अजि मी व्याघ्र पाहिले (उत्तरार्ध)

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील पेंच व्याघ्रप्रकल्पातील सफारीचा अनुभव...

culturalsafaritours.com | प्रातिनिधिक चित्र

माझी दुपारची सफारी तीनला सुरु होणार होणार होती, त्यामुळे मी जेवण केले आणि कुसुम वृक्षाच्या सावलीत शांतपणे बसून राहिलो. हवेत गारठा होता. मी विचार करू लागलो की, तिथे केवळ वाघ दिसला नाही म्हणून हे लोक इतके निराश कसे काय होऊ शकतात? माझी सगळी गात्रे प्रफुल्लीत झालेली होती. सभोवती नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगर्द झाडे, नाकातून फुफ्फुसांत भरणारी शुद्ध हवा आणि ओलसर रानाचा, निरनिराळ्या झाडांचा अर्क मिसळलेला करकरीत सुगंध, कानांना येणारे निरनिराळ्या पक्ष्यांचे सुमधुर आवाज आणि रंध्रारंध्रांत पसरणारी रानातील शांतता, एका विलक्षण संस्कृतीशी ओळख आणि निसर्गाशी तादात्म्य पावल्याची सुखद भावना!


या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. मधेच गाईडने गाडी थांबवायला सागितले. या गाईडच्या सर्व अवयव व इंद्रियांमध्ये प्रचंड समन्वय होता. त्याची नजर चौकसपणे चौफेर फिरत होती, कॉल येतात का त्यासाठी कान सदैव टवकारलेले होते आणि पर्यटकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तो सदैव सज्ज होता. यावेळी गाईडला दूरवर बिबट्या दिसला होता. आम्हा कोणालाच काही दिसत नव्हते. त्या गाडीत ड्रायव्हरच्या बाजूला एक उंचवटा केलेला होता मग तिथे आम्ही एकामागून एक जाऊ लागलो. 
“यह सामने एक पेड पर धूप आ रही है वह दिख रहा है?”
“हा”
“उसके बाये ओर थोडा आगे व्ही आकार का पेड दिख रहा है?”
“हा दिख रहा है”
“बस उसी ‘व्ही’ में से सीधा देखिये”
दूरवर एक कातळ होता. त्यावर बिबट्या पहुडला होता. जे आम्हाला स्थिर असलेल्या गाडीत इतक्या कष्टाने दिसत होते, ते त्या गाईडला चालत्या गाडीत ओझरत्या नजरेने दिसले होते. 
तितक्यात ड्रायव्हर म्हटला, “और एक है नीचे, शायद मादा है” 

आम्ही पाहिले की, आणखी एक बिबट्या त्या कातळावर चढला. हा बिबट्यांचा विणीचा हंगाम होता. त्यामुळे ते जोडपे एकत्र येत होते. गाईडने सांगितले की, आता इथे थांबण्यात अर्थ नाही. थांबलो तर बिबटे बिथरतील. एक गोष्ट माझे लक्ष वेधून घेत होती की, आमच्या सफारीच्या संपूर्ण कालावधीत गाईडने ‘टायगर’ हा शब्द कधीही वापरला नाही, तो वापरत असलेला शब्द होता ‘predator’.

