बापूजींना कुणी मारूच कसं शकतं आई?

वरदान रागाचे - भाग 22

मी आजोबांकडं दोन वर्षं राहिलो. सेवाग्राममधला तो काळ बापूंसाठी आणि जागतिक इतिहासासाठी कलाटणी देणारा होता. भारतातली सगळी राजकीय ताकद पणाला लागली होती. देशप्रेमानं उसळली होती. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्याचा ऐन क्षण जवळ येत चालला होता. सर्व जाती, धर्म आनंदानं एकत्र नांदतील असा एकसंध देश बापूजींना हवा होता... पण त्यांच्या या स्वप्नाला वारंवार तडाखे बसत होते. भारताच्या उत्तर प्रांतातला काही भाग वेगळा करून स्वतंत्र मुस्लीम देशाची निर्मिती करण्याची कल्पना दशकभर रेटली जात होती. या नवीन देशाचं नाव पाकिस्तान असणार होतं. पाकिस्तान म्हणजे पवित्र स्थान. वाटाघाटींनी वेग घेतला असला तरी फाळणीच्या कल्पनेला बापूजींचा विरोध होता.

फाळणी मोहिमेच्या धुरिणांपैकी एक नेते होते मुहम्मद अली जीना. बापूजींप्रमाणेच त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राची सुरुवात वकील म्हणून केली होती. ते लंडनमध्ये होते. मुळात थोडा घमेंडी आणि उद्धट स्वभाव त्यांना बाजूला सारता आला नाही. त्यांनी बापूजींशी वेळोवेळी प्रचंड वाद घातला होता. असं असताना भारताचं स्वातंत्र्य दाराशी आल्यावर बापूजींनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जीनांचं नाव त्या वेळचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना सुचवलं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. भारताला एकसंध राखण्याचा आणि मुस्लीम अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकण्याचा हा अखेरचा मार्ग बापूजींनी चाचपून पाहिला होता.

त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करता... बापूजींची ही सूचना खरोखर प्रभावी होती. असाच प्रसंग अमेरिकेत निर्माण झाला होता तेव्हा तिथे वेगळं घडताना मी पाहिलं होतं. अमेरिकन राजकारण्यांची सत्ताकांक्षा इतकी तीव्र आहे की, अस्तित्वात असलेले कायदे त्यांनी झुगारून दिले, सुप्रीम कोर्टाच्या अपॉइंटमेंट्‌स थांबवल्या आणि स्वतःचा अहंकार नि युद्धखोरी फुलवण्यासाठी चक्क सरकार बरखास्त केलं. अशा प्रसंगात भूतकाळात बापूजी कसं वागले? व्यक्तिगत इच्छा आणि भावभावना यांपेक्षा देशाचं हित मोठं हेच त्यांनी त्यांच्या वागण्यातून प्रत्येक वेळी दाखवून दिलं.

लॉर्ड माउंटबॅटन नंतर म्हणाले की, बापूजींच्या पंतप्रधानपदाबाबतच्या वेगळ्याच प्रस्तावानं ते अक्षरशः हलले, स्तब्ध झाले... पण ती वेळ आदर्शवादी कृतीची नव्हती. ठरलेल्या आणि सर्वमान्य झालेल्या नियोजनाप्रमाणे कृती करणं आता अत्यावश्यक होतं. त्यानुसार नेहरू पंतप्रधानपद भूषवतील आणि जीना पाकिस्तानचे सर्वोच्च नेते असतील हे ठरलं होतं. विभाजनाच्या गुंतागुंतीच्या वाटाघाटीतून बापूजींना तुटलेपणाची भावना जाणवत होती... पण ते हातावर हात ठेवून स्वस्थ बसणारांतले नव्हते. हिंदू-मुस्लीम तणावातून देशात पेटलेल्या संघर्षामुळं रस्त्यांवर प्रेतांचा खच पडत होता... हा रक्तपात थांबवणं गरजेचं होतं. त्यासाठी बापूजींचा प्रवास सुरू झाला.

