सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं!

वरदान रागाचे- भाग 7

फोटो सौजन्य: thestrategydistillery.com

आजोबांच्या काळात टि्वटर, फेसबुक सारखा सोशल मिडिया असता तर त्यांनी तो आश्रमात दिवसभरात काय काय घडलं हे सांगायला जसा रेडिओ ब्रॉडकास्ट वापरायचे तसाच वापरला असता याची मला खात्री आहे. अर्थात एखाद्या विषयावर लाईक ठोकून आपण जग बदलू शकत नाही. लोकांना खऱ्या अर्थानं कार्यप्रवण करण्यासाठी सोशल मिडियाचा उपयोग होऊ शकतो. अरब क्रांती ही विस्मयकारक गोष्ट सोशल मिडियामुळेच घडली. मध्यपूर्वेत सर्वत्र दडपशाही बोकाळलेली असताना कुणीतरी दडपलेल्या ठिणग्यांना हवा देतो तेव्हा आतषबाजी तर होणारच असते. या हाकेनं हजारो लोक रस्त्यांवर उतरले, एकमेकांच्या समोर आले आणि त्यांना जो बदल घडायला हवा होता तो त्यांनी प्रत्यक्षात आणला. 

अर्थात ही माध्यमं लोकांना चुकीच्या गोष्टीही करण्यासही प्रवृत्त करतात. कट्टरतेला खतपाणी घालतात. मध्ये एक बातमी अशी आली होती की, अनेक अरब पुरूष ‘सुसाईड बॉम्बिंग’ साठी जीव धोक्यात घालत होते कारण त्यांच्या श्रद्धाळू मनांना हेरून काही गोष्टी पटवून देण्यात आल्या होत्या. तुम्ही या कार्यासाठी जीव दिला तर 'परलोकीच्या किनाऱ्यावर बऱ्याच कुमारिका सुंदर मुली तुमची वाट बघत उभ्या असतील आणि तुमचं ते आयुष्य सुखाचं होणार आहे!' अशा गोष्टींची भुरळ पडणारी मंडळी असतीलही पण आताची तरूण मुस्लिम मंडळी या असल्या कहाण्यांनी भ्रमित होतील असं वाटत नाही. मात्र भुरळ पडणाऱ्यांच्या मानसिकतेचा विचार करून पाहिला तर, दमनकारी शासनव्यवस्थांची एकी, कठोर धार्मिक नियम नि कायदे, अस्तित्वात आलेल्या नव्या देशांबद्दलची साशंकता या सगळ्या परिणामातून येणाऱ्या भयंकर अस्वस्थतेला सामोरं जाण्यापेक्षा मृत्यू बरा या निर्णयापर्यंत लोक येत असावेत. 

अशा सगळ्या कोलाहलात शांततेचा संदेश फिरत राहाणं ही गरज सगळ्या मोठी नि महत्त्वाची असं मला वाटतं. मग हा संदेश रेडिओ, टेलीव्हिजन, फेसबुक, टि्वटर कशातूनही प्रसारित होवो! द्वेष नि नैराश्य यांची द्वाही फिरण्यापेक्षा शांततेचा संदेश फिरण्यानं एकूण परिणाम हा ताकद वाढण्यात होणार आहे.

आज दिसतं की यापूर्वी कधीच नव्हते इतक्या प्रमाणात लोक एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, पण तरी कधी नव्हते इतके ते एकाकीही झाले आहेत. बापूजींबरोबर प्रवास व्हायचा तेव्हा आम्ही एकत्र बसून गप्पा मारायचो किंवा मग एकेकटे आपापल्या विचारात रमायचो. वेगळ्या शब्दात सांगायचं तर आम्ही कधी थेट समोरासमोर असायचो तेव्हा बोलायचो किंवा मग स्वत:च्या विचारात हरवून खिडकीतून दूर बघत अधिक स्वत:जवळ यायचो. तो एकांत आनंदाचा करून टाकायचो. आता माणसं मिळालेला प्रत्येक मोकळा क्षण स्मार्टफोनच्या स्क्रीनवर रोखून पाहण्यात घालवतात. त्यातून ते एकटेही राहात नाहीत व लोकांशी जोडलेलेही.