आमची गाडी पुढे निघाली. ‘तुरिया गेट 4 किमी’ असा बोर्ड दिसला. वाघ दिसण्याची शक्यता संपली होती. थोडे पुढे जाऊन गाईडने गाडी थांबवली. एका झाडाच्या बुंध्याच्या थोडे खाली एक घुबड बसले होते. गाईडने काहीतरी इंग्लिश नाव सांगितले. ते गोल डोळ्याचे गरगरीत घुबड स्थितप्रज्ञ बसले होते. ते घुबड पाहून मला जी.ए. कुलकर्णींच्या ‘पिंगळावेळ’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ आठवले आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘गोल्ड कोस्ट’जवळ पिवळ्या रंगात रंगून उभा असलेला माणूस आणि त्याच्या बाजूला असलेला ‘make me laugh and win 500 $’ बोर्ड आठवला, कारण हे घुबड असेच एकटक बघत होते/ आमच्या हालचालीचा त्याच्यावर काहीही फरक पडत नव्हता, त्याच्या डोळ्यांतदेखील काही भाव दिसत नव्हते. हरिणाच्या डोळ्यांत कायम एक भेदरलेले आणि भोळसट भाव दिसतात, माकडाच्या डोळ्यांत मिश्किली असते आणि ते सतत काही ना काही करत असतेच, कुत्र्याच्या डोळ्यांतले भाव आपल्या वागण्यानुसार बदलत असतात, गाईच्या डोळ्यांत कायम कारुण्य असते. घुबड अशुभ मानले जाते, त्यामुळे आमच्या गाडीत जे कुटुंब होते - ते आधीच वाघ न दिसल्यामुळे वैतागलेले होते - त्यांनी “इसमे क्या देखना है, चलो आगे” असे करवादून म्हटले. 

तुरिया गेट

आम्ही तुरिया गेटला पोहोचलो. एकामागून एक गाड्या परत येत होत्या आणि “कुछ दिखा क्या” हे परवलीचे वाक्य ऐकू येत होते. कोणाला ‘काहीच दिसले’ नव्हते, सर्वांचे चेहरे निराशेने ग्रासलेले होते. 

माझी दुपारची सफारी तीनला सुरु होणार होणार होती, त्यामुळे मी जेवण केले आणि कुसुम वृक्षाच्या सावलीत शांतपणे बसून राहिलो. हवेत गारठा होता. मी विचार करू लागलो की, तिथे केवळ वाघ दिसला नाही म्हणून हे लोक इतके निराश कसे काय होऊ शकतात?

माझी सगळी गात्रे प्रफुल्लित झालेली होती. माझ्या सर्वांगाला काही ना काही मिळाले होते. सभोवती नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगर्द झाडे, नाकातून फुफ्फुसांत भरणारी शुद्ध हवा आणि ओलसर रानाचा, निरनिराळ्या झाडांचा अर्क मिसळलेला करकरीत सुगंध, त्वचेला आल्हाददायक वाटणारे कोवळे ऊन आणि त्यातून भरपूर मिळणारे 'ड' जीवनसत्त्व, कानांना येणारे निरनिराळ्या पक्ष्यांचे सुमधुर आवाज आणि रंध्रारंध्रांत पसरणारी रानातील शांतता, एका विलक्षण संस्कृतीशी ओळख आणि निसर्गाशी तादात्म्य पावल्याची सुखद भावना!

एव्हाना तीन वाजताच्या सफरीच्या गाड्या गेटजवळ येऊ लागल्या होत्या. माझा गाडी क्र. 45 होता. यावेळी टप काढलेली फोर्स मोटर्स जिप्सी होती. माझ्या गाईडचे नाव लांबलचक होते, बिभूतीशरण पांडे.

त्याने मला पहिला प्रश्न विचारला, “सुबह कुछ दिखा क्या?” मी त्याला जे जे दिसलं ते सांगितलं. मग त्याने स्पेसिफिक प्रश्न विचारला, “वाघ दिसला का?” मी नकारार्थी उत्तर दिले. तो म्हणाला, “कल भी कुछ नही दिखा” मी त्याला माझे तत्त्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडणार नव्हतो. खरे सांगायचे तर ही सफारी मी केवळ ‘रिफंड’ मिळणार नव्हता म्हणून करत होतो. कारण मला सकाळीच खूप काही दिसले व मिळाले होते. 

