तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..

वरदान रागाचे - भाग 3

डेलियाचे फुल. फोटो सौजन्य: listamaze.com

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा मराठी अनुवाद कर्तव्य वरून पुढील 12 आठवडे (प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी) क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. म्हणजे या लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. 
- संपादक

त्या दिवशी चरख्यावर बसलेलो असताना बापूजींनी मला सांगितलं, काहीतरी वाईट घडण्याची पूर्वसूचना म्हणून आपण रागाकडे बघायला हवं. रागाची नोंद वहीत करणं ही तर फक्त पहिली पायरी झाली. मनावर नियंत्रण साधण्यानं खात्री तयार होते की भविष्यात असं काही घडलं तर मी योग्य तऱ्हेनं प्रतिक्रिया देईन. समोरच्याला धारेवर धरायचा, त्याचं भावनिक नुकसान करायचा तुमचा खरोखर इरादा नव्हता हे खरंच असेल तर झाल्या प्रसंगावर सगळ्यांसाठी आनंददायी ठरेल असा नेमका इलाज काय त्या गोष्टीवर एकाग्र व्हायला हवं. तुम्ही तातडीनं दिलेल्या प्रतिक्रियेनं फरक पडला नसेल तर कुठल्या प्रतिक्रियेनं योग्य समजूत पटेल?

‘‘बापूजी, मला माझं मन कणखर करायचं आहे. मी कुठला व्यायाम करू सांगा ना?’’

त्यांनी खूप सोपी पद्धत सांगितली. ते म्हणाले, तू कुठल्यातरी शांत खोलीत बस जिथं तुला कुठलंही व्यवधान नसेल. (आजच्या काळात व्यवधान नसण्याचा अर्थ मोबाईल फोन हातात न घेणे.) अशा अडथळामुक्त जागी स्वत:समोर एखादं सुंदर फूल किंवा फुलाचा फोटो, चित्र असं काही नजरेसमोर धर. मिनिटभर किंवा थोडं जास्त त्याकडे सलग पहा. एकूण काय की ध्यान लाव. त्यानंतर डोळे मिटून घ्यावेत नि पाहावं की पाहिलेली प्रतिमा मिटल्या डोळ्यांसमोर किती वेळ टिकते. - मी हे केलं. अगदी सुरुवातीसुरुवातीला मी डोळे मिटताक्षणी ती प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोरून पुसली गेली. मात्र मी जर हे अधिकाधिक वेळा केलं असतं तर कदाचित मी जास्त वेळ प्रतिमा टिकवू शकलो असतो. या प्रयोगातून मला कळलं की एकाग्रतेच्या मध्ये येणारे अडथळे मला दूर सारता येतात. सरावानं हळूहळू मनावर मी नियंत्रण मिळवू लागलो आहे.

तू थोडा मोठा झालास की या अभ्यासाच्या पुढच्या पायरीवर जाऊन पोहोचशील, आजोबा म्हणाले होते. तशाच शांत खोलीत बसून एकचित्तानं स्वत:च्या पूर्ण जाणीवेनिशी आपण कसा श्वास घेतोय, कसा सोडतोय याकडे लक्ष दे. मन श्वासावर केंद्रित करताना शरीराखेरीजचा इतर कुठलाही असंगत विचार बाजूला सार. या व्यायामानं तुझ्या प्रतिक्रियांवर तुझं अतिशय चांगलं नियंत्रण तयार होईल आणि संकटाच्या क्षणी तू आततायीपणे वागणार नाहीस.

दुसऱ्याच दिवसापासून मी बापूजींनी सांगितलेला अभ्यास करायला सुरुवात केली. आजही मी हा अभ्यास अतिशय मन:पूर्वक करतो. मन काबूत ठेवायचा हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. अर्थात रागाचा निचरा अतिशय तल्लखपणे कृतीकडे कसा वळवायचा हे लक्षात यायला नि त्यात यश मिळायला माझे महिनोन्‌महिने खर्च पडले आहेत. रागाचं व्यवस्थापन हा जीवनाला पुरून उरणारा अभ्यास आहे. काही महिने हा अभ्यास करायचा नि आता मी यात कौशल्य मिळवलं असं म्हणायचं याला इथं जागा नाही. असं होऊच शकत नाही! जीवनातली परिस्थिती बदलत राहाते, त्याबरोबर रागाचा भडका उडण्याची कारणंही बदलत जातात. त्यामुळं सतत सजग राहून कुठल्याही दिशेनं येणारा चेंडू टोलवण्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागतं.