बापूजी लोकांमध्ये असायचे तेव्हा ते लोकांना काहीतरी नवं सांगून प्रेरणा द्यायचे, त्यांच्या विषयाशी संबंधित काही नव्या युक्त्या द्यायचे. त्यानंतर मात्र ते आश्रमातल्या त्यांच्या खास एकांतात शिरायचे आणि स्वत:ला सामोरं जायचे, शांत व्हायचे... यातून त्यांचं मन पुन्हा ताजंतवानं व्हायचं. मी स्वत:जवळ पूर्ण जाणीवेनिशी असायचं तंत्र त्यांच्याकडे बघून बघूनच शिकलो. जिथे असेन तिथला असायला शिकलो. आजच्या तंत्रज्ञानानं एक गंभीर गंमत करून ठेवलेली आहे, त्यामुळं आपण कुठंतरी मध्येच असतो. ‘इन-बिटविननेस’ असं म्हणतात याला इंग्रजीत. त्यामुळं आपण इतर माणसांमध्ये किंवा माणसांशी निगडित नसतो (कारण आपण सतत फोनच्या स्क्रीनवर पाहात राहातो.) आणि खऱ्या अर्थानं एकटेही नसतो (कारण आपण सतत टेक्स्ट करत राहातो, विचाराची गरज वगळून!). तंत्रज्ञानानं निर्माण केलेला हा नरक आपल्याला कायम अधांतरी असल्याची भावना देतो. 

कितीतरी वेळा मी पाहिलंय, मुलं रेस्टॉरंटमध्ये किंवा पार्कात खेळताहेत आणि त्यांच्या पालकांचं लक्ष मोबाईलमध्ये गुंतलं आहे. मुलांबरोबर असण्याच्या त्या काळात पालकांना सतत ऑफिसात किंवा लांबच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला लहानमोठे निरोप द्यायची अशी काय निकड असते? हा जो संदेश पालक मन लावून कुणा लांबच्या तिसऱ्याला पाठवताहेत तो खरा तर त्यांच्या मुलांनी घेतलेला असतो. आपल्याकडं लक्ष द्यावं, आपलं ऐकावं इतके आपण आपल्या पालकांसाठी महत्त्वाचे नाही आहोत हा संदेश त्यांनी नकळतपणे घेतलेला असतो. अशा घटना बघताना मला स्वत:च्या भाग्याचा हेवा वाटायला लागतो. माझ्या आईवडिलांनी आणि आजोबांनी खरंच खूप लक्ष देऊन माझी जपणूक केली, संगोपन केलं. जगभरातल्या लोकांना ‘आपल्या गांधीजीं’ना भेटायचं असायचं, त्यांच्याशी खूप महत्त्वाचं काही बोलायचं असायचं, पण जो वेळ आजोबा मला द्यायचे त्यात कसलीच हयगय ते करायचे नाहीत. मला जो वेळ दिला तो त्यांनी पूर्णपणे दिला. त्यांच्या सहवासात मला वाटायचं, मी कुणीतरी महत्त्वाचा आहे, माझं ऐकून घेतलं जातंय! मुलांना गरज असतानाच्या काळात पालकांनी त्यांच्याकडं नीट लक्ष पुरवलं, त्यांच्या वाढीत ते सहभागी झाले तर मुलं अधिक स्वावलंबी होतील. त्यानंतर ती अगदी एकटी असतानाही एकाकी असणार नाहीत.

बापूजींना वाटायचं, माणसांनी सत्याच्या शोधासाठी जगण्यातला जास्तीजास्त वेळ द्यायला हवा. या शोधाची उत्कट इच्छा हे त्यांना भांडवल वाटायचं कारण आयुष्याचं सगळं यथार्थ त्यात सामावलेलं आहे असं ते म्हणायचे. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जितके जास्त खोल जातो तितकं जास्त खोलवर आपल्याला आपलं स्वत:चं जगणं कळतं, जगायचं कशासाठी ते कळतं. सत्याचा फारच अल्प नि क्षणभंगुर अनुभव आपण घेतला आहे असं बापूजींनी कबूल केलं होतं. मात्र या अगदी क्षणिक अनुभवाचं वर्णन करताना ते म्हणाले होते, ‘रोजचा सूर्य आपल्या या साध्या डोळ्यांनी बघताना जितका तीव्र व तेजस्वी दिसतो त्याहून कोट्यावधी तीव्रतेचा डोळे दिपवणारा अनुभव म्हणजे सत्याचा अनुभव!’ या ना त्या किरकोळ अथवा क्षुद्र गोष्टींनी विचलित होत राहिलो तर आपल्याला या अनुभवातला अलौकिक भाग लक्षात येणार नाही. सगळ्याशी जुळवून घेण्याचा कोलाहल हा सत्याच्या शांत ध्वनीला बुडवतो. नाहीसा करतो.

