वि. स. ऊर्फ भाऊसाहेब खांडेकर - माणसातल्या देवाची पूजा करणारे विचारशील लेखक

माझ्या जीवनाचे शिल्पकार- भाग 5

काही थोर माणसे आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या अवस्थांत भेटतात आणि आपल्याला त्यांच्याकडून नेहमी नवे चिंतन, नवा विचार ऐकायला मिळतो. विविध अनुभवांतून गेल्यावर आपल्याही मनाची समज वाढते, आपण चिकित्सक होतो आणि तरीही काही थोर व्यक्तींकडे आपल्याला सतत जावेसे वाटते. भाऊसाहेब खांडेकरांशी माझी अशीच आयुष्याच्या विविध अवस्थांत भेट झाली आणि प्रत्येक वेळच्या भेटीतून आमचा ऋणानुबंध दृढ होत गेला.

आमच्यामध्ये पहिला भावबंध निर्माण झाला, तो खांडेकरांच्या कादंबऱ्यांमधून. मॅट्रिकच्या वर्गात असताना त्यांची ‘उल्का’ ही कादंबरी वाचली आणि विलक्षण प्रभावित झालो. ‘गड आला पण सिंह गेला’, ‘सावळ्या तांडेल’ या कादंबऱ्यांतील रोमहर्षक वातावरणात रमलेल्या माझ्या मनाला धक्का बसला. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला. सुरक्षित जीवन जगणारा. कसलीच झळ न लागलेला. ‘उल्का’ कादंबरी वाचली आणि माझे मन अस्वस्थ झाले. समाजात इतके दैन्य-दारिद्र्य असू शकते, त्यावर मात करून ‘उल्का’मधील चंद्रकांतसारखा तेजस्वी तरुण स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतो, संघर्ष करताना धुंद होतो- हे सारे मला अपरिचित होते. माझ्या मनात एक कोलाहल सुरू झाला. माझे घर मला एकदम संकुचित वाटू लागले. आपण या सुरक्षित जीवनात गुरफटून राहून चालणार नाही, असे तीव्रतेने वाटले. मी खांडेकरांची पुस्तके सपाट्याने वाचू लागलो. ‘हृदयाची हाक’, ‘कांचनमृग’, ‘दोन ध्रुव’ या कादंबऱ्या वाचल्या. त्यांचे कथासंग्रह वाचू लागलो आणि वि. स. खांडेकरांनीच माझे भावविश्व व्यापून टाकले. देशावरच्या काहीशा रुक्ष गावात मी वाढलो होतो. भाऊंच्या पुस्तकातील कोकणातील निसर्गाची वर्णने वाचून, धामापूरचे तळे एकदा पाहिले पाहिजे, असे वाटले. भाऊसाहेबांच्या कादंबऱ्यांतील नायकांच्या ध्येयवादी जीवनाबद्दल मला ओढ वाटू लागली आणि याच मार्गाने आपल्याला वाटचाल केली पाहिजे, असा मनाचा निश्चय होऊ लागला.

कॉलेजमध्ये गेल्यावर मी मराठी व इंग्रजी साहित्य छांदिष्टपणे वाचू लागलो. समवयस्क मित्रांबरोबर सतत चर्चाही चालत. मनोहर आळतेकर हा माझा मित्र म्हणे, ‘‘खांडेकरांचे नायक स्वप्नाळू असतात. पण जग स्वप्नांवर चालत नाही.’’ मी राजकीय अभ्यासवर्गात जात असे. तेथे मधू लिमये एकदा म्हणाला, ‘‘समाजवादाचे दोन प्रकार आहेत- आदर्शवादी आणि शास्त्रीय. साहित्यातही खांडेकरांसारखे काही लेखक आदर्शवादी चित्रे रंगवतात. पण राजकारण, समाजजीवन फार वेगळे असते. वास्तवाचे भान नसेल तर मनाशी बाळगलेली स्वप्ने विरून जातील.’’ पण अशी टीका ऐकूनही माझ्या मनावरील खांडेकरांच्या लेखनाचा पगडा कमी झाला नाही. ‘पांढरे ढग’मधील अभय ही नायकाची व्यक्तिरेखा मला फार आवडली. पुढे 1942 मध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली. माझ्याबरोबरीच्या ज्या अनेक तरुणांनी चळवळीत भाग घेतला, त्यांच्याबरोबर तुरुंगात चर्चा करताना मला असे आढळून आले की, त्यांच्यापैकी अनेकांना वि. स. खांडेकरांच्या कथा-कादंबऱ्या फार आवडत. किंबहुना, त्यांच्या मनातील ध्येयाच्या ऊर्मीचे खांडेकरांच्या साहित्याशी जवळचे नाते होते. तुरुंगात आचार्य भागवत यांची अनेक भाषणेही ऐकायला मिळाली. रवीन्द्रनाथांच्या साहित्यावर बोलताना ते एकदा म्हणाले, ‘‘अभिजात साहित्याचा संस्कार अभिरुचीवर झाला पाहिजे. मराठी वाचकांना मात्र रोमँटिक, स्वप्नरम्य साहित्याबद्दल अधिक आकर्षण वाटते. पण गोविंदाग्रज कल्पनाविलासातच गुंतून पडले आणि त्यांचे शिष्य वि. स. खांडेकर हेही रोमँटिकच आहेत.’’ या विधानात तथ्य आहे, हे मला जाणवत होते; पण त्याच वेळी ‘हिरवा चाफा’, ‘दोन मने’ या कादंबऱ्यांच्या सुखद स्मृती मनात रेंगाळत होत्या आणि ध्येयवादाला प्रेरक ठरणारे खांडेकरांचे साहित्य हेच आचार्य भागवतांच्या टीकेला चोख उत्तर आहे, असे मला वाटते.

