खोटेपणाबद्दल पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा सत्याचे परिणाम भोगणं अधिक चांगलं

वरदान रागाचे - भाग 11 

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 11 वा लेख.  
- संपादक

माझे आजोबा हे किती विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे हे मला हळूहळू कळत होतं. संपूर्ण प्रामाणिकपणापासून तसूभरही न ढळता सगळे मोह दूर सारत ते किती परिपूर्ण माणूस झाले आहेत हे माझ्या लक्षात येत होतं. मानवी स्वभावातला एक दोष या दृष्टीनं आजोबा खोटेपणाकडे पाहायचे. त्यांच्या तरुणपणी त्यांनीही काही प्रसंगांत फसवाफसवीचा आधार घेतला होता. कदाचित म्हणूनच माझी अंड्याची गोष्ट ऐकून ते मला माफ करू शकले.

अनेक तरुण मुलांना जो मोह टाळता येत नाही... त्याला वयाच्या अकराव्या वर्षी बापूजीही बळी पडले होतेच. नको म्हटलंय त्याकडेच अनिवार्यपणे जाण्याचा हा मोह! त्यांच्यासाठी हा मोह होता मांसाहाराचा नि सिगरेट्‌सचा. झोकात सिगरेट ओढत, मग धुराची वलयं सोडत, त्यांकडं बेफिकिरीनं पाहत राहणारी माणसं त्यांना आकर्षक वाटायची. सिगरेट्‌सची थोटकं जमा करून त्यांनी पहिला झुरका घेऊन पाहिला होता. तसं करून पाहिल्यावर आता त्यांना खरीखुरी भारतीय सिगरेट हवी होती. सिगरेट्‌सचं पाकीट आणण्यासाठी त्यांनी घरातून थोडेथोडे पैसे कुणाच्याही नकळत उचलायला सुरुवात केली. मात्र सिगरेट्‌सची तल्लफ जशी कधीतरी चढली तशीच नाहीशीही झाली. धूम्रपान आरोग्यासाठी किती घातक आहे हे इतरांनी कुणी सांगण्याऐवजी त्यांनीच जाहीर केलं, ‘सिगरेट ओढणं हे अतिशय अमानुष, वाईट आणि धोकादायक आहे.’ त्यांना रेल्वेचा प्रवास अजिबात आवडायचा नाही... कारण तिथं लोक सिगरेट ओढायचे. त्या वासानं ठसका लागतो, श्वास घेता येत नाही असं बापूजी म्हणायचे.

मांसाहार करणं हा बापूजींनी योजलेल्या डावपेचांचा भाग होता, पळवाट म्हटलं तरी चालेल. मात्र ही पळवाट एका चांगल्या उद्देशानं त्यांनी स्वीकारली होती. ती पळवाट आहे याचं भान त्या लहान वयात त्यांना असणं शक्य नव्हतं. गोष्ट बापूजींच्या लहानपणची आहे. ते लहानपणीही अशक्त, बारीक होते... पण मनात मात्र भारताच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेनं उधाण भरलेलं होतं... त्यामुळं प्रत्यक्ष दिसणाऱ्या शरीरापेक्षा आपण ताकदवान नि शूर आहोत असं मनातून वाटलं तरी खऱ्या अर्थानंच बलवान नि अंगापिंडानं मजबूत दिसणाऱ्या ब्रिटिशांशी आपण मुकाबला कसा करणार या प्रश्नानं त्यांना त्रास व्हायचा. बालपणी नर्सरी ऱ्हाइम्स म्हणून जी गाणी कानांवर यायची... त्यांतही ब्रिटिश मांस खातात म्हणून ताकदवान असतात, हिंदू त्यांचा कधीच मुकाबला करू शकत नाहीत अशी काहीशी ओळ होती. बापूजींचा त्या वेळचा जो खास मित्र होता... तो मुसलमान होता. त्यानंही सांगितलं होतं, ‘‘जर तुला ब्रिटिशांसारखं मजबूत नि आडमाप व्हायचं असेल नि त्यांना भारताबाहेर हुसकून लावायचं असेल तर तू मांसाहार करायलाच हवास.’’ तो मित्रही लहानच होता... पण तरी त्याला त्याचं-त्याचं मत होतं.