कुठल्यातरी आकस्मिक क्षणी अचानकपणे आपल्याला नवंनिराळं सुचण्याचा अनुभव आला असं कितीतरी संगीतकारांनी प्रतिभेबद्दल विचारल्यावर सांगितलं आहे. अंघोळ करत असताना किंवा झोप नि जाग यांच्या सीमारेषेवर हिंदकळत असताना मोठ्या कल्पना सुचल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. काही लेखक तर झोपताना शेजारी वहीपेन ठेवतात, कारण रात्रीच्या त्या नीरव वेळी आगंतुकपणे एखादी कल्पना, एखादं चित्रं मनावर तरळतं, ते त्या क्षणी चमकतं नि नाहीसं होतं. रात्रीच्या वेळीच किंवा अंघोळीला गेलेलं असताना एखादी नवथर कल्पना सुचणं ही काही जादुई गोष्ट नव्हे! त्या काळात आपण एकटे असतो आणि मनाला भरकटायला, उड्या मारायला, तोडगे काढायला अवसर मिळतो. जगात मिसळण्यातून, लोकांच्या भेटीगाठींमधून आपल्या पोतडीत जे अनुभव जमा होतात त्यानं आपला दृष्टीकोन व्यापक होतो हे खरंय, पण इतकीच गरज एकटेपणाची देखील आहे. या काळात अनुभवांच्या विविध कंगोऱ्यांना आपण बारकाईनं बघतो, अर्थ लावतो, संवेदनक्षम होतो. बापूजींकडून मी लोकांत नि एकांतामधलं हेच तत्त्वज्ञान शिकलो.

मी आणि सुनंदा अमेरिकेत राहायला गेलो त्यानंतर ‘एम.के.गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्स’ आणि ‘गांधी वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ अशा दोन संस्था आम्ही सुरू केल्या. तिथं राहायला लागल्यावर व कामानिमित्तानं एकेक गोष्टी कळत गेल्या. ‘ॲन्युअल रेनासन्स विकेन्ड’ या समारंभाला उद्योगव्यवसाय, राजकारण आणि कलेतल्या अग्रेसर असणाऱ्या अमेरिकन नागरिकांनाच सन्मानानं निमंत्रण देण्यात येई. माजी राष्ट्रपती, ऑलिम्पियन्स, नोबेल पुरस्कार विजेते अशी इथल्या निमंत्रितांची वजनदार यादी. मी यादीत बसणारा नव्हतो तरी आयोजकांनी मला या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं, याचा खरोखर मला अभिमान वाटतो. 

‘ग्रॅन्डडॅडी ऑफ ऑल आयडियाज फेस्टिव्हल’ अशी ख्याती असणाऱ्या येथील व्यासपीठावर विचारांची खूप घुसळण होई. अतिशय बुद्धिमान माणसांचा सहभाग असणाऱ्या इथल्या कार्यशाळा, भाषणं, विविध लोककल्याणकारी धोरणांबद्दलची चर्चा यातून मला चेतना मिळे. नव्या कामांसाठी एक नवा उत्साह संचारल्यासारखं वाटे. अर्थात इथल्या कल्पनांनी नुसतं भारावून चालणार नाही, घरी परतून मला सगळ्यांशी या कल्पना बोलाव्या लागतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील हे मला कळत होतं. इतक्या लोकांच्या चर्चेतून जे हाती गवसलं त्याचा पडताळा घेण्यासाठी, भारावलेपणातून बाहेर यावं लागेल आणि नव्या कल्पनांना माझ्या कामाच्या मागणीशी जोडून घेण्यासाठी मला माझा स्वत:चा एकांत मिळवावा लागेल. तो मिळाला तरच कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी काम करू शकेन. 