पुढे 1946 मध्ये मी कोल्हापूरला गेलो असताना, चंद्रकांत पाटगावकर यांच्याबरोबर मी भाऊसाहेब खांडेकरांकडे गेलो. भाऊ साधे आहेत. त्यांना तरुणांशी बोलायला आवडते, हे मी ऐकले होते. तरीही ज्या मनमोकळेपणाने भाऊंनी माझे स्वागत केले, ते मी अपेक्षिले नव्हते. मी ज्या वेळी ‘आपण माझे आवडते लेखक आहात, म्हणून भेटायला आलो आहे’, असे म्हणालो; तेव्हा भाऊ हसले आणि म्हणाले, ‘‘जगातल्या मोठ्या लेखकांचे सर्व साहित्य वाचा, म्हणजे तुमच्या आवडीनिवडी बरोबर होतील.’’ मी मधून-मधून प्रश्न विचारी आणि भाऊसाहेब त्या अनुषंगाने खूप बोलत. पहिल्या भेटीतच आमचे नाते जुळले. तासाभराने मी निघालो, तेव्हा भाऊ म्हणाले, ‘‘केव्हाही कोल्हापुरात आलात की, येत जा आणि कॉलेजात शिकवत असलात, तरी चळवळीशी संबंध तोडू नका.’’

कोल्हापूरमध्ये माझी बहीण राहत असे. शिवाय काही वर्षे भणगे आणि अ. के. भागवत हे माझे निकटचे मित्र कोल्हापुरात कॉमर्स कॉलेजमध्ये प्राचार्य व उपप्राचार्य होते. त्यामुळे मी अनेकदा तिकडे गेलो. तेथे गेल्यावर मी भाऊसाहेबांकडे कटाक्षाने जात असे. आमच्या संभाषणात अनेक विषय येऊन जात. अर्थात भाऊच मुख्यत: बोलत. मी फक्त मधून-मधून प्रश्न विचारीत असे.

एकदा मी गेलो, त्या वेळी भाऊसाहेब अर्न्स्ट टोलर या जर्मन नाटककाराच्या ‘I was a German’ या आत्मकथेवर बोलू लागले. ते म्हणाले, ‘‘प्रधान, ही एक तेजस्वी आत्मकथा आहे.’’ भाऊंनी अर्न्स्ट टोलरच्या 'Letter from Prison' या पुस्तकाचा केलेला सुंदर मराठी अनुवाद मी वाचला होता. भाऊ म्हणाले, ‘‘टोलरने लिहिलेली पत्रे तुम्ही वाचलीच आहेत. एकीकडे त्याची काव्यात्म वृत्ती आणि दुसरीकडे हिटलरच्या तुरुंगात असताना त्याच्या मनाची न ढळलेली खंबीरता, या दोन्हींमुळे मी फार प्रभावित झालो. टोलर पाच वर्षे तुरुंगात होता, पण तुरुंगातल्या एकांतवासाने किंवा हाल-अपेष्टांनी त्याचे मन पिचले नाही. मी शिरोड्याला हायस्कूलमध्ये ‘The Prisoner of Chillon’ ही बायरनची कविता शिकवली होती. परंतु त्या कवितेतील 'Brightest in dungeon, Liberty thou art' या ओळीचा अर्थ मला अर्न्स्ट टोलरची पत्रे वाचताना कळला.’’ यावर मी इतकेच म्हणालो, ‘‘कॅपिटॉल बॉम्ब केसमधील माझ्या मित्रांनी पोलीस लॉकअपमध्ये सगळा छळ सोसला आणि तरी त्यांचे धैर्य अभंग राहिले. त्या वेळीही मला बायरनची हीच ओळ आठवली.’’ भाऊ म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यापेक्षा भाग्यवान आहात, कारण तुम्हाला तुरुंगात जायला मिळाले. मला ज्या शब्दांचा अर्थ टोलरच्या पुस्तकातून उमगला, तो अर्थ तुम्हाला प्रत्यक्ष तुरुंगातच कळला.’’ भाऊ पुढे म्हणाले, ‘‘मी ‘तुरुंगातील पत्रे’ साने गुरुजींना अर्पण केले आहे. कारण गुरुजींनी तुरुंगात ‘श्यामची आई’ लिहिले. टोलरने जर्मनीतील त्या तुरुंगाच्या कोठडीत असताना त्याला चंद्र-तारे दिसले की त्याच्या मनाला कसा आधार वाटे, हे लिहिले आहे. गावाकडच्या आठवणी आल्या की, त्याला तिकडचे शेत डोळ्यांसमोर दिसू लागे. याचा अनुवाद करताना मला एकदम आठवले की, साने गुरुजींना नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांच्या कोकणातील गावाकडच्या झऱ्याचे संगीत ऐकू येई. तेथील वेली व फुले त्यांना दिसत आणि त्याच क्षणी मी ठरवले की, हे पुस्तक साने गुरुजींनाच अर्पण करायचे.’’ हे बोलणे चालू असतानाच भाऊ एकदम स्तब्ध झाले. त्यांनी एक-दोन येरझारा घातल्या. मला त्यांची अस्वस्थता जाणवली, पण काय बोलावे ते सुचेना. इतक्यात भाऊच पुन्हा बोलू लागले, ‘‘आपल्याला वाटते की, आपल्याला माणसे समजली. अर्न्स्ट टोलर माझा आवडता लेखक. त्याच्या पत्रांमुळे, त्याच्या आत्मकथेमुळे मी त्याच्या निकट गेलो. पत्रांचा अनुवाद करताना त्याच्या मनाचे सामर्थ्य मला जाणवले होते. पण इतक्या खंबीर मनाच्या अर्न्स्ट टोलरने पुढे आत्महत्या केली. ती का केली असेल? मी जेव्हा हा विचार करतो, तेव्हा मला समजते की, माणसाच्या मनाचा आपल्याला थांगच लागत नाही. काही कोपरे समजतात, इतकेच. आम्हा लेखकांना अहंकार असतो की, आम्हाला जीवन कळले. पण हे केवळ अर्धसत्य असते.’’ भाऊ बोलत होते, थांबत होते, पुन्हा बोलत होते. ते म्हणाले, ‘‘हिटलरने जे हत्याकांड केले, त्यामुळे माणूस किती क्रूर आहे, अद्याप तो किती रानटीच राहिला आहे- हे जगाला समजले. जे गॅस चेंबरमध्ये मेले, त्यांनी तर अनंत यातना भोगल्याच; पण अर्न्स्ट टोलरचे कविमन इतके होरपळून गेले की, अखेर त्यालाही स्वत:चे आयुष्य संपवावेसे वाटले. लक्षावधी माणसांची मने अशीच करपून गेली असतील.’’ भाऊ पुढे म्हणाले, ‘‘हिटलर तर दुष्ट होताच, पण आपणही अद्याप रानटीच आहोत. फाळणीच्या काळात काय झाले? रामानंद सागर म्हणाला त्याप्रमाणे, फाळणीमध्ये माणुसकीचाच मुडदा पडला.’’ भाऊंना तो ताण असह्य होऊ लागला आणि ते मला एकदम म्हणाले, ‘‘मी जरा पडतो आता.’’ खिन्न मनाने मी बाहेर पडलो.