राग चांगल्यासाठी वापरण्याची युक्ती आजोबांना पहिल्यांदा कधी व कशी सापडली याची मला उत्सुकता वाटत होती. त्यातूनच मी विचारलं, ‘‘आजोबा, एक प्रश्न विचारू?’’

‘‘हो, विचार अरूण... नक्की विचार...’’

‘‘राग इतका उपयोगी ठरू शकतो नि त्याच्यात इतकी ताकद असते हे तुम्हाला कधी कळलं?’’

त्यांनी चरखा थांबवला आणि मोठ्याने हसत म्हणाले, ‘‘हा धडा मला दिला तुझ्या आजीने!’’

‘‘खरंच? कसा? काय झालं होतं?’’

‘‘माझं लग्न अतिशय लहान वयात झालं होतं. बायकोशी कसं वागतात हे मला मुळीच ठाऊक नव्हतं. शाळा सुटली की वाचनालयात मी वैवाहिक नात्यावरची पुस्तकं शोधायला जायचो. एकदा आमच्यात काही वादावादी झाली. मी एकदम खेकसलो ... तिची प्रतिक्रिया मात्र अगदी सौम्य व शहाणपणाची होती. ते पाहून मी स्तब्ध झालो. नंतर झाल्या घटनेवर मी विचार केला तेव्हा लक्षात आलं की रागाच्या भरात आपण किती अविवेकी वागतो... त्याचवेळी हे ही लक्षात आलं की तुझ्या आजीनं परिस्थितीचा ताण किती सुंदरपणे निवळून टाकला. तिनंही रागानं काही सुनावलं असतं तर आमच्यात कोण जोरात ओरडतंय याचा सामना रंगण्याची शक्यता होती... त्याचा शेवट काय झाला असता कोण जाणे! या प्रसंगाचा मी जितका खोलवर विचार करतो तितकं मला अधिक जाणवतं की रागाचा शहाणपणानं व विधायक वापर करायला आपण सगळ्यांनी शिकायलाच हवं.

माझ्या आजीचा नुकताच तुरुंगात असताना मृत्यू झाला होता. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे बापूजी व ती तुरूंगात होते. तिच्या जाण्यानं बापूजी किती अस्वस्थ झाले होते हे मला कळत होतं. महिन्यातल्या एका दिवशी ते तिच्या आठवणीत प्रार्थना घ्यायचे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून मला रागावर दिलेल्या संयमी नि शांत प्रतिसादाचं महत्त्व कळत गेलं. ही गोष्ट असामान्य होती. एरवीही एखादा माणूस जोराने ओरडायला लागला की सावध पवित्रा घेत समोरचा माणूसही आपल्या आवाजाची पातळी वाढवत नेतो. मात्र तुम्हाला ज्यांनी दुखावलं, चिडायला भाग पाडलं अशा माणसांना तुम्ही सज्जनपणे सौम्य उत्तर दिलं तर त्या क्षणाचं रूपच पालटतं!