सातत्यानं मिडियावर वावर, तिथल्या कल्पना, काम यातून काही एक प्रमाणात जोम मिळतो ही खरी गोष्ट आहे, पण हे करता करता आपण काही नकोशा, गरजेच्या नसणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतून पडत नाही ना यासाठी सजग राहावे लागते. मी काहीही करत असेन, अगदी कितीही व्यस्त असेन तरी स्वत:ला रिचार्ज करायची बापूजींची युक्ती वापरतोच. त्यामुळंच रोज चिंतन आणि ध्यानासाठी, एकूण स्वत:सोबत राहाण्यासाठी मी वेळ काढतोच.  मी ध्यानाविषयी, चिंतनाविषयी बोलतो तेव्हा पुष्कळ लोक नाक मुरडतात, ‘अमुक गोष्ट माझ्यासाठी नाहीच हो! मला नाही जमणार.’ असं म्हटलं तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. मला वाटतं, बहुतेक, मी ध्यानाचा उल्लेख करतो तेव्हा त्यांना हे काहीतरी आध्यात्मिक प्रकरण असणार आणि ते करायचं म्हणजे लांबलचक कफनी घालून धूपउदबत्त्यांच्या गूढ वलयात बसावं लागणार अशी कल्पना होत असणार. ध्यान म्हणजे वातावरणनिर्मिती करून करायची साधना नव्हे. तेव्हा खरंच सांगतो, अगदी जिममधल्या कपड्यात तुम्ही बागेतल्या एखाद्या बाकावर बसूनही ध्यान लावू शकता. फक्त गरज असते ती, जिथे असू तिथं थोडा विराम घेण्याची. स्वत:मध्ये, स्वत:च्या जगण्यामध्ये डोकावून बघण्याची. मला ही साधना जितक्यांदा शक्य होते तितक्यांदा मी करतो. मी शांत बसून नजर आतल्या विचारांकडे वळवतो आणि त्यांचं प्रत्यक्षात येणं जगासाठी किती महत्त्वाचं असेल, मला माझ्यासाठी किंवा इतरांसाठी त्यातलं काय साध्य करायला आवडेल हे तपासतो.

आज मी वयानं ज्येष्ठ झालोय. आजच्या अवस्थेत माझ्यासाठी महत्त्वाचं हे आहे की मी अशा तऱ्हेनं वागावं-बोलावं-जगावं की लोकांना आदर नि प्रेमाचं प्रतिक म्हणून माझ्याकडे बघता यावं. मी स्वत:चा उल्लेख ‘पीस फार्मर’ म्हणून करायला सुरुवात केलीय... शांततेचा शेतकरी! शेतकरी शेतात बी पेरतो आणि पिकानं अंग धरावं, जोमानं वाढावं नि त्यातून अमूल्य असं धान्य हाती यावं याची वाट बघतो. मीही तर तेच करतोय. तरूणांच्या मनात शांतता नि अहिंसेचं बी पेरून ‘धान्य’ उगवेल याची वाट बघतोय. मी जे करतोय त्याचा प्रभाव सोशल मिडियावर मला किती लाईक्स मिळालेत किंवा माझा मेसेज कितीजणांनी पुन:पुन: शेअर केलाय यातून जोखत नाही. ‘मी कोण आहे, काय आहे?’ असा प्रश्न स्वत:बाबतीत पडणाऱ्यांनी ‘मी केवळ स्वत:साठी जगू शकत नाही.’ या उत्तरापर्यंत येणं यावर माझं लक्ष असतं. या बदलातून मी प्रभाव जोखतो.

एकदा आजोबा म्हणाले होते, ‘‘मी जो कुणी आहे त्याचा मला अभिमान आहे, तुलाही तसंच वाटत असेल अशी मला आशा आहे.’’ - मला मी भाग्यवान आहे असं खरोखर वाटतं. आपल्या सगळ्यांनाच तसं वाटायला हवं. आपलं वय काय याचा या प्रश्नाशी संबंध नाही, पण बरेचदा बरेचजण ही चूक करतात... तुलनेची चूक! आपण स्वत:ची तुलना दुसऱ्याशी करतो की माझ्यापेक्षा याच्याकडे जास्त काही आहे, जास्त स्थावरजंगम मालमत्ता, जास्त प्रसिद्धी, जास्त खेळणी वगैरे. मात्र जर आपण स्वच्छ डोळे उघडून पाहिलं तर लक्षात येतं, या जास्तीच्या गोष्टींसोबत जास्तीचं दु:ख, जास्तीचं नैराश्यही तिथं वास करून आहे. त्याचवेळी जाणीव होते की आपण आपल्याला मिळालेलं जन्माचं हे वरदान बदल घडण्यासाठी आपण वापरू शकतो. वापरायला हवं.