एकदा मी भाऊंकडे गेलो, त्या वेळी आदल्याच दिवशी भाऊंनी आर्थर कोसलरच्या आत्मचरित्राचा पहिला भाग 'Arrow in the Blue' वाचून संपवला होता. जे नवीन वाचले असेल, आवडले असेल त्याबद्दल बोलल्याशिवाय भाऊंना राहवत नसे. कोसलरबद्दल आणि त्याच्या आत्मकथेबद्दल भाऊ म्हणाले, ‘‘प्रधान, या पुस्तकातले ‘सायकॉलॉजी ऑफ कन्व्हर्शन’ हे प्रकरण अप्रतिम आहे. तरुणपणी कोसलरला कम्युनिझमबद्दल आकर्षण वाटू लागते. तो त्या पक्षातील कार्यकर्त्यांशी मैत्री करतो. तेथील एक प्रमुख कार्यकर्ते त्याला मार्क्सिझम समजून सांगतात आणि मार्क्सची काही पुस्तके वाचायला देतात. मार्क्सवादी तत्त्वज्ञान पटल्यावर आपल्या मनाची काय स्थिती झाली, याचे कोसलरने केलेले वर्णन तुम्ही वाचलेच पाहिजे. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने तरुण कोसलरचे विचारविश्व व्यापून टाकले. त्याला ज्या प्रश्नांनी अस्वस्थ केले होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जणू त्याला सापडली. राजकारण, अर्थकारण यांतील समस्यांची उकल करण्याचा मार्ग सापडला, असे त्याला वाटू लागले. किंबहुना, डायलेक्टिक्सची किल्ली लावून आपण कोणत्याही प्रश्नाचे कुलूप उघडू, असे तो मानू लागला. एका अर्थाने ही मनाची अवस्था फार चांगली असते. ‘नष्टोमोह: स्मृतिर्लब्धा’ ही अर्जुनाची अवस्था अशीच होती. पण हाही एक भ्रम असतो. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे मार्क्स म्हणाला. पण कोसलरने लिहिलेले सायकॉलॉजी ऑफ कन्व्हर्शन वाचताना मार्क्सचे डायलेक्टिक्स म्हणजेही अशीच माणसांना भ्रांतचित्त बनवणारी अफू आहे, असे मला वाटले.’’ पुढे भाऊ म्हणाले, ‘‘पण हा त्या तत्त्वज्ञानाचा दोष नाही. मार्क्स म्हणाला की, मी तुम्हाला शास्त्रीय रीतीने जीवनाचा अर्थ कसा लावायचा ते सांगतो आणि काही जणांना ही शास्त्रीय रीत समजली म्हणजे जणू सगळ्या प्रश्नांची उत्तरे सापडली, असा भ्रम झाला. आजही अनेक मार्क्सवादी अशा धुंदीतच असतात. मार्क्सच्या अनुयायांप्रमाणेच प्रत्येक धर्माच्या काही अनुयायांना प्रेषितांच्या आज्ञेनुसार आपण चाललो की आपल्याला मोक्ष मिळणारच, असे वाटत असते. मनाची ही अवस्था फार फसवी आहे, कारण तिच्यामुळे आपण सत्यापासून दूर जातो. सॉक्रेटिस असे कधी करत नव्हता. तो सतत प्रश्न विचारत असे. आपले वामन मल्हार जोशी प्रत्येक समस्येचा असाच सर्व बाजूंनी विचार करतात. काही जण वामनरावांना संशयात्मा म्हणतात. मला ते मुळीच मान्य नाही. आपल्याला अंतिम सत्य गवसले, अशा भ्रमात वावरणाऱ्या अनेकांपेक्षा वामनरावांचे सत्यशोधन किती तरी उच्च प्रतीचे होते.’’ भाऊ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही रसेलचा 'In defence of scepticism' हा लेख वाचला असेलच. रसेलची भूमिका ही खरी सत्यशोधकाची भूमिका आहे. सत्य सापडणे फार कठीण असले तरी सत्य शोधण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि जगातील सर्व ठोकळेबाज तत्त्वज्ञानांमुळे या आनंदालाच माणसे मुकतात. आपल्याला अंतिम सत्य गवसले आहे असे वाटणे, यासारखी आत्मवंचना नाही. पण या आत्मवंचनेनेही एक प्रकारची झिंग येते, हे कोसलरने फार छान सांगितले आहे.’’ 

