष्टी त्यात संपल्या असतील. माणसांतील तेढ लढाया घडवत नाही. फार तर ती भांडणापर्यंत जाईल. 

साऱ्यांचे इष्टसाध्य एकाच सुखसमाधानाचे असेल तर त्यांच्यात आत्मीयता व स्नेहभावही असेल. ईश्वरांनी माणसे जोडली नाहीत. धर्मांनीही त्यांचे जप करून त्यांना एकमेकांविरुद्ध लढायला लावले. विज्ञानात व खगोलशास्त्रात दूरदूरचे ग्रह व तारे परस्परांना लांबच्या संबंधांनी बांधून कसे ठेवतात व परस्परांवर न आदळता आपल्या शिस्तीत कशी वाटचाल करतात तसे समाजाचे उद्याचे स्वरूप राहील. दुरावा राहील… पण वैर जाईल. आजच्या समाजातल्या दुराव्यांना वैराची जोड आहे. ती संपेल. एकूण काय… नारळीकर म्हणाले तसे जगाचे चांगले चालले आहे. माणसांनाच त्याच्या पातळीवर पोहोचायचे आहे.

विल्यम ब्लेकही याहून वेगळे काही सांगत नाही… डार्क डेज ऑफ रिलिजन… जातील असे जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याला धर्मातील काळी व अनिष्ट बाजू जाईल असेच म्हणायचे असते. धर्मातल्या चांगल्या बाबी शिस्त, नीती, माणुसकी, जिव्हाळा, आदर, वात्सल्य हे सारे राहील. त्यांतील युद्धे संपतील, वैर आणि दुरावा जाईल, द्वेष आणि तिरस्कार संपेल असेच तोही म्हणतो. 

धर्मातील चांगल्या गोष्टी आणि विज्ञानाने उघड केलेली सत्ये माणसांचे जीवन अधिक सुखी व आनंदाने भरलेले करील. ब्लेक नास्तिक नाही… पण आजच्या धर्माने उद्याच्या प्रगतीचे मार्ग रोखून धरले आहेत असे तो म्हणतो. तो अडसर जाऊन जीवनाचा मार्ग अधिक प्रशस्त व खुला होईल. तसे झाले तर जुन्यानव्यातील फरक संपेल व कदाचित विज्ञान आणि धर्म यांची दृष्टीही एक होईल. ब्लेकचा आशावाद प्रत्यक्षात साकारायला वेळ लागेल… पण ती पहाट आता दूर मात्र नाही.

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: लेखमाला चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर श्रद्धा Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Belief Part 14 Load More Tags

Add Comment