आपल्या अनुभवांचा आवाका कळण्यासाठी नि त्याबद्दलची एक भरीव समज येण्यासाठी आपल्याला लोकांची गर्दी नि त्यांच्या अपेक्षा यापासून एकांत मिळवावा लागतो. या शांत क्षणांमध्येच बरेच उलगडे होतात. आपण आपल्या भवताली असणाऱ्या लोकांसोबत किंवा बातम्यांमधून झळकणाऱ्या सेलिब्रिटींसोबत स्वत:ची तुलना करत राहिलो तर आपल्याबद्दलचं एक स्वतंत्र मोठं चित्र आपल्या नजरेत येऊ शकणार नाही. जगाच्या कुठल्या निकषात आपण पूर्णपणे ठीकठाक बसतो याचा काही अंदाजच आपल्याला लागणार नाही.

काही काळ शांत नि स्थिर बसून राहाणं ही एक मोठीच कठीण गोष्ट वाटावी असे सध्याचे दिवस आहेत. असंख्य तऱ्हेच्या व्यवधानांमुळे मीही कधीकधी हलून जातो. आपण संगीत ऐकतो, पॉडकास्ट नि व्हिडीओज पाहतो, इंटरनेटवर काहीतरी धुंडाळत राहातो... या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात, गेल्या दोन वर्षात इतक्या नव्या डेटाचं निर्माण झालंय जितकं गेल्या काही शतकांमध्ये नि सहस्त्रकांमध्ये झालं नव्हतं. जितका आजूबाजूचा आवाज नि उलथापालथ वाढतेय तितकेच शांततेचे नि एकांताचे क्षण व छोटे कोपरे आपल्याला मिळणं अत्यावश्यक होऊन बसलं आहे.

अलीकडे मी अनेक विद्यापीठांमध्ये बोलायला जात असतो. तिथं मी माझा हा भिन्नत्वाच्या उत्सवाचा नि घुसळणीचा मुद्दा नेहमी मांडतो. भिन्न वंश, धर्म, श्रद्धा, संस्कृतीच्या तरूण मुलामुलींनी एकत्र येऊन शिकण्याची जागा तयार व्हायला हवी. अशा विविधतेला एकत्र आणता यावं म्हणून आपल्या प्रवेशविषयक धोरणांमध्ये अधिक लवचिकता आणत विद्यापीठांची प्रशासनं जितका जास्त प्रयत्न करू पाहताहेत तितकं जास्त विद्यार्थीवर्ग या मुद्‌द्याला क्षीण करतो आहे. हा विद्यार्थीवर्ग समविचारी गटांमध्येच मिसळणं पसंत करतो, त्यांना वर्गामध्येही फार वेगळेपणा चालत नाहीत, सुरक्षित गटातटांच्या आजूबाजूलाच ते बसतात, यामुळं नव्या नि अस्वस्थ करणाऱ्या वेगळ्या गोष्टींमध्ये त्यांना घुसावं लागत नाही. ते त्यांना नकोच असतं. 

मी असं ऐकलंय की काही शाळांमध्ये ‘ट्रिगर वॉर्निंग’ नावाचा एक प्रकारही असतो... एखादं व्याख्यान, अभ्यासासाठीचं एखादं पुस्तक आपल्या श्रद्धा नि मान्यतांशी निगिडत नसल्याने समजा विद्यार्थी अस्वस्थ झाले तर त्यांनी ही ‘ट्रिगर वॉर्निंग’ द्यावी म्हणजे त्यानुसार कार्यवाही होईल. हे शिक्षण कसं काय झालं मला सांगा? कितीतरी महाविद्यालयांनी हा संकुचित दृष्टीकोन स्वीकारला आहे. क्रमिक पुस्तकात सांगितल्याप्रमाणं शिकणं आणि आपल्या करिअरसाठी जे लागतं त्याची तयारी करत मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं या पलीकडे शिक्षण ही काहीतरी व्यापक चीज आहे. अमेरिकेतल्या उत्कृष्ट महाविद्यालयांमध्ये असे कितीतरी भित्रे विद्यार्थी नाखुषीनं स्वत:ला बंद करून शिकताहेत हे जर आजोबांनी बघितलं असतं तर ते खरोखर खूप दु:खी झाले असते.