झालं! त्याचं ऐकून बापूजींनी कुणाच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीनं मांसाहार करायला सुरुवात केली. आता कोणत्याही परिस्थितीत शरीर मजबूत करायचं होतं. पालकांना फसवून हा कार्यक्रम पार पाडणं हे फारच गुंतागुंतीचं प्रकरण होतं. बापूजींनी नि त्यांच्या मित्रानं पहिल्यांदा मांस चाखण्यासाठीची जागाही नदीकिनाऱ्याच्या एका निर्जन भागात ठरवली होती. त्यांना ती चव अजिबात आवडली नाही. रात्री खूप वाईट स्वप्नंही पडली. तरी केलेला निश्चय असाच जाऊ द्यायचा नव्हता. जवळपास वर्षभर त्या मित्रानं बकरीचं आणि अन्य प्रकारचं मांस नियमितपणानं पण गुपचूप आजोबांना खाऊ घातलं. त्यांनीही पूर्ण गुप्तता राखत मांसाहार केला. एका खोट्यानंतर दुसरं खोटं. साखळी होत गेली. अशाच एका गुप्त जेवणानंतर बापूजी घरी आले तेव्हा आईनं जेवायचा आग्रह केला. त्यांनी पोटात दुखायचं सोंग घेतलं नि जेवण टाळलं. एकदा तर आपल्या भावाची सोन्याची एक चीज त्यांनी त्याच्या नकळत चोरली... जादा मांसाहाराचे पैसे चुकते करण्यासाठी.

या सगळ्या लपवाछपवीमुळं बापूजींना वाईट वाटत होतं... शिवाय सलग इतका काळ मांसाहार करून ते अपेक्षेप्रमाणे अंगापिंडानं सुधारलेही नव्हते. त्यातून लक्षात आलं की, संतुलित शाकाहारातून मिळणारं पोषण आणि ताकद ही मांसाहारातून मिळणाऱ्या ताकदीपेक्षा वेगळी नसते! त्यानंतर बापूजींनी मांसाहार सोडायचा निर्णय घेतला आणि आईवडलांशी खोटेपणाही थांबवायचा ठरवलं.

खोटेपणा थांबवायचा ठरवला तरी त्याची कबुली देणं ही अवघड गोष्ट होती. बापूजींचं मन त्यासाठी तयार नव्हतं. उठावं नि आईवडलांसमोर उभं राहून, खरं काय ते सांगून टाकावं असं घडेना... तेव्हा त्यांनी पत्र लिहायचं ठरवलं. केलेली सगळी लपवाछपवी नि खोटेपणा त्यात सविस्तर लिहिला आणि क्षमा मागितली. यापुढचं आव्हान होतं ते लिहिलेलं पत्र देण्याचं. त्या काळात बापूजींचे वडील थोडे आजारी होते. बापूजीच त्यांची काळजी घेत होते. अशाच एका संध्याकाळी त्या दोघांना पुरेसा एकांत मिळाल्याची वेळ साधून बापूजींनी ते पत्र देण्याचं धैर्य केलं. वडलांनी पत्र वाचलं, पुन्हापुन्हा वाचलं. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. अखेर त्यांच्या वडलांनी त्यांना छातीशी ओढलं आणि ते पुटपुटले, ‘‘माफ केलं तुला मी. माफ केलं!’’

चलबिचलीचा हा संपूर्ण काळ आठवताना बापूजी दुःखी होतात. मला ही गोष्ट सांगताना बापूजींनी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. आपण तीच चूक पुन्हा करणार नाही या वचनासह जर अतिशय शुद्ध मनानं कबुली दिली तर गमावलेला विश्वास आपण परत कमवू शकतो... मात्र खोटं बोलणं, सत्याला सामोरं जाण्याचं नाकारणं हा आपल्या वागणुकीचा भाग होतो... तेव्हा खरा संघर्ष तयार होतो याचीही कल्पना त्यांनी मला दिली. खोटेपणा हा वाळूसारखा असतो, वाळूनं मजबूत पाया तयार होत नाही... त्यामुळं त्या भुसभुशीत पायाच्या आधारे तुम्ही जी उभारणी करता... ती कमजोर, डळमळणारी आणि असुरक्षित असते. जर तुम्ही अशा पायावर भर टाकत गेलात तर तुमचा वाळूचा किल्ला कधीतरी ढासळल्यावाचून राहणार नाही.