भाऊसाहेबांना कोसलरचे आत्मचरित्र, विशेषत: त्यातील एक प्रकरण आवडले. पण कोसलरने संपादित केलेल्या 'The God that failed' या पुस्तकाबद्दल मात्र त्यांची प्रतिक्रिया वेगळी, मला काहीशी अनपेक्षित होती. भाऊ  म्हणाले, ‘‘भांडवलशाहीने केलेल्या अन्यायाची चीड आलेल्या अनेकांना कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाबद्दल आकर्षण वाटू लागले. काही जणांना कम्युनिझम आला तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल, असेही वाटू लागले. पण कम्युनिस्ट राजवटीतही अनेक अन्याय-अत्याचार झाले. अनेकांची हत्या करण्यात आली. त्यामुळे पुन्हा काही जण विचार करू लागले. यांपैकी ज्या विचारवंतांचा आणि लेखकांचा कम्युनिझमबद्दल पूर्ण भ्रमनिरास झाला, त्यांचे लेख या पुस्तकात आहेत. कोसलरने या संग्रहाला नाव मोठ्या हुशारीने दिलेय. 'The God that failed' हे शीर्षक मन वेधून घेणारे आहे. पण मला नाही हे पुस्तक आवडले.’’ मी भाऊसाहेबांना विचारले, ‘‘तुमचा या पुस्तकावर नेमका आक्षेप काय आहे?’’ भाऊसाहेब म्हणाले, ‘‘तुम्हाला माहीत आहे की, ‘डेमोक्रॅटिक सोशलिझम’ ही विचारसरणी मला पटते. मी आग्रहाने लोकशाही समाजवादाचे समर्थन करतो. मला कम्युनिस्टांचा ‘डिक्टेटरशिप ऑफ दि प्रोलिटॅरिएट’ हा विचार अजिबात मान्य नाही. हुकूमशाही आली की सत्याची गळचेपी होणे, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होणे अटळ आहे. या पुस्तकात कम्युनिस्ट राजवटीत कसे अन्याय झाले, देशोदेशींच्या कम्युनिस्ट पक्षांनी कशा चुकीच्या भूमिका घेतल्या आणि सत्याचा विपर्यास कसा केला, याची उदाहरणे अनेकांनी दिली आहेत. ती उदाहरणे खरी आहेत, असे मी मानतो. त्यांच्यामधून कम्युनिस्ट पक्षाची कार्यपद्धती कशी सदोष आहे, काही ठिकाणी ती किती घातक आहे, हे समजून येते; परंतु त्यामुळे ते तत्त्वज्ञान खोटे ठरते, असे म्हणणे मला मान्य नाही. धर्मात कर्मकांडाला महत्त्व देऊन मूळ उदात्त धर्माला काळिमा फासणारे जसे दोषी आहेत, त्याचप्रमाणे मार्क्सचे तत्त्वज्ञान नीट न समजता केवळ सत्तेच्या आहारी गेलेेले कम्युनिस्ट नेतेही दोषी होते. पण त्यांच्या दुष्कृत्यांचा निषेध करताना समतेच्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात कोसलर मला प्रचारकी वाटला. कम्युनिस्टांची प्रचारकी भूमिका मला आवडत नाही, तसाच कम्युनिस्टविरोधी प्रचारातील अभिनिवेशही मला आवडत नाही.’’ भाऊ पुढे म्हणाले, ‘‘लेखकाने अशी प्रचारकी भूमिका घेतली की, त्याच्या कलेचीही हानी होते, असे माझे मत आहे. जॉर्ज ऑर्वेलचे ‘ॲनिमल फार्म’ हे पुस्तक मला फार आवडले. त्यातील उपरोध, उपहास आणि तरीही त्या सर्व  लेखनातील संयम, त्याची रेखीव शैली केवळ अपूर्व आहे. परंतु पुढे-पुढे ऑर्वेलने कम्युनिस्ट-विरोधाची कडवी भूमिका घेतली. राजकारणात अशी भूमिका घेण्याला माझा विरोध नाही, परंतु अशा प्रचारकी अभिनिवेशाने कलेला हिणकसपणा येतो. ऑर्वेलचे ‘नाइन्टीन एटीफोर’ हे पुस्तक मी वाचले. ‘ॲनिमल फार्म’मधील संयम इथे सुटला आहे आणि ऑर्वेल कलावंत-लेखक न राहता या पुस्तकात तो जणू राजकीय प्रतिस्पर्ध्याचा मर्मभेद करण्यासाठी लिहिणारा अभिनिवेशी पत्रकार बनला आहे.’’

भाऊसाहेबांचे त्या दिवशीचे विवेचन ऐकल्यावर मी माझ्या मित्रांना म्हणालो, ‘‘भाऊसाहेब खांडेकर प्रत्यक्ष राजकारणापासून दूर असले, तरी विचारांच्या बाबतीत ते किती जागरूक असतात, हे मला आज समजले.’’