बापूजींनी मला अशा गोष्टी जेव्हा सांगितल्या होत्या तेव्हा त्या अर्थातच तत्त्व म्हणून कळल्या होत्या, पण काही वर्षांनी भावनांच्या तीव्र आवेगात असण्याच्या काळात ह्या गोष्टी किती खऱ्या आहेत हे मला कळलं. वयाच्या बाविसाव्या वर्षी मी दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा भारतात आलो होतो, एका नातेवाईकांना भेटण्याच्या निमित्तानं. काम होताच मला ताबडतोब दक्षिण आफ्रिकेत, घरी परतायचं होतं. तिथं वर्णभेद निर्मूलन विषयक मोठा लढा चालू होता, त्यात मी सहभागी होतो. मात्र घडलं वेगळंच. माझ्या पोटात तीव्र वेदना व्हायला लागल्या, अपेंडिसायटिसची शस्त्रक्रिया ताबडतोब करवून घेणं आवश्यक होतं. त्यावेळी तिथं परिचारिका असणारी सुनंदा आंबेगावकर हिने मला दवाखान्यात भरती करून घेतलं. ती अतिशय प्रेमळ शिवाय सुंदर. दवाखान्याच्या पाच दिवसाच्या मुक्कामात या मुलीनं माझं मन जिंकलं. आम्ही दोघंही संकोची. आपण सिनेमाला जाऊ या का हे विचारायलाही मी खूप वेळ घेतला. ठरल्यावर मी सिनेमा थिएटरवर दुपारी बरोबर तीन वाजता येऊन थांबलो. अखेरीस सहा वाजायच्या थोडं आधी ती थिएटरवर पोहोचली. तोवर वाट बघून बघून मी थकून गेलो होतो. मी अजूनही थांबलो असेन अशी तिची अपेक्षाच नव्हती. तिनं येताच मला सांगितलं की दवाखान्यात तातडीची काही केस आली नि तिला उशीर होत गेला. नंतर मात्र तिनं कबूल केलं की असं काही नव्हतं, तिला यायचं धैर्य गोळा करता येईना, ते झालं तेव्हा ती आली.

सुरुवात अशी अडखळत झाली, तरी नंतर आम्ही प्रेमात पडलो, लग्नही केलं. सुनंदाला माझ्याबरोबर दक्षिण आफ्रिकेत परतण्यासाठी व्हिसा लागणार होता, पण मला त्यात काही अडचण जाणवत नव्हती. मी त्या देशाचा नागरिक असल्यामुळे माझ्या बायकोला घेऊन जाण्याचा मला हक्क होता. - पण तो काळ अतिशय कडव्या वर्णभेदाचा होता नि सुनंदासारख्या भारतीयांचं स्वागत त्या देशात होणार नव्हतं. वर्षभर आम्ही या ना त्या मार्गे पुष्कळ प्रयत्न केले, सरकारला विनवून पाहिलं, पण सगळं फोल गेलं. ती दक्षिण आफ्रिकेत येऊ शकणार नव्हती! अशा परिस्थितीत माझ्यासमोर दोनच पर्याय होते, माझ्या बायकोबरोबर मी इथं भारतात राहाणं किंवा माझी विधवा आई नि बहिणींसोबत दक्षिण आफ्रिकेत राहाणं. ही कसली परिस्थिती आपल्यावर येऊन ठेपलीय या विचारानं मी हैराण झालो, संतापलो. सरकार कसं काय एखाद्या माणसाला हा विनाकारण ताप देऊ शकतं? माझ्यासाठी कुठलाही एक निर्णय घ्यावा लागणं ही त्रासदायक परिस्थिती होती. मी माझ्या नव्या विवाहित आयुष्याला न्याय द्यायचं ठरवलं. आयुष्यात नव्यानं आलेल्या माणसाची सोबत मिळणं आम्हा दोघांसाठी गरजेचं होतं.

त्यानंतर साधारण दहा वर्षांनंतरची गोष्ट. तिकडचे एक परिचित भारतात येणार होते. मी जहाजावर त्यांना भेटायला गेलो... त्या गोऱ्या माणसानं माझा हात हातात घेतला आणि उत्साहानं सांगितलं, आठवडाभर मुंबईतच असणार आहे व शहर बघायची खूप इच्छा आहे. त्यांच्या दृष्टीनं मी ओळखीचा व त्यातल्या त्यात जवळचा असणारा एकुलता भारतीय होतो... पण म्हणून मी मदत करू? कशी काय? त्यांनी त्याची ओळख जेपी बेसन अशी करून दिली. तिकडच्या राजकीय व्यवस्थेत ते संसद सदस्य म्हणून सक्रिय होते.