प्रत्यक्ष अनुभवातून बापूजींना कळलं होतं की, खोटेपणाबद्दल पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा सत्याचे परिणाम भोगणं अधिक चांगलं. आयुष्यात धक्के खाऊन शिकलेला धडा तुम्ही असेपर्यंत तुमच्यासोबत राहतो. अर्थात हे एकदा कळणं पुरेसं नसतं. बापूजीही पुन्हापुन्हा हा धडा नव्यानं शिकत राहायचे. ते एकदा सिगरेट्‌ससाठी, एकदा मांसाहारासाठी नि एकदा चोरीबद्दल खोटं बोलले... मात्र अखेर आपल्या वडलांदेखत चुकीची कबुली दिल्यानंतर त्यांनी पुन्हा कधीही खोटेपणाचा आश्रय घेतला नाही. त्यानंतरच त्यांनी सत्याबद्दलचं स्वतःचं आकलन सांगितलं, ‘‘सत्याचं तेज अवर्णनीय असतं... सूर्याच्या तेजापेक्षा कित्येक पट तेजस्वी, डोळे दिपवून टाकणारं!’’

असत्य आणि अहिंसा यांसारख्या क्लिष्ट संकल्पनांचा संबंध कसा आहे त्याची एक छान मांडणी बापूजींनी केली होती. हिंदू, बौद्ध आणि अशा अनेक धर्मांत अहिंसेचा समावेश सद्‌गुणांमध्ये करण्यात आला आहे. स्वतःला नि दुसऱ्याला इजा पोहोचू नये असं वागणं अहिंसेमध्ये अभिप्रेत आहे. बापूजींच्या अहिंसा चळवळीचा आधार काय होता हे समजून घेणं यामुळं सोपं जातं... पण अहिंसा हे तत्त्व सर्वांनी अधिक खोलवर अनुसरणं बापूजींना अपेक्षित होतं. त्यात आपण दुसऱ्याला आणि स्वतःला ज्या इजा पोहोचवतो त्या सर्व तऱ्हेच्या सूक्ष्म इजांचाही विचार नि जाणीव आहे.

खोटं बोलण्याची नि फसवण्याची अंतःप्रेरणा रोखणं हे शारीरिक मारहाणीचा त्याग करण्याहून अधिक कठीण आहे. बापूजींप्रमाणे खोटेपणा करण्याचे एखाददोन तरी झोंबरे अनुभव मला यायला हवे होते... निकराच्या वेळीही ठामपणानं सत्यच बोलायला हवं या निर्णयापर्यंत त्यातून मी येऊ शकलो असतो. मी कुठे, कसा पोहोचलो नि त्यानंतर निरंतर तसा टिकू शकलो याबद्दल आता सांगायला हवं. 

राजकीय चर्चांमध्ये तथ्यं कशी वाकवली जातात हे पाहून मी कमालीचा चकित व्हायचो. काही माणसांना वाटतं की, त्यांना जे सत्य वाटतं ते सत्य तुमच्या गळी उतरवणं मुळीच कठीण नाही. मान्य आहे की, विज्ञानाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात... पण प्राप्त परिस्थितीत संपूर्ण सत्याचा शोध घेण्यासाठी जे जास्तीजास्त चांगले पर्याय आहेत... त्यांचाच विचार अखेर आपण करणार, त्यांच्यावरच विसंबू शकणार, हो ना? ‘जागतिक तापमान बदल’ नावाची घटना खोटी आहे, बाहेरून येणाऱ्या लोकांमुळं गुन्हेगारीत वाढ होते किंवा वेगवेगळ्या तऱ्हेचे होणारे अन्याय्य भेदभाव ही काल्पनिक गोष्ट आहे असं तुम्ही म्हणत असाल तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती या घटनांचे जे पुरावे देतेय त्यांकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करता आहात असा अर्थ होतो. अशी भडक, भावुक नि खोटेपणावर आधारलेली मांडणी करून तुम्ही एक दिवस जिंकाल... पण पुढं? बाहेरून येणाऱ्यांना गुन्हेगार म्हणायची किंवा भेदभावाला पाठिंबा द्यायची तुमची म्हणून काही खासगी कारणं कदाचित असतील तरी तुम्ही ज्या बाजूनं उभे राहता त्या मुद्‌द्यांचा प्रामाणिकपणानं विचार करायची गरज असते. संकल्पनांऐवजी त्या सोसणाऱ्या माणसांचा विचार करायला हवा. स्वतःसाठी किंवा तुम्ही पाठिंबा देत असलेल्या सरकारसाठी भुसभुशीत पायावरचं भविष्य नका बांधू! बापूजी म्हणायचे, सत्यासाठी समर्पणाच्या ओढीनं ते राजकारणात सक्रिय झाले. याबाबतीत आपण आदर्श म्हणून त्यांचं उदाहरण अनुसरायला हरकत नाही.