भाऊसाहेब सतत नवी पुस्तके वाचत. वैचारिक साहित्य त्यांना विशेष आवडे. एकदा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही, ‘फिअर ऑफ फ्रीडम’ हे पुस्तक वाचलेत का? वाचले नसेल तर जरूर वाचा. अगदी वेगळे विवेचन केलेय त्या लेखकाने. आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य हवे असते. पण स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलणे सोपे नसते. या जबाबदाऱ्यांनी ज्यांची छाती दडपून जाते, त्या माणसांना- अशा भीरू समाजाला स्वातंत्र्याची भीतीच वाटू लागते. बंधनांच्या साखळ्यांमुळेच त्यांना सुरक्षित वाटू लागते आणि ते नंतर त्या बंधनांचे समर्थन करू लागतात. या पुस्तकात हा विचार वाचताना मन अंतर्मुख होते.’’ यावर मी म्हणालो, ‘‘भाऊसाहेब, डोळे कितीही बिघडले तरी नवनवीन पुस्तके वाचण्याची तुमच्या मनाची ओढ कायम आहे, याचे आश्चर्य वाटते.’’ यावर भाऊ म्हणाले, ‘‘मी फारसे कृतिशील आयुष्य जगलो नाही. आता तर सतत बिघडणाऱ्या प्रकृतीमुळे मी जेमतेम संध्याकाळी फिरायला जातो. अशा वेळी ग्रंथ हेच माझे सोबती असतात.’’ पुढे भाऊ म्हणाले, ‘‘नवनवीन विचार मांडणारे ग्रंथ मला फार आवडतात. त्यातही आग्रही भूमिका घेण्यापेक्षा वाचकाला विचार करायला लावणारी पुस्तके मला जास्त आवडतात. रसेलचे सगळेच विचार मला पटत नाहीत, पण त्याची पुस्तके वाचताना विचारांचे एक नवेच क्षितिज दिसते. त्यामुळे रसेलची काही पुस्तके मी पुन: पुन्हा वाचतो. त्याचे ‘अन्‌पॉप्युलर एसेज’ हे पुस्तक मला विलक्षण आवडते.’’ भाऊ थोडे थांबून पुढे म्हणाले, ‘‘प्रधान, वैचारिक लेखन करणाऱ्या अनेक आधुनिक लेखकांचे ग्रंथ मी वाचतो. पण ललित साहित्याचे मात्र तसे नाही. अनेक आधुनिक अमेरिकन कादंबऱ्या वाचताना मी त्या अर्धवटच सोडून दिल्या. आधुनिक कवितेबद्दलही मला  फारसे काही वाटत नाही. मला असे वाटते की, चाळिशीनंतर ज्याप्रमाणे आपल्या नव्या ओळखी झाल्या तरी नव्याने मैत्री जमत नाही, तसेच ललित लेखकांचे आहे. जे लेखक मला विशीत-तिशीत-चाळिशीत आवडले, त्या चेकॉव्ह-टॉलस्टॉय यांसारख्या लेखकांचे साहित्य पुन्हा वाचताना माझे मन रमते; कारण त्यांच्याशी माझी दीर्घ काळ निकट मैत्री झालेली असते. नव्या साहित्याशी अशी माझी जवळीक होतच नाही. कदाचित माझ्या मनाची ती मर्यादा असेल.’’

मराठी ललित साहित्याबाबत मात्र भाऊसाहेबांच्या मनाला अशी मर्यादा पडलेली नव्हती. त्यांच्यापेक्षा अगदी भिन्न प्रवृत्तीच्या, अगदी वेगळ्या रीतीने लिहिणाऱ्या लेखकांचे ललित साहित्यही भाऊसाहेब नेहमी वाचत असत आणि त्यांच्या संवेदनशील मनाला याही लेखकांचे सामर्थ्य चट्‌कन जाणवत असे. यासाठीच भाऊसाहेब ‘सत्यकथा’ नियमाने वाचीत. ‘सत्यकथे’त जी. ए. कुलकर्णी यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. भाऊसाहेबांनी त्या वाचल्या आणि ते मला म्हणाले, ‘‘जी. ए. कुलकर्णी हा कोणी नवा लेखक दिसतोय. त्यांच्या तीन-चार कथा मी वाचल्या. मानवी जीवनातील दु:खाची त्यांची जाण इतरांपेक्षा अगदी वेगळी आहे आणि ती व्यक्त करण्याची त्यांची शैलीही मनाची पकड घेणारी आहे.’’