3 जून 1947 रोजी वाटाघाटी संपल्या आणि अंतिम करारावर सह्या झाल्या. इकडे भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं आणि लगेचच त्याचे तुकडे होऊन दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. फाळणीमुळं हिंसेला चिथावणी मिळाली, हिंदू-मुस्लीम ताण टोकाला पोहोचला. 15 ऑगस्टला स्वतंत्र भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या आनंदात सहभागी होण्याचा उत्साह बापूजींना वाटणं शक्य नव्हतं; ठुसठुसणारं मन घेऊन ते वावरत होते. एकत्र बांधलेला वाटणारा समाज मोठ्या प्रमाणात विखुरायला सुरुवात झालीच होती. लोक कुठं जाणार, कुठं राहणार याचे निर्णय होत होते... पार्श्वभूमीला हिंसा होतीच. या फाळणीनं जगाच्या इतिहासातलं सगळ्यात विराट स्थलांतर घडलं आणि सुमारे पंधरा कोटी लोक रक्तपात आणि सांप्रदायिक हिंसाचार यांतून जीव वाचवत आपल्या सुटकेच्या प्रयत्नात स्थलांतरित झाले. या प्रयत्नांत लाखो लोकांनी प्राण गमावले.

ऑगस्टच्या सुरुवातीला बापूजींनी दौऱ्याचं नियोजन केलं होतं. देशाच्या ज्या-ज्या भागात हिंसा आणि रक्तपात होतो आहे... तिथं थेट जायचं त्यांनी ठरवलं होतं. सांप्रदायिक हिंसाचार वाढत जाऊन प्रचंड कत्तली होणार या दहशतीखाली कलकत्त्यातले आणि दिल्लीतले लोक होते. मलाही बापूजींसोबत जायची इच्छा होती... पण त्यांनी ठाम नकार दिला. ‘लहान मुलांनी जायची ती जागा नाही.’ असं ते म्हणाले होते.

मी मागेच थांबलो. बापूजींनी वेगवेगळ्या शहरांना भेटी देणं सुरू केलं. दंग्यांनी शहरं उद्ध्वस्त झाली होती. भविष्यात काय होणार याची टांगती तलवार लोकांवर होती. आपली माणसं, कुटुंबं, घरंदारं, आपले उद्योगधंदे यांचं फाळणीनंतर काय होणार याची चिंता होती. विद्वेषाचा तो प्रचंड कहर बघून बापूजीही धास्तावले होते. बापूजींची ट्रेन कलकत्त्याला थांबली तेव्हा स्वातंत्र्यदिनापर्यंत दौरा थांबवण्याची विनंती तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यांना केली. हिंसेचा चेहरा आणखी विकराळ होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांना भेडसावत होती. बापूजींनी त्यांची विनंती एका अटीवर मान्य करण्याचं आश्वासन दिलं. ते म्हणाले, ‘मी प्रवास थांबवतो... पण माझी आणि मुस्लीम लीगचा भाग असणारे त्यांचे पंतप्रधान हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी यांची राहण्याची व्यवस्था एका छताखाली तुम्ही करायला हवी.’

‘संकटकाळ कल्पनेपलीकडचा असतो. त्या काळात पूर्वी कधी कल्पना केली नसेल असे साथीदार आपल्या सोबतीला मिळून जातात!’ इतकंच ते म्हणाले होते. 

बापूजींची मागणी वरून सहज नि काहीशी भाबडी वाटली तरी ती एक चातुर्यपूर्ण योजना होती. जगात सगळ्यात जास्त ख्याती लाभलेला हिंदू आणि समाजात अतिशय महत्त्वाची मानली जाणारी मुस्लीम व्यक्ती एकत्र दिसले तर हिंसक झालेल्या समाजासाठी नकळत एक संदेश गेला असता. रस्त्यारस्त्यांवर चाललेला रक्तपात आणि हत्या यांचं सत्र  कदाचित धिमं झालं असतं. ते थांबलं असतं का? आणखी काय घडू शकलं असतं? मुळात त्या ताणतणावाच्या परिस्थितीत असा विचार करता येणं हेच विलक्षण होतं. बापूजी आणि सुऱ्हावर्दी या दोघांनी जवळच्या एका घराला भेट दिली. आसपासच्या घरांमधून ते एकच घर ओकंबोकं पडलेलं जाणवत होतं. जातधर्मातून निपजलेल्या हाणामारीत लुटलं गेलं होतं. तिथं गेल्यागेल्या जमावानं बापूजींना घेराव घातला. जमाव भयंकर चिडलेला होता. आता हे लोक आपल्याला संपवणार असं बापूजींना क्षणभर वाटून गेलं... मात्र कशाचाच परिणाम होऊ न देता बाजूला उभ्या सुऱ्हावर्दींसोबत बापूजी शांतपणानं बोलत राहिले. यातून परिणाम घडला. नवल वाटावं अशी कलाटणी मिळाली.

15 ऑगस्टला आणखी विदीर्ण करणारी हिंसा होण्याची शक्यता होती... पण कलकत्त्यामध्ये लोकांनी एकत्र येऊन शांतपणे मोर्चा काढला. ‘हिंदू-मुस्लीम भाईभाई’ असे नारे दिले. आजोबांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या. ‘कलकत्त्यातील चमत्कारा’बद्दल लॉर्ड माउंटबॅटन यांनी बापूजींचं अभिनंदन केलं आणि कबुली दिली, ‘सैन्यालाही हार पत्करावी लागते तिथं तुम्ही शांततेचं मरुद्यान फुलवता...’ भारतभर उसळलेल्या दंगलींच्या नि रक्तपाताच्या गोंधळात माउंटबॅटन यांचे हे कौतुकाचे उद्‌गार म्हणजे अहिंसेच्या ताकदीचा पुनरुच्चारच....

दरम्यान दिल्लीमध्ये नव्या पंतप्रधानांनी स्वतंत्र भारताचा झेंडा पहिल्यांदा फडकवला.

‘या सगळ्याचं श्रेय कुणाला द्यायचं असेल तर गांधीजींनाच द्यायला हवं.’ असं जल्लोश करणाऱ्या गर्दीला पंतप्रधानांनी सांगितलं.

मी त्या वेळी अन्य कुटुंबीयांसोबत मुंबईमध्ये होतो. लाखो लोक रस्त्यारस्त्यांवर चाललेल्या फेऱ्यांमध्ये, नृत्यांमध्ये सहभागी झाले होते.

‘आनंदानं उसळण्याचं काही कारण मला दिसत नाही.’ असं आजोबा म्हणाले होते. आजोबांच्या भावनेचा, त्यांच्या मनाचा आदर म्हणून आमच्यापैकी कुणीही या जल्लोशात सामील झालं नाही.

आम्ही लहानमोठी मुलं मिळून रस्त्यावरची रोशणाई नि हर्षोल्लास बघायला बाहेर पडलो... नाही असं नाही... पण मला आठवतंय की, बाहेरचा उत्सव माझ्या मनावर ओरखडे उमटवत होता. फाळणी होऊ नये म्हणून वारंवार केलेली विनंती निरुपयोगी ठरत आहे हे जाणवून बापूजींचे डोळे मलूल झाले होते. एरवीचे साथीदार सत्तेच्या ताकदीपाठीमागे कुठं कुठं विखुरले होते, घाईत होते. ज्या-ज्या विचारानं, तत्त्वानं आपण जगलो, राजकारण केलं... त्या सगळ्याची जणू पीछेहाट होतेय असं बापूजींना जाणवत होतं. फाळणीतून दोन स्वतंत्र देश मिळाले तरी लोकांमध्ये प्रचंड फूट पडणार आहे असं त्यांना दिसत होतं. झालंही तेच. दोन्ही बाजूच्या लोकांच्या बेसुमार कत्तलींचं भीषण दृश्य साऱ्या देशानं पाहिलं.

तरीही बापूजींनी प्रयत्न सोडले नाहीत. ते या ना त्या गावाला, या ना त्या शहराला भेटी देत राहिले. शांततेचं आणि विवेकाचं आवाहन करत राहिले. ते प्रयत्न जमावाच्या रागापुढं नि असुरक्षिततेपुढं तोकडे पडले. पुन्हा उसळलेल्या दंग्यांचं नि हत्यांचं सत्र त्यांना थोपवता आलं नाही. घाबरलेले निर्वासित विखरू लागले, त्यांना मार्ग सुचेना. दिसेल त्या दिशेनं पळत सुटणं आणि जीव वाचवणं इतकंच हातांत उरलं. एका गावातून बातमी आली की, लोक पन्नास-पन्नास मैल अंतर पायी कापून आपल्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताहेत. तशाही अवस्थेत बापूजी दिल्लीला पोहोचले. भडकलेल्या जमावाच्या अगदी जवळ होते बापूजी. अक्षरशः लॉर्ड माउंटबॅटन यांचं घरही मृत्यूच्या तांडवातून वाचलं नाही. या कोलाहलात बापूजींची वागणूक शांतपणाची होती. त्या वेळी देशभर उसळलेली हिंसा आणि क्रौर्य दुर्दैवी पुरावा म्हणून आजही समोर आहेत... या घटना जणू... अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग सुटला की काय घडतं... याचा खेदजनक पुरावा आहेत.

देशामधलं अस्थैर्य पाहता... दक्षिण अफ्रिकेत परतण्याचा निर्णय आईवडलांनी घेतला. त्या काळात समुद्रमार्गानं भारतातून दक्षिण अफ्रिकेत यायला सुमारे बावीस दिवस लागायचे, कधीकधी ते वाढायचेही. नोव्हेंबरच्या सुरुवातीला पहिला मार्ग खुला होणार होता... म्हणजे परत जाण्यासाठी अजून तीन महिने वाट बघायला लागणार होती.

वडलांनी आपलं नियोजन बापूजींना सांगितलं. बापूजींनी प्रवासासाठी आशीर्वाद दिले. माझ्यासाठी खास निरोप आला त्यांच्याकडून, ‘अरुणऽ मी काय काय सांगितलंय ते विसरू नकोस.’ बापूजी जवळ असणार नव्हते... त्यामुळं त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच आठवाव्या लागणार होत्या. पुढे त्यांनी लिहिलं, ‘तू मोठा होशील तेव्हा शांततेचं कार्य सुरू ठेवशील अशी आशा करतो.’

दोन वर्षांच्या त्यांच्या सहवासात मी खूप काही शिकलो होतो. लहान असलो तरी थोडा अजून उंच झालोय असं त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं मला वाटायला लागलं. उत्साह जाणवू लागला.

त्या वेळी कुठं जाणीव होती की, आजोबा शेवटचं काही सांगताहेत मला. पुन्हा कधीही बोलणार नाहीत माझ्याशी.

मी बापूजींजवळ शेवटचं राहिलो... त्या काळात भारतामध्ये सकारात्मक आणि परिवर्तनाची ऊर्जा म्हणून सगळे त्यांच्याकडं पाहत होते. देशाच्या पातळीवर व्यापक काही घडवताना माझ्यासारख्या छोट्या मुलामध्येही ते बदलाचं, प्रेरणेचं कारण ठरत होते. पूर्वीच्या मानानं माझा संताप कमी झाला होता. जेव्हा कधी चिडायचो तेव्हा त्या रागाचं रूपांतर चांगल्या गोष्टीत कसं करायचं हे मला कळायला लागलं होतं. माझ्यातल्या सकारात्मकतेच्या ठिणगीनं मी जगात चांगलं करायला उद्युक्त होणार होतो. अहिंसेचे बारीकबारीक कंगोरे पाहायला मी शिकलो होतो. बापूजींच्या मार्गदर्शनानुसार माझं आयुष्य मला चांगल्या कामांसाठी अर्पण करायचं होतं. हिंसेला प्रवृत्त करणाऱ्या विषमतेविरोधात आणि धार्मिक कट्टरतेविरोधात मला लढायचं होतं.

मी खूप लांबचा प्रवास करून आलो होतो नि लांबच्या प्रवासाला निघणार होतो... पण आत्ताचा प्रवास पूर्वीसारखा भिववणारा नव्हता. माझ्या मनात जुन्या आठवणींची गर्दी झाली होती. आईवडलांबरोबर वर्ध्याच्या रेल्वे स्टेशनपासून धूळभरल्या रस्त्यातून सेवाग्रामपर्यंत चालत आलो तो दिवस मला आठवत होता. मी अजूनही किशोरावस्थेतच होतो... पण आता स्वतःला नि बाकीच्यांना काही सिद्ध करून दाखवण्याचा निर्धार माझ्या मनात होता. माझ्या सहज वागण्यावर, बुद्धीवर अहंकाराचा कब्जा मी यापुढे होऊ देणार नव्हतो. विनयशीलतेबद्दल मला बरंच काही शिकायला मिळालं होतं. तुमचं मन तुमच्या कृतीतून दिसत राहतं. त्यातून विनयशीलतेचं ‘असणं’ लपत नाही.

अखेर आम्ही दक्षिण अफ्रिकेत परतलो. वडलांनी आनंदाची बातमी दिली. भारतीय मुलांसाठी फिनिक्स आश्रमापासून जवळच एक नवी शाळा सुरू झालीय. हुश्श वाटलं कारण सतत शिक्षा देणाऱ्या कडक ननच्या कॉन्व्हेंट शाळेत जाऊन शिकायची माझी तयारी नव्हती. इलाची नि माझी चांगलीच सोय झाली. रोजरोजचा सतरा मैलांचा प्रवास वाचला. सगळं काही चांगलं चालू असलं तरी अफ्रिकेत परतल्यापासून करमत नव्हतं. वेगळंच वाटत होतं. दोन वर्षांत मी खूप बदलून गेलो होतो. नवा माणूस झालो होतो. फिनिक्स आश्रमातल्या आमच्या घरात सेवाग्रामपेक्षा बऱ्याच सोयी होत्या, आराम होता. तिथल्यापेक्षा चांगला स्वयंपाक इथे व्हायचा. असं असलं तरी माझं मन आजोबांजवळच राहिलं होतं. माझ्या मनात सतत विचार यायचा... भारतात आजोबांकडे परत जायला हवं.

...मात्र ते कधी घडू शकलं नाही. आम्ही अफ्रिकेत परतल्यावर दोन महिन्यांनी, 30 जानेवारीला कल्पनेपलीकडची वाटेल अशी ती घटना घडली.

मी आणि इला शाळेतून घरी निघालो होतो. शेतकऱ्यांच्या ट्रक्सच्या नि ट्रॅक्टर्सच्या रहदारीतून तयार झालेल्या चिखलाच्या कच्च्या रस्त्यावरून चालायला वेळ लागत होता. उसाच्या शेतीतून काढलेल्या त्या वाटेत प्रचंड उकडत होतं. थोडं चाललो तोच इलानं असहकार पुकारला. आणखी चालू शकत नाही असं म्हणत सुस्कारा सोडून तिनं रस्त्यावर बसकण मारली. ‘मी नाही चालणार आणखी, माझे पाय दुखताहेत. तू मला उचलून ने...’ असं ती म्हणायला लागली.

बापूजींकडं राहून येण्यापूर्वीचा मी असतो तर तिला खेचत घरी नेलं असतं. किमान बालीशपणाबद्दल तिला ओरडलो तरी असतो. माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होती ती. तिचं काही ना काही असं चालायचंच. या वेळी मात्र मला अशी परिस्थिती कशी हाताळायची हे ठाऊक होतं. तिचं मन न दुखावता समजुतीनं हा प्रसंग मी पार पाडला.

‘मी काही तुला उचलून नेणार नाही... मात्र एक होईल हंऽ तुला इथंच सोडून मी निघून जाईन. तू बस किती वेळ बसायचं असेल तोवर.’ मी शांतपणानं तिला म्हणालो.

अर्थात असं म्हणालो तरी मी तिला सोडून जाणार नव्हतो. मी तिथंच उभा राहिलो. तितक्यात फिनिक्स आश्रमात राहणारे एक प्रौढ गृहस्थ झपाझप पावलं टाकत आमच्या दिशेनं येताहेत असं मला दिसलं. एरवी कधी आश्रमाचा परिसर सोडून ते बाहेर यायचे नाहीत त्यामुळं त्यांना बघून मला खूप आश्चर्य वाटलं. वाटलं, ते कुठंतरी निघालेत पण क्षणभरात भान आलं की, आम्हालाच शोधत ते इथपर्यंत आलेले आहेत.

जवळ आल्यावर धापा टाकत ते घाईत म्हणाले, ‘अरुणऽ पटकन घरी चल. तुझ्या आईनं तुला बोलावलंय. तिला गरज आहे तुझी. इलाला मी आणतो. तू पळ.’

‘होऽ घराकडेच निघालोय... पण इतकी गडबड कशाची?’

‘तू जा लवकर. पळ. बोलत बसू नको. आईला गरज आहे तुझी.’

मग मला जाणवलं की, काहीतरी खरोखर गंभीर घडलं आहे. घरी पोहोचलो तर आई फोनवर बोलताना हुंदक्यांनी अक्षरशः थरथरत होती. मी येताच तिनं फोन ठेवला पण तो पुन्हा वाजला. तिनं तो घेतला पण तिला बोलणं जमेना.

पुन्हा पुन्हा वाजणारा फोन, न आवरणारे हुंदके यांच्या दरम्यान कसंबसं तोंडातल्या तोंडात पुटपुटत तिनं तिला कळलेली भयंकर बातमी मला सांगितली.

माझ्या लाडक्या आजोबांची हत्या झाली होती.

‘आता ते कधीही दिसणार नाहीत आपल्याला...’ आई रडत म्हणाली.

मी भयचकित झालो होतो... कसंबसं इतकंच विचारलं की, वडील कुठं आहेत.

‘ते सकाळीच शहरात एका मिटिंगसाठी गेले आहेत. त्यांच्याशी कसा, कुठं संपर्क करायचा मला कळेना झालं आहे.’ आई अस्वस्थपणे म्हणाली.

तिला माझ्याशी आणखी बोलायचं होतं पण फोन सतत वाजत राहिला. लोकांना बातमी कळत होती तसतसे ते गांधी कुटुंबीयांशी बोलू पाहत होते. त्या सगळ्या गोंधळात काही समजेनासं होऊन मी रडायला लागलो. नुकताच तर परत आलो होतो आजोबांकडून... पण गेल्या दोन वर्षांतले सगळे क्षण डोळ्यांसमोरून झरझर सरकत होते. चरख्यावर त्यांच्यासोबत लावलेली शर्यत, फिरताना आमच्या खांद्यांवर त्यांनी घेतलेला झोका, मी त्यांना हसवायचा प्रयत्न करायचो तेव्हा त्यांनी माझ्या गालावर थोपटलेला त्यांचा तळवा... कितीतरी आठवणी! आता ते आम्हाला सोडून गेले आहेत यावर विश्वास बसणं कठीण जात होतं.

‘बापूजींना कुणी मारूच कसं शकतं आई?’

यापूर्वीही त्यांना मारण्याचा प्रयत्न उजव्या हिंदू गटांकडून झाल्याचं मला माहिती होतं... बापूजींनी त्यांना फसवलं अशी त्यांची भावना असल्यामुळं त्यांचा बापूजींवर राग होता... मात्र या सगळ्या हल्ल्यांना बापूजी पुरून उरले होते. त्यांना संपवणं शक्यच नाही असं त्यामुळं मला वाटायला लागलं होतं.

दरम्यान वडील घरी परतले. बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी कारण त्यांचा रंग एकदम उडाला होता. ते डोळ्यांतलं पाणी कसंबसं आवरून धरताहेत हे ओळखू येत होतं. मिटिंग संपल्यावर फळं घ्यायला मंडईत गेले तेव्हा ती भयंकर बातमी त्यांना कळली. त्यांची अवस्था बघून दुकानदारांनी आम्ही घरी पोहोचवतो असं सांगितलं... पण नकार देऊन, आपलं बळ कसंबसं टिकवून वडील घरी पोहोचले. आल्या-आल्या त्यांनी आईला मिठी मारली, आम्हाला जवळ घेऊन ते तसेच बसून राहिले.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा दंगली हिंदू मुस्लीम दंगली महंमद अली जिना गांधी हत्या Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Solani Navangul Non- Violance Riots Hindu Muslim Ritos Mohammad Ali Jinnah Gandhi Assasination Load More Tags

Add Comment