हा केवळ एक नैतिक पेचप्रसंग राहत नाही तर भावनिक गुंता होऊन जातो. कारण नेहमा एकीकडे तिच्या पोटच्या मुलाची नैसर्गिक वाढ पाहताना सुखावत असते तर दुसरीकडे AI रुपी कृत्रिम अपत्याच्या वाढीतील संभाव्य धोके पाहून गोंधळात पडत असते आणि परिस्थितीपुढे हतबल झाल्यामुळे अपराधीभावना तिला ग्रासत असते. AI साठी लहान बाळाचे रुपक योजून हा चित्रपट प्रेक्षकाला अंतर्मुख करतो.
मानवाचा इतिहास हा विविध क्षेत्रांतील शोधांचा आणि त्या अनुषंगाने झालेल्या उत्क्रांतीचा इतिहास आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शोध हा या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा आहे. एकविसावे शतक हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चे शतक म्हणून ओळखले जाईल. या शतकाचा अर्धा टप्पा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा विकास व पुढील अर्धा टप्पा सर्व समष्टीवर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांचा असणार आहे. साहजिकच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा सध्या सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय ठरत आहे.
Humans in the loop ही खरंतर मशीन लर्निंगची एक प्रक्रिया आहे ज्यात मानवी बुद्धिमत्ता व यंत्रशक्ती यांचे एकत्रीकरण करून यंत्राची अचूकता, निर्णयक्षमता व कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. ही एक अव्याहत चालणारी प्रक्रिया असणार आहे.
Humans in the loop हा चित्रपट मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांतील परस्पर संबंधांवर प्रकाश टाकणारा आणि AI च्या उत्क्रांतीच्या पार्श्वभूमीवर माणुसकीच्या मुलभूत प्रेरणांवर भाष्य करणारा सध्याच्या काळातील काहीसा दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे.
या चित्रपटाची कथा झारखंडमधील छोट्याश्या गावात घडते. ही कथा नेहमा या आदिवासी स्त्रीची, तिच्या धानू या किशोरवयीन मुलीची व गुंटू या बाळाची आहे. नेहमाची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे आणि ती नवऱ्याचे शहर सोडून आपल्या मूळ गावी आली आहे. धानूला शहरातून गावाकडे मनाविरुद्ध यावे लागले आहे आणि त्यामुळे नेहमा व धानू या मायलेकींमध्ये कडवटपणा आलेला आहे. शहरापेक्षा गावातील विश्व वेगळे आहे. धानूचे गावात मन रमत नाहीये, शाळेत लक्ष लागत नाहीये. त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे तिची नवी मैत्रीण मालती जिच्यामुळे तिचे आयुष्य थोडेसे सुसह्य झालेले आहे.
घराची आर्थिक जबाबदारी पेलण्यासाठी नेहमाने एका AI निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या स्थानिक केंद्रात डेटा लेबलिंगचे काम स्वीकारले आहे. हे काम तिला सहजासहजी मिळालेले नाही आणि ते टिकवून ठेवणे ही तिची निकड आहे. या केंद्रात AI च्या प्रशिक्षणासाठी स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीचा आधार घेतला जात आहे. साहजिकच या माहितीच्या गुणवत्तेवर AI ची गुणवत्ता अवलंबून असणार आहे.
नेहमाचा वैयक्तिक व व्यावहारिक आयुष्यातील समांतर प्रवास इथे सुरु होतो. नेहमा जिथे काम करते ते AI सध्या बाल्यावस्थेत आहे आणि तिचा मुलगा गुंटूसुद्धा. त्या दोघांवर संस्कार करण्याची जबाबदारी नेहमावर आहे. त्याच वेळी तिची मुलगी धानू हिचासुद्धा गावातील जगण्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे.