एकदा थोर लेखकांबद्दल बोलणे निघाले असताना मी म्हणालो, ‘‘थोर लेखक हे कमालीचे आत्मकेंद्रित असतात. त्यांचे स्वत:च्याच साहित्यावर प्रेम असते. त्यांच्यापेक्षा वेगळ्या शैलीत लिहिणारे लेखक त्यांना कधीच आवडत नाहीत.’’ यावर भाऊसाहेब म्हणाले, ‘‘हे तसे पाहिले तर अपरिहार्यच आहे. थोर कलावंत आपल्या कलेशी एकरूप झालेला असतो. त्याची कलाच त्याचे जीवन व्यापून टाकते. त्यामुळे त्याचा आशय आणि त्याची अभिव्यक्ती दोन्ही अविभाज्य असतात. थोर गायक, थोर नर्तक यांच्या बाबतीत हे शंभर टक्के खरे असते. चित्रकारांच्या बाबतीतही जवळजवळ तसेच असते. अशी एकरूपता साहित्यिकांपैकी फार थोड्यांना अनुभवता येते. पण जे या उच्च पातळीवर जातात, त्यांची कलाकृतींच्या निर्मितीत जणू समाधी लागते. त्यांना स्वत:ची अनुभूती आणि निर्मिती हेच अंतिम सत्य वाटते. सर्वांनाच हे भाग्य लाभत नाही. माझ्या लेखनात विचारांना प्राधान्य असते आणि त्यामुळे अनेकांना मी केलेले स्वभावलेखन उणे वाटते. मी निर्भेळ कलेच्या पातळीवर जाऊ शकलेलो नाही. त्यामुळे माझा एक फायदा मात्र झाला. तो म्हणजे, अन्य लेखकांच्या साहित्याचा आनंद मी उपभोगू शकलो.’’ भाऊसाहेब पुढे म्हणाले, ‘‘मला स्वातंत्र्य चळवळीबद्दल आकर्षण होते. क्रांतिकारकांच्या जीवनातील त्यागाची, समर्पणाची उदात्तता मला समजत असे. परंतु कुसुमाग्रज ज्या रीतीने क्रांतिकारकांच्या मनाशी एकरूप होऊ शकले, ते सामर्थ्य माझ्या मनात नाही. पण मी आत्मकेंद्रित असा मोठा लेखक नसल्यामुळे कुसुमाग्रजांची कविता वाचताना माझे मन हरखून गेले. बोरकरांची उत्कट काव्यात्म वृत्ती माझ्याजवळ नाही, पण बोरकरांच्या काव्यातील सौंदर्याचा आस्वाद मी रसिकतेने घेऊ शकतो. मला माझ्या लेखनाच्या मर्यादा माहीत असल्यामुळे अन्य लेखकांचे मोठेपण नाकारण्याचा करंटेपणा मी करत नाही.’’ यावर आमची बरीच चर्चा झाली. भाऊसाहेब पुढे म्हणाले, ‘‘असे असले तरी आपल्याही आवडी-निवडी असतात. माझ्याही तशा आहेत. मराठीतील नवकथाकारांपैकी अरविंद गोखले मला जसे आवडतात, तशा मला पु. भा. भाव्यांच्या कथा आवडत नाहीत. त्यांच्या लेखनाशी माझी ‘वेव्हलेंथ’ जुळतच नाही. नवकथा लेखकांमध्ये दि. बा. मोकाशी हे अग्रणी मानले जात नाहीत. पण मला त्यांच्या काही कथा फार आवडतात. मात्र केवळ एखाद्या लेखकाची प्रकृती माझ्याहून भिन्न आहे, म्हणून मी त्याला कमी लेखत नाही. रणजित देसाई कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे येत असे. तो माझा चाहता होता. त्या वयात कोणाला तरी मोठे मानावेसे सगळ्यांनाच वाटते. मी रणजितचे काही लेखन वाचले. चर्चेतील त्याचे बोलणे ऐकले आणि माझ्या लक्षात आले की- हा तरुण लेखक जरी माझ्याशी प्रेमाने वागत असला, तरी याच्या मनाची घडण वेगळी आहे. मी त्याला सांगितले की- रणजित, तू माझेच काय, पण कोणाचेही अनुकरण करू नकोस. ज्या मातीत तू वाढलास, तिच्याशी प्रतारणा करू नकोस. मला माहीत होते की, माझ्यापेक्षा तो इतिहासाकडे अगदी वेगळ्या दृष्टीने पाहत होता. भूतकाळातील जे त्याज्य आहे ते टाकले पाहिजे, जे कालबाह्य आहे त्याची भलावण करता कामा नये- ही माझी भूमिका. तर, रणजित हा इतिहासकाळात चिरंतन मूल्यांचा आविष्कार शोधणारा. त्याने स्वत:शी प्रामाणिक राहावे, ही माझी अपेक्षा होती आणि ती त्याने पूर्ण केली. तो एक कलावंत आहे. मला जी सामाजिक मूल्ये महत्त्वाची वाटतात, त्यापेक्षा वेगळ्या गोष्टींचे त्याला महत्त्व वाटते. ‘स्वामी’ ही एक सुंदर कलाकृती आहे, पण त्यात इतिहासाचे जे उदात्तीकरण आहे ते मला रुचणारे नाही.’’ यावर मी इतकेच म्हणालो, ‘‘असे असूनही आयरनी ही की, आपली पुस्तके अभिमानाने प्रकाशित करणाऱ्या देशमुखांनीच ‘स्वामी’ कादंबरी प्रसिद्ध केली.’’ भाऊसाहेब यावर काही बोलले नाहीत. फक्त थोडे हसले.

भाऊसाहेब खांडेकरांना केवळ विचारात रस नव्हता, त्यांना कृती अधिक महत्त्वाची वाटे. त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे, भाऊ माणूस म्हणून फार मोठे होते. अन्याय दिसला की, ते क्षुब्ध होत. दु:ख, दारिद्र्य भोगणाऱ्या माणसांबद्दल त्यांना सहानुभूती वाटे आणि अशा अनेकांना ते हस्ते-परहस्ते मदत करीत. खोटेपणाची, दांभिकतेची त्यांना चीड होती. त्यांनी स्वत:च्या उणिवा कधी झाकल्या  नाहीत, त्याचप्रमाणे इतरांच्या दोषांवर कधी कुत्सित टीकाही केली नाही. भाऊ बोलताना अनेक विषयांवरील आपली मते मांडीत, पण न्यायाधीशाची भूमिका मात्र घेत नसत. ते मला एकदा म्हणाले, ‘‘गाल्सवर्दीच्या एका नाटकातलं एक पात्र म्हणतं, ‘परमेश्वरा, मला इतरांना समजून घेता येऊ दे.’...’’ भाऊंचे अंत:करण विशाल होते. म्हणूनच दत्तक गेल्यावर घरची सावकारी टाकून ते शिरोड्याला शिक्षक म्हणून गेले आणि तिथेच अठरा वर्षे रमले. शिरोड्याच्या गरीब गाबितांच्या घरातल्या मुलांना शिकवण्यासाठी धडपडणारे खांडेकर, शिकवताना विद्यार्थ्यांना उत्तम साहित्याची व सर्वच ज्ञानाची गोडी लावणारे खांडेकर, मास्टर विनायकसारख्या ध्येयवादी दिग्दर्शकासाठी ‘छाया’, ‘अमृत’ यांसारख्या पटकथा लिहिणारे खांडेकर- हे त्यांच्या जीवनाचे पैलू लक्षात घेतले म्हणजेच त्यांच्या साहित्याचे त्यांच्या जीवनाशी काय नाते होते, ते कळून येते. भाऊंचे वाचन, चिंतन कधी थांबले नाही. जगातील भोगवाद आणि स्वार्थीपणा कमी व्हावा, असे त्यांना सारखे वाटे. या विषयाच्या त्यांच्या सतत चाललेल्या चिंतनातूनच ‘ययाति’ ही कादंबरी लिहिली गेली. भाऊंनी स्वत:च्या कादंबऱ्यांना लिहिलेल्या प्रस्तावना म्हणजे त्यांचे प्रकट चिंतनच असे. साने गुरुजींच्या ‘आस्तिक’ या कादंबरीला भाऊंनी लिहिलेली प्रस्तावना वैशिष्ट्यपूर्ण आहे. भाऊंना अश्रूंचे सामर्थ्य माहीत होते आणि त्याचबरोबर अन्यायाच्या निर्भय प्रतिकाराचेही सामर्थ्य ते अचूक ओळखत होते. भाऊ एकदा मला म्हणाले, ‘‘शरीर थकले म्हणजे मन थकलेच पाहिजे, असे नाही. आपण कृती करू शकत नसलो तरी आपण सत्पक्षाच्या बाजूचे आहोत, अन्यायाचा निषेध करतो- हे समाजाला सतत कळले पाहिजे. अशा आपल्या मूक पाठिंब्यामुळेही समाजातील कार्यकर्त्यांना बळ लाभते.’’ भाऊंनी आयुष्यभर असे बळ अनेकांना दिले. भाऊंची सहृदयता असामान्य होती. उदात्त विचार व उत्कट भावना यांचा संगम भाऊंच्या जीवनात झाला होता आणि म्हणूनच ते अनेकांचे प्रेरणास्थान बनले. भाऊसाहेब खांडेकर ही महाराष्ट्राच्या समाजजीवनातील साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील सत्‌शक्ती होती.