जेपी बेसन यांनी त्यांचं राजकीय स्थान सांगितल्यावर माझ्या मनात जुन्या रागाची एक लहर दौडत गेली. त्यांच्या सरकारनं माझा अपमान करून मला तिथं परत येण्यापासून अडवलं होतं. अशावेळी मी त्यांना मदत का करावी? उलट त्या जहाजावरून त्यांना ढकलून द्यावं आणि अपमानाचा बदला घ्यावा असंच मला वाटत होतं. पण त्यावेळी बापूजींनी दिलेल्या तत्त्वांचा अभ्यास चालूच होता. त्याच्या परिणामामुळं मी संताप विधायक पद्धतीनं व शहाणपणानं वापरायचा व पहिली पायरी म्हणून तिरसटपणानं प्रतिक्रिया द्यायची नाही हे ठरवून टाकलं. मीही माझ्या हातातला त्यांचा हात प्रेमभरानं दाबला आणि अतिशय सभ्यपणानं त्यांना सांगितलं, तिकडच्या वर्णभेदाचा बळी मीही ठरलो आणि भारतातच राहाणं भाग पाडलं मला तिथल्या सरकारनं. बायको सोबत येऊ शकणार नव्हती, मग मी तरी कसा जाणार?

‘‘तुमच्या सरकारची धोरणं मला मान्य नाहीत ही गोष्ट खरी, पण तुम्ही माझे पाहुणे आहात... या शहरातलं तुमचं वास्तव्य सुखाचं असावं याची काळजी मी घ्यायला हवी. ती मी घेईन!’’, मी सहज आवाज ठेवत माझं मत सांगितलं.

मी माझ्या या मित्राला आधी स्थिरस्थावर होऊ दिलं. मग ते असेपर्यंत आठवडाभर त्यांना आणि त्यांच्या बायकोला आम्ही दोघांनी मुंबई फिरवली, त्यांचा मनापासून पाहुणचार केला. एकत्र फिरताना आम्ही खूप बोललो त्यात दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष हा ही विषय होता. माझ्या कुटुंबाला विभक्त होऊन राहाण्याची वेळ त्यामुळेच तर आली होती. शेवटच्या दिवशी निरोप घेताना त्या दोघांनाही अश्रू आवरेनात.

‘‘पूर्वग्रहांमुळं किती चुकीच्या घटना घडत जातात खरोखर! आमचे डोळे तुम्ही उघडलेत. मी वर्णभेदाच्या बाजूने सरकारला पाठिंबा देतोय ते चूक आहे असं मला जाणवलं आहे. मी आता तिथं वर्णद्वेषाच्या विरोधात उभा राहाणार आहे.’’, बेसन यांनी मला मिठी मारत कबुली दिली.

ते जहाजावर चढत होते तेव्हा मी बघतच राहिलो त्यांच्याकडे. इतक्या कमी दिवसांच्या आमच्या सहवासात इतका बदल कसा शक्य आहे? मी साशंक होतो. मी म्हणालोही माझ्या बायकोला, ‘‘ते जे बोलले आहेत त्यात सच्चाई किती याबद्दल मी संदिग्ध आहे. पण ठीकाय, वाट बघू काय होतंय त्याची...’’

मला फार वाट बघावी लागली नाही. बेसन दक्षिण आफ्रिकेत परतल्यापासून वर्णद्वेषाच्या विरोधात बोलायला लागले. त्यांचा विरोध इतका तीव्र होता की सरकारनं त्यांना संसदेबाहेर हुसकून लावलं. पुढची निवडणुक ते हारले. तरीही ते आपल्या मुद्‌द्यावर अढळ राहिले. त्यांच्या या भूमिकेमुळे इतरांचा दृष्टीकोन बदलायला अर्थातच मदत झाली.

बेसन यांच्यामध्ये झालेला अविश्वसनीय बदल पाहून बापूजींच्या ‘राग हुषारीने वापरता येतो’ या तत्त्वात असणाऱ्या शक्तीवर पुन्हा शिक्कामोर्तब झालं. त्यावेळी मनात येतं होतं त्याप्रमाणे मी बेसन यांच्या कानशीलात लगावलं असतं किंवा त्यांना जहाजावरून ढकललं असतं तर मला कदाचित क्षणिक समाधान मिळालं असतं. त्यांच्यासारख्या सरकारी माणसाची खरडपट्टी काढणं माझ्यासाठी कठीण नव्हतं, त्यालाही मी म्हणतो ते ऐकून घेणं भाग पडलं असतं, पण या सगळ्याचा शेवट काही समाधानकारक झाला नसता. त्यातून बेसन भारतातून पूर्वीपेक्षा अधिक खात्रीनं आपल्या देशात परतले असते, की वंशभेद ही योग्यच गोष्ट आहे आणि अश्वेत लोक नि भारतीय लोकांपासून अंतर राखणं बरं!