एक माणूस माझ्या पाहण्यात आला होता, वेगळ्या तऱ्हेचा विनोद म्हणून त्याचं उदाहरण सांगतो. त्यानं खोटं बोलण्याची सवय का सोडली माहितीये? कारण त्याला वाटत होतं की, आपण फार सराईतपणानं खोटेपणा करण्याइतके ‘स्मार्ट’ नाही, खोटं बोलताना रचलेल्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत, कुणाला काय सांगितलं तेही आठवत नाही... त्यामुळं आयुष्यात गोंधळ वाढत चाललाय म्हणून खोटेपणा सोडायची त्याची इच्छा तयार होत गेली. खोटारडेपणा सोडण्याचं तुमचं कारण काहीही असेल तरी एक आश्वासन मला देता येईल... आपण जे नाही ते आहोत असं नाटक करत राहण्यापेक्षा सत्य बोलणं आणि त्याचं पालन करणं ही गोष्ट तुम्हांला जास्त ताकद देते.

अमेरिकन लोक कायम स्वतःला पटलेल्या मार्गानं जाणाऱ्या प्रामाणिक लोकांचं मनापासून कौतुक करतात असं मी पाहिलं आहे. सच्ची माणसं वेगळीच दिसतात. साधंसुधं भरड धोतर, शाल आणि झिजलेली चप्पल घालणाऱ्या आजोबांची प्रतिमा नेहमी माझ्या डोळ्यांसमोर येते. या माणसाचे लाखो-कोटी अनुयायी. कसं जमलं त्यांना हे? मला वाटतं की, याचं उत्तर अगदी साधं आहे. बापूंच्या हृदयात असणारी सत्याची आस आणि त्यांच्या ध्येयातला प्रामाणिकपणा यांमुळं लोक सहजपणे भारावून जात असणार! आजही जातात....

1930मध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात अहिंसात्मक मार्गानं केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी बोलताना लोक आजही अचंबित होतात. मीठ हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग... पण ब्रिटिशांनी स्थानिकांच्या मिठाच्या उत्पादनावर बंधनं लादली आणि ब्रिटिशांकडून मीठ विकत घेऊन खाणं भाग पाडलं. मिठावर प्रचंड करही लावला. अहिंसक चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मिठावरचा कर रद्द करवून घेणं ही बापूजींची योजना होती. खरंतर बापूजींचा विश्वास बोलणी करण्यावर होता... म्हणूनच त्यांनी व्हॉईसरॉयला भावनिक आवाहन करणारं एक विस्तृत पत्र लिहून ब्रिटिशांच्या अन्यायी नीतीमुळे भारतीय जनतेला येणाऱ्या अडचणी नि त्या दुरुस्त करण्याचे मार्ग सुचवले होते. योग्य पाऊल उचलण्यासाठी प्रेरित केलं होतं. या पत्राचं उत्तर व्हॉईसरॉयनं चार ओळींत दिलं. मथितार्थ होता - गांधींनी कायदेभंग करता कामा नये!

‘गुडघे टेकून मी भाकरी मागितली नि सरकारनं धोंडा दिला!’ या शब्दांत आपल्याला वाटणारा खेद बापूजींनी अनुयायांसमोर व्यक्त केला होता. 

बापूजींनी आपली योजना जाहीर केली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरून जवळपास 240 मैल पायी मोर्चा जाणार होता. त्या विशिष्ट टप्प्यावर किनाऱ्यावरचं मीठ उचलून बापू कायदेभंग करणार होते. त्या वेळी ते होते त्या आश्रमातल्या सगळ्यांनाच त्यांच्याबरोबर जाण्याची इच्छा होती... मात्र त्यांनी मोजके लोक निवडले. या मोर्चात चालणारा सगळ्यांत लहान वयाचा तरुण होता सोळा वर्षांचा आणि सगळ्यांत मोठे होते वय वर्ष एकसष्ट असणारे बापूजी. यात्रेसाठी ते सकाळी उठून चालायला लागणार होते... तेव्हा त्यांना निरोप द्यायला सगळे आश्रमवासी उठून पहाटेपूर्वी तयार होते. शेजारपाजारच्या गावांमधून आलेले हजारो लोक तिथं उपस्थित होते. भारत, युरोप, अमेरिका या देशांमधले पत्रकारही त्या वेळी हजर होते.

रोज विशिष्ट अंतर चालून झालं की बापूजी एखाद्या गावात थांबायचे, स्थानिक माणसांना आपल्या संकल्पाबद्दल सांगायचे. ते ऐकून त्या-त्या गावातले आणखी लोक त्यांच्या जथ्यात सामील व्हायचे.