गोवा सत्याग्रह चालू असताना 1955च्या मे महिन्यात मी गोव्याच्या सरहद्दीवर काम करीत होतो. त्या वेळी तेरेखोलच्या बाजूला गेलो असताना मी मुद्दाम शिरोडा येथे गेलो. भाऊंची ही कर्मभूमी पाहावी, असे फार दिवस माझ्या मनात होते. शिरोड्याला गेल्यावर भाऊ राहत असलेले घर आणि ते जेथे मुख्याध्यापक होते ते ट्युटोरिअल हायस्कूल मी पाहिले. तसेच ते डोंगरावर जेथे जाऊन बसत, ती जागा पाहिली आणि नंतर शिरोड्याच्या समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त फिरलो. सावंतवाडीहून भाऊ शिरोड्याला कसे आले, येथे त्यांची प्रतिभा कशी बहरली- हे सारे मला ठाऊक असल्यामुळे, शिरोड्यात फिरताना त्या साऱ्या घटना कशा, कुठे घडल्या असतील याचाच मी विचार करत होतो. पुण्याला परत जाताना मी कोल्हापूरला थांबलो होतो, तेव्हा मी भाऊंकडे गेलो आणि शिरोड्याला जाऊन आल्याचे सांगितले. मी भाऊंना म्हणालो, ‘‘गोव्याच्या लढ्यात सत्याग्रहींना भीषण मारहाण होत असताना आपण केवळ काठावर राहून सत्याग्रहींची देखभाल करतो, यामुळे मी फार अस्वस्थ आहे.’’ यावर भाऊ एकदम म्हणाले, ‘‘मला कल्पना आहे तुमच्या अस्वस्थतेची, कारण पंचवीस वर्षांपूर्वी मी याच अनुभवातून गेलो. शिरोड्याला 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह झाला, त्या वेळी शाळेच्या नोकरीत असल्यामुळे मीही केवळ सत्याग्रहींची देखभालच करीत होतो. आपण सत्याग्रह करू शकत नाही, यामुळे मी फार खिन्न होतो. मला अपराधी वाटत होते. नोकरीच्या साखळ्या फार जाचक असतात. हे जे तुम्हाला आता वाटते, तसेच मलाही तेव्हा वाटले.’’ मी म्हणालो, ‘‘तुम्ही आता त्या साखळ्यांतून मुक्त झालात. मी कधी होईन, कोण जाणे!’’ भाऊ म्हणाले, ‘‘प्रधान, आपण शेवटी प्रापंचिक माणसे. माझ्यावर तेव्हा कुटुंबाची जबाबदारी होती, तुमच्यावर आज तुमच्या म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी आहे. ही बंधने सांभाळीतच जितके करता येईल तितके करायचे.’’ माझ्या मनाची वेदना भाऊंनी जाणली. फुंकरही घातली. आमचा भावबंध अधिकच दृढ झाला.

पुढे दहा वर्षांनी मी नोकरी सोडून सर्व वेळ समाजवादी पक्षाचे काम करायला लागलो. त्यानंतर मी जेव्हा कोल्हापूरला गेलो, तेव्हा नेहमीप्रमाणेच भाऊसाहेबांना भेटायला गेलो. भाऊंची प्रकृती बरी नव्हती, पण त्यांचा उत्साह मात्र कायम होता. ते एकदम मला म्हणाले, ‘‘आता नोकरीच्या साखळ्यांतून मुक्त झाल्यामुळे तुम्हाला मनासारखे काम करता येईल.’’ मी भाऊंना म्हणालो, ‘‘माझा एक मित्र मला म्हणाला, तू खांडेकरांच्या साहित्यामुळे स्वप्नाळू बनला आहेस. राजकारण कठोर असते. तुझ्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होतील, तेव्हाच तू खांडेकरांपासून दूर होशील.’’ भाऊसाहेब मला थांबवत म्हणाले, ‘‘तुमच्या त्या मित्राला काही समजत नाही. तुम्ही कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना माझ्या प्रभावाखाली असणार. पण ज्या वेळी तुम्ही 42 च्या चळवळीत भाग घेतलात, तेव्हापासूनच तुमची स्वतंत्र वाटचाल सुरू झाली. तेच इष्ट होते. काही शिक्षक संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. पण विद्यार्थी वयाने मोठे झाले की, आपापला मार्ग शोधतात. जो-तो स्वत:च्या प्रवृत्तीप्रमाणे वागतो. संस्कारक्षम वयात तुम्हाला माझे साहित्य आवडले, पण स्वातंत्र्य चळवळीत पडण्याची प्रेरणा तुम्हाला भोवतालच्या परिस्थितीतूनही मिळाली असणार. 17-18 व्या वर्षी ध्येयवादी विद्यार्थी त्यांच्या आंतरिक प्रेरणेला बाहेरचे आधार शोधत असतात. तसा आधार तुम्हाला माझ्या साहित्यात सापडला असणार. पण खरे महत्त्व तुमच्या मनातील ऊर्मीलाच असते. तुमच्या वाटचालीचे श्रेय मी जर घ्यायला लागलो, तर ते चूक ठरेल. प्रत्येक जण आपापला मार्ग शोधत असतो. तुमच्या मित्राला तुम्ही सांगा की, खांडेकरांच्या स्वप्नाळू जगातून मी 42 मध्येच बाहेर पडलो आहे.’’ यावर मी म्हणालो, ‘‘आपले साहित्य केवळ स्वप्नाळू आहे, हे म्हणणेच मला मान्य नाही. आपल्या साहित्याचा आणि विचारांचा माझ्या मनावर फार खोल संस्कार झाला आहे. आता राजकारणात मी माझ्या विचारांप्रमाणे वाटचाल करत असतानाही तुमचे साहित्य माझ्या सदसद्‌विवेकबुद्धीची सतत राखण करील.’’ यावर भाऊ हसले आणि म्हणाले, ‘‘साहित्यनिर्मितीचा एक आनंद असतोच. पण त्याच्याइतकाच आनंद तुमच्यासारख्या वाचकांशी जो कायमचा स्नेह निर्माण होतो, त्यामुळे मिळतो.’’

भाऊसाहेब खांडेकर यांच्या कादंबऱ्यांवर माझा एक विद्यार्थी पीएच. डी.साठी प्रबंध लिहिणार होता. मी ही गोष्ट भाऊसाहेबांनी सांगितली आणि म्हणालो, ‘‘मी त्याला आपल्याला भेटायला सांगितले आहे.’’ भाऊ म्हणाले, ‘‘भेटण्यापूर्वी मी माझ्या कादंबऱ्यांना लिहिलेल्या प्रस्तावना त्याला काळजीपूर्वक वाचून यायला सांगा.’’ मी म्हणालो, ‘‘हे मी सांगेनच. आपल्या प्रस्तावनांमधून आपली वैचारिक भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे.’’ मला थांबवून भाऊ म्हणाले, ‘‘इतकेच नाही तर, काही कादंबऱ्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनांमध्येही फरक आहे. आपण जसे वयाने वाढतो, तसे स्वत:च्या लेखनाकडेही अधिक तटस्थपणे पाहू शकतो. जे आपल्या कादंबरीत पुरेसे व्यक्त झाले नाही, असे मला काही वर्षांनी वाटले; तो विचार मी प्रस्तावनेमध्ये अधिक स्पष्टपणे मांडला आहे.’’

भाऊसाहेबांनी लिहिलेल्या प्रस्तावना कुसुमाग्रजांनी संपादित केलेल्या असून त्या प्रस्तावनांना एक मार्मिक प्रस्तावना लिहिली आहे. मी हे श्री. पु. भागवतांजवळ बोललो असता ते म्हणाले, ‘‘या सर्व प्रस्तावनांचा सूक्ष्म अभ्यास केला, तर त्यातून एका लेखकाचे आत्मचरित्र आपल्याला दिसेल. भाऊसाहेब खांडेकरांच्या वैचारिक वाटचालीचा असा आलेख कोणी तरी लिहिला पाहिजे.’’ श्री. पु. भागवतांच्या अपेक्षेप्रमाणे कोणी तरी पुरुष अभ्यासकाने हे काम केले तर भाऊसाहेब खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश पडेल, असे मला वाटले.

भाऊंच्या बरोबरची संभाषणे- किंबहुना, भाऊंचे ते अखंड चालणारे बोलणे मला आजही आठवते. त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांचे प्रांजळ आत्मकथन, नवनवीन विचारांमुळे त्यांच्या वृत्तीत अक्षय टिकलेले चैतन्य यांच्यामुळे त्यांचा सहवास मला फार प्रिय असे. आगरकरांचे वर्णन भाऊसाहेब खांडेकरांनी ‘देव न मानणारा देवमाणूस’ असे केले होते. भाऊसाहेब खांडेकर हे माणसातल्या देवाची पूजा करणारे विचारशील लेखक होते. भाऊ गेले... पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा आणि विचारांचा सुगंध माझ्या मनात आजही दरवळत आहे.

- ग. प्र. प्रधान


वाचा माझ्या जीवनाचे शिल्पकार या प्रकरणातील इतर भाग : 

एस्‌. एम्‌. पाठीवर थाप मारून म्हणाले, ‘‘प्रधान, तू पास झालास!’’

नानासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच मी समाजवादी चळवळीत सतत काम करत राहिलो...

साने गुरुजींचे विचार माझ्या पिढीला मार्गदर्शक ठरले

आचार्य जावडेकरांच्या ज्ञानदीपावर अनेकांना आपल्या दिवट्या उजळता आल्या असत्या...


साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :

माझी वाटचाल 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत

लोकमान्य टिळक - पेपरबॅक  हार्डकवर

Tags: ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी माझी वाटचाल माझ्या जीवनाचे शिल्पकार पुस्तक व्यक्तिवेध ग. प्र. प्रधान वि. स. खांडेकर G.P. Pradhan Acharya Javdekar Majhi vatchal Majhya jivanache shilpkar V. S. Khandekar Load More Tags

Add Comment