प्रशिक्षण केंद्रातील काम वरवर पाहता सरधोपट आहे, ते म्हणजे AI साठी दिलेली चित्रे व्यवस्थित अंकित (tag) करणे. पण ते काम जोखमीचेदेखील आहे कारण चित्र चुकीचे अंकित (tag) केले तर AI ला चुकीची माहिती जाणार आहे आणि त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
नेहमाचे कामाच्या ठिकाणचे नैतिक द्वन्द्व (ETHICAL DILEMMA) एका प्रसंगातून अधोरेखित होते. ही कंपनी एका कीडनाशक यंत्रावर काम करत असते. या यंत्राला विविध किडी, कीटक यांचे फोटो टॅग करून देण्याचे काम नेहमाकडे असते. चित्रे बघताना नेहमाला दिसते की, कीड/कीटक यांच्या चित्रांमध्ये सुरवंटाचे चित्र देखील समाविष्ट केले आहे. नेहमाच्या पारंपारिक ज्ञानानुसार सुरवंट हा पानाचा कुजलेला भाग खातो त्यामुळे तो वनस्पतीला उपकारक ठरतो. आणि त्यामुळे त्याचे कीड असे वर्गीकरण करून त्याला मारणे हे चुकीचे आहे. त्यामुळे ती सुरवंटाचे चित्र टॅग करत नाही.
साहजिकच कंपनीच्या मते लेबलिंग चुकीचे झालेले असते त्यामुळे नेहमाच्या बॉसला कंपनीतील वरिष्ठांकडून ऐकून घ्यावे लागते. नेहमाची बॉसदेखील एक आदिवासी स्त्रीच असते. नेहमा स्पष्टीकरण देते पण ते ऐकून घेतले जात नाही; उलट तिला ऐकवले जाते की, तुझे काम दिलेली चित्रे टॅग करण्याचे आहे; ते कर; स्वत:ची अक्कल पाजळू नकोस.
बहुराष्ट्रीय कंपन्या साहजिकच AI विकसनाच्या जीवघेण्या स्पर्धेत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर आपले मॉडेल बाजारात आणायचे आहे. त्यांचे स्थानिक जीवनाशी देणे घेणे नाही. त्यांना AI साठी माहिती हवी आहे पण सखोल ज्ञान नको आहे. इथे आपल्या मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या, पारंपारिक ज्ञानावर विश्वास असलेल्या आणि नैतिकतेशी बांधिलकी असलेल्या नेहमाचा नफेखोर कंपनीशी संघर्ष सुरु होतो.
इथे एक मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की, उपलब्ध माहितीचे तर्क/विवेकाच्या कसोटीवर विश्लेषण न करता सार्वत्रिकीकरण केलेले असेल, AI ला दिलेली माहिती पूर्वग्रहदूषित असेल, तर त्याचे निर्णय व कृतीदेखील पूर्वग्रहबाधित असतील. अशा प्रकारे अस्तित्वात आलेले AI निक्षितपणे ज्ञानाचे सपाटीकरण करेल, वास्तवाकडे दुर्लक्ष करेल, जीवनाच्या विविध अंगांना एकसाचीपणा येऊ शकेल हा गंभीर धोका आपल्यापुढे असेल. मानवाचे त्याच्या मातीशी, संस्कृतीशी जोडले गेलेले जे अस्तित्व आहे ते हिरावून घेतले जाऊ शकते. या सूत्राकडे आदिवासी स्त्रीच्या परिप्रेक्ष्यातून हा चित्रपट बघतो.
आता हा केवळ एक नैतिक पेचप्रसंग राहत नाही तर भावनिक गुंता होऊन जातो. कारण नेहमा एकीकडे तिच्या पोटच्या मुलाची नैसर्गिक वाढ पाहताना सुखावत असते तर दुसरीकडे AI रुपी कृत्रिम अपत्याच्या वाढीतील संभाव्य धोके पाहून गोंधळात पडत असते आणि परिस्थितीपुढे हतबल झाल्यामुळे अपराधीभावना तिला ग्रासत असते. AI साठी लहान बाळाचे रुपक योजून हा चित्रपट प्रेक्षकाला अंतर्मुख करतो.
हेही ऐका - विज्ञानाने मानवतेचे भावात्मक उद्दिष्टही दिले! (विवेक सावंत)
नेहमाचे मातीशी जोडलेले ममत्व आणि विवेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या धोरणांवर प्रभावी ठरतो का? धानू निसर्गाच्या सानिध्यात आपल्या मुळांशी जोडली जाते का? हे पडद्यावरच पाहणे रंजक ठरेल.
बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा या दोन शब्दांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही नैसर्गिक प्रज्ञेला, आणि यंत्र हे मानवाला पर्याय ठरेल की ते त्याचे प्रतिबिंब म्हणून अस्तित्वात राहील? अशा समकालीन महत्वाच्या प्रश्नाला हा चित्रपट विविध प्रसंगांच्या माध्यमातून वाचा फोडतो. केवळ 73 मिनिटांचा हा चित्रपट त्यातील गहन आशय व तो मांडण्याच्या रूपकात्मक पद्धतीमुळे रोचक ठरतो. वर उल्लेख केलेल्या प्रसंगातील सुरवंट हे एक रूपक आहे. त्याचप्रमाणे आणखी एक रूपक आहे साळिंदर या प्राण्याचे. साळिंदर हा गुहेत राहणारा अत्यंत भित्रा आणि जिवाला धोका निर्माण झाल्यास आपले काटे शत्रूवर फेकणारा प्राणी आहे. नेहमा आणि आणि तिची मुलगी धानू यांच्या आयुष्यातील निर्णायक प्रसंगात या रूपकाचा चपखल वापर म्हणजे दिग्दर्शकीय कौशल्याचा उत्तम नमुना आहे. प्रेक्षकांनी तो आपापल्या परीने उमजून घेणेच योग्य ठरेल.
हा चित्रपट मागील वर्षी MAMI आणि केरळ फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला होता. मागील महिन्यात काही मर्यादित चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला, परंतु तुलनेने दुर्लक्षितच राहिला. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. चित्रपटाची झलक येथे पाहता येईल
अरण्य सहाय या तरुण माध्यमकर्मीने या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची पटकथा बांधीव व छायाचित्रण नेटके आहे. संगीताचा वापर मोजकाच पण प्रभावी आहे. साधे सरळ संवाद पटकथेला पूरक ठरतात आणि दोन संवादांमधील मोकळ्या जागा (pause) सुद्धा सशक्तपणे व्यक्त होतात. सर्व कलाकार raw असल्याने चित्रपटाला एक प्रकारचा अस्सलपणा लाभला आहे व हे लोक आपलीच कथा सांगत असल्याचा अनुभव चित्रपट पाहताना येतो.
चित्रपटात नेहमा आणि धानूच्या मनोविश्वांचा परस्परसंबंध अधिक चांगल्या प्रकारे दाखवता आला असता असे वाटते. तसेच कामावर शांतपणे, संयतपणे वागणारी नेहमा धानूवर मात्र कायम ओरडताना दाखवली आहे आणि ती धानूच्या साध्या प्रश्नांची उत्तरेदेखील देत नाही, तिच्यावर ओढवलेली परिस्थिती समजून घेत नाही, हे थोडे खटकते. तसेच धानूचा ताबा तिच्या वडिलांकडे जाऊ नये म्हणून नेहमाला नोकरी करावी लागते हेदेखील कायद्यातील तरतुदींशी सुसंगत ठरत नाही.
असे असले तरी हा चित्रपट मनोरंजनाबरोबरच एक वैचारिक अनुभूती देणारा चित्रपट आहे. आजच्या कळत आपल्याला AI च्या परिणामांपासून अलिप्त राहणे अशक्य आहे कारण तो परिणाम एकाच वेळी सर्वव्यापी व मूलभूत असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट सामाजिकदृष्ट्या औचित्यपूर्ण ठरतो.
टी.व्ही शाप की वरदान? मोबाईल शाप की वरदान? अशा विषयावरचे निबंध आपण शाळेत लिहिलेले असतात. काळ बदलला तशी तंत्रज्ञानाची नावे केवळ बदलली. मात्र ‘शाप की वरदान?’ हा मूलभूत प्रश्न तसाच राहिलेला आहे, याचे भान हा चित्रपट देतो.
Humans in the Loop
(हिंदी + कुरुख या आदिवासी भाषेतील चित्रपट)
लेखक आणि दिग्दर्शक - अरण्य सहाय
निर्मिती - Storiculture, Museum of Imagined Futures, SAUV Films
अभिनय - सोनल मधुशंकर (नेहमा), ऋधिमा सिंग (धानू), गीता गुहा (नेहमाची बॉस), विकास गुप्ता, प्रयरेक मेहता, अनुराग लुगुन
कोठे पाहता येईल? - नेटफ्लिक्स
- मकरंद ग. दीक्षित
meetmak23@gmail.com
(लेखक, संगणक अभियंता असून ‘स्पार्क फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागात शिक्षण, रोजगार व जलसंवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Tags: netflix AI Artificial Intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय नैतिकता आदिवासी शाप की वरदान ह्युमन्स इन द लूप संघर्ष Load More Tags
Add Comment