‘हा एका माणसाचा संघर्ष नाही, आपल्यासारख्या लाखो माणसांचा आहे. आपला संघर्ष आहे!’ एका गावात लोकांना संबोधित करताना बापूजी म्हणाले होते. त्या वेळी तिथं तीस हजारांहून अधिक लोक बापूजींना ऐकण्यासाठी आणि त्यांच्या संकल्पाला बळ देण्यासाठी जमले होते. या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं सामूहिक वचन त्यांनी भाषण झाल्यावर दिलं.

महिन्याभरानं बापूजी इप्सित ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर चालणाऱ्या लोकांची संख्या तीस हजाराच्या घरात पोहोचली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बापूजींसोबत त्या समुद्रकिनाऱ्यावर उभे होते. बापूजींनी त्याच क्षणी विराट जनसमुदायाच्या सोबतीनं ते ऐतिहासिक पाऊल उचललं आणि वाकून चिमूटभर नैसर्गिक मीठ हातात घेतलं.

‘हे चिमूटभर मीठ उचलून मी ब्रिटिश साम्राज्याच्या पायाला हादरे देतो आहे!’ त्यांनी घोषणा केली.

ब्रिटिश सरकारच्या कायद्यापुढे मान तुकवायला त्यांनी नकार दिला. कुठल्याही रागाशिवाय, हिंसेशिवाय त्यांनी ब्रिटिशांना जाणीव करून दिली की, माणसांना गुलाम बनवून वागवणं चूक आहे. बापूजींचे मित्र आणि सहकारी असणारे महादेवभाई मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांच्याबरोबर उभे होते. त्यांनी ही घटना आपल्या डायरीत नोंदवून ठेवली होती. त्यांनी लिहिलंय, बापूजींबरोबर हजारो लोक समुद्रकिनारी वाळूवर उभे होते. बापूंनी चिमूटभर मीठ उचलून हात उंचावल्यावर बाकीच्यांनीही त्यांचं अनुकरण केलं. लोक आनंदानं हसायला लागले, गायला लागले, प्रार्थना करायला लागले. असं वाटत होतं की, बापूंच्या या कृतीला संपूर्ण भारतभरातून प्रतिसाद मिळतो आहे. त्या वेळी तिथं ब्रिटिश पोलीस होते. त्यांनी ताबडतोब बापूंना अटक केली, किनाऱ्यावर त्यांच्यासह उभ्या असणाऱ्या बाकी साठ हजार सत्याग्रहींनाही अटक करण्यात आली... पण कृतीतून योग्य तो संदेश लोकांनी घेतला होता. लाखो लोकांनी आपापल्या ठिकाणी राहून सविनय कायदेभंगाला सुरुवात केली. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतले कितीतरी लोक एकत्र येऊन मिठाची निर्मिती करायला लागले. ब्रिटिश किती लोकांना तुरुंगात तरी डांबणार? सगळे तुरुंग भरून गेले, नव्या लोकांना बंदिवान करायला सरकारकडे जागा उरली नाही.

माझ्या आजोबांकडे धगधगणारं प्रभावी भाषणकौशल्य नव्हतं. एखादी निष्णात सेना किंवा एखाद्या राजकीय पक्षाचं समर्थनही त्यांच्या पाठीशी उभं नव्हतं... मात्र त्यांच्या एका हाकेवर हजारो लोक मिठाच्या सत्याग्रहासाठी त्यांनी ठरवलेल्या रस्त्यावरून चालले, त्यातून लाखो-करोडो लोकांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिली. महात्मा गांधी आपल्याला सखोल सत्यापर्यंत घेऊन जातील हा विश्वास यामागे होता. अपूर्व श्रद्धा आणि प्रामाणिकपणा यांनी भारलेलं हे व्यक्तिमत्त्व, त्यामुळं त्यांना पराजित करणं केवळ अशक्य!

खोटेपणाचा त्याग करून सत्याची कास धरण्यानं आपलं आयुष्य खरोखर बदलून जातं... आपलं बदलतं तेव्हा देशाचंही बदलू शकतं!

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले नऊ भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...
6. वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते
7. सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं! 
8.भौतिक स्थैर्य आणि नैतिकता यांचे संबंध व्यस्त असतात...
9. निम्मं जग कसे दिवस काढत आहे हे पाहाण्याची खिडकी आपल्यापाशी नसते
10. खोटं बोलणं आपल्याला दुबळं करत असतं

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा दांडी मार्च सत्य Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Truth Dandi March Load More Tags

Add Comment