राग हुषारीनं वापरता येणं ही गोष्ट व्यक्तिगत जीवन जगताना जगण्याचा दर्जा वाढवतेच, पण मोठ्या जगाच्यादृष्टीनंही हे खरंय. आजोबांना त्यांच्या राजकीय अनुभवाच्या सुरुवातीच्या काळात हा शोध लागला. 1913 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत राहात होते त्यावेळी वंशभेद आणि विलगीकरणाच्या मुद्‌द्यांवर त्यांना एकानवीन आंदोलनाची घोषणा करायची होती. त्यांनी हे आंदोलन छेडण्याआधी सरकारबद्दल आक्रमक भाषा न वापरता, दोषारोप न करता संवाद व्हावा अशी विनंती सरकारला केली होती. सरकारनं याची उचित दखल घेतली नाही तेव्हा त्यांनी लोकांना याची कल्पना दिली. शांततामय मार्गानं कुठल्याही आक्रमक हेतूशिवाय प्रश्नावर तोडगा काढायची आपली इच्छा होती, पण आता सरकारची तशी तयारी नाही असं सांगत त्यांनी लोकांना सविनय आंदोलन करण्यासाठी हाक मारली.

त्याचवेळी दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतील रेल्वे कर्मचाऱ्यांनी कामातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची मागणी करत संप घोषित केला होता. या संपामुळे गैरसोय तयार होणार आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधण्यात हा संप यशस्वी होणार आहे हे बापूजींच्या लक्षात आलं. त्यामुळंच हा संप थांबेपर्यंत आपल्या आंदोलनाची घोषणा करणं उचित होणार नाही असा विचार करून त्यांनी आंदोलन पुढं ढकललं.

रेल्वे संपाच्या नेत्याने सुचवलंही, ‘‘तुम्ही आम्हाला येऊन मिळा... दोन्ही ताकदी एकत्र येऊ देत. आमचा संपही अतिशय कायदेशीर मार्गाने जाणारी अहिंसक मोहिमच आहे. शिवाय आपला शत्रू एकच आहे.’’

यावर आजोबांनी ताबडतोब उत्तर दिलं, ‘‘मी कुणालाच माझा शत्रू मानत नाही. सगळे मित्रच आहेत. मला त्यांना शिक्षित करायचं आहे, त्यांची मनं बदलायची आहेत.’’

रेल्वे कामगारांनी ठरल्याप्रमाणे संप केला. ते रस्त्यांवर उतरले, त्यांनी प्रक्षुब्ध घोषणा दिल्या. त्यांना प्रशासनाकडून जे हवं होतं ते मिळत नव्हतं म्हणून ते खूप निराश झाले होते, रागावले होते, अशा परिस्थितीत त्यांच्या मध्ये हिंसा जागृत होणं साहजिक होतं. जमाव हिंसक झाल्यावर जादा कुमक घेऊन त्यांना थांबवण्याचं आयतं कारण पोलीसांना मिळालं. त्यांनी हा संप मोडून काढला. चार दिवसांनी कामगार परत कामावर जायला लागले, हाती काहीच लागलं नाही.