बापूजींची एकांताची कल्पना अशी अजिबात नव्हती. आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारी माणसं, वेगळ्या कल्पना पटत नाहीत म्हणून त्यांच्यापासून फटकून राहाणं हा एकांत नव्हे. सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं! बापूजी सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यायचे आणि त्यांच्या खास एकट्याच्या वेळेत सगळे विचार, कल्पना तोलून पाहायचे नि निर्णय घ्यायचे की त्यांना नक्की कुठल्या दिशेला जायचं आहे. आपल्या विरोधी विचारांच्या माणसांच्या समोर बसून, डोळे भिडवून त्यांची विविध मतं नि दृष्टीकोन ऐकायला हवेत असं बापूजी सांगायचे. एखाद्या व्याख्यात्यानं आपल्याला पटत नाहीत असे मुद्दे मांडल्यावर वर्गातून उठून जाणारे विद्यार्थी बघून बापूंना खरोखर निराश वाटलं असतं हे मला माहितीय.

बौद्धिकदृष्ट्या सुरक्षित जागेवर बसणं ही धोकादायक गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही इतरांचे दृष्टीकोन, त्यांची पद्धत यांच्यापासून एक विशिष्ट अंतरावर राहाण्याचा निर्णय घेऊन टाकलेला असतो. ही जागा मग गैरसमजांचं नि पूर्वग्रहांचं कुरण बनते. त्यातून बाहेर येण्याची शक्यताच नसते, कारण दुसऱ्याचं ऐकून न घेण्याचा निर्णय हा गैरसमजांची न संपणारी साखळी तयार करत राहातो. अशा सगळ्या संकोची वातावरणात ‘शिकागो विद्यापीठा’नं स्वीकारलेल्या शिक्षणपद्धतीवर बापूजी फार खूष झाले असते. तिथं कुठलीही नवी कल्पना अथवा दृष्टीकोन मांडल्यावर विद्यार्थ्यांनी उठून जाऊ नये हा संकेत आहे. चर्चेला वाव अर्थातच आहे.

‘‘तुमचं मन खूप खिडक्या असणाऱ्या खोलीसारखं हवं! सगळीकडून वारा खेळू दे, पण कशानंही वाहून जायला नकार देता यायला हवा.’’, बापूजी म्हणाले होते. हा सल्ला मला फार मोलाचा वाटतो. वेगवेगळी माहिती, कल्पना, वेगवेगळे दृष्टीकोन यांच्या झुळका आपण आपल्या आत, जगण्यात येऊ द्याव्यात, पण त्यानं तुम्ही भारावून जाता उपयोगी नाही. मन मोकळं ठेवण्याचा अर्थ, आपल्या दिशेनं येईल ते स्वीकारणं असा होऊ शकत नाही. स्वीकार ही पुढची पायरी, त्याआधी ऐकण्याची पायरी असते. ऐकणं ही महत्त्वाची कृती आहे या गोष्टीवर यातून शिक्कामोर्तब होतं.

जगामध्ये मिसळून जात जितक्या नव्या कल्पनांचा स्पर्श तुम्हाला होतो तो होऊ द्यावा... पण त्यानंतर आपला एकांताचा कोपरा गाठावा आणि शांतपणे या सगळ्यावर विचार करावा, ठरवावं, की जग आणखी चांगलं व्हावं म्हणून यातल्या कोणत्या कल्पनांचा पाठलाग एक माणूस म्हणून मला करायचा आहे!

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी


वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले सहा भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...
6. वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ एकांत सोशल मिडिया आत्मपरीक्षण Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Seclusion Solitutde Social Media Introspection Load More Tags

Add Comment