यावेळी आमची गाडी गेट क्र. 3 ने आत गेली. थोड्या वेळाने एका वळणावर काही गाड्या थांबलेल्या दिसत होत्या, त्यामुळे आम्ही पण थांबलो. “कॉल है क्या?” मी विचारले, कारण मला हरणाचा कुsकुs आवाज येत नव्हता. गाईड म्हणाला, “हां जी. लंगुर का कॉल है” माकडं इतर वेळी हूप हूप असा आवाज करत पण वाघाचे अलर्ट देताना ‘क्व्याक क्व्याक’ असा आवाज करत. यावेळी आमच्या डाव्या बाजूच्या झाडावर बसलेलं माकड उजवीकडे बघून कॉल देत होतं. “predator शायद बैठा हुआ है. ज्यादा समय बैठता नही, हम यहां रुकते है” मला ‘कुर्र कुर्र’ असा आणखी एक आवाज येत होता. मी गाईडला विचारले, “हा पण कॉल आहे का?” तर त्याने सांगितले की, हा ‘रॅकेट टेल्ड’ (Racket-tailed) पक्षाचा आवाज आहे. त्याला ‘मिमिक्री बर्ड’ असेसुद्धा म्हणतात. हा पक्षी 30 ते 40 पक्ष्यांचा आवाज हुबेहूब काढू शकतो. त्याची शेपटी ‘रॅकेट’प्रमाणे दिसते म्हणून त्याला ‘रॅकेट टेल्ड’ असे नाव आहे. वाघसुद्धा सहा ते सात प्रकारचे आवाज त्याच्या ‘मूड’नुसार काढतो. 

या जंगलात मला फळझाडे कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे माकडे काय खातात याचे मला कुतूहल होते. गाईड म्हटला की, माकडे झाडाची पाने तोडतात, देठ खुडून त्यातला रस पितात आणि पाने खाली टाकतात. मग ती पाने चितळ, सांबर खातात. त्यामुळे माकडे आणि चितळ बऱ्याचदा एकाच ठिकाणी ग्रुपमध्ये दिसतात. 

आम्ही 20 ते 25 मिनिटे तिथे थांबलो पण काही दिसायचे नाव घेईना. तसा हा भाग पाटदेव वाघिणीचा होता. आमच्या गाड्या पुढे निघाल्या. आमचा गाईड जरा अबोल होता आणि सुस्तदेखील. तो उत्तरे देखील मोघम देत होता. मी त्याला विचारले की, हमे टायगर नही दिखा. लेकीन टायगर ने हमें देखा होगा क्या? त्यावर तो म्हणाला की, “हो भी सकता है. नही भी हो सकता है” पण माझ्या माहितीनुसार आपण 10 वेळा वाघ बघायला जंगलात गेलेलो असलो आणि आपल्याला एक वेळा वाघ दिसलेला असेल तरी वाघाने आपल्याला नऊ वेळा पाहिलेले असते!

जंगल कितीही भारी वाटले तरी एका काळानंतर ते एकसुरी (monotonous) होत जाते. अर्थात, जंगल आहे तसेच असते आपले मन एकसुरी होत जाते. आम्ही आणखी बराच वेळ भ्रमंती केली. आता कॉल येणेदेखील बंद झाले होते आणि पावणेसातला आम्हाला गेटवर पोहोचायचे होते. आम्ही परतीच्या मार्गावर निघालो, ड्रायव्हर त्या मानाने वेगात गाडी चालवत होता. इतक्यात त्याने ब्रेक दाबला. 
“क्या हुआ?” गाईडने विचारले. 
“टायगर” ड्रायव्हर म्हणाला. 
“अरे कोई कॉल भी नही है, चलो आगे”

इतक्यात डाव्या बाजूच्या जंगलात सळसळ झाली आणि पुढे जे दिसले, ते एकाच जागी खिळवून ठेवणारे विलोभनीय दृश्य होते. एक अजस्र पिवळ्या काळ्या पट्ट्याचे धूड संथपणे पण डौलात पाय टाकत पुढे येत होते. मार्जार कुळातला तो प्राणी आपली पावलेही ‘कॅट वॉक’ पद्धतीने टाकत होता. तो त्याचे पाऊल जमिनीवर ‘टाकत’ नव्हता तर ‘रोवत’ होता आणि “हा माझा इलाका आहे” असा संदेश देत होता. त्या हिंस्र प्राण्याच्या डोळ्यात जरब असली तरी लोभसपणाही ठासून भरलेला होता. आम्ही आमची गाडी थोडी पुढे घेतली आणि मागे वळून उभे राहिलो. मागच्या गाड्या 10 फूट मागे गेल्या. लोकांचे कॅमेरे सरसावले. गाईडच्या म्हणण्याप्रमाणे तो ‘स्वस्तिक’ नावाचा वाघ होता. त्याने शांतपणे त्याच्याच मस्तीत डावीकडून उजवीकडे रस्ता क्रॉस केला (वाघ रस्ता क्रॉस करताना दिसणे हे दुर्मीळ दृश्य असते असे म्हणतात.) त्याची शेपटी डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा डावीकडे अशी हलत होती म्हणजे स्वारी सुशेगाद होती. त्याच्या लेखी आम्हाला शून्य महत्त्व होते. रस्ता क्रॉस करून रानात गुडूप होताना चार ते पाच सेकंद त्याने आमच्या जीपकडे पहिले. आमची नजरानजर झाल्याचा मला भास झाला. बाकीच्या पर्यटकांच्या बाबतीत तशी शक्यता नव्हती. कारण त्यांच्या डोळ्यासमोर एक तर डीएसएलआर कॅमेरे होते किंवा मोबाईल! 

स्वस्तिक वाघाचे लेखकाच्या सहप्रवाशाने टिपलेले छायाचित्र

आम्ही सगळे आणखी काही काळ तसेच शांतपणे थांबून राहिलो. रानाची स्वतःची शांतता आणि आमची शांतता त्या प्राण्याने काही क्षणांत एकरूप करून टाकली. आम्ही तुरिया गेटकडे निघालो. मला पुन्हा शाळेच्या पुस्तकातील ‘दर्शनमात्रे’ हा धडा आठवला आणि त्यातल्या ‘स्वाध्याय’ विभागातील प्रश्नदेखील. ‘वाघ पाहिल्यावर लेखिकेच्या मनात निर्माण झालेल्या भावनांचे वर्णन करा’ शाळेत असताना मी इकडून-तिकडून, ‘गाईड’/‘21 अपेक्षित’ मधून घोकून उत्तर लिहिले होते. आज मला तोच प्रश्न विचारला तर मी सांगेन की, “कितीही प्रयत्न केला तरी त्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. मला शून्य मार्क दिले तरी चालतील.”

माझा होस्ट नियंत दुबे मला घ्यायला आला होता. मला वाघ दिसल्याचे समजल्यावर त्याला देखील आनंद झाला. मी घरी जाऊन अंघोळ करून जेवायला बसलो. अवनीला काल मी ओरिगामी शिकवली असल्याने माझी तिच्याशी गट्टी जमली होती. तिनेच पाट-पाणी घेतले. मी कालपासून निरीक्षण करत होतो की, घरची कामे अवनीच करत होती. अवधेश नुसताच मोबाईलमध्ये गुंतलेला दिसत होता. त्यामुळे मी त्याला हटकले आणि विचारले, “तू अवनीला मदत करत नाही का?” त्यावर तो बोलला काहीच नाही पण “तुम्ही आमच्यात कशाला नाक खुपसताय?” असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आज जेवायला पालकची भाजी होती. ती धड पातळपण नव्हती आणि सुकीपण नव्हती! त्यात लसूण होती आणि ती भाजी निगुतीने केलेली दिसत होती. चव तर अप्रतिम होतीच आणि दिवसभर दमल्यानंतर असे गरम जेवण म्हणजे स्वर्गच! जेवण झाल्यानंतर आम्ही पडवीत बसलो तर नीला भाभी गाजर हलव्याच्या रूपाने ‘डेझर्ट’ घेऊन आल्या. त्यांनी स्वतः ते आणून दिले आणि आणखी घ्या असे सांगून गेल्या. त्यांचा अवघडलेपणा दूर झाला होता. त्या गरम गाजर हलव्याच्या प्रत्येक घासात किमान दोन बदाम व चार बेदाणे येत होते. मी काल ‘बैंगन भरता’चे कौतुक करताना लावलेले ‘घी’ आज गाजर हलव्यात उतरले होते! या कुटुंबाचे आणि माझे भेटणेदेखील नशिबाचा भाग होता नाही तर कोण कुठचा मी आणि नियंत.. मी कॅब करतो काय आणि त्याच्या घरी पाहुणचार घेतो काय, सगळेच नवल.

आज गारठा जास्त होता म्हणून मी गच्चीत झोपलो नाही पण खिडकीतून दिसणाऱ्या इवल्याशा आभाळाकडे बघत पडून राहिलो... तर आहे हे असं आहे! जंगलाची एक वेगळी संस्कृती आहे. इथे कोणालाही मुलभूत अधिकार नाहीत. कारण कोणाला मुलभूत अधिकार दिले तर सर्व व्यवस्था कोलमडून पडेल. उदा. हरिणाला जगण्याचा मुलभूत अधिकार दिला तर वाघाच्या जगण्याच्या हक्कांवर गदा येईल. जंगलाच्या व्यवस्थेत सर्वांना मुलभूत कर्तव्ये दिलेली आहेत आणि सर्व प्राणी मुलभूत कर्तव्ये विनातक्रार पार पाडत असतात. 

त्या वाघाने चार ते पाच सेकंद आमच्याकडे पहिले. माझ्या मनात विचार आला की, मी त्याला कसा दिसलो असेल? डोक्यावर गोल हॅट, जॅकेट, खांद्याला सॅक असे माझे ध्यान त्याला कसे वाटले असेल? त्याच्या मनात माझ्याविषयी काय विचार आले असतील? वाघाच्या दृष्टीने माणसांचे जंगल कसे दिसते ते एकदा पाहिले पाहिजे.

सकाळच्या वेळी मी निरीक्षण केले होते की, एक माकड झाडावरून टूनटून उद्या मारत आमच्या गाडीला सोबत करत होते. ते माकड काय, वाघ-हरीण काय, आपापली मुलभूत कर्तव्ये पार पाडतील आणि नैसर्गिक मृत्यूची चाहूल लागली की, एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन मिळालेल्या आयुष्याचे आभार मानत हसत हसत मृत्यूला कवटाळतील. त्यांच्यासाठी ना कुठली थेरपी, ना आय सी यु.. ना काही. आपली वेळ संपली की संपली. जगण्याचादेखील हव्यास नाही. 

रुडयार्ड किपलिंग

पेंच प्रकल्प मध्यप्रदेशच्या सिवनी जिल्ह्यात आहे. हा सिवनी जिल्हा व पेंचचे जंगल रुडयार्ड किपलिंगने त्याच्या ‘जंगलबुक’ या पुस्तकाच्या रूपाने पूर्ण जगभरात नावारूपास आणले. त्याच्याविषयीची कृतज्ञता म्हणून पेंचच्या प्रवेशद्वारावर त्याचे सुंदर भित्तीचित्र कोरले आहे. किपलिंगने बऱ्याच कवितादेखील लिहिल्या. त्यातली ‘If’ ही कविता लोकप्रिय आहे. पेंचचा निरोप घेताना माझ्या मनात मात्र रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेच्या ओळी घोळत राहिल्या.. 

The Woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep,

टीप : सदर लेखातील वन्य प्राण्यांविषयीची माहिती गाईडबरोबरच्या संभाषणातून संकलित केलेली असून ती अचूक असल्याचा दावा लेखक करत नाही.

- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com 
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)


हेही वाचा : 

 

Tags: वाघ प्रवासवर्णन जंगल सफारी पर्यावरण साहित्य बॅगपॅक मकरंद दीक्षित Load More Tags

Add Comment