या घटनेनंतर थोड्या दिवसांनी बापूजींनी आपलं वर्णभेदाविरोधातलं आंदोलन जाहीर केलं. त्यांनी आंदोलनाचा आवाज शांततेचा राखला. पोलीसांनी अत्याचार केल्यावरही त्यांनी पोलीस दलाचा उल्लेख शत्रू म्हणून केला नाही. सगळ्यांची अगदी पोलीसांचीही सहानुभूती जिंकणं हा त्यांचा उद्देश होता. कुणाची हानी व्हावी, कुणाला पेचात पकडावं हा त्यांचा मार्गच नव्हता. पोलीस अटक करायला आल्यावर बापूजी आणि त्यांचे अनुयायी कुठलाही विरोध न करता अगदी शांतपणे पोलीसांच्या व्हॅनमध्ये जाऊन बसले. पोलीसांना शरण गेलेल्यांची जागा नव्या आंदोलकांनी घेतली, त्यांनाही ताब्यात घेतलं गेलं. बाहेर पुन्हा तेच घडलं, नवे लोक आंदोलनासाठी बसले. पोलीसांनी पुन्हा तेच केलं, या ही तुकडीला तुरूंगात टाकलं. तुरूंगात एकही आणखी माणूस भरता येणं अशक्य होईपर्यंत ही साखळी चालू राहिली. अखेर पंतप्रधान जनरल जॅन सी. स्मट्‌स यांनी तोडगा काढण्यासाठी बापूजींना बोलावून घेतलं. ते त्याप्रमाणे स्मट्‌सना जेव्हा भेटायला गेले तेव्हा स्मट्‌सनी, आजोबा आणि त्यांचे अनुयायी यांना कसं आटोक्यात आणावं हेच समजेनासं झाल्याचं कबूल केलं. ते म्हणाले, ‘‘तुम्ही नेहमीच इतक्या आदरानं, सहृदयीपणे वागता, समजून घेण्याच्या पातळीवर स्वत:ला ठेवता, त्यामुळे हिंसेनं तुम्हाला चेपून टाकणं अवघड होऊन बसतं. आंदोलक भडकलेले असले की त्यांच्यावर हल्ला करणं सोपं जातं.’’

रागाचा भडका उडालेला असताना शांत राहाणं ही गोष्ट मुळीच सोपी नव्हे, पण जर प्रयत्न केला व या कृतीचे परिणाम पाहिले की तुम्हाला या युक्तीवर विश्वास बसू लागतो. हे पडताळून बघायला कुठल्या मोठ्या प्रसंगाची किंवा आंदोलनाची गरज नाही. आसपासच्या, जवळच्या माणसांबाबतीत रोजचं जीवन जगताना आपण असं करून बघू शकतो. रागाला वाट करून देण्याची आपली क्षमता बदलली की आपल्या भवतीच्या माणसांमध्ये पडलेला फरक आपल्याला दिसतो. कुणालाच भीतीच्या छायेत राहाण्याची इच्छा नसते, ना कुणाचा छळ करण्याची इच्छा असते... सगळ्यांनाच वाटतं, आपल्याला समोरच्यांनी समजून घ्यावं, आपली कदर करावी. आपल्या ‘रागा’ला बिघडलेल्या गोष्टी दुरूस्त करण्यासाठी उद्युक्त करण्याचं महत्त्व मोठं आहे, पण हे केव्हा? - जर आपण ‘मी कसा बरोबर’ यापेक्षा ‘मी विशिष्ट गोष्टीवर नेमका तोडगा काढला आहे का?’ हे बघत असू तर. तोडगा काढणं हे आपलं ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो!

त्या दिवशी आश्रमात चरख्यावर काम करता करता आमच्या या गप्पा चाललेल्या होत्या. गोष्टी सांगून झाल्यावर बापूजींनी सांगताहेत ते मला कळतंय हे बघून त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, ‘‘तुझा राग हुषारीनं वापर... प्रेम आणि सत्य या दोन गोष्टींनी किती प्रश्न सुटतात हे तुला कळत जाईल!’’

मला जाणवलं की बापूजी किती तळातून प्रेम करतात. त्या क्षणापासून प्रेम आणि सहृदयता रागापेक्षा ताकदीची असते हेही माझ्या लक्षात आलं. माझ्या पूर्ण आयुष्यात मी अनेकदा अन्याय आणि पूर्वग्रहांचा सामना केला, पण मला कधीही समोरच्यावर दगड मारावा अशी भावना झाली नाही. रागातून कृती करण्यापेक्षा वेगळे तोडगे मी शोधले.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले दोन भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...

Tags: अरुण गांधी महात्मा गांधी राग दक्षिण आफ्रिका वर्णभेद सत्याग्रह आंदोलन Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Anger South Africa Racism Satyagraha Load More Tags

Add Comment