आद्य धर्म आणि धर्मव्यवस्था...

चार्वाक लेखमालेचा भाग - 3

लोकायत हा जगाचा आद्य धर्म आहे. तो कुणा गुरूच्या ग्रंथातून वा ईश्वराकडून माणसाला मिळाला नाही. तो त्याने स्वतःच आत्मसात केला आहे. या धर्माची सारी शिकवण शब्दांतून येत नाही. ती प्रत्यक्ष अनुभवातून येते. आईवडील शिक्षक समाज, राजा वा सामाजिक संस्था तो  सांगत नाहीत. तो ज्याचा त्याने प्रमाणपूर्वक वा प्रयत्नातून मिळवलेला व जपलेला असतो. या धर्माची अनेक नावे आहेत. चार्वाक, बार्हस्पत्य वा जीवनाचे शास्त्र जेवढी नावे अधिक तेवढाच त्याचा आवाका वा प्रभावाचे क्षेत्रही मोठे आहे. तो ज्ञानी वा अज्ञानी, शिक्षित वा अशिक्षित, शहरी वा ग्रामीण किंवा पाश्चात्य वा पौर्वात्य अशा सर्व व्यक्तींना सहजगत्या प्राप्त होणारा आहे. 

जगातील प्रत्येकच प्रस्थापित धर्मांच्या जन्माचा काळ, स्थळ व बरेचदा त्यांचे संस्थापक सांगता येतात. गौतम बुद्ध आणि महावीर यांचे जन्म सहाव्या शतकात झाले. त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या मुहूर्ताला त्यांच्या धर्माचा जन्मकाळ म्हणता येतो. महंमद पैगंबराचा जन्म 570 या वर्षी मक्केमध्ये कुरेश या जमातीत झाला. त्याच्यावर अल्लाचा पहिला संदेश (इ.स.पू.) 612मध्ये मक्केत उतरला. ती इस्लामची जन्मतारीख आहे. येशू ख्रिस्त 1 जानेवारी 1 या दिवशी बेथलहेमध्ये जन्मला. त्याने ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. हिंदू व ज्यू या धर्मांचे आद्यग्रंथ व त्यांचे मूळ पुरुष इतिहासाला ठाऊक नाहीत. ज्या दिवशी ते गवसतील त्या दिवशी त्या देान धर्मांचा जन्मकाळही सांगता येईल. 

धर्मांची याविषयीची एक बतावणी अशी की, या धर्मसंस्थापकांनी धर्म निर्माण केले नाहीत तर त्यांनी पूर्वीच अस्तित्वात असलेले धर्म संपादित व संग्रहित केले असे त्यांचे अनुयायी सांगतात. महावीरांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले तर बुद्धाच्या अगोदर  10 बोधिसत्त्व होऊन गेले असे म्हटले जाते. पैगंबराच्या अगोदरही सव्वा लक्ष प्रेषित अल्लाने पृथ्वीवर पाठवले असे सांगितले जाते. आपला धर्म पुरातन, अतिप्राचीन व ईश्वर वा मूळ सत्याच्या जवळचा आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. 

डार्विनच्या सिद्धान्ताप्रमाणे माणूस माकडांपासून उत्क्रांत झाला. अनुभवाने प्राप्त होणारा धर्म त्या मनुष्यपूर्व माकडांच्या अवस्थेतसुद्धा संस्कार घडवणारा व त्यांची वागणूक व वर्तन निश्चित करणारा आहे. 

माणूस स्वतंत्र असतो. त्यावर वर्ग, राज्य, धर्म वा आणखी कोणते नियंत्रण नसते, तो स्वतःच तेवढा असतो तेव्हा तो याच धर्माच्या शिकवणीनुसार वागत असतो. जन्माला येणारे मूल कोणताही संघटित धर्म घेऊन येत नसते. त्याच्यावर कुठला संस्कारही नसतो. प्रथम आईच्या, मग इतर नातेवाइकांच्या सहवासाने त्याला त्या गोष्टी लाभतात. त्यांच्यावाचूनही तो जगू, राहू व वाढू शकतो. उपजीविका हीच तेवढी त्याची गरज असते. मग त्याच्या वाट्याला जे संस्कार येतात ते अनुभवाने दिलेले असतात. मूल कुटुंबात वाढले तरी तिथे त्याला लाभणारे संस्कारही अनुभवांवर आधारितच असतात. अनुभव हीच जगाची पहिली शाळा आहे. तीच माणसांच्या या पहिल्या आद्य संस्कृतीची निर्मिती आहे.

अनुभव हा ज्ञानाचा निर्माता आहे आणि अनुभवाचे उगमस्थान दृश्य व इंद्रियगोचर जग हे आहे. जे अनुभवाला येते त्याची साठवणूक, चिंतन, विचार, अध्यापन ही ज्ञानाची प्रक्रिया असली तरी त्यातल्या कोणत्याही अवस्थेत अनुभवाचे वा तो देणाऱ्या जगाचे अस्तित्व वा अनुभूती नाकारता येत नाही. ज्ञानाची निर्मिती अशी होते. (प्रस्तुत लेखकाच्या घरी एके काळी संत्र्याची बाग होती. तीत माकडे येत. ती झाडावरची संत्री ओरबाडत. तेव्हा लक्षात आलेली विलक्षण गोष्ट ही की, त्या संत्र्याची साल ती त्याला डोळ्यासमोर धरून काढत नसत.  मागे हात नेऊन ती मागे संत्री सोलत असत. डोळ्यांसमोर संत्रे सोलले तर त्याच्या सालीचे पाणी डोळ्यांत जाते व त्याचा त्रास होतो हे त्यांना कसे कळले होते? कशामुळे? ग्रंथवाचनाने, शाळेत गेल्याने की स्वतःच्या अनुभवातून? अनुभव हीच त्यांचीही शाळा व तोच त्यांचा ज्ञानग्रंथही.) 

धर्म वा राज्य यांची उगमस्थाने वेगळी आहेत. त्यांचा अनुभवांशी असलेला संबंध दुरान्वयाचा व जगाशी संबंध सत्तेच्या धारणेपुरता मर्यादित आहे. प्रत्यक्ष ज्ञान ही त्याची निर्मिती नाही. तो त्याचा विषयही नाही. विनोबा म्हणायचे, ‘शाळेत पुस्तकातून दिलेले शिक्षण हे बाहेरून आणलेले पाणी विहिरीत भरण्यासारखे आहे.’ ज्ञान ही माणसातली उपजत शक्ती आहे. तिला अनुभुतीची चेतनाच तेवढी द्यायची असते. ती शाळा, कॉलेजांत मिळत नाही. तिथे फक्त माहिती दिली जाते. ती चेतना अनुभवातून येत असते. 

लोकायतांचा, बार्हस्पत्यांचा आणि चार्वाकांचा सारा भर या अनुभूतिजन्य चेतनेवर आहे. इंद्रियांच्या अनुभवाला येते, प्रत्यक्षात दिसते आणि जाणवते ते ज्ञान. ते प्रमाणातून वा तर्कातूनही प्रकट होते. जे यात बसत नाही ते अज्ञान वा अंधश्रद्धा होय. विनोबांची उपजत व अनुभूतीच्या चेतनेशी येणारी जाण व चार्वाकांचे अनुभूतिजन्य ज्ञान हे परस्परांना अधिक जवळ आणणाऱ्या आहेत.

ज्ञान हे अनुभवजन्य असेल तर अनुभवाला न येणाऱ्या गोष्टी खऱ्या कशा मानायच्या? जग अनुभवाला येते, समाज अनुभवाला येतो... पण ईश्वर अनुभवाला येत नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म, मृत्यूनंतरचे जीवन या अनुभवसिद्ध गोष्टी नाहीत. मग त्या सत्य कशा समजायच्या? ग्रंथामधून ईश्वरांची कथा येते, अल्लाची स्तुती येते, होली घोस्टचे अस्तित्व येते... पण त्यातल्या एकाच्याही प्रत्यक्ष भेटीचा योग कधी येत नाही. पुराणातल्या कविता  हा सत्याचा पुरावा होत नाहीत. समर्थनानेही सत्य सिद्ध होत नाही. सत्याच्या कसोट्या दोनच. एक ते अनुभवसिद्ध असले पाहिजे आणि दुसरे ते सार्वत्रिक असले पाहिजे.

वेद हे जगातले पहिले मौखिक व लिखित ग्रंथ मानले जातात. त्यातही ऋग्वेद हा सर्वाधिक पुरातन ग्रंथ मानला जातो... तरीही वेदात चार्वाकांची निंदा आहे. ज्यांची निंदा करून त्यांना खोडून काढायचे ते प्रत्यक्षात समोर असल्याखेरीज ते कसे केले जाईल. ही बाबच चार्वाकांचे वेदांहूनही प्राचीन असणे सिद्ध करते. चार्वाकांच्या धर्माला आरंभी आद्यधर्म म्हटले ते यामुळेच.

अनुभव आयुष्य शिकवतो. वागणूक सांगतो. काय करायचे, काय करू नये हे रुजवतो. तो केवळ माहिती देत नाही. जीवनाचे धडे देतो. अनुभव ग्रंथात नसतो, पुस्तकात नसतो, शाळा-कॉलेजात नसतो. तो जीवनात असतो. जीवन आणि अनुभव या समानार्थी बाबी आहेत. त्या पुस्तकी नाहीत. शाब्दिक नाहीत. सजीव आहेत. 

अनुभव हाच मूळचा व सर्वाधिक अधिकार असणारा शिक्षक आहे. हे एकवार ध्यानात घेतले की, त्याच्याशी योग्य की अयोग्य, स्वीकारण्याजोगे की टाळण्यालायक याचा विवेकच मग त्यातून येतो. त्या कसोटीवर खऱ्याखोट्याची शहानिशा करता येते. 

धर्म, ग्रंथ, ज्ञानी म्हणवणाऱ्या माणसांचे धडे वा त्यांनी दिलेली शिकवण हे सारे त्या विवेकाच्या आधाराने निश्चित करता येते. ते सारेच खोटे वा वाईट नसते. चांगले व अनुभवसिद्धही असते... पण ते सारेच तसे असते असे नाही. ज्ञान आणि प्रचार यांत अंतर आहे. ज्ञान विवेकाच्या कसोटीवर उतरते. प्रचार उतरत नाही. त्याचे खोटेपण व उथळपण या शहानिशेत कळून चुकते. त्याच वेळी खरे ज्ञानी, निःस्पृह व प्रामाणिक आणि लबाड यांच्यातला फरकही लक्षात येतो. 

आपले ज्ञानेश्वर तुकारामादी संत खरे, ज्ञानी, निःस्पृह व समाजाचे उपकारकर्ते. त्यांनी कधी उपजीविकेसाठी धर्म सांगितला नाही किंवा धर्माचा बाजार मांडून आपले मोठेपण मिरवले नाही. सत्याची पूर्ण जाण असताना समाजाला नीतीच्या मार्गावर ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्य झिजवले व त्याचा त्यागही केला. पुजारी, पुरोहित, पोथीपुराणे करून आपला उदरनिर्वाह करणारे धंदेवाईक असतात. ते धर्मही सांगत नाहीत आणि ईश्वरही त्यांना कसा तो कळत नाही. पाठ केलेले मंत्र म्हणणे व पोथ्या वाचणे ही उपासना नव्हे. ती उपासनेच्या नावाने केली जाणारी फसवणूक आहे.

एक प्रश्न आणखीही विचारता येणारा आहे. धर्म अगोदर जन्माला येतात की सत्ता? सत्ता धर्मांना राबवते की धर्म सत्तांवर हुकमत गाजवतो? माकडांच्या टोळ्यांना शिस्त व आज्ञापालन असते. त्यांच्यातले सर्वाधिक बलवान माकड साऱ्यांना आपल्या ताब्यात ठेवते. सारी टोळी त्याच्या नियंत्रणात राहते व त्याच्या आज्ञेबरहुकूम वागते. माकडांचा धर्म नसतो... पण त्यांच्यात सत्ता व सत्ताधारी असतात. माणूस हा माकडांपासून उत्क्रांत झाला असेल तर त्याने त्यांच्यापासून प्रथम सत्ता व सत्तेची व्यवस्थाच घेतली असेल की नाही?  

डार्विनला विरोध करणाऱ्यांचे किमान पन्नास ग्रंथ आज जगात आहेत. व्हॉट डार्विन गॉट राँग, डिफिटिंग डार्विनिझम, डार्विन्स ब्लॅकबॉक्स, डार्विन ऑन ट्रायल, डार्क साईड ऑफ डार्विन अशी काही पुस्तके आहेत व ती बरीचशी वाचलीही गेली आहेत. तथापि त्यांना विज्ञानाची मान्यता नाही. आज त्यांची फारशी विचारणाही कोणी करत नाही. मध्यांतरी भारताच्या एका केंद्रीय मंत्र्याने डार्विन चूक असल्याचे सांगितले तेव्हा त्याची जगभर छिः थुः झाल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. 

ग्रंथ का लिहिले जातात, धर्म का स्थापन होतात, संघटना कशासाठी निर्माण केल्या जातात. हे सारे मनुष्याजातीच्या विकासासाठी व कल्याणासाठी होते काय? की त्यामागे समाजाला गुलाम करण्याचा, ताब्यात ठेवण्याचा आणि सत्ता व संपत्ती धारण करणाऱ्यांना बलवान करण्यासाठी तो असतो. त्यामागे केवळ ज्ञान साधना असते की सत्ताधारी आणि प्रजाजन संपत्तीधारी आणि वंचित, आज्ञा करणारे व तिचे पालन करणारे, सांगणारे व ऐकणारे असे दोन वर्ग करण्याचा इरादाही त्यामागे असतो. 

सत्य एकच असेल वा असते असे म्हटले जाते तर ते सार्वत्रिक का नाही? ईश्वर साऱ्यांचा पालक असेल तर वेगवेगळ्या धर्मांचे पालक वेगवेगळे का असतात? शिवाय त्यांच्यात लढे का होतात? धर्म माणसांचे संघटन करत असेल तर तो जमिनीच्या तुकड्यांसाठी लढाया का करवतो आणि या लढाया शतकानुशतके कशा चालतात? धर्मांनी जग सांधले व जोडले आहे की ते विभागले आहे? ईश्वरांनी माणसांना माणुसकीच्या प्रेरणा दिल्या की त्यासोबत माणसांना गुलाम करण्याचेही धडे दिले.  हे जग एक असेल, ईश्वर एक असेल तर मग शतकांच्या लढाया कशा झाल्या आणि त्यात अब्जावधी माणसे देवाच्या व धर्माच्या नावाने मारली का गेली व अजून ती तशी मारली का जात आहेत?

आपल्या परंपरागत घडणीत आणि शिकवणुकीत काही राहून गेले आहे काय, त्यात उणिवा आहेत काय की त्यात अनुभव हा मूळ व मूलभूत शिक्षक असण्याच्या भानाचा विसर आहे? ग्रंथकर्ते, मग ते धर्मज्ञ असोत वा तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ असोत वा विद्वान, त्यांच्याही विचारांचा आधार अनुभवच असतो की नाही. त्या आधाराची कसोटी लावल्याखेरीज ते लिहीत असतील तर ते ज्ञानी कसले, ते तर फक्त कॉपीमास्तर. 

अनुभव व त्यावर आधारित सत्य ही अशी कसोटी आहे की, तिच्यासमोर जगातले सर्व ईश्वर कोसळतात, धर्म हवेत तरंगू लागतात, परंपरा मोडीत निघतात, श्रद्धा हास्यास्पद होतात आणि सगळे संत, सज्जन, धर्मगुरू आणि धर्माची शिकवण देणारे सारे टाळकरी वा वारकरी होतात. त्या साऱ्यांनी ईश्वराला सत्य मानले तर म. गांधींनी सत्यालाच ईश्वर का मानले? या दोन वचनांमधील खरा फरक समजून घेणे कठीण नाही. ईश्वर मानला तर खरेखोटे काही उरत नाही आणि सत्य मानले तर ईश्वर कुठे राहत नाही. 

गांधीजी जेव्हा ईश्वर सत्य आहे असे न म्हणता सत्य ईश्वर आहे असे म्हणतात... तेव्हा त्यांना ईश्वराविषयी नेमके काय म्हणायचे असते हा प्रश्न यासाठी विचारायचा की, ‘मी कर्मठ हिंदू आहे...’ असे म्हणणारा हा महात्मा एकाच वेळी ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ का म्हणत होता? बायबलातली वचने का उच्चारत होता? संतांना व तत्त्वज्ञांना बरोबरीचे लेखत होता. त्याला रोमाँ रोलाँ व आईन्स्टाईन दोघेही सारखे व सारख्याच योग्यतेचे वाटत होते. तो ईश्वर न मानणाऱ्या सॉक्रेटीसला जगातला पहिला सत्याग्रही का म्हणत होता? 

धर्म सनातन आहेत, ते अनादी आणि अनंत आहेत या वचनाएवढे दुसरे असत्य वचन कोणतेही नाही... कारण जगातल्या प्रत्येक धर्माची जन्मतिथी वा जन्मकाळ सांगता येतो. तो लक्षात घेतला की धर्माआधीचा काळ कळतो. त्यात कोण असते? धर्म की त्यांनी जन्माला घातलेले ईश्वर? इतिहासाच्या ओघात काही धर्म व संस्कृती लोपही पावल्या. त्यांच्यासोबतच त्यांचे ईश्वरही काळाच्या पडद्याआड गेले. हे घडल्यानंतर मग शिल्लक काय राहिले? 

प्रश्न हा की, धर्मांच्या अगोदर व नंतर काय उरते? उरते ते फक्त सत्य आणि त्याची जाणीव... की जाणीवच तेवढी खरी असते व तिच्यावर वाढलेल्या संस्कृती... मात्र धर्मांच्या पुटांनीच तिचा कोंडमारा केलेला असतो. बहुतेक साऱ्यांत ती अर्धमेली वा पूर्णपणे निद्रितच असते. ज्यांच्यात ती जिवंत असते ते नवे मार्ग, नव्या दिशा आणि नवी क्षितिजे शोधत निघतात.

आरंभी अशा एकट्या माणसांची  टिंगल होते. त्यांचा प्रसंगी छळही होतो... मात्र अखेरीस सारेच जण त्याच्या व त्याने दाखवलेल्या मार्गावरून चालू लागतात. जगात जन्माला आलेले नवे मार्गदर्शक सगळे असे होते व आहेत. त्यांतल्या काहींना त्यांचे उद्दिष्ट हाती लागले. काहींचा प्रवास अर्ध्यावर थांबला तर काहींना परंपरांनी पुढे जाऊच दिले नाही... मात्र त्या साऱ्यांची धडपडच जग मोकळे करणारी आणि माणुसकीचा मार्ग प्रशस्त करणारी ठरली.

जग विज्ञानाने पुढे गेले. संशोधनाने व तर्काने त्याला पुढचा मार्ग दाखवला. श्रद्धा स्थितिवादी असल्याने तीच त्याच्या पायातील अवजड बेडी ठरली. साऱ्या तत्त्वज्ञानातला संघर्ष त्याचमुळे श्रद्धा व तर्क किंवा मन व मेंदू यांच्यातला आहे असे म्हटले जाते. ज्याचे तर्क मारले ते मागे राहिले. जगातले अनेक वर्ग असे दाखवता येतात. 

‘स्वतंत्र विचार करणारी स्त्री ही चेटकीण असते आणि प्रत्येकच चेटकीण ही वध्य असते...’  असे सांगणाऱ्या चौथ्या शतकातील पोपने युरोपात पन्नास लाखांवर स्त्रिया जिवंत जाळल्या. आपल्याकडे ब्राह्मणांखेरीज इतरांना धर्मज्ञान मिळू न देणाऱ्या मनुस्मृतीने आपल्या समाजाचे किती वर्ग मागे ठेवले. वपन व सती यांसारख्या जुलमी प्रथांमुळे किती स्त्रियांचे जीवन, मन व विचार संपवले. मुक्त मन आकाशात भरारी घेते. बंदिस्त मन स्वतःला जमिनीत गाडून जगते.

चार्वाकांच्या मते ईश्वर नाहीत अन्‌ धर्मही नाहीत म्हटले की मंदिरे, मशिदी, गुरुद्वारे, चर्चेस्‌, पॅगोडाज्‌ अन्‌ सायनागॉजेस आपोआप जातात. भक्त जातात, यात्रा संपतात, वारकरी अन्‌ टाळकरी, पुराणे अन्‌ कीर्तने, प्रवचने आणि पोथ्यापुराणेही नाहीशा होतात. धर्माचा व ईश्वराचा समूळ नायनाट असा झाला की, त्यांवर आधारलेली माणसे, त्यांच्या उपजिविका त्यांनी ईश्वराच्या नावाने समाजात मिळवलेली आसने व स्थानेही जातात. ब्राह्मण, पुरोहित, मुल्ला-मौलवी, पोप-पादरी, संत इत्यादी सारे निकालात निघतात. 

या साऱ्या माणसांची व त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या सामाजिक वर्गांची फार मोठी गुंतवणूक या साऱ्यांत असते. ती धार्मिक, मानसिक, श्रद्धाविषयक, जीवनाविषयीच्या आश्वस्तेबाबत आणि ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’  असे आश्वासन देणाऱ्या महंतांबाबतही आहे. 

एवढ्यावरच ही पडझड थांबत नाही. लोकायत विचार वेदांएवढाच किंवा त्याहूनही अधिक प्राचीन आहे... कारण सर्वप्रथम वेदांनी खंडनासाठी लोकायत मत घेतलेले आहे. श्वेताश्वतर, बृहदारण्यक, कठ, छांदोग्य इत्यादी उपनिषिदांतूनही त्या मताचा प्रतिवाद येतो. छांदोग्यात विरोचननामक असुराच्या देहात्मवादाचा उल्लेख आहे. विष्णुपुराणात महामोहाच्या व रामायणात जाबालीच्या तोंडी चार्वाक मत आले आहे. महाभारताच्या शांतिपर्वात व वनपर्वात त्यांचा उल्लेख आहे. भगवद्‌गीतेच्या सोळाव्या अध्यायात असुरांच्या नावे लोकायताचे खंडन आले आहे. पद्मपुराणात, भागवतात व मनुस्मृतीतही चार्वाक मताचे उल्लेख येतात. 

चार्वाकांच्या मते पृथ्वी, आप, तेज व वायू ही चारच महाभुते जगात आहेत. काथ, चुना व विड्याचे पान एकत्र आणले की त्यापूर्वी नसलेला लाल रंग येतो किंवा मद्यामध्ये न दिसणारी नशा असते. तसे या चार जडतत्त्वांच्या संघातातून जीवसृष्टी व प्राणिसृष्टी जन्माला येते असे त्यांचे म्हणणे आहे. चार्वाकांना मोक्ष व धर्म या बाबी मान्य नाहीत. काम व त्याचा आधार असलेला अर्थ हे दोनच पुरुषार्थ ते मानतात. स्वाभाविकच त्यात ईश्वरादी बाबी येत नाहीत.

राजे, महाराजे, सम्राट, बादशहा आणि त्यांचे दरबारी चाहते हेदेखील याच श्रद्धेच्या बळावर समाजावर आपली पकड ठेवतात. त्यांच्या हाती असलेल्या सत्तेच्या आश्रयाने एक मोठा आश्रितांचा (त्यात ऋषी-मुनींसह सारे येतात) वर्ग तयार होतो. तो सत्तेच्या मागे ईश्वर उभा करतो. भारतात व हिंदूंमध्ये राजा हा ईश्वराचा अंश असतो. त्याची आज्ञा ही ईश्वराची आज्ञा असते व त्याची अवज्ञा हे धर्मदृष्ट्या पाप ठरते. 

तिकडे बादशहांनाही खलिफांकडून खिलाफत (मान्यता) येते. तीच त्यांना मिळालेली अल्लाची मान्यता असते. ख्रिश्चनांमध्ये सारे राजे व सम्राट पोप यांची मान्यता मिळवायचे. ती मिळवायला ते पोपला मोठमोठ्या देणग्या द्यायचे. पोपची व रोमची श्रीमंती त्यांतून उभी राहिली. आपल्याकडेही समाज दरिद्री होत असताना ईश्वर व त्यांची मंदिरे सुवर्णमयी झाली. ईश्वर कोसळल्याने पुढे या राजसत्ताही कोसळतात. 

धर्मसत्ता व राजसत्ता कोसळल्या की त्यात असलेल्यांचे हितसंबंधही जमीनदोस्त होतात. त्यांचे सामाजिक वर्चस्व व थोरवी मातीमोल होते. ती माणसे त्यांचे हे कोसळणे मुकाट्याने पाहत नाहीत. मग त्यांच्या अत्याचारांची व दहशतीची सुरुवात होते.

इतिहासात चौदा हजारांहून अधिक लढायांची नोंद आहे. त्या साऱ्यात धर्मांचे झेंडे हातात घेऊन सत्तांनी लढवले आहेत. त्यात किती माणसे मारली गेली, किती स्त्रियांची विटंबना झाली आणि किती पोरे जिवंतपणी जाळली गेली... एकट्या बाराव्या शतकात भारतात झालेल्या धार्मिक लढायांत चाळीस लाख माणसे मृत्यू पावली. यावरून या मृत्यूंच्या आकडेवारीचे अंदाज बांधता येतो आणि जगाचा इतिहास याच भीषण युद्धांनी भरला असल्याचे जाणवते. 

ख्रिश्चन व मुसलमान या दोन धर्मांतली युद्धे तब्बल सातशे वर्षे चालून इस्तंबूलच्या पाडावाने थांबले. या लढाया दोन धर्मांत व राज्यांतच होत नसत. भारतात शैवांच्या व वैष्णवांच्या, जैनांच्या आणि बुद्धांच्या युद्धांच्याही नोंदी आहेत... शिवाय महाभारतासारखी युद्धे एकाच घराण्यातील भांडणांतून होत व त्यात ‘अठरा अक्षौहिणी’  बळी पडत. 

चार्वाकांचा सर्वाधिक राग या वंशयुद्धांवर, स्वतःची माणसे मारण्यावर आहे. तशी एक कथा महाभारतातच आहे. भारतीय युद्ध जिंकून सगळे पांडव हस्तिनापुराकडे येत असताना त्यांना चार्वाक पंथाचे काही लोक अडवतात अन्‌ संतापून विचारतात, ‘केवळ या राज्यासाठी, सिंहासनासाठी आणि राजमुकुटासाठी आपल्या लक्षावधी आप्तांची कत्तल केलीत. सत्तेसाठी भ्रातृहत्येचे, कुटुंबहत्येचे पाप केलेत. तुम्हाला समाधान तरी कसे मिळेल?’ हा सारा प्रकार श्रीकृष्णाच्या उपस्थितीत घडला हे विशेष. 

चार्वाकांना ईश्वर वा धर्म मान्य नसला तरी रक्तसंबंधातील नीतिमत्ता मान्य होती हे सांगणारी ही घटना आहे. धर्मांना नीती नेहमीच मान्य राहिली नाही. किंबहुना अनीती हेही धर्मांचे खास वैशिष्ट्य राहिले आहे. परधर्माच्या लोकांना दिलेला शब्द तुम्ही पाळण्याचे कारण नाही. त्यांच्या स्त्रियांचा सक्तीने भोग घेण्याचा व त्यांच्या ठायी संतती जन्माला घालण्याचा अधिकार तुम्हाला आहे असे सांगणारे धर्म जगात आहेत. 

हिंदू धर्माने अस्पृश्यता नैतिक व धार्मिक ठरवली आहे. हिंसा करू नका... पण इतरांनी हिंसा करून मारलेले प्राणी तुम्ही खायला हरकत नाही अशी नैतिक पळवाट बुद्ध धर्मही सांगतोच. वैदिकांच्या यज्ञात हिंसा होती आणि ईश्वर... त्यांच्या कथा तरी कोठे नैतिक आहेत. थेट ब्रह्मदेवापासून विष्णू व शिव यांच्यापर्यंत आणि इंद्रापासून इतर दैवतांपर्यंत. मग ऋषी-मुनींनीही मागे का राहायचे? त्यांच्याही अनीतिकथा आपल्या पोथ्यापुराणांत आहेत... पोप फार नीतिशुद्ध नव्हते. इस्लाममध्येही तशा परंपरा अधोरेखित करणाऱ्या गोष्टी आहेत.

खरेतर नीतिमान माणूस धार्मिक राहू शकतो... पण धार्मिक माणूस नीतिमान असेलच असे नाही आणि नीती हीच खरेतर धर्माहून श्रेष्ठ आहे. नीती हे मूल्य तर धर्म हे संघटन आहे. या संघटनेने व तिच्या सभासदांनी नीती हे मूल्य पाळावे ही अपेक्षा आहे... मात्र एकाही धर्माने ती काटेकोरपणे व अखंडपणे पाळली असे इतिहास सांगत नाही.

ईश्वर, धर्म, धार्मिक कर्मकांडे यांना विरोध करणारा चार्वाकांचा पंथ पांडवाच्या काळातही आदरणीय होता हे विशेष आहे. वनपर्वात द्रौपदी कृष्णाला सांगते, ‘लोकायत मताचे ग्रंथ शिकवायला तिच्या वडिलांनी काही पुरोहितांची नेमणूक केली होती.’ तात्पर्य, चार्वाक आदरणीय होते, त्यांचे ग्रंथ अस्तित्वात होते. ते शिकवले जात होते आणि त्यांचे पुरोहितही होते. 

आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. 

हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले... पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही... कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता. काही विद्वानांच्या मते, तेराव्या शतकात सापडलेला तत्वोपप्लवसिंह हा जयराशीभट्टाचा ग्रंथ चार्वाकांचा असावा... पण त्याचा ग्रंथकर्ता म्हणतो, ‘मी चार्वाक मतासह सर्व धर्ममतांचे खंडन करून दाखवतो.’ तात्पर्य, चार्वाकांचा ग्रंथ नाही, परंपरा नाही, त्यांचे आचार्य नाही आणि तरीही तो पंथ राहिला आहे. कशाच्या बळावर?सामान्य माणसांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाच्या भरवशावर...

साऱ्याच काळात राजांना शत्रू होते. ब्राह्मणांना आणि धनवंतांनाही विरोधक व टीकाकार होते. सत्ता वा शक्ती शत्रूवाचून सहसा राहत नाही. तिच्या अनुयायांनीच त्यांना जन्म दिला असतो. काही विद्वानांच्या मते चार्वाकांचा विचार असा जन्माला आला असणेही शक्य आहे... मात्र विरोधातून जन्माला येणारा विचार नेहमीच नकारात्मक असतो. चार्वाकांचा विचार अनुभवजन्य व अनुभवसिद्ध असल्याने विधायक आहे. त्याला ही उपपत्ती लागू पडत नाही.

- सुरेश द्वादशीवार
sdwadashiwar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)


'चार्वाक' ही 16 भागांची लेखमाला 1 ते 16 मार्च 2021 या काळात प्रसिद्ध होईल. या लेखमालेतील इतर लेख वाचण्यासाठी 'इथे' क्लिक करा.

Tags: चार्वाक सुरेश द्वादशीवार ईश्वर Marathi Series Suresh Dwadashiwar Charvak God Load More Tags